22 Feb 2021

समदा दिवाळी अंक २०२० लेख

 अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा २.०

-----------------------------------

आमचं गावाकडचं जुनं धाब्याचं घर आहे... सलग सात खणांचं... त्यातल्या एका कोपऱ्यात स्वयंपाकघराचा उंचवटा आहे... त्या उंचवट्याच्या कोपऱ्यात चूल आणि वैल आहे. चूल धडाडून पेटली आहे. त्यावर तापलेला तवा आहे. मी त्या उंचवट्याच्या खाली ताट समोर घेऊन बसलो आहे. माझी आजी त्या चुलीशेजारी हातात फुंकणी घेऊन चुलीत फूंक मारते आहे. चुलीतल्या धुरामुळं तिचे डोळे तर चुरचुरताहेतच, पण मलाही एवढ्या लांब ती धग लागते आहे... पण पोटातली भुकेची धग त्याहून मोठी आहे... म्हणून मी दटून तिथंच बसलो आहे... मग तव्यावरची गरमागरम भाकरी पुढच्या मिनिटाला माझ्या ताटात येते आहे आणि ताटातल्या ताकातल्या पिठल्यासोबत मी ती पेढ्यासारखी अत्यंत रुचकर भाकरी खातो आहे...

आजी आणि आईच्या हातचं जेवण हा विषय प्रत्येकालाच प्रिय असा! आपला शब्दश: पिंड ज्यावर पोसला आहे असं हे खाण्याचं नातं... या दोघींशी जसा आपला रक्ताचा संबंध असतो, तसा आणि तितकाच लहान आतड्याचा, मोठ्या आतड्याचा, जठराचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, स्वादुपिंडाचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जिभेचाही संबंध असतो. शेतात पडलेलं बीज आणि त्यातून वर आलेल्या धान्याच्या कोंभाइतकंच हे नातं जैव असतं... त्यामुळंच बालपणीच्या या दोघींशी संबंधित सगळ्या आठवणी त्यांच्या हातून खाल्लेल्या पदार्थांच्याच जास्त आहेत. बायकोच्या हातच्या पदार्थांना आईच्या हातची चव येत नाही आणि आईच्या हाताला ती चव यायला आजीच्या हाताखाली अनेक वर्षं उमेदवारी करावी लागते, असं आपल्याकडं म्हणतात त्यामागं हेच कारण असावं. वर्षानुवर्षं हाताला चटके सोसत या माउल्यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवले. त्याची सर आता कशाला येणं शक्य नाही...

आमच्या आजीचं नाव काशीबाई. ती माहेरची देशमुख. जामखेडच्या गढीवरच्या देशमुखांचं तालेवार माहेर. त्यामुळं तिच्या अंगात तो ‘देशमुखी’ तोरा शेवटपर्यंत होता. आमचं गाव तसं दुष्काळी! बऱ्याच गोष्टींचा अभाव... पण या जामखेडच्या मातीत ज्वारी उत्कृष्ट दर्जाची पिकते. आमच्या शेतातून घरी ज्वारी यायची आणि आमच्या बाहेरच्या घरात निम्म्या भागात पोती ओतली जायची. शेजारी आधाराला उरलेली पोती लावली जायची. आम्ही भावंडं त्या पोत्यावर चढून त्या ज्वारीत उड्या मारायचो. ज्वारीत खेळून खेळून पाय पांढरेफटक व्हायचे. ‘अन्नधान्याने घर भरू दे,’ ही म्हण आमच्या घरात शब्दश: मूर्त व्हायची. अर्थात ज्वारी घरातली खूप असली, तरी आमच्या रोजच्या जेवणात भाकरी नसायची. पोळी, भाजी, कोशिंबिरी, चटण्या, भात आणि वरण असाच सर्वसाधारण घरांत असतो, तसा रोजचा मेनू असायचा. 

