2 Feb 2016

मुंबई ट्रिप ट्रॅव्हलॉग

पुणे-मुंबई-पुणे
---------------


मुंबईला जाणं फार क्वचित होतं. माझं कुणीही जवळचं नातेवाइक तिथं नाही. अन्य काही फार कामं असतात, असंही नाही. पण तरी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मला मुंबईला जायला आवडतं. मी या शहराच्या प्रेमात आहे. जगातले लाखो लोक या शहराच्या प्रेमात आहेत, तसंच! मी कुणी वेगळा नाही. तरी प्रत्येक अनुभव हा खास आपला असतो आणि तो शेअर करायला मला आवडतं, म्हणूनच हा मुंबईवरचा खास ब्लॉग लिहावासा वाटतोय.
या वेळचं निमित्त माझ्या मामेभावामुळं घडलं. ओंकार देशपांडे हे त्याचं नाव. हा माझा सख्खा व एकमेव मामेभाऊ. तो माझ्यापेक्षा बराच, म्हणजे १४ वर्षांनी लहान आहे. पण जेव्हा तुम्ही ४० आणि २६ वर्षांचे असता, तेव्हा मित्रच जास्त असता. तर ओंकार आता माझा मित्रच आहे, असं म्हणायला हरकत नाही. तो आयटीत आहे. गेली दोन वर्षं तो मुंबईत नोकरी करतोय. अर्थातच सिंगल आहे. तो कित्येक दिवस मला मुंबईत बोलवत होता. मुंबईत मनसोक्त फिरायचं माझं स्वप्न त्याला माहिती होतं. म्हणून तो कायमच मला बोलवायचा. अखेर नुकतीच त्याची पुण्याला बदली झाली. तो आता फक्त पंधरा दिवस मुंबईत असणार होता. तेव्हा मात्र मी ३० जानेवारीच्या शनिवारी मुंबईत जायचं निश्चित केलं. माझं एक किरकोळ कामही होतं प्रभादेवीला. पण ते अगदी मस्ट होतं असंही नाही. पण या दोन गोष्टींमुळं मी उचल खाल्ली आणि शनिवारी एक दिवस मुंबईला जायचं ठरवलं. माझी बायको (आणि मुलगा) तिच्या मैत्रिणींबरोबर गेट-टुगेदर करण्यासाठी याच दिवशी साताऱ्यात जाणार होती. त्यामुळं तर माझा निश्चय पक्काच झाला.
मुंबईला जायचं तर ट्रेननं जायला मला आवडतं. ट्रेनचं ऑनलाइन बुकिंग करणं, त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं या साध्या साध्या गोष्टी मी भयंकर कंटाळ्यामुळं आजतागायत केलेल्या नाहीत. त्यामुळं मित्रवर्य अभिजित पेंढारकरला साकडं घातलं. त्यानं दोन मिनिटांत माझं प्रगती एक्स्प्रेसचं ऑनलाइन तिकीट काढून टाकलं. (प्रगती का, तर सव्वासातची डेक्कन क्वीन गाठायची, म्हणजे वारज्याहून पावणेसातला निघावं लागतं. थंडीत हे व्याप फार होतात.) बुधवारी तिकीट काढलं, तेव्हा ते वेटिंग ५९ होतं. मात्र, शुक्रवारी रात्री आठ वाजता ते कन्फर्म झालं आणि मी हुश्श केलं. सकाळी बाइक घेऊन निघालो. गाडीत पेट्रोल कमी होतं. पण उशीर होईल असं वाटल्यानं मी तशीच गाडी दामटली आणि स्टेशनच्या पार्किंगमध्ये लावून टाकली. पुण्यात रात्री-बेरात्री परत आल्यावर रिक्षावाल्यांचा जाच सहनशक्तीच्या पलीकडे असतो. त्यामुळं स्वतःची बाइक नेणं हा फारच सोयिस्कर पर्याय असतो. त्या पार्किंगचे ५० रुपये गेलेले लय वेळा परवडतात. तर मी बरोबर ७.४० वाजता स्टेशनात होतो. प्रगती एक्स्प्रेस एक नंबरच्याच प्लॅटफॉर्मला थांबेल, अशी माझी अपेक्षा होती. (आणि ती काही चुकीची म्हणता येत नाही.) पण डेक्कन क्वीनचा मान प्रगतीला नसतो, हे माझ्या लगेच लक्षात आलं. तिथं जो डिस्प्ले होता, ज्यावर गाड्या आणि प्लॅटफॉर्म नंबर दिलेले असतात, तिथं प्रगती एक्स्प्रेसचं नाव होतं पण समोर प्लॅटफॉर्मच्या जागी डॅश होता. माझं डोकंच हललं. तेवढ्यात एका माणसानं सांगितलं, की प्रगती पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मला आहे. मग अक्षरशः पळत गेलो. आपण ज्या जिन्यानं उतरतो त्याच्या विरुद्ध बाजूला नेहमी आपला डबा असतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळं मग पुन्हा उलटा चालत डी-६ या माझ्या डब्यात घुसलो.
शनिवार असला, तरी (की त्यामुळेच?) गाडीला 'य' गर्दी होती. मी माझ्या जागेवर बसलो. तीन सीटची ही बाकडी रेल्वेनं एवढी लहान काढली आहेत, की जरा ते बाकडं रुंदीला जास्त असेल, तर तिथं चौथा माणूस बसेल अशी भीती त्यांना वाटत असावी. त्यामुळं तिसऱ्या सीटवर बसणारा जवळपास प्रत्येक माणूस 'सरका जरा' हे वाक्य बोलूनच तिथं बसत होता. अनेक जण तर काटकोनात फिरून मधल्या जागेकडं पाय करून बसतात. माझ्या पलीकडं बसलेले एक सत्तरीतले आजोबा आणि पासष्टीतल्या आजी होत्या. (ते कन्नड की तेलगू भाषिक होते, हे नंतर कळलं.) त्यांच्याकडं 'टाइम्स ऑफ इंडिया' होता. कर्जतनंतर तो माझ्याकडंच असणार आहे, हे मी मनाशी पक्कं बोलून ठेवलं. प्रवास सुरू झाला, की माझा कॅमेरा सुरू होतो. आजूबाजूच्या लोकांकडं पाहणं (म्हणजे त्यांचं निरीक्षण करणं) हा माझा छंद. माझं एक निरीक्षण असं, की मुंबईला जाताना तुमच्या डब्यात एक तरी बुरखाधारी मुस्लिम महिला आणि कुटुंब असतंच. याही वेळी ते होतंच. उलट संख्या जास्तच होती. माझ्या शेजारी मधल्या पॅसेजमध्ये एक राजस्थानी मुलगा आणि दुसरा एक त्याचा मित्र असे उभे होते. ते अखंड बडबडत होते. तो मुलगा मला डिसेंट वाटला. काही तरी उद्योगधंदा शोधण्यासाठी मुंबईला निघाला असावा, असं वाटत होतं. माझे शेजारी आजोबा रिझर्व्ह कॅटॅगरीतले होते. माझ्याशी सोडाच, पण ते एकमेकांशीही फारच क्वचित बोलत होते. तासाभरानंतर गाडीत नाश्ता-नाश्ता, चाय-कॉफीच्या आरोळ्या सुरू झाल्या, तसं आजोबांनी पार्सल आणलेलं चीज सँडविच काढलं. म्हणजे दोन सँडविच होते. एक आपल्या पत्नीला देऊन दुसरं त्यांनी खाल्लं. अगदी शिस्तीत. मी 'इटली-वडा-चटणीय्ये'ची वाट पाहत होतो. (या लोकांमध्ये काही जण इडलीला इटली म्हणतात; तर जे इडली असं म्हणतात, ते मेदूवड्याला मेंदूवडा म्हणतात. दोन्हींचा बरोबर उच्चार केल्यास त्यांचा परवाना रद्द होतो!) मी ज्याच्याकडून घेतली, तो 'इटली'वाला होता. मी दोन्ही मिक्स मागितलं, तर त्यानं तीन 'इटल्या' आणि एक 'मेदूवडा' दिला. हे कॉम्बिनेशन त्यानंच ठरवलं. द्रोणात हे चार पदार्थ टाकून त्यावर बऱ्यापैकी चटणीची आंघोळ घालून तो निघूनसुद्धा गेला. हे खाणं झाल्यावर मग कॉफी हवीच होती. (कारण इथं येणारा चहा डिपवाला होता. तो मला आवडत नाही.) कॉफीपान झाल्यावर आणि गाडी घाट उतरायला लागल्यावर मग एकूणच जरा डब्यात स्थैर्य आलं. व्हॉट्सअपवर माझा व पेंढारकरचा संवाद चालू होता. त्यामुळं पनवेलला गाडी पोचली तेव्हा ती लेट आहे हे कळलं. प्रगतीची ही अधोगती नक्की कुठं झाली, ते मला आठवेना. कारण गाडी निघाली, तेव्हा अगदी वेळेत होती. शिवाय मध्ये घाटात एक-दोन मिनिटं उभी असेल, तेवढंच. मला काही घाई नव्हती हे खरंच. पण गाडी दादरला पोचायच्या वेळेत ठाण्यातच उभी होती. ओंकार दादरला येऊन थांबला होता. दिवा स्टेशनापासून पुढं लोकल दिसायला लागतात. लोकलच्या दारात लटकून मुंबईकर निघालेले असतात. लोकल आणि एक्स्प्रेसची शर्यत सुरू असते. दोन्हीकडचे लोक अगम्य अशा नजरांनी एकमेकांकडं पाहत असतात. हे दृश्य पाहायला मला फार आवडतं. (बाय द वे, माझ्या शेजारचे आजी-आजोबा ठाण्याला उतरल्यामुळं मला विंडो सीट मिळाली होती.) अखेर १०.