29 May 2023

पासवर्ड दिवाळी अंक २२ - कथा

सर रघू विश्वेश्वरय्या..
------------------------

दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि रघूनं जोरदार उडी मारून आनंद व्यक्त केला. यंदा त्याला दिवाळीच्या सुट्टीत दिल्लीला फिरायला जायचं होतं. त्याचे आई-बाबा आणि सोबत त्याचा लाडका मित्र साहिल पण असणार होता. साहिलही रघूसारखाच सातवीत होता. साहिलचे आई-बाबाही अर्थातच सोबत असणार होते. या काकांकडं मोठ्ठी एसयूव्ही होती, म्हणून त्या गाडीतून गोव्याला जायचं ठरत होतं. मात्र, रघूला रेल्वेनं प्रवास करायला आवडायचं. त्यामुळं गोव्याचा बेत रद्द होऊन दिल्लीला जायचं ठरलं होतं. रघूनं हट्टानं बाबांना रेल्वेगाडीची तिकिटं काढायला सांगितली होती. त्याच्या बाबांनी वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसचं तिकीट काढलं. एसी डब्याचं तिकीट वेटिंगवर होतं. वेटिंग म्हणजे काय, आरएसी म्हणजे काय, कन्फर्म म्हणजे काय, पीएनआर म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांनी रघूनं बाबांना भंडावून सोडलं. रेल्वेगाडीतून एका वेळी साधारण हजार लोक प्रवास करू शकतात. रेल्वे डब्यांचे प्रकार असतात. जनरल डबा, आरक्षित थ्री टायर स्लीपर, सेकंड एसी आणि फर्स्ट क्लास असे वेगवेगळे डबे असतात. त्यातल्या सेवासुविधांनुसार त्यांची तिकिटं वेगवेगळी असतात. रेल्वेगाडीचं आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन चार महिने आधी करता येतं. मात्र, सणासुदीच्या आणि सुट्टीच्या दिवसांत लोक खूप जास्त प्रवास करतात, त्यामुळं गाड्यांना गर्दी असते. अनेक लोक आधी तिकीट आरक्षित करतात आणि नंतर काही कारणानं रद्द करतात. त्यामुळं अनेक लोक ‘वेटिंग’वरचं, म्हणजे प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन ठेवतात. नशीब चांगलं असेल, तर हे तिकीट कन्फर्म होतं आणि तुम्हाला प्रवास करता येतो अशी सगळी माहिती रघूच्या बाबांनी त्याला दिली. तरी रघूची उत्सुकता शमत नव्हती. मग त्यानं ‘यू ट्यूब’वर रेल्वेगाड्यांचे खूप व्हिडिओ पाहिले. रेल्वेचं हे एक वेगळंच जग असल्याचं त्याच्या लक्षात आलं. भारतात रेल्वेचं केवढं मोठ्ठं जाळं आहे, हे बघून त्याला फार भारी वाटलं. राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या शर्यतीचे व्हिडिओ बघून तर तो हरखून गेला. दोन गाड्या अशा एकाच वेळी दोन ट्रॅकवरून एकाच दिशेनं धावतात, हे त्यानं यापूर्वी कधीही बघितलं नव्हतं. हल्ली स्मार्टफोन आल्यापासून कुणीही व्हिडिओ करू शकत असल्यानं रेल्वे प्रवासाचे हजारो व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. रघूला ते व्हिडिओ बघायचा नाद लागला. अनेक परदेशी प्रवाशांनी भारतात प्रवास करून त्याचे व्हिडिओ केले होते. त्यांच्या नजरेतून आपला देश बघताना रघूला गंमत वाटत होती. आता उत्सुकतेनं रघूनं भारतातल्या रेल्वेचा इतिहास वाचायला सुरुवात केली. भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वेगाडी बोरिबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली ही माहिती त्याला समजली. पुणे आणि मुंबई दरम्यानचा रेल्वेचा अवघड घाट इंग्रजांच्या काळात कसा तयार झाला, हेही त्यानं वाचलं. रघूनं आत्तापर्यंत अनेकदा पुणे ते मुंबई प्रवास रेल्वेनं केला होता. त्याची एक मावशी मुंबईत राहायची. मात्र, या रेल्वेमार्गावर लागणारे बोगदे आणि त्यातून काढलेला हा लोहमार्ग याची माहिती वाचताना त्याचे डोळे विस्फारले. भारतातील सर्वांत लांब धावणारी रेल्वे हिमसागर एक्स्प्रेस आहे आणि ती काश्मीरमधील जम्मूपासून निघून थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत जाते, हे वाचून रघूनं नकाशाच काढला. त्या लांबलचक प्रवासाचा मार्ग त्यानं पेन्सिलनं नकाशावर पुन्हा एकदा काढला. त्या एक्स्प्रेसला दिलेलं समर्पक नाव वाचून त्याला फारच खास वाटलं. हिमालयातून निघून थेट खाली हिंदी महासागरापर्यंत जाणाऱ्या त्या एक्स्प्रेसनं आयुष्यात एकदा तरी प्रवास करायचा असा निश्चय त्यानं करून टाकला. आता त्याला वेगवेगळ्या एक्स्प्रेस गाड्यांची नावं जाणून घ्यायची उत्सुकता लागली. मुंबईहून कोलकत्याला जाणाऱ्या गाडीला गीतांजली एक्स्प्रेस, तर पुण्याहून कोलकत्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसला आझादहिंद एक्स्प्रेस असं नाव का दिलं असेल, हे त्याच्या लक्षात आलं. इतिहास हा त्याचा आवडता विषय होता. पुण्याहून जम्मूकडं जाणाऱ्या गाडीला झेलम एक्स्प्रेस, तर मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या गाडीला कोणार्क एक्स्प्रेस असं नाव आहे, हे त्याला समजलं. मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला ‘तुतारी एक्स्प्रेस’ असं नाव दिल्याचं ऐकल्यावर त्याला फार आनंद झाला. ज्येष्ठ कवी केशवसुत यांच्या प्रसिद्ध अशा ‘तुतारी’ या कवितेचं नाव गाडीला दिल्यामुळं त्याला मराठी साहित्याचा आणि साहित्यिकांचा अभिमान वाटला. पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या गाडीचं नाव ‘अहिंसा एक्स्प्रेस’, तर मुंबईवरून बंगळूरला जाणाऱ्या गाडीचं नाव ‘उद्यान एक्स्प्रेस’ असं आहे, हे वाचल्यावर आता त्याला आश्चर्य वाटलं नाही.
रघू ज्या वास्को-निजामुद्दीन गाडीनं जाणार होता, त्या गाडीविषयी तो बाबांना विचारू लागला. वास्को हे गोव्यातलं एक शहर आहे आणि तिथून ही रेल्वेगाडी दिल्लीला पुणे मार्गे जाते, असं त्याला बाबांनी सांगितलं. गाडी दिल्लीला जाणार आहे तर ‘निजामुद्दीन’ हे काय आहे, असा त्याला प्रश्न पडला. मग त्यानं ‘गुगल’बाबाला विचारलं. तेव्हा ‘हजरत निजामुद्दीन’ हे दिल्ली शहरातील एक मोठं स्टेशन आहे, असं त्याला कळलं. ही गाडी पहाटे चार वाजता पुण्यात येते. त्यामुळं रघूला तर कधी जायचा दिवस उजाडतो (खरं तर मावळतो...) असं होऊन गेलं. अखेर प्रवासाला निघण्याचा दिवस आला. रघूनं सगळी जय्यत तयारी केली होती. थंडीचे दिवस असल्यानं ‘हुडी’वालं जर्किन, शूज, हँड्सफ्री इअरफोन, खिशात कॅडबरी असा सगळा जामानिमा करून तो सज्ज झाला. साहिल आणि त्याची फॅमिली परस्पर स्टेशनवर येणार होते. रघूच्या बाबांनी कॅब बुक केली. खूप उशिरा स्टेशनवर जाण्यापेक्षा रात्री बारा वाजताच स्टेशनवर जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. कॅब आली. रघूच्या घरापासून स्टेशन ४५ मिनिटं दूर होतं. रात्री ११.२० ला निघालेली कॅब बरोबर १२ वाजून १० मिनिटांनी रेल्वे स्टेशनच्या आवारात शिरली. समोरच महात्मा गांधींचा भव्य पुतळा दिसला. पुणे स्टेशनची जुनी दगडी इमारत दिव्यांनी झगमगून निघाली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्टेशनला तिरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळं ही मूळची देखणी इमारत आणखीन झळाळून उठली होती. आता या इमारतीविषयी त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. आता बाबाला त्रास द्यायचा नाही, हे त्याला माहिती होतं. त्याऐवजी ‘गुगल’बाबाला विचारायचं; अजिबात कटकट न करता तो उत्तर देतो, हे त्याला ठाऊक झालं होतं. त्यानं लगेच ‘पुणे रेल्वे स्टेशन’ असा सर्च दिला. त्याबरोबर स्टेशनची सगळी माहिती त्याच्या मोबाइलवर अवतरली. हे स्टेशन १९२५ मध्ये बांधून पूर्ण झालंय हे वाचून त्याला आश्चर्य वाटलं.
