24 Feb 2017

फर्स्ट डे फर्स्ट शो - सहा परीक्षणे


१.
 
बदलत्या हिंदी-मराठी सिनेमांची शैलीदार झलक
--------------------------------------------
सतीश जकातदार
-----------------

फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणजे मुरब्बी सिनेशौकिनांचा परवलीचा शब्द! दर शुक्रवारी प्रदर्शित होणारा नवा कोरा सिनेमा पाहणे आणि त्याबाबत शेलकी (रटाळ... भुक्कड...) शेरेबाजी करून तडकाफडकी निवाडा करणे हा सिनेप्रेमींचा हातखंडा उद्योग. कुठल्याही कॉलेज कट्ट्यावर, चहाच्या टपरीवर हमखास दिसणारे हे दृश्य. पण दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचं तत्काळ 'परीक्षण' लिहिणे ही खरे तर तारेवरची कसरत आणि कसबही!
वृत्तपत्राच्या धावपळीच्या जगात 'चित्रपट परीक्षण' कामाचा भाग म्हणून स्वीकारणे आणि लिखाणात 'त्या' चित्रपटाला न्याय देणे हे काम तसे जिकिरीचे आणि जबाबदारीचेही! याचे भान ठेवून अनेक लेखक-पत्रकारांनी विविध वृत्तपत्रांत चित्रपट परीक्षण केले. खरे तर हे लेखन म्हणजे चित्रपट पाहताक्षणी परीक्षणकर्त्यांनी दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया. थोडक्या शब्दांच्या मजकुरात, पण खुमासदार शैलीत चित्रपट का 'बघावा', त्याचा दर्जा काय याचे 'प्रिस्क्रिप्शन' परीक्षणकर्ता देतो. पूर्वीपासूनच सर्वच वृत्तपत्रांत चित्रपट परीक्षणे येत असली, तरी हे कसब फार थोड्यांना जमले. पूर्वीच्या काळात भाऊ पाध्ये, शुद्धनिषाद (श्रीकांत ठाकरे) आणि विजय तेंडुलकरांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात अशीच चित्रपट परीक्षणे लिहिली आणि त्यातून काही उत्तम ललित लेखन जन्माला आले. आजही त्यातील काही पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. त्यानंतरच्या काळात हेमंत देसाई, मुकेश माचकरांची चित्रपट परीक्षणे त्या त्या वेळी गाजली; ती त्यातील 'अचूक निदान' आणि शैलीमुळे.
या पार्श्वभूमीवर श्रीपाद ब्रह्मेंचे समर्पक शीर्षक असलेले 'फर्स्ट डे फर्स्ट शो' हे पुस्तक हाती पडले. सलग वाचताना त्यातून गेल्या दशकातील बदलत्या हिंदी-मराठी सिनेमाची झलकच पाहावयास मिळते. लहानपणापासून असलेलं ब्रह्मेंचे सिनेप्रेम आणि कुतूहल त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवते. चपराक प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत ब्रह्मेंनी 'सकाळ' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' या दैनिकांत पत्रकारिता करीत असताना वेळोवेळी लिहिलेल्या तीनशेहून अधिक चित्रपट परीक्षणांमधील निवडक ५० परीक्षणे या पुस्तकात समाविष्ट केली आहेत. मुख्यतः नव्या शतकातील गेल्या दहा-बारा वर्षांतील लोकप्रिय चित्रपटांच्या परीक्षणांचा त्यात समावेश आहे. हिंदी-मराठी सिनेमाच्या दृष्टीने गेल्या दशकात बहुविध आशय-विषय आले आणि नजरेत भरणारे प्रयोगही या काळात झाले. त्याचे अवशेष या पुस्तकात विखुरलेले आहेत.
'श्वास' चित्रपटाने मराठी सिनेमात चैतन्य आणले. त्यानंतर आनेक आगळे-वेगळे प्रयोग मराठी सिनेमांत झाले. त्यामुळे २००४ चा 'श्वास' ते २०१६ च्या 'नटसम्राट'पर्यंत अशी २५ मराठी चित्रपटांची परीक्षणे या पुस्तकात आहेत. त्यातून मराठी सिनेमाच्या समकालीन इतिहासावर अनोखा दृष्टिक्षेप पडला आहे. निखळ विनोदी चित्रपटांचा प्रवाह हिंदी सिनेमात सुरू करणाऱ्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या राजकुमार हिरानींच्या चित्रपटापासून त्यांच्याच 'पीके' व अगदी वेगळ्या धाटणीच्या, पण वेधक अशा, नीरज घायवानच्या 'मसान' या २०१५ च्या चित्रपटापर्यंत अशा २५ हिंदी चित्रपटांची परीक्षणं पुस्तकात आहेत. त्यातून गेल्या दशकात बदलत गेलेल्या हिंदी सिनेमाची वैशिष्ट्येही लक्षात येतात.
खरे तर चित्रपट परीक्षण म्हणजे 'बातमीमूल्य' असलेले नव्या चित्रपटाचे वृत्त. सिनेमाची गोष्ट, कलावंत-तंत्रज्ञांची करामत आणि चित्रपटाचे नेमके वैशिष्ट्य याच त्रिसूत्रीभोवती कोणत्याही परीक्षणाचा डोलारा उभा असतो. तसेच इथेही घडले आहे. त्यात वाचकाला मजा येते ती मथळ्यांमुळे आणि लेखनशैलीमुळे! ब्रह्मेंनी या पुस्तकात तशी मजा आणली आहे. बऱ्या-वाईट साऱ्याच चित्रपटांकडे अनुकंपा दाखवत ब्रह्मे चित्रपटाची गोष्ट सांगता सांगता त्यातील तथ्यही सहजपणे सांगून जातात.
'कहानी' या चित्रपटाचे 'नजरबंदीचा खेळ' असे नेमके वर्णन करणाऱ्या ब्रह्मेंच्या चित्रपट परीक्षणांचे मथळे आकर्षक आहेत (उदा. शाळा - वहीत जपून ठेवावे असे मोरपीस) आणि सूचकही (खट्टामीठा - डोशाच्या पिठाचे थालीपीठ) आहेत. कुठल्याही चित्रपटाची जशी 'वन लायनर' असते तशी परीक्षणांचीही असते. तशी 'वन लायनर' लिहिण्याची हातोटी ब्रह्मेंना गवसली आहे.
काही वेळा ते या सर्व चित्रपटांत 'काय' पाहायचे आणि 'कसे' सांगितले आहे याचे वर्णन करतात, तर काही चित्रपटांचे कथानक कोणत्या पार्श्वभूमीवर उभे आहे ती पार्श्वभूमी विशद करतात. उदाहरणार्थ, 'हजारों ख्वाहिशें ऐसी'ची गोष्ट सांगण्याआधी ते १९७० च्या चळवळींचा कालखंड प्रथम विस्ताराने लिहितात. तत्काळ प्रतिक्रिया म्हणून लिहिलेली ही सारीच परीक्षणे दखलपात्र असली, तरी त्यात सिनेमाच्या 'रचने'विषयीची निरीक्षणे अभावानेच आढळतात. तरीही या परीक्षणांचे महत्त्व कमी होत नाही.
या परीक्षणांच्या निमित्ताने गेल्या दशकातील बदलत गेलेल्या हिंदी-मराठी सिनेमाचे दर्शन जसे घडते, तसेच सरत्या काळा काळातील बदललेल्या आशय-विषयांचा लेखाजोखाही पाहावयास मिळतो. याच दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व आहे.
---
फर्स्ट डे फर्स्ट शो
श्रीपाद ब्रह्मे
चपराक प्रकाशन
पृष्ठे : १४४, किंमत : १०० रुपये

---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद, ५ फेब्रुवारी २०१७)
------
२.

पुन:प्रत्ययाचा आनंद 
------------------------




अनिरुद्ध धोंगडे, जकार्ता (इंडोनेशिया)

चित्रपट सुरू झाला, की समोरच्या भव्य पडद्यावर काही व्यक्ती आणि सूर अवतीर्ण होऊन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. मनाला गुंगवून, गुंतवून टाकणारा हा सुमारे अडीच-तीन तासांचा अनुभव !! लाखो जणांच्या सुप्त मनात स्वत:ला पडद्यावर पहाण्याची इच्छा असते म्हणूनही असेल कदाचित; पण एकंदरीत चित्रपट (सिनेमा), हा कलाप्रकार फार लोकप्रिय आहे !!
त्यात करमणूक असते आणि कधी कधी एखादा सामाजिक संदेश किंवा दिग्दर्शकाने केलेले विशिष्ट मत प्रदर्शन किंवा स्टेटमेंट असते. भारतात दर वर्षी सुमारे नऊशे सिनेमांची निर्मिती होते. मग यातले चांगले किती आणि आपल्या आवडत्या कलाकारांनी काम केलेला सिनेमा असला तरी तो आपण आपला वेळ व पैसे खर्च करून पाहावा का, हे प्रश्न पडतातच की !!
आपल्याला चांगला सिनेमा कोणता हे कोणी जर स्वत:हुन सांगितले तर ... तर आपण कोणता सिनेमा पाहावा या प्रश्नाचे उत्तर मिळणे सुलभ होईल. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे चित्रपट परीक्षण याकरिता वाचले जाते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
दर आठवड्याला चित्रपट पाहणे व परीक्षण लिहिणे हे थोडेसे ग्लॅमरस काम व हसत-खेळत केलेली नोकरी असं वाटतं खरं; पण इतर कोणत्याही नोकरीतील जबाबदारीसारखीच ही एक जबाबदारीच आहे. प्रेक्षकांशी आणि चित्रपट माध्यमाशी असलेली बांधिलकी सांभाळण्याची जबाबदारी !!
दर शुक्रवारी किंवा शनिवारी वृत्तपत्रात परीक्षण वाचायला मिळणारच हे आपण गृहित धरलेले असते. मर्यादित व समर्पक शब्दांत, ठरावीक वेळेत (डेडलाइनमध्ये) परीक्षण लिहून देण्याची जबाबदारी म्हणजे दर आठवड्याला स्तंभलेखकाने केलेली एक कसरतच असते हे वाचक व प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवतही नाही.
लेखक व वरिष्ठ पत्रकार श्री. श्रीपाद ब्रह्मे यांनी वृत्तपत्रात चित्रपट परीक्षण लिहिण्याची
जबाबदारी सलगपणे ३०७ वेळा पार पाडली, म्हणजेच तब्बल ३०७ आठवडे ३०७ विविध विषयांवरील चित्रपटांसाठी त्यांनी ही कसरत कमालीच्या यशस्वीपणे केली !! ( ५२ आठवडे म्हणजे एक वर्ष बरं का!)
‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हे श्री. श्रीपाद ब्रह्मे यांच्या, ‘सकाळ’ आणि मटाया वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या काही मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या निवडक ५० परीक्षणांचे पुस्तक आहे. आजचे वृत्तपत्र दिवस संपला की रद्दी म्हणूनच ठेवलं जातं. असं असताना २००३ पासून २०१४ पर्यंत लिहीलेल्या या परीक्षणांमध्ये असं काय आहे, की ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि परत वाचाविशी वाटली -- या प्रश्नाचे थेट व थोडक्यात उत्तर, ‘लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचे शब्दकौशल्य व खुमासदार लेखनशैली यांची पुस्तक वाचताना येणारी प्रचीती,’ असे दिले पाहिजे!
श्रीपाद ब्रह्मे यांच्या लेखणीत शाईबरोबरच शब्दही भरलेले असतात असं वाटावं इतक्या सहजतेने त्यांच्या लेखणीतून शब्द उतरतात आणि परीक्षण एखाद्या ललित लेखाचे रूप घेऊनच अवतरते !!
उदाहरणार्थ काही चित्रपटांची नावे व त्यांच्या परीक्षणांचे शीर्षक पाहू या -
श्वास - मराठी चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी देणारा !!

नितळ - आमचं मन असं नितळ आरस्पानी होईल ?
गंध - पडद्याला सुवास संवेदनेचा
शाळा - मनाच्या वहीत जपून ठेवावंसं मोरपीस
खोसला का घोसला - नाइस ‘प्लॉट’
ओम शांती ओम - पंचतारांकित बुफे
खट्टा मीठा - डोशाच्या पीठाचे थालिपीठ
भाग मिल्खा भाग - आपल्या नसानसातून धावणारा प्रेरणापट
अशी शीर्षकेच चित्रपटाबद्दल बरेच काही सांगून जातात व वाचकांची ( प्रेक्षकांची) उत्कंठा वाढवितात.
शीर्षके जशी सुंदर आहेत तशीच परीक्षणातील खुशखुशीत आणि समर्पक वाक्यं - खरोखरच ‘ब्रह्मेवाक्यं’च ती!
कट्यार काळजात घुसली - अजिबात न चुकवावा असा देखणा स्वरानुभव आहे !!
काय द्याचं बोला - आपला मक्या हिरोये त्यात राव! मक्या म्हणजे अनासपुरे वो. बीडचा. आलं का ध्येनात? असं म्हणून हे परीक्षण वाचकांना थेट चित्रपटगृहातच आपल्या मक्या अनासपुरेसमोर नेऊन सोडतं!
आनंदाचं झाड - एक तर साजुक तुपाच्या शिऱ्यासारखीच ही गोष्ट आहे .... मध्यमवर्गीयांना रोज अंगुरमलई नको का असते? पण वेळेला शिराच उपयोगी पडतो आणि दुसरं म्हणजे हा शिरा आपल्याला मनापासुन आवडतो !!
हे नेमके शब्द वाचल्यावर साजुक तुपातला शिरा खायला प्रेक्षक थिएटरमध्ये येणारच की!
गाभ्रीचा पाऊस - ‘गाभ्री’ ही विदर्भातील इरसाल भाषेतील शिवी आहे असा उलगडा
करीत, हे परीक्षण लहरी पावसामुळे निर्माण झालेल्या विदर्भातील शेतकऱ्याच्या समस्या या चित्रपटात व कलाकारांनी जीव ओतून केलेल्या अभिनयातून पडद्यावर कशा जिवंत झाल्या आहेत, हे सांगतं. आणि हा वेगळ्या वाटेवरचा पाऊस आपण सर्वांनी आवर्जून भिजावं असाच आहे असं सांगून संपतं. पण वाचन संपल्यावर वाचक एक संवेदनशील प्रेक्षक म्हणून आवर्जून या अनुभवात भिजायला चित्रपटगृहात जाईल!
गंध - चित्रपट हे द्विमिती माध्यम आहे. अशा माध्यमातून गंधासारखी संवेदना प्रेक्षकांपर्यंत कशी जाणार, अशी सुरुवात करीत हे परीक्षण पुढे सांगते, की दिग्दर्शक गंध या चित्रपटातून ही संवेदना प्रेक्षागारात उधळतो. तीन कथांची ही अत्तरकुपी म्हणजे प्रयोगशील दिग्दर्शकाच्या प्रतिभेचा पसरलेला सुगंधच!
अशा शब्दांतील या चित्रपटाचे परीक्षण वाचल्यावर वाचक या सुगंधाने मोहरण्यासाठी चित्रपटाला गेला नाही तरच नवल!
हिंदी चित्रपटांबद्दल ब्रह्म्यांनी जसे लिहिले आहे त्याबद्दल काय सांगावे -

दबंग - अत्रंगी ऍक्शन सतरंगी मनोरंजन
डर्टी पिक्चर - बुम्बाट
पानसिंग तोमर - नियती नावाच्या शर्यतीची भन्नाट गोष्ट !!
बर्फी - थोडक्यात उत्कट, उदात्त आणि शब्देविण संवादु साधणाऱ्या या बर्फीची चव न
चुकता घ्यायला हवी ... कदाचित आपल्या व्यक्तिमत्त्वातला गोडवा थोडा वाढेल!
चेन्नई एक्स्प्रेस - सो बोर्ड ऑन धिस एक्स्प्रेस फॉर फुल्ल फन जर्नी !! वाय वेटिंग - चालो ये पिच्चर देखेगी !!
आणि अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
हे पुस्तक आपण कुठल्याही पानापासून वाचायला सुरू करू शकतो; पण एकदा वाचायला सुरुवात केली, की सगळी १५० पाने वाचल्याशिवाय ते खाली ठेवू शकत नाही!
लेखक श्रीपाद ब्रह्मे यांच्या, चित्रपट डोळसपणे पाहण्याच्या व समर्पक शब्दांत तो कागदावर उभा करण्याच्या हातोटीमुळे या पुस्तकात समाविष्ट केलेल्या चित्रपट परीक्षणांच्या वाचनानंतर ते चित्रपट पुन्हा पाहिल्याचा एक वेगळाच अनुभव येतो. यातच या पुस्तकाचे खरे यश सामावलेले आहे.
पुस्तकाचे निर्मिती मूल्य चपराक प्रकाशनाने उत्तम दर्जाचे ठेवले आहे.
वाचन संपल्यावर लेखक श्रीपाद ब्रह्मे यांचे शब्दकौशल्य आणि खुशखुशीत लेखन शैली सुंदर चित्रपटाप्रमाणेच मनात रेंगाळतात आणि त्यांच्याकडुन अपेक्षा वाढतात !!
त्यांच्या ललित लेख संग्रहास, विनोदी लेखनास वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी खात्री वाटते. चित्रपटांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळवून देणारे संग्राह्य पुस्तक फर्स्ट डे फर्स्ट शो!
---- 

३.


परीक्षणांचा ७० एमएम आविष्कार 

- प्राची कुलकर्णी-गरुड

काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर सर्फिंग करताना अचानक एक सुरेखसं वाक्य सापडलं आणि चांगलं लक्षातही राहिलं होतं.  “There is no end. There is no beginning. There is only the infinite passion of life. ”
इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक फेडरिको फेलिनी यांनी चित्रपट कलेविषयी काढलेल्या या उद्गाराची आठवण श्रीपाद ब्रह्मे लिखित 'फर्स्ट डे फर्स्ट शो' या पुस्तकामुळे झाली. म्ह्टलं तर  हे पुस्तक म्हणजे श्रीपाद यांनी लिहिलेल्या चित्रपट परीक्षणांचं हे संकलन आहे आणि त्याच वेळी परीक्षणांमधून गरजेनुसार आलेल्या तत्कालीन सामजिक संदर्भाचा एक महत्त्वपूर्ण दस्तावेजसुद्धा आहेच!
सन २००३ ते २०१४ या अकरा वर्षांच्या काळात श्रीपाद ब्रह्मे यांनी सकाळ आणि नंतर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांत काम करताना सातत्याने चित्रपट परीक्षणं लिहिली. त्यापैकी निवडक अशा पंचवीस मराठी आणि पंचवीस हिदी चित्रपटांच्या परीक्षणांचा या पुस्तकात समावेश आहे.
श्रीपाद ब्रह्मे सिनेपरीक्षण लिहू लागले, ही गोष्ट त्या काळातली जेव्हा नव्या सिनेमाविषयीची माहिती मुख्यतः वृत्तपत्रं आणि मोजक्या साप्ताहिकांमधून मिळत असे. इंटरनेट आवृत्त्यांचाही वाचकवर्ग तयार झाला होता. मात्र, सोशल मीडिया ही चीज अजून ओळखीची झाली नव्हती. सकाळ किंवामहाराष्ट्र टाइम्स’मधल्या त्यांच्या कॉलमला वाचकांचा विक्रमी प्रतिसाद मिळत असे. पाहिलेल्या सिनेमाविषयी वाचकांना सांगताना, 'अगदी आपल्या मनातलंच लिहिलं आहे,’ हा अनुभव वाचकाला मिळतो.  वृत्तपत्रात छापून आलेलं परीक्षण वाचून मगच तो चित्रपट पाहायचा किंवा नाही ते बहुस्ंख्य प्रेक्षक ठरवत असतात. या पार्श्वभूमीवर ब्रह्मे यशस्वी ठरले आहेत.
'फर्स्ट डे फर्स्ट शो' या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक लेखाची शीर्षकं. त्या त्या चित्रपटाच्या विषयाचा संपूर्ण गोषवारा या शीर्षकांमुळे समजल्यासारखा होतो. श्वास - मराठी चित्रपटाला नवी 'दृष्टी' देणारा..., पक पक पकाक - अद्'भुत'रम्य, मातीच्या चुली - आपल्या घरातल्याच 'चुली'वरची खम्ंग फोडणी... किंवा डर्टी पिक्चर - बुम्बाट... अन् बर्फी - शब्देविण स्ंवादु... ही काही प्रातिनिधिक उदाहरणं सांगता येतील. नुसत्या शीर्षकाच्या ताकदीवर लेख वाचायला भाग पाडण्यात लेखक सर्वथा यशस्वी होतो.
दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची भाषाशैली! गेली जवळपास १७-१८ वर्षं वृत्तपत्रीय लेखन करून लेखकाने आपली स्वतंत्र अशी कथनशैली निर्माण केली आहे. आणि याच खुमासदार शैलीचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मकरंद अनासपुरे अभिनीत 'काय द्याचं बोला!' या चित्रपटाचं परीक्षण. केशव कुंथलगिरीकर या मराठवाड्यातल्या वकिलाच्या बोलीशी तंतोतंत नातं सांगणाऱ्या शैलीत ब्रह्मे लिहितात - ष्टोरी तरी काय हाये पिच्चरची मंडळीएकदम शिंपल पन फक्कड्.. ' लेखकाची ही रंजक शैली आपलं काम बरोब्बर पार पाडते आणि वाचकाचं प्रेक्षकात रूपांतर होतं.
हे पुस्तक वाचताना एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे लेखकाची सिनेमाविषयीची आत्मीयता. चित्रपटाविषयी लिहिताना लागलेला हा आत्मीय सूर वाचकालाही सोबत नेतो. प्रत्येक सिनेमातल्या उजव्या बाजूचं अधिक उठावदार करून एका आस्वादात्मक, रसग्रहणाचा प्रत्यय वाचकाला येतो.
या आणि अशा अनेक कारणांसाठी श्रीपाद ब्रह्मे यांचं 'फर्स्ट डे फर्स्ट शो' हे चित्रपट परीक्षणाचं पुस्तक अवश्य संग्रही असायला हवं हे नक्की!

