19 Dec 2021

पुणे मेट्रो लेख

मेट्रोच्या बोगद्यात...
-----------------------

जगातल्या सर्व गोष्टींविषयी मला कुतूहल वाटतं. माझ्या पेशाला पूरक अशीच ही गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते जाणून घ्यावं, असं सतत वाटत असतं. नवीन काही निर्माण झालं, की शक्य होईल तेवढ्या लवकर त्या ठिकाणाला भेट देणं मला आवडतं.
पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून मला त्या कामाविषयी कुतूहल आहे. मी येता-जाता त्या कामाची प्रगती बघत असतो. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा पिंपरी ते स्वारगेट या लाइनचा भाग अंडरग्राउंड आहे. हे काम बघण्याचा योग शनिवारी आला. सहकारी सुनीत भावे पूर्वीपासून मेट्रोशी संबंधित सर्व बातम्या बघतो. त्याच्यामुळं ऑफिसातल्या काही सहकाऱ्यांना मेट्रोचं काम बघता आलं. पूर्वीही काही जण गेले होते, तेव्हा मला जमलं नव्हतं. मात्र, या शनिवारी जमवलंच. मग अभिजित थिटे, चैत्राली चांदोरकर, विहंग घाटे आणि मी असे आम्ही चौघं हे काम बघायला दुपारी बारा वाजता स्वारगेटला पोचलो. स्वारगेटकडून सारसबागेकडं येताना पाणीपुरवठा केंद्राच्या अलीकडं मेट्रोचं मोठं गेट लागतं. तिथून आत गेल्यावर तिथल्या जनसंपर्क अधिकारी अर्चना यांनी आमचं स्वागत केलं.

