9 Oct 2018

रिव्ह्यू - अंधाधुन

उघड्या डोळ्यांसमोरचा चकवा
-------------------------------------



श्रीराम राघवनचा ‘अंधाधुन’ हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे एक जबरदस्त सस्पेन्स-क्राइम-थ्रिलर आहे. म्हणजे तो थोडासा सस्पेन्स, थोडा क्राइम आणि थोडा थ्रिलर असा आहे. मात्र, या तिन्हीचा एकसंध परिणाम साधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात श्रीराम राघवन यशस्वी झाला आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवता येणं ही यशस्वी सिनेमाची साधी व्याख्या आहे. त्या व्याख्येत ‘अंधाधुन’ फिट बसतो. असा सिनेमा पाहताना एखादं कोडं सोडवीत असल्याचा बौद्धिक आनंद लाभावा लागतो. मेंदूला काहीसा खुराक मिळावा लागतो. बऱ्याच दिवसांनी असा बौद्धिक आनंद देणारा, मेंदूला खाद्य देणारा सिनेमा ‘अंधाधुन’च्या निमित्तानं बघायला मिळाला. ‘ल अकॉर्दोओर’ (द पियानो ट्यूनर) या २०१० मध्ये आलेल्या फ्रेंच लघुपटावर हा सिनेमा आधारित आहे.

SPOILER ALERT (रसभंग इशारा)

