28 Oct 2018

जगणं मस्त मजेचं... सप्टेंबर

जगणं मस्त मजेचं....
------------------------


रसिकहो नमस्कार,
‘जगणं मस्त मजेचं’ ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता (आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ‘विविधभारती’वर) प्रसारित होणारी लोकप्रिय कौटुंबिक श्रुतिका मालिका..! या मालिकेसाठी लिखाण करण्याची संधी मला गौरी लागू आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ औटी यांनी दिली. मी यानिमित्ताने श्रुतिका प्रथमच लिहिली. पुण्यात राहणाऱ्या, कुणाल व रेणू या आधुनिक, आजच्या काळात जगणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही काल्पनिक श्रुतिका लिहायची होती. हे काम मला आवडलं... कुणाल इंजिनीअर, तर रेणू मराठीची प्राध्यापिका असते...
या मालिकेसाठी लिहिलेले स्क्रिप्ट मी इथं शेअर करतो आहे. अर्थात या स्क्रिप्टचं वाचन करणारे अमित वझे (कुणाल), रूपाली भावे-वैद्य (रेणू), आरती पाठक (सई), दीप्ती भोगले (दिघेकाकू), गोंधळेकरकाका (बाळाजी देशपांडे), देशमुख सर (संजय डोळे) यांच्यामुळं ही श्रुतिका खऱ्या अर्थानं श्रवणीय झाली. (मी अजूनपर्यंत यातल्या एकाही कलाकाराला भेटलेलो नाही.)
आकाशवाणीसाठी लिहावं ही माझी खूप जुनी इच्छा होती. गेल्या दोन-तीन वर्षांत तशा काही संधी मिळाल्या, तरी श्रुतिका हा प्रकार लिहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. ‘जगणं मस्त मजेचं’ या मालिकेच्या निमित्तानं माझी ही इच्छाही पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद आहे. जूनमध्ये नव्या स्वरूपात ही मालिका सुरू झाली, तेव्हा मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखकांनी तिचे सुरुवातीचे भाग लिहिले होते. त्यामुळं ही धुरा पुढं वाहताना मला किंचित दडपणही आलं होतं. पण पहिलाच भाग आवडल्याचं गौरी लागूंनी कळवलं आणि मला हुश्श झालं...
मला आशा आहे, आपल्यालाही हे स्क्रिप्ट * वाचायला आवडेल...

(* हे स्क्रिप्ट आणि प्रत्यक्षात सादर झालेले भाग यात थोडेफार बदल आहेत. कधी कलाकारांनी इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, तर कधी काही भाग एडिट झाला आहे. पण एकूण इफेक्ट अर्थातच खूप चांगला आला आहे.)

-----


१. एक सप्टेंबरचा भाग
---------------------------------------

कुणाल (गुणगुणतोय) - खूश है जमाना आज पहली तारीख है... खूश है जमाना आज पहली तारीख है...
रेणू (स्वयंपाकघरातून) - वा... वा... आज एकदम किशोर संचारलाय काय रे तुझ्या अंगात... मस्त लोळतोयस आणि वर गाणी म्हणतोयस... बरंय बाबा तुझं... आणि काय रे, तुला खूश व्हायला एक तारीख कशाला रे हवी? 
कुणाल - अहो, पगाराचा दिवस आहे आज... आनंद होणारच. महिनाभर राब राब राबून शेवटी, अमुक तमुक अमाउंट ट्रान्स्फर टु युअर अकाउंटवाला 'तो' मेसेज आला ना, की कसं भारी वाटतं... असं वाटतं, रोज असा मेसेज यावा...
रेणू (आतूनच) - अहाहा.. रोज यावा म्हणे... खाऊच आहे की नाही?
कुणाल - अगं, स्वप्नं पाहायला काय हरकत आहे? नाही तरी बघ ना, सध्या श्रावण सुरू असल्यामुळं मला किती तरी गोष्टींची फक्त स्वप्नंच पाहावी लागताहेत... त्यात हे एक अजून...
रेणू (चहा घेऊन बाहेर येते) - हे घ्या महाराज तुमचा चहा. आता माझं काम संपलं. मी तयारीला लागते. तुझं बरंय रे बाबा... मला नाहीय सुट्टी आज... लेक्चर आहेत... तू नाश्त्याचं बघतोयस ना?
कुणाल (आळस देत) - ना...आ... श्ता.... अरे बापरे... ते काम आहेच का माझ्याकडं? 
रेणू - असं काही बोलतोयस की जणू आजच करतोयस. दर शनिवारी ही तुझीच जबाबदारी असते... विसरलास का?
कुणाल - छे... विसरून कसं चालेल? आखिर पापी पेट का सवाल है भाई...
रेणू - आज बरीच डायलॉगबाजी सुचतीय... गाणी काय सुचताहेत...
कुणाल - अगं हो, मघाशी तू चहाचा कप घेऊन येताना अशी सुंदर दिसत होतीस ना, की मला ते गाणं आठवलं... कोणतं बरं...  भूपेंद्रचं गं ते... हां... हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए... खुलेआम आँचल ना लहराके चलिए... हुजूर इस कदर भी ना इतराके चलिए...
रेणू - इश्श... काहीही हं कु....
कुणाल - अरे वा... किती दिवसांनी म्हटलीस गं इश्श... मी तर विसरूनच गेलो होतो... बाकी आता खरंच काळजी घे बरं का... नववा महिना लागलाय आजपासून... (हसतो)
रेणू (खो खो हसते) - काय रे... उगाच पीजे मारू नकोस... सकाळी सकाळी असले मेसेज टाळावेत म्हणून मी ते व्हॉट्सअप आणि एकूणच फोन बंद ठेवते, तर तू आहेसच का ती कसर भरून काढायला...
कुणाल - अगं, मी खरंच जोक केला. बाकी आता आपल्याला कितीही वाटलं, की साराला बहीण किंवा भाऊ आणावा, तरी ते शक्य नाहीय... गोंधळेकरकाका किंवा दिघेमावशीही आडून आडून कधी तरी सुचवत असतात. पण मी लक्षच देत नाही.
रेणू - हो, म्हणजे काय... त्यांना काय जातंय सुचवायला. आपलं आधीच ठरलंय ना... एकच मूल बास ते... एक तर आपलं हे शहरातलं असं स्ट्रेसफुल लाइफ, आहे तेच झेपत नाहीय, त्यात आणखी कुठं रे जबाबदाऱ्या वाढवायच्या? बाय द वे, त्याचं काय आता मधेच? 
कुणाल - छे, कुठं काय! काहीच नाही. आज एक सप्टेंबरचा तो जोक मारला ना, तिथून सुरू झालं हे सगळं... जाऊ दे. आपण आपली मस्त गाणी म्हणू. मस्त मूड आहे सुट्टीचा, कशाला बिघडवायचा? 
रेणू - छान. तू गाणी म्हणत बस. मला निघायचंय रे बाबा थोड्या वेळात...

