----------------------------------------------------
'एम. एस. धोनी - ॲन अनटोल्ड स्टोरी' आज बघितला. मला आवडला. म्हणजे एकदा बघण्यासारखा नक्की आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीचं काम मस्तच केलंय. तो संपूर्ण सिनेमाभर धोनीच वाटतो, हे त्याचं यश आहे. रांचीसारख्या छोट्या गावातून येऊन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यातही सर्वाधिक यशस्वी कर्णधार हा धोनीचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. नीरज पांडेसारखा दिग्दर्शक असल्यानं हा प्रवास रोचक पद्धतीनं पाहायला मिळेल, अशा अपेक्षेनं आपण सिनेमा पाहायला सुरुवात करतो. सिनेमा खूपच मोठा आहे. तीन तास दहा मिनिटांचा... त्यामानाने त्यात नाट्यमयता कमी आहे. पूर्वार्धात धोनीचं पूर्वायुष्य आलं आहे. (जी खरंच आपल्याला माहिती नसलेली, म्हणजेच अनटोल्ड स्टोरी आहे..) ही सगळी गोष्ट एकरेषीय पद्धतीनं साकारते. पण त्यात आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी असल्यानं त्यातील रंजकता टिकून राहते. धोनी शाळेत असतानाचं त्याचं फुटबॉलप्रेम, क्रिकेटकडे अपघातानं वळणं इथपासून ते खरगपूर स्टेशनवर टीसी म्हणून त्यानं केलेली नोकरी हा सगळा भाग पूर्वार्धात चांगला जमला आहे. विशेषतः धोनी हा 'यारों का यार' आहे आणि त्याचे सर्व मित्र आणि त्यांनी धोनीच्या उत्कर्षासाठी केलेला आटापिटा हा सर्वच भाग खूपच सुंदररीत्या समोर येतो. विशेषतः धोनीला कलकत्ता विमानतळावर रात्रीतून जीप करून सोडायला जाणारे मित्र आणि त्यांची तगमग डोळ्यांत पाणी आणते. हेलिकॉप्टर शॉट धोनी एका मित्राकडून अचानक कसा शिकतो, हेही रंजक आहे. धोनीचे शालेय व नंतर प्रथम दर्जा सामने यात सविस्तर दाखवले आहेत आणि ते सगळे तपशिलाची गरज भागवणारे आणि धोनीच्या करिअरची पायाभरणी कशी झाली, हे नीट दाखवणारे झाले आहेत.
उत्तरार्ध धोनीच्या सगळी क्रिकेट करिअरची चढती भाजणी मांडणारा आहे. हा भाग बऱ्यापैकी निराश करतो. धोनीसारख्या छोट्या गावातून आलेला तरुण भारतीय संघात तेव्हा असलेल्या दिग्गजांशी कसा वागतो, कसा बोलतो, संघ उभारणी कशी करतो, त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या राजकारणाचा मुकाबला कसा करतो, तो स्वतः इतरांविरुद्ध कसं राजकारण करतो, त्याच्या बाजूनं कोण असतं, विरोधात कोण असतं, हे सगळं यात आपल्याला पाहायला मिळेल, असं वाटतं. पण तसं ते काहीच होत नाही. कारण आपल्याकडं बायोपिक काढण्यासाठी वास्तवाचा कठोर सामना करण्याचं धैर्य ना त्या कथानायकाकडं असतं, ना दिग्दर्शकाकडं! बीसीसीआयचा यातला उल्लेख तर एवढा गुडीगुडी आहे, की हसू येतं. गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्याचं पोस्टर लहानपणी धोनीनं हट्टानं विकत घेतलेलं असतं, तो सचिन तेंडुलकर... या सर्वांसोबत खेळण्याची, एवढंच नव्हे, तर त्यांचा समावेश असलेल्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी धोनीला मिळाली. तेव्हा त्याला काय वाटलं, तो या सगळ्यांशी कसा वागला-बोलला हे पाहण्यात प्रेक्षकांना रस होता. केवढं नाट्य आहे या घटनेत! पण या सगळ्या घटना नुकत्याच घडून गेल्यामुळं आणि खुद्द धोनीही वन-डेत का होईना, पण अजून खेळत असल्यानं त्या सर्वांवर काहीही भाष्य करायला त्यांची छाती झाली नसावी. नाही म्हणायला एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये धोनी वरिष्ठ खेळाडूंच्या फिल्डिंगविषयीची आपली मतं स्पष्ट सांगतो आणि आपल्याला हवी तशी टीम मिळत नसेल, तर नेतृत्वही नको असं सांगतो एवढा एक प्रसंग यात आला आहे. २००७ च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाची दारूण स्थिती असताना आणि द्रविडनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता कुणाला कर्णधार करायचं, यावर खल सुरू असताना सचिननं आपलं मत धोनीच्या पारड्यात टाकलं आणि तसं शरद पवारांना सांगितलं, हे खुद्द पवारांनी अनेक वेळा जाहीररीत्या सांगितलं आहे. मग हा एवढा महत्त्वाचा प्रसंग या सिनेमात का नाही? गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे आणि सचिन या पाच पांडवांविषयी धोनीची मतं काय होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे. धोनीनं पद्धतशीरपणे एकेकाला संघातून दूर केलं. ज्या गांगुलीनं धोनीला संघात घेतलं आणि कायमच त्याची पाठराखण केली, त्या गांगुलीलाही धोनीनं सोडलं नाही. हा सर्व इतिहास माध्यमांतून नुकताच चर्चिला गेल्यानं सर्वांना माहिती आहे. यात सांगोवांगीच्या काही गोष्टी नसतीलच असं नाही. पण जर त्या तशा असतील, तर स्वतःच्या बायोपिकच्या निमित्तानं त्या वादाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणं धोनीला शक्य होतं. मात्र, या सिनेमात त्यावरही मौन बाळगण्यात आलं आहे. किंबहुना एक युवराज सोडला, तर अन्य कुठल्याही खेळाडूचं दर्शन का घडविलेलं नाही, हे अनाकलनीय आहे. बाकी प्रत्यक्ष सामन्यांचं चित्रण आणि धोनीच्या जागी सुशांतचा चेहरा चिकटवण्याचं कसब अनेकदा अति झालेलं आहे.
धोनीच्या आयुष्यात साक्षीच्या आधी आलेल्या प्रियांका नावाच्या तरुणीचा एपिसोड जेवढा मजेशीर आहे, तेवढाच या प्रकरणाचा अंत धक्कादायक. साक्षी आणि माहीची ओळख होते, तो प्रसंगही मजेशीर आहे. नंतर माही तिला भेटण्यासाठी औरंगाबादला येतो आणि तिच्या आणि तिच्या एका मैत्रिणीसह रिक्षानं फिरतो हा भागही मस्त जमलाय. विशेषतः औरंगाबादमधलं सर्व चित्रिकरण पाहून औरंगाबादकर खूश होतील. सिनेमाचा क्लायमॅक्स अर्थातच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये झालेला वर्ल्ड कपचा अंतिम सामना आणि त्यात धोनीनं षटकार मारून भारताला मिळवून दिलेला अविस्मरणीय विजय हाच आहे. किंबहुना याच दृश्यापासून चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवटही इथंच येऊन होतो...
धोनीच्या वडलांची भूमिका अनुपम खेरनं छान केली आहे. धोनीच्या बॅनर्जी नावाच्या प्रशिक्षकांची भूमिका राजेश शर्मानं झक्कास केली आहे. (क्रीडा चित्रपटांत राजेश शर्माचा चेहरा आता जणू मस्ट झाला आहे.) धोनीच्या बहिणीच्या भूमिकेत भूमिका चावलानं बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं आहे. धोनीच्या आयुष्यात आलेल्या प्रियांका आणि साक्षी या दोन तरुणींच्या भूमिका अनुक्रमे दिशा पटणी आणि किआरा अडवानी यांनी चांगल्या केल्या आहेत. किआरा अडवानी विशेष छान.
चित्रपटातील गाणीही चांगली आहेत, पण ती लक्षात मात्र राहिली नाहीत.
क्रीडापटूंवर बायोपिक बनवणं सोपं नाही. विशेषतः तो खेळाडू अद्याप खेळत असेल तर खूपच. पण तरीही नीरज पांडे दिग्दर्शक असल्यामुळं अपेक्षा उंचावतात. हे सर्व लक्षात घेता, हा सिनेमा वन टाइम वॉच ठरतो. धोनीसारख्या खेळाडूचं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे. पण सिनेमा ते सगळं आयुष्य दाखवत नाही आणि इथंच तो अपुरा वाटतो.
---
दर्जा - तीन स्टार
---
Very apt! 👌
ReplyDeleteधन्यवाद... :-)
Delete