प्रत्येकाला शूज कम्पलसरी होते. याशिवाय तिथं गेल्यावर हेल्मेट आणि रेडियमचं जॅकेट आम्हाला घालायला दिलं. बोगद्यापर्यंत खाली जायला एखादी लिफ्ट असेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात लोखंडी सांगाड्याचा एक तात्पुरता जिना तिथं उभारला आहे. या जिन्यात एका वेळी पाचच लोकांना खाली किंवा वर जाता येतं. आम्ही तो जिना उतरू लागलो, तेव्हा तिथले काही कामगार वर येताना दिसले. दोन माणसं जेमतेम जाऊ शकतील, अशा रुंदीच्या त्या जिन्यानं आम्ही खाली खाली जात होतो. जवळपास तीस मीटर म्हणजे दहा मजले एवढं खाली आम्ही गेलो. वरून पाहिलं तर खाली एवढं काम सुरू आहे हे समजतही नाही. आम्ही खाली पोचल्यावरच त्या कामाच्या भव्यतेचा अंदाज आला. डाव्या बाजूला मेट्रोच्या स्टेशनची इमारत आकार घेत होती. तिथं एकूण चार मजले दिसत होते. आम्हाला तिकडं न जाता उजवीकडं म्हणजे बोगद्याकडं जायचं होतं. तिथं सुरुवातीला एक केबिन होती. तिथल्या रजिस्टरमध्ये आम्ही आमची नावं व येण्याची वेळ नोंदविली. अर्चना यांनी आम्हाला प्राथमिक माहिती दिली व नंतर युवराज गावंडे हे तेथील काम पाहणारे इंजिनीअर आमच्यासोबत आले. त्यांनीच आम्हाला नंतर सगळी माहिती दिली. बोगद्याच्या सुरुवातीची जागा खूपच मोठी होती. मधोमध दोन ठिकाणी रुळ टाकले होते. त्यावरून ट्रॉलीची ये-जा सुरू होती. बोगद्याच्या आत बसवायच्या सिमेंट-काँक्रिट रिंग वाहून नेण्याचं आणि टीबीएमनं बोगदा खणल्यावर निघालेली माती आणून टाकायचं काम या ट्रॉल्या करीत होत्या. स्वारगेट हे शेवटचं स्टेशन असल्यानं इथं रुळ बरेच क्रिस-क्रॉस होणार आहेत. त्यामुळं हा सुरुवातीचा भाग बराच रुंद होता. इथून दोन वेगवेगळ्या बोगद्यांतून मेट्रो सिव्हिल कोर्टाकडे (म्हणजेच मंडई, बुधवार चौकाकडे) जाणार आहे आणि तिथून येणार आहे. स्वारगेटवरून मंडईकडे जाणाऱ्या लाइनला डाउन लाइन म्हणतात, तर तिकडून इकडे येणाऱ्या लाइनला अप लाइन म्हणतात. अप लाइनच्या बोगद्याचं खोदकाम जवळपास एक किलोमीटरहून अधिक झालं आहे.
(मंडईपर्यंतचं अंतर साधारण दोन किलोमीटर २०० मीटर एवढं आहे.) सिव्हिल कोर्टकडून खणत येणारं टीबीएम आणि इकडून तिकडं खणत जाणारं टीबीएम यांचं जंक्शन बुधवार चौक (फडके हौद स्टेशन) इथं आहे. अप लाइनचं मशिन एक किलोमीटरहून दूर असल्यानं युवराज यांनी आम्हाला डाउन लाइनवरचं मशिन दाखवायला न्यायचं ठरवलं. हे मशिन साधारण पाचशे मीटरपर्यंत दूर खणत गेलं होतं. आम्ही त्या बोगद्यात शिरलो. तो बोगदा अगदी व्यवस्थित तयार झालाय. शेजारून (त्या जिन्यासारखीच) एक तात्पुरती लोखंडी पट्ट्यांची लाइन चालत जाणाऱ्यांसाठी केली आहे. आम्ही त्या पट्टीवरून चालत निघालो. थोडं आत गेल्यावर जरा घाम जाणवू लागला. आम्ही खरं तर फार खोल आलो नव्हतो, तरी बोगद्यात आत आत चाललो आहोत या जाणिवेनं थोडीशी भीती वाटली. अर्थात तिथं सर्व सुरक्षा व्यवस्था (पुरेसे दिवे, ऑक्सिजन इ.) चोख होती आणि महत्त्वाचं म्हणजे टीबीएम बघायची उत्सुकता फार होती. आत आत जाऊ लागलो तशी थोडी धाप लागू लागली. (ज्यांना श्वासांचा किंवा दम्याचा वगैरे त्रास आहे, त्यांना इथं येणं जरा अवघडच जाईल.) आम्ही आमचे स्वेटर, जर्किन काढून टाकली. त्यांचं ते हेल्मेट वर होतंच. शिवाय मास्क. त्यामुळं नंतर मास्कही काढून टाकला. आता जरा नीट श्वास घेऊन चालता यायला लागलं.
अखेर (आमच्या दृष्टीनं) बरीच पायपीट केल्यावर यंत्राचा आवाज येऊ लागला. लाइट दिसू लागले. सुरुवातीला रेल्वेच्या इंजिनासारखं एक युनिट लागलं. तिथं आत अनेक कम्प्युटर आणि डिस्प्ले होते. समोर चाललेलं सगळं काम आणि त्याचे तपशील तिथं दिसत होते. सीसीटीव्ही कॅमेरे होते. या केबिनमध्ये एसी होता. त्यामुळं तिथं शिरताच एकदम बरं वाटलं. हे विचार, ते विचार असं करून थोडा जास्तच वेळ आम्ही तिथं उभे राहिलो आणि जरा गार झालो. (बाकी हे सगळं अवाढव्य काम बघून तसेही गारच झालो होतो म्हणा...) हे टीबीएम ‘टेराटेक’ नावाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीचं असलं, तरी ते चीनमध्ये तयार झालं आहे. त्या इंजिनासारख्या दिसणाऱ्या युनिटमधून एक ट्रॉली मागे जाताना दिसली. खणल्यावर बाहेर पडणारा सगळा राडारोडा वरून सिमेंट मिक्सरसारख्या मोठ्या भांड्यातून खाली एकेका ट्रॉलीत पडत होता. नंतर ही ट्रॉली त्याच रुळांवरून मागे जात बोगद्यातून बाहेर जात होती. हा सगळा टीबीएमचाच भाग होता असं कळलं. मला ते यंत्र म्हणजे एकच युनिट असेल असं वाटत होतं. पण ते समोर गोल फिरणारं कटर हा त्या महाकाय यंत्राचा केवळ एक भाग होता, असं कळलं. त्या कटरपर्यंत तर आपल्या पोचताच येत नाही. त्याच्यामागे सिमेंटच्या रिंग गोलाकार बसवण्याचं काम यंत्राच्या साह्यानं सुरू होतं. हे कामही ऑटोमॅटिक होतं. फक्त दोन रिंग जोडणारे मोठाले स्क्रू यंत्रानं पिळण्याचं काम कर्मचारी करतात. अशी एकेक रिंग बसवत हे मशिन पुढं जातं. दिवसाला साधारण आठ ते दहा मीटर खोदाई करून रिंग बसवल्या जातात. आम्ही गेलो तेव्हा ५५३ वी रिंग बसविली जात होती. (म्हणजेच साधारण ५०० ते ५५० मीटर अंतर मशिननं पार केलं होतं.) आपण आत्ता साधारण कुठे आहोत, असं अभिजितनं विचारलं. तेव्हा साधारण खडक पोलिस स्टेशनच्या आसपास (म्हणजे त्या जागेच्या खाली) आपण आहोत, असं समजलं. गंमत वाटली. आपल्या डोक्यावर आख्खं शहर, रस्ते, तुफान रहदारी आहे, या कल्पनेनं थरारून जायला झालं. इथं २४ बाय ७ सतत काम सुरू असतं, असं युवराज सांगत होते. आठ आठ तासांची शिफ्ट असते. तरीही हे कर्मचारी तिथं एवढ्या उकाड्यात आणि थोड्या कमी ऑक्सिजनमध्ये काम करताहेत हे बघून कमालच वाटली. हे काम साधारणपणे सहा महिन्यांत, तर शेजारच्या अप लाइनचं काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं ‘महामेट्रो’चं नियोजन आहे. 