(तेवढ्यात बेल वाजते...)

रेणू - कोण आलंय बघ रे... गोंधळेकरकाकाच असतील...

(कुणाल दार उघडतो...)

सई - अरे, आवरलं नाहीस अजून?
रेणू - कोण? सई? अगं, ये ना... सरप्राइज... आज अशी अचानक?
सई (आश्चर्यानं) - म्हणजे? तुला यानं सांगितलं नाही?
कुणाल - एक मिनिट, काय सांगितलं नाही सई?
सई (ओरडते) - कुणाल.... तू पूर्ण विसरला आहेस... आज आपला ग्रुप भेटणार होता सकाळी 'खादाडेश्वर'ला... श्वेता आलीय यूएसवरून... सम्या पण आलाय दिल्लीवरून... तू कम्प्लीट विसरलायस...
कुणाल - ओह शिट शिट... सीरियसली सई... कम्प्लीट विसरलो गं मी... किती वाजलेयत? पावणेनऊ... अरे बापरे... आपण दहाला भेटणार होतो 'खादाडेश्वर'ला?
रेणू - एक मिनिट, मला कुणी सांगेल का काय झालंय? आणि 'खादाडेश्वर' हा काय प्रकार आहे?
सई - अगं, तुला खादाडेश्वर माहिती नाही? नवं रेस्टॉरंट झालंय जे. एस. रोडला.... कमाल आहे. तुला माहिती नाही?
रेणू - नाही गं बाई... पण ते सोड. तुमचं एवढं गेट-टुगेदर ठरलं आणि कुणाल एका अक्षरानंही मला बोलला नाहीय...
कुणाल - अगं, मीच कम्प्लीट विसरून गेलो, तर आता तुला काय सांगणार कप्पाळ?
रेणू - बरं, आता सांगतोयस का पाच मिनिटांत?
कुणाल - सई, तू सांग ना हिला... मी पटकन अंघोळीला पळतो... दाढीला तर आज सुट्टीच...
रेणू - ए, ए माणसा... तुझे लांबचे मित्र-मैत्रिणी येतायेत... आता नीटच आवरून जा... उगाच माझी अब्रू जायची... 
कुणाल - बरं बरं... मी आवरतोय... सई, प्लीज...
सई - हो हो... मी सांगते तिला... तू पळ... अगं रेणू, काय झालं माहितीय का? आमचा इंजीनिअरिंगचा एक ग्रुप आहे. तुला माहितीच आहे. 
रेणू - हो, 'बंडल बग्ज' का काही तरी असलंच नाव आहे ना... (हसते)
सई (हसत) - हो हो... काहीही नाव ठेवलंय ग्रुपचं... हे त्या सम्याचं डोकं... आता मोठा बिझनेसमन झालाय... पण थर्ड इयरला दोन वर्षं डेरा टाकला होता महाराजांनी... माझ्याच नोट्सच्या चिंध्या करून सुटलाय... 
रेणू - अगं, ते जाऊ दे... मुद्द्याचं बोल. आजची मीटिंग का ठरलीय?
सई - अगं, तुला ती श्वेता माहितीय का? मुंबईची? नंतर लग्न करून यूएसला सेटल झाली ती? 
रेणू - खरं तर नाहीय आठवत... पण तू सांग... तिचं काय?
सई - अगं काही नाही. तिचं एक लग्न तिकडं होता होता मोडलंय... आता ही लग्नच करायचं नाही म्हणतीय. वर तिला मुलगी दत्तक घ्यायचीय. म्हणून ती भारतात आलीय. तिचे आई-बाबा असतात पार्ल्याला... तिकडं थांबलीय. मग ग्रुपवर गेला आठवडाभर हीच चर्चा.... सम्या म्हणाला, की मी येत्या शुक्रवारी पुण्यात येतोय. शनिवारी सकाळी 'खादाडेश्वर'ला भेटू या... मग श्वेतापण येते म्हणाली. मग ती, मी, कुणाल, सम्या आणि अभ्या असे आम्ही पाच जण 'खादाडेश्वर'ला भेटायचं ठरलं... श्वेता कालच पुण्यात आलीय. बाणेरला तिची कुणी तरी मावसबहीण आहे वाटतं. तिच्याकडं थांबलीय. ती आता पोचत असेल. सम्याचे आई-वडील तर पुण्यातच असतात. तोही आलाय काल. अभ्या काय तिथं जवळच राहतो. लांबून येणारे मी आणि कुणालच. तर या शहाण्यानं आवरून तयार राहावं की नाही... बघ ना... आता आम्हाला उशीर होणारे...
रेणू - कठीण आहे गं बाई. मला एका शब्दानं तरी सांगेल की नाही हा माणूस. मी गजर लावून उठवलं असतं. हा निवांत उठलाय. पेपर वाचत लोळत होता आणि वर कसली कसली गाणी म्हणत बसला होता आत्तापर्यंत...
सई - कहर आहे हं खरंच.
रेणू - पण काय गं, या मुलीचं बिनसलं कशामुळं?
सई - वो भी एक लंबी स्टोरी है... 
रेणू - लेकिन शॉर्ट में सुना दो अभी...
सई - अगं, ही श्वेता चांगली कम्प्युटर इंजिनीअर... आमचीच क्लासमेट... आधी बेंगलोरला प्लेसमेंट झाली होती. तिथं तिचं एका मल्याळी पोराबरोबर जमलं. पण हिचे घरचे एकदम ऑर्थोडॉक्स... लग्नाला परवानगी देईनात. मग या दोघांनी पळून जायचं ठरवलं. एवढ्यात श्वेताला त्या मुलाच्या आधीच्या एका प्रकरणाबाबत समजलं. कोलमडलीच गं मग ही ते पाहून... आली जॉब सोडून मुंबईला परत...
