13 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - भाग मिल्खा भाग

आपल्या नसानसांतून 'धावणारा' प्रेरणापट...




भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांची - ज्यांना सर्व जग गौरवानं 'फ्लाइंग सिख' म्हणून ओळखतं - अपूर्व जीवनगाथा कधी तरी हिंदी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर झळकेल, अशी आपण कल्पनाही केली नव्हती. परंतु राकेश ओमप्रकाश मेहरा या आघाडीच्या दिग्दर्शकानं हे आव्हान पेललंय आणि त्यांनी हा मिल्खा नावाचा अवलिया धावपटू पडद्यावर अक्षरशः जिवंत केलाय. मेहरांसोबतच हा मिल्खा जगणारा अभिनेता फरहान अख्तर याचंही श्रेय तेवढंच महत्त्वाचं. या दोघांच्या ध्यासातून साकारलेला हा सिनेमा पाहणं म्हणजे एक भावनोत्कट अनुभव आहे. चांगला सिनेमा या व्याख्येच्या तांत्रिक फूटपट्ट्यांमध्ये 'भाग मिल्खा भाग' बसत नसेलही... किंबहुना नाहीच बसत - परंतु तरीही तो एक मस्ट वॉच सिनेमा आहे. याचं कारण या सिनेमाच्या कथानायकाशी या देशाचं आणि देशातील प्रत्येक नागरिकाचं जैव नातं जडलेलं आहे; रक्ताचं नातं जडलेलं आहे. हे नातं तुटलेल्या मायभूमीचं आहे, डोळ्यांसमोर 'कत्ले-आम' झालेल्या सर्व आप्तेष्टांचं आहे, या देशाचा ब्लेझर अंगावर मिरविण्याच्या अभिमानाचं आहे, लाखो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर तिरंगा लहरत असताना आणि राष्ट्रगीत वाजत असताना ऊर भरून येण्याचं आहे... फाळणीच्या जखमा घेऊन निर्वासितांच्या कॅम्पमध्ये दीनवाणेपणे जगताना डोळ्यांत भव्य स्वप्न घेऊन जगायचं आहे, कष्ट-निर्धार आणि समर्पणातून शून्यातून विश्व उभं करण्याचं ते नातं आहे आणि त्यामुळंच प्रत्येक भारतीय प्रेक्षक कथानायकाच्या प्रत्येक व्यथेशी आणि प्रत्येक यशाशी एकरूप होतो. सध्या हयात असलेल्या एखाद्या गाजलेल्या व्यक्तिमत्त्वावर सिनेमा बनविताना प्रेक्षकांना त्याची ही पूर्वपीठिका माहिती असणं हा नक्कीच त्या सिनेमासाठी पूरक घटक ठरतो. अर्थात मिल्खासिंग कोण आहेत आणि या देशाच्या क्रीडा इतिहासात त्यांचं नक्की काय स्थान आहे, याचा केवळ पाठ्यपुस्तकातला धडा असावा तसा हा सिनेमा नाही, हेही इथं आवर्जून नमूद करायला हवं. ही मिल्खासिंग नावाच्या माणसाची स्वतःशी चाललेली लढाई आहे आणि या लढाईत तो काय जिद्दीनं विजय मिळवतो, याची ही वीरविजयगाथा आहे. अॅथलिट मिल्खासिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा सिनेमा म्हणून हा सिनेमा पाहायला जाल, तर फसगत होईल. क्रीडा क्षेत्रातील आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर मिल्खासिंग यांनी ४०० मीटर्सच्या शर्यतीत ४५.८ सेकंदांचं वर्ल्ड रेकॉर्ड त्या काळात स्थापन केलं, हे त्यांचं सर्वोच्च यश होतं. अॅथलेटिक्सच्या 'ट्रॅक अँड फिल्ड' प्रकारात तोपर्यंत कोणीही भारतीय एवढ्या उत्तुंग कामगिरीच्या जवळही गेला नव्हता. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिकमध्ये आलेल्या अपयशानंतर मिल्खासिंग यांचे डोळे उघडले. त्यांनी त्यानंतर अफाट मेहनत करून टोकियोच्या एशियाडमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली (तीही त्या वेळी आशियात अव्वल धावपटू म्हणून गाजत असलेल्या पाकिस्तानच्या अब्दुल खलीदला हरवून) आणि त्यानंतर कार्डिफमधील कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारताला ४०० मीटर्समध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यामुळंच १९६० च्या रोम ऑलिंपिक स्पर्धेत पंतप्रधान पंडित नेहरूंपासून सर्व देशवासीयांना मिल्खासिंग यांच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती. मात्र, या सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धेत मिल्खासिंग चौथ्या स्थानावर फेकले गेले. ही वास्तवातल्या मिल्खासिंग यांच्या करिअरची आकडेवारी आहे.
सिनेमा हे सगळं सांगतो, पण तो सिनेमाचा केंद्रबिंदू नाहीच. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातल्या गावात धर्मांधांकडून वडिलांचं डोकं उडवलं जात असताना, भाग मिल्खा भाग या त्यांच्या जीवघेण्या आरोळीपासून कायम धावतच राहिलेल्या एका शूर सरदार मुलाची ही गोष्ट आहे. दिल्लीतल्या निर्वासित कॅम्पमध्ये जगत असताना बहिणीच्या आसऱ्यानं मोठं झालेल्या एका एकाकी मुलाची ही कथा आहे. उमलत्या वयात बीरोवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या, नंतर प्रेमभंग झाल्यावर आर्मी जॉइन करणाऱ्या आणि एक ग्लास दुधाच्या अपेक्षेनं धावण्याची शर्यत जिंकण्याची उमेद ठेवणाऱ्या एका साध्या-भोळ्या भारतीय तरुणाची ही कहाणी आहे. मिल्खासिंग नावाच्या तरुणाची ही गोष्ट अशी प्रातिनिधिक पातळीवर नेऊन दिग्दर्शकानं फार मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळं ही फक्त एका गाजलेल्या क्रीडापटूची चरित्रवजा मांडणी उरत नाही... तर जगातल्या प्रत्येक अडथळ्यावर, संकटावर जिद्दीनं मात करण्याची प्रेरणा जागवणाऱ्या तरुणाईची ही गोष्ट बनते.