'फर्स्ट डे फर्स्ट शो'
लेखक - श्रीपाद ब्रह्मे
चपराक प्रकाशन, पुणे,
किंमत - १०० रुपये
पृष्ठसंख्या - १४४


(पूर्वप्रसिद्धी - साहित्य सूची, जानेवारी अंक)
-------

४. 

'मलाही हेच म्हणायचे होते...'
--------------------------------

सुप्रिया कुलकर्णी-खोत
------------------------ 

टीव्ही असो की डीव्हीडी,मूव्ही चॅनल असो की पायरेटेड मूव्ही, दर शुक्रवारच्या पहिल्या शोची अर्थात  70 mm ची खुमारी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजवणारी!या सिनेमा नावाच्या वेडाचं असं रक्तात भिनण आपल्यासाठी अनिवार्यच! प्रसिद्ध चित्रपट समीक्षक,लेखक आणि पत्रकार असणाऱ्या श्रीपाद ब्रह्मेंनी सुरुवातीला एक आस्वादक म्हणून, नंतर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आणि अखेर एक 'सदर' चालवताना लिहिलेल्या सुमारे ३०७ चित्रपटांची परीक्षणे - तीच उत्कटता, तेच तादात्म्य आणि सातत्य कायम राखणं अजिबात सोपी गोष्ट नाही!
निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून चित्रपट परीक्षण लिहिणाऱ्या पत्रकार मित्रांच्या हस्ते या अनोख्या पुस्तकाचं प्रकाशन होणं हे जणू एखाद्या चित्रपटाच्या प्रिमिअरला चित्रपटसृष्टीतल्या सगळ्या दिग्गजांनी हजेरी लावण्याइतकं दुर्मिळ आणि म्हणूनच जरा 'हट के ' !
या पुस्तकासाठी निवडलेली परीक्षणंही विविध विषयांना स्पर्श करणारी... शीर्षकांमधून श्लेष साधत तर कधी मर्म उकलत, कधी अर्जुनाप्रमाणे थेट माशाच्या डोळ्याचा वेध घेत (उदा. भाग मिल्खा भाग -आपल्या नसानसांतून 'धावणारा' चित्रपट) ही परीक्षणे आपल्यासमोर येतात.मुळात परीक्षणे लिहिणे हेच मुळी मोठ्या कौशल्याचं काम! वाचणारा उत्सुकतेनं आधी शीर्षक पाहणार तेव्हा त्याच्यासमोर अख्खा चित्रपट - किमान मुख्य झलक तरी तरळायला हवीच .. आणि जसजसं ते परीक्षण तो वाचत जाईल तसतशा वाचणाऱ्याच्या मनात त्या त्या प्रतिमा एखाद्या 'स्लाईड शो'प्रमाणे उतरत जायला हव्यात - अर्थात, कलायमॅक्स फुटला तर नाही पाहिजे पण त्याच्याबद्दलच्या  उत्सुकतेच्या ठिणग्या वाचकाच्या मनात नक्की फुटायला हव्यात! एक निराळं असं भारावलेपणाचं आणि औत्सुक्याचं विश्व तयार व्हायला हवं वाचकाच्या मनात आणि त्यात तरंगतच वाचकानं आपसूक चित्रपटाच्या टॉकीजचा मार्ग धरायला हवा. 
ब्रह्मेंचं लेखन या सगळ्या कसोट्याना तंतोतंत उतरतंच; पण शिवाय ज्या ज्या चित्रपटांच्या अनुषंगानं उभ्या राहणाऱ्या जनरल नॉलेजची भरही वाचकांच्या पदरात टाकतं! शिवाय चित्रपट परीक्षण ही काय नुसती 'गुडी गुडी' गोग्गोड भाटगिरी करायची गोष्टही नसते, याचाही प्रत्यय श्रीपादच्या परीक्षणांमधून लख्खपणे जाणवतो. 'टाइमपास २'मधली वाईट रीतीनं लोप पावलेली उत्स्फूर्तता,' 'सिनेमाची म्हणून एक भाषा असते. कॅमेऱ्यालाही कधी तरी बोलूद्या' म्हणून 'शब्दबंबाळ बोलपट' हे नटसम्राटचं यथार्थ वर्णन, 'खट्टा-मिठा'ला उद्देशून 'डोशाच्या पिठाचं थालिपीठ...' या शीर्षकातच सगळं परीक्षण आलं! उलट परीक्षण लिहीत असतानाही चित्रपटानं गाठलेली उंची - तिचं मोजमाप करत असतानाही ब्रह्मेंनी प्रॅक्टिकल ग्राउंड अजिबात सोडलेलं नाहीये - म्हणूनच ही  सगळी परीक्षणं अस्सल वाटतात, तुमच्या-आमच्या मनातली वाटतात. 
खरं तर तुम्ही आम्ही सगळेच आपापल्या आयुष्यात येनकेनप्रकारणेन परीक्षकाची भूमिका सदैव बजावत असतोच... अगदी चित्रपट पाहिल्या पाहिल्या काही ना काही प्रतिक्रिया प्रत्येकाच्याच मनात उमटते. चित्रपट परीक्षण वाचल्या वाचल्या 'राईट! मलाही हेच म्हणायचे होते अगदी!' अशी उत्सफूर्त प्रतिक्रिया देण्याचं काम श्रीपाद ब्रह्मेंचं प्रत्येक परीक्षण चोख बजावतं आणि हेच या पुस्तकाचं मोठं यश आहे असं मला वाटतं!
त्रुटी कोणती असेल तर ती हीच की, हे पुस्तक इतकं छोटं का आहे? आणखी काही चित्रपटांचा समावेश यात का नाहीये, असा प्रश्न पुस्तक सम्पल्याक्षणी चित्रपट संपल्यावरच्या टायटललिस्टसारखा उसळी मारून वर येतो! खैर, परिश्रमपूर्वक दस्तावेजीकरण म्हणून संकलित करण्यात आलेल्या या ६० चित्रपट परीक्षणांमुळे, त्या त्या चित्रपटांशी पुनश्च रिलेट होण्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असाच !
----                       
.
सुफळ संपूर्ण

शुक्रवारची कहाणी


- जयदीप पाठकजी
चित्रपटांची दुनिया म्हणजे शुक्रवारची कहाणीच! गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतात. (काही सणांचे औचित्य साधून ते गुरुवारीही प्रदर्शित केले जातात; पण असे प्रकार अपवादच!) प्रदर्शित झाल्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत त्यांचं भवितव्य ठरतं. हे भवितव्य ठरवण्याचं काम वृत्तपत्रीय परीक्षणं करतात. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबाबत जाणून घेण्यास रसिक प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यांची ही उत्सुकता शमवण्याचं काम वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी चित्रपट परीक्षणे करतात. श्रीपाद ब्रह्मे यांचं फर्स्ट डे फर्स्ट शोहे पुस्तक वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या चित्रपट रसास्वाद लेखनाचं संग्रहित रूप आहे. २५ ‌हिंदी आणि २५ मराठी चित्रपटांच्या परीक्षणांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. मराठी आणि हिंदीमध्ये गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये प्रदर्शित राहिलेल्या आणि रसिकांच्या लक्षात राहिलेल्या चित्रपटांबद्दल वाचताना तो चित्रपट आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. ओघवत्या शैलीमध्ये या चित्रपटाची सफर लेखक आपल्याला घडवतो. शुक्रवारी चित्रपट पाहून तातडीने त्याचे परीक्षण शनिवारी किंवा रविवारी प्रसिद्ध करण्यासाठी करावी लागणारी धडपड मीही अनुभवली असल्यामुळे ब्रह्मे यांच्या पुस्तकाने मला वेगळाच आनंद दिला. ही परीक्षण वाचताना त्यातील आपणही हेच केलं, हे जाणवलं. ही परीक्षण अतिशय कमी कालावधीत लिहावी लागत असल्यानं नेमक्या शब्दांमध्ये चित्रपटाबद्दल सांगणं ही निश्चितच अवघड गोष्ट आहे. ब्रह्मे यांनी ही किमया साधली आहेच; पण हे लिहित असताना स्वतःची अशी शैलीही निर्माण केली आहे. मराठी चित्रपटांबद्दल आत्मीयतेनं लिहिणारे ब्रह्मे वेळेप्रसंगी मराठी चित्रपटांना शालजोडीतील मारण्यातही मागे-पुढे पाहत नाहीत. हिंदी चित्रपटांबद्दलही ते तितक्याच समरसतेनं लिहितात. श्वास, काय द्याचं बोला, गाभ्रीचा पाऊस, शाळा यासारख्या चित्रपटांचा रसास्वाद वाचनीय झाला आहे. या परीक्षणांची शीर्षकं हादेखील एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. मराठी चित्रपटसृष्टीत ट्रेंड सेटर ठरलेल्या श्वासच्या परीक्षणाचं शीर्षक मराठी चित्रपटाला नवी दृष्टी देणाराअसं आहे, तर गंधचित्रपटाच्या परीक्षणाचं शीर्षक पडद्याला सुवास संवेदनेचाअसं आहे. हिंदी चित्रपटांच्या परीक्षणांबद्दलही हेच सांगता येईल. खोसला का घोसलाच्या परीक्षणाचं शीर्षक नाइस प्लॉटअसं आहे. तर, द डर्टी पिक्चरच्या परीक्षणाचं शीर्षक बुम्बाटअसं आहे. चित्रपटाच्या प्रकृतीनुसार, त्यातील आशयानुसार शीषर्क बदलत राहतात. इंग्लिश-विंग्लिश चित्रपटाच्या परीक्षणाचं शीर्षक ‘लई-वई भारी-वारी’ असं आहे.  
चित्रपटाकडे एक कला म्हणून पाहत असतानाच मुक्तमनाने त्या चित्रपटाचा रसास्वाद करण्यावर लेखकाचा भर आहे, हे वारंवार जाणवतं. काही वेळा या मनस्वी लेखनामुळे एखाद्या चित्रपटाबद्दल चार जास्त वाक्य भरभरून लिहिली जातात. बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या चेन्नई एक्स्प्रेस या टिपिकल बॉलीवूडपटाचं परीक्षण याच प्रकारातील आहे. चित्रपट पाहून आल्यानंतरची इमिजिएट रिअॅक्‍शन, चित्रपटाचं कथानक, प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी, जाणवलेल्या उणिवा आणि एकंदरित चित्रपटांचं मूल्यमापन अशा पातळ्यांवर चित्रपटांबद्दल लिहिलं गेलं आहे. चित्रपटांबद्दल भाष्य करतानाच कथानकाचे समकालीन संदर्भ, विशिष्ट काळांबद्दलचं भाष्य आणि बदललेल्या जाणिवा यांचंही दर्शन होतं. सुधीर मिश्रांच्या गाजलेल्या हजारो ख्वाहिशे ऐसीचं परीक्षण जास्त भावतं. सत्तरच्या दशकात नवनिर्माणाच्या ध्यासानं धडपडणाऱ्या तरुणाईंची स्पंदनं मिश्रांनी या चित्रपटात टिपली आहेत. ब्रह्मे या चित्रपटावर लिहिताना तो काळ आपल्यापुढं उभा करतात. या परीक्षणाचा शेवट आपल्यापुढे अनेक प्रश्न उभे करतो. या परीक्षणाच्या शेवटी ब्रह्मे म्हणतात, ‘भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या कालखंडाचा अत्यंत दाहक अनुभव चित्रपट देतो. ती मस्ती, ती रग कुठं गेली? कुठं गेली ती आंदोलनं? कुठं गेल्या चळवळी? असे प्रश्न आता वयाची ५५ ते ६० वर्षे पूर्ण केलेल्यांना चित्रपट पाहनू पडावेत. आणि आता वीस-बाविशीत असलेल्यांच्या मनात नव्या (खऱ्या) क्रांतीचा फंडा जगावा, तरच मिश्रांची ख्वाहिश पूर्ण होईल..’ हे वाचताना ‘हजारो ख्वाहिशे’ आपण नुकताच पाहून आलो आहोत, असं फिलिंग येतं.
चित्रपटाबद्दल भाष्य करीत असतानाच चित्रपट कलेची बलस्थानं, यशस्वी चित्रपटाचे ठोकताळे लेखक अधोरेखित करतो. ‘सिनेमाची एक लय असते. उत्सुकता वाढविणारा आरंभ, ती विकसित करणारा मध्य आणि या उत्सुकतेचं उत्कंठेत रूपांतर करून योग्य तो समाधान करणारा शेवट म्हणजेच कळसाध्याय’ हे ‘नटसम्राट’च्या परीक्षणातील वाक्य प्रभावी वाटतं. या पुस्तकात असलेलं लेखकाचं मनोगतही आवर्जून वाचावं असं आहे. सिनेमाची गोडी कधीपासून लागली ते पहिला सिनेमा कुठे पाहिला आणि पहिल्यांदा सिनेमावर कधी लिहिलं याबाबतचा लेखकाचा अनुभव अनेक वाचकांचं स्मरणरंजन ठरू शकतो. वर्तमानपत्रात चित्रपट परीक्षणाविषयी आणि परीक्षणकर्त्यांविषयी असलेले अनेक समज-गैरसमज यावरही सविस्तर भाष्य या मनोगतात केलं आहे. श्रीपाद ब्रह्मे यांच्या या पुस्तकात अंदाजे गेल्या १३ वर्षांतील हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांचा रसास्वाद वाचायला मिळतो. वर्तमानपत्रातील लेखनाला शब्दांचं बंधन असल्यामुळं मोजक्याच शब्दात आपण चित्रपट समजून घेतो. काही वेळा या चित्रपटाबद्दल थोडं विस्तारांनं हवं होतं किंबहुना ‘अरेच्चा परीक्षण संपलं की’, अशी प्रतिक्रियाही येते. मात्र, अर्थात हा आकृतिबंध वृत्तपत्रीय समीक्षणात स्वीकारला गेला असल्याने त्याला पर्याय नाही, हेदेखील जाणवतं. थोडक्यात काय तर, श्रीपाद ब्रह्मे यांनी सांगितलेली ‘शुक्रवारची कहाणी’ श्रवणीय (येथे वाचनीय) आहे. पारंपरिक कहाणीच्या भाषेतच बोलायचं तर‘ ही साठा उत्तराची शुक्रवारची कहाणी सुफळ संपूर्ण आहे.!’

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक मासिक, जानेवारी अंक)

----

६.

चित्रपट परीक्षणांचं मोहक जग 

-----------------------------------


स्मिता पाटील

---------------

चित्रपटांच्या जादुई दुनियेचा मोह प्रत्येकालाच असतो. हे जग म्हटलं तर आपल्यातलंच तरीही आपल्याहून खूप निराळं, ओढ लावणारं. या दुनियेबद्दल वाचायला, बघायला, जाणून घ्यायला बहुतेक जणांना आवडतंच. कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की तो पाहायचीइच्छा प्रत्येकाला होते. अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारे कितीतरी उत्साही वीर असतात.
पण काही जण अंदाज घेऊन, वर्तमानपत्रात आलेली परीक्षणं वाचून मगच तो बघतात. चित्रपट परीक्षण ही बाब वाचक आणि चित्रपटाशी संबंधित लोकांसाठी फारच महत्त्वाची असते. याच विषयाचं एक चांगलं आणि मराठीतलं पहिलंच पुस्तक श्रीपाद ब्रह्मे वाचकांसाठी घेऊन आले आहेत.
वृत्तपत्रीय लिखाणाचा आवाका, मर्यादा लक्षात घेता हे लिखाण काही काळच लक्षात राहत असतं. तरीही याची बलस्थानं नाकारून चालत नाही. त्यामुळे याचं पुस्तक होणं चित्रपट अभ्यासकाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीनं महत्वाचं ठरतं. ही परीक्षणं वाचून चित्रपट बघायचा की नाही हे जेव्हा प्रेक्षक ठरवतो तेव्हा लिहिणाऱ्याची जबाबदारी जास्त वाढत असते. ही जबाबदारी ओळखून वृत्तपत्रीय वेळेच्या आणि शब्दमर्यादेत योग्य तेच लिहिणं या कसोटीला ब्रह्मे उतरले आहेत हे या पुस्तकातून दिसत राहतं. सुमारे ११ वर्षांत दोन वृत्तपत्रांमध्ये तब्बल ३०७ चित्रपटांची परीक्षणं त्यांनी लिहिली. त्यापैकी निवडक परीक्षणांचं हे पुस्तक, ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’.
श्वास या चित्रपटाच्या परीक्षणापासून सुरू झालेलं हे पुस्तक मसानपाशी येऊन थांबतं आणि लक्षात येतं, की अरेच्या, पुस्तक संपलंय. इतके आपण गुंगून जातो, एकरूप होतो पुस्तकातल्या भाषेशी, चित्रपटांच्या जगाशी. प्रत्येक परीक्षणाचा शेवट मोजक्या शब्दांमध्ये पण फारच परिणामकारक केलाय. उदा. त्यांच्या चित्रपटांमधून मिळणाऱ्या आनंदाचं भलंथोरलं झाडच असावं, त्याचं या चित्रपटासारखं बोन्सायहोऊ नये, हीच इच्छा!
सातत्यानं परीक्षणं लिहिताना ती एकसुरी होण्याची शक्यता असते, पण ब्रह्मे यांनी जाणीवपूर्वक भाषेचे वेगवेगळे फॉर्मस वापरले आहेत. त्यामुळे ही परीक्षणं खुमासदार बनली आहेत. काय द्याचं बोलाया चंद्रकांत कुलकर्णींच्या चित्रपटाच्या परीक्षणात त्यात मकरंद अनासपुरे जी भाषा बोलतो, त्याच भाषेत लिहिलं आहे. इंग्लिश विंग्लिशच्या चित्रपट परीक्षणात लिहिलंय, ‘हा एक लई-वई, भारी- वारी सिनेमा असून, तो चुकवल्या- बिकवल्यास पश्चाताप- बिश्चाताप वगैरे- बिगैरे होण्याची दाट- वाट शक्यता- बिक्यता आहे.’ ‘चेन्नई एक्स्प्रेसची सुरुवात अशी आहे, ‘अय्ययो, रामा, शिवा, गोविंदा... शाहरुखा , दीपिका, रोहिता... क्या पिक्चर बनाई! चेन्नई एकस्प्रेस्स... हमारी गाव की नामकी पिच्चर... नंबर वन्न...
आणखी एक म्हणजे या परीक्षणांची शीर्षकं अगदी मास्टरपीसच आहेत. बहुतेक शीर्षकं खाण्याशी संबंधित आहेत, त्यामुळे वाचक पटकन आकर्षित होतो. चटपटीत, नर्मविनोदी तर कधी हळवी शीर्षकंही पुस्तकात वाचायला मिळतात. आनंदाचं झाडया चित्रपटाचं साजुक तुपातला शिरा’, 'खट्टा-मीठा'चं शीर्षक तर अफलातून, ‘डोशाच्या पीठाचं थालिपीठ’. याशिवाय इतरही अनेक परीक्षणांची शीर्षकं फार अर्थपूर्ण आहेत. 'रन' नावाच्या एका टुकार चित्रपटाच्या परीक्षणाचं शीर्षक 'पळा पळा' एवढंच, तर रेनकोटया ऋतुपर्ण घोषच्या चित्रपटाच्या परीक्षणाचं शीर्षक 'धुंद वादळाची होती, दुपार पावसाची...' असं काव्यात्मक! 'परिणीता' या विद्या बालनच्या चित्रपटाच्या परीक्षणाचं शीर्षक 'द कम्प्लीट वुमन' असं बोलकं, तर ब्लॅक फ्रायडेचं शीर्षक काळ्या शुक्रवारची 'स्फोटक' कहाणी’. श्वास, काय द्याचं बोला, नितळ, गंध, रिटा, ताऱ्यांचे बेट, शाळा, वॉटर, बर्फी, इंग्लिश- विंग्लिश, लुटेरा, भाग मिल्खा भाग या चित्रपटांची परीक्षणं तर खासच जमलेली आणि मुळापासून वाचावीत अशीच आहेत. परीक्षणांची प्रवाही भाषा वाचकांच्या मनाची पकड शेवटपर्यंत धरून ठेवते. ही भाषा कधी तरल बनते, कधी खुसखुशीत होते तर कधी उपहासाने चिमटे घेते. कधी हळुवारपणे एखादं गुपित सांगावं तसं हितगुज करते. मोजक्या शब्दात प्रभावी आशय पोहोचवणं हे अवघड असतं, पण ब्रह्मे यांना हे फारच चांगलं जमलंय.
परीक्षणांची ही शैली वाचकांच्या मनाचा वेध घेते. सुरुवातीपासून शेवटापर्यंत उत्सुकता निर्माण करणारी ही परीक्षणं आजही तितकीच ताजीतवानी करतात आणि पुन्हा एकदा हे चित्रपट पाहावेत असंही वाटायला लावतात, हेच या पुस्तकाचं यश आहे.
चपराक प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या आकर्षक पुस्तकाचं मुखपृष्ठ समीर नेर्लेकर यांनी परीक्षणांच्या भाषेइतकंच देखणं केलंय. मधूनमधून मुद्रितशोधनाचे काही दोष सोडले तर पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय सोडवत नाही, हे अगदी खरं.
----------

3 comments:

  1. श्रीपाद ब्रह्मे यांच्या चित्रपट परीक्षणाच्या पुस्तकाची परीक्षणेही पुस्तकाला साजेशी,अगदी लज्जतदार झाली आहेत.फर्स्ट डे फर्स्ट शो ची लज्जत चाखायलाच हवी,पुस्तक ताबडतोब वाचायलाच हवे अशी इच्छा मनात जागवणारी अशी जमून आली आहेत

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete