5 Dec 2016

चिंतन आदेश दिवाळी लेख १६

शापित गंधर्व
------------

मृत्यू या विषयावर जेवढं बोलू आणि लिहू तेवढं कमी आहे. माणसाला मृत्यूचं आणि कदाचित मृत्यूनंतरच्या संभाव्य परिस्थितीचं अमर्याद आकर्षण कायम वाटत आलेलं आहे. एखादी गोष्ट संपूर्णपणे कळत नाही, तोवर तिचा वेध घेत राहायचं हा मानवी स्वभावच आहे. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा' असं महाकवी ग. दि. माडगूळकरांनी लिहून ठेवलेलं आहे. माणसाचं सरासरी आयुष्यमान ७० ते ९० वर्षं आहे, असं गृहीत धरलेलं आहे. यात अर्थातच पुढं-मागं दहा वर्षं होतात. पण जास्तीत जास्त माणसं ७० ते ९० वर्षं एवढं जगतात, असं आपण मानतो. यापेक्षा कमी वयात माणूस गेला, तर तो अकाली गेला, असं म्हणण्याची पद्धत आहे. थोडक्यात आपल्या इथल्या गणितानुसार ६० पेक्षा कमी वयात गेलेला माणूस निश्चितच अकाली मरण पावला, असं म्हणता येईल. माणूस अकाली गेला, की वाईट वाटतंच. यांनी आणखी जगायला हवं होतं, असं वाटतं. त्यात अकाली गेलेली व्यक्ती चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्ती असेल, तर बोलायलाच नको. चित्रपटसृष्टीतील अशाच काही निखळलेल्या पाच ताऱ्यांच्या वादळी आयुष्याचा आणि शेवटच्या दिवसांचा वेध घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.

रिक्त मधुघट... 
------------------------
अकाली गेलेल्या तारे-तारकांचा विषय निघाला, की पहिल्यांदा चटकन नाव येतं ते सौंदर्यसम्राज्ञी मधुबालाचं. मधुबाला केवळ ३६ वर्षं जगली. मुमताज जेहान देहलवी असं तिचं मूळ नाव. तिचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ चा आणि मृत्यू २३ फेब्रुवारी १९६९ चा. आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीतली सर्वांत सुंदर अभिनेत्री असा गौरव तिनं प्राप्त केला होता. पण अशा सौंदयवतीला अल्पायुष्याचा शाप होता. कदाचित तिचं वयोवृद्ध होणं नियतीलाच मंजूर नसावं. म्हणूनच ती केवळ ३६ वर्षांची असताना नियतीनं तिचा डाव अर्धवट मोडला. 'द ब्यूटी विथ ट्रॅजेडी', 'द व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा' अशी अनेक बिरुदं तिच्या नावामागं लागली. तिच्या जाण्यानंतरही तिच्या दिसण्याविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी आजही चर्चा होत असते. तिच्या अनेक सिनेमांतून ती आपल्याला आजही दिसते. त्या अर्थानं ती अजरामरच आहे. 
मधुबालाच्या शेवटच्या आजाराविषयी तिच्या अनेक चरित्रांत, तसंच इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार, १९५४ मध्ये तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं सर्वांत प्रथम निष्पन्न झालं. त्या वेळी ती मद्रासमध्ये 'बहुत दिन हुए' नावाच्या सिनेमाच्या सेटवर काम करीत होती. पुढं पाच-सहा वर्षांत तिचा हा आजार चांगलाच बळावला. तिच्या बहिणीच्या मते, या आजारामुळं मधुबालाच्या शरीरात जादा रक्त तयार होत असे आणि ते नाक व तोंडावाटे बाहेर येत असे. अनेकदा डॉक्टर तिच्या घरी येत आणि बाटल्याच्या बाटल्या रक्त जमा करून नेत. या आजारामुळं तिच्या फुफ्फुसांवरही ताण पडे आणि त्यामुळं तिला श्वास घ्यायला त्रास होई. ती सतत खोकत असे आणि दर चार ते पाच तासांनी तिला ऑक्सिजन द्यावा लागे; अन्यथा तिचा श्वास कोंडला जाई. शेवटची सुमारे नऊ वर्षं ती अंथरुणालाच खिळून होती आणि अगदी शेवटी तर ती अगदी अस्थिपंजर झाली होती. अशी मधुबाला पाहायला आपल्याला कधीच आवडलं नसतं. 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना...' म्हणणारी अवखळ किंवा 'परदा नहीं जब कोई खुदा से, बंदों से परदा करना क्या...' असं म्हणणारी करारी मधुबालाच आपल्याला आवडते. पण कलावंतांचं रूपेरी आयुष्य आणि प्रत्यक्षातलं आयुष्य यात असाच जमीन-अस्मानाचा फरक असतो. कलाकारही शेवटी माणूसच असतात आणि माणूसपणाचे, शरीराचे सर्व भोग त्यांनाही भोगावेच लागतात. कलाकार पडद्यावर आपल्याला यक्षासारखे भासतात, पण प्रत्यक्षात त्यांनाही जरेचा शाप असतोच. मधुबालासारखी एखादी या शापातून सुटते आणि चिरतारुण्यासह अजरामर होते.