५४ ची वेळ टळून अर्धा तास झाल्यानंतर प्रगती साडेअकराला दादरला पोचली. ओंकार भेटला. आम्हाला आधी प्रभादेवीला जायचं होतं. आज फक्त बस आणि लोकलनंच फिरायचं हे मी ओंकारला सांगितलं होतं. त्यामुळं लगेच दादर ईस्टकडून वेस्टला आलो आणि केशवसुत उड्डाणपूल ओलांडून आम्ही कबुतरखान्याला आलो. गोखले रोड होता बहुतेक. तिथून प्रभादेवीची बस पकडली. मुंबईची बेस्ट नावाची ही जी काही बससेवा आहे, ती फारच बेस्ट आहे. आम्हाला जिथं जायचं होतं, तिथं जायला आठ रुपये तिकीट होतं. जाताना सचिनची शारदाश्रम शाळा दिसली. चार स्टॉप गेल्यानंतर आमचा स्टॉप आला. आदल्या दिवशी अतिशहाणपणा करून गुगल मॅपवर मी सगळं पाहून ठेवलं होतं. त्यामुळं सयानी रोड अशी पाटी दिसताच आम्ही तडक त्या रस्त्यानं निघालो. (मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं महापालिकेनं रस्त्याला दिलेलं नावच सगळीकडं वापरतात. आणि रस्त्यावर शिस्तीत त्या नावाचा बोर्ड पिनकोडसकट मौजूद असतो.) रवींद्र नाट्य मंदिर चौकाच्या दुसऱ्या बाजूला असू शकतं, हे लक्षात न घेता, आम्ही परळ डेपोपर्यंत चालत गेलो. मग अक्कल विकत घेऊन पुन्हा मागच्या चौकात आलो. (गुगल मॅप वापरण्यापेक्षा तिथल्या दुकानदाराला विचारणं केव्हाही योग्य असतं, हा धडा!)
रवींद्र नाट्य मंदिर दिसलंच. शेजारीच पु. ल. देशपांडे अकादमी होती. तिथं एक प्रदर्शन सुरू होतं. ते पाहिलं. पुण्यातलेच किशोर गुमास्ते यांनी नृत्यमुद्रांच्या छायाचित्राचं प्रदर्शन भरवलं होतं. त्यांच्याशी बोललो. हे गृहस्थ वकील आहेत, पण छंदापोटी त्यांनी हा व्याप केला होता. आणखीही एक अमृता काळे नावाच्या गायिका आल्या होत्या. त्यांचीही ओळख झाली. मग आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. तिथं फुलांच्या सजावटीचं एक प्रदर्शन भरलं होतं. तेही मस्त होतं. ते पाहून खाली उत्सव नावाचं हॉटेल होतं, तिथं जेवलो. त्या हॉटेलमध्ये अक्षरशः कुणीही नव्हतं. आपण मुंबईत आहोत की कुठं, असा मला क्षणभर प्रश्न पडला. नंतर काही लोक आले. मुंबईकरांची जेवायची वेळ दोननंतर असते, असं ओंकारनं सांगितल्यावर याचा उलगडा झाला. पण तिथं जेवण अप्रतिम चवीचं होतं. हराभरा कबाब मसाला नावाचा एक पदार्थ घेतला होता. भारीच होता. तुडुंब जेवल्यानंतर खरं तर बाहेर पडायचा कंटाळा आला होता. पण आम्हाला मेट्रो आणि मोनोरेलची सैर करायची होती. बाहेर पडल्यानंतर माझा आत्येभाऊ साईनाथ याचा मेसेज आला, की तोही मुंबईलाच यायला निघालाय म्हणून. (माझं एफबीवरचं स्टेटस त्यानं पाहिलं होतं.) मला आनंद झाला. कारण जाताना मला त्याची चांगली कंपनी असणार होती. माझा हा आत्येभाऊ चित्रकार आहे. गायतोंडेंवरच्या