रघू आणि त्याचे आई-बाबा आता स्टेशनमध्ये शिरले. एवढ्या रात्रीही स्टेशनच्या बाहेर व आत भरपूर गर्दी होती. वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत-जात होते. त्यात भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांतले लोक दिसत होते. वेषभूषा मात्र बहुतेकांची सारखीच होती. थंडीमुळं अनेकांच्या अंगात स्वेटर, कार्डिगन, जर्किन्स होती. त्यात मात्र वैविध्य दिसत होतं. स्टेशनवर सगळीकडं इलेक्ट्रॉनिक फलक लावले होते आणि त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची माहिती प्रदर्शित होत होती. स्टेशनवर हल्ली बऱ्यापैकी स्वच्छता असते, असं रघूला दिसून आलं. कचरा इकडेतिकडे न फेकता लोक कचराकुंडीत टाकत होते. विशेषत: लहान मुलं त्यांच्या खाण्याची रॅपर्स न चुकता कचराकुंडीला (तिथं हिंदीत ‘कूडादान’ लिहिलं होतं...) दान करत होती. तिथं खाण्याचे स्टॉल होते. त्यासमोर उभं राहून बरेच लोक तिथले पदार्थ खात होते. वडापावला नेहमीप्रमाणेच भरपूर डिमांड होती. तिथं एक पुस्तकांचाही स्टॉल होता. पण तिथली पुस्तकं बरीचशी हिंदीत होती. काही इंग्रजीत होती. मात्र, रघूच्या बाबांनी त्याला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं एक चरित्र दिलं होतं. ते त्याला या प्रवासात वाचायचं होतं. आत्ता त्यांची कॅब ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उड्डाणपुला’वरूनच आली होती. नुकतीच शाळेत १५ सप्टेंबरला विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी त्यांची माहिती त्याच्या शिक्षकांनी सांगितली होती. रघूला ती ऐकून विश्वेश्वरय्या यांच्याविषयी आणखी कुतूहल वाटू लागलं होतं. कधी एकदा ते पुस्तक वाचतो असं त्याला झालं होतं.
थोड्याच वेळात साहिल आणि त्याचे आई-बाबाही आले. मग रघूचे आई-बाबा आणि साहिलचे आई-बाबा गप्पा मारत बसले. साहिल आणि रघू यांनी एकमेकांना बघताच मिठी मारली. दोघांनीही हँड पंच केला आणि ‘यो...’ असं ओरडले. रघूला बसून बसून लगेच कंटाळा आला होता. मग जरा स्टेशनवर चक्कर मारून येऊ का, असं त्यानं बाबांना विचारलं. त्यावर बाबांनी ‘साहिल आणि तू बरोबर जा आणि मोबाइल सतत हातात ठेव’ असं सांगून परवानगी दिली. स्टेशनच्या बाहेर जायचं नाही आणि रुळ क्रॉस करायचे नाहीत, अशीही सक्त ताकीद त्यांनी दिली. चहा घ्यावासा वाटला, तर थोडे पैसेही रघूकडं दिले. रघू आणि साहिल हातात हात घालून निघाले. स्टेशनवरचं ते रंगबिरंगी, हलतं-फिरतं जिवंत जग रघूला फार आवडलं. तो स्टेशनवरच्या माणसांचं निरीक्षण करू लागला. सगळ्याच लोकांकंडं स्वेटर नव्हते, असं त्याच्या लक्षात आलं. प्रत्येकाकडचं सामानही वेगवेगळं होतं. कुणी वळकट्या बांधल्या होत्या, तर कुणाकडे चाकांवर पळणाऱ्या भारी बॅगा होत्या. कुणाकडं अगदी साध्या पिशव्या होत्या, तर तरुण मुलांकडं काळ्या सॅक होत्या. कुणी भारी भारी शूज घातले होते, तर काहींजवळ अगदी साध्या स्लीपर होत्या. काही जण मोठ्या ग्रुपने प्रवास करत होते, तर कुणी कुणी अगदी एकटे होते. एक मात्र होतं. बहुतेक सर्वांकडं मोबाइल होते आणि त्यातले ९० टक्के लोक मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसले होते. रघू आणि साहिलला थोड्याच वेळात कंटाळा आला आणि ते आई-बाबांकडं परत आले. आता रात्रीचे दोन वाजले होते. स्टेशनवरची गर्दी थोडी कमी झाली होती.
