4 Nov 2016

व्हेंटिलेटर रिव्ह्यू

प्रसन्न, ताजा, मोकळा श्वास...
--------------------------------
'श्वास' ते 'व्हेंटिलेटर'... मराठी चित्रपटांचा गेल्या तपातला प्रवास... एक वर्तुळ पूर्ण झालं... काय गंमत आहे पाहा... व्हेंटिलेटर ते श्वास हा खरा जगण्याकडचा प्रवास असतो. पण मराठी सिनेमा श्वास ते व्हेंटिलेटर असा प्रवास करीत 'जगण्या'कडं झेपावतोय.... असो.
फर्स्ट थिंग फर्स्ट. राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर' हा नवा मराठी सिनेमा आपल्याला एक प्रसन्न, ताजा, मोकळा श्वास घेतल्यासारखा निखळ आनंद देतो. खूप दिवसांनी असा स्वच्छ, सुंदर सिनेमा पाहायला मिळालाय. या सिनेमात त्रुटी नाहीतच असं नाही. पण एकूण सिनेमाचा प्रभाव हा पुष्कळच सकारात्मक आणि आनंदीपणाकडं नेणारा आहे.
माणसाच्या जन्म आणि मरणातल्या अगणित क्षणांना आपण जीवन म्हणतो. हे जीवन व्हेंटिलेटर नामक एका यंत्राला बांधलं गेलं, की त्याचा अटळ असा शेवट आला, असंच आपण समजून चालतो. एखाद्याच्या आयुष्यात हा क्षण आला, की त्याच्याशी जोडली गेलेली अगणित आयुष्यं तिथं जमा होतात. त्यांच्याही आयुष्यात मग वेगळ्या पातळ्यांवर उलथापालथी सुरू होतात. हे सगळं शेवटी मग त्या एका श्वासापाशी येऊन थांबतं. हा श्वास कधी थांबवायचा याचा निकाल घेण्याची वेळ ज्या व्यक्तीचा तो श्वास आहे तो सोडून बाकी सर्वांवर येते. इथं मग रक्ताच्या नात्यांची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, रागाची, लोभाची कसोटी लागते. त्रागा करून चालत नाही. हा सगळा प्रवास अगदी जीवघेणा असतो आणि आपल्यातल्या माणूसपणाला हरघडी आव्हान देणारा असतो.
राजेश मापुस्कर या दिग्दर्शकाला हे नेमकं कळलंय. आपल्याला नक्की काय सांगायचंय याची स्पष्टता दिग्दर्शकाच्या मनात असणं फार महत्त्वाचं असतं. इथं तो प्रश्नच नाही. अर्थात सांगायचं काय हे नुसतं माहिती असून चालत नाही; तर ते नीट सांगण्याची हातोटीही लागते. इथंच दिग्दर्शकाच्या 'दिग्दर्शक' म्हणून असलेल्या कौशल्याचा कस लागतो. चंद्रकांत कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, मृणाल कुलकर्णी किंवा सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या सिनेमांत ही गोष्ट सांगण्याची, बिटवीन द लाइन्स सांगण्याची हातोटी नीट दिसते. राजेशचा हा सिनेमाही अभिमानानं त्यांच्या पंक्तीत स्थान मिळवू शकेल, इतका उजवा झालाय.
गोष्ट तशी साधीच, नेहमीचीच. मुंबईतील गजानन कामेरकर हे गृहस्थ अचानक चक्कर येऊन पडलेयत आणि एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहेत. तिथं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय आणि प्रकृती गंभीर आहे. अशा वेळी त्यांचे सगळे नातेवाइक तिथं गोळा होतात. कामेरकरांचा मुलगा प्रसन्न (जितेंद्र जोशी) राजकारणात काही तरी धडपड करतोय, पुतण्या राजा (आशुतोष गोवारीकर) प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. इतर काही नातेवाइक श्रीवर्धनवरून यायला निघाले आहेत. प्रत्येकाची काही ना काही तऱ्हा आहे. प्रत्येकाची काही ना काही व्यथा आहे. प्रत्येकाचं काही तरी सांगणं आहे आणि ते सांगण्याची असोशीही आहे.
राजेश मापुस्करचं कौतुक यासाठी, की पात्रांची भाऊगर्दी असूनही त्यानं जवळपास प्रत्येक पात्राला न्याय दिलाय. प्रत्येक पात्र नीट उभं केलंय. त्यांना काही तरी व्यक्तिमत्त्व दिलंय. त्यामुळं लांबीनं अगदी छोटी भूमिका असलेले यातले कलाकारही लक्षात राहतात. कथेतल्या पात्रांचं हे असं नीट मॅपिंग करणं भल्याभल्यांना जमत नाही. फार चांगल्या सिनेेमांतच असं पाहायला मिळतं. राजेशनं पटकथेवर भरपूर काम केल्याचं आणि प्रत्येक दृश्याची नीट सांगड घातल्याचं जाणवतं. त्यामुळं इथं आपल्याला प्रत्येक माणसागणीक एक वेगळा नमुना भेटतो. या नातेवाइकांतील काहींची मांडणी थोडीशी अर्कचित्रात्मक आहे. विशेषतः गावाकडच्या सगळ्या पात्रांना जाणूनबुजून हा बाज देण्यात आला आहे. आणि हे नीट जाणवतं. पण तरीही खटकत नाही. गावाकडची मंडळी मुंबईला यायला निघतात तेव्हाचा सर्वच सिक्वेन्स धमाल जमला आहे. विशेषतः ते वयस्कर आजोबा आणि त्यांच्या लघुशंकेच्या सवयीवर दीर्घ हशे मिळविण्यात आले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आता इथं विनोदनिर्मिती करायचीच अशा अहमहमिकेनं केलेलं नाही. ते अगदी स्वाभाविक आणि कथेच्या ओघात आपल्यासमोर येतं. हा बॅलन्स साधणं हे ताकदीच्या दिग्दर्शकाचं काम आहे. राजेशच्या कलाकृतीत ते पूर्णपणे दिसून आलंय. इथं आपले एकसे एक मराठी कलाकारही त्याच्या मदतीला आले आहेत, यात शंका नाही. विशेष उल्लेख करावासा वाटतो, तो सुलभा आर्य, उषा नाडकर्णी, सुकन्या कुलकर्णी-मोने, नम्रता आवटे यांचा. या सर्व अभिनेत्रींनी अगदी थोड्याशा अवकाशातही अभिनयाचा जो वस्तुपाठ समोर ठेवलाय ना, त्याला तोड नाही. शिवाय निखिल रत्नपारखी, विजू खोटे, अभिजित चव्हाण, शशांक शेंडे, नीलेश दिवेकर, भूषण तेलंग, विजय निकम, मनमित पेम या सर्वांनीच दमदार काम केलंय. विशेषतः अश्विनची भूमिका करणाऱ्या संजीव शहांचं काम मला आवडलं. सतीश आळेकरांनी साकारलेले भाऊ पाहण्यासारखे. बमन इराणीची पाहुणा कलाकार म्हणून उपस्थिती आनंददायक! आशुतोष गोवारीकर बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दर्शन देत असला, तरी त्याचा वावर सहज आहे. मात्र, लोकप्रिय दिग्दर्शकाची भूमिका त्याच्यासाठीच खास तयार केलीय की काय, असं वाटतं. कारण या सर्व खानदानात तोच फक्त वेगळा आहे. अर्थात सिनेमॅटिक लिबर्टी आहेच. या सर्वांत महत्त्वाचा उल्लेख करावासा वाटतो तो जितेंद्र जोशीचा. जितेंद्र हा ताकदीचा अभिनेता आहे, यात शंकाच नाही. या चित्रपटात त्यानं साकारलेला 'प्रसन्न' बघण्यासारखा आहे. या व्यक्तिरेखेचे सर्व कंगोरे अगदी सूक्ष्मपणे त्यानं पकडले आहेत. वडिलांशी कधीही पटलेलं नाही, त्यांनी कायमच आपला राग राग केला या भावनेपासून ते शेवटच्या धक्क्यापर्यंत जितेंद्रनं त्याच्या पात्राचा ग्राफ कसा वरवर नेला आहे, हे प्रत्यक्ष पाहायलाच हवं.
चित्रपटाचं बहुतांश चित्रिकरण हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. ते खूप तपशीलवार आणि हळवं आहे. पार्श्वसंगीताचा वापर परिणामकारक आहे. गणपतीच्या दिवसांतलं वातावरण सुरुवातीच्या शीर्षकांच्या वेळी सुंदर टिपलंय.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका दृश्यात प्रियांका (चोप्रा) येते आणि बाप व मुलं यांच्या नात्यावर टिप्पणी करते. हे थोडंसं हेतुतः केल्यासारखं असल्याचं जाणवतं. पण फार खटकत नाही. प्रियांकानं म्हटलेलं प्रमोशनल गाणं एंड स्क्रोलला येतं की काय, असं वाटत होतं. पण सुदैवानं तसं काही नाही.
एकूणच बाप आणि मुलं यांच्या नात्यावर हलकीफुलकी टिप्पणी करणारा, हसत-खेळत मनोरंजन करणारा हा सिनेमा पाहायलाच हवा.
---
दर्जा - चार स्टार
---

No comments:

Post a Comment