मधुबाला आणि दिलीपकुमार यांचं प्रेमप्रकरण जगजाहीर होतं. मात्र, त्या प्रकरणाचा दुर्दैवी अंत झाला. या प्रेमभंगावर खुन्नस म्हणून की काय, मधुबालानं किशोरकुमारशी लग्न केलं. त्यासाठी किशोरकुमारनं इस्लाम धर्म स्वीकारला. पण पुढेही हे लग्न फार काही यशस्वी झालं असं म्हणता येत नाही. याचं कारण मुळात मधुबाला सतत आजारीच असायची. किशोरकुमारनं या काळात तिची बरीच सेवा केली, असं अनेक जण सांगतात. तर याउलट त्यानं तिला तिच्या माहेरी आणून सोडलं आणि फार काही लक्ष दिलं नाही, असाही एक मतप्रवाह आहे. साधारण १९६६ च्या आसपास मधुबालाची प्रकृती थोडी सुधारली. त्या वेळी तिनं राज कपूरसोबत अर्धवट राहिलेल्या 'चालाक' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करायचा प्रयत्न केला. मात्र, शूटिंगची थोडीशी दगदगही तिला झेपली नाही आणि हा सिनेमा अपूर्णच राहिला. पुढं १९६९ मध्ये आता आपल्याला पडद्यावर येणं शक्य नाही, हे लक्षात आल्यावर मधुबालानं सिनेमा दिग्दर्शन करण्याची घोषणा केली. 'फर्ज और इश्क' असं त्या सिनेमाचं नाव होतं. मात्र, निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मधुबाला हे जग सोडून गेली आणि हाही सिनेमा केवळ घोषणेच्या पातळीवरच राहिला. मुंबईत तिची संगमरवरी समाधी बांधण्यात आली. त्यावर कुराणातील आयत कोरण्यात आले. पुढं २०१० मध्ये ही समाधी वादग्रस्तरीत्या उद्-ध्वस्त करण्यात आली. मधुबाला शरीररूपानं केव्हाच निघून गेली असली, तरी तिच्या रूपेरी पडद्यावरच्या चैतन्यमयी आणि उत्कट प्रेमात पाडणाऱ्या छबीद्वारे अद्याप आपल्यात जिवंतच आहे.

धुंद, अधुरं स्वप्न 
----------------
अकाली मरण पावलेल्या कलाकारांमध्ये आणखी एक नाव लगेच डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे गुरुदत्तचं. वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक लखलखता तारा होता. तो केवळ ३९ वर्षं जगला. नऊ जुलै १९२५ रोजी बंगलोरमध्ये जन्मलेल्या गुरूनं १० ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबईत आपलं जीवन संपवलं. एका मनस्वी कलावंताचा अकाली आणि दुर्दैवी मृत्यू झाला. या कलाकारांचं जगणं बघितलं, की लक्षात येतं, की ही साधीसुधी माणसं नव्हतीच. वेगळ्याच जगात वावरणारी स्वप्नाळू, वेडी माणसं होती. लौकिक जगाचे आचारविचार, रुढी-रिवाज यांना कधी पेललेच नाहीत. अनेकदा या लोकांनी जगाला फाट्यावर मारलं, तर जगानंही अनेक प्रसंगी त्यांची हेळसांड केली, थट्टा-मस्करी केली. गुरुदत्त हा विलक्षण प्रज्ञावंत कलाकार होता. त्याच्या जगण्याच्या सर्व शक्यता त्यानं स्वतः निर्माण केल्या होत्या. पारंपरिक जगण्याच्या सर्व चौकटी मोडीतच हा कलाकार एका आगळ्या धुंदीत जगला. त्याच्या त्या जगात केवळ प्रेम होतं, पॅशन होती, संगीत होतं, चित्र होतं आणि अर्थातच या सर्वांचा समुच्चय असलेला सिनेमा होता.