रेणू - अरे देवा... मग हे यूएसचं काय?
सई - ऐक ना... वर्षभर डिप्रेस्डच होती. ट्रीटमेंट चालू होती. मग सम्याच्याच ओळखीतून हा नवा जॉब लागला. लगेच ट्रेनिंगला यूएसला गेली. तिकडं पुन्हा एक जण मित्र भेटला. ही अशी हळवी झालेली. त्यानं आधार दिला. मराठीच मुलगा होता. नाव विसरले आता. मग ही त्याच्या प्रेमात पडली. सहा महिने बरं चाललं होतं... आणि...
कुणाल (अचानक एंट्री घेत, मोठ्याने) - व्हिलनची एंट्री झाली...
सई, रेणू - ए, दचकलो ना आम्ही...
रेणू - झाली का महाराज अंघोळ?
कुणाल - काय वाटतंय तुला?
रेणू - हं, आता आवर पटापट... ही थांबलीय केव्हाची... आणि मलाही जायचंय अरे... नाश्ता राहिलाच आहे आणि माझा.
कुणाल - अरे बाप रे, मेलो. तू दोन मिनिटं थांबतेस का? मी खालून 'समर्थ'मधून तुला पटकन पॅटिस आणून देतो...
रेणू - राहू दे आता. मी बघते काय करायचं ते... पळ तू आधी...
कुणाल - अगं, नऊ वाजताहेत अजून... आहे आम्हाला वेळ. सम्या आणि अभ्या काही वेळेत येत नाहीत हे मला पक्कं माहिती आहे.
सई - हो कुणाल, पण आपण नको उशीर करायला...
रेणू - आणि हो, ते व्हिलनची एंट्री का काय, ते काय म्हणालास मधेच?
कुणाल - श्वेताची स्टोरी ना, अगं ही त्या विवेकच्या प्रेमात पडली आणि पुन्हा त्याचे आई-वडील मधे तडमडले. हिनं त्याला आधीचं सगळं सांगितलं होतं. ते ऐकून त्यांनी आम्हाला असलं स्थळ नको म्हणू सांगितलं... आहे की नाही कमाल! 
सई - अरे, पण तो कोण तुझा विवेक, त्याच्या काय फक्त नावातच विवेक आहे वाटतं... त्याला नव्हतं का समजावून सांगता येत त्याच्या आई-वडिलांना?
कुणाल - हे बघ सई, आपण असं जजमेंटल होऊ नये. आपल्याला काय माहिती त्यांच्या घरात नक्की काय झालंय ते... नाही का?
रेणू - अरे, ते सगळं ठीक आहे. पण ही मुलगी आता लग्नच करायचं नाही असं काय म्हणतेय एकदम? आणि दत्तक मुलगी काय? तुम्ही समजवा ना तिला... अजून चांगला कुणीतरी मुलगा भेटेलच की...
सई - एक्झॅक्टली रेणू... बुल्स आय... आम्ही हेच सांगणार आहोत तिला... 
कुणाल - माझा तर पूर्ण पाठिंबा आहे तिला... घेऊ देत मुलगी दत्तक... राहू देत एकटी तिला... सुश्मिता सेन नाही का राहत? काय भारी बाई आहे? आधी ती माझा क्रश होती... पण आता खरोखर आदर वाटतो तिच्याबद्दल... ती काय, नीना गुप्ता काय... थोर बायका या...
रेणू - हो ना? पण तुझी मैत्रीण आहे का एवढी थोर? आणि काय रे, तू अगदी पाठिंबा देतोयस तिला.... पण या असल्या मोरल सपोर्टचा काही उपयोग नसतो. पुढं तिचं तिला एकटीनंच करावं लागणार आहे सगळं...
सई - तेच ना... मुळात आमचं असं ठरलंय, की तिचं सगळं ऐकून घेऊ. मग बोलू...
रेणू - हे ठीक आहे. ती काय म्हणतेय ते खरंच तुम्ही सगळे शांतपणे ऐकून घ्या. लगेच 'जजमेंटल' होऊ नका, एवढंच माझं म्हणणं...
सई - बरोबर आहे रेणू तुझं... आपल्याकडं लोकांना अशी सवयच आहे. लगेच एखाद्यावर काही तरी शिक्का मारायची सगळ्यांना घाई झालेली असते. ए, पण आम्ही तसे वाटतोय का तुला? 
रेणू - अगं, गैरसमज नको करून घेऊस. तुला असं नाही गं म्हटलं. एकूणच आपल्याकडं लोकांना ही सवय आहे ना, म्हणून म्हटलं... 
सई - हं, चला... उशीर होतोय कुणाल. निघू या का?
कुणाल - अगं, पाचच मिनिटं थांब. मी रेणूला पॅटिस आणून देतो खालून...
रेणू - ओ महाराज, राहू द्या ते पॅटिस. मी आमच्या कँटीनला खाते काही तरी... मला आवरू दे आता... तुम्ही निघा. आणि जमल्यास मला 'खादाडेश्वर'मधून पार्सल आणा....
सई - अगं मी हेच म्हणणार होते. नक्की पाठवते कुणालसोबत... 
रेणू - चलो, बाय... कुणालचंही 'पार्सल' पाठव सोबत... आम्हाला लागतं ते....

