11 Dec 2016

जयललिता लेख

'अम्मा' नावाचं गारूड
--------------------

तमिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री - पुरुच्ची थलैवी (महान नेत्या) - जे. जयललिता यांच्या निधनानं तमिळनाडूच्याच नव्हे, तर भारताच्या राजकीय पटलावरील एक महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व अस्तंगत झालं आहे. जयललिता तमिळी जनतेसाठी 'अम्मा' (आई) होत्या. एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री ते जनतेची आई हा त्यांचा प्रवास मोठा रंजक आणि अनेकांच्या प्रतिभेला वाव देणारा आहे. जयललितांचं आयुष्य वादळी अन् नाट्यपूर्ण होतं हे खरंच; पण ज्या तमिळनाडूच्या राजकारणात त्यांनी एवढी वर्षं राज्य केलं, त्या तमिळनाडूच्या तमिळी सिनेमांप्रमाणंच त्यात आयुष्याचे सर्व रंग गडद छटेत रंगविलेले स्पष्ट दिसत होते. जयललिता वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी (म्हणजे तशा अकालीच) गेल्यानंतर आता त्यांच्या लोकप्रियतेची त्यांच्या वागण्या-बोलण्याची, त्यांच्या स्वभावाची सगळीकडं कारणमीमांसा केली जात आहे. विविध माध्यमांतून त्यांचा वेध घेतला जात आहे. जयललितांचं स्त्री असणं, त्यातही एक लोकप्रिय अभिनेत्री असणं आणि नंतर त्यांनी स्वतःचं रूपांतर 'अम्मा'मध्ये (आई) करणं या सगळ्यांचीही वेगळ्या पातळीवर चर्चा होताना दिसते आहे. पण जयललिता यांना एवढं लोकप्रिय होण्यासाठी नक्की काय गमवावं लागलं असेल? भारतीय राजकारणातलं प्रतीकांचं माहात्म्य आणि एखाद्याचं व्यक्तिस्वातंत्र्य या लढाईत दर वेळी प्रतीकांचाच विजय का होत असेल?
तमिळनाडूच्या राजकारणात, किंवा एकूणच भारताच्या राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, तर एका स्त्रीनं नक्की काय केलं पाहिजे, याची जाणीव जयललितांना काही गोष्टींमुळं निश्चितच झाली असेल. राजकारणात येण्यापूर्वी जयललिता अभिनेत्री होत्या. नुसत्या अभिनेत्री नव्हे, तर चांगल्या लोकप्रिय आणि पहिल्या क्रमांकाचं मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. आपल्या देशात प्रत्येक व्यवसायासाठी, प्रत्येक पेशासाठी लोकांच्या मनात स्वतंत्र कप्पे असतात. कुठला व्यवसाय कुणी करावा किंवा कुठल्या पेशात कुणी दिसावं याचे जनतेच्या मनात काही ठोकताळे पक्के असतात. जयललिता अभिनेत्री होत्या आणि त्या क्षेत्रात त्यांचं बरं चाललं होतं. खरं तर त्यांना अभिनेत्रीही व्हायचं नव्हतं. दहावीत राज्यात पहिल्या आलेल्या मुलीनं अभिनय क्षेत्रात जायचं काहीच कारण नव्हतं; पण जयललितांचं आयुष्य एवढं सरळ असणारच नव्हतं. आईमुळं त्या अभिनय क्षेत्रात आल्या. एकदा त्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर मात्र त्यांनी तेथे अव्वल स्थान मिळवलं. एखादी नटी कष्टानं मोठं यश मिळवते, तेव्हा तिचं श्रेय तिला देण्यातही आपला समाज सदैव कुचराई करताना दिसतो. मग नट्यांना सिनेमात करावी लागणारी कथित तडजोड ते एखाद्या सुपरस्टारची मर्जी असणं इथपर्यंत सर्व गोष्टींना तिच्या यशाचं भागीदार केलं जातं. हे सगळं खरं आहे असं मानलं, तरी या गोष्टी करणारी प्रत्येक नटी मोठी होत नसते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा जयललिता यांना काही गोष्टी अनुकूल घडल्या असं मानलं, तरी त्यापुढची