अशा या वेड्या, कलंदर माणसानं 'प्यासा' आणि 'कागज़ के फूल'सारखे सार्वकालिक श्रेष्ठ सिनेमे दिले. दुर्दैवानं 'कागज़ के फूल' १९५९ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला, तेव्हा पडला. या सिनेमाचं अपयश गुरुदत्तच्या जिव्हारी लागलं. त्यापुढं त्यानं त्याच्या प्रॉडक्शनच्या एकाही सिनेमावर दिग्दर्शक म्हणून स्वतःचं नाव येऊ दिलं नाही. गुरुदत्तनं गायिका गीता रॉयशी १९५३ मध्ये लग्न केलं. मात्र, त्या दोघांत वारंवार खटके उडत. अभिनेत्री वहिदा रेहमानचं गुरुदत्तच्या आयुष्यात येणं ही घटना गुरू आणि गीतामधल्या तणावाला आणखी खतपाणी घालणारी ठरली. गुरुदत्त सेटवर जेवढा शिस्तबद्ध दिग्दर्शक होता, तेवढाच तो वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी आणि बेशिस्त होता. प्रचंड प्रमाणात धूम्रपान, मद्यपान या गोष्टींच्या आहारी गेल्यानं तर शारीरिकदृष्ट्या तो आधीच पोखरून निघाला होता. पत्नीशी तणावपूर्ण संबंध आणि वहिदाबरोबरचं असफल प्रेम यामुळं गुरुदत्त मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यात 'कागज़ के फूल'च्या अपयशामुळं तर आणखीनच वाईट स्थिती झाली. दहा ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबईत पेडर रोडवरील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत्या घरी बेडरूममध्ये गुरुदत्त मृतावस्थेत आढळला. मद्यात झोपेच्या गोळ्या घालून घेण्याची त्याची सवय त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. गुरुदत्तनं आत्महत्या केली की त्याचा अपघाती मृत्यू झाला, याविषयी प्रवाद आहेत. मात्र, त्यानं पूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गुरुदत्तचा मुलगा अरुण याच्या म्हणण्यानुसार, गुरुदत्तनं आत्महत्या केली नाही; तर दारूच्या नशेत चुकून जास्त गोळ्यांचा डोस पोटात गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. आत्महत्या करायची असती, तर गुरुदत्तनं दुसऱ्या दिवशी दोन मीटिंग ठेवल्या नसत्या, असं त्याचं म्हणणं. त्या वेळी गुरुदत्त प्रॉडक्शनतर्फे 'बहारें फिर भी आयेंगी' या सिनेमाचं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू होतं. त्या कामासाठी ११ ऑक्टोबरला तो माला सिन्हाला भेटणार होता; तसंच रंगीत सिनेमांचं तंत्रज्ञान त्या वेळी नुकतंच हिंदीत आलं होतं, त्याविषयी तो राज कपूरशी चर्चा करणार होता. आत्महत्या करायची असती, तर गुरुदत्तनं दुसऱ्या दिवशी या दोघांना भेटायला बोलावलं नसतं, असं त्याच्या मुलाचं म्हणणं आहे. याशिवाय गुरुदत्त अजून दोन सिनेमांवर काम करीत होता. एक होता 'पिकनिक'. यात साधना त्याची नायिका असणार होती. दुसरा होता के. असीफचा 'लव्ह अँड गॉड.' पैकी गुरूच्या मृत्यूमुळं 'पिकनिक' हा सिनेमा डब्यात गेला, तर तब्बल दोन दशकांनी १९८६ मध्ये संजीवकुमारला घेऊन 'लव्ह अँड गॉड' अखेर तयार झाला. 'गुरुदत्त प्रॉडक्शन'च्या 'बहारें फिर भी आयेंगी'चं नशीबही चांगलं होतं. गुरूच्या जागी धर्मेंद्रला घेऊन दोन वर्षांनी, म्हणजे १९६६ मध्ये हा सिनेमा पडद्यावर झळकला. 