(सगळे हसतात...)

----


२. आठ सप्टेंबरचा भाग
------------------------------------------------


जगणं मस्त मजेचं - भाग १७ : २९ सप्टेंबर २०१८ साठी
-------------------------------------------------------------

(पार्श्वभूमीवर 'सुनियो जी अरज म्हारी'च्या आधीची तान ऐकू येते...)

रेणू - कुणाल, सुनियो जी अरज म्हारी... उठ रे बाबा. खूप वेळ झाला आता... आणखी किती वेळ लोळत पडणारेस? आज देशमुख सर येणार आहेत घरी... कधीही येतील. तू असाच पारोसा उठून भेटणार आहेस का त्यांना?
कुणाल - रेणू, अगं काय गं... झोपू दे ना... किती छान वाटतं मला शनिवार उजाडला की. दोन दिवस कशी मस्त सुट्टी... आणि आता आपल्या पुण्यात हवा पण किती झकास आहे... थंडी वाजतेय पहाटे चक्क... असं रजईत गुरफटून घेऊन लोळण्यात काय सुख आहे तुला नाही कळायचं...
रेणू - असू दे. मला नकोय ते सुख... आणि ऑफिशियली थंडी पडायला अजून वेळ आहे. अजून नवरात्र जायचंय. तेव्हा हमखास पाऊस पडतोच आपल्याकडं... आणि काय रे? मागच्या शनिवारी आपल्याला सईबरोबर बाहेर जायचं होतं म्हणून मीच ब्रेकफास्ट केला. आज तसं काही नाहीय. तू करणार आहेस का काही? की परत मलाच उभं राहावं लागणार आहे किचनमध्ये? पण माझं आवरून झालंय आणि मला सरांसोबत जायचंय बाहेर... तेव्हा पुन्हा किचनमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करायची माझी काही तयारी नाहीय बाबा. तर तू उठच आता....
कुणाल - अगं हो हो हो... किती बोलतीयेस रेणू... मान्य आहे, तुझे सर येणार आहेत ते! मी पोहे करू शकतो पटकन. करू का बोल... नाही तर 'समर्थ' आहेच ब्रेकफास्ट सिद्धीस न्यायला! सरळ उडीदवडे आणि सांबार आणू का पार्सल? 
रेणू - नको आता कुठं जात बसू. तू टाक पोहे. आधी आवरून घे ना पण पटकन. ब्रश कर... मी सरांना नऊला यायला सांगितलं होतं रे कुणाल. ते वेळेचे पक्के आहेत. कधीही येतील बघ आता. जा, जा, पळ...
कुणाल - देशमुख सरांच्या आईच्या हातचे धपाटे खाल्ले नाहीत बऱ्याच दिवसांत... जायला हवं एकदा...
रेणू - अरे, विषय काय चाललाय? तू काय बोलतोयस? आपण सरांकडं नाही चाललोय... ते आपल्याकडं येताहेत.
कुणाल - अगं तेच ना. आपण त्यांच्याकडं जायला हवं होतं. म्हणजे काकूंच्या हातचे गरमागरम धपाटे आणि तूप खाल्लं असतं मी. मला तो प्रकार भयंकर आवडलाय. 
रेणू - धपाटे मी तुला घालते आता. कधी न मिळाल्यासारखं करतोस... कमाल आहे हं तुझी...
कुणाल - हे बघ रेणू... आपल्याकडं कधी केलेयत तू तसले धपाटे? तुला येत नाही तसं. ती त्यांच्या मराठवाड्यातली स्पेशालिटी आहे.
रेणू - अरे हो. पण याचा अर्थ मला येत नाही असं नाही. मी काकूंना रेसिपी विचारून घेतलीय धपाट्यांची... मी देईन तुला करून कधी तरी. पण आत्ता आवर...
कुणाल (हसतो) - हो हो. जातो. तुझ्या हातचा धपाटा खाण्यापेक्षा ब्रश केलेला बरा... 