आमच्या आजीमधली सुगरण खऱ्या अर्थानं दिसायची ती सणावाराला. तेव्हा तिचा कडक सोवळ्यात स्वयंपाक असायचा. होळी, श्रावणातले चारही शुक्रवार, पोळा, नवरात्र, दसरा, खंडोबाचं नवरात्र हे प्रमुख सण घरात साजरे व्हायचे. त्यात दोन्ही नवरात्रांत आणि श्रावणात कुळधर्म, कुळाचार चाले. श्रावणातल्या चारही शुक्रवारी घरात पुरणावरणाचा ज्याचा ‘चारी ठाव’ म्हणतात तसा स्वयंपाक असायचा. माझी आजी तिच्या साठीपर्यंत सगळा स्वयंपाक एकहाती करायची. नंतर सुना आल्यावर तिनं फक्त पुरणपोळ्यांचं काम स्वत:कडं घेतलं आणि बाकी स्वयंपाक माझी आई व काकू मिळून करू लागल्या. ती सवाष्ण बारा वाजता जेवायला यायच्या आत हा सगळा स्वयंपाक तयार असायचा. त्यासाठी या बायका पहाटेच उठून कामाला लागायच्या. पुरणाचा घाट मोठा असायचा. मी जरा मोठा झाल्यावर कधी कधी पुरणयंत्रांतून पुरण हाटण्याचं काम मला मिळे. पण हे खूप नंतर! त्यापूर्वी आजी पाटा-वरवंट्यावरच पुरण घालत असे. मात्र, आजीची पुरणपोळी कमाल असायची. अगदी रेशमासारखी नाजूक, नेमकी गोड आणि अजिबात पुरण बाहेर न सांडणारी अशी बांधीव पोळी आजी करायची. तांबूस, लालसर रंगाची ती पोळी वरून साजूक तूप घातल्यावर आणखीनच देखणी दिसायची. तिचा पहिला घास तोंडात गेला, की चटका बसायचाच. पण तो चटका सोसत सोसत ती पोळी घशाखाली उतरवण्याच्या आनंदाला ‘स्वर्गीय’ एवढा एकच शब्द मला सुचतो. खरं सांगायचं, तर त्या लहान वयात या अन्नपदार्थांचं मोल आम्हाला कितपत कळलं होतं कोण जाणे. तो दर्जा आम्ही जणू गृहीतच धरला होता. नंतर आयुष्यात घराबाहेर पडायची, होस्टेलवर राहण्याची, मेसमधला गार डबा खाण्याची वेळ आली, तेव्हा डोळे खाडकन उघडले. आजी आपल्याला काय उत्तम दर्जाचं जेवण करून खायला घालत होती, हे समजलं. आजीसारखीच तिची मोठी मुलगी, म्हणजे माझी थोरली आत्या सुगरण होती. अक्षरश: अन्नपूर्णाच ती! तिच्या हाताला जी चव होती, त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. कुठलाही पदार्थ सांगा, तिला तो जमत नाही किंवा तिचा तो बिघडलाय, हे मी कधीच पाहिलेलं नाही. या माझ्या आत्यानंही आमच्या जिभेचे भरपूर चोचले पुरवले. वास्तविक पुरणपोळी खावी तर माझ्या आजीच्या हातचीच! (हे प्रत्येक जण म्हणत असतो, हे मला ठाऊक आहे आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत तेवढंच खरं आहे. याचं कारण आपल्यावर लहानपणी त्या खाण्याचा झालेला संस्कार!) पण खरोखरच आमच्या आजीची पुरणपोळी रेशमासारखी असायची. त्या काळातल्या बहुतेक बायका अशाच सुगरण असायच्या. पण प्रत्येकीच्या हातची चव वेगळी! आमच्या आत्यानं तिच्या आईचा हा गुण केवळ उचललाच होता असं नाही तर तिनं त्या गुणाचा भरपूर विस्तारही केला. माझे आजी-आजोबा शिरूरला अनेक वर्षं राहिले. आत्या ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. तिचं लग्न पुण्यात मकाशीर कुटुंबात झालं आणि ती पुणेकर झाली. आधी कसबा गणपतीजवळ आणि नंतर साततोटी हौदाजवळ फुलंब्रीकर वाड्यात तिनं अनेक वर्षं संसार केला. वाड्यातली खोली होती दहा बाय दहाची... आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गावावरून तिच्याकडं यायचो आणि आठ-आठ दिवस मुक्काम ठोकायचो. आत्या, तिचे यजमान, माझी दोन्ही आत्येभावंडं यांनी कधीही पाहुणे आले म्हणून कुरकुर केल्याचं मला आठवत नाही. उलट त्या वाडासंस्कृतीची मला लहानपणीच (पुण्यात राहत नसूनही) ओळख झाली. त्या छोट्याशा खोलीत आत्याचा संसार आणि तिचा सुगरणीच्या वरताण स्वयंपाक चालायचा. 

आम्ही देशस्थ आणि त्यात गावाकडचे! आमच्याकडं तळणीच्या मोदकांची पद्धत! उकडीचा मोदक हा पदार्थ मी सर्वप्रथम खाल्ला तो या आत्याच्या हातून... तिच्या हातचे उकडीचे मोदक कधीही बिघडले नाहीत. उलट, तिच्यासारखे उत्कृष्ट मोदक मी आजतागायत कुणाचेच खाल्ले नाहीयेत. मी नंतर पुण्यात शिकायला आलो, तरी सणावाराचं माझं गोडधोड खाणं आत्यानं कधी चुकू दिलं नाही. मी जेवायला आपला कायम त्यांच्याकडे! ती गरमागरम उकडीचे मोदक वाढायची, तुपाची धार सोडायची... बाकी काही खाऊ नकोस; फक्त मोदक खा, म्हणायची. मी वेड्यासारखा एखादा मोदक शेवटी खायचो. बाकी भाजी-पोळी खात बसायचो. जेव्हा आपल्याला मिळत असतं, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते, हेच खरं. माझी ही आत्या दहा वर्षांपूर्वी कर्करोगानं गेली. तिला अन्ननलिकेचा कर्करोग झाला होता. तिला शेवटी शेवटी एक घासही खाता यायचा नाही. आयुष्यभर दुसऱ्याला खाऊ घालण्यात आनंद मानणाऱ्या माझ्या या ‘मोठ्या आई’ला शेवटी शेवटी काहीही खाता येत नव्हतं... तिला अन्नच घेता येत नव्हतं... दैवानं केलेला यापेक्षा क्रूर विनोद माझ्या पाहण्यात नाही! 

