22 Sept 2017

न्यूटन रिव्ह्यू

'मत' में है विश्वास...
-----------------


SPOILER AHEAD
---------------------

न्यूटन या शीर्षकाचा हिंदी सिनेमा येतो आहे, म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर ज्या काही कल्पना येतात, त्यांना छेद देणारा असा हा सिनेमा आहे, हे आधी सांगितलं पाहिजे. आपल्याला एकच न्यूटन माहिती... अॅपलवाला... या सिनेमाचा नायक मात्र सरकारी नोकरी करणारा साधा माणूस आहे. भौतिकशास्त्रात एम. एस्सी. केलेला आहे, एवढाच काय तो त्याचा आणि न्यूटनचा संबंध. त्याचं नाव खरं तर नूतनकुमार असं आहे. पण शाळेत या नावावरून मुलं चिडवायची म्हणून त्यानं दहावीच्या फॉर्मवर स्वतःचं नाव 'न्यूटन' असं लिहून, बदलून टाकलं. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या  या न्यूटनची (राजकुमार राव) स्वतःची म्हणून काही तत्त्वं आहेत. त्याचे पारंपरिक वळणाचे आई-वडील एक सोळा वर्षांची मुलगी त्याला दाखवायला नेतात, तेव्हा ती अल्पवयीन आहे म्हणून तो नकार देऊन निघून येतो. कामात तो अतिशय शिस्तीचा आहे, वेळ पाळणारा आहे. अशा या न्यूटनवर सरकारी कर्मचारी म्हणून निवडणुकीची ड्यूटी करण्याची वेळ येते. तसा तो राखीव कर्मचाऱ्यांमध्ये असतो, पण छत्तीसगडमधील एका अतिशय दुर्गम व माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात एका निवडणूक केंद्रावर जाण्याची वेळ त्याच्यावर येते. त्याच्याबरोबर दोन कर्मचारी सहकारी म्हणून येतात आणि एक स्थानिक तरुणी ब्लॉक ऑफिसर म्हणून यायची असते. निवडणूक केंद्र असलेलं ठिकाण इतकं दुर्गम असतं, की त्यांना हेलिकॉप्टरमधून त्या ठिकाणी नेलं जातं. दोघा सहकाऱ्यांपैकी एक जण लोकनाथ (रघुवीर यादव) म्हणून असतात, ते निवृत्तीला आलेले असतात आणि केवळ नाइलाज म्हणून या कामावर आलेले असतात. दुसरा असतो, तो केवळ हेलिकॉप्टरमधे बसायला मिळावं म्हणून आलेला असतो. या मतदान केंद्रावर केवळ ७६ आदिवासींचं मतदान असतं. त्या केंद्रावर जाण्याआधी रात्री या तिघांना निमलष्करी दलाच्या कॅम्पवर नेलं जातं. तिथं त्यांची गाठ तिथल्या आत्मासिंह या अधिकाऱ्याशी (पंकज त्रिपाठी) पडते. हा अधिकारी या परिसरात चांगलाच मुरलेला असतो. त्याला न्यूटन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम भराभर संपवून निघून जावं, असं वाटत असतं. सुरुवातीला तर तो कॅम्पमधूनच त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न करतो; पण न्यूटनच्या खमकेपणापुढं त्याचं काही चालत नाही आणि अखेर या सर्वांना आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या निवडणूक केंद्रापर्यंत चालत जावं लागतं. तिथं गेल्यावर या सर्वांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, आदिवासी मतदान करायला येतात की नाही, लष्करी अधिकारी नक्की काय करतो, राज्याचे पोलिस महानिरीक्षक आंतरराष्ट्रीय पत्रकार महिलेला घेऊन तिथं भेट द्यायला येतात तेव्हा काय होतं हे सगळं पडद्यावरच पाहायला हवं.
अमित मसूरकर या दिग्दर्शकाचा हा दुसराच सिनेमा. मात्र, या दिग्दर्शकानं एवढं अप्रतिम काम या सिनेमात केलंय, की 'हॅट्स ऑफ' असं म्हणावंसं वाटतं. (या सिनेमाची भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून कालच निवड झाली, त्यावरून सिनेमाची एकूण गुणवत्ताही सिद्ध झाली. एरवी प्रायोगिकच वाटेल, अशा या सिनेमाला मुख्य प्रवाहात मिळालेलं स्थान आणि मिळणारा प्रतिसाद आशादायी आहे.)
भारतातील लोकसभा निवडणूक आणि त्यानिमित्त वापरली जाणारी जगड्व्याळ यंत्रणा हा आपल्याच नव्हे, तर साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय आहे. देशाच्या अगदी दूरवरच्या, दऱ्याखोऱ्यांतल्या, जंगलातल्या दुर्गम केंद्रांमध्ये निवडणूक कर्मचारी जातात आणि मतदान पार पाडतात, हा देशवासीयांसाठी आणि माध्यमांसाठी कायमच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. दर निवडणुकीच्या वेळी याच्या बातम्याही येतात. छत्तीसगडमधील माओवादी/नक्षलग्रस्त भागांत तर खरोखर स्थानिक विरोध डावलून अशी निवडणूक घेणं किती अवघड आहे, याची कल्पना सर्वांनाच आहे. याच विषयावर हा संपूर्ण सिनेमा केंद्रित आहे. असा विषय निवडल्याबद्दल आणि त्याचा उत्तम अंमल केल्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन केलं पाहिजे.
