प्रेरणादायी ‘काळा’ची कहाणी
-----------------------------------
‘मेड इन इंडिया - ए टायटन स्टोरी’ ही ॲमेझॉन प्राइम’वरची वेब सीरीज काल ‘बिंज वॉच’ केल्यानंतर दोन गोष्टी आधी सांगितल्या पाहिजेत. एक म्हणजे ही वेब सीरीज प्रत्येक भारतीयाने बघितली पाहिजे. दुसरी गोष्ट, मला झेर्क्सेक्स देसाई या माणसाविषयी याआधी काहीही माहिती नव्हती. अर्थात, टायटन या ब्रँडविषयी माहिती होती आणि टाटा या नावाचे आकर्षणही होते. या दोन्हींमुळेच कदाचित ही मालिका सलग पाहत गेलो आणि संपल्यावरच थांबलो.
टाटा उद्योगसमूहाविषयी भारतीय माणसाच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा आहे. याला काही कारणे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून टाटा घराण्याचे भारतीय उद्योग क्षेत्रात असलेले अतुलनीय योगदान, टाटा उद्योगसमूहाची कार्यसंस्कृती, टाटा परिवारातील बहुतेक बड्या लोकांची जीवनदृष्टी आणि त्यांचा साधेपणा, ग्राहकांचा कमावलेला विश्वास, केवळ उद्योगांची उभारणी न करता देशाच्या हितासाठी अनेक संस्थांची उभारणी, लोकोपयोगी कामे आणि एकूणच देशप्रेम या सर्वांमुळे सर्वसामान्य भारतीय माणसाला ‘टाटा’ हे नाव प्रिय आहे. या उद्योगसमूहाचा अभिमान आहे. याच टाटांनी ऐंशीच्या दशकात संपूर्णपणे भारतात तयार होणारे घड्याळ निर्मिण्याचा ध्यास घेतला आणि तो तडीसही नेला. या प्रवासात आलेल्या अडचणी, देशाची व जगाची तत्कालीन मानसिकता, परदेशी उद्योगांच्या नजरेतून भारत, कामगार-उद्योगपती संबंध, उद्योगपती-राजकारणी संबंध, लायसन्स राज, काळाबाजार, तस्करी आदी अनेक गोष्टींतून ही कथा उलगडत जाते. या कथेचे नायक आहेत झेर्क्सेक्स देसाई. त्यांनीच ‘मेड इन इंडिया’ घड्याळाचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, देसाई यांचे बॉस आणि मित्र जे. आर. डी. टाटा यांचे त्यांना याबाबत खूप मोलाचे मार्गदर्शन झाले. टाटा मंडळी कसा विचार करतात, त्यांचा उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, यशस्वी लोक यशस्वी का असतात हे देसाई आणि जेआरडी यांच्या संवादांतून समजते. जेआरडींच्या तोंडी असणारे अनेक संवाद तर ‘सुभाषिते’ म्हणून मनावर कोरून ठेवावेत असे आहेत. हे सगळे संवाद मुळातूनच ऐकायला हवेत. एखादा ब्रँड शून्यातून उभा करताना काय काय प्रसंग येतात, त्यावर ही मंडळी आपल्या बुद्धिचातुर्याने कशी मात करतात; कधी चुकतात, तर कधी योग्य ठरतात; त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांतील अडचणीवर कशी मात करतात हे सगळं दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल आपल्याला तपशीलवार दाखवतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देसाई आणि त्यांचे सहकारी कधीही हिंमत हरत नाहीत. चुकांवर मात करून पुढे जाण्याचा मार्ग शोधत राहतात.
या सर्व कथेला ‘मेड इन इंडिया’ची जोड आहे आणि तो प्रवास खूप भावनाशील आहे. खरे तर कुठलाही उद्योग महणजे फायदा-तोट्याची रुक्ष गणिते आणि एकूणच रोखठोक व्यवहार. मात्र, टाटांच्या विचारसरणीत याला जोड असते ती संवेदनशीलतेची. परदेशांतील लोकांकडून अपमान झाला की टाटा मंडळींमधले अस्सल भारतीयत्व जागे होते आणि ते आपल्या कर्तृत्वाने या सर्वांना लक्षात राहील असे उत्तर देतात. मुंबईतील ताजमहाल हॉटेलची उभारणी कशी झाली हे आपल्याला माहिती आहे. टाटांच्या ‘टायटन’चा जन्मही असाच परदेशातून आलेल्या नकारातून झाला. पुढे या ब्रँडने एवढे यश मिळवले, की ज्या फ्रेंच घड्याळ कंपनीने (फावरलुबा) सुरुवातीला या ब्रँडला तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता, तीच कंपनी ‘टायटन’ने नंतर विकत घेतली. भारत सरकारच्या मालकीच्या ‘एचएमटी’ या उपक्रमाची घड्याळे तेव्हा भारतात अतिशय लोकप्रिय होती. मात्र, ती किल्लीची, मेकॅनिकल घड्याळे होती. टाटांनी क्वार्ट्झ तंत्रज्ञान आणून क्रांती केली. काळाच्या पुढचा विचार केला नाही, तर एखादा ब्रँड कसा नामशेष होतो आणि एखादा कसा तगून राहतो, याची ही दोन उदाहरणे. मालिकेत ‘जीएमटी’ नावाने येणाऱ्या एचएमटीची ही बाजूही यात नकळतपणे समोर येते.