पुस्तकाचं प्रकाशन संध्याकाळी मुंबई विद्यापीठात होणार होतं. तिथं तो निघाला होता. मला हा कार्यक्रम आहे, हे माहिती होतं. पण एकट्यानं तिकडं जायचं की नाही, याचा मी विचार करीत होतो. पण आता साईनाथ येतोच आहे, म्हटल्यावर मी सहा वाजता राजाबाई टॉवरला पोचायचं नक्की केलं. पु. ल. अकादमीतून बाहेर पडून आम्ही सिद्धिविनायकाकडं चालत निघालो. जाताना रस्त्यावर एक टपरीवजा हॉटेल दिसलं. तिथं लोक ताटात पोळी-भाजी, वरण-भात असं जेवत होते. आम्ही हॉटेलात आत्ता जेवढे पैसे खर्च केले, त्याच्या एक दशांश रकमेत हे जेवण मिळत होतं. मुंबईचं हेच वैशिष्ट्य आहे आणि ते मला आवडतं. वीर सावरकर मार्गानं उजवीकडं वळून सिद्धिविनायकापाशी पोचलो. पण तिथं बरीच रांग होती. म्हणजे रांग असणार हे आम्ही अपेक्षितच धरलं होतं. पण ही जास्तच मोठी रांग होती. अखेर दारातूनच सिद्धिविनायकाला नमस्कार केला आणि निघालो. दादर स्टेशनला जाण्यासाठी एक बस पकडली. ती बस लांबून जात होती. पण आम्हाला बरंच वाटलं. रानडे रोड, गोखले रोड, केळकर रोड, गडकरी चौक, टिळक पूल असा सगळा कोकणस्थी-सारस्वती मार्गी प्रवास करून आम्ही प्लाझापाशी उतरलो. स्टेशनात गेलो. वेस्टर्न लाइनवर बोरिवली लोकल पकडून अंधेरीला आलो.
 अंधेरी स्टेशनातूनच मेट्रो स्टेशनकडे जायला स्कायवॉक केला आहे. हे सगळं बघायला भारी वाटत होतं. मी दिल्लीत मेट्रोतून बराच फिरलोय. त्यामुळं मेट्रोचं तितकंसं आकर्षण नव्हतं. पण मुंबईतून मेट्रोमधून फिरण्याचं नक्कीच होतं. आम्ही अंधेरी स्टेशनला घाटकोपरचं तिकीट काढलं. पण माझा भाऊ म्हणाला, की आपण इथून वर्सोव्याला जाऊ व तिथून थेट घाटकोपरला जाऊ. आम्हाला प्लास्टिकचे कॉइन मिळाले होते. वर्सोव्याला आपल्याला पकडतील असं मला वाटलं. पण त्या यंत्रणेतला हा दोष माझ्या भावाला माहिती होता. त्यामुळं आम्ही घाटकोपरच्या मेट्रोत न चढता उलट्या, म्हणजे वर्सोव्याला जाणाऱ्या मेट्रोत चढलो. दोनच स्टेशनं गेल्यावर वर्सोवा आलं. मग आम्ही उतरून खाली आलो आणि पुन्हा दुसऱ्या एस्कलेटरनं चढून घाटकोपरला जाणाऱ्या मेट्रोच्या फलाटावर आलो. वास्तविक, वर्सोव्याला बाहेर पडणारा प्रवासी हा थेट स्टेशनच्या बाहेरच पडला पाहिजे. मात्र, तिथं तशी काही व्यवस्था नव्हती. त्यामुळं आम्ही त्याच तिकिटात घाटकोपरला जाणार होतो. (अंबानींना फसवल्याचं किरकोळ समाधान आम्हाला लाभलं.) तेवढ्यात मेट्रो आलीच आणि आम्ही घाटकोपरला निघालो. फारशी गर्दी नव्हती.
आम्ही फोटोबिटो काढून मेट्रो पर्यटन पूर्ण केलं. अंधेरीला मात्र जरा गर्दी झाली. अर्ध्या तासात घाटकोपर आलं. राइड छानच झाली. घाटकोपरला उतरून आम्ही चेंबूरची बस पकडली. तिथं मोनोरेलच्या स्टेशनाखालीच बस थांबली. मग बस सोडून मोनोच्या स्टेशनात गेलो. मेट्रोच्या मानानं हे जरा गरीब प्रकरण वाटलं. (पुलंच्या भाषेत सांगायचं, तर मेट्रो मॅनेजर असेल, तर मोनो लोअर डिव्हिजन क्लार्कच्या इतमामानं राहते...)
 मोनोतून प्रवास करणारे एकूण आमच्यासारखे हौशे-नवशे-गवशेच दिसले. काही शाळेतली पोरं होती. नववी-दहावीतली असावीत. त्यातला एक जण प्लॅटफॉर्मवर शिट्ट्या मारत होता. तो गाडीत बसल्यावरही शिट्ट्या मारत होता, हे पाहून मोनोचा एक सुरक्षारक्षक आला आणि त्यानं त्या पोराला झापला. परत शिट्टी वाजवली, तर खाली उतरवीन, म्हणाला. (पण हे सामाजिक अंगातून वगैरे नसावं, तर ती शिट्टी ऐकून मोनोचा ड्रायव्हर गाडी पुढं काढेल, अशी त्याला वाटणारी भीती असावी, असं आपलं मला वाटून गेलं. थोडक्यात, त्या स्टेशनात शिट्टी मारायचा एक्स्क्लुझिव्ह राइट फक्त मोनोचा होता!) पण ती राइडही मस्त झाली. विशेषतः मोनोरेलला फारच कमी रुंदीचे खांब लागतात. कमी जागा व्यापते. शिवाय टर्न मारताना गाडी कलते, हे भारी वाटतं आतून बघायला. आरसीएफ वगैरे झपाट्यानं मागं टाकून, वळणं-वळणं घेत मोनो वडाळा डेपोला पोचली. इथून पुढं हा मार्ग दादर आणि परळपर्यंत जाणार आहे, म्हणे. तसं झाल्यास मोनोरेलला गर्दी होईल. सध्या तरी फार काही बरं चाललेलं दिसलं नाही. आम्ही वडाळा डेपो स्टेशनला उतरून खाली आलो, तर त्या भागात एकदम शुकशुकाट. मग जरा चालत जाऊन एक टॅक्सीवाला गाठला. तोपर्यंत चार वाजले होते. आम्हाला आता चहाची तल्लफ आली होती. तोपर्यंत ओंकारनं जवळचं स्टेशन वडाळा नसून, गुरू तेगबहादूरनगर हे आहे, हे शोधून काढलं होतं. तिथं सार्वजनिक वाहतुकीचं एकही साधन उपलब्ध नसल्यानं अखेर टॅक्सी करून त्या स्टेशनला जायचं ठरवलं. हा टॅक्सीवालाही कूल होता. आधी तर आम्हाला म्हणाला, जवळच आहे. चालत पण जाऊ शकता. पण आम्ही तरीही त्याच्या गाडीत बसल्यावर त्याला आम्हाला नेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र, मुंबईत एक आहे. कुठलाही टॅक्सीवाला नाही म्हणत नाही. आमचे २२ रुपये झाले. ते देऊन आम्ही शेजारच्या टपरीवर चहा प्यायला वळलो. तो आमचा टॅक्सीवाला आम्हाला हॉर्न वाजवून बोलावत होता. त्याला वाटलं होतं, की आम्ही स्टेशन कुठंय ते विचारतोय. म्हणून तो आम्हाला सांगत होता, की अजून पुढं जा म्हणून. शेवटी त्याला सांगितलं, की आम्हाला माहिती आहे स्टेशन; आम्ही चहा प्यायला थांबलोय म्हणून. मग तो ओके ओके म्हणाला. मुंबईत ही मदत करायची वृत्ती सर्वत्र दिसते. म्हणूनच मला हे शहर आवडतं.
गुरू तेगबहादूरनगर नावाचं स्टेशन मुंबईत आहे, याचा मला आत्ताच पत्ता लागला होता. प्लॅटफॉर्मवर गेल्यावर सीएसटी इकडं की तिकडं (म्हणजे कुठं उभं राहायचं?), याचं थोडं कन्फ्युजन झालं. मला दिशांचं आणि भूगोलाचं ज्ञान बऱ्यापैकी आहे. शिवाय एकदा एका रस्त्यानं गेलो, की मी तो रस्ता पुन्हा कधीही विसरत नाही. पण त्या स्टेशनच्या विचित्र रचनेमुळं असेल, थोडं कन्फ्युजन झालं खरं. वास्तविक सूर्याकडं पाहून आम्हाला दिशा कळायला हरकत नव्हती. पण ते नंतर लक्षात आलं. जवळच एक पोलिसमामा होते. (हेही मुंबईचं एक वैशिष्ट्य. जागोजागी पोलिस असतातच.) त्यांनी योग्य ती दिशा दाखविली. हार्बर लाइन ही मुंबईतली एक दुर्लक्षित लाइन आहे. इथल्या लोकलही पश्चिम रेल्वेच्या मानाने फारच कळकट असतात. त्या चालू असतात, एवढंच त्यांचं वैशिष्ट्य. गोदीच्या बाजूनं जाणारी ही लोकल आम्हाला पंधरा मिनिटांत छत्रपती शिवाजी टर्मिनसला घेऊन गेली. सीएसटीला आलं, की समोरच्या अंडरग्राउंड मार्केटमध्ये जाऊन काही तरी खरेदी करायचा मला फार मोह होतो. पण तो टाळून आम्ही वरूनच रस्ता क्रॉस केला आणि आझाद मैदानाकडं आलो. आम्हाला मुंबई विद्यापीठात जायचं होतं. राजाबाई टॉवरची खूण माहिती होती. पण आझाद मैदान आणि ओव्हल मैदानात माझी गल्लत झाली. पण तरीही चालतच आम्ही राजाबाई टॉवरला पोचलो. सव्वासहा वाजले होते. मुंबईत या वेळेला किती सुंदर वातावरण असतं, हे जाणवलं. सूर्य पश्चिमेला अस्ताकडे निघाला होता आणि पश्चिमवारा तिथल्या तापलेल्या हवेवर अलगद फुंकर घालत होता. विद्यापीठाच्या आवारातली झाडं, फुलं प्रसन्नपणे डोलत होती. या वातावरणामुळं चालून आलेला थकवा दूर पळाला.
आम्ही अगदी फ्रेश मूडमध्ये त्या देखण्या दीक्षान्त सभागृहात शिरलो. आत्येभावाला शोधण्यात थोडा वेळ गेला. पुढच्या बाजूला उजवीकडं एक दार होतं आणि तिथून बाहेरच्या बाजूला काही लोकांची लगबग सुरू असलेली दिसली. मी तिथं गेलो. तिथं चहापानाची व्यवस्था होती. अर्थात मी आगंतुक असल्यानं चहा काही घेतला नाही. पण कुणी ओळखीचं दिसतंय का, ते पाहत होतो. तेवढ्यात प्रिया जामकर दिसल्या. आम्ही फेसबुकवर फ्रेंड असलो, तरी पहिल्यांदाच भेटत होतो. दोघेही पुण्याचे; पण पहिल्यांदा भेटत होतो मुंबईत! त्या या कार्यक्रमात अभिवाचन करणार होत्या, हे मला माहिती होतं. मग त्यांना शुभेच्छा देऊन मी जागेवर येऊन बसलो.
थोड्याच वेळात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आमच्या शेजारून व्यासपीठाकडं जाताना दिसल्या. त्या आल्यानंतर कार्यक्रम लगेचच, पण निर्धारित वेळेपेक्षा दहा-पंधरा मिनिटं उशिरा सुरू झाला. चिन्हचे सतीश नाईक यांनी हा सारा घाट घातला होता. या कार्यक्रमाची एक्स्क्लुझिव्हिटी माझ्या लगेचच लक्षात आली. सतीश नाईक तळमळीनं आणि मनापासून बोलत होते. पण दिवसभराच्या वणवणीमुळं मला चक्क डुलक्या येऊ लागल्या. ओंकारचीही तीच अवस्था झाली असावी. कारण तो बाहेर गेला. येताना दोन कप चहा घेऊन आला. तो चहाचा कप पाहून मला फारच बरं वाटलं. चहा घेतल्यानं मग तरतरी आली. मग कुलगुरू संजय देशमुख बोलले. नंतर प्रिया जामकरांचं अभिवाचन झक्कासच झालं. त्यांनी तीन भाग वाचले. पण प्रत्येक भाग वाचल्यानंतर टाळ्या न पडता, एकदम शेवटी पडल्या. लोकांना एक भाग संपल्याचं कळलंच नाही की काय, असं मला वाटलं. असो. नंतर प्रभाकर कोलते यांचं भाषण झालं. तेही छान बोलले. किशोरीताई फार बोलल्या नाहीत. त्यांचं बोलणं झाल्यावर त्या जायला उठल्याच. मग आम्हीही उठलो. दारात नाईकांच्या लेखाची एक प्रत मिळत होती, ती घेतली आणि बाहेर पडलो. साडेआठ वाजले होते. या वेळेत मी कधीच मुंबईत नव्हतो पूर्वी. मला फोर्टातल्या त्या रस्त्यांवरून रात्री फिरायचंच होतं. मग आम्ही रमतगमत नरीमन पॉइंटकडं निघालो. मंत्रालयावरून आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवरून मादाम कामा रोडनं एअर इंडियापाशी आलो. सर्व सिनेमांत दाखवतात, त्या कट्ट्यावर बसलो. मजा आली. एवढं साधं सुख; पण मला एवढी वर्षं ते लाभलं नव्हतं. काही गोष्टींचे योग यावे लागतात हेच खरं. आम्ही तिघंही अगदी रिलॅक्स होतो. न बोलता बराच वेळ बसलो. मग तिकडून चौपाटीकडं चालू लागलो. तिकडं एका पानवाल्याकडं आइस पान भारी मिळतं, हे ओंकारनं सांगितलं. मग आम्ही जेवायच्या आधीच ते पान खाल्लं. तोंडात एक मिनिट गारेगार झालं. मस्तच होता तो अनुभव.
