24 Dec 2016

दंगल रिव्ह्यू

'दंगल' हो... मंगल हो...!!
-----------------------------



आपल्याकडं चांगल्या क्रीडापटांची तशी वानवाच आहे. 'चक दे इंडिया' हा अलीकडच्या काळात आलेला आणि चांगला जमलेला पहिला क्रीडापट म्हणावा लागेल. त्यानंतर 'भाग मिल्खा भाग', 'मेरी कोम' ते नुकताच आलेला 'एम. एस. धोनी - अनटोल्ड स्टोरी'पर्यंत अनेक क्रीडापट आले. त्यातले बरेचसे चांगले प्रयत्न होते. खुद्द आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर यांनी भारतीयांचं क्रिकेटप्रेम अचूक हेरणारा 'लगान' १५ वर्षांपूर्वी काढला होता, तोही एका अर्थानं क्रीडापटच (पण काल्पनिक) होता. याच आमीरनं आता नीतेश तिवारीच्या 'दंगल' या नव्या हिंदी चित्रपटातून पुन्हा एकदा अस्सल, अगदी शब्दश: या 'मातीतला' क्रीडापट तयार केला आहे. 'दंगल'चं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ कुस्तीवरचा क्रीडापट राहत नाही, तर त्यापलीकडं जाऊन काही मूलभूत मुद्द्यांवर बोलतो. मुलींना आपण एक समाज म्हणून देत असलेली हीन वागणूक, आपल्याकडं असलेला क्रीडा संस्कृतीचा अभाव, बाप आणि मुली यांच्यातलं नातं अशा अनेक गोष्टींना सहृदयतेनं स्पर्श करतो. एक कलाकृती म्हणून आपल्या गाभ्यात असलेलं नाट्य नीट खुलवतो, प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो आणि त्यांच्या मनातल्या काही आदिम भावभावनांना साद घालतो... त्यामुळंच सिनेमा संपतो तेव्हा आपण एक माणूस म्हणून थोडेसे उन्नत झालो आहोत, असा काहीसा फील हा सिनेमा देतो. आपल्या देशावर आपल्या मनाच्या तळात कोपऱ्यात कुठं तरी असलेलं प्रेम एकदम पृष्ठभागावर आणून ठेवतो. मग आपण या कलाकृतीचा आनंद लुटत असताना अनेकदा हसतो, ओरडतो, चित्कारतो, मुठी वळतो, निराश होतो आणि हताशही होतो... डोळ्यांत पाणी येतं, अंगावर रोमांच उभे राहतात, पोटात कुठं तरी हलतं... आपलं सर्व शरीर असं त्या कलाकृतीला जैव प्रतिसाद देऊ लागतं. असा अनुभव देणारे सिनेमे कमी असतात. 'दंगल' पाहताना हे सगळं घडतं म्हणून तो सिनेमा आपल्याला आवडतो. प्रेक्षक म्हणून आपण त्यात एवढे घुसतो, एवढे तद्रूप होतो, की सिनेमात राष्ट्रगीत सुरू झालं, की आपणही नकळतपणे उठून उभे राहतो आणि सिनेमाच्या नायकासोबत आपलेही डोळे पाणावतात.
आमीर खानचं वैशिष्ट्य असं, की त्यानं एखाद्या गोष्टीत रस घेतला, की ती परिपूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. इथंही महावीरसिंह फोगाट या हरियाणवी कुस्तीगीराची भूमिका साकारताना त्यानं कोणतीही कसूर ठेवलेली नाही. महावीरसिंह यांनी आपल्या गीता आणि बबिता या दोन्ही मुलींना कुस्तीपटू म्हणूनच वाढवलं आणि त्यांनी देशासाठी पदकं जिंकून आणावीत, असं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न हरियाणासारख्या सर्वाधिक स्त्री-भ्रूणहत्या होणाऱ्या राज्यात साकारणं सोपं नव्हतं. पण कुठली तरी दुर्दम्य आशा माणसाला सदैव काही तरी अलौकिक करण्याची प्रेरणा देत असते. महावीरसिंह यांनी आपलं स्वप्न स्वतःच्या दोन्ही मुलींच्या माध्यमातून साकारलं. हा प्रवास दाखवताना आमीरला महावीरसिंह यांची भूमिका करायची होती आणि त्यासाठी भरपूर वजन वाढवावं लागणार होतं. आमीरनं ते केलंच; पण त्या हरियाणवी भाषेचा लहेजाही (म्हारी छोरियाँ छोरों से कम है के?) छान उचलला. त्याला या भूमिकेत पाहणं अगदीच आनंददायी अनुभव आहे. (आता आमीरनं एखादी मराठी व्यक्तिरेखा साकारावी, असं वाटू लागलं आहे.)
'दंगल'च्या गोष्टीचा नक्की जीव कशात आहे, हे दिग्दर्शक नीतेश तिवारीनं बरोबर ओळखलं आहे. त्यामुळंच सिनेमा लांबीनं मोठा (पावणेतीन तास) असला, तरी तो कुठंही कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमाची पटकथा चांगली आहे. ती बांधीव असल्यानं अनावश्यक फापटपसारा नाही. सिनेमा अगदी मुद्देसूदपणे गोष्ट सांगत पुढं सरकत राहतो. त्या दृष्टीनं सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच येणारा आमीर व दुसऱ्या एका कुस्तीगीराचा शॉट पाहण्यासारखा आहे. इथं नायकाला एस्टॅब्लिश करण्यासाठी अगदी अचूक प्रसंग निवडण्यात आला आहे. नंतर महावीरसिंहांना लागोपाठ चार मुली होणं, त्यामुळं मुलगा होईल आणि तो कुस्ती खेळेल, या त्यांच्या पारंपरिक विचारांना बसलेला धक्का, त्यातून आलेलं नैराश्य हा सगळा घटनाक्रम भराभर पुढं जातो. महावीरसिंहांच्या दोन्ही मोठ्या मुली एकदा मारामारी करून दोन मुलांना चांगला चोप देतात, हा प्रसंग सिनेमाचा टर्निंग पॉइंट ठरतो. इथंच महावीरसिंहांना कळून चुकतं, की आपल्या मुली पहिलवानकीचं रक्त घेऊनच जन्माला आल्या आहेत. त्याच क्षणी ते मुलींना कुस्तीपटू करण्याचा निर्धार करतात आणि तो मोठ्या जिद्दीनं, समाजाची पर्वा न करता तडीस नेतात.
या सगळा प्रवास नीतेशनं रंजक पद्धतीनं बांधला आहे. पूर्वार्धात अनेक ठिकाणी हास्याच्या लकेरी पेरल्या आहेत. ओंकार हे या मुलींच्या चुलतभावाचं पात्र इथं महत्त्वाचं आहे. हा ओंकार केवळ कथेचा निवेदक नाही, तर तो स्वतः या घटनाक्रमामधलं एक महत्त्वाचं पात्र आहे. या मुली सुरुवातीला त्याच्याबरोबरच कुस्तीची प्रॅक्टिस करतात. त्याच्याबरोबर पळतात, भांडतात... सख्खा भाऊ नसला, तरी हा ओंकार त्यांच्यासाठी असा छान सखाच बनून जातो. इथं येणारं 'बापू तू सेहत के लिए हानीकारक है' हे गाणंही धमाल आहे. पुढं या मुलींचे केस कापण्याचा प्रसंग असो, वा पहिल्यांदा मुलाबरोबर जाहीर कुस्ती लावण्याचा प्रसंग असो, महावीरसिंहांची जिद्द सगळीकडं प्रकर्षानं दिसत राहते. खूप कष्टानं गीताची प्रगती होते. महावीरसिंह तिला अगदी कुस्तीत तरबेज बनवतात. गीता राष्ट्रीय विजेती ठरते. यानंतर तिला पतियाळातल्या क्रीडा अकादमीत जावं लागतं....
उत्तरार्धात मोठ्या झालेल्य गीता आणि बबिताचा वेगळ्या पातळीवरचा संघर्ष आणि त्यातून कधी बिघडत, तर कधी घडत जाणारं त्यांचं पित्याबरोबरचं नातं दिग्दर्शकानं फार सुरेख मांडलंय. गीताला क्रीडा अकादमीत एक खडूस कोच (गिरीश कुलकर्णी) भेटतो. गीता पहिल्यांदाच घर सोडून बाहेर पडलेली असते. इथं तिला तिच्या तारुण्याची, स्त्रीत्वाची होणारी जाणीव नीतेशनं फार सट्ली, हळुवारपणे दाखवली आहे. यामुळे आणि इतर काही गोष्टींमुळं तिच्यात आणि वडिलांत दुरावा निर्माण होतो. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेऊनही गीताच्या पदरी फक्त अपयश येतं. दिल्लीच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकायची संधी गीतासमोर येते, तेव्हा मात्र महावीरसिंहांना राहवत नाही. पुढे अशा काही घटना घडत जातात, की बाप-लेकींमधलं नातं आणखी घट्ट होत जातं आणि शेवट अर्थात नाट्यमय व गोड होतो.
