19 Apr 2017

बेगम जान रिव्ह्यू...

बाईचं रक्त...
---------------

 
काही काही सिनेमे प्रेक्षकांकडून काही अधिकची अपेक्षा करतात. 'बेगम जान' हा श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमाही प्रेक्षकांकडून प्रगल्भ प्रतिसादाची अपेक्षा ठेवतो. 'बेगम जान' पाहताना काही तरी तुटल्याची जाणीव सदैव आतून हादरा देत राहते. किंबहुना अशी जाणीव होत राहावी या हेतूनेच सगळ्या सिनेमाची रचना केल्याचे दिसते. या सिनेमाला असलेली फाळणीची पार्श्वभूमी या तुटलेपणाची जाणीव आणखी अधोरेखित करत राहते. हा सिनेमा फाळणीवरचा नाहीच. तो बेगम जान या स्त्रीचा आहे, त्याचबरोबर यातल्या अम्माचा आहे, रुबिनाचा आहे, गुलाबोचा आहे, जमिलाचा आहे, लताचा आहे, अंबाचा आहे, मैनाचा आहे, राणीचा आहे.. अन् छोट्याशा शबनमचाही आहे... आणि सिनेमाच्या सुरुवातीला येणाऱ्या दृश्यातील २०१६ मधल्या दिल्लीतील बसमध्ये चार-पाच लांडग्यांच्या तावडीत सापडलेल्या आजच्या तरुणीचाही आहे...!
या सगळ्या बायका काही तरी सांगताहेत... रक्ताळून सांगताहेत, आक्रंदून सांगताहेत... छातीचा उभार आणि योनीच्या पोकळीपलीकडची 'बाई' कधीच न दिसणाऱ्या प्रचंड मोठ्या मानवी समूहासाठी फार कळकळीनं काही तरी सांगताहेत...
पहा... ती ऐंशी वर्षांची म्हातारी थंडपणे दिल्लीतल्या त्या लांडग्यांसमोर अंगातले सगळे कपडे उतरवतेय... तीच म्हातारी जेव्हा दहा वर्षांची मुलगी असते तेव्हा तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यासमोर आपल्या आईची अब्रू वाचवण्यासाठी हेच करत होती.... (अर्थात तेव्हा तिचं ते कृत्य पाहून पश्चात्ताप पावणारा पोलिस अधिकारी होता, आता काय होईल हे माहिती नाही!)... खुद्द बेगम जान राजाच्या मर्जीसाठी सर्वांत लहान मुलगी त्याच्यासाठी नैवेद्यासारखी पेश करताना, त्यानं ग्रामोफोन आणला नाहीय म्हणून स्वतः गाणं गायला बसते, तेव्हा आतडं पिळवटून टाकतेय... सुरजितचं प्रेम समजावून घेणारी रुबिना आपल्या छातीवर, खाली त्याचा हात ठेवून त्याला काही तरी फार थोर सांगतेय.... मास्टरवर प्रेम करणारी गुलाबो शेवटी त्याच्याकडूनही विकली जाते, तेव्हा दोन दांडग्यांच्या खाली जाताना काळीज हादरवणारी अस्फुट किंकाळी फोडतेय... लहान वयात कोठ्यावर आलेली शबनम शून्यात बघत असते अन् बेगम जानकडून सात-आठ लागोपाठ मुस्कटात खाल्ल्यावर जेव्हा फुटते, तेव्हा त्या दोघीही काही तरी सांगून जाताहेत... 'महिना याद मत दिलाओ साहब, हर बार आता है और लाल कर जाता है...' म्हणत मोजणी अधिकाऱ्याला घालवून देणारी बेगम जान आतून आतून बोलतेय... लाडक्या कुत्र्याचं मांस कुणी तरी जेवणात कालवून घालतं तेव्हा भडभडून उलटी करणारी बेगम जान सगळ्या देहातून काही तरी सांगतेय...
असं हे रक्तरंजित आक्रंदन आहे... कोठ्यावरच्या बायका आणि देशाची फाळणी हा तेव्हाच्या काळातील तुटलेपणाचा सर्वोच्च परिपाक मानायला हरकत नसावी. पण हा सिनेमा काळाचा संदर्भ सोडूनही काही सार्वकालिक भाष्य करतो, म्हणूनच तो वेगळा ठरतो. तो सांगतो, स्त्रीच्या आत्मभानाची गोष्ट! स्त्रीच्या देहाचा आदर करा, अशी शिकवण नकळत सदैव सांगत राहतो. झाशीच्या राणीपासून रजिया सुलतानपर्यंतच्या सर्व खंबीर स्त्रियांचे संदर्भ अम्माच्या गोष्टींच्या रूपानं सदैव समोर पेरत राहतो. हा सिनेमा केवळ प्रौढांसाठीचा आहे, पण तो केवळ वयानं नव्हे, तर अकलेनंही वाढ झालेल्यांनी पाहावा असाच आहे. याचं कारण यातल्या बायकांचं दुःख, वेदना समजावून घेण्यासाठी लागणारी कुवत किमान ३५-४० पावसाळे पाहिल्याशिवाय येणं कठीण आहे.