श्रीराम राघवनचं पुणे प्रेम चित्रपट रसिकांना माहिती आहे. त्यानं हा संपूर्ण सिनेमा पुण्यात तयार केला आहे. सिनेमाला पुण्याचं नेपथ्य आहे. नायक प्रभात रोडवर राहत असतो, तर दुसरी महत्त्वाची पात्रं मगरपट्टा सिटीत राहत असतात. थरारपट किंवा रहस्यपट सहसा दोन प्रकारचे असतात. पहिल्यात पात्रांपैकी काहींना रहस्य माहिती नसतं आणि काहींना ते माहिती असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही ते रहस्य माहिती नसतं. चित्रपटातील रहस्य माहिती नसलेल्या पात्रांची घालमेल त्यामुळं प्रेक्षक त्या पात्रांच्या बरोबरीनं अनुभवू शकतात. दुसऱ्या प्रकारात पात्रांपैकी काहींना रहस्य माहिती नसतं, तर काहींना ते माहिती असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही ते रहस्य माहिती असतं. चित्रपटातील रहस्य माहिती असलेल्या पात्रांना त्यामुळं मिळणारा एक विचित्र आनंद प्रेक्षकही त्या पात्रांच्या सोबतीनं अनुभवतात. ‘अंधाधुन’ची सुरुवात होते, तेव्हा तो दुसऱ्या प्रकारचा चित्रपट आहे, असं आपल्याला वाटतं. या चित्रपटाचा नायक आकाश (आयुष्मान खुराना) हा एक अंध पियानोवादक आहे. अंध व्यक्तींच्या आंधळं असण्या/नसण्यावर बेतलेले अनेक रहस्यपट आपण पाहिलेले असल्यामुळं आपण सुरुवातीलाच अंदाज व्यक्त करून मोकळे होतो, की हां, हा आकाश काही आंधळा नसणार बरं का! पण थोड्याच वेळात आपल्याला असं कळतं, की नाही, हा पहिल्या प्रकारातला चित्रपट दिसतोय. नंतर थोड्या थोड्या वेळानं आपल्याला एकदा तो या प्रकारातला, तर एकदा त्या प्रकारातला हा सिनेमा आहे, असं वाटू लागतं. आपल्याला अंदाजांच्या या झोक्यावर खेळायला लावून दिग्दर्शक बराच काळ आपल्यालाही गुंगवून ठेवतो आणि एका बेसावध क्षणी एक जोरदार थप्पड देतो. ती मिळाल्यावर आपण खरंच भेलकांडतो.
चांगल्या रहस्यपटाचं किंवा थरारपटाचं हेच वैशिष्ट्य असायला हवं आणि ‘अंधाधुन’ एक मिनिटही आपल्या या वैशिष्ट्यापासून दूर जात नाही. अशा रहस्यपटात प्रेक्षकाला सतत काही एक अनुमान करण्याची सवय लागते आणि त्याचे अनुमान बरोबर येणार नाही, याची काळजी घेण्याचे काम दिग्दर्शकाला करावे लागते. प्रेक्षकांचे अनुमान चुकणे म्हणजे चित्रपटाचे यश म्हणता येईल.
चित्रपट माध्यमाची सर्व बलस्थाने पणाला लावून श्रीराम राघवन हा खेळ सुरू करतो. चित्रपटाच्या सुरुवातीला सशाच्या शिकारीचं एक दृश्य येतं... एक शेतकरी बंदूक हाती घेऊन एका सशाच्या मागं लागलेला असतो. ‘पुणे ३२ किमी’  अशा माइलस्टोनसमोर तो ससा येऊन थांबतो आणि शेतकरी गोळी झाडतो. इथून हा सिनेमा सुरू होतो. या प्रसंगाचं चित्रपटाच्या दृष्टीनं महत्त्व काय असं आपल्याला वाटत राहतं. ते अगदी शेवटी उलगडतं. इथून चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममधून एक नजरबंदीचा खेळ दिग्दर्शक सुरू करतो. आपला अंध पियानोवादक असलेला नायक, तो राहत असलेला प्रभात रोडवरचा बंगला, त्याच्या खाली राहणारा एक आठ-दहा वर्षांचा पोरगा, आपल्या नायकाला अपघातानं भेटलेली सोफी (राधिका आपटे) ही मुलगी, तिच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये त्याला पियानो वाजवायला मिळालेली संधी, तिथं त्याची प्रमोद सिन्हा (अनिल धवन) या एके काळच्या बॉलिवूड नटाची झालेली ओळख, सिन्हाची जराशी विचित्र स्वभावाची बायको सिमी, या दोघांच्या घरी अचानक त्याला जावं लागणं आणि तिथं एका भयंकर प्रसंगाशी झालेला त्याचा सामना... हा सर्व घटनाक्रम पूर्वार्धात दिग्दर्शक सफाईनं उलगडतो. यातही आपल्या मनात येत असलेले विशिष्ट अंदाज, अनुमान, तर्क या सगळ्यांना फाटा मिळतो आणि वेगळंच नाट्य आकाराला येतं.
उत्तरार्धात हे नाट्य आणखी वेगवान, थरारक होतं. आता हा पहिल्या प्रकारातला सिनेमा आहे असं आपल्याला वाटू लागतं. आणखी पात्रं सामील होतात. नायक आणि विरुद्ध पार्टी असे दोन सरळ तट पडलेले दिसतात. पण नंतर दिग्दर्शक त्यात अशी सरमिसळ करतो, की कोण कुणाच्या बाजूला आहे हेच कळेनासं होतं. एक प्रकारचं कोडं सोडवीत असल्याचा बौद्धिक आनंद इथं मिळायला सुरुवात होते. आपण अंदाज करीत राहतो आणि दिग्दर्शक आपल्याला वेगळ्याच ठिकाणी नेऊन उभं करतो. अर्थात असं करताना सर्व घटनाक्रमाला किमान तर्काचं अधिष्ठान असावं लागतं. ते नसेल तर मग सगळाच डोलारा कोसळू शकतो. यातल्या प्रमुख पात्रांचा एकमेकांशी लपंडाव सुरू असताना तर्काची बाजू भक्कम ठेवणं हे कसबी दिग्दर्शकालाच शक्य होतं. श्रीराम राघवन यात अजिबात कमी पडलेला नाही. किंबहुना प्रेक्षकाला आपले अंदाज चुकत चालल्याचा आनंदच होतो.
या चित्रपटात एक सोडून दोन खून घडतात. ते कुठे, कसे आणि का घडतात, त्यामागं कोण असतं, हे सगळं अर्थातच क्लायमॅक्सला उलगडतं. त्या क्लायमॅक्सनंतरही दिग्दर्शक दोन वर्षांनी घडणारा एक घटनाक्रम दाखवून आपल्याला अजून एक धक्का देतो. हा धक्का तसा प्रेडिक्टेड आहे. पण तरीही तो पुरेसा आनंददायक आहे. सिनेमा संपल्यावर प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवतात, एवढा सिनेमाचा प्रभाव राहतो.
आयुष्मान खुरानानं यातल्या अंध पियानोवादकाची भूमिका छान केली आहे. त्याच्या नेहमीच्या पठडीतल्या भूमिकांपेक्षा ही वेगळी आहे. आपण जे नाही ते आहोत, असं दाखविण्याची त्याच्या पात्राची धडपड संपूर्ण सिनेमाभर आहे. ती साकारणं अवघड होतं. पण आयुष्माननं ते काम फार चांगलं निभावलं आहे. राधिका आपटे, मानव विज, अश्विनी काळसेकर, छाया कदम, झाकीर हुसेन असे अनेक कलाकार यात आहेत. त्या सगळ्यांनीच आपापली कामे चांगली केली आहेत. अनेक वर्षांनी दर्शन देणारे अनिल धवन यात सरप्राइजिंग पॅकेज म्हणून आले आहेत. यात त्यांच्या जुन्या गाण्यांचा खुबीनं वापर करण्यात आला आहे. या सगळ्या कलाकारांत खरी भाव खाऊन जाते ती तब्बू. तिच्या अप्रतिम भावदर्शनानं आपण अचंबित होतो. तब्बूच्या काही चांगल्या भूमिकांत ही सिमीची भूमिका निश्चितच असेल.
श्रीराम राघवनच्या या सिनेमात आपलं पुणं सतत दिसत राहतं. सिनेमात दिसणारं पुणं वेगळंच भासतं. ते पाहायला छान वाटतं. या चित्रपटाला अमित त्रिवेदीचं संगीत आहे. काही गाणीही आहेत. पण माझ्या ती फारशी लक्षात राहिली नाहीत.
थोडक्यात, चुकवू नये असाच हा थ्रिलर आहे.

---
दर्जा - चार स्टार
---

5 comments:

  1. खरोखर कमाल सिनेमा आहे हा... शेवटपर्यंत समजतच नाही पुढे काय होईल ते...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete