27 Nov 2016

नोटाबंदी प्रहसन

‘हजार’ ख्वाहिशें ऐसी.... 
--------------------------

आमच्या साध्या-सरळ, मध्यमवर्गीय आयुष्यात दिवाळीनंतर अचानक शिमगा हा सण येईल, असे भाकीत कुठल्याही दिवाळी अंकात वाचायला मिळाले नव्हते. आम्ही वट्ट पाचशेची नोट उडवून काही दिवाळी अंक आणले होते. पण मुखपृष्ठावरील एक-दोन बऱ्या ललना सोडल्यास त्या अंकांत आत काहीच नव्हते, या नैराश्याने आम्ही आधीच वैतागलो होतो. अशात आठ नोव्हेंबरच्या निशासमयी ‘मित्रों...’ ही चिरपरिचित हाक कानी आली. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकामुळे नमोजी बोलणार आहेत, हे आधीच माहिती होतं. आम्ही पेंगुळलेल्या अवस्थेत त्यांचं ते नेहमीचं भाषण ऐकू लागलो. आणि अचानक... त्यांनी बॉम्बगोळाच टाकला! पाचशे अन् हजारच्या नोटा रद्द करून आमच्या आयुष्यात मोठीच ‘(अनर्थ)क्रांती’ घडवून आणली. पाचशे, हजारच्या नोटांच्या गठ्ठ्यांचा बेड करून त्यावर झोपणाऱ्यांपैकी आम्ही नव्हे. आमच्याकडं व्यापार या खेळातल्यादेखील तेवढ्या नोटा कधी नव्हत्या. तर ते असो. पण तरी जात्याच मध्यमवर्गीय असल्यानं आमची रोकड, गुंतवणूक इ. शेळीच्या शेपटासारखी एकदम उघडी पडली. बराच काळ हतबुद्ध अवस्थेत गेल्यानंतर आत्ता या रात्रीच्या वेळी आपण फक्त झोपूच शकतो, एवढा एक विचार ‘मनी’ आला. नंतरच्या तीन तासांत अनेकांच्या आयुष्यात ‘ब्लॅक ट्युसडे’ नामक आत्तापर्यंत कधीही रीलिज न झालेला सिनेमा सुरू झाला होता म्हणे. आमच्याकडं मात्र एकदम घनघोर शांतता नांदत होती.
सकाळी उठल्यावर पेपरांमध्ये आणि सोसायटीमध्ये याची चर्चा सुरू झाल्यावर आम्ही अंदाज घेतला. ज्यांना हजार-पाचशेच्या नोटा लपवून ठेवायची वाईट खोड होती, अशा मंडळींच्या चेहऱ्यावर जे भाव होते, त्याचे वर्णन करण्यास आमच्याकडे शब्द नाहीत. खरं तर विविध भावांचं ते मिश्रण होतं. पण ‘पडेल भाव’ तेव्हा सर्वांत भाव खाऊन जात होता, यात शंका नाही. अशा लोकांनी मध्यरात्रीच एटीएमवर धाव घेऊन उरलीसुरली शंभराची कॅश काढून आणल्याचं कळलं. दुसऱ्या दिवशी बँका तर बंदच होत्या. तिसऱ्या दिवशी अन्य बेसावध मंडळी तिथं पोचली, तेव्हा एटीएमे बंद आणि बँकांसमोर रांगा अशा आगळ्यावेगळ्या दृश्याला त्यांना सामोरं जावं लागलं. पण आमच्या पुण्यातली, विशेषतः पेठांतली धोरणी मंडळी सकाळी व्हॉट्सअॅप बघूनच बाहेर पडत असल्यानं, डबा, छत्री, थर्मास, सतरंजी, पाण्याची बाटली असा सगळा सरंजाम घेऊनच त्यांनी घर सोडलं होतं. काहींच्या घरी तर अर्धांगानं लढाईवर जाण्यापूर्वी ओवाळतात, तसं आपापल्या ‘एजमानां’ना ओवाळलंदेखील होतं म्हणे. तिकडं बँक कर्मचाऱ्यांची अभूतपूर्व धांदल उडाली. त्यांच्या आयुष्यातल्या एका महायुद्धालाच जणू बुधवारी सुरुवात झाली होती. तरी बरं, सरकारनं हा दिवस ग्राहकांसाठी बंदच ठेवला होता. सुट्ट्या घेऊन जे पर्यटनाला वगैरे बाहेर गेले होते, त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली. त्यातले जे शहाणे होते, त्यांनी गुपचूप घरची वाट धरली.
घराघरांतल्या बायकांच्या छुप्या बँका पितळी डब्यांतून, पिगी बँकेतून आणि पलंगांच्या कोपऱ्यातून अलगद बाहेर आल्या. हा काळा पैसा नव्हता, तर आपापल्या ‘काळ्या मण्यां’नी साठवलेला पैसा होता. या पैशांतूनच समांतर अर्थव्यवस्थेलाही समांतर अशी एक तिसरीच अर्थव्यवस्था कित्येक वर्षं चालू होती, तिला अचानक खीळ बसली. बायकांनी अत्यंत नाइलाजानं, जणू ठेवणीतले दागिने काढून द्यावेत तितक्या नाखुशीनं आपल्याकडच्या नोटा बाहेर काढल्या.
बाकी आमच्यासारख्या काही मध्यमवर्गीय माणसांकडं पाचशे-हजारच्या नोटाच नव्हत्या. आपल्याकडं काळा-पांढरा, हिरवा-निळा असा कसलाच पैसा नाही, याचं त्यापूर्वी कधीही एवढं वैषम्य वाटलं नव्हतं. अहो, आमच्याकडं काम करणाऱ्या ताईंकडं पाचशेच्या पंधरा नोटा निघाल्या. वॉचमनकाकांकडं हजाराच्या दहा नोटा निघाल्या. पण आम्ही आमचे सगळे कपडे, सगळे खिसे उलटेसुलटे केले, तरी त्यातून एकही हजार वा पाचशेची नोट बाहेर पडली नाही. आमची म्हणजे भलतीच ‘कॅशलेस इकॉनॉमी’ होती, हे तेव्हा लक्षात आलं.