या सिनेमाची सुरुवात होते ती छत्तीसगडमधल्या एक स्थानिक नेत्याच्या प्रचाराने. नंतर हा नेता जंगल भागातून जात असताना नक्षलवादी त्याची गाडी अडवतात आणि सरळ गोळ्या घालून त्याला ठार मारतात. या प्रसंगातून सिनेमाचा एकूण टोन सेट होतो. त्यानंतर आपल्या नायकाचं घर दिसतं. त्याचे मध्यमवर्गीय आई-वडील दिसतात, त्याचा मुलगी पाहण्याचा व तिथून परततानाचा बसमधला प्रसंग आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व समोर येतं. त्यानंतर फार वेळ न घालवता सिनेमा थेट मुख्य कथाविषयाकडं येतो. छोट्या छोट्या प्रसंगमालिकेतून दिग्दर्शक आपल्याला मुख्य घटनाक्रमाकडं कसा घेऊन जातो आणि त्या दृष्टीनं प्रसंगांची केलेली रचना पाहण्यासारखी आहे. अगदी एखाद-दुसऱ्या दृश्यामधून संबंधित घटनेतील पात्राचं व्यक्तिमत्त्व प्रस्थापित करण्याचं त्याचं कौशल्य दाद देण्यासारखं आहे. पंकज त्रिपाठीनं रंगवलेला आत्मासिंह स्वभावानं नक्की कसा आहे, हे त्याच्या पहिल्याच अंड्याच्या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं. तीच गोष्ट रघुवीर यादव यांनी साकारलेल्या लोकनाथची आणि अंजली पाटीलनं उभ्या केलेल्या मलकोची. अंजली पाटीलची मलको ही स्थानिक तरुणी तर खरोखर तिथलीच असावी, असं वाटावं एवढ्या ऑथेंटिसिटीनं तिनं ती रंगविली आहे. कथानक एकदा जंगलात शिरल्यानंतर बदललेल्या गडद रंगाचं अस्तित्व अंगावर येतं; तसंच मोडकळीस आलेल्या शाळेच्या खोलीचं नेपथ्यही जमून आलेलं आहे. याशिवाय प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी न्यूटनचं कमालीचं निग्रही राहणं आणि इतरांचे त्यानुरूप बदलत गेलेले प्रतिसाद हा सर्व प्रकार सिनेमाची उंची वाढवायला मदत करतो.
यातून न्यूटनचं काहीसं विक्षिप्त, पण अंतर्यामी कणखर व सच्चं व्यक्तिमत्त्व दिग्दर्शक आपल्यासमोर उभं करतो. त्यातून हळूहळू जाणवत जातं, की हा न्यूटन म्हणजे अशा अनेक लाखो भारतीयांचाच प्रतिनिधी आहे. कायद्याचं पालन करून आपलं कर्तव्य बजावण्यातील त्याची असोशी कित्येक जणांच्या अंगात असते. देशाच्या कानाकोपऱ्यात असे कित्येक 'न्यूटन' शांतपणे आपलं काम करत असतात. त्यांच्यामुळं ही सगळी व्यवस्था नीट सुरू असते. अशा सर्व लोकांना हा सिनेमा म्हणजे आपलीच कहाणी वाटेल. निवडणूक केंद्रावर जाण्यासाठी न्यूटन मोबाइलमधला गजर लावून पहाटे उठतो, तिथपासून शेवटी मतदान तीन वाजता संपायला दोन मिनिटं असतात, तर तेवढा वेळ झाल्यावरच पेपरवर सही करण्यापर्यंत न्यूटनची कर्तव्यदक्षता दिग्दर्शकानं अनेक प्रसंगांत टिपली आहे. आपण एका निवडणूक केंद्राचे केंद्राधिकारी आहोत; म्हणजेच थोडक्यात आत्ता आपण सरकार आहोत, या जबाबदारीच्या भावनेतून न्यूटन एक क्षणही विचलित होत नाही. त्यामुळंच तो कित्येकदा जीव धोक्यात घालतो, त्या लष्करी अधिकाऱ्याशीही कैकदा पंगा घेतो. सोबत असलेल्या त्या तरुणीचीही त्याला भाषा समजण्यासाठी मदत होते. तिला सुरक्षितपणे घरी जाता यावं यासाठी तो धडपडतो. अशा अनेक बारीकसारीक गोष्टींमधून न्यूटनची कर्तव्यनिष्ठता दिग्दर्शक लखलखीतपणे आपल्यासमोर आणतो. आपणही आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतून आपली कामाप्रती किंवा देशाप्रती असलेली निष्ठा व्यक्त करत असतो. त्यामुळंच 'न्यूटन'चं ते वागणं आपल्याला अगदी आपलंसं वाटतं.
​ राजकुमार राव यानं रंगवलेला 'न्यूटन' पाहण्यासारखा आहे. हा अभिनेता दिवसेंदिवस फॉर्मात येत चालला आहे. या वर्षातला हा त्याचा तिसरा जबरदस्त चित्रपट. तिन्हीतली कामे वेगवेगळी आणि उत्कृष्ट! साधासरळ चेहरा ठेवून सर्व प्रकारचे भाव व्यक्त करण्याची त्याची खासियत जबरदस्त आहे. तीच गोष्ट पंकज त्रिपाठीची. हा अभिनेताही सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. यात त्याला नेहमीपेक्षा वेगळा, लष्करी अधिकाऱ्याचा रोल मिळाला आहे. तो त्यानं जोरदार केला आहे. रघुवीर यादव, अंजली पाटील यांची साथ मोलाची... मोजक्या प्रसंगांत संजय मिश्रासारखा कलावंत छाप पाडून जातो.
थोडक्यात, 'न्यूटन'सारखे सिनेमे आपल्याला स्वतःवरचा विश्वास आणखी भक्कम करण्यास मदत करतात. त्यामुळं ते पाहायला पर्याय नाही.
---
दर्जा - साडेचार स्टार
---

No comments:

Post a Comment