गुरुदत्त शेवटच्या काही काळात पत्नी गीतापासून विभक्त झाला होता आणि एकटा राहत होता. अब्रार अल्वी हे गुरुदत्तचे जवळचे मित्र. त्यांनी गुरुदत्तच्या आठवणी सांगणारं पुस्तक लिहिलं आहे. मात्र, अखेरच्या दिवसांतही गुरुदत्त अब्रार यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर फार काही बोललाच नाही. अगदी गीता व वहिदाविषयीही तो काही बोलत नसे. यावरून आत्महत्या करण्याची त्यानं खरोखरच मानसिक तयारी केली होती का, असा प्रश्न पडतो. ते काही का असेना, एक कलंदर, उमदा आणि विलक्षण प्रतिभावंत असा कलाकार आपल्यातून तेव्हा अकाली निघून गेला. गुरुदत्त आणखी काही वर्षं जगला असता, तर त्यानं त्या त्या काळात कसे सिनेमे बनवले असते, याचं कुतूहल वाटतं. बहुतेकदा काळाच्या पुढचे सिनेमे देणारा हा दिग्दर्शक आता जगातल्या मोजक्या टॉपच्या दिग्दर्शकांमध्ये अढळ स्थान पटकावून बसला आहे. 

मूर्तिमंत ट्रॅजेडी
---------------

मधुबाला व गुरुदत्तप्रमाणेच अकाली हे जग सोडून गेलेली तारका म्हणजे मीनाकुमारी. हिंदी सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन! तिच्या पडद्यावरील भूमिकांप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही तिच्या वाट्याला ट्रॅजेडीच आली, हे दुर्दैव! मेहजबीन बानो उर्फ मीनाकुमारी एक ऑगस्ट १९३२ रोजी या जगात आली आणि ३१ मार्च १९७२ रोजी हे जग सोडून गेली. पुरतं चाळीस वर्षांचंही आयुष्य तिला लाभलं नाही. जन्मापासूनच दुःखानं सतत तिची सोबत केली आणि अतीव वेदनेची मूर्तिमंत प्रतिमा झालेली ही थोर अभिनेत्री अकालीच हे निर्दयी जग सोडून गेली. मीनाकुमारीचा जन्म झाला, तेव्हा तिचे पिता अली बक्ष यांना दुसरीही मुलगी झाल्याचं दुःख झालं. त्यांची परिस्थिती फारशी बरी नव्हती. मीनाच्या आईच्या बाळंतपणाची डॉक्टरांची फी देण्याचीही त्यांची ऐपत नव्हती. तेव्हा निराश अवस्थेत अली बक्ष यांनी तिला एका मुस्लिम अनाथालयाच्या दाराशी ठेवलं आणि ते तिथून निघून जाऊ लागले. मात्र, मुलीचं रडणं ऐकून त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते तिला घ्यायला परत फिरले. नुकत्याच जन्मलेल्या त्या मुलीच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या. अली बक्ष यांनी तिला तातडीनं उचलून घेतलं आणि घरी परत आणलं. मीनाकुमारीचं पुढचं संपूर्ण आयुष्य दुःखमय जाणार, याची नियतीनं दाखवलेली ती चुणूकच होती. लहानग्या मेहजबीनला इच्छा नसतानाही सिनेमात काम करावं लागलं. औपचारिक शिक्षण असं काही झालंच नाही. चिमुकली मेहजबीन 'बेबी मीना' हे नाव धारण करून सिनेमांत बालकलाकाराच्या भूमिका करू लागली. चेहऱ्याला जो रंग लागला तो लागलाच. या रंगात वेदनेचा एक गहिरा रंग मिसळला होता, तो मात्र कुणाला दिसला नाही. विजय भट यांच्या अनेक सिनेमांत तिनं बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनीच तिचं नामकरण मीनाकुमारी असं केलं. वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी मीना नायिका बनली. सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९४६ ते १९५१ या पाच वर्षांत तिनं अनेक पौराणिक व अन्य फँटसी सिनेमांत कामं केली. पुढं १९५१ मध्ये तिची भेट दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्यासोबत झाली. मीनाकुमारीच्या अपघातानंतर या दोघांची जवळीक वाढली. महाबळेश्वरवरून मुंबईला येताना मीनाच्या गाडीला अपघात झाला आणि तिला पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तेव्हा कमाल अमरोही यांनी तिची काळजी घेतली. तेव्हापासून दोघांचं प्रेम फुललं आणि लगेच त्यांनी लग्नही केलं. तेव्हा कमाल ३४ वर्षांचे, तर मीना १९ वर्षांची होती. हे लग्न गुप्त पद्धतीनं झालं. कमाल यांचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि त्यांना तीन मुलं होती. नोंदणी पद्धतीनं लग्न झाल्यावर दोघंही आपापल्या घरी गेले होते. हे लग्न झाल्याचं मीनाच्या वडिलांना कळल्यावर ते संतापले आणि त्यांनी त्वरित तिला घटस्फोट घेण्यास सांगितलं. मात्र, मीनाकुमारीनं याला स्पष्ट नकार दिला. तरीही ती वडिलांकडंच राहत होती. पुढं एका प्रसंगी वडिलांनी रात्री तिला घरी घेण्यास नकार दिल्यानंतर तिनं तिची गाडी वळवून कमाल यांच्या घरी नेली व ती त्यांच्याकडे राहिली. या प्रसंगानंतरच मीनाकुमारीनं अमरोहींशी लग्न केलंय, ही बातमी सर्वांना समजली. मीनाकुमारीचं कमाल यांच्यावर कमालीचं प्रेम होतं. ती त्यांना कायम 'चंदन' या नावानं, तर ते तिला कायम 'मंजू' या नावानं हाक मारीत असत. पुढं मीनाकुमारी मोठी स्टार झाली. 'बैजू बावरा', 'परीणिता', 'दो बिघा जमीन', 'आझाद' आदी सिनेमांतली तिची कामं गाजली. पुढं ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी मीनानं 'मिस मेरी' या चित्रपटात विनोदी भूमिकाही लीलया साकारली होती. जेमिनी गणेशन यात तिचे नायक होते. पुढं 'दिल अपना और प्रीत पराई', 'कोहिनूर', 'भाभी की चुडियाँ' (मराठी चित्रपट 'वहिनीच्या बांगड्या'चा रिमेक) अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून मीनाकुमारीच्या अभिनयाचं बुलंद दर्शन प्रेक्षकांना घडत गेलं. १९६२ या वर्षानं मीनाकुमारीच्या आयुष्यात इतिहास घडविला. त्या वर्षीच्या उत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये तिन्ही नामांकनं एकट्या मीनाकुमारीलाच मिळाली होती. हे चित्रपट होते 'साहिब, बिबी और गुलाम', 'आरती' आणि 'मैं चूप रहूँगी'. अर्थात 'साहिब, बिबी और गुलाम'मधल्या छोट्या बहूच्या जबरदस्त भूमिकेसाठी मीनाला त्या वर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. गुरुदत्तच्या या सिनेमातली 'छोटी बहू' मीनाकुमारी अक्षरशः जगली, कारण ही भूमिका तिच्या वैयक्तिक आयुष्याशी खूपच साधर्म्य सांगणारी होती. मीनाकुमारीनं साकारलेली ही भूमिका म्हणजे हिंदी सिनेमाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली एक फार वरच्या दर्जाची भूमिका मानली जाते.
