निष्काम कर्मयोगी
---------------------
एमएस ऊर्फ एमएसडी ऊर्फ कॅप्टन कूल ऊर्फ माही ऊर्फ महेंद्रसिंह धोनी आता
पुन्हा मैदानात कधीच कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार नाही. चार जानेवारीच्या
संध्याकाळी आपण वन-डे व टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत
असल्याचं जाहीर करून, धोनीनं पुन्हा एक धक्कादायक घोषणा केली. कसोटी संघाचं
कर्णधारपदही त्यानं असंच सहज सोडलं होतं. आपल्या नेतृत्वगुणांसाठी ओळखला
जाणारा माही आता मैदानावर फक्त खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे.
नेतृत्वगुणांसाठी ज्याला सर्व जगानं नावाजलं, त्यानं नेतृत्वाची कवचकुंडलं
अशी सहज काढून ठेवावीत, हा वेगळ्या पातळीवरचा निष्काम कर्मयोगच आहे. माहीनं
हा निर्णय घ्यावा, यात काहीच आश्चर्य नाही; कारण पहिल्यापासूनच तो असे
धक्कादायक वाटणारे, पण त्याच्यासाठी योग्य असलेले निर्णय घेण्यासाठी
प्रसिद्ध आहे.
धोनीच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया येत
आहेत. त्यानं केलं ते बरोबरच केलं, असं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
याचं कारणही स्पष्ट आहे. कसोटी संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं आल्यापासून
तो आणि आपला एकूणच सर्व संघ अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे. कोहलीनं स्वतःचे
नेतृत्वगुण सिद्ध करून दाखवले आहेत. नेतृत्व करण्याचा ताण त्याच्या
वैयक्तिक कामगिरीवर पडत नाही, हेही दिसून आलंय. याउलट धोनी गेले तीन-चार
महिने संघात नाहीय. संघाची घडी नीट बसली आहे आणि त्याला नव्याने या
वातावरणाशी जुळवून घेऊन संघाचं नेतृत्व करावं लागणार होतं. या परिस्थितीत
विराटकडंच तिन्ही प्रकारांतलं नेतृत्व असावं, असं वाटणाऱ्यांची संख्या वाढू
लागली होती. धोनीनं आता बाजूला व्हावं, असं त्याला कदाचित सुचवलंही गेलं
असतं. पण त्यापूर्वीच त्यानं हा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा आपल्यातल्या
अचूक निर्णयक्षमतेचा प्रत्यय दिला.
धोनी कर्णधार झाला तो विपरीत परिस्थितीत. दहा
वर्षांपूर्वी भारत वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कपमध्ये दारूण पद्धतीनं हरून
बाहेर पडला होता. राहुल द्रविडकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं आणि ते
धोनीकडं देण्यात आलं. याचं कारण त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या
पहिल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये माहीनं भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तोही
अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून! वन-डे वर्ल्ड कपमधला पराभव विसरायला
लावणारा हा विजय होता. धोनीचे नेतृत्वगुण या स्पर्धेत विशेषत्वानं दिसले
होते. जोगिंदर शर्माला अखेरचं षटक देण्याचा निर्णय त्याचाच होता. आज
जोगिंदर शर्माचं नावही कुठं दिसत नाही की तो खेळाडूही कुठंय ते माहिती
नाही. मात्र, त्या क्षणापुरता त्याला अचूक वापरून घेण्याची धोनीची हातोटी
फारच वेगळी आणि सर्वांना स्तिमित करणारी होती. तेव्हा तर भारतीय संघात
सचिन, सेहवाग, राहुल, गांगुली, लक्ष्मण आणि कुंबळे असे दिग्गज खेळाडू होते.
मात्र, ‘कॅप्टन कूल’ असं बिरुद मिरवणाऱ्या धोनीनं या सगळ्यांना समर्थपणे
हाताळलं. त्याच वेळी वन-डे आणि टी-२० मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली,
सुरेश रैना, अश्विन, युवराजसिंह, अजिंक्य रहाणे यासारख्या अनेक खेळाडूंना
मोठं केलं. या सर्वांच्या क्षमतेचं त्याचं आकलन जबरदस्त होतं. वर्ल्ड
कपच्या अंतिम सामन्यात स्वतःला युवराजच्या जागी चौथ्या क्रमांकावर बढती
देण्याचा त्याचा निर्णयही असाच जबरदस्त मास्टरस्ट्रोक होता. गंभीर मैदानात
होता आणि मुरलीधरन एका बाजूने गोलंदाजी करीत होता. युवराजही डावखुरा
असल्यानं दोघेही डावरे फलंदाज मैदानात आले असते आणि मुरलीचा सामना करणं
त्यांना कठीण केलं असतं. आणि त्या स्थितीत आणखी एक विकेट पडली असती, तर
भारतावरचं दडपण वाढलं असतं. पण माहीनं स्वतः मैदानात उतरून श्रीलंकेच्या
डावपेचांना सुरुंग लावला. गेल्या वर्ल्ड कपमध्ये मुरलीनं त्याला शून्यावर
यष्टिचीत केलं होतं. मग या वेळी मुरलीसमोर या पठ्ठ्यानं एकदाही क्रीझ सोडली
नाही.
भारताला कसोटी, वन-डे आणि टी- २० या तिन्ही
प्रकारांत सर्वोच्च स्थान मिळवून देणारा हा एकमेवाद्वितीय कर्णधार. पण विजय
मिळाल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असायची. अशा वेळी तो
निष्काम कर्मयोगी भासायचा. ‘विजय मिळवून देण्याची जबाबदारी माझी, आता
तुम्ही सगळे जल्लोष करा,’ अशी त्याची देहबोली असायची. आतापर्यंतच्या सर्व
मोठ्या विजयांच्या चित्रफिती पाहा. धोनी सर्वांपासून अलिप्त कुठे तरी
कोपऱ्यात उभा असलेला दिसतो. अगदी २०११ चा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हाही
सचिनसह विराट, हरभजन आदी सर्व खेळाडू भावूक झाले होते. पण माही अगदी
स्थिरचित्त होता. हाच तो निष्काम कर्मयोग! धोनी भारतासारख्या जगातल्या
लोकप्रिय संघाचा कर्णधार होता. जग फिरला. अनेक लोक त्याला भेटले असतील,
अनेक मोह समोर आले असतील. मात्र, या सर्व गोष्टी त्यानं शांतचित्तानं
हाताळल्या. त्याच्या मैदानातील वर्तणुकीत कधीही आगाऊपणा दिसला नाही.
कुठल्याही खेळाडूसोबत त्याचा मैदानात वाद झालेला आठवत नाही. यष्टिरक्षक खरं
तर स्लेजिंग करण्यात पटाईत असतात. मात्र, धोनीनं पद्धतीनं स्लेजिंग कधीच
केलं नाही. फलंदाज क्रीझबाहेर गेला आणि चेंडू मागं त्याच्या ग्लोव्हजमध्ये
आला, तर मात्र तो फलंदाज वाचायचा नाही!
माहीच्या या नेतृत्वगुणांमुळेच तो भारताचा
सर्वाधिक यशस्वी कर्णधार झाला, यात वाद नाही. काही काही खेळाडू धोनीचे
म्हणून ओळखले जायचे, किंवा अजूनही ओळखले जातात. अश्विन, जडेजा, रैनापासून
ते अलीकडच्या बुमराह किंवा हार्दिक पंड्यापर्यंत अनेक खेळाडूंवर ते
धोनीच्या मर्जीतले खेळाडू असल्याचा शिक्का बसला आहे. याउलट गंभीर किंवा
रहाणे त्याच्या फार मर्जीतले नसल्यानेच त्यांचे संघात स्थान कायम नसायचे,
असेही बोलले जाई. गांगुली, द्रविड वा लक्ष्मण यांना धोनीने एकेक करून कशी
निवृत्ती घ्यायला लावली, याच्याही चर्चा ऐकू येतात. मात्र, धोनीनं
स्वतःच्या नेतृत्वगुणांच्या जोरावर या सगळ्या नकारात्मक चर्चा बंद करायला
भाग पाडल्या आणि संघाला शिखरावर नेलं...
यशाच्या शिखरावर असताना, योग्य वेळी थांबायचं
भान असणं हेही मोठ्या खेळाडूचंच लक्षण मानलं जातं. सुनील गावसकरच्या
निवृत्तीचा दाखला त्यासाठी दिला जातो. धोनीनं पुन्हा एकदा त्याच्या या
निर्णयानं तो मोठा खेळाडू असल्याचं दाखवून दिलं आहे. आता तो कर्णधार नसला,
तरी मैदानावर असणारच आहे. त्याचा तो प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट आता तो आणखी
सहजतेनं मारू शकेल...
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - ६ जानेवारी २०१७)
---
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - ६ जानेवारी २०१७)
---
No comments:
Post a Comment