वीस वर्षं या मोहमयी सृष्टीत अव्वल दर्जा टिकवून ठेवणं हे खचितच सोपं काम नाही. ते त्यांनी केलं, याचं कारण मुळात त्या हुशार होत्या. जात्याच अंगी असलेली बुद्धिमत्ता आणि तमिळी जनतेसाठी मोठा गुण ठरावा असं हिंदी-इंग्रजीवर असलेलं प्रभुत्व यामुळं जयललितांचं स्थान इतर नट्यांपेक्षा निश्चितच उजवं ठरत राहिलं. एम. जी. रामचंद्रन यांचा त्यांच्या आयुष्यावर असलेला प्रभाव त्यांनीही कधी नाकारला नाही. त्यांच्यामुळंच त्या राजकारणात आल्या. पण एमजीआर यांच्या निधनानंतर जलललितांची खरी कसोटी लागली...
एखाद्या महिलेनं राजकारणात नेतृत्व करावं याचं उदाहरण आजूबाजूला नव्हतंच अशी काही तेव्हा देशात परिस्थिती नव्हती. पंतप्रधान इंदिरा गांधी हे याचं सर्वांत मोठं आणि ठळक उदाहरण जयललितांच्या समोर होतं. अर्थात इंदिरा गांधींची पार्श्वभूमी आणि त्यांचं पंतप्रधान होणं या देशात अगदी सहज, स्वाभाविक मानलं गेलं होतं. मुळात इंदिरा गांधींचं स्त्री असणं त्यात फारसा अडथळा आणणारं ठरलं नाही. शेवटी ती 'पंडित नेहरूंची मुलगी' होती. राजा-राणीच्या गोष्टींचा पगडा असलेल्या भारतीय जनमानसासाठी 'राजा'ची मुलगीच त्याच्या गादीचा वारसदार ठरणं अगदी स्वाभाविक होतं. अर्थात तरीही इंदिरा गांधींना विरोध झालाच. पण तो त्यांनी मोडून काढला आणि इथं त्यांच्यातल्या कणखर स्त्रीचं दर्शन सर्व जगाला झालं. जयललितांचं सिनेमातलं करिअर त्याच वेळी समांतर सुरू होतं. त्या हे सगळं पाहत असणार. त्याच काळात श्रीलंकेत (तमिळनाडूला सर्वार्थानं जवळ) सिरिमाओ भंडारनायके पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या होत्या. त्या तर आशियातल्या नव्हे, तर जगातल्या पहिल्या राष्ट्रप्रमुख ठरल्या होत्या. अर्थात एमजीआर असेपर्यंत जयललितांची राजकीय महत्त्वाकांक्षा निद्रितावस्थेतच होती, असं म्हणायला पाहिजे. जसं अभिनेत्री होणं हे त्यांनी मागून घेतलं नव्हतं, तसं राजकारणात जाणं हाही त्यांचा वैयक्तिक चॉइस नव्हता. एमजीआर यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये फूट पडली आणि पक्षातला मोठा जनाधार जयललितांच्या मागं आला, हा सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहे. 
पण जेव्हा त्या प्रथम विधानसभेत आल्या आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करू लागल्या, तेव्हा त्यांचा खरा कस लागला. तमिळनाडूच्या विधानसभेत तोपर्यंत कुठलीही स्त्री विरोधी पक्षनेता नव्हती. जयललितांच्या रूपानं त्या विधानसभेनं प्रथमच स्त्री विरोधी पक्षनेता पाहिली. करुणानिधींचा द्रमुक सत्तेत होता. करुणानिधींच्या भाषणाला जयललितांनी आक्षेप घेतला म्हणून भर विधानसभेत त्यांची साडी फाडण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली. भारतातल्या संसदीय कामकाजाच्या इतिहासातला हा काळा अध्याय! पण जयललिता डगमगल्या नाहीत. त्या तशाच फाटक्या साडीनिशी माध्यमांना सामोऱ्या गेल्या आणि 'मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा या विधानसभेत पाय ठेवीन,' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि ती तडीलाही नेली. इथे सर्वप्रथम जयललितांना त्यांच्या स्त्री असण्याची आणि त्यातही अभिनेत्री असण्याची तीव्र जाणीव झाली असणार. अभिनेत्री म्हणजे तमाम जनतेची