या सगळ्या सिनेमाच्या प्रवासात जमलेली गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे कास्टिंग. मोठ्या गीताच्या भूमिकेत फातिमा साना शेख या अभिनेत्रीनं काम केलं आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. मात्र, ती गीताच वाटावी, एवढी जबरदस्त कामगिरी तिनं केली आहे. विशेषतः शेवटाकडील कुस्तीची दृश्यं तर तिनं अफलातून दिली आहेत. त्यासाठी रीतसर कुस्तीचं प्रशिक्षणही घेतलं आहे. मोठ्या बबिताची भूमिका सान्या मल्होत्रानं केली आहे. तिनंही छान काम केलं आहे. अधिक कौतुक वाटतं ते लहान गीताचं काम करणाऱ्या झायरा वासिम आणि लहान बबिताचं काम करणाऱ्या सुहानी भटनागरचं. या दोघींनी सिनेमाचा पूर्वार्ध व्यापला आहे. एकाच वेळी अत्यंत निरागस, वडिलांवर प्रेम असणाऱ्या, पण त्याच वेळी स्त्रीसुलभ गोष्टी करण्याचं स्वाभाविक आकर्षण असलेल्या या दोन तरुण मुली झायरा आणि सुहानीनं कमालीच्या कन्व्हिन्सिंगली साकारल्या आहेत. साक्षी तन्वरनं या मुलींची आई चांगली उभी केली आहे. ओंकारच्या भूमिकेतल्या अभिनेत्यानंही लक्षात राहण्यासारखं काम केलं आहे. गिरीश कुलकर्णींनी खडूस प्रशिक्षकाची भूमिका नेहमीच्या टेचात, झक्कासच केली आहे.
संगीत प्रीतमचं आहे. सिनेमात चार-पाच मोठी गाणी आहेत. ती गाणी चांगली असली, तरी लक्षात राहिली नाहीत. कथानक पुढं न्यायला त्यांचा बऱ्यापैकी उपयोग झालेला आहे.
तेव्हा हा सिनेमा सर्वांनी बघावा नक्की. आपल्या देशात एकूणच खेळ संस्कृतीचा अभाव आहे. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' या सुविचाराची आपण जेवढी विटंबना करीत असू, तेवढी अन्यत्र कुठे क्वचितच होत असेल. खेळत असा वा नसा, उत्तम शरीरसंपदा राखण्यात काहीच गैर नाही. उलट बलवान माणूस जास्त खिलाडू वृत्तीचा असतो. आपल्याला हा सिनेमा पाहून हेही शिकता आलं तर खूपच चांगलं!
एक गोष्ट मात्र सांगायला हवी. महावीरसिंह फोगाट यांनी आपल्या मुलींवर स्वतःची जिद्द लादली तर नाही ना, असं सुरुवातीला नक्कीच वाटून जातं. याचं कारण त्या मुलींना कुस्ती खेळण्याची आवड असते, असं नसतं. मात्र, एकदा वडिलांनी ठरवलंय म्हटल्यावर त्या मुली निमूटपणे सगळं करतात. अर्थात हेतू वाईट नसल्यानं हेही चालून जातं. पण तरी वडिलांनी मुलींची इच्छा विचारायला हवी होती, असं वाटतं हे खरं.
बाकी 'दंगल' ही सर्वथा 'मंगल'च आहे.
---
दर्जा - **** (चार स्टार)
---

8 comments:

  1. तुम्ही शेवटी म्हणताय ते मनात येणारच, खासकरून आजूबाजूला सतत अापली अपुरी स्वप्नं मुलांकरवी सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणारे पालक पाहून.
    ओंकार त्या मुलींचा चुलतभाऊ आहे, फार लाघवी आहे ते पात्र. बहिणींसाठी काहीही करायला तयार असणारा प्रेमळ भाऊ.
    मला चक दे आठवत होता पाहताना, काही संवाद नि शाॅट थेट उचलल्यासारखे. पण आवडलाच एकंदर.

    ReplyDelete
  2. Shripad - very good review as always!

    ReplyDelete
  3. मस्त रे श्रीपाद! परिचयाचा शेवट तू लिहिलास हे तू त्या कलाकृतिच्या किंवा त्यातील कोणत्याही पात्राच्या मोहात न आडकता हा परिचय लिहिलास याचं ते द्योतक आहे.

    ReplyDelete
  4. Superb review!
    Unka bapu hanikarak na hotta to aj gitta babitta ko 4-4 bachchhe hotte, gold medal na hotta😁

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा... बिल्कुळ सही बात्त बोली जी आप्प णे....

      Delete