माहीला पर्याय नाही...
--------------------
महेंद्रसिंह
धोनी म्हणजे एक अफाट व्यक्तिमत्त्व आहे. डोक्यावर बर्फाची लादी ठेवून
वावरणारा हा माणूस म्हणजे कमाल आहे. अशी वृत्ती स्वतःवर कमालीचा विश्वास
असल्याशिवाय अंगी येत नाही आणि स्वतःवर विश्वास असण्यासाठी भरपूर मेहनत
करावी लागते. धोनीकडं दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळंच तो फार न बोलता, जे
काही बोलायचंय ते बॅटद्वारे आणि यष्टींमागे उभं राहून बोलून दाखवतो.
सध्या
धोनी ३६ वर्षांचा आहे. म्हणजे क्रिकेटपटूंच्या दृष्टीनं करिअरच्या उताराचा
काळ. क्रिकेटची पुढची विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये होणार
आहे. तेव्हा धोनी ३८ वर्षांचा असेल. त्यामुळंच तो विश्वचषकाच्या संघात असेल
का, असावा की नसावा अशा काही चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये आणि
माध्यमांमध्येही सुरू झाल्या आहेत. पण श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या
एकदिवशीय मालिकेत धोनी सध्या ज्या तडफेनं खेळतोय ते पाहता विश्वचषकातही
'माहीला पर्याय नाही' असंच म्हणावंसं वाटतं. त्याची कारणं पाहू या...
एक
तर धोनीचा फिटनेस. धोनी शरीरानं, हाडापेरानं चांगलाच मजबूत आहे. रोज शेरभर
दूध पिऊन आणि तेवढाच घाम गाळून त्याचं शरीर कणखर झालं आहे. त्याच्या
हालचालींत कुठंही मंदपणा दिसत नाही. यष्टींमागं उभा असताना अजूनही तो बाइज
जाऊ देत नाही किंवा झेल सुटू देत नाही. यष्टिचीत करण्यामधलं त्याचं चापल्य
अजूनही वादातीत आहे. एक विराट कोहली सोडला, तर भारतीय संघातील
त्याच्यापेक्षा किती तरी तरुण खेळाडूंपेक्षाही धोनी फिटनेसच्या बाबतीत सरस
वाटतो. एकेरी धावा घेतानाची त्याची चपळाई बघण्यासारखी असते. महत्त्वाचं
म्हणजे कसोटी असो वा वन-डे, दोन्हीतले आंतरराष्ट्रीय संघ निवडताना आज कठोर
अशी फिटनेस चाचणी घेतली जाते. त्यात तुम्ही उत्तीर्ण झालात, तरच संघात
स्थान मिळतं. तिथं तुमची पूर्वपुण्याई काही कामाला येत नाही. तेव्हा धोनी
संघात आहे याचाच अर्थ ही कठोर अशी चाचणी तो दर वेळी उत्तीर्ण होतो आणि
स्वतःचा फिटनेस सिद्ध करतो!
दुसरा
मुद्दा म्हणजे धोनीचा नेतृत्वाचा अनुभव. गांगुलीच्या नेतृत्वाखाली
भारताच्या संघानं २००३ च्या विश्वचषकात उपविजेतेपद मिळवलं आणि त्यानंतर
भारतीय संघात काही फेरबदल झाले. तोपर्यंत भारतीय संघाला नियमित यष्टिरक्षकच
नव्हता. गांगुलीच्या पारखी नजरेनं धोनीमधली गुणवत्ता हेरली आणि त्याला
२००४ मध्ये भारतीय संघात आणलं. तेव्हापासून गेल्या एक तपाहून अधिक काळ माही
भारतीय संघाचा अविभाज्य भाग ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं
पहिली टी-२० स्पर्धा पाकिस्तानला हरवून जिंकली. त्यानंतर सर्वांत
महत्त्वाची कामगिरी म्हणजे २०११ मध्ये विश्वचषक जिंकला. भारतानं
आत्तापर्यंत दोनदाच विश्वचषक जिंकला आहे आणि कपिलदेवनंतर धोनीच अशी कामगिरी
करू शकला आहे, हे महत्त्वाचं! त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं
कसोटी क्रमवारीत २०१३ मध्ये पहिला क्रमांक पटकावला. याशिवाय गेल्या वर्ल्ड
कपमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारत उपांत्य फेरीपर्यंत एकही सामना
न गमावता पोचला होता. आतापर्यंत पाच-पाच विश्वचषक खेळणारे काही खेळाडू
होऊन गेले आहेत. धोनी २०१९ चा विश्वचषक खेळला, तर तो त्याचा चौथा विश्वचषक
असेल. त्यामुळं त्यानं खेळणं फार काही आश्चर्याची गोष्ट असणार नाही.
तिसरा
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धोनी कर्णधार असताना त्यानं बऱ्याच नव्या
खेळाडूंना संधी दिली. (काहींवर अन्यायही केला, हे खरंय!) अश्विन, जडेजा,
रोहित, धवन, रैनापासून ते अलीकडच्या हार्दिक पंड्या, बुमराहपर्यंत अनेक
खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली प्रथम खेळले. धोनीला सीनियर असलेले सगळे
खेळाडू एक तर निवृत्त झाले किंवा संघातून बाहेर फेकले गेले. सध्याचा
कर्णधार विराट कोहली यालाही धोनीविषयी आदर आहे. परवाच्या धोनीच्या
तीनशेव्या सामन्याच्या वेळी विराटनं 'तू आमचा कायमच कर्णधार असशील,' असे
उद्गार काढले होते. त्यामुळं या संघातल्या सर्व खेळाडूंचा खेळ धोनीला
चांगला माहिती आहे. त्यांच्यातल्या गुणांची, दोषांची त्याला नीट कल्पना
आहे. आता संघात सगळ्यांत सीनियर खेळाडू धोनीच आहे. त्याच्या शब्दावर
विश्वास ठेवणारे, त्याच्याकडून प्रेरणा घेत शिकलेले हे सगळे खेळाडू आहेत.
धोनी यष्टींमागे उभा राहून सदैव या सगळ्या खेळाडूंशी बोलत असतो. त्यांना
युक्तीच्या चार गोष्टी सांगत असतो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना
प्रोत्साहन देत असतो. त्याच्या उपस्थितीमुळं विराटवरचं बरंचसं दडपण कमी होत
असणार, यात शंका नाही.
चौथा
मुद्दा म्हणजे, धोनीची खेळाची समज आणि 'आउट ऑफ बॉक्स' विचार करण्याची
त्याची वृत्ती. परवा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिले दोन्ही बळी
धोनीच्या रिव्ह्यूमुळेच मिळाले, असं म्हणता येईल. खेळताना त्याचं चौफेर
लक्ष असतं आणि तो जेव्हा मैदानात असतो, तेव्हा शंभर टक्के 'काया-वाचा-मनेन'
संघासोबत मैदानात असतो. त्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो. तो कधीही
'स्लेजिंग' करताना दिसत नाही. त्याउलट आपल्या खेळाडूंशी सतत बोलून त्यांना
प्रेरणा देताना दिसतो. 'आउट ऑफ बॉक्स' विचार करण्याची त्याची वृत्ती
विश्वचषकासारख्या स्पर्धेत फार उपयोगाची असते. अत्यंत अटीतटीनं सगळे खेळत
असतात. गुणवत्ता सगळ्यांकडंच असते. अशा वेळी थंड डोक्यानं, वेगळा विचार
करून प्रतिस्पर्ध्याला नमविण्यासाठी धोनीसारखा खेळाडूच हवा. पहिल्या टी-२०
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माला शेवटचं षटक देण्याचा त्याचा
निर्णय असाच अफलातून होता. आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून अनेकदा
अश्विनला गोलंदाजीची सुरुवात करायला देणे किंवा फलंदाजीच्या क्रमवारीत बदल
करून स्वतः आघाडीवर लढणे (विश्वचषकाचा अंतिम सामना) अशा अनेक गोष्टी
माहीच्या वेगळ्या विचारांची साक्ष देतात. त्याच्या बहुतेक अशा निर्णयांचा
संघाला फायदाच झालेला दिसतो.
पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धोनीनं दोन वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आणि फक्त एक-दिवशीय व टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. धोनीला स्वतःला त्याचा खेळ वन-डे व टी-२० या प्रकारांसाठी अत्यंत अनुकूल वाटतो. पन्नास षटकांच्या सामन्यात तर घसरलेला डाव सावरण्याची कामगिरी त्यानं अनेक वेळा केली आहे. अगदी सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मागच्या तिन्ही सामन्यांत धोनीनं नुसती ही डाव सावरण्याची कामगिरी केलीय असं नाही, तर सामने जिंकूनही दिले आहेत. त्याच्या केवळ समोर असण्यानं भुवनेश्वरसारख्या गोलंदाजालाही उत्कृष्ट फलंदाजी करण्याची प्रेरणा मिळते आणि तो अर्धशतक ठोकून सामना जिंकून देतो. धोनीला जगातला 'सर्वोत्कृष्ट फिनिशर' असं म्हणतात ते उगीच नाही. सहाव्या-सातव्या क्रमांकावर खेळायला येऊनही केवळ तीनशे सामन्यांत त्यानं साडेनऊ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या मनगटातला जोर आणि ताकद यामुळं जगातल्या कुठल्याही मैदानावर, कुठल्याही गोलंदाजाला मैदानाबाहेर भिरकावण्याची त्याची क्षमता कोणीही नाकारू शकत नाही.
पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धोनीनं दोन वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आणि फक्त एक-दिवशीय व टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. धोनीला स्वतःला त्याचा खेळ वन-डे व टी-२० या प्रकारांसाठी अत्यंत अनुकूल वाटतो. पन्नास षटकांच्या सामन्यात तर घसरलेला डाव सावरण्याची कामगिरी त्यानं अनेक वेळा केली आहे. अगदी सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मागच्या तिन्ही सामन्यांत धोनीनं नुसती ही डाव सावरण्याची कामगिरी केलीय असं नाही, तर सामने जिंकूनही दिले आहेत. त्याच्या केवळ समोर असण्यानं भुवनेश्वरसारख्या गोलंदाजालाही उत्कृष्ट फलंदाजी करण्याची प्रेरणा मिळते आणि तो अर्धशतक ठोकून सामना जिंकून देतो. धोनीला जगातला 'सर्वोत्कृष्ट फिनिशर' असं म्हणतात ते उगीच नाही. सहाव्या-सातव्या क्रमांकावर खेळायला येऊनही केवळ तीनशे सामन्यांत त्यानं साडेनऊ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या मनगटातला जोर आणि ताकद यामुळं जगातल्या कुठल्याही मैदानावर, कुठल्याही गोलंदाजाला मैदानाबाहेर भिरकावण्याची त्याची क्षमता कोणीही नाकारू शकत नाही.
सहावा
थोडा भावनात्मक मुद्दा... २०११ च्या विश्वचषकात सगळे खेळाडू सचिनसाठी
विश्वचषक जिंकूनच द्यायचा, या भावनेनं फार प्रेरित होऊन खेळले. या
खेळाडूंमध्ये धोनी आणि विराटही होते. आता धोनीलाही असाच गोड निरोप देण्याची
जबाबदारी विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आली आहे. अशी काही तरी
अंतःप्रेरणा असेल तर सगळ्यांचीच कामगिरी अंमळ सुधारते, असा अनुभव आहे. या
प्रेरणेतून भारतीय संघ खेळला आणि त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा विश्वचषक
जिंकून माहीला 'अलविदा' म्हटलं तर धोनीसारखा नशीबवान आणि सुदैवी खेळाडू
दुसरा कोणी नसेल. गेल्या १३ वर्षांत त्यानं भारतीय संघासाठी केलेल्या
कामगिरीसाठी... 'इतना गिफ्ट तो बनता ही है बॉस'!
------
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे : ३ सप्टेंबर २०१७)
----
No comments:
Post a Comment