आजी आणि मोठ्या आत्याच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईच्या हातचा स्वयंपाकही असाच उत्कृष्ट असतो. आईचं माहेर मराठवाड्यातलं. त्यामुळं तिच्या आईच्या हातचे मराठवाडी पदार्थ ती सहज करते. त्यात एसर आमटी किंवा शेंगोळ्यांसारखे पदार्थ तिचे खास फेव्हरिट. आईचा असाच एक पेटंट पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. आईच्या हातून ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्लाय त्यांनी कायमच तिच्याकडं वारंवार त्या खिरीची फर्माईश केलीय. आईचा कधीही न बिघडणारा आणखी एक पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या. खरं तर आईचा कोकणाशी काहीही संबंध नाही. मात्र, तिच्या सर्व जमणाऱ्या पदार्थांमध्ये नारळाचा समावेश असतो. गव्हाच्या खिरीतही त्या नारळाचं दूध लागतंच. माझ्या लहानपणी आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो. आजी-आजोबा, माझी धाकटी आत्या (तिचं लग्न होईपर्यंत), माझा काका, नंतर काकू आणि आम्ही एकूण सहा भावंडं... आई प्रत्येकाची आवड-निवड जपत स्वयंपाक करायची. आत्याला लसूण चालायचा नाही. मग तिची भाजी वेगळी... बाकीच्यांची वेगळी. काकाला दही-साखर जेवणात आवडायचं. मग आवर्जून त्याच्यासाठी ती वेगळी दही-साखरेची वाटी काढून ठेवायची... (यावरून एक आठवलं. मला लहानपणी एक विचित्र म्हणावी अशी सवय होती. मला मध्यरात्री जाग यायची व तेव्हा प्यायला मला दूध लागे. आई माझ्या उशाशी दुधाचा कप वर बशी पालथी घालून ठेवायची. मी मध्यरात्री उठून बशीत ते गार दूध ओतून प्यायचो. मला त्यातली साखर ढवळलेली चालायची नाही. मी ती साखर नंतर चमच्याने खायचो.) घरी आलेले पाहुणे सकाळच्या एसटीनं परत जाणार असले, तरी सकाळी सात वाजता त्यांना साग्रसंगीत जेवू घालायचा कार्यक्रम घरी चालायचा. शक्यतो बाहेरचं खाणं टाळण्याकडं कल असायचा. त्यामुळं बाहेर कुठंही जायचं झालं, तरी घरून डबा नेणं ही सर्वमान्य रीत होती. नाही तर दुसऱ्याकडं मेहुण म्हणून, मुंजा म्हणून वा कुमारिका म्हणून जेवायला जाणे हे सर्वांत सोपं होतं!

गावी शाळेत डबा नेण्याची पद्धत नव्हती. सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास शाळा भरे. मधला वेळ सरळ घरी यायचं. नंतर माध्यमिक शाळेतसुद्धा घर एवढं जवळ होतं, की दुपारच्या वीस मिनिटांच्या मधल्या सुट्टीत दुपारचा चहा प्यायला घरी यायचो. पुढं नगरमध्ये शाळेत जायला लागल्यावर डबा हा प्रकार आयुष्यात आला. तिथं पोळी, लोणचं आणि एक भाजी हा ठरलेला मेनू असायचा. इतर मित्रांचे डबे उघडले, की मग त्यासोबत त्यांचं सगळं जगणंच नकळत समोर उलगडायचं. काही काही मित्र डबाच आणायचे नाहीत. टाइमपास करत बसायचे. ते डबा का आणत नसतील, हा प्रश्न तेव्हा पडलाच नाही. आता पोटात तुटतं! अर्थात शाळेतल्या वयात असलेला निरागसपणा अंगी होता. तेव्हा कुणीही कुणाच्याही डब्यात हात घालून सहज काहीही खाऊ शकत होता. मीही आपल्या घरी होणाऱ्या भाजीपेक्षा वेगळ्या चवीच्या भाज्या पहिल्यांदा या डब्यांतूनच चाखल्या. तिखटाची ‘गोडी’ लागली ती तिथपासून! एरवी आमच्या घरचं जेवण म्हणजे टिपिकल मध्यमवर्गीय, ब्राह्मणी आणि अळणी! पण आई त्या पदार्थांनाही अशी चव आणते, की विचारू नका. साधी फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात असू देत. मला तर वाटतं, महाराष्ट्रातील काही पिढ्याच्या पिढ्या फोडणीची पोळी वा फोडणीचा भात या ब्रेकफास्टवर लहानाच्या मोठ्या झाल्या असतील.

आईच्या हातचं खाणं हा कुठल्याही मुलासाठी 'वीक पॉइंट' असतो आणि त्या भावनेभोवतीच्या सर्व भावनोत्कट बाबी बाजूला ठेवल्या, तरी आमची पिढी घरच्या खाण्याबाबत आजच्या पिढीपेक्षा जास्त समृद्ध होती आणि म्हणूनच जास्त फिट आहे, असं आवर्जून सांगावंसं वाटतं. 

आमच्या लहानपणी गावात बेकरी नव्हतीच. तेव्हा पाव किंवा मैद्याचे अन्य पदार्थ फार उशिरा आयुष्यात आले. अगदी बिस्कीटही खाण्याची फार क्रेझ नव्हती. हे सगळं बालपण संपल्यावर, शहरात गेल्यावर मनसोक्त खायला मिळालं. मात्र, त्यामुळं घरचं सकस अन्न खाऊन लहानपणी जी सुदृढता लाभली ती आजही उपयोगी पडते आहे. आमच्या शेतात पेरूच्या झाडावर बसून, तिथले पेरू तोडून तिथंच खाण्याचं भाग्य मला व माझ्या भावंडांना लाभलं. घरच्या शेतातला गहू, ज्वारी, बाकीचा भाजीपाला खाण्याचं सुख अनुभवता आलं. खूप श्रीमंती होती असं नाही, पण कधी काही कमी पडलं नाही. खाण्या-पिण्यात तर मुळीच नाही. साधं-सुधं, पण सकस व महत्त्वाचं म्हणजे गरमागरम जेवण दोन्ही-तिन्ही वेळांना पोटात जात होतं.

संक्रांतीच्या आधी, ऐन थंडीत धुंधुरमासाचं जेवण हा एक सोहळा असायचा. सकाळी आई लवकर उठून बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचं दही कालवलेलं भरीत, तिळाची चटणी असं ताट समोर ठेवी. भावंडांत गप्पागोष्टी करता करता हे जेवण सकाळी कधी संपायचं ते कळायचंही नाही. तीच परिस्थिती भोगीची. ती भोगीची टिपिकल मिक्स भाजी घरात व्हायचीच. आमच्याकडं महालक्ष्म्या यायच्या, तेव्हाही पुरणा-वरणाचा नैवेद्य असायचाच; पण जोडीला  त्या सोळा भाज्या साग्रसंगीत घरी केल्या जायच्या. महालक्ष्मीच्या नैवेद्याचं ताट संपवणं हे एक आव्हान असायचं. घरात अनेकदा मुंजा मुलगा म्हणून मलाच नैवेद्याचं ताट मिळायचं. त्यात काहीही टाकून द्यायचं नाही, अशी अट असायची. पहिल्यांदा कंटाळा यायचा. विशेषत: पंचामृत वगैरे प्रकार भातात कालवून वगैरे शेवटी एकत्र संपवायचे हे मला अजिबात आवडायचं नाही. पण आजूबाजूचे सगळे ज्येष्ठ तसंच जेवतात, हे पाहून मीही तसंच करायला लागलो. त्या अटीमुळं एक मात्र झालं. ताट स्वच्छ करायची सवय लागली. कुठलाही पदार्थ कुरकुर न करता खायची चांगली सवयही लागली. मुळात आई सुगरण असल्यानं ती करत असलेलं काहीही आम्ही मिटक्या मारीत खायचोच आणि आजही खातो. त्यामुळं तिथं अमुक एक आवडत नाही वगैरे प्रश्नच उपस्थित व्हायचा नाही.

माझी आजी मी १८ वर्षांचा असतानाच गेली. म्हणजे तसा तिचा फार सहवास मला लाभला नाही. मात्र, तिनं तिचा सगळा वारसा तिच्या थोरल्या मुलीकडं आणि माझ्या आईकडं सोपवला होता, असं म्हणायला हरकत नाही. या तिन्ही माउल्यांनी माझं केवळ शारीरिक भरणपोषण केलं असं नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा निरोगी, सुदृढ पायाही भक्कमपणे रचला. आज मी जो काही आहे, तो त्यांच्या हातचं चवीष्ट अन्न खाऊन आणि पचवून...!

---


(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक २०२०)

--------

No comments:

Post a Comment