29 Jan 2017

राहुल द्रविडवरील लेख

द्रविड, वुई हेट यू!
----------------


राहुल द्रविड नामक रसायन नक्की कशानं बनलं आहे, याचा उलगडा होत नाही. अगदीच वाया गेलेला, वेडा मनुष्य आहे हा! क्रिकेट या, या देशातल्या सर्वांत लोकप्रिय खेळात सर्वोच्च लोकप्रियता मिळूनही हा माणूस जमिनीवरचे पाय सोडायला तयार नाही. काही तरीच वागतो, बोलतो. शांत राहून कार्यरत वगैरे राहतो. आता परवाचीच घटना पाहा. बेंगळुरू विद्यापीठानं त्याला सन्माननीय डॉक्टरेट पदवी देण्याचं ठरवलं. तर हे महाशय त्याला नम्रपणे नकार देते झाले. एवढ्यावरच थांबले नाहीत, तर क्रीडा क्षेत्रात काही तरी भरीव संशोधन करून ही पदवी मिळवीन, असंही सांगते झाले. काय हे! हा म्हणजे कहर झाला. आयती पदवी कुणी देत असेल, तर ती घ्यावी एवढी साधी गोष्ट या माणसाला समजत नाही, याला काय म्हणावे! अशा सन्माननीय इ. पदव्या मिळविण्यासाठी आपल्या देशात लोक काय काय प्रकार करतात, हे राहुलला माहिती नाही, असं म्हणणंही चुकीचं ठरेल. 
आता अन्य कुणा माणसाला, उदा. एखाद्या शिक्षणमहर्षी वा सहकारमहर्षी राजकारण्याला अशी पदवी दिली जाणार आहे, अशी कल्पना करू. लगेच उंची हॉटेलमध्ये स्वतंत्र पत्रकार परिषद झाली असती. सर्व माध्यमांमध्ये ही बातमी व्यवस्थित छापून आली असती. वृत्तवाहिन्यांवर मुलाखत आली असती. त्या शिक्षणमहर्षीच्या वा सहकारमहर्षीच्या संस्थांमध्ये रोषणाई करण्यात आली असती. मिठाई वाटली गेली असती. गावभर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गाणारे फलक लावण्यात आले असते. अरे राहुलदेवा, हे शिक्षणमहर्षी वा सहकारमहर्षी तरी खूप मोठे झाले... साधा गल्लीतला (एरवी एका झापडीत खाली पडेल असा) आमचा गॉगलधारी, सुवर्णसाखळीधारी युवा कार्यकर्ता एकोणीस किंवा तेवीस वर्षांचा झाला तरी आख्ख्या पेठेला माहिती पडेल एवढे त्याचे फ्लेक्स लागतात. 'माहौल' का म्हणतात, तो केला जातो. भले आमचं हे 'युवकांचे आशास्थान' किंवा 'आळीचे हृदयस्थान' फर्स्ट इयर फेल असले म्हणून काय झाले! आपल्या देशात काहीही लायकी नसताना स्वतःचा फुकाचा डंका करून घेण्याची अशी दिव्य परंपरा असताना हे द्रविड महोदय मात्र आपल्या गाववाल्यांना त्यांचा फ्लेक्स लावण्याची संधी देत नाहीत, हे काही बरोबर नाही. 
स्थानिक राजकारण्यांशी संधान साधून बेंगळुरूजवळील अब्जावधी किमतीची शेतजमीन अल्प मोबदल्यात पदरात पाडून घ्यावी, खासगी क्रिकेट कोचिंग अकादमी काढावी, खोऱ्यानं पैसे ओढावेत, परदेशांतल्या नामांकित गॉगल, घड्याळं इ. कंपन्यांबरोबर लाखो डॉलरचे करार करावेत, वर्षांतून सहा महिने परदेशांत सुट्टी घालवावी, एनआरआय स्टेटस पदरात पाडून घ्यावं, परदेशी बँकांत मजबूत पैसा साठवावा आणि पुढल्या ४२ द्रविडी पिढ्यांचं कल्याण साधावं एवढा साधा विचार या राहुल द्रविड नामक गृहस्थाला करता येत नाही, म्हणजे बघा. गेलं ना आयुष्य वाया! त्याऐवजी हे महाशय काही तरी अभ्यास वगैरे करतात खेळाचा... वरिष्ठ संघाचं प्रशिक्षकपद नाकारून ज्युनिअर संघाचं प्रशिक्षकपद मागून घेतात... पुढची पिढी घडवताहेत म्हणे... कुठं तरी ऑस्ट्रेलियात ब्रॅडमन व्याख्यानाच्या वार्षिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून जातात आणि काही तरी अभ्यासपूर्ण वगैरे बोलतात... एकूण सगळा वेडेपणाच की...
