19 Jun 2023

मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक २२ - लेख

अविनाशी लक्ष्याची प्रज्ञा
-----------------------------

बालमित्रांनो, सध्या आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. नुकतीच आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं पूर्ण झाली. या काळात आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रगतीची नवनवी शिखरे गाठली आहेत. अवकाश तंत्रज्ञानापासून अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णतेपर्यंत आणि संरक्षण सज्जतेपासून खेळाच्या मैदानांपर्यंत भारताची घोडदौड वेगात सुरू आहे. आपल्या सर्वांना आपल्या देशाचा अभिमान वाटतो. आपला राष्ट्रध्वज, म्हणजेच आपला तिरंगा म्हणजे आपला जीव की प्राण! उंचावर डौलानं फडकत असलेला आपला तिरंगा झेंडा बघून नेहमी मन भरून येतं, नाही का! देश स्वतंत्र व्हावा म्हणून स्वातंत्र्यलढ्यात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपासून ते सीमेवर निधड्या छातीने देशाचे संरक्षण करणाऱ्या आपल्या जवानांपर्यंत सर्वांच्या बलिदानाची आठवण येते आणि मन गहिवरून येतं. ऑलिम्पिकसारख्या जगातल्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाचा तिरंगा झळकतो आणि आपलं ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत तिथं वाजवलं जातं, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. तो क्षण त्या खेळाडूच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण होऊन जातो.
भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी दिवसेंदिवस उंचावत चालली आहे. विशेषत: ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले खेळाडू आता अतिशय वरच्या दर्जाची कामगिरी बजावताना दिसत आहेत. नुकत्याच ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकं अशी एकूण ६१ पदकं मिळवून चौथा क्रमांक मिळविला. भारताची ही कामगिरी चांगली मानली गेली, याचे कारण भारतीय खेळाडू ज्या नेमबाजी या क्रीडाप्रकारात भरपूर पदकं मिळवतात, त्या नेमबाजीचा समावेश या स्पर्धेत नव्हता. तो असता तर आपली पदकांची संख्या ७५ पेक्षा अधिक झाली असती. या स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टरनी, मुष्टीयोद्ध्यांनी, कुस्तीपटूंनी आणि बॅटमिंटनपटूंनी मोठ्या संख्येने पदके मिळविली. ॲथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडूंनी आठ पदके मिळविली आणि आपल्या कामगिरीची छाप या स्पर्धेवर उमटविली. कुस्तीत भारताला सर्वाधिक १२ पदकं मिळाली. वेटलिफ्टिंगमध्ये दहा, ॲथलेटिक्समध्ये आठ, तर टेबल-टेनिस व मुष्टियुद्धात प्रत्येकी सात पदकं भारतीय खेळाडूंनी मिळविली. 

केवळ विजयाचे ‘लक्ष्य’


बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून सुवर्णपदक मिळविले. चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवून बॅडमिंटनमधील तिसरं सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं. लक्ष्य सेन हा भारताचा नवा बॅडमिंटन स्टार होऊ शकतो. भविष्यात त्याच्याकडून मोठ्या यशाची अपेक्षा ठेवता येईल. मित्रांनो, बॅडमिंटन या खेळाचा जन्म पुण्यात झाला हे तुम्हाला माहिती आहे का? एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी पुणे शहरात या खेळाला सुरुवात केली, म्हणून सुरुवातीला बॅडमिंटनला ‘पूना गेम’ असंही म्हणत असत. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण आदी खेळाडूंमुळे या खेळाला भारतात लोकप्रियता मिळाली. विशेषत: पदुकोण यांनी ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप’ ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा १९८० मध्ये जिंकल्यानंतर भारतात बॅडमिंटनची लोकप्रियता कळसाला पोचली होती. अलीकडच्या काळात पदुकोण यांच्यानंतर पी. गोपीचंद यांनी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखविला होता.
लक्ष्य सेन या खेळाडूमध्येही ही स्पर्धा जिंकण्याची क्षमता निश्चितच आहे. उत्तराखंडमधील अलमोडा या ठिकाणी जन्मलेल्या लक्ष्यचा भाऊ चिराग हाही नामांकित बॅडमिंटन खेळाडू आहे. लक्ष्यचे वय आत्ता केवळ २१ वर्षे आहे. बर्मिंगहॅममध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर शर्ट काढून प्रेक्षकांत भिरकावण्याच्या त्याच्या स्टाइलमुळे अनेकांना सौरभ गांगुलीने लॉर्डस् क्रिकेट मैदानावर भारत जिंकल्यावर अशाच पद्धतीने शर्ट काढून फिरवला होता, त्या घटनेची आठवण झाली. एकविसाव्या शतकात जन्मलेल्या लक्ष्यसारख्या खेळाडूंच्या पिढीची विजिगिषु वृत्तीच त्यातून दिसून येते. 

सर्व अडथळ्यांवर मात

राष्ट्रकुल स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेल्या अविनाश साबळे या खेळाडूची कथाही अशीच प्रेरणादायक आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मांडवा या गावी जन्मलेला अविनाश घर ते शाळा हे सहा किलोमीटरचं अंतर कुठलीही वाहनाची सोय नसल्यानं पायी चालत किंवा पळत पार करायचा. तीन हजार मीटर स्टीपलचेस या धावण्याच्या शर्यतीत अडथळे ओलांडत शर्यत पूर्ण करावी लागते. अविनाशने राष्ट्रीय विक्रमासह बर्मिंगहॅमला या स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं. साध्या शेतकरी कुटुंबातल्या अविनाशचा हा प्रवास थक्क करणारा आहे. बारावीनंतर अविनाश लष्कराच्या ‘५, महार रेजिमेंट’मध्ये दाखल झाला. तिथे लष्कराच्या साधनसामग्रीच्या मदतीने त्याला धावण्याच्या कौशल्याचा विकास करता आला.

याआधी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही अविनाशने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. इतकच नव्हे तर जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता.
बर्मिंगहॅममध्ये अविनाशची ३००० मीटर स्टीपलचेस ही शर्यत चांगलीच रंगतदार झाली. शर्यतीच्या अंतिम फेरीत केनियाच्या खेळाडूंना कडवी झुंज दिली. अविनाशने ८ मिनिटं आणि ११.२० सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक पटकावलं. भारत आणि केनिया यांच्यामध्ये या वेळी कडवी झुंज पाहायला मिळाली. जगात धावण्याच्या स्पर्धांमध्ये आफ्रिकन, विशेषत: केनियन खेळाडूंचे वर्चस्व आहे. अविनाशने हे वर्चस्व मोडून काढत यश मिळवलं आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या फेरीपर्यंत हे स्थान कायम राखले होते. त्या वेळी अविनाश रौप्यपदक मिळवू शकेल, असे कुणालाही वाटले नव्हतं. अखेरच्या लॅपमध्ये (फेरी) मात्र अविनाशने जोरदार मुसंडी मारली आणि थेट रौप्यपदकाला गवसणी घातली. आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये पदक जिंकता आले नव्हते. मात्र, अविनाशने या वेळी कमालच केली. या वेळी अविनाशने विचारपूर्वक धाव घेतली. कोणत्या क्षणी काय करायचं हे त्यानं जणू आधी ठरवलं होतं. त्यामुळंच त्याला रौप्यपदक मिळवता आलं. भारताचं हे स्टीपलचेसमधील पहिलंच पदक आहे.

‘बालबृहस्पती’चा गवगवा

राष्ट्रकुल खेळांव्यतिरिक्त आणखी एका खेळात एक लहानगा भारतीय खेळाडू जागतिक दर्जाची कामगिरी करत आहे. हा खेळ आहे भारतीयांचा स्वत:चा असा खेळ बुद्धिबळ आणि या ‘बालबृहस्पती’ खेळाडूचं नाव आहे आर. प्रज्ञानंद! बुद्धिबळाच्या खेळात सध्याचा जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन याला पराभूत करणारा सर्वांत लहान खेळाडू म्हणू प्रज्ञानंदची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चेन्नईचा हा खेळाडू सध्या केवळ १७ वर्षांचा आहे. सावळासा, चेहऱ्यावर कपाळावर टिपिकल दाक्षिणात्य माणसांप्रमाणे आडवे पांढरे भस्म लावणारा हा मुलगा सध्या जगभरातील बुद्धिबळप्रेमींचे आकर्षण ठरला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी ‘इंटरनॅशनल मास्टर’ आणि अवघ्या बाराव्या वर्षी ‘ग्रँडमास्टर’चा किताब त्याने मिळवला. एवढ्या कमी वयात ‘ग्रँडमास्टर’ होणारा तो या खेळाच्या इतिहासातील केवळ दुसरा खेळाडू आहे. त्याची बहीण आर. वैशाली हीदेखील महिला ग्रँडमास्टर आहे. त्याचे वडील तमिळनाडू राज्य सहकारी बँकेत ब्रँच मॅनेजर आहेत, तर आई गृहिणी आहे.
विश्वनाथन आनंद हा भारताचा बुद्धिबळातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा खेळाडू. त्याच्याच गावचा रमेशबाबू प्रज्ञानंद आता लवकरच आनंदचे सर्व विक्रम मोडीत काढील आणि विश्वविजेता होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. डी. गुकेश हाही बुद्धिबळ खेळाडू भारताचे नाव सर्वत्र गाजवतो आहे. लहान वयात  ग्रँडमास्टर किताब पटकावणाऱ्या खेळाडूंत तो तिसरा आहे. तोही चेन्नईचाच आहे.  भविष्यात प्रज्ञानंद आणि गुकेश भारताला बुद्धिबळ खेळात अनेक विजय मिळवून देतील आणि तिरंगा उंच फडकावत ठेवतील, यात शंका नाही.
मित्रांनो, आज या तीन-चार खेळाडूंची यशोगाथा अगदी थोडक्यात पाहिली. याशिवाय आणखी पुष्कळ खेळाडू उत्तम कामगिरी बजावत आहेत आणि देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. तुम्ही त्यांची माहिती जरूर गोळा करा आणि तुमच्या नोंदवहीत लिहून ठेवा. अभ्यासासोबतच खेळणे आणि त्यात प्रावीण्य मिळविणे तितकेच महत्त्वाचे आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच. भविष्यात तुमच्यातूनही कुणी तरी लक्ष्य किंवा सिंधू किंवा अविनाश साबळे किंवा प्रज्ञानंद तयार होईल, यात शंका नाही. 


---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक २०२२)

----

No comments:

Post a Comment