यापुढचा मीनाकुमारीचा प्रवास म्हणजे दुःखाची 'दर्दभरी दास्तान' आहे. पती कमाल अमरोहींबरोबर झालेले मतभेद, तिच्या आयुष्यात आलेले धर्मेंद्र, सावनकुमार किंवा गुलज़ार आदी पुरुष आणि मद्याचं दिवसेंदिवस वाढत जाणारं व्यसन यामुळं तिचा घात झाला. मीनाला निद्रानाशाचा विकार होता. झोपेच्या गोळ्यांऐवजी ब्रँडीचा एक पेग घेण्याची सूचना तिच्या डॉक्टरांनी १९६३ मध्ये तिला केली होती. मात्र, ही मद्याची सवयच पुढं तिचा जीव घेईल, याची तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती. पतीबरोबर मतभेद झाले आणि वेगळी राहत असली, तरी तिनं अमरोहींपासून कायदेशीर घटस्फोट कधीच घेतला नाही. 'पाकिजा' हा चित्रपट हे अमरोहींचं अल्टिमेट स्वप्न होतं. सुमारे १५ वर्षं ते या स्वप्नांचा पाठपुरावा करीत होते. त्यांच्या 'मंजू'लाही याची कल्पना होती. म्हणूनच मतभेद असतानाही तिनं 'पाकिजा' स्वीकारला आणि पूर्णही केला. 'पाकिजा' प्रदर्शित झाला आणि दीड महिन्यानं ती गेली. 'नाझ' नावानं कविता करणारी ती एक संवेदनशील शायराही होती. 'पाकिजा'साठी मीनाला फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनयाचा (मरणोत्तर) पुरस्कार  मिळाला... आणि अर्थात शेवटचाच! अतीव वेदनेची आणि हृदयात खोलवर उमटलेल्या अमीट जखमेसारखी मीनाकुमारी कायमची त्या दुसऱ्या अलौकिक दुनियेत निघून गेली. तिच्या रूपेरी पडद्यावरच्या एकेक जबरदस्त भूमिकांद्वारे मात्र ती अद्याप आपल्यातच आहे. 

अफाट प्रतिभा, पण...
----------------------
अगदी अफाट प्रतिभा, पण देवानं दिलेलं मर्यादित आयुष्य... असंच वर्णन अभिनेता संजीवकुमारचं करावं लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला कायमस्वरूपी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्यांमध्ये संजीवकुमारचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. केवळ ४७ वर्षांचं आयुष्य संजीवकुमारला लाभलं. नऊ जुलै १९३८ रोजी सुरतमध्ये जन्मलेला हरिभाई जेठालाल जरीवाला मुंबईत सहा नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या जोरदार झटक्यानं मरण पावला. इतर अभिनेत्यांपेक्षा संजीवकुमारनं त्याच्या वयापेक्षा अधिक वयाच्या किती तरी भूमिका केल्या. दैवदुर्विलास असा, की तो स्वतः मात्र वयाची पन्नाशी ओलांडू शकला नाही. संजीवकुमारला हे माहिती होतं. ही एक विचित्र, परंतु खरी गोष्ट होती, की संजीवकुमारच्या कुटुंबात फारच कमी लोक वयाच्या पन्नाशीनंतर जगले होते. त्याचा धाकटा भाऊ त्याच्या आधीच गेला, तर थोरला भाऊही संजीवकुमार गेल्यानंतर सहा महिन्यांतच मरण पावला. 
संजीवकुमार उर्फ हरिभाईनं चित्रपटसृष्टीवर आपल्या अलौकिक प्रतिभेनं चांगलाच ठसा उमटवला. 'शोले'तील ठाकूर असो, की 'त्रिशूल'मधील आर. के. गुप्ता ही अमिताभच्या पित्याची भूमिका असो, संजीवकुमारनं प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. वयाच्या केवळ सदतिसाव्या वर्षी त्यानं 'शोले'तील 'ठाकूर'ची भूमिका साकार केली आहे, हे सांगून खरं वाटत नाही. आपल्या प्रत्यक्षातील वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका स्वीकारताना संजीवकुमारला कुठलंही भय वाटत नव्हतं. त्याचा स्वतःच्या अभिनयक्षमतेवर पूर्ण विश्वास होता. कवी-लेखक गुलजार यांच्यासोबत संजीवकुमारनं बरंच काम केलं. विशेषतः 'कोशिश'मधील मूकबधीर हरिचरण माथूरची भूमिका संजीवकुमारनं अत्यंत उत्कटतेनं साकारली. 'खिलौना'तील भूमिकेमुळं मुळात संजीवकुमार हिंदी चित्रपटसृष्टीत प्रकाशोझोतात आला. गुलजारसोबत त्यानं 'मौसम', 'आँधी', 'अंगूर', 'नमकीन' आदी नऊ चित्रपटांत काम केलं. दाक्षिणात्य सिनेमांच्या हिंदीत होणाऱ्या रिमेकनी राजेश खन्ना व संजीवकुमारला चांगलाच हात दिला. 'नया दिन नयी रात' या चित्रपटात संजीवकुमारनं नऊ विविध भूमिका साकारल्या होत्या. शिवाजी गणेशन यांच्या 'नवरात्री' (१९६४) या तमीळ सिनेमाचा तो रिमेक होता. 'पती, पत्नी और वो' या सिनेमातील त्यांची हलकीफुलकी भूमिकाही गाजली होती. 
साधारण १९८० च्या नंतर संजीवकुमारनं चरित्र भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. त्याला जन्मापासूनच हृदयाचा त्रास होता. संजीवकुमार कायम अविवाहित राहिला. अभिनेत्री सुलक्षणा पंडितसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. परंतु दोघेही अविवाहितच राहिले. संजीवकुमारला हृदयविकाराचा पहिला झटका आल्यानंतर त्याच्यावर अमेरिकेत बायपास सर्जरी करण्यात आली. मात्र, मुंबईत परतल्यावर त्याला सहा नोव्हेंबर १९८५ रोजी दुसरा अटॅक आला आणि त्यातच तो निवर्तला. संजीवकुमार त्या वेळी सुमारे दहा सिनेमांत काम करीत होता. हे सर्व सिनेमे नंतर यथावकाश प्रदर्शित झाले. त्यातल्या त्याच्या भूमिकांची काटछाट करण्यात आली. संजीवकुमारच्या अकाली जाण्यानं एक अफाट प्रतिभेचा उत्तम नट आपण गमावला यात शंका नाही. 

स्मिता नावाचं स्वप्न
------------------
स्मिता पाटील. किती अकाली गेली! अवघ्या एकतिसाव्या वर्षी, मुलाच्या बाळंतपणात स्मिता अचानक गेली. स्मिताचं नाव आठवलं, की आजही हळहळणारी एक पिढी आहे. स्मिता म्हणजे अत्यंत मनस्वी, कलंदर व्यक्तिमत्त्व. तिच्या गुणांविषयी बोलायचं म्हणजे पारा चिमटीत पकडण्यासारखं आहे. स्मिता म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक मुग्ध-मधुर स्वप्न! ही अशी स्वप्नं केवळ स्वप्नातच पाहायची असतात. वास्तवाच्या रुक्ष भूमीवर ती शोधू गेल्यास हाती नैराश्याची रिक्त मूठ येण्याचीच शक्यता अधिक. स्मिताचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी शिरपूर (जि. धुळे) इथं झाला. तिचे वडील शिवाजीराव गिरीधर पाटील हे नामांकित राजकारणी. तिचं शालेय शिक्षण पुण्यात रेणुकास्वरूप हायस्कूलमध्ये झालं. स्मितानं अगदी सुरुवातीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर बातम्या देण्याचंही काम केलं. तिनं पुण्याच्या 'एफटीआयआय'मध्ये शिक्षण घेतलं होतं. श्याम बेनेगल यांनी तिला 'चरणदास चोर' या सिनेमात सर्वप्रथम संधी दिली. पुढं श्याम बेनेगल यांच्या जवळपास प्रत्येक सिनेमात स्मिता होती. ती आणि शबाना आझमी तत्कालीन समांतर सिनेमाचा चेहरा बनल्या. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, गिरीश कर्नाड यांच्यासह तिनं अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण कामं केली. मंथन, निशांत, भूमिका, आक्रोश, चक्र, शक्ती, नमक हलाल, आखिर क्यों, मिर्चमसाला, वारिस हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट. मराठीतही जैत रे जैत आणि उंबरठा या डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटांतून स्मितानं केलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. स्मिता केवळ अभिनेत्री नव्हती, तर स्त्रीवादी चळवळीतही ती सक्रिय होती. तिच्या अनेक भूमिकांमधूनही तिनं सक्षम स्त्री-भूमिका रंगविल्या. 