निवृत्त झाल्यावर कुणी तरी विचारलं, की तुला आता कुठल्या गोष्टीचा आनंद वाटेल? तर हा बाबा म्हणाला, की मला माझ्या मुलाला शाळेत सोडता येईल आणि परत घेऊन येता येईल... त्याच्या शाळेच्या रिपोर्ट डेला पालक म्हणून जाता येईल, याचा मला आनंद आहे! शेवटी मिडलक्लास ती मिडलक्लासच मानसिकता! कधी सुधारणार हा?
कुठलं ट्विटर हँडल नाही, करोडो फॉलोअर्स नाहीत, वादग्रस्त वक्तव्य नाही, पेज थ्रीवर उपस्थिती नाही, राजकारणी डावपेच नाहीत, किंवा गेला बाजार मस्त टीआरपी देणार एखादं लफडंसुद्धा नाही. अरेरे... कसं व्हायचं या गृहस्थाचं! 
यापूर्वी २०१४ मध्ये गुलबर्गा विद्यापीठानं असंच १२ जणांना सन्माननीय डॉक्टरेट देण्याचं घोषित केलं होतं. तेव्हाही हे महाशय तिकडं फिरकले नाहीत. डॉक्टरेट ही पदवी किती मेहनत करून कमवावी लागते, याची या माणसाला जरासुद्धा कल्पना नसावी; अन्यथा दोनदोनदा ती नाकारण्याचं औद्धत्य त्यानं दाखवलंच नसतं. इथं साधं दहावी किंवा बारावी पास होतानासुद्धा आम्ही आई-बापांवर उपकार केल्यासारखे अभ्यास करायचो. नंतर विद्यापीठातून जेमतेम पदवी मिळवितानाही आमच्या संयमाची कसोटी लागली होती. तेव्हाही आमच्या अविकसित राष्ट्राला उपकृत केल्याच्या थाटात आम्ही तिसरा वर्ग मिळवून ती पदवी (एकदाची) पदरात पाडून घेतली होती. आणि इथं जगातील सर्वोच्च सुखं पायाशी लोळण घेत असताना हा राहुल शरद द्रविड नामक मध्यमवर्गीय मराठी माणसाचा मुलगा म्हणतो, की मी अभ्यास करून डॉक्टरेट मिळवीन? हे खरंच कठीण झालं!
आता काही अभ्यासू, स्कॉलर लोकांना असा अभ्यास वगैरे करायचा छंदच असतो म्हणा. हे द्रविड महाशय त्यातलेच एक. अगदी क्रिकेट खेळतानाही सचिन तेंडुलकरसारख्या प्रखर सूर्यासमोर स्वतःला सिद्ध वगैरे करायचं काहीही नडलं नव्हतं. पण यांनी करून दाखवलं, तेही शांतपणे. नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर प्रथम पाऊल ठेवलं आणि बझ ऑल्ड्रिननं दुसरं... पण सगळं जग नाव घेतं ते आर्मस्ट्राँगचंच. द्रविडच्या भाळी ऑल्ड्रिनचं प्राक्तन होतं. तो कायम सचिनच्या छायेत राहिला, पण सूर्यासमोर सदैव चमकण्याची जिद्द घेऊन! वेडी माणसंच असले उद्योग करत बसतात. पुढंही आपल्या संघाला गरज म्हणून हे महोदय हातात ग्लोव्हज घेऊन चक्क यष्टिरक्षणाला उभे राहिले. घाम काढणारं हे काम करून पुन्हा आपल्या बॅटिंगच्या वेळी संघाला खंबीर आधार हवा म्हणून यांनी स्वतःची 'भिंत' भक्कमपणे उभी केली. अत्यंत कर्तव्यबुद्धीनं, शांतचित्तानं! 
द्रविडच्या या असल्या वागण्यानं एक फार मोठा धोका निर्माण झालाय. सोशल मीडियावर तर त्याच्या कौतुकाचा महापूर सुरू झालाच आहे; पण या देशातल्या तरुण मुलांना किंवा खेळाडूंना लोक आता द्रविडच्या आदर्शाचं उदाहरण द्यायला लागले आहेत. भारतीय संघातले तरुण खेळाडू तर कायमच त्याचं गुणगान करतात. अगदी परदेशांतले नवोदित फलंदाजही 'आम्ही जे काही आहोत ते द्रविड सरांमुळंच' असं बोलतात. या एका माणसामुळं या देशाची सगळी 'शिस्त' बिघडायला लागली आहे.
राहुलदेवा, कशाला रे हा 'द्राविडी' प्राणायाम? आम्ही देशवासी चांगले सुखात होतो. आयते पदव्या मिळवीत होतो, यशाचे शॉर्टकट शोधत होतो, हळूच नियम मोडून लोकांना तत्त्वज्ञान ऐकवीत होतो, एवढुंस्सं केलं तर हे एवढं करून सांगत होतो... तू या सगळ्यांवर बोळा फिरवलास...!
आणि तरीही आम्हाला परत परत तुझ्या प्रेमात पाड, डोळ्यांत पाणी आण...
जा, वुई हेट यू...!
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती - २९ जानेवारी २०१७)

---

3 comments: