1 Dec 2016

डिअर जिंदगी रिव्ह्यू

किस्सा कुर्सी, कबड्डी अन् कायराचा!
---------------------------------- 

फर्स्ट थिंग फर्स्ट.... 'डिअर जिंदगी' हा जगण्यावर मनःपूत प्रेम करणाऱ्या सर्वांना आवडणारा सिनेमा आहे, यात वादच नाही. 'इंग्लिश-विंग्लिश' या पहिल्याच लई-वई भारी-वारी सिनेमानंतर गौरी शिंदेची दिग्दर्शक म्हणून असलेली ताकद लक्षात आली होती. या संवेदनशील आणि सिनेमा माध्यमाची शक्तिस्थानं नेमकी माहिती असलेल्या दिग्दर्शिकेचा हा दुसरा सिनेमा स्वाभाविकच तिच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढवतो. 'इंग्लिश-विंग्लिश' हा अगदीच जमून गेलेला सिनेमा होता. त्या तुलनेत 'डिअर जिंदगी' तेवढा भारी नसला, तरी किमान गौरीकडून अपेक्षांना तडा जाऊ देत नाही, हे निश्चित. आणि हो, अनेकांनी यापूर्वीच लिहिल्याप्रमाणं हा गौरीप्रमाणंच आलिया भटचाही सिनेमा आहे. केवळ आलियासाठी बघावा एवढी जबरदस्त कामगिरी तिनं यात केली आहे, यात वाद नाही. आणि आज ती अवघी २३ वर्षांची आहे! आणखी काही वर्षांनी ती फारच मोठी अभिनेत्री होणार यात शंका नाही. आणखी एक सांगायचं राहिलं, यात शाहरुख खानही आहे. मला स्वतःला 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया'नंतर (पोस्ट २०००) या सिनेमातला शाहरुख आवडला. याचं कारण गौरी शिंदेनं या सुपरस्टारला पूर्णपणे काबूत ठेवलं आहे. असा नियंत्रित शाहरुख हा पाहायला फारच मस्त अभिनेता आहे. यापुढं त्याची भूमिकांची निवड अशीच वेगळी आणि चोखंदळ राहिली, तर दिलीपकुमारप्रमाणं कित्येक वर्षं तो या चित्रपटसृष्टीवर राज्य करील, यात वाद नाही.
गौरीचा पहिला सिनेमा साधारण तिच्या आईच्या पिढीतल्या बायकांचं जगणं चितारणारा होता. (त्या सिनेमाची गोष्ट खरंच तिच्या आईच्या आयुष्यावरून प्रेरित होती.) आणि हा दुसरा सिनेमा गौरीच्याही पुढचा पिढीचा आहे. कायरा (आलिया) ही या पिढीची या सिनेमातली प्रतिनिधी. या पिढीला मी मोबाइल पिढी म्हणतो. भारतात १९९५ मध्ये मोबाइल सर्वप्रथम आलाा. या वर्षानंतर जन्मलेलं प्रत्येक मूल या मोबाइल पिढीचं प्रतिनिधित्व करतं. मोबाइल आणि या पिढीत आश्चर्यकारक साम्यं आहेत. मोबाइलप्रमाणेच या पिढीत दर दोन वर्षांनी पिढी (पिढीअंतर्गत पिढी) बदलते. तर अशा या कायराच्या चिमुकल्या आयुष्यातही बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तिच्या आयुष्यात बॉयफ्रेंड टिकत नाहीयेत. चार मित्र-मैत्रिणी आहेत. आई-वडील गोव्यात आहेत. कायरा चित्रपटसृष्टीत सहायक सिनेमॅटोग्राफर आहे. पण तिला अद्याप सिनेमॅटोग्राफर म्हणून स्वतंत्रपणे काम मिळालेलं नाहीय. ते तिचं स्वप्न आहे. तर काही प्रसंग असे घडतात, की कायराला पुन्हा आई-वडिलांकडं यावं लागतं गोव्याला... त्यांच्याशी तिचं अजिबात पटत नाही. त्याचीही काही कारणं आहेत. अखेर गोव्यात तिला योगायोगानं भेटतात डॉ. जहांगीर खान (शाहरुख) हे 'ब्रेन डॉक्टर'! हे डॉक्टर इतर थेरपिस्टसारखे नाहीत. यांची स्वतःची अशी खास शैली आहे पेशंटशी वागायची... त्यांचा व्हिला पण भारी आहे. त्यातल्या वस्तू पण अजब-गजब आहेत. अशा या डॉ. 'जग'ची आणि आपल्या नायिकेची भेट होणं हे अपरिहार्यच असतं. त्यांच्या भेटींतूनच मग पुढं सिनेमा फुलत जातो आणि कायराचं जगणंही!
गौरीच्या सिनेमांचं मला जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतः स्त्री असल्यानं तिचे चित्रपट नायिकाप्रधान असतात आणि स्त्रीचं भावविश्व ते नेमकं जाणतात. या सिनेमातही या नव्या पिढीच्या मुलीचे विचार, तिचं जगणं, तिचे प्रश्न आणि तिचा त्रागा ती सहज समजू शकते. लांबून पाहणाऱ्याला वाटेल, की काय या मुलीला सुख टोचतंय का? सगळं तर आहे; पण यांना कशात सुखच नाही. कदाचित वरवर पाहता ते खरंही वाटेल. पण ते तसं नसतं ना! हीच तर खरी मेख आहे. या पिढीचं म्हणणं, त्यांचं आक्रंदन नक्की कशाबाबत आहे, हेच अनेकांना कळत नाही. गौरीला ते कळलंय. तिच्या कायराच्या देहबोलीतून ते जाणवतं. समाज, मित्र, कुटुंब, प्रियकर अशी सीमित होत जाणाऱ्या परिघाकडून त्यांना काय हवंय ते समजतं. या पिढीला सुदैवानं भौतिक सुखांची कमतरता नाही. ही पिढी बुद्धिमानही आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर तिला पुढं जायचंय. पण आपल्या आई-वडिलांच्या पिढीच्या खुंटीला एखादं पाळीव जनावर बांधावं तसे आपण बांधले गेलो आहोत, असं या पिढीला फार तीव्रतेनं वाटतं. त्यातून मग त्यांची निवड करण्याची धडपड सुरू होते. निर्णय घेण्याची क्षमता असूनही आपण काही करू शकत नाहीये, असं काही तरी फीलिंग येतं. अर्थात एवढंच नसतं. कायराचंही असंच झालं आहे. मग डॉक्टर खान तिला यातून कसं बाहेर काढतात, हे सिनेमाच्या उत्तरार्धात येतं. हे सांगण्याची गौरीची पद्धत प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारी आहे. मूलतः कायराच्या व्यक्तिरेखेशी आपण तादात्म्य पावू शकतो, हे महत्त्वाचं. ही मुलगी फार खरी, कन्व्हिन्सिंग वाटते. डॉ. खान तिला समजावून सांगताना कुर्सी आणि कबड्डीची उदाहरणं सांगतात. एखाद्या खुर्चीची खरेदी करतानाही आपण किती विचार करून करतो.... मग एखाद्या व्यक्तीबरोबर नातं जोडताना किती विचार करायला हवा, हे डॉक्टर सांगतात. समुद्राशी कबड्डी खेळण्याचा प्रसंगही धमाल.... आई-वडिलांनी मुलांना पुढे त्यांच्या कायम लक्षात राहतील अशा बालपणीच्या आठवणी द्याव्यात, हे डॉक्टरांचं सांगणंही खास! नंतर एकदा रो-रो बोटीतून जाताना आजच्या पिढीच्या रिलेशनशिपबाबत बोलताना डॉक्टर म्हणतात, की तुम्ही सगळं ओझं त्या एकाच (प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको) नात्यावर का लादता? सगळ्या अपेक्षा त्या एकाच नात्याकडून का व्यक्त करता? हे त्या नात्यावर अन्याय करणारं नाही का? संगीतात रुची असणाऱ्या दोन लोकांची म्युझिकल रिलेशनशिप असू शकत नाही का? एखाद्याबरोबर इंटलेक्चुअल रिलेशनशिप असावी, एखाद्याबरोबर फक्त मैत्रीची-दंगामस्तीचं नातं असावं... आणि हे किती खरं आहे! अगदीच पटणारं!
गौरीचा हा सिनेमा आपलासा वाटत जातो तो अशा काही हळव्या क्षणांमुळं... संवादांमुळं...
सिनेमात त्रुटी नाहीतच असं अजिबात नाही. मला स्वतःला हा सिनेमा लांबलेला वाटला. तो किमान १५ मिनिटांनी लहान करता आला असता. शिवाय कायराच्या आई-वडिलांच्या पात्रांच्या भूमिका अजून जरा नामवंत कलाकारांना दिल्या असत्या, तर बरं झालं असतं, असं वाटून गेलं. आलियाच्या प्रियकरांच्या भूमिकांत कुणाल कपूर, अली जफर आणि अंगद बेदी आहेत. त्यांना फार वाव नाही. शिवाय मुळात कायराचं सगळं दुःख ज्या प्रसंगावर आधारलेलं आहे, तो प्रसंग किंवा ती घटनामालिका अनेकांना कन्व्हिन्सिंग नाही वाटणार! आपण स्वतः ती परिस्थिती अनुभवलेली असेल, तरच आपल्याला त्यातली वेदना कदाचित समजू शकेल. पण माझ्या मते, ही सिनेमाची त्रुटीच आहे.
बाकी लक्ष्मण उतेकर यांची सिनेमॅटोग्राफी आणि अमित त्रिवेदीचं संगीत झक्कास... अली जफरचं गाणं छान आहे.
थोडक्यात, आलियासाठी तर बघाच... पण शाहरुखसाठीही बघा...

----
दर्जा - साडेतीन स्टार
----


No comments:

Post a Comment