विद्या बालननं साकारलेली बेगम जान पाहणं हा खरोखर विलक्षण आनंद आहे. विद्याची अभिनयक्षमता जबरदस्त आहे, हे वाक्य आता लिहिण्याचीही गरज नाही. विद्या ही विद्या आहे आणि म्हणूनच 'बेगम जान' उभी आहे... अर्थात या सिनेमात बेगम जानची स्वतःची स्टोरी अजून यायला हवी होती, असं वाटत राहतं... पण तो फार मोठा दोष नव्हे. सिनेमाची भाषा टोकदार, थेट आहे. एकूणच प्रभाव गडद करण्यासाठी दिग्दर्शकानं भाषेपासून ते नेपथ्यापर्यंत आणि वेषभूषेपर्यंत सगळीकडं हे टोक गाठलं आहे. पण ते बहुतांश प्रभावीच ठरतं.
बाकी गौहर खान, पल्लवी शारदा या दोघींनीही खूप चांगलं काम केलं आहे. इला अरुण अम्माच्या भूमिकेत परफेक्ट. आशिष विद्यार्थी आणि रजत कपूर भारतीय व पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. त्यांचे हाफ क्लोजअप वगैरेची चर्चा भरपूर झाली असली, तरी तो प्रयोग एकूण ठीकच आहे. नसीरुद्दीन शाह राजाच्या छोट्याशा भूमिकेतही छाप पाडून जातात. त्यांचा मुद्राभिनय बघण्यासारखा... 
 या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आशा भोसलेंनी दीर्घ काळानंतर केलेलं पार्श्वगायन. 'प्रेम में तोहरे' हे आशाबाईंनी गायलेलं गाणं अप्रतिम. वयाच्या ८४ व्या वर्षीही आशाबाईंचा आवाज कसला भारी लागला आहे! बेगम जानच्या अनुभवी, मुरलेल्या स्त्रीत्वाला आशाबाईंखेरीज दुसऱ्या कोणाचा आवाज सूट होणार? या निवडीबद्दल दिग्दर्शकाला खरोखर दाद दिली पाहिजे. चित्रपट संपतो, तेव्हा 'वो सुबह कभी तो आएगी' हे 'फिर सुबह होगी' (१९५८) मधलं मूळ मुकेश व आशाबाईंनी गायलेलं गाणं श्रेया घोषाल अन् अरिजितच्या आवाजात ऐकायला मिळतं. या गाण्यानं शेवट करणं हाही दिग्दर्शकाचा मास्टरस्ट्रोक आहे. त्याला काय सांगायचं आहे, हे सगळं शेवटी त्यात येतं. 'हंसध्वनी'तल्या बासरीची सुरावट हुरहुर लावत असतानाच सिनेमा संपतो...
आपण सिनेमा संपल्यानंतर आधीचे राहिलेले नसतो. आपण स्त्री नावाच्या अथांग महासागराबाबतच्या किंचित अधिक जाणिवेनं समृद्ध झालेलो असतो...
बाईचं रक्त - मग ते कोणत्याही कारणानं का निघेना - तुम्हाला नव्यानं घडवतं, जोडतं हेच खरं...!

(ता. क. सिनेमात काही त्रुटी निश्चित आहेत. काहींना तो प्रचंड अंगावर येणाराही वाटू शकतो. काहींना विस्कळितपणा जाणवेल; पण तरीही त्याकडं थोडं दुर्लक्ष करून एकदा बघावा असा हा सिनेमा नक्कीच आहे.)

दर्जा - चार स्टार
---

6 comments:

  1. What a review!!! Damn good. Nicely described though a delicate topic.

    ReplyDelete
  2. Great review..Now it is a must watch for me

    ReplyDelete
  3. Very good review. It has evoked my interest in the movie. Earlier also these adpects have been handled although in a very subtle manner in movies like Umrao Jaan etc. But this one seems to hit bulls eye without any deception.

    ReplyDelete