पण पुन्हा चारचौघांसारखं वागलं नाही, तर आपल्या मध्यमवर्गपणाला बट्टा येईल, या भीतीनं आम्ही हळूच शेजाऱ्यांकडं पाचशेच्या नोटा मागितल्या. त्यांनी आधी आमच्या डोळ्यांत वाकून का पाहिलं ते कळलं नाही. पण नंतर मोठ्या औदार्यानं त्यांनी पाचशेच्या दोन नोटा दिल्या. अर्थातच पुढल्या महिनाभरात शंभरच्या नोटांच्या रूपानं त्या परत करायच्या, या बोलीवरच! या पाचशेच्या नोटा घेऊन आता आम्हाला मिरवता येणार होतं... आम्हीही चार भारतीयांसारखेच गांजलेले आहोत, हे दाखवता येणार होतं. असं करता आलं नसतं तर मात्र आमच्या आयुष्यात ती फार मोठी उणीव राहून गेली असती.
बाहेर पडलो खरा, पण या नोटा कुठं खपवाव्यात काही कळेना. पेट्रोलपंपावर गेलो तर तिथं मारामाऱ्या सुरू होत्या. सरकारी रुग्णालयांत जाण्याची आमच्या बापजाद्यांतही हिंमत नाही. आमचा प्रॉपर्टी टॅक्सही अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच भरून झाला होता. आमच्या या आर्थिक शिस्तीचं नकळत दर्शन घडून ऊर भरून आला. तरीही आव्हान बाकी होतंच. मग आम्ही साक्षात आमच्या बँकेत जाऊन ‘काउंटर अॅटॅक’ करायचं ठरवलं. वर्षानुवर्षं ‘सवाई’ला जात असल्यामुळं ग्रुप करणं, रांग धरणं, सतरंज्या टाकणं, जागा पकडणं, तिरकस टोमणे मारणं, दुसऱ्याला काहीच कळत नाही अशा नजरेनं त्याच्याकडं बघणं, अधूनमधून वा.. वा.. अशी दाद देणं या सगळ्या गोष्टी तिथं श्वासाएवढ्या सहज जमून आल्या. व्हॉट्सअॅपवरचे तीन-चार टुकार जोक सांगून रांगेतल्या लोकांना हसवलंही! तेही गांजलेले असल्यानं कुणी जे काही सांगेल, त्यावर बिचारे हसत होते. अशा तब्बल ५६ मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आमचा नंबर आला. आमच्या हातातल्या दोन पाचशेच्या नोटा बघून त्या ब्यांककाकू कुत्सितशा हसल्या आणि त्यांनी मला शंभरच्या नोटा बदलून दिल्या. बँकेतल्या लोकांकडं अपार सहानुभूतीनं पाहत आम्ही तिथून काढता पाय घेतला. खिशात शंभरच्या तब्बल दहा नोटा असल्यानं आम्ही प्राणपणानं त्यांचं रक्षण करीत त्या घरापर्यंत आणल्या. हुश्श!
खरं सांगायचं, तर यानंतर काही आजतागायत बँकेत जाण्याचा प्रसंग आमच्यावर आलेला नाही. कारण खर्च काय करायचा आणि कशाला, हा आमचा बेसिक सवाल असतो. मात्र, विनाकारण रिकाम्या रस्त्यानं फिरणं, बँका व एटीएमसमोरच्या लायनी बघून येणं यात आम्हाला मध्यमवर्गीय कोमट आनंद होतो. आपल्याला त्रास नाही, पण दुसऱ्याला होतोय तर त्याचा आनंद मानू नये, या आई-बापांनी दिलेल्या शिकवणीला आम्ही ३० डिसेंबरपर्यंत स्वतःच ‘स्टे’ दिला आहे. शिवाय वाईटातून चांगलं निघतं त्यात आनंद मानावा असं आम्हाला वाटतं. पाहा ना, उगाचच खरेदी करीत फिरणारे लोक कमी झाले. रस्त्यावरची, बसमधली, एसटी स्टँडवरची, हॉटेलांमधली फालतू गर्दी एकदम कमी झाली. लोक स्वतःच्या घरात जास्त वेळ बसू लागले. बराच दिवस केली नव्हती अशी कामं करू लागले. मुलांचा अभ्यास वगैरे घेऊ लागले. म्हाताऱ्या आई-बापांची चौकशी करू लागले. घरच्या धनिणीला कामात मदत करू लागले. भाजीबिजी आणून देऊ लागले. असा सगळीकडं एकदम सुकाळ माजला! जणू रामराज्य आले...
...पण मध्यमवर्गाचं चांगलं झालेलं कुणाला पाहावतं का सांगा!
...बघता बघता ३० डिसेंबर उजाडला आणि पोटात धस्स झालं. व्हॉट्सअॅपवर मेसेज आला... पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करणार आहेत. रात्री आठ वाजता टीव्ही लावा...!
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २७ नोव्हेंबर २०१६)
---
(चित्र - अतुल बेलोकर)
----

No comments:

Post a Comment