टाटांनी ‘टायटन’ ब्रँड कसा उभा केला, याचा हा सर्व प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. तो पाहताना एक भारतीय म्हणून आपल्याला अतिशय अभिमान वाटत राहतो. भारताने १९८३ मध्ये पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला तो प्रसंग, किंवा महिला हॉकीतील यशावर आधारित ‘चक दे इंडिया’सारखा चित्रपट किंवा ‘इस्रो’ने चंद्रावर आपले यान उतरवणे या सर्व घटना आपल्याला जेवढ्या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद वाटतात, त्याच जातकुळीतील ही ‘टायटन’ची ‘मेड इन इंडिया’ कहाणी आहे. सहा भागांच्या या मर्यादित मालिकेत बाजी मारून गेला आहे तो जिम सरभ हा अभिनेता. यापूर्वी ‘रॉकेट बॉइज’मध्ये आपण त्याला होमी भाभांची भूमिका उत्तमरीत्या निभावताना पाहिले आहे. एकूणच आता ऐतिहासिक पारशी वा गुजराती व्यक्तींच्या भूमिका करण्यासाठी जिम एकदम तयार आहे, असे दिसते. जेआरडींच्या भूमिकेत नसीरुद्दीन शहा अगदी शोभून दिसले आहेत. जेआरडींच्या व्यक्तिमत्त्वातला रुबाब, तो पारशी गोडवा आणि अनुभवाने चेहऱ्यावर आलेले शांत-शीतल तेज हे सर्व नसीरुद्दीन शहांसारखे कसलेले अभिनेते व्यवस्थित दाखवतात. (फक्त फ्रेंच उत्तम बोलता येत असलेले जेआरडी फ्रेंच कंपनीच्या मालकाशी दुभाषा घेऊन बोलताना दाखवले आहेत, हे खटकतं.) तीच गोष्ट जिम सरभच्या विगची. तो विग अगदी कृत्रिम दिसतो आणि अजिबात नीट नाही.
यात वैभव तत्त्ववादीने साकारलेली आकाश दीक्षित ही देसाईंच्या मित्राची व्यक्तिरेखा आहे. अशी काही व्यक्ती खरोखर होती की ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे याची कल्पना नाही. विनय कामत यांच्या पुस्तकावर ही वेबसीरीज बेतलेली आहे. त्यांनी पुस्तकात या कथनासाठी हे पात्र निर्मिले आहे का, हे माहिती नाही. याचे कारण मी मूळ पुस्तक वाचलेले नाही. वैभव तत्त्ववादीने त्याची भूमिका व्यवस्थित निभावली आहे. मात्र, त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आकाश दीक्षित असताना आणि त्याच्या घरातले लोक मराठी बोलत असलेले दिसत असताना क्रेडिटमध्ये मात्र त्याच्या पात्राचे नाव ‘आकाश बन्सल’ असे लिहिलेले दिसते. ही चूक अक्षम्य आहे. यात मेघा म्हात्रे या पात्राच्या रूपाने आणखी एक मराठी पात्र आहे. तिच्या आईच्या छोट्याशा भूमिकेत प्रतीक्षा लोणकर दिसतात. ही मेघा आणि गौरव धर (जे वास्तवातील या कंपनीचे नंतरचे एमडी भास्कर भट आहेत...) यांच्या हळुवार प्रेमकहाणीचा साइड ट्रॅकही आपल्याला यात दिसत राहतो. गौरवचे काम करणाऱ्या अभिनेत्यानेही चांगले काम केले आहे.
‘टायटन’ हे नाव कसे सुचले, ‘टायटन’च्या टीव्हीवरच्या पहिल्या जाहिरातीसाठी मोझार्टची धून वापरण्याची कल्पना कशी सुचली, पहिल्या दोन कर्मचाऱ्यांच्या मुलाखती, तमिळनाडूत जमीन पाहण्यासाठी केलेली कसरत, बॉम्बे हाउसमधले वातावरण, तत्कालीन मुंबईतली नॉस्टॅल्जिक करणारी दृश्ये, चोरबाजारातील घड्याळांचा काळाबाजार, सुरुवातीला उत्तर भारतात घड्याळांचा खप कमी व दक्षिण भारतात जास्त का व त्याचे मिळालेले अनपेक्षित उत्तर, एका अनाहूत लग्नसमारंभात घुसून मार्केटिंग हेडने दाखवलेली ‘वेडिंग गिफ्ट’ म्हणून ‘टायटन’ देण्याची अभिनव कल्पना असे अनेक रंजक प्रसंग मालिकेत आहेत. त्यामुळे आपण सुमारे साडेपाच तासांच्या या प्रवासात चांगलेच गुंतून राहतो.
थोडक्यात, काही चुका वा त्रुटी सोडल्या तर एकूण ही मालिका निश्चित पाहावी अशी आहे. सध्या ‘मेड इन इंडिया’चा बोलबाला असताना, ऐंशीच्या दशकात, उदारीकरणाच्या आधी टाटा समूहातील एक व्यक्ती भारतीय बनावटीचे, काळाच्या पुढचे तंत्रज्ञान वापरणारे मनगटी घड्याळ तयार करण्याचा ध्यास कसा घेते आणि अनेक प्रयत्नांनी तो कसा यशस्वी करून दाखवते, याची ही प्रेरणादायी कहाणी आपण तर बघावीच; शिवाय आपल्या पुढच्या पिढीला, घरातील कुमारवयीन किंवा तरुण मुलांना तर आवर्जून दाखवावी.
---
(ओटीटी - ॲमेझॉन प्राइम)
---


No comments:
Post a Comment