6 Oct 2016

ओम पुरीवरचा लेख

ओम, पुरे!
---------
राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट या तीन विषयांवर बोलायला भारतात कुणालाही तज्ज्ञ असायची गरज असत नाही; कारण सगळेच जण या तीन विषयांत ‘तज्ज्ञ’ असतात, असं नेहमी गमतीनं बोललं जातं. भारतीयांचं या तिन्ही विषयांविषयीचं अतिरेकी प्रेम आणि नको तेवढा उत्साह लक्षात घेता, ते सार्थही आहे. पण कधी कधी मात्र अति होतं आणि सर्वत्र संतापाची लाट पसरते. सध्या पाकिस्तानबरोबर आपला देश एका गंभीर तणावातून जात आहे. अशा वातावरणात देशवासीयांकडून मर्यादशील वक्तव्यांची अपेक्षा करणं गैर नाही. पण तसं झालं तर अजून काय पाहिजे? सध्या ओम पुरीपासून ते सलमान खानपर्यंत सगळे सिनेमा कलाकार जे काही बडबडत सुटले आहेत, ते पाहता ‘ओम, पुरे!’ असंच म्हणायची वेळ आली आहे, हे निश्चित.
कलाकारांना, त्यातही हिंदी सिनेमांत काम करणाऱ्या कलाकारांना आपल्या देशात एक विशेष ‘स्टेटस’ आहे. म्हणजे सरकारनं किंवा लोकांनी त्यांना हे ‘स्टेटस’ दिलंय असं नाही; तर त्या लोकांनीच स्वतःला ते बहाल केलंय. त्यांना असं वाटतं, की ते सुपरस्टार किंवा लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळं त्यांना या देशात प्रत्येक गोष्टीत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. नुसता अधिकार आहे असं नाही; तर लोकांनी ते ऐकलं पाहिजे. याचं कारण त्यांना जवळपास प्रत्येक गोष्टीतलं सगळं काही कळतं.
ओम पुरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतले नामांकित कलाकार. कलात्मक आणि समांतर सिनेमांमधला एक महत्त्वाचा चेहरा. आपल्याकडे नॉर्मल कलाकारांपेक्षा समांतर कलाकारांना आणखीनच एक अतिविशेष ‘स्टेटस’ आहे. आपल्या देशात कलात्मक आणि समांतर सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या कलाकारांचं योगदान निश्चितच श्रेष्ठ दर्जाचं आहे, यात वाद नाही. पण असं केल्यानंतर आपल्याला जगातल्या प्रत्येक घटनेवर भाष्य करण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळतो, असा समज त्यांच्यात कुठून वाढीस लागतो, हे अनाकलनीय आहे. ओम पुरीही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच परवा ते दूरचित्रवाणीवरील चर्चेत बरळले. हो, ते जे काही बोलले त्याला आणि त्यांच्या त्या अवस्थेतील बडबडीला आपल्याकडे ‘बरळणे’ हाच एक चपखल शब्द आहे. सध्याच्या तणावाच्या स्थितीत पाकिस्तानच्या कलाकारांनी भारताविरुद्ध सुरू असलेल्या दहशतवादाचा किमान निषेध तरी करायला पाहिजे की नको, असा साधा प्रश्न होता. त्यावर ओम पुरी यांनी अद्वातद्वा प्रत्युत्तरं तर दिलीच; पण कहर म्हणजे ‘त्या जवानांना कुणी आर्मी जॉइन करायला सांगितली होती?’ असं अत्यंत बेमुर्वत व अश्लाघ्य वक्तव्य करून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ओम पुरी हे वक्तव्य करताना नक्कीच मद्याच्या अमलाखाली असावेत, असा संशय घ्यायला जागा आहे. त्यामुळं त्या या बेताल वक्तव्याकडं दुर्लक्ष करायला हवं, असं कुणी म्हणेल. पण तसं असतं तर ओम पुरी यांनी कदाचित दुसऱ्या दिवशी माफी मागितली असती वा दिलगिरी व्यक्त केली असती. तशी त्यांनी ती दुसऱ्या दिवशी मागितलीही; पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका वाहिनीवर बोलताना त्यांच्यातला उर्मटपणा कायमच राहिला. याही वेळी ते मद्यप्राशन करूनच बोलत असावेत, असं वाटण्याजोगी परिस्थिती दिसत होती. एके काळी उत्तमोत्तम भूमिका करून देशभरातल्या रसिकांची वाहव्वा मिळवणाऱ्या या कलाकाराची अवस्था बघवत नव्हती. त्यांना स्वतःचं एक वाक्यही नीट बोलता येत नव्हतं की त्याचं समर्थन नीट करता येत नव्हतं. ‘मला आर्मीच्या कोर्टात न्या; मला फाशी द्या,’ असं काय वाट्टेल ती बडबड ते करीत होते. एका मोठ्या कलाकाराचं हे जाहीर अधःपतन अक्षरशः केविलवाणं आणि त्यांच्यासाठी लाजीरवाणं होतं. कलाकाराला त्यांची प्रतिमा बनवायला आयुष्य खर्च करावं लागतं, पण तीच प्रतिमा नष्ट होण्यास केवळ एक मिनिटही पुरेसं ठरतं, असं जे म्हणतात त्याचा शब्दशः प्रत्यय आला.
ओम पुरी काय किंवा सलमान खान काय, किंवा पाकिस्तानचा वा तिथल्या कलाकारांचा अष्टौप्रहर पुळका येणारे महेश भट किंवा शाहरुख खानसारखे लोक काय... हे नक्की कुठल्या जगात वावरतात, असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाशी, त्यांच्या भावभावनांशी यांचा कुठलाही कनेक्ट राहिलेला नाही, हे वारंवार दिसून येतं. हस्तिदंती मनोऱ्यात राहून, स्वप्रतिमेशी अखंड प्रेमालाप करणारे हे सगळे तकलादू लोक... यांना सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी काय घेणं-देणं आहे? वास्तविक ओम पुरी हा कलाकार असा नाही. त्यांनी अनेक समांतर वा कलात्मक सिनेमांत सामान्य माणसांचीच कथा आणि व्यथा मांडली आहे. ‘अर्धसत्य’पासून ‘धूप’पर्यंत अनेक उदाहरणं सांगता येतील. मग असं असताना त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यात या पडद्यावरच्या संवेदनशीलतेचा थोडा तरी अंश का येऊ नये? याचं कारण कदाचित सामान्य माणसाच्या देशप्रेमात कुठलाही व्यवहार दडलेला नसतो आणि या कलाकारांची प्रत्येक कृती त्यांचं व्यावहारिक यश आणि प्रतिमा यांचा सौदा केल्याशिवाय घडतच नाही, यात असावं. प्रत्येकाचे कुठे ना कुठे ‘स्टेक्स’ वा हितसंबंध गुंतलेले असतात. असं असेल तर यांनी किमान गप्प बसून तरी हे हितसंबंध सांभाळत बसावं. तर तसंही नाही. ‘आपणच कसे शहाणे आणि तुम्ही सगळे गाढव’ हे सांगण्याची यांची अहमहमिका लागलेली असते. मग स्वतःच्या बेताल आणि खोट्या वक्तव्यांची समर्थनं करण्यासाठी यांना कलास्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य असल्या बेगडी भावनांचा आधार घ्यावा लागतो.
कलाकारांचं स्वातंत्र्य किंवा लोकशाहीनं दिलेलं भाषण स्वातंत्र्य आहेच ना! ते सगळेच जण मान्य करतात. पण लोकशाहीनं दिलेले हे सर्व हक्क नेहमी ‘कंडिशण्ड’ असतात. याला सदैव अटी व शर्ती लागू असतात. या अटी व शर्ती अर्थातच लोकशाहीपूरक खुल्या वातावरणाच्या आणि सर्वांना समान न्यायाच्या असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले सध्याचे अत्यंत तणावाचे संबंध लक्षात घेता, इथं सर्वसामान्य वातावरणातले एरवीचे नियम लागू होत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं आपला देश आणि त्याचे हितसंबंध हेच सर्वोच्च प्राधान्याचे असले पाहिजेत; तुमचे भाषण स्वातंत्र्य वगैरे नंतर! 
 ओम पुरी आणि सलमान यांना एकाच मापात मोजायचं एरवी कारण नाही. पण पाकिस्तानसारख्या संवेदनशील विषयावर बोलून आणि पाकिस्तानी कलाकारांविषयी अकारण सहानुभूती दाखवून ओम पुरींनी इथल्या नागरिकांची मनं दुखावली आहेत यात शंका नाही. हे लोक असं बोलू धजतात, याचं कारण आपल्याकडे आपल्या या अशा उथळ आणि सवंग विधानांचीही तळी उचलणारे कुणी ना कुणी भगत भेटतील याची त्यांना असलेली खात्री! या देशात असा एक कथित मानवतावादी, डावीकडं झुकलेला, इंटुक कंपू आहेच आहे आणि तो अशा वेळी अहमहमिकेनं पाकिस्तानच्या बाजूला उभा राहतो हे कित्येकदा बघण्यात आलेलं आहे. या सर्वांना फक्त आठच दिवस सियाचिनच्या युद्धभूमीवर लढायलाही नको; नुसतं राहायला पाठवा... मग किती पाकप्रेम शिल्लक उरतंय हेच आम्हाला बघायचं आहे. मुळात काय आहे, हे लोक इकडं मुंबईत आपल्या वातानुकूलित घरांमध्ये, ऐश्वर्यात लोळत असतात (आणि हा पैसाही इथल्या जनतेनंच यांचे सिनेमे डोक्यावर घेऊन यांच्या खिशात ओतलेला असतो) आणि त्यांना सीमेवर आपले जवान तुमच्यासाठी काय हाल सोसत उभे आहेत, याची काडीमात्रही कल्पना नसते. त्यामुळेच त्यांच्या तोंडून अशी भाषा निघू शकते.
यावर या मंडळींचे सिनेमे बहिष्कृत करा, वगैरे टूम निघेल. पण त्यालाही काही अर्थ नाही. याचं कारण मूळ मानसिकतेत आहे. ती जोवर हे लोक बदलत नाहीत, तोवर काहीच बदलणार नाही.
एके काळी हिंदी सिनेमांतल्या कलाकारांच्या समाजभानाविषयी आदरानं बोललं जायचं. बलराज सहानी, सुनील दत्त यांच्यापासून ते अलीकडच्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेपर्यंत अनेक कलाकारांनी हे समाजभान जपलं आहे आणि इथल्या रसिकांनीही त्यांना कायमच पाठिंबा दिलाय. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले कित्येक वर्षं लष्करासाठी (माझ्या माहितीनुसार) किमान एक लाख रुपये दर वर्षी स्वउत्पन्नातील देत असत. त्याचा गवगवाही ते अजिबात करत नसत. चंद्रकांत गोखलेंची हीच परंपरा त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले यांनीही पुढं चालविली आहे, असं कळतं. या दोन्ही कलाकारांची सैन्याप्रतीची ही सक्रिय आदरभावना आपल्याला त्यांच्यासमोर नतमस्तक करणारी आहे. ओम पुरींसारख्या ज्येष्ठ कलाकाराकडूनही तशीच अपेक्षा होती. मात्र, त्यांनी ती पार धुळीला मिळविली. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो! तो सोकावू नये यासाठी भविष्यात असा वेडेपणा आणि बेताल बडबड कुणी कलाकारानं करू नये, एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो. तोपर्यंत ‘ओम, पुरे!’ 
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; ६ ऑक्टोबर २०१६)

No comments:

Post a Comment