(तेवढ्यात बेल वाजते.)

रेणू - सर आलेच वाटतं. तू आवरून ये पटकन. मी दार उघडते.

(रेणू दार उघडते. देशमुख सर येतात.)

देशमुख सर - सुप्रभात रेणू... अगं काये? आवरलं नाही का काय अजून? निघायचं ना बाई आपल्याला? मीटिंग दहाला सुरू आहे बरं शार्प...
रेणू - हो सर. मी आवरून अगदी तयार आहे. ब्रेकफास्ट करू या आणि निघू या... कुणाल करणार आहे पोहे.
देशमुख सर - वा वा... कुठं आहेत साहेब? आवरतेत का अजून? आवरूं द्या, आवरूं द्या... मी तवर इथं बसून जरा पेपर वाचतो.
रेणू - बसा सर निवांत. येईलच तो इतक्यात.... काकू काय म्हणताहेत? कुणालनं आत्ताच त्यांच्या हातच्या धपाट्यांची आठवण काढली होती.
देशमुख सर (हसतात) - वा... वा... म्हातारी झ्याक आहे की... तिचा पांडुरंग आणि तिची पोथी, तिचा तुकोबा आणि त्याची गाथा... चाललेलं असतंय बघ एकदम भारी... 
रेणू - आता इकडंच आल्या का त्या?
देशमुख सर - न्हाई न्हाई. कदी इकडं असती, तर कधी गावाकडं, माझ्या भावाकडं असती. तिला प्रवास झेपत नाही आता फार... आता आलीय तर दिवाळीपत्तूर हिकडंच राहील आता... तुम्ही दोघं या की परत... धपाटे करून घालील तुम्हाला ब्येस... डोळे जरा अधू झाल्यात तिचं... पण घोर नाही. यावा बिनधास्त...
रेणू (हसते) - अहो, तसं नाही. त्यांची तब्येत होऊ द्या व्यवस्थित. मग येऊ आम्ही...
देशमुख सर - म्हातारीला कष्टाचं काही नाही बघ. तिचं सगळं आयुष्य तसं कष्टातच गेलं. माझे वडील शाळा मास्तर होते, तुला तर माहितीच आहे. सारख्या बदल्या व्हायच्या त्यांच्या. माझे आजोबासुद्धा शिक्षक होते बरं का.... निजामी होती तेव्हा... लांब तिकडं देगलूरला... तवापासून फिरती बघ आमच्या फॅमिलीला सारखी... आईनं कधी कुरकुर केली नाही. घरात वीस-पंचवीस माणसांचा बारदाना होता. पहाटे चारपासून चुलीपाशी असायची. पंचवीस माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक एकटी रेटायची...
रेणू - हो, मी कुणालला सांगितलं होतं मध्यंतरी. असाच विषय निघाला होता स्वयंपाकाचा तेव्हा...
देशमुख सर - पूर्वीच्या या बायांनी फार कष्ट काढले बघ रेणू. पण एक होतं, त्यांनी कधी तक्रार नाही केली. आनंदानं करत राहिल्या. घरातल्या माणसांसाठी राबत राहिल्या. त्या मानानं घरातल्या बाकीच्यांनी त्यांची जेवढी कदर करायला पाहिजे होती तेवढी केली नाही बघ.
रेणू - एक्झॅक्टली सर. मला तेच म्हणायचं होतं. या बायका राबल्या, याचं कारण त्यांना दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही तुम्ही. चूक होतं ते...
देशमुख सर (हसतात) - ए बाई, आता तू माझी शाळा घेऊ नको हां...

(कुणाल येतो.)

कुणाल - वा सर... कधी आलात? आणि कसली शाळा चाललीय?
देशमुख सर - ये बाबा कुणाल. तू आलास ते बरं झालं. नाही तर ही रेणू देत होती मला लेक्चर बायकांच्या बाबतीत आम्ही पुरुषांनी कसा अन्याय केलाय त्यावर...
रेणू - खरंच आहे ते...
कुणाल - ए बाई, राहू दे ते आता. तुम्हाला घाई आहे ना... मी पटकन पोहे टाकतो.
देशमुख सर - पाहा, काळ कुठून कुठं आलाय ते. चुलीपुढची बाई गेली न्हवं का... आणि आता ह्यो गडीमाणूस करणार आपल्यासाठी ब्रेकफास्ट...
रेणू - असू दे की. करू दे. एरवी पाच दिवस मीच राबत असते बरं का सर.... चूल, म्हणजे आता हा गॅस..... हा काही सुटलेला नाही बरं का आम्हाला अजून... उलट आमचे कष्ट दुप्पट झालेयत.
कुणाल - सर, लवकर विषय बदला. नाही तर इथं कधीही धरणीकंप होईल.
रेणू (हसते) - हो, आणि तुला असंच वाटेल, की ही धरणी आता दुभंगून मला पोटात घेईल तर बरं...
देशमुख सर - अगं रेणू, भूकंपावरून आठवलं. हे बघ पेपरला आज लेख आलाय. आमच्या मराठवाड्यात किल्लारीला भूकंप झाला होता ना, त्याला या उद्याच्या रविवारी, म्हणजे ३० सप्टेंबरला २५ वर्षं पूर्ण होतायत.
कुणाल - बाप रे सर... २५ वर्षं झाली? काळ काय भराभर जातो नाही? मला चांगलाच आठवतोय तो भूकंप... १९९३. गणपती विसर्जनाची रात्र होती. मी पुण्यातच होतो. मिरवणूक बघून मी पहाटे अभ्याच्या रूमवर झोपायला गेलो होतो. तर अचानक भांडी वाजून पडायला लागली. काही कळेचना. मग त्या वाड्यातले शेजारचे काका धावत आले बाहेर. ओरडले, की अरे, भूकंप होतोय. सगळे बाहेर या. दोन मिनिटांत आम्ही सगळे वाड्यातले लोक चौकात जमा झालो होतो. मी माझ्या आयुष्यात अनुभवलेला हा एकमेव मोठा भूकंप...
रेणू - देव करो आणि पुन्हा अनुभवायला न मिळो रे बाबा. मी कुठं होते तेव्हा? मला का नाहीय आठवत?
कुणाल - तुला सांगितलेला उपाय तू केलास नाहीस रेणू. बदाम खा बदाम... रोज सकाळी येणारे.... (हसतो...) 
देशमुख सर - अरे, तुम्हाला इथं पुण्यात तरी तसा किरकोळच जाणवला म्हणायचा. मी तर तेव्हा लातूरला राहायचो. शिकायला होतो मी तिथं कॉलेजात. मी ती रात्र कधीच विसरणार नाही. शक्यच नाही तर! इमारत नुसती गदागदा हलत होती आमची.
रेणू अन् कुणाल (एकदम) - बाप रे... भयंकरच...
देशमुख सर - आता काय सांगू? कसा बाहेर पडलो आणि पुढं कसं निभावलं ते माझं मला माहिती. तिथल्या मैदानात सगळे जमले होते. अनेक घरं पडली होती. मग कळलं, की किल्लारीला मेन सेंटर होतं भूकंपाचं... ते गाव तर पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं... आम्ही त्याच संध्याकाळी कॉलेजचे सगळे मित्र तिकडं गेलो मदतीला... भयंकर परिस्थिती होती हो सगळी... आता आठवलं तरी काटा येतोय बघा अंगावर...
कुणाल - खरंय सर. ही नैसर्गिक आपत्ती फारच मोठी होती. खूप नुकसान झालं आपलं...
देशमुख सर - एक तर काय... आपली खेड्यातली घरं तुम्हाला माहिती... सगळी मातीची.... एकमजली किंवा जास्तीत जास्त दुमजली. आणि भूकंप पहाटं झाला ना... लोकांना पळायला संधीच मिळाली नाही हो... आम्ही नंतर पाहिलं ना तिथं... अनेक बॉड्या बाहेर काढल्या. झोपलेला माणूस कसा दिसतो तशाच दिसत होत्या. एकदम शांत, निरागस भाव... लहान लहान लेकरं तर....
रेणू - नको सर, प्लीज... नको. त्रास होतो हो...
देशमुख - होय. त्रास तर होतोच. आम्ही तर प्रत्यक्ष पाहिलं सगळं. पुढले काही दिवस अन्नाचा घास उतरला नाही बघ पोटात. नुस्ते पाणी आणि चहावर राहिलो. संध्याकाळी कोणी कोणी राइसचं पार्सल आणून द्यायचं. कधी दोन घास खाल्ले तर खाल्ले. असं सगळं झालं होतं.
कुणाल - आपल्याकडं नैसर्गिक आपत्ती खूप येतात. पण नंतर परत तसं होऊ नये म्हणून आपण कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात फार कमी पडतो बरं का सर. आपल्याकडं माणसाच्या आयुष्याला सगळ्यांत कमी किंमत! कधी बदलायचं हे सगळं?
रेणू - कुणाल, तू म्हणतोस ते बरोबर आहे. एकदा एका प्रकारानं हानी झाल्यावर पुन्हा तशाच प्रकारातून कमीत कमी जीवितहानी व्हावी, असे प्रयत्न आपण करू शकतो. पण आपल्याकडं नेमकं तेच होताना दिसत नाही.
देशमुख सर - आता पुनर्वसन हा फार मोठा विषय आहे. किल्लारीचं पुनर्वसन झालं. पण गावाचं गावपण गेलं बघा. अनेक गावांचं हे झालं. भूकंपामुळं एक पिढीच संपली. अनेक जण कायमस्वरूपी स्थलांतरित झाले. अनेकांचं गाव सुटलं... ही वेदना फार जीवघेणी असते बरं का...
रेणू - हो सर. कल्पना आहे. आपली मुळं उपटून दुसरीकडं नेऊन रुजवायची हे सोपं काम नाही.
देशमुख सर - पण माणसानं नेहमी पॉझिटिव्ह राहावं... एकमेकांना मदत करावी. एकमेकांच्या बाबतीत सहानुभूती असावी. राग, द्वेष नको. ज्ञानोबामाऊली म्हणतात, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले... तर असं विश्वाचं आर्त प्रत्येकाच्या मनी प्रकाशलं पाहिजे ना बाबा...