फँटसी! वर म्हटल्याप्रमाणं कुणी कुठल्या व्यवसायात असावं, याचे ठोकताळे आपल्याकडं जनतेच्या डोक्यात पक्के असतात. त्यामुळंच विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडं बघण्यापेक्षा एक अभिनेत्री म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं गेलं असणार आणि त्यामुळंच सत्ताधाऱ्यांना त्यांच्या साडीला हात घालण्याचं धारिष्ट्य झालं असणार. (याचा अर्थ बाकी कुणी अभिनेत्रीशी असंच वागावं असा नव्हे; हे त्याचं समर्थनही नव्हे. फक्त हा मुद्दा मानसिकतेचा आहे.) अत्यंत हुशार असलेल्या जयललितांनी हे नक्कीच जोखलं असणार.... मुख्यमंत्री व्हायचं, राज्याची प्रमुख व्हायचं तर जनतेची 'अम्मा' होण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखलं. त्यांनी रंगीबिरंगी साड्या नेसणं, भरपूर दागिने अंगावर घालणं बंद केलं. विशिष्ट पद्धतीनं साडी नेसून त्यांनी स्वतःचं संपूर्ण अंग झाकून टाकलं. जनतेच्या मनातली फँटसी साफ पुसून काढली. आपल्याकडच्या राजकारणातली ही प्रतीकात्मकता त्यांनी फार लवकर ओळखली. त्यांनी लगेच स्वतःचं रूपांतर 'अम्मा'मध्ये करून टाकलं. राजकारणात ताकद मिळविली. स्वतःच्या जोरावर पक्ष चालविला. पाच वेळा मुख्यमंत्री झाल्या. आपल्यातलं स्त्रीत्व विसरून त्या एक कठोर राजकारणी झाल्या. कसा केला असेल हा प्रवास त्यांनी? हा मानसिक संघर्ष किती अवघड असेल? एके काळी त्यांच्या रूपाची, सौंदर्याची चर्चा व्हायची. स्त्री म्हणून सुखावणारे कित्येक क्षण त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात अनुभवले असणार. हे सर्व एकदम सोडून देऊन, एक मुखवटा घेऊन जगताना त्यांना काय गमवावं लागलं असेल? प्रचंड संपत्ती, हजारोंच्या संख्येत असलेल्या साड्या, शेकडो जोड आणि प्रासादतुल्य निवासस्थान या भौतिक गोष्टींमुळं त्यांना सोडाव्या लागणाऱ्या गोष्टींची भरपाई झाली असेल? 
कधी तरी सिमी गरेवालच्या मुलाखतीत 'आजा सनम मधुर चांदनी में हम' गुणगुणताना किंवा 'नरी काँट्रॅक्टरवर माझा क्रश होता' असं सांगताना हे त्यांच्यातलं स्त्रीत्व अधूनमधून दिसून येतं... पण ते तेवढंच! बाकी त्या स्त्रीत्वाचे सगळे मनोव्यापार त्यांनी त्या अवाढव्य हिरव्या साडीत आणि लांब ब्लाउजमध्ये चिणूनच टाकले असणार! कशासाठी केलं असेल हे त्यांनी आणि त्यातून शेवटी त्यांना काय मिळालं? 
आपल्याकडं राजकारणातल्या महत्त्वाकांक्षांसाठी स्त्री असो किंवा पुरुषही... यांना आपलं नैसर्गिक स्त्रीत्व आणि पौरुष  कायमचं झाकून का टाकावं लागतं? साधे-सरळ स्त्री आणि पुरुष म्हणून ते का जगू शकत नाहीत? कशाला जनतेची 'अम्मा' व्हावं लागतं? कशाला त्यांचे 'भाऊ' वा 'दादा' व्हावं लागतं? तिकडं न्यूझीलंडचे पंतप्रधान आपल्या पत्नीला वेळ देता यावा म्हणून राजीनामा देतात आणि आपल्याकडं...? स्त्रीला साधं स्त्री म्हणून जगण्याची चोरी...!
अम्मा नावाचं गारूड समजावून घेताना हा विचार करीत गेलं तर सुन्न व्हायला होतं...! 
जेव्हा या देशातलं राजकारण आणि एकूणच समाजकारण राजकीय लोकांच्या दैवतीकरणाचा आणि पप्पा वा 'अम्माकरणा'चा मोह टाळू शकेल, तेव्हा कदाचित ते अधिक निर्मळ होण्याची शक्यता आहे.
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ डिसेंबर २०१६)
---

No comments:

Post a Comment