12 Dec 2016

कॉमेडी कट्टा दिवाळी अंक लेख

नस्ती 'कटकट'
--------------

पुरुषाच्या जन्माला येण्याचे जसे खास फायदे आहेत, तसेच अर्थातच तोटेही आहेत. दाढी, मिशा आणि डोईवर वाढणाऱ्या केशसंभाराची निगा राहणे हे काम आयुष्यभर करत राहावे लागते. डोईवरल्या केशसंभाराचा भार पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या पारड्यात अंमळ अधिक असायचा. हल्ली तसं काही राहिलेलं नाही. मात्र, सांभाळण्याचा जाच दोघांनाही आहेच. त्यामुळे डोईवरले केस सोडून देऊ. मात्र, दाढी आणि मिशा आयुष्यभर पुरतात. डोक्यावर जसं टक्कल पडून त्या जाचातून मुक्तता होते, तसं दाढीचं का टक्कल पडत नाही, हा बालबुद्धीचा असला, तरी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय तो 'बाल'बुद्धीचाही प्रश्न आहे! केवळ रोज दाढी करावी लागते आणि महिन्यातून किमान एकदा 'बाल'दिन साजरा करावा लागतो, या धास्तीने अनेकांनी संन्यास घेतला आहे, असे हिमालयातील गुहा आदी ठिकाणी राहणाऱ्या साधूमंडळींशी चर्चा केली असता, सहज समजून येईल. हवं तर स्वतः जाऊन खात्री करून या. 
रोजच्या रोज केलेली गुळगुळीत दाढी हे सामान्य संसारी माणसाचं हृदयद्रावक प्रतीक आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या माणसाला हे कार्य रोजच्या रोज सिद्धीस न्यावं लागतं. दाढी करता येणं ही एक साधना आहे. संसारी माणसांना ती सहज साध्य होत नाही. त्यासाठी अनेक वर्षं सराइतासारखा फिरणारा हात लागतो. आजीच्या हातच्या पुरणपोळीची सर आईच्या हाताला येत नाही आणि आईच्या हातच्या पुरणपोळीची चव बायकोच्या हाताला येत नाही, तीच स्थिती इथं आहे. चाळिशीत तयार झालेला हात अर्थातच विशीत नसतो. अस्मादिकांना प्रथम ओठांवर आणि मग हनुवटीवर लव फुटली, तेव्हा 'लव 86' नामक सिनेमा जोरात होता. चिकण्याचुपड्या नायकांची चलती होती. त्या प्रभावामुळं की काय, अस्मादिकांनी प्रथमपासूनच मिशीला चाट दिली. पहिली दाढी ही पहिल्या चुंबनाएवढीच रमणीय आठवण असते. बहुतेकदा ही दीक्षा एखाद्या परममित्राकडूनच मिळते. काहींना वडील किंवा मोठा भाऊ किंवा काका, मामा यांच्याकडूनही मिळते. सुदैवानं आमच्या काळापर्यंत यूज अँड थ्रो रेझर आले होते. त्यामुळं पहिला प्रयोग त्या रेझरद्वारेच झाला. होस्टेलवरच्या खोलीतला तो चिमुरडा आरसा, त्यात जेमतेम दिसणारं आपलं मुखकमल, आंघोळीच्याच मगातून आणलेलं किंचित कोमट पाणी, मग त्या शेव्हिंग क्रीमचा फुगत जाणारा फेस आणि त्यात हळूहळू माखला जाणारा आपला मुखचंद्रमा... अहाहा... काय ते अविस्मरणीय दृश्य! त्यात आपल्याला ही दीक्षा देणारा मित्र आपल्याला मार्गदर्शन करतोय की आपलं अवसान घालवतोय अशा काही तरी अगम्य सूचना देत असतो. मग अगदी अलगद गालावरून फिरणारा तो रेझर, रेझरच्या रुंदीएवढा गालावर उठलेला स्वच्छ पट्टा, तेथील केस निघून गेल्याचं पाहून झालेला अपरिमित आनंद... वाहव्वा... मग सावकाश सगळा फेस उतरवणं, पुन्हा एकदा दाढी घोटणं आणि पुन्हा हाच प्रयोग करून दाढी अध्यायाची सुफळ समाप्ती करणं... तोंड धुतल्यावर आरशात दिसणारा आपला वेगळाच चेहरा आणि तो पाहून ओठांच्या कोपऱ्यात फुटलेलं नकळत हसू... त्या आठवणी अगदीच गुळगुळीत आणि सुगंधी आहेत. दुर्दैवानं पहिल्या चुंबनाप्रमाणंच पहिल्या दाढीचा अनुभव हा पहिल्या दाढीपुरताच अविस्मरणीय वगैरे ठरतो. बाकी कुठल्याही गोष्टीचं रुटीन झालं, की त्यातली मजा संपलीच म्हणून समजा.
पहिल्यांदा चेहऱ्यावर आलेली लव बरेच दिवस टिकते. पण एकदा का दाढी केली, की मग रोज भराभर तिथं केस उगवायला लागतात. '...की तोडिला तरु, फुटे आणखी भराने' हेच तत्त्व! मग आयुष्यभर हे रोजचं गिरमिट मागं लागतं. म्हणूनच काही धोरणी तरुण पहिली दाढी होता होईल तो लांबवतात. काही काही जणांनी तर विसाव्या वर्षापर्यंतदेखील दाढीच्या ब्रशला किंवा रेझरला हात लावलेला नसतो. पुष्कळदा ही अशी अर्धवट फुटलेली दाढी छानच दिसते. तरुणाईच्या बेफिकीर, बेधुंद आणि बेदरकार वागण्याचं जणू ती प्रतीकच असते. शिवाय त्या वयात एवढी महत्त्वाची कामं असतात, की त्यात दाढीबिढी करायला वेळ देणं म्हणजे वेडेपणाच! मात्र, चुकूनमाकून एखाद्याची मजल गर्लफ्रेंडला डेटला घेऊन जाण्यापर्यंत गेली, तर त्याला अचानक गुळगुळीत दाढीचं महत्त्व पटतंच. मग तो रोजच्या रोज दाढी करायला लागून एकदम 'संसारी'च होतो. 
आणि प्रत्यक्ष संसारात पडल्यावर तर काय विचारता! दाढीचा सोहळा अगदी सुरुवातीला मासिक, मग पाक्षिक, मग साप्ताहिक असा होत होत लग्न होईतो दैनिक होऊन जातो. नोकरदार माणसाला तर पर्यायच नसतो. रोजच्या रोज गुळगुळीत दाढी करून, फॉर्मल कपडे, शूज वगैरे घालूनच त्याला ऑफिसात जावं लागतं. मग सुरू होते दाढीची लढाई! इतिहासात पानिपतची लढाई, खर्ड्याची लढाई किंवा प्लासीची लढाई आदी लढाया प्रसिद्ध आहेत. पण रोज घराघरांत चालणाऱ्या या दाढीच्या लढाईचं नाव इतिहासात का नाही? आम्ही शेकडो बिनीचे सरदार या लढाईत घायाळ होत असतो. (अर्थात, नंतर छान इ. दिसून कुणाला तरी घायाळ करू, हा एक गोड गैरसमज त्यामध्ये दडलेला असतो, तो भाग वेगळा!) वास्तविक ही लढाई म्हणजे एक प्रकारे स्वतःशीच लढाई. मोठमोठे आध्यात्मिक गुरू 'फाइट विदीन', 'स्वतःशीच लढा' वगैरे तत्त्वज्ञान सांगत असतात. पण त्यांना बेसिनच्या आरशासमोर उभं राहून, केवळ बनियन आणि खाली गुंडाळलेला टॉवेल अशा तुटपुंज्या वस्त्रांनिशी स्वतःच्याच प्रतिमेकडे निरखून पाहत पाहत चाललेली ही घनघोर लढाई का बरे दिसत नाही? ही स्वतःशीच चाललेली लढाई नव्हे काय? शस्त्रही आमच्याच हाती, ते ज्यावर चालवावयाचे तो देहही आमचाच... पण कुरुक्षेत्रावर अडचणीत सापडलेल्या पार्थाप्रमाणे आम्हाला 'आता शस्त्र कुणावर चालवू' वगैरे कुठलेही प्रश्न पडत नाहीत. (अर्जुन रोज दाढी करीत होता काय? असता, तर त्यास हे असले प्रश्न पडले नसते.) 'न धरी शस्त्र करी मी' असला यादवी बाणा इथं उपयोगाचा नसतो; अन्यथा ऑफिसात महाभारत हे ठरलेलं! त्यामुळं रोज इथं सकाळी समरभूमी असते. यात अर्धांग नावाचं एक महत्त्वाचं पात्र मोलाची भूमिका बजावत असतं. आपल्या ब्रशपासून ते चहा घेण्यापर्यंत संथगतीनं चाललेल्या हालचालींचं रूपांतर विजेच्या चपळाईनं होणाऱ्या हालचालींत करण्याचं सामर्थ्य तिच्या 'अहो, आता आवरता, का...' या एका वाक्यात दडलेलं असतं. या वाक्याची प्रत प्रत्येक घरानुसार निराळी असू शकते. मात्र, त्याचा अंतिम परिणाम हा दाढीधारी इसमाचं दाढी करण्याचं कार्य वायुवेगानं पार पाडण्यातच होतो.
अशी किती संकटं, किती आव्हानं! रविवारची सकाळ असते. छान लोळत पडावंसं वाटतं. आंघोळ आदी तिरस्करणीय गोष्टींची आठवणही आपण पाल झटकल्यासारखी मनातून काढून टाकत असतो. दाढीलाही फाटा द्यावा, असा तीव्र विचार मनात येतो आणि त्याच वेळी हनुवटीवर फुटलेल्या पांढऱ्या केसाचा एक अंश आपल्याला सहज दिसतो. हाच तो क्षण, हीच ती वेळ! आपण पुन्हा एकदा विजेच्या चपळाईनं हत्यार चालवून वाढत्या वयाची जाणीव करून देणारा तो दुष्ट पुरावा क्षणार्धात नष्ट करतो. मग आफ्टरशेव्ह लोशन लावून मस्त पावडर-बिवडर लावल्यावर मग पुन्हा आपण आरशात पाहतो तेव्हा कुठं हुश्श वाटतं. केवढा धोरणीपणा... केवढी मेहनत... परंतु पुरुषांच्या घरगुती कर्तृत्वाला जगात मान नाही हेच खरे! काही काही भाग्यवंतांनी दाढी राखून रोजच्या रोज करायच्या या लढाईवर विजय मिळविलेला असतो. पण त्यांचीही एक वेगळीच लढाई सुरू असते. ही दाढी राखणं म्हणजं अक्षरशः 'राखणं' असतं. ती नीट ट्रिम करणं, कलर करणं या भानगडींपासून त्यांचीही सुटका नसतेच. त्यामुळंच पुरुषांच्या या दाढीच्या लढाईला इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळायला हवं.
मिशी हे एक याच अध्यायातलं महत्त्वाचं प्रकरण आहे. अक्कडबाज, तलवारकट, हिटलर, चॅप्लिन, फ्रेंच असे मिशांचे आणि मिशीवाल्यांचे अगणित प्रकार आहेत. मिशी आणि मर्दानगी यांचं एक उगीचच नातं आहे. मानलेल्या बहीण-भावाच्या नात्यासारखंच हे नातं तकलादू आणि खोटं म्हणायला हवं. कारण वास्तविक असं काही नसतं. पण काही गैरसमज असतात, तसंच हे! भरल्या मिशीला पीळ देत मर्दानगी दाखवण्याचे निवड आता आखाड्यातसुद्धा राहिलेले नाहीत, या चालू वर्तमानकाळाचे आपण सर्व जण 'साक्षी' आहोत. तेव्हा मिशीला पीळ न दिलेलाच बरा! 
या दैनंदिन दाढी लढाईसोबत आणखी एक मासिक कटकट पुरुषांच्या मागे लागलेली असते, ती म्हणजे कटिंग. महिन्यातील एखादा रविवार असा घातवाराच्या रूपानं उगवतो आणि आपण अक्षरशः पाय ओढत त्या केशकर्तनगृही जाऊन पोचतो. तिथं आपल्यासारखीच शत्रूच्या हाती मान द्यायला असलेल्या अभागी पुरुषांची लाइन लागलेली असते. कुणी पेपर वाचतं, कुणी एकमेकांत गप्पा मारतं, तर कुणी मोबाइलवर चॅट करीत बसतं. आपला नंबर शक्यतो लवकर येऊ नये आणि उशीर झाला, या कारणाखाली पळ काढता यावा, अशीच आपली मनोमन इच्छा असते. किमान एक आठवडा तरी हे संकट पुढं ढकलता येईल, तर बरं, असं वाटत असतं. पण नियती नेहमीच शत्रूला साथ देते. त्याप्रमाणे 'चला काका,' ही आरोळी कानी येते. आपण इकडं-तिकडं पाहू लागतो, पण हे संबोधन आपल्यालाच आहे, हे आपल्या कमी झालेल्या डोईवरच्या भाराकडं पाहून समजून घ्यायचं असतं. खरं तर अस्मादिकांच्या डोईवर आता केवळ नावालाच काही ऐवज अस्तित्व राखून आहे. अशा वेळी केशकर्तनकार काकांनी आम्हाला निम्म्या किमतीत कापणी करून द्यायला हवी. पण येथे त्यांची व्यावसायिक नीतिमत्ता आड येत असावी. प्रत्येकाला समान काम, समान दाम या तत्त्वानं आपल्यालाही फुल्ल चार्ज बसतो. त्या परिसरात सर्वत्र केसच केस पडलेले असतात. जगात केसांची एवढी विपुल संख्या असताना, परमेश्वरानं आपल्याच पदरी निम्मं माप का घातलं, या विचारानं आधीच खिन्नता आलेली असते. त्यात कर्तनकाकांना 'जले पें नमक छिडना' या वाक्प्रचाराची अंमलबजावणी करायची हौस येते. आपल्या डोक्याकडं तुच्छ कटाक्ष टाकून, 'काय हो, काहीच राहिलं नाही की...' अशा अर्थाचं काही तरी वाक्य बोलल्याशिवाय कात्रीची टोकं उघडणारच नाहीत. अशा वेळी आपणही 'मग आता निम्मेच पैसे घ्या माझे' असा काही तरी विनोद करून, आपल्याही अंगी मुठेचंच पाणी आहे, हे दाखवायचं असतं. ते कर्तव्य आम्ही दर वेळी नित्यनियमाने करतो. आपल्या या विधानावर कर्तनकाका बोलत काहीच नाहीत. मात्र, क्षणोक्षणी आपली मुंडी पिरगाळून, इकडं-तिकडं सटासटा वळवून, खाली घालायला लावून पुढील काही मिनिटांत सर्व अपमानाचं उट्टं काढतात. खरोखर, एवढी मान खाली घालायची वेळ तर अर्धांगासमोरही येत नाही! कटिंग करता करता, गल्लीतल्या नगरसेवकाच्या कर्तृत्वापासून ते ओबामाच्या नाटो धोरणाविषयी आणि फ्लॅटच्या वाढत्या किमतींपासून ते कमी पावसामुळं घटलेल्या डाळ उत्पादनापर्यंत सर्व विषयांवर कर्तनकाका मुक्त चिंतन करीत राहतात. आपण ते खालच्या मानेनं ऐकायचं असतं. जरा मान वर केली, की कर्तनकाका ती पुन्हा खाली ढकलतात आणि वर 'हलू नका ओ, कातरी लागंल,' असंही ठणकावतात. आपल्या आयुष्यात ऐन प्रभातसमयी पातलेली ही 'कातरवेळ' कधी एकदा संपते, असं होऊन जातं. एकदाची कटिंग संपते. पैसे देण्याआधी काखा वर करायचा कार्यक्रम होतो. (वास्तविक हा कार्यक्रम पैसे देताना करायची आपली इच्छा असते. पण ते कधीच जमणार नाही.) गुळगुळीत काखा आणि हुळहुळीत मान घेऊन आपण 'सेंट्रल जेल' अशी पाटी लिहिलेल्या मोठ्ठ्या दारातून सिनेमाचा नायक कसा बाहेर येतो, तसे बाहेर येतो आणि 'ही सृष्टी मजला पुन्हा दाखविल्याबद्दल, हे आकाशातल्या बापा, तुझे आभार,' अशा नजरेनं सभोवताली पाहून घेतो. मेन्स पार्लर किंवा युनिसेक्स पार्लर आदी कितीही उच्च दर्जाचं कटिंगचं दुकान असलं, तरी मान व खांदा या परिसरात सदैव टोचणारे केस न पाडणारा कर्तनवीर आम्हाला अद्याप भेटायचा आहे. ही आमच्या आयुष्यात कायमच टोचून राहिलेली एक सल आहे, म्हणा ना! कधी घरी येऊन शॉवर घेतो, असं होऊन जातं. बऱ्याचदा ही आंघोळ या मासिक कृत्याच्या नावानंच केली जाते, हे वेगळं सांगायला नकोच.
अशी ही आम्हा पुरुषांच्या आयुष्यात जन्मभरासाठी लागलेल्या कटकटीची कहाणी तुम्ही कोणतीही कटकट न करता, वाचलीत याबद्दल तुम्हाला एक कटिंग चहा... भेटा, कटकट न करता!
---
(पूर्वप्रसिद्धी - कॉमेडी कट्टा दिवाळी अंक २०१६)

No comments:

Post a Comment