मग चालायचा कंटाळा आल्यानं टॅक्सी केली आणि चौपाटीकडं निघालो. या रस्त्यावरून मी पूर्वी गेलो असलो, तरी ते दिवसा. रात्री हा भाग खरा पाहण्यासारखा असतो. दुतर्फा उंची गाड्या लागल्या होत्या. पुढं उजव्या बाजूला तारापोरवाला मत्स्यालय लागलं. (हे पाहायचंय अजून...) मग नंतर काही लॉन्ससदृश ठिकाणं लागली. तिथं बरेच कार्यक्रम/इव्हेंट/पार्टी इ. सुरू होतं. आयोजित करणारे अब्जाधीश असावेत, एवढं निश्चित कळत होतं. एका ठिकाणी जत्राही दिसली. अगदी पाळणे वगैरे होते. आम्ही चौपाटीवर चक्कर मारून आलो, तोपर्यंत साडेनऊ वाजले होते. आता भुका लागल्या होत्या. मग ओंकारच्या फेव्हरिट आयडियल नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमधल्या वेटरनं आम्ही काही बोलायच्या आधीच, आज ड्राय डे आहे (३० जानेवारी), तेव्हा बिअर मागू नका, असं सांगून टाकलं. (एवढे मनकवडे वेटर मुंबईतच भेटतात; म्हणूनच मला हे शहर आवडतं.) या हॉटेलमध्ये ज्यूक बॉक्स होता. याविषयीही मी वाचलं पुष्कळ होतं. पण प्रत्यक्ष असा ज्यूक बॉक्स असलेल्या हॉटेलात मी प्रथमच आलो होतो. ओंकार आणि त्याचे मित्र इथं कायम त्यांची गाणी वाजवत बसतात. अर्थात ही सोय फुकट नव्हती. वीस रुपयांचं कॉइन घेऊन ते टाकायचं होतं. मी जास्त शहाणपणा करून टायटॅनिकमधलं माय हार्ट विल गो ऑन हे गाणं सिलेक्ट केलं. पण प्रत्यक्षात भलतंच धांगडधिंगा असलेलं एक गाणं सुरू झालं. मी तिथल्या माणसाला पदोपदी सांगितलं, की हे मला हवं असलेलं गाणं नाही. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. हे रिमिक्स आहे, असं म्हणाला. मी कपाळाला हात लावला. ते गाणं इंग्लिश होतं, की अन्य कुठल्या भाषेत हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. हा ज्यूक बॉक्स माझ्यासाठी झूठ बॉक्स ठरला, अशी कोटी करून मी गप्प बसलो. ओंकारनं मात्र किशोरकुमारचं प्यार दिवाना होता है हे गाणं निवडलं, ते व्यवस्थित लागलं. साईनाथ सर्वांत शहाणा ठरला. त्यानं कुठलंच गाणं निवडलं नाही. आम्ही मेक्सिकन इंचिलाडा बीन्स विथ चीज ऑर्डर केलं. हा पदार्थ त्या दोघांनीही कधी खाल्ला नव्हता. हे माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा लहान असले, तरी माझ्यापेक्षा पुष्कळच हुशार आहेत. साईनाथ तर जग फिरला आहे. पण त्यांनी न केलेली एक तरी गोष्ट मी केलीय, याचा मला किरकोळ आनंद झाला. इंचिलाडा मस्तच होतं, नंतर व्हेज हैदराबादी बिर्याणी सांगितली. ती मात्र काहीच्या काही होती. मुंबईत कुठल्या हॉटेलमध्ये काय मागवायचं, याचंही एक शास्त्र आहे. ते आम्हाला अवगत नसल्यानं ही फसगत झाली. पण एकूण मज्जाच आली म्हणायची. पुन्हा चौपाटीवर जाऊन काही तरी हादडायचं या मिषानं बाहेर पडलो. मात्र, तिथं जाऊन काहीच खावंसं वाटेना. मग पुन्हा एकदा पानच घेतलं आणि निघालो. बिर्ला मातोश्री सभागृहाच्या जागी ठक्कर्स नावाचं एक सभागृह झालंय, हे बघून मी ठक्क (आपलं... थक्क) झालो. पु. लं. आपले सगळे नाट्यप्रयोग याच ठिकाणी करायचे हे मला माहिती होतं. आता तिथं नाट्यप्रयोग होत असतील, असं मुळीच वाटत नव्हतं. कालाय तस्मै नम:...