दिवाळी...
------------
दिवाळी आल्याचं निसर्गाला बरोबर कसं काय कळतं?
कसा हलकेच हवेत गारवा येतो? चोरपावलांनी हळूच मागे येऊन डोळे झाकत मिठी
घालणाऱ्या सखीसारखी थंडी बरोबर पहाटे कशी आपल्या दुलईत शिरते? दसऱ्याच्या
आधी नदीवर धुऊन वाळवलेल्या गोधडीसारखी सगळी झाडं-पानं-फुलं एकदम अशी
सुस्नात आणि हिरवी-स्वच्छ कशी काय दिसायला लागतात? निसर्गात आधी दिवाळी
येते आणि मग ती हळूच आपल्या तना-मनांत उतरते, हे खरं. आपले सगळे सण-समारंभ
असेच निसर्गाशी जैव नातं जोडून आहेत. म्हणूनच तर चार महिने दंगा घालणारा
पाऊस हलके हलके एक्झिट घेतो आणि मग सगळा भवताल हळुवारपणे थंडीच्या आधीन
होतो. या वातावरणातल्या बदलाची पण मजा असते. एखादी मैफल रंगत रंगत जावी,
तसा तो आस्ते आस्ते आपल्यात भिनतो. एकदा या बदलाची चाहूल लागली, की मग घरही
हसू लागतं. दसऱ्यानिमित्त घरातली जळमटं निघालेलीच असतात. कोपरा न् कोपरा
लख्ख उजळलेला असतो. पंख्यावरची, कपाटांवरची धूळ झटकलेली असते. पाऊस संपून
गेल्यावर जशी वातावरणातील धूळ खाली बसते आणि अगदी दूरवरचा आसमंतही
व्यवस्थित न्याहाळता येतो, तसं घरातला प्रत्येक इंच न् इंच स्वच्छ आणि
सुंदर दिसायला लागतो. दसऱ्यानिमित्त दारावर, गॅलरीत लावलेले हार आणि
तिथल्या झेंडूचा दरवळ कायम असतो. हार सुकले तरी लवकर काढावेसे वाटत नाहीत.
उत्सवी वातावरण असं सगळीकडं भरून राहिलेलं असतं. तेच मग अलवारपणे मनातही
उतरतं. मेंदूत कसल्याशा अचाट संदेशांची देवाणघेवाण सुरू होते... मनातली
दिवाळी सुरू होते ती तिथंच...
एकदा का मन सज्ज झालं, की मग सणही रंगू
लागतो... आपण माणसं मूलतः सामाजिक प्राणी असल्यानं आपल्याला कळपात,
घोळक्यात राहायला आवडतं. आपले सण-उत्सवही असेच गर्दीच्या साक्षीनं रंगतात.
मग मनातल्या उत्सवाला भौतिक सुखांचं मखर हवंसं वाटू लागतं. दिवाळीनिमित्त
बाजार फुललेलाच असतो. मग ही सुखाची साधनं दिमाखात घरात येतात. कधी जुनी
जातात अन् नवी येतात... कधी एकदम नवीनच येतात... त्यांच्या अस्तित्वानं
घराचा गाभारा भरायला लागतो. प्रसन्नतेचा अनाहत नाद मग ऐकू येऊ लागतो. काही
तरी सुखद भावना रोमरोमांतून फुलून येते. सगळं जग कसं सुंदर आहे, असं
वाटायला लागतं. मनातले सगळे विकार काही काळापुरते का होईना, कुलूपबंद
होतात. अष्टसात्त्विक भाव प्रकटतात. चेहरा सौम्य होतो, वक्ररेषा हसऱ्या
होतात... शरीर असा प्रतिसाद देऊ लागतं आणि मग या मोठ्या सणाची जाणीव जागृत
होते...
हे सगळं पाहिलं, की दिवाळीला सर्व सणांची
महाराणी का म्हणत असतील, ते लक्षात येतं. चांगला आठवडाभर चालणारा सण.
प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व. आणि वर्षानुवर्षं दिवाळीची प्रतीकंही
ठरलेली... तीपण किती अर्थपूर्ण! घरासमोर टांगलेला आकाशकंदील, पणत्यांची
रांग, फुलबाज्या, भुईनळे, भुईचक्रं ही सगळी उजेडाची प्रतीकं! आसमंताबरोबरच
मनातला काळोखही मिटवून टाकणारी; जगायला सदैव बळ देणारी, आशादायक अशी! तो
तीनदा हातातून निसटून खाली पडणारा मोती साबण म्हणजे स्वच्छतेचं प्रतीक...
तनाप्रमाणंच त्याला आपलं मनही स्वच्छ करता आलं असतं तर, असं कित्येकदा
वाटून जातं. सुवासिक उटणं म्हणजे या दिवसांतल्या निरामय आरोग्याचं प्रतीक!
पत्नीसाठी पाडवा, तर बहिणीसाठी भाऊबीज... कुटुंबाच्या समृद्धीसाठी
लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी... सर्व कुटुंबाच्या एकोप्याचा जणू संदेश
देणारी वसुबारस... दिवाळीतला प्रत्येक दिवस असा आपापला अर्थ आणि सांगावा
घेऊन येत असतो. त्यांचा अर्थ आपण नीट समजून घेतला तर दिवाळीचा झगमगाट आणखी
वाढलाच म्हणून समजा. दिवाळी आपल्या सोबत अनेक प्रकारचे आनंद घेऊन येते.
दिवाळीचा फराळ हा त्यातला एक जिव्हातृप्ती करणारा आनंद! कितीही नाही असं
ठरवलं तरी ज्याचा मनमुराद आस्वाद घेतल्याशिवाय समाधान वाटत नाही, असं हे
खाणं! यासोबतच खास आपल्या प्रांतात मिळणारा दिवाळीचा आनंद म्हणजे दिवाळी
अंक. हे आपलं खास वैशिष्ट्य. चकल्या आणि चिवड्याचे बकाणे भरत भरत दिवाळी
अंकातल्या साहित्याचा आनंद लुटणं हे आपल्यासाठी परमसुखाचं निधान! एकही
दिवाळी अंक कधी घेतला नाही, असं मराठी घर असेल असं वाटत नाही. आपल्या
जगण्याचा अविभाज्य भागच झालाय आता तो...
पूर्वी दिवाळीनिमित्त नातेवाइक एकमेकांकडे
जायचे... दुसऱ्या गावाला जाता यायचं. आता हे प्रमाण निदान शहरांत तरी कमी
झालंय. त्याऐवजी लोक आता पर्यटनस्थळी दिवाळी साजरी करतात. शहरातल्या
गजबजाटापासून, कोलाहलापासून दूर जावंसं वाटणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात
गेल्यावरच 'दिवाळी' वाटणं, हेही स्वाभाविकच आहे. विशेषतः आर्थिक संपन्नता
आल्यानंतर सणाचे आणि एकूणच सेलिब्रेशनचे निकष बदलतात, हे खरं. पूर्वी बारा
महिने गोडधोड खायला मिळायची सोय नव्हती, ऐपतही नव्हती. म्हणून दिवाळीत
मिळणाऱ्या गोडाधोडाचं अप्रूप असे. तीच गोष्ट कपड्यांची किंवा अन्य खरेदीची!
आता बारा महिने शॉपिंग सुरूच असतं आणि गोड-धोडाचं तर बोलूच नका. आपण
पूर्वी निदान काही तरी निमित्त काढून सेलिब्रेशन करायचो. आता निमित्ताचीही
गरज उरली नाही. याचं कारण आपली वाढलेली व्यवधानं आणि त्याच्या व्यस्त
प्रमाणात मिळणारा मोकळा वेळ. त्यामुळं जेव्हा कामातून सुट्टी मिळेल किंवा
रजा मिळेल तीच आपली दिवाळी आणि तोच आपला दसरा असतो. किंबहुना आता शहरांत
तरी हीच मानसिकता वाढू पाहतेय. आणि त्यात गैर काही नाही. असं असलं, तरी
दिवाळीचा माहौल हे सगळं विसरायला लावतो आणि दिवाळीचं म्हणून खास असं वेगळं
सेलिब्रेशन आपण करतोच करतो...
याचं कारण दिवाळीचं स्वरूप बदललं असेलही; पण
तिचा अंतरात्मा तोच आहे. तिचं सांगणं तेच आहे. दिवाळी बदलत चाललीय असं, मला
वाटतं, गेल्या शंभर वर्षांपासून लोक बोलत असतील. पण दर वेळा तो आकाशकंदील
आणून घरासमोर आपल्या आनंदाची जणू प्रकाशमय गुढी उभारण्याची ती ऊर्मी कायमच
असते. हा सण प्रकाशाचा आहे, त्यामुळं अखंड ऊर्जादायी आहे. वर्षभरात आपल्या
मनात साठलेलं नैराश्य, मळभ दूर करून नव्या उत्साहानं जगण्याला सामोरं
जाण्याची प्रेरणा हा सण देतो. दिवाळीच्या वेळी घराबाहेर, उंबऱ्याच्या
कोपऱ्यात शांतपणे तेवत असलेली पणती जणू काही आपलंच इंधन बनते. तिचा तो
इवलासा प्रकाशही आपल्याला आतून उजळवून टाकतो. आपल्या देशातला एकही भाग
किंवा कोपरा असा नसेल, की तिथं दिवाळी साजरी होत नाही. सगळ्या देशवासीयांना
उल्हसित करणारा हा भलताच ऊबदार सण आहे. दिवाळी आवडते, ती या अशा
कारणांसाठी... निसर्गही तिच्या स्वागतासाठी कसा तयार होऊन उभा असतो. आपल्या
चिमुकल्या जगण्याला प्रकाशाचा अर्थ देणारा हा सण आणि आपल्याला भौतिक
सुखांच्या मखरातून काढून सृष्टीच्या कुशीत जोजवू पाहणारा निसर्ग... दोघेही
भव्य आणि उदात्त! दोघांचंही सांगणं तसंच - जगणं समृद्ध करणारं!
निसर्गापासून दूर जाऊ नका आणि आतला विवेकाचा प्रकाश सदैव प्रज्वलित राहू
द्या, एवढ्या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. मग आयुष्यभर दिवाळीच
दिवाळी!
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; संवाद पुरवणी; १६ ऑक्टोबर २०१६)
----
खुपच छान लेख!
ReplyDeleteदिवाळीचं हवहवसं वातावरण शब्दात सुंदर मांडलं आहे.दिवाळी जशी जवळ येवू लागते .... तसतशी ती आधी मनात रंगू लागते .... दिवे,रांगोळया,कंदील,ऊटणे,फराळ,फटाके..... पहाट .. ....हया सारयांनी ती रंगते!.... मनात...आठवणीत... साठवलेलया आठवणींत!
मनःपूर्वक धन्यवाद...
ReplyDelete