रघूला बाबांनी दिलेल्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांच्या चरित्राची आठवण झाली. त्यानं सॅकमधून ते पुस्तक काढलं. त्यांच्या एका मोठ्या बॅगेवर बसून आणि स्टेशनवरच्या खांबाला टेकून तो ते पुस्तक वाचू लागला. विश्वेश्वरय्या यांच्या अद्भुत जगण्याविषयीचं त्याचं कुतूहल कमी न होता वाढतच होतं. पुण्यातल्या खडकवासला धरणाचं कामही त्यांनीच केलंय हे रघूला माहिती नव्हतं. तो उत्सुकतेनं पुस्तक वाचत होता; पण डोळे कधी पेंगू लागले ते कळलंच नाही. एकदम बाबा ‘रघू, उठ, उठ... गाडी आली...’ असं ओरडून म्हणताहेत असं त्याला वाटलं. त्याचे डोळे उघडले. स्टेशनवरची गडबड वाढली होती. त्यांची गाडी फलाटावर लागली होती. त्यांची तिकिटं कालच कन्फर्म झाली होती. गाडी पकडायला सगळ्यांची एकच झुंबड उडाली. रघूही झोपाळलेल्या अवस्थेत बाबांचा हात धरून गाडीकडं निघाला. आपण कधी डब्यात चढलो, कधी आपल्या बर्थवर आडवे झालो, हे रघूला काहीही आठवलं नाही. थोड्याच वेळात गाडी हलल्याचं त्याच्या लक्षात आलं. रघू सर्वांत खालच्या बर्थवर झोपला होता. त्यानं आग्रहानं ही खालची सीट मागून घेतली होती. त्यानं खिडकीबाहेर बघितलं. स्टेशनवरची माणसं, दिवे भराभर मागं पडत चालले होते. आता गाडीनं चांगलाच वेग घेतला होता. रेल्वेगाडीची स्वत:ची अशी एक लय असते. गाडीत बसल्यावर थोड्याच वेळात सगळ्यांच्या अंगात नकळत ती लय भिनते. रघूच्याही तारा गाडीच्या तारांशी जुळल्या. थोड्याच वेळात त्याचे डोळे मिटले. गाडीचा ‘ढिडक ढिडक ढिडक ढिडक ढगढगढगढगढग ढिडक ढिडक ढिडक धिडक धिडक...’ हा आवाज मात्र त्याच्या कानात व मेंदूत घुमत राहिला.
अचानक रुळांमधून वेगळाच, काही तरी घासल्यासारखा आवाज येऊ लागलाय, असं रघूला वाटू लागलं. त्यानं डोळे उघडले. कान पुन्हा सीटला लावले. मगाशी येत होता त्यापेक्षा वेगळा आवाज येत होता, असं त्याला जाणवलं. मग त्याला अचानक असं वाटलं, की या रेल्वेमार्गावर पुढं रुळांमध्ये काही तरी बिघाड असला पाहिजे. रुळ कदाचित तुटलेही असतील. मग रघू उठला. त्यानं आजूबाजूला बघितलं. सगळे लोक गाढ झोपले होते. मग रघू खाली उतरला. आता त्यानं डब्याच्या फ्लोअरलाही कान लावला. त्याला पुन्हा तेच जाणवलं. काही तरी गडबड आहे. अशा वेळी चेन ओढून गाडी थांबवायची, हे त्याला माहिती होतं. रघूनं पुढचा-मागचा कुठलाही विचार न करता वर चढून जोरात चेन ओढली. गाडी थांबली. पण विशेष म्हणजे आजूबाजूचं कुणीही जागं झालं नाही. ते लोक, अगदी त्याचे आई-बाबा अगदी गाढ झोपले होते. गाडी एका निर्जन भागात थांबलीय असं लक्षात येत होतं. बाहेर अर्थात दाट अंधार होता. थंडीमुळं धुकंही पसरलं असावं. गाडीतही ते धुकं आलं होतं. त्या धुक्यातून अचानक एक माणूस त्याच्या दिशेनं येताना दिसला. तो माणूस थेट विश्वेश्वरय्यांसारखा दिसत होता. या रेल्वेत दाक्षिणात्य मोटरमन असावा, अशी रघूनं स्वत:ची समजूत करून घेतली. त्या माणसानं रघूला थेट इंग्रजीत विचारलं, ‘व्हॉट हॅपन्ड माय बॉय? व्हाय डिड यू पुल द चेन?’ रघूनं त्याला आलेली शंका सांगितली. तो माणूस चिंतेत पडला आणि लगेच माघारी गेला. थोड्या वेळात त्या डब्यात रेल्वेचे बरेच अधिकारी लोक आले. ‘इथे रघू नावाचा मुलगा कुठे आहे?’ असं त्यांच्यातला एक जण विचारत होता. रघू पुढं झाला. गंमत म्हणजे अजूनही आजूबाजूचे लोक झोपलेलेच होते. त्या अधिकारी माणसानं रघूला सांगितलं, की त्याच्यामुळं या गाडीतील हजार लोकांचे प्राण वाचले आहेत. पुढे एक-दीड किलोमीटरवर खरंच रुळांना तडे गेले होते. त्यामुळं गाडीला मोठा अपघात झाला असता. त्यामुळं आम्ही रघूचं कौतुक करतो आणि त्याचं नाव राष्ट्रपती शौर्यपदकासाठी सुचवतो.
रघूला अतिशय आनंद झाला. पुढच्याच मिनिटात तो राष्ट्रपती भवनात होता. विशेष म्हणजे राष्ट्रपतीही त्या विश्वेश्वरय्यांसारखेच दिसत होते. त्यांनी रघूला शौर्यपदक बहाल केलं. ते घेऊन रघू पळतच बाबांकडं आला. बाबांना पदक दाखवण्यासाठी त्यानं गळ्यापाशी हात नेला, तर पदक नव्हतंच. रघू अतिशय दचकला. पुन्हा पुन्हा गळ्यापाशी, छातीपाशी पदक आहे का, ते चाचपत राहिला. ‘बाबा, पदक गेलं.... पदक हरवलं...’ असं म्हणून रडायला लागला.
‘रघू, रघू... उठ बेटा... कसलं पदक? काय हरवलंय...’ बाबांच्या आवाजानं रघू आता खराखुरा जागा झाला. बाहेर उजाडलं होतं. गाडी वेगानं धावतच होती. रघूनं डोळे चोळत एकदा खिडकीबाहेर आणि एकदा बाबांकडं बघितलं. बाबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं.
‘बाबा, काही नाही झालं. चहा घेऊ या... ’ रघू हसत बाबांना म्हणाला.
‘विचित्रच आहे जरा पोरगं,’ अशा अर्थाचा लूक देऊन बाबा चहावाल्याकडं वळले. इकडं रघूनं सीटला कान लावून पुन्हा एकदा गाडीची लय ऐकली.
‘ढिडक ढिडक ढिडक ढिडक ढगढगढगढगढग ढिडक ढिडक ढिडक धिडक धिडक...’
...ती अगदी ‘नॉर्मल’ होती. पलीकडं उशाशी विश्वेश्वरय्यांचं चरित्र पडलं होतं. रघूला सगळा उलगडा झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. पुस्तकावरचे विश्वेश्वरय्या आजोबाही त्याच्याकडं बघून मिश्कील हसत आहेत, असा भास त्याला झाला... गाडी वेगानं दिल्लीकडं पळत राहिली...

----

(पूर्वप्रसिद्धी - पासवर्ड दिवाळी अंक २०२२)

---

No comments:

Post a Comment