दुसरं काय! नशीब, पुढं टिळकांचा पुतळा तरी ठेवलाय. नाही तर तिथंच हे लोक एखादा पब किंवा बार काढायचे. दा. भ. (दादासाहेब भडकमकर) मार्ग पोलिस ठाण्याचा बोर्ड पाहिल्यावर हुतात्मा तुकाराम ओंबाळेंची आठवण येणं स्वाभाविकच होतं. तिथं आता ओंबाळेंचा अर्धपुतळाही उभारलाय. त्याला नमन करून पुढं निघालो. फूटओव्हरब्रिजवरून पलीकडं उतरलो. चर्नीरोड स्टेशनात आलो. ओंकारचं बोरिवलीचं आणि आम्हा दोघांचं दादरचं तिकीट काढलं. थोड्यात वेळात लोकल आली.

गाडीत बसल्यावर तिघांचा एक फोटो काढून घेतला. ओंकारला टाटा करून आम्ही दादरला उतरलो. वेस्टवरून ईस्टला आलो आणि चालत शिवनेरीच्या स्टॉपवर आलो. शेवटची बस होती बहुतेक. फार गर्दी नव्हती. ड्रायव्हरला रस्ता माहिती नव्हता. त्यानं मागच्या एका प्रवाशाला जीपीएसवरून रस्ता दाखवायला सांगितलं. साईनाथनंही जीपीएस सुरू केलं आणि आम्ही रस्ता बरोबर आहे का, ते पाहायला लागलो. वडाळा मार्गे यानं गाडी चेंबूरला आणली. पुन्हा उलटी मैत्री पार्ककडं नेली. तिथला कंट्रोलर म्हणालासुद्धा, की इकडून कुठून आणली गाडी? तर आमच्या ड्रायव्हरनं ट्रॅफिक जाम होतं, असं धादांत खोटं कारण सांगितलं. आम्हाला आता झोप यायला लागली होती. मधेच जाग आली, तर गाडी घाटात होती आणि तिथं मात्र खरंच ट्रॅफिक जाम झाला होता. आजूबाजूंनी शेकडो अवजड ट्रक आणि ट्रकच दिसत होते. दोन चाळीस झाले होते. आम्हाला निघून अडीच तास झाले होते. अर्थात आता वेळेचा आम्हाला काही फरक पडत नव्हता. मग मात्र पुन्हा चांगलीच झोप लागली आणि ड्रायव्हर औंध औंध करीत ओरडू लागला, तेव्हा जाग आली. सव्वाचारला गाडी स्टेशनवर आली. आरटीओचा पंप चालू असतो, असं कळलं. मग मी माझी बाइक घेऊन त्या पंपावर गेलो आणि तिथं पहाटे साडेचार वाजता पेट्रोल भरलं. पुढच्या वीस मिनिटांत घरी पोचलो. एवढं दमायला झालं होतं. लगेच झोपावं की नाही! पण पेपर दिसले आणि लक्षात आलं, की आपण पेपरच वाचलेले नाहीत. मग शनिवारचे सगळे पेपर वाचून काढले आणि साडेपाचला झोपलो...
इति पुणे-मुंबई-पुणे अध्याय समाप्ती...
---

6 comments:

  1. छान ... चित्रमय वर्णन ... धन्यवाद

    ReplyDelete
  2. वा. भन्नाटच लिहिलं आहेस. मुंबईत राहायला जाऊन दोन वर्षं झाली, तरी अनेक रस्त्यांची, चौकांची, ठिकाणांची नावं आज पहिल्यांदा समजली. तुझ्या लेखातून सगळे तपशील मिळणार, याची खात्री होतीच. मोनो सफर माझीही अजून राहिलेय. करेन लवकरच.

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा... माझं भूगोल आणि एकूणच संदर्भप्रेम... बाकी मोनो सफर लवकर कर. पुढचा ट्रॅक सुरू नाही झाला, तर कदाचित बंद वगैरे पडेल.

      Delete
  3. रात्रीचं वर्णन छान

    ReplyDelete