सगळं काम बघितलं, फोटो काढले आणि मागं फिरलो. परत येताना बोगद्याच्या बाहेरचा प्रकाश दिसला आणि हायसं वाटलं. तिथं प्रचंडच पाणी गळत होतं. पुण्यात भूजलपातळी अगदी चांगली आहे. जरा खणलं, की पाणी लागतंच. इथं तर शेजारून कालवाही जातो. हे पाणी नंतर वॉटरप्रूफिंग तंत्रानं बंद करणार आहेत. बाहेर पडताना पुन्हा एकदा वेळ नोंदविली आणि तिथून निघालो. अगदी दारात एक छोटंसं मंदिर असल्याचं दिसलं. हे आत जाताना मगाशी दिसलं नव्हतं. तिथंही फोटो काढले. आता पुन्हा त्या तात्पुरत्या जिन्याने दहा मजले वर जायचं होतं. शेजारी चार मजली स्टेशन आकाराला येत होतं. जिने चढून वर आलो, तेव्हा ऊन चांगलंच जाणवत होतं. तो सगळा एरिया केवढा मोठा आहे, याचा आता नीट अंदाज आला. स्वारगेट हे मल्टिमोडल हब असणार आहे. इथं पीएमपी, एसटी आणि मेट्रो यांना एकाच छताखाली आणण्यात येणार आहे.
बाहेर पडलो. वरच्या बाजूला त्यांचं छोटंसं ऑफिस आहे. तिथं गेलो. चहा झाला. समोर मेट्रोचे नकाशे लावले होते. साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, एलिव्हेशन बघून इंजिनीअरिंगचे दिवस आठवले. समोर एका नकाशावर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा फोटो होता. ते माझ्याकडंच बघताहेत असा भास झाला आणि मी मनोमन चेहरा झाकूनच घेतला.
त्या सग‌ळ्या जगड्व्याळ पसाऱ्याला आणि हे काम उभं करणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांना नमस्कार केला आणि तिथून निघालो...


---

याआधी मेट्रोवर लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

---





16 comments:

  1. मस्त अनुभव. एका वेगळ्याच जगाची सैर केलीत आणि वाचकांनाही घडवली आहेस. आता हा प्रवास लवकर अनुभवायला मिळो! 😄

    ReplyDelete
  2. कमाल वर्णन.... तुझ्या बरोबर आम्ही पण जाऊन आलो तिथे... वाचताना सुद्धा श्वास अडकल्या सारखे व्हायला लागली....आणि बाहेर आल्यावर हुश्श... मस्तच...ग्रेट काम

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! कृपया आपले नाव लिहा...

      Delete
  3. श्रीपाद... मी देखील मेट्रो प्रकल्पाला भेट दिली होती. काहीबाही लिहावेसे देखील वाटले. पण कंटाळा केला. तु छान लिहिलंयस. तुझ्यासारखं मला जमलाही नसतं.

    राजीव जतकर.

    ReplyDelete
    Replies
    1. हो काका... तुमचे फोटो बघितल्यापासूनच मला मी कधी एकदा बघतोय हे काम, असं झालं होतं... 😀

      Delete
  4. खूप मस्त लिहिलंय. जसं जसं वाचत जाऊ तशी उत्कंठा वाढत जाते.आपल्या लेखणीमुळे या जगाचा अनुभव तिथे प्रत्यक्ष न जाताही घेता आला.

    ReplyDelete
  5. मस्त, सैर करवून आणली!भाग्यवान आहात!

    ReplyDelete
  6. वर्णन छानच .. आमचीही बोगद्यातून सैर झाली ..थरारक आणि मस्त👌👌👌👍💐

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद, वीणाताई!

      Delete