कुणाल - वा... या गाण्यावरून आठवलं. लता मंगेशकरांनी किती सुंदर, आर्त स्वरांत हे गाणं गायलंय...
रेणू - कुणाल, कालच लतादीदींचा वाढदिवस झाला ना! योग्य वेळी त्यांची आठवण झाली म्हणायची तुला...
कुणाल - अगं हो. बरोबर. काल दीदी ८९ वर्षांच्या झाल्या आणि आता त्यांनी नव्वदीत पदार्पण केलंय...
देशमुख सर - व्वा.. शंभर वर्षं जगू देत. जीवेत शरदः शतम्! 
रेणू - खरंय सर. तीन आठवड्यांपूर्वी आशाताईंचा वाढदिवस झाला तेव्हा आम्ही बोललो होतो. या दोन्ही बहिणींनी आपल्याला काय भरभरून दिलंय नाही! त्यांची गाणी बघा ना, सदैव सोबतच असतात आपल्या. 
कुणाल - खरंय. काल आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर आम्ही दिवसभर लता मंगेशकर या सातअक्षरी चमत्काराविषयीच बोलत होतो. त्यांची काही गाणी ऐकली ना, की अजूनही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
रेणू - हो रे... माउलींच्या या सगळ्या रचनाच बघ ना. 'मोगरा फुलला' काय किंवा 'रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा' काय, दुसऱ्या कुठल्याही आवाजात आपण इमॅजिनच करू शकत नाही. 
देशमुख सर - अहो, मी तर दीदींच्या जुन्या गाण्यांचा फॅन आहे बरं का. माझ्या मोबाइलमध्ये फोल्डरच्या फोल्डर भरली आहेत त्यांच्या जुन्या गाण्यांनी. अगदी 'आएगा आएगा आएगा आनेवाला'पासून ते 'लग जा गले'पर्यंत... सगळीच फेवरिट...
रेणू - दैवदत्त देणगी आहेच रे आवाजाची. पण त्यांची मेहनत बघ ना... प्रत्येक गाणं सुरेल... हा सूर कधीच बेसुरा झाला नाही. 
कुणाल - आणि अपील बघ. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते कामरूपपर्यंत सगळ्या देशाला बांधून ठेवणारा हा आवाज. आपल्या लहानपणी ते 'मिले सूर मेरा तुम्हारा' लागायचं बघ... त्यात शेवटी दीदी गायच्या. माझ्या अंगावर तर कायम रोमांच उभे राहायचे.
रेणू - अरे तेव्हाच का! आजही कधी यू-ट्यूबवर ती क्लिप पाहते मी, तेव्हा मलाही अगदी भरून येतं...
देशमुख सर - आमच्या वडिलांकडं पूर्वी तो फोनो होता. कर्णा... त्यावर ते फक्त लताबाईंची गाणी ऐकायचे. असा गोड आवाज...
कुणाल - खरंय. काही लोकांचं आयुष्य बघितलं ना, की थक्क व्हायला होतं. मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलं होतं, की माइकवर अचूक क्षमतेनं आदळणारा असा पिकोलो जातीचा त्यांचा आवाज आहे म्हणे.
रेणू - ते काही असो. त्या आवाजाचा सुयोग्य वापर त्यांनी केला ना पण... सगळ्यांनाच जमतं असं नाही. कित्येक अवघड गाण्यांत त्या श्वास कुठं घेतात, तेही कळत नाही. ही खरंच कमाल आहे.
देशमुख सर - आपल्यासारख्या सामान्य माणसांचं आयुष्य उजळून टाकण्यासाठी देव अशा काही दैवी लोकांना जन्माला घालत असावा. दीदी त्यातल्याच एक आहेत.
रेणू - मला तर कित्येकदा वाटतं, की आपण फार भाग्यवान आहोत. आपण पुढच्या पिढ्यांना सांगू शकू, की आम्ही लता मंगेशकरांना प्रत्यक्ष पाहिलंय, आशा भोसलेंना पाहिलंय, भीमसेन जोशींना पाहिलंय... 
कुणाल - अगदी अगदी! कित्येकदा या व्यक्ती हयात असताना लोकांना त्यांचं फार महत्त्व वाटत नाही. पण त्या नसतील ना, तेव्हा कळतं मग...
रेणू - पण या लोकांच्या बाबतीत तसं काही नाहीय. लोकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिलंय. दीदींना तर 'भारतरत्न' सन्मान दिलाय. जगभरातले संगीतप्रेमी त्यांच्या गाण्यावर जीव ओवाळून टाकतात. त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात.
कुणाल - खरंय. एक सांगू का? काही गोष्टी आपल्या सामान्य माणसांच्या आकलनापलीकडच्या असतात. आपण त्यांचं विश्लेषण करायच्या भानगडीत पडूच नये. फक्त त्या गोष्टीचा आनंद लुटावा. लताचं गाणं हा तसाच विषय आहे.
रेणू - अगदी खरं. मला तर वाटतं, आपल्या जगण्यातल्या प्रत्येक क्षणासाठी एक छान गाणं दिलंय आपल्याला त्यांनी. अगदी अंगाईगीतापासून ते रोमँटिक गाण्यांपर्यंत आणि दुसरीकडं अध्यात्मापासून ते ज्याला डिव्हाइन म्युझिक म्हणतात, अशा दैवी रचनांपर्यंत त्यांनी आपल्या सूरांतून सतत आपल्याला काही तरी दिलंच आहे. 
कुणाल - होय. मी या सगळ्यांविषयी कृतज्ञ आहे.
देशमुख सर - कृतज्ञता ही फार मोठी गोष्ट आहे, बरं का कुणाल. माणसानं नेहमी आपल्याला जे काही मिळालं आहे, ज्यांच्यामुळं मिळालं आहे त्या सगळ्यांविषयी सदैव कृतज्ञ असावं.
रेणू - अरे कुणाल, लतादीदींचा विषय निघाला आणि बोलतच बसलो बघ आपण. तू कर ना पोहे पटकन प्लीज. तसं केलंस तर मी अगदी कृतज्ञ राहीन. (हसते)
देशमुख सर - आणि मी पण बरं का रे (हसतात)
कुणाल - ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या वेळी मला तुमच्या घरी धपाटे खायला न्या, म्हणजे झालं... 

