मोठा ‘माणूस’
----------------
अमिताभ बच्चनच्या वागण्या-बोलण्यात, वावरण्यात
एक खानदानी आदब दिसते. अलाहाबादच्या श्रीवास्तवांचे संस्कार लख्ख दिसतात.
पिता थोर कवी आणि साहित्यिक असल्याचा सर्वाधिक परिणाम अमिताभच्या
व्यक्तिमत्त्वावर झालेला स्पष्ट कळून येतो. अमिताभ अभिनेता म्हणून किती
श्रेष्ठ आहे किंवा महान आहे, यावर कदाचित एक वेळ चर्चा होऊ शकेल. मात्र, तो
एक उत्तम ‘माणूस’ आहे, याबद्दल दुमत होण्याची शक्यता नाही. आजच्या काळात
हे माणूसपण दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेलं असताना अमिताभसारख्या बुजुर्ग
कलाकाराचं आपल्या आसपास असणं हे किती सुखावह आणि आश्वासक आहे!
अमिताभच्या तरुणपणी जेव्हा तो ‘अँग्री यंग मॅन’
साकारत होता, तेव्हा त्याला प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं
नाही. आम्ही कळत्या वयाचे झालो, तेव्हा अमिताभच्या कारकिर्दीचा पूर्वार्ध
संपून गेला होता. त्याचं पडद्यापलीकडचं अस्तित्व तेव्हा फार काही जाणवायचं
नाही. त्या काळात माध्यमेही मर्यादित होती. शिवाय अमिताभ तेव्हा काही फार
मीडिया-फ्रेंडली नव्हता, म्हणे. ते काही असो... अमिताभमधलं हे सुसंस्कृत
माणूसपण भावलं ते त्याच्या उतारवयात! दुसऱ्या इनिंगमध्ये म्हणजे साधारणतः
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभला आपण पाहिलं, तेव्हा मात्र त्याच्यातला
हा गुणविशेष सर्वांच्याच प्रकर्षानं लक्षात आला. एक तर तेव्हा तो जवळपास
५६-५७ वर्षांचा झाला होता. या वयात येणारी एक गोड परिपक्वता त्याच्या अंगात
ठायी ठायी भिनली होती. या कार्यक्रमातला त्याचा वावर बघण्यासारखा होता.
अमिताभ तेव्हा ऑलरेडी ‘महानायक’ पदाला पोचला होता. सामान्य लोकांना थेट
त्याच्याशी संवाद साधण्याची मिळालेली संधी आणि स्वतःच्या प्रतिमेची जाणीव
असूनही अमिताभचं त्या सर्वसामान्य लोकांशी वागणं खूप सहज होतं. अमिताभच्या
वागण्या-बोलण्यातली नम्रता, आदब कमालीची मोहवणारी होती. थोडं यश मिळालं, की
माणसं बहकल्यासारखी वागतात. डोक्यात हवा गेल्यासारखी उडायला लागतात.
अमिताभसारखं उत्तुंग यश तर फारच थोड्यांना मिळतं. या पार्श्वभूमीवर त्याचं
हे सार्वजनिक कार्यक्रमातलं वागणं खूपच आपुलकीचं आणि संस्कारशील होतं. कुणी
म्हणेल, अशा कार्यक्रमांत मोठे लोक मुद्दाम तसे वागतात-बोलतात. हे काही
अंशी खरंही आहे. मात्र, अमिताभच्या वागण्यात-बोलण्यात कुठेही हा बेतीवपणा
दिसला नाही. तो सुसंस्कृतपणा त्याच्या रक्तातच होता; असला पाहिजे.
सर्वसामान्य लोकांशी, विशेषतः महिलांशी बोलताना, त्यांना त्या खुर्चीवर
बसवताना, त्यांच्याशी हास्य-विनोद करताना अमिताभ कुठंही अभिनय करत होता
वा त्याचा हा सगळा बेतीव सभ्यपणा होता, असं कुठंही वाटलं नाही. किंबहुना
अशा कार्यक्रमात यजमानानं कसं वागावं-बोलावं याचा वस्तुपाठच त्यानं घालून
दिला. अमिताभच्या या आदबशीर वागण्यानं घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या
व्यक्तीविषयी वाटतो तसा आदर त्याच्याविषयी सर्वांना वाटू लागला हे निश्चित.
अमिताभच्या आयुष्याकडं नीट पाहिलं, तर लक्षात
येतं, की एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याप्रमाणेच त्याच्याही
आयुष्यात अनेक चढ-उतार आले. सुख-दुःखाचे प्रसंग आले, आशा-निराशेचे क्षण
आले. अमिताभचं कुटुंब म्हणजे अलाहाबादमधलं एक प्रतिष्ठित कुटुंब. वडिलांची
कीर्ती केवळ त्या शहरातच नव्हे, तर देशभरात पसरलेली. शिवाय इंदिरा गांधी
आणि एकूणच नेहरू-गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे संबंध. राजीव गांधी आणि
अमिताभ हे बालमित्र. अशा वेळी अमिताभचं आयुष्य सर्वसामान्यांसारखं असणार
नव्हतं, हे उघडच होतं. पण एका वेगळ्या पातळीवर अमिताभलाही संघर्ष टळला
नाहीच. त्याचं आयुष्य यशापयशाच्या रोलरकोस्टर राइडसारखं भासतं. त्याला
सुरुवातीला रेडिओवर मिळालेला नकार, नंतर लंबूटांगा नट म्हणून होणारी
हेटाळणी, मग एकदम मोठं यश, सुपरस्टारची बिरुदावली, मग प्रेमाचा त्रिकोण,
नंतर अचानक झालेला जीवघेणा अपघात, नंतर राजकारणात प्रवेश, तिथली अपयशी
खेळी, मग पुन्हा खासदारकीचा राजीनामा, नंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन,
चुकीच्या चित्रपटांची निवड, मग पुन्हा काही चित्रपटांना यश, मग दीर्घकाळ
विश्रांती, मग कंपनीची दिवाळखोरी, मग पुन्हा त्यातून सावरण्यासाठी राजकीय
मित्रांची मदत, नंतर पुन्हा सेकंड इनिंग, ‘कौन बनेगा करोडपती’चं तुफान यश
आणि त्यात एक से बढकर एक चांगल्या भूमिका साकारण्याची संधी...
अमिताभच्या या सर्व प्रवासात सर्वसामान्यांना
आपल्याही आयुष्याशी असलेलं साम्य जाणवतं. अमिताभकडं असलेलं वलय आणि पैसा
यांची तुलना सामान्यांशी होत नसली तरी हे साम्य त्यांना जाणवतं, हे विशेष!
याचं कारण अमिताभनं स्वतः कधी आपल्या या स्थानाचा आणि वलयाचा सामान्यांसमोर
गवगवा केलेला नाही आणि हेच त्याच्या ‘मोठा माणूस’ असण्याचं गमक आहे.
---
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती : ११ ऑक्टोबर २०१६*)
(* अमिताभच्या पंचाहत्तराव्या वर्षातील पदार्पणानिमित्त केलेल्या विशेष पानातील लेख.)
---
खुप छान अप्रतिम..!👌💐
ReplyDeleteछान लिहिलंय! अभिनंदन! अमिताभच्या वागण्यातील अदब अतिशय नैसर्गिक आहे,अजिबात कृत्रिम नाही, त्यात चांगल्या घराचे संस्कार आणि कवी पित्याचा कलाकार प्रभाव यांचं सुंदर मिश्रण आहे. धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद विनील...
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteछानच् लिहिलयं
ReplyDeleteखूपच सुंदर व आजही अगदी ताजा वाटणारा आहे हा लेख👌🙏 ..अगदी आमचीच 'मन की बात ' प्रकट झाली आहे ... मला देखील त्याच्यातील माणूस अतिशयच भावतो... व त्याच हे नितांत सुंदर दर्शन आपल्याला केवळ के बी सी या कार्यक्रमा मुळेच शक्य झालंय ...कालच के बी सी तील 80व्या वाढदिवसाचा विशेष भाग पहात असताना त्याने पुढील अनेक वर्षे हा कार्यक्रम असच करत राहून आगामी पिढ्या घडवत रहावं असं वाटल👏👏👏👌👍🌹
ReplyDelete