केवळ समांतर सिनेमातच नव्हे, तर व्यावसायिक चित्रपटांतूनही तिनं अनेक भूमिका केल्या. स्मितानं अभिनेता राज बब्बरशी केलेलं लग्न वादात सापडलं होतं. राज बब्बरनं त्याची आधीची पत्नी नादिरा हिला सोडून स्मिताशी लग्न केलं. स्मितानं मूल होऊ देऊ नये, असा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला होता म्हणे. मात्र, तिनं तो डावलला. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच १३ डिसेंबर १९८६ रोजी मध्यरात्री ती हे जग सोडून गेली. तेव्हा ती अवघ्या ३१ वर्षांची होती. स्मिताचा मृत्यू वैद्यकीय हलगर्जीपणामुळं झाला, असाही आरोप करण्यात येतो. प्रख्यात दिग्दर्शक मृणाल सेन यांनी अनेक वर्षांनंतर हा आरोप केला होता. ते काहीही असलं, तरी स्मिता अकाली गेली एवढंच सत्य मागे उरलं. स्मिता आज हयात असती, तर ६१ वर्षांची असती. म्हणजेच चित्रपटसृष्टीत अद्यापही पुष्कळ सक्रिय असती. या बदललेल्या काळात स्मिताही निश्चितच बदलली असती आणि तिनं स्वतःच्या अस्तित्वानं नंतर आलेल्या कित्येक सिनेमांना 'चार चाँद' लावले असते, यात शंका नाही. आता आपण केवळ तिच्या त्या काळातल्या सिनेमांतल्या तिच्या प्रतिमा डोळ्यांत साठवून ठेवू शकतो. 

इतर निखळलेले तारे
---------------------

हिंदी वा मराठी चित्रपटसृष्टीत अकाली निखळलेले इतरही अनेक तारे-तारका आहेत. दिव्या भारती (वय १९), जिया खान (२०), विनोद मेहरा (४५), अमजदखान (५१), गीता बाली (३५), ऋतुपर्ण घोष (४९), निर्मल पांडे (४८), दिलीप धवन (४५), जसपाल भट्टी (५७), शफी इनामदार (५०), आदेश श्रीवास्तव (५१) असे अनेक कलाकार हे जग फार लवकर सोडून गेले. कुणी असाध्य आजारानं, तर कुणी अपघातात गेले. काहींच्या मृत्यूविषयी अद्याप गूढ आहे. नैसर्गिक मरण नक्कीच नाही, पण मग आत्महत्या की घातपात, याचं उत्तर काळाच्या उदरातच दडलेलं आहे. यापैकी जसपाल भट्टी यांच्याशी तर माझे वैयक्तिक स्नेहबंध होते. त्यामुळं त्यांचा अपघाती मृत्यू ही मला स्वतःला वैयक्तिकरीत्या अत्यंत वेदनादायी घटना होती.
मराठीतही अरुण सरनाईक (वय ४९, २१ जून १९८४ मध्ये पुणे-कोल्हापूर हायवेवर अपघाती मृत्यू), जयराम हर्डीकर (१९७८ मध्ये अपघाती मृत्यू), डॉ. काशिनाथ घाणेकर (वय ४६, मृत्यू २ मार्च १९८६), रंजना (वय ४५, मृत्यू ३ मार्च २०००), लक्ष्मीकांत बेर्डे (वय ५०), भक्ती बर्वे (वय ५१, एक्स्प्रेस-वेवर ११ फेब्रुवारी २००१ रोजी अपघातात मृत्यू), रसिका जोशी (वय ३८, ७ जुलै २०११ रोजी ल्युकेमियानं मृत्यू), स्मिता तळवलकर (वय ५९, ६ ऑगस्ट २०१४ रोजी कॅन्सरनं मृत्यू) असे अनेक कलाकार अकालीच हे जग सोडून गेले. या सर्वांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं, यात शंका नाही. आजच्या काळात हे सगळे असते, तर त्यांनी कुठल्या भूमिका कशा केल्या असत्या, याची आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो. अर्थात हे सर्व कलाकार त्यांच्या कलाकृतींच्या रूपानं आपल्यात कायमच राहतील, यात शंका नाही.
--------

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी २०१६, चिरनिद्रा विशेषांक)
----

No comments:

Post a Comment