राकेश ओमप्रकाश मेहरा आपल्या कलाकृतीवर अफाट मेहनत घेतात. ते प्रत्येक दृश्यात जाणवतंही. पीरियड फिल्म बनवणं, त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं कलादिग्दर्शन असणं या आता फार अवघड गोष्टी नाहीत. मेहनतीच्या जरूर आहेत. मेहरांसारख्या दिग्दर्शकाकडून ती किमान अपेक्षा असतेच. मेहरांची एक विशिष्ट शैली आहे. एखादा विलंबित ख्यालातला राग गायकानं तब्येतीनं रंगवावा, अशी त्यांची मांडणी असते. आता अनेकांना ही मांडणी कंटाळवाणी वाटू शकते. नव्हे, वाटतेच. त्यामुळंच तीन तास आठ मिनिटांचा हा लांबलचक सिनेमा पाहताना हे सगळं एवढं यात हवंच होतं का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मेहरा मात्र प्रत्येक तपशील खुलवून, सावकाश सांगण्यावर भर देतात. पूर्वार्धात या प्रकारच्या मांडणीचा कंटाळा येऊ शकतो. उत्तरार्धात मिल्खासिंग यांची मैदान मारण्याची कामगिरी सुरू होते आणि कथेलाही थोडा वेग येतो. अर्थात मिल्खासिंग यांच्या करिअरमधला सर्वोच्च बिंदू म्हणजे त्यांनी सेट केलेलं ४५.८ सेकंदांचं वर्ल्ड रेकॉर्ड. मात्र, मेहरांच्या गोष्टीत ही बाब क्लायमॅक्सला येत नाही. रोममधला त्यांचा जिव्हारी लागणारा पराभवही नाही. किंबहुना तो पराभव सुरुवातीलाच त्यांनी दाखविला आहे. याउलट पाकिस्तानबाबत लहानपणी अत्यंत कटू भावना असताना, नेहरूंच्या आग्रहाखातर लाहोरला जाणं आणि तिथं पुन्हा एकदा खलिदला हरवून अयूब खान यांच्याकडून फ्लाइंग सिख हा गौरव मिळवणं या बिंदूवर सिनेमाचा शेवट करण्याचा निर्णय दिग्दर्शकानं घेतला आहे. तेवढी सिनेमॅटिक लिबर्टी त्यांना आहे, कारण या बिंदूमध्ये असलेलं नाट्य रंगवणं दिग्दर्शकाला मोह पाडणारंच आहे. मिल्खासिंग यांचं पाकिस्तानात जाणं, आपल्या मूळ गावाला, घराला भेट देणं हे सगळं दाखवून मग तेथील मित्रत्वाच्या शर्यतीत त्यांनी खलिदला हरवणं यात अनेक प्रतीकं सामावलेली आहेत. मेहरांनी ती नेमकी टिपलीयत.
सिनेमाची कथा सांगताना दिग्दर्शकानं अनेक फ्लॅशबॅक, तर कधी फ्लॅशबॅकमध्ये आणखी एक फ्लॅशबॅक असे प्रकार वापरले आहेत. 'सेपिया टोन'विषयी मेहरांना असलेली प्रीती आता सर्वांना माहिती आहे. सेपियाटोनचे फ्लॅशबॅक जमले असले, तरी पूर्वार्धात ते बरेचसे ताणले गेले आहेत. विशेषतः आर्मी कॅम्पमधले प्रसंग, बीरोबरोबरचे प्रेमप्रसंग, मेलबर्नमधली नाचगाणी, छोटीसी लव्हस्टोरी हे सगळं आणखी कट-शॉर्ट करता आलं असतं, असं वाटत राहतं.
बिनोद प्रधान यांची सिनेमॅटोग्राफी आणि शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत या दोन्ही गोष्टी सिनेमाच्या दर्जात भरच घालतात. विशेषतः मिल्खा व कोच रणबीरसिंग यांचे लडाखमधले प्रसंग अप्रतिम जमले आहेत. विशेषतः'जिंदा' हे गाणं जमलेलं.
अभिनयाबाबत बोलायचं तर फरहाननं हा सिनेमा खाऊन टाकलाय. त्याच्या या भूमिकेविषयी कितीही विशेषणं वापरली, तरी ती कमीच पडतील. मिल्खासिंग यांनी स्वतःच फरहानला 'तुझ्यात माझा भास होतो,' असं प्रमाणपत्र दिलंय. आता याहून मोठं बक्षीस काय हवं? फरहानला यंदा अभिनयाची बरीच अॅवॉर्ड मिळतील, यात शंका नाही. त्याची मेहनत प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते. कायाकल्प वगैरे शब्द आपण नुसतेच ऐकतो. त्याचा अर्थ काय, हे पाहायचं असेल, तर या सिनेमातल्या फरहानकडं पाहावं. खास त्याच्या या रोलसाठी हा सिनेमा पाहायला हरकत नाही. बाकी सोनम कपूर, पवन मल्होत्रा, प्रकाश राज, योगराजसिंग यांनीही आपापली कामं छान केली आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री मीशा शफीनं जलतरणपटू पेरिझादच्या छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. मिल्खाच्या वडिलांच्या भूमिकेद्वारे हॉलिवूड कलाकार आर्ट मलिक यांनीही प्रथमच हिंदी चित्रपटात काम केलंय. विशेष उल्लेख करावा लागेल तो मिल्खाच्या बहिणीची भूमिका करणारी दिव्या दत्ता आणि छोट्या मिल्खाची भूमिका करणारा जपतेजसिंग यांचा.
तेव्हा मिल्खासिंग यांची ही प्रेरणादायी कथा नक्की पाहा. त्यांच्या प्रत्येक धावेच्या वेळी आपणच धावतोय असं वाटेल... जणू आपल्या रक्तातून, नसानसांतून ही धाव येतेय, असा फील येईल आणि आपल्याला आपलाच अभिमान वाटेल!
---

निर्मिती - राकेश मेहरा, व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा
पटकथा-संवाद - प्रसून जोशी
संगीत - शंकर-एहसान-लॉय
सिनेमॅटोग्राफी - बिनोद प्रधान
प्रमुख भूमिका - फरहान अख्तर, सोनम कपूर, दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा, योगराजसिंग, दलीप ताहिल, जपतेजसिंग, मीशा शफी, रिबेका ब्रीड्स आदी.
दर्जा - ****
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, पुणे - १३ जुलै १३)
----

6 comments:

  1. श्रीपादा,
    कालच तर बोललो ना तुझ्याशी.
    तुझा सल्ला घेण्यासाठी फोन केला होता.
    अन् तू जे काही बोललास त्यामुळे, एकट्याने नाही, सहकुटुंब पाहायचा हा चित्रपट, असे ठरले. त्यामुळे बेत लांबला. तो योग उद्या येतोय.
    पण, श्री, हे परीक्षण वाचून मी खरेच भारावलो.
    रुढ अर्थाने हे परीक्षण नाही. प्रशिक्षणही आहे वाचकाचे.
    धावणा-या मिल्खाला पकडले आहेस तू,
    तुझ्या खास शैलीत.
    तू तसाच आहेस, तरल, हळवा, पण नेमका!
    वाचताना ते पुन्हा जाणवले.
    उद्याच मिल्खा पाहणार...

    - संजय आवटे

    ReplyDelete
  2. tu lihilelya parikshanamulech tya movie la nyay milato...apratim likhan kelay...lihitana shadb tuzya samor ubhe rahatat janu...

    ReplyDelete