(सगळे हसतात...)

(मागे 'नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाजही पहचान है... गर याद रहें' ऐकू येत राहतं...)

----


३. १५ सप्टेंबरचा भाग
------------------------------

(पार्श्वभूमीवर 'उठी उठी गोपाळा' ऐकू येतंय...)

रेणू - उठी उठी कुणाला... ओ इंजिनीअर साहेब, उठा... बास झालं लोळणं आणि पेपर वाचणं...
कुणाल (आळस देत) - अममममम, हो गं... उठतोच आहे. आणि ऐक, जरा अभिनंदन कर की माझं...
रेणू - का? आज काय आहे? 
कुणाल - माझ्या व्हॉट्सअपवर बघ धडाधड अभिनंदनाचे मेसेजेस पडताहेत. आमचा कॉलेजचा ग्रुप तर धरण फुटावं तसा फुटलाय...
रेणू - काय रे बाबा! नाही लक्षात येत... आणि काय रे, फोन बंद ठेवायचा ठरलंय ना आपलं... तासभर तरी बंद ठेव रे... 
कुणाल - अगं हो हो, आज आमचा दिवस! इंजिनीअर्स डे आहे आज... अभियंता दिन... 
रेणू (हसत) - अगं बाई हो का! अभिनंदन हो इंजिनीअर साहेब... 
कुणाल - तुला माहितीय का रेणू, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिवस असतो. आपल्या भारतातले हे सर्वश्रेष्ठ अभियंते... म्हणून त्यांच्या नावानं हा दिवस साजरा केला जातो. 
रेणू - अरे हो... खरंच... आमच्या कॉलेजमध्येही आज खास कार्यक्रम आहे बरं का... माझी सुट्टी आहे आज ते सोड. पण मी कशी काय बरं विसरले? 
कुणाल (हसत) - बदाम खात जा तू... रोज सकाळी फोनवर तुला येतात ना ढिगानं तुझ्या लाडक्या मित्रांकडून... 
रेणू (हसत) - गप रे. फालतूपणा करू नकोस. ते तसले बदाम मी रोज 'डिलिट' नावाच्या कुंडीत फेकून देते. छान खत होतं त्याचं...
कुणाल - वा.. वा... 'खत'वरून आठवलं... मेरी ये 'खता' माफ करना बेगम जान...
रेणू - कुठून शिकतोस रे हे असले फालतू पीजे मारायला... त्या व्हॉट्सअपनं तुझ्यातला अस्सल विनोद संपवलाय बघ पूर्ण...
कुणाल (हसत) - 'विनोद' संपला असला, तरी 'अमिताभ' शिल्लक आहे अजून... 
रेणू (ओरडते) - कुणाल, कुण्या, कुणल्या... मेलास तू आज... काय फेकून मारू रे तुला...
कुणाल - सॉरी, सॉरी सॉरी... बरं ऐक. सीरियस मोड ऑन हं... हे बघ; हा मेसेज बघ. तुला भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल काही माहिती आहे का? आणि ते जरी म्हैसूरचे असले तरी आपल्या पुण्याशी त्यांचा फार जवळचा संबंध होता. एक तर ते माझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे सीओईपीमध्ये शिकलेयत... 
रेणू - ए, एक मिनिट! ते तुझ्या कॉलेजमध्ये नाही शिकले, ते ज्या कॉलेजात शिकले, तिथं नंतर तू शिकलायस, कळलं ना!
कुणाल - हो, हो बाई. ऐक तर... धरणांमध्ये जे स्वयंचलित दरवाजे बसविले जातात ना, ते भारतात पहिल्यांदा सर विश्वेश्वरय्यांनी शोधून काढले बरं का.... आणि पहिल्यांदा त्याचा प्रयोग कुठं केला असेल? आपल्या खडकवासला धरणात... तेही १९०३ मध्ये... आहे ना भारी!
रेणू - खरंच रे... आपण कित्येक वेळा टाइमपास करायला त्या धरणावