उसासे अन् उमाळे
----------------------
आपलं पहिलं प्रेम ही म्हटली तर फारच वैयक्तिक आणि हृदयाच्या कप्प्यात जपून वगैरे ठेवलेली गोष्ट. आपण आयुष्यात जिच्यावर पहिलं प्रेम केलं, तीच पुढं आयुष्यभर आपल्या सोबत राहण्याची शक्यता नसतेच. फारच थोड्यांना हे भाग्य लाभतं. त्यामुळं हे पहिलं प्रेम असं कायम मनात किंवा हृदयाच्या कप्प्यात जपूनच ठेवून द्यावं लागतं. बहुतेकांचा हाच अनुभव असतो. त्यामुळं सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' हा नवा मराठी चित्रपट पाहताना अशा बहुतेक सर्वांना आपलीच गोष्ट चालली आहे की काय असं वाटतं आणि सिनेमा कसाही असला तरी त्या प्रतिपाद्य विषयामुळं त्या कलाकृतीविषयी आपसूक प्रेम निर्माण होतं. एक सकारात्मक भावना तयार होते.
त्या दृष्टीनं सतीशनं निवडलेला विषय अगदी हुकमी आहे. अर्थात त्याचा अर्थ सिनेमा वाईट आहे, असा नाही. सिनेमाही नक्कीच बघणेबल आहे. किमान एकदा बघावा एवढा तरी निश्चितच. याचं कारण सिनेमाचं कास्टिंग. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आणि कुमारवयातले अभिनय बेर्डे व आर्या आंबेकर या चौघांनी चांगलं काम केल्यामुळं सिनेमा आणखीनच सुसह्य होतो. याशिवाय प्रेम या विषयावरची सतीशची हुकूमत. या दिग्दर्शकानं यापूर्वीही प्रेम या विषयाचे निरनिराळे पैलू आपल्याला उलगडून दाखविले आहेत. त्यामुळंच उलट त्याचा सिनेमा म्हटल्यावर एक विशिष्ट अपेक्षा तयार होते आणि एका अर्थानं ही त्या दिग्दर्शकाला मिळालेली पावतीच असते. सतीश या सिनेमाद्वारे त्या अपेक्षांना उतरला असला, तरी स्वतः एक दिग्दर्शक म्हणून तो आणखी पुढं गेला आहे का, किंवा त्यानं या सिनेमातून प्रेम या संकल्पनेच्या आणखी काही मिती शोधण्याची शक्यता व्यक्त केली आहे का, असं विचारल्यास त्याचं उत्तर मात्र नकारार्थी येतं.
या सिनेमाचा हिरो आता बहुदा पस्तीस ते चाळिशीमधला आहे. याचं कारण कॉलनीत व्हीसीआर आणून 'मैंने प्यार किया' सिनेमा पाहिला जात होता, तेव्हा आपला बालहिरो साधारण दहा वर्षांचा असावा. हा सिनेमा आणि यापुढेही सिनेमात येणारे अजय देवगणच्या 'फूल और काँटे'चे उल्लेख किंवा 'साजन'मधली गाणी पाहिल्यास हा हिरो नक्कीच १९८०-८१ च्या आसपास जन्मलेला असावा, जो आत्ता स्वाभाविकपणे पस्तिशी ओलांडलेला आहे. ज्याचं लग्न होऊन आता सात वर्षं झालीयत आणि आयुष्यात तसा तो सेटल झालाय....
इथं एक महत्त्वाची गोष्ट मला नोंदवायचीय. साधारणतः १९७५ ते १९८५ या काळात जन्मलेली पिढी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पिढी आहे. या गोष्टीचा नायकही त्याच काळात जन्मलेला आहे, म्हणून हा उल्लेख करणं गरजेचं वाटतं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत वेगानं बदललेलं जग अगदी पहिल्यांदा याच पिढीनं अंगावर घेतलं. त्यापूर्वीचं तुलनेनं शांत आयुष्यही याच पिढीनं बालपणी अनुभवलंय. यामुळं मोबाइलपूर्व आणि मोबाइलोत्तर अशा दोन युगांची साक्षीदार असलेली ही 'युनिक' पिढी आहे. या पिढीनं लहानपणी प्रेम तर केलं, मात्र आजच्या पिढीएवढी कदाचित ती स्मार्ट नसल्यानं ते प्रेम व्यक्त करायचं मात्र राहून गेलं. माझ्या पिढीत तर अनेकांच्या - अगदी माझ्यासकट अनेकांच्या - बाबतीत हे निश्चितच घडून गेलंय यात वाद नाही. आणि गंमत म्हणजे आता तंत्रज्ञानाची आणि संवादांची अत्याधुनिक साधने हातात असताना या पिढीला पुन्हा नव्यानं तरुण व्हावंसं वाटतंय. मुळात आत्ताही ते जास्तीत जास्त चाळिशीचे म्हणजे तसे तरुणच आहेत. आता त्यांना पुन्हा त्या काळातल्या मित्रांना (विशेषतः मैत्रिणींना) भेटावंसं वाटतंय. अगदी स्वाभाविक असं हे आकर्षण आहे. यातलं तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं नेपथ्य वगळलं तर मग या गोष्टीतली महत्त्वाची गंमतच संपते. अगदी सहजपणे वैयक्तिक संपर्क ही या माध्यमांची ताकद आहे आणि त्यामुळं या पिढीच्या जुन्या प्रेमांना अगदी सहज धुमारे फुटू लागले आहेत. ही गंमत सतीशनं या गोष्टीत आणलेली नाही. म्हणजे तो फोकस नसेलही, पण किमान ती बॅकड्रॉपला तरी दिसायला हवी होती.
हल्लीच्या काळात स्मार्टफोन बाळगणाऱ्या कुठल्याही दोन व्यक्तींना वन टु वन संपर्क शक्य झाल्यानं संवादाच्या, प्रेमात पडण्याच्या (जोडीनं अर्थातच विवाहबाह्य संबंधांच्या) किती तरी शक्यता निर्माण झाल्या आहेत. प्रेम या संकल्पनेला यामुळं किती तरी नव्या मिती जोडल्या गेल्या आहेत. मुळात अशा या नात्यांना रूढार्थानं प्रेम तरी म्हणावं का, असाही प्रश्न पडतो. पण ते जे काही असतं, ते आहेच. आणि अगदी आपल्या आजूबाजूला आहे. अनुरागची गोष्ट सांगताना दिग्दर्शक आजच्या काळातली गोष्टही सांगत असल्यानं या मितीचा संदर्भ यायला हवा होता, असं वाटलं. ज्याला कुठलंही नाव देता येणार नाही, अशा किती तरी प्रकारच्या नात्यांची निर्मिती या आभासी संपर्क साधनांमुळं शक्य झाली आहे. अनुरागसारख्या माणसाला या सगळ्यांची कल्पनाच नसेल, असं वाटत नाही. नायिका तन्वीही या सगळ्यांशी परिचित आहे. मग त्यांच्या नात्याकडं पारंपरिक पद्धतीनंच पाहण्याचा अट्टाहास दिग्दर्शकानं का केला असेल, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असो.
बाकी त्यानं जे मांडलंय किंवा दाखवलंय त्याविषयी बोलायचं तर चित्रपटात तीन फ्लॅशबॅक आहेत... किंवा असं म्हणू या, की नायक तीन वेगवेगळ्या वयोगटांत दिसतो. अगदी चौथी-पाचवीच्या वयात, मग कॉलेजच्या वयात आणि मग थेट आत्ताचा... आजचा! तर या तिन्ही काळांची गुंफण दिग्दर्शकानं चांगली केली आहे. त्या त्या काळाची वैशिष्ट्यं दर्शवणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी (उदा. व्हीसीआर, जीन्स पँट किंवा मारुतीचं जुनं मॉडेल इ.) नीट दाखवल्या आहेत. तपशिलांची काळजी घेतली आहे. कलादिग्दर्शनही नेमकं आहे. विशेषतः नायिकेच्या वेषभूषेच्या बाबतीत तर हा बदल अधिक प्रकर्षानं दिसतो. काळानुसार बदललेली मध्यमवर्गीय कुटुंबं आणि त्यांच्या घरांमधले बदल सतीशनं फार नेमकेपणानं टिपले आहेत.
अर्थात ही सगळी उत्तम नेपथ्यरचना झाली. या पार्श्वभूमीवर घडणारी गोष्ट काय सांगते? किंवा हे कथानक आपल्याला काय गोष्ट सांगतं? तर सांगायचं म्हणजे या कथानकात तसं फार नाट्य नाहीच. लहानपणी जिच्यावर प्रेम केलं ती अशी अचानक पुन्हा येतेय म्हटल्यावर मुळात हेच एक नाट्य ठरायला हवं. पण सिनेमात नेमकं तेच नीट घडलेलं दाखवलेलं नाही. यात आपला नायक मित्राकडून नायिका पुन्हा भारतात आलीय हे कळल्यावर तिच्या घरचा पत्ता मागतो आणि मग हळूच चोरट्या प्रेमवीरासारखा तिच्या घराभोवती घिरट्या घालतो. तो हे असं का वागतो, हे माझ्या तरी आकलनापलीकडंचं आहे. लहानपणी किंवा कुमारवयातही त्यांची जी घट्ट मैत्री दाखवली आहे, ती पाहता त्याचं हे वागणं काही झेपत नाही. आता त्यांचं भांडण होऊन ती निघून गेलेली असते हे दाखवलं असलं, तरी एवढ्या वर्षांनंतर आणि एवढी मॅच्युरिटी आल्यानंतर तरी तो तिला भेटायला का घाबरतो? शिवाय ते बागेत पहिल्यांदा भेटतात तो प्रसंग तर मला हास्यास्पदच वाटला. वास्तविक हा प्रसंग किती तरी अधिक संवेदनशील किंवा तरल असा दाखवायला हवा होता. त्या प्रसंगात ते दोघं ज्या पद्धतीनं भेटतात किंवा बोलतात त्यावरून त्यांच्यात लहानपणी एवढं घट्ट प्रेम असावं असं काही वाटत नाही. नंतर एकदा ते एका हॉटेलमध्ये भेटतात तेव्हाही ती फार तुटक वागते आणि निघून जाते. तिच्या त्या तुटक वागण्याला सिनेमात एक स्पष्टीकरण दिलं असलं, तरी मला ते फारच त्रोटक किंवा लंगडं वाटलं. मात्र, याची सगळी कसर दिग्दर्शकानं शेवटच्या त्यांच्या त्या गच्चीवरच्या भेटीत भरून काढली आहे. इथं त्या नायक-नायिकेच्या समजूतदारपणाची आणि मॅच्युरिटीची (विशेषतः नायिकेच्या) ओळख पटते आणि 'हां, हे असंच हवं' असं जे आपल्याला वाटतं, तो क्षण आनंदाचा आहे.
मनस्विनी लता रवींद्र या आजच्या आघाडीच्या पटकथा लेखिकेनंच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. पटकथाकार स्त्री आणि दिग्दर्शक पुरुष असल्यानं नायक-नायिका या दोघांच्याही मनोवस्थेचा विचार व्यवस्थित झाला आहे आणि ही या चित्रपटाची एक महत्त्वाची जमेची बाजू आहे.
अभिनयात अंकुश चौधरीसाठी आता अशा भूमिका हातखंडा आहेत. त्याचा वावर सहज आहे. भावना चेहऱ्यावर प्रकट करण्यात तो कमी पडत नाही. तेजश्री प्रधाननंही चांगलं काम केलंय. ती दिसते छान. मात्र, क्वचित काही वेळा कृत्रिम वाटते.
खास कौतुक करावंसं वाटतं ते अभिनय बेर्डेचं. लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा मुलगा पहिल्याच चित्रपटात तरुण अनुरागच्या भूमिकेत अगदी आश्वासक कामगिरी करून केला आहे. अभिनयच्या रक्तातच अभिनय आहे, हे अगदी जाणवतं. त्याचा चेहरा बोलका आहे. शब्दफेकीवर आणि देहबोलीवर अजून मेहनत घेतली तर तो पुढील काळात एक उत्तम अभिनेता होऊ शकतो, यात वाद नाही. आर्या आंबेकरनं माझ्या माहितीनुसार प्रथमच एवढी मोठी भूमिका केली असावी. तिनं कुमारवयीन तन्वीचं काम समरसून केलं आहे. तन्वीची व्यक्तिरेखा तिनं नीट समजून घेऊन काम केल्याचं जाणवतं.
लहान अनुरागच्या भूमिकेत सतीशचा मुलगा हृदित्य राजवाडे यानं छान काम केलं आहे. लहान तत्वीची भूमिका निर्मोही अग्निहोत्री या अतिशय गोड मुलीनं केली आहे. बाकी सुकन्या आणि संजय मोने, तुषार दळवी, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे हेे सगळे कलाकार उत्तमच.
संगीतात हृदयात वाजे समथिंग हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. बाकी गाणीही सिनेमात ऐकायला छान वाटतात. पण ती लक्षात राहत नाहीत. किमान माझ्या तरी लक्षात राहत नाहीत.
असो. तेव्हा एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही. कमी अपेक्षा ठेवून गेलात तर अधिक आनंद मिळेल.
---
दर्जा - तीन स्टार
----

श्रीपाद.. रिव्हू उत्तम लिहला आहे.. पण त्यात व्यक्त केलेली शंका की,ं एवढ्या वर्षांनंतर आणि एवढी मॅच्युरिटी आल्यानंतर तरी तो तिला भेटायला का घाबरतो?ं ते अगदी नॅचरल आहे.. कारण लहानपणी आणि पौगंडावस्थेत असणारा मोकळेपणा मॅच्युअर झाल्यावर राहत नाही.. ती काय म्हणेल, तिला काय वाटेल... ती ओळखेल काय.. भांडणानंतरचा राग कायम असला तर, तिथे चिडून फटकारले तर... अशा नानाविध शंका अंकुशच्या चेहऱ्यावर आहेत... त्यामुळे बहुदा दिग्दर्शकाने नायकाची तिसरी इनिंग अशी दाखविली आहे.. आता प्रत्यक्षात नायिकेचे व नायकाचे लग्न झाले आहे.. त्यामुळे बालवयातील प्रेम पुन्हा उफाळून आले तर काय? ही भितीही रास्त आहे.. त्यामुळे दाखविलेले प्रसंग अत्यंत नॅचरल व रिअलिस्टिक वाटतो.. बाकी ब्रह्मवाक्य अंतिम सत्य...
ReplyDeleteओळखेल काय ही भीती व्यर्थ होती. बाकी दोन शंका त्याच्या आधीच्या कॅरेक्टरबरोबर जात नाहीत....
Delete