7 Oct 2017

कासव - रिव्ह्यू

मना, तुझे मनोगत...
-----------------------


माणसाचं मन ही एक अजब गोष्ट आहे. या मनाचा थांग आपला आपल्यालाच कैकदा लागत नाही, तिथं तो इतरांना लागावा ही अपेक्षा करणं व्यर्थच. मग हे मन जेव्हा काही कारणानं भरकटतं किंवा इतरांच्या लेखी वेड्यासारखं वागू लागतं, तेव्हा त्याला समजून कोण घेणार? आपल्यालाच या वेड्या मनाला आवरावं लागतं, सावरावं लागतं.
सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा 'कासव' हा नवा चित्रपट पाहताना आपल्याला सारखा याचा प्रत्यय येत राहतो. काही कारणांनी आपलं मन अनेकदा निराशेच्या खोल गर्तेत जातं. काही म्हणता काही करावंसं वाटत नाही. मन आजारी आहे हे इतरांना कळत नाही. ही अस्वस्थता मग वाढतच जाते आणि मग जीव देण्याइतकं टोकाचं काही तरी करावंसं वाटू लागतं. अशा वेळी ज्यांच्या आधाराची सर्वाधिक गरज असते, तेच लोक पाठ फिरवतात. सगळं जगणं विस्कटून जातं. दोरी तुटलेल्या पतंगासारखं भिरभिरणं नशिबात येतं. या नाजूक अवस्थेवर इलाजही तसाच नाजूकपणे करावा लागतो. हलक्या, रेशमी हातांनी हा गुंता सोडवावा लागतो. अशा वेळी शांतपणे सगळी परिस्थिती हाताळावी लागते. समुद्रात राहणारं कासव मग इथं प्रतीकरूपानं समोर येतं. परिस्थिती विपरीत असेल तेव्हा हे कासव स्वतःला आक्रसून घेतं. आपल्याच कोशात जातं. माणसालाही असंच स्वतःला वेळ देण्याची गरज भासते.
या कथेतील मानवला (आलोक राजवाडे) अशीच स्वतःला वेळ द्यायची गरज असते. त्याच्या या नाजूक स्थितीला समजून घेणारी जानकी (इरावती हर्षे) त्याला योगायोगानं भेटते. ती स्वतः अशा मनोवस्थेतून गेलेली असते. त्यामुळे मानवची ओळखही नसताना ती त्याला आपल्यासोबत घेऊन येते. कोकणातील गावात दत्ताभाऊ (डॉ. मोहन आगाशे) यांच्यासोबत कासव संवर्धन केंद्रात ती काम करत असते. या शांत गावात, समुद्राच्या सान्निध्यात मानव स्वतःला हळूहळू कसा सापडत जातो, याची ही गोष्ट आहे. जानकीच्या सोबत असलेला ड्रायव्हर यदू (किशोर कदम) आणि त्या गावातील एसटी स्टँडवर काम करणारा पोऱ्या अशी आणखी दोन महत्त्वाची पात्रं कथेत येतात. मानवचा भूतकाळ कळण्यासाठी त्याच्या सावत्र आईचं (देविका दफ्तरदार) पात्रही येऊन जातं. कोकणातलं गाव असल्यानं दशावतारी नाटक मंडळी आणि त्यातला अश्वत्थाम्याचा सूचक संदर्भही येतो.
बहुतेक माणसांच्या आयुष्यात येणारं अटळ नैराश्य हा सिनेमाचा विषय असल्यामुळं त्याला संवेदनशील हाताळणीची गरज होती. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा आता अशा प्रकारच्या चित्रपटांत हातखंडा झाला आहे. सातत्यानं अशा प्रकारच्या गंभीर चित्रपटांची निर्मिती करणं ही सोपी गोष्ट नाही. हा सिनेमाही त्यांनी अशाच संवेदनशीलतेनं हाताळला आहे. या सिनेमाची लय संथ आहे. अत्यंत सावकाश, वेळ देऊन तो आपल्याला स्वतःमध्ये मुरवावा लागतो. माणसाचं अस्थिर, बेचैन मन आणि ते दुरुस्त होण्यासाठी करायचे उपाय यांची अत्यंत तरल अशी मांडणी या सिनेमात येते. यात मानवला भेटलेली जानकी स्वतः तशी संवेदनशील आहे. ती मानवला समजून घेऊ शकते. त्याला सावरण्यासाठी वेळ द्यावा लागेल, हे तिला समजतं. ही कलाकृती पाहणाऱ्या प्रेक्षकांकडूनही तशाच संवेदनशीलतेची अपेक्षा आहे.

सिनेमा मुख्यत्वे घडतो तो मानव आणि जानकी यांच्या संदर्भात. त्या दोघांचे मनोव्यापार तपशिलानं आले आहेत. मानवचं अत्यंत अस्थिर असणं आणि अशा स्थितीतून गेलेल्या जानकीचं त्या अनुभवातून आलेलं शहाणपण आणि शांतपण असा विरोधाभास सातत्यानं समोर येत राहतो. या मनोव्यापाराला ऑलिव्ह रिडले कासवांच्या अनोख्या जीवनक्रमाची जोड येते. अत्यंत शांतपणे, सावकाश हा चित्रपट आपल्याला नैराश्याची हळवी कथा सांगतो आणि मनाच्या आजारावरचे उपायही सांगतो.
आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे या दोघांनीही अप्रतिम काम केलं आहे. किशोर कदम नेहमीच सुंदर काम करतात. या सिनेमातही त्यांनी यदूची भूमिका अशीच जीव ओतून केली आहे. चित्रपटात शांत क्षण अनेक आहेत. धनंजय कुलकर्णी यांचा कॅमेरा आणि संकेत कानेटकर यांच्या संगीताने या जागा सुरेखरीत्या भरून काढल्या आहेत.
सध्या आपण अनावश्यक गोंगाटात जगत आहोत. अशा वेळी बधिर झालेल्या आपल्या शरीराला आपल्या मनाचं काहीच ऐकू येत नाही. मनाचं ऐकण्याची सध्या फार गरज आहे. त्याला बरं नसेल तर त्याच्याकडं बघण्याची, त्याला गोंजारण्याची आवश्यकता आहे. आपण 'ससा' झालो आहोत; आता कासव व्हायला हवं, असं हा सिनेमा सांगतो... खरंय, 'कासव' झालो तरच जगण्याची ही शर्यत जिंकू शकू...!
----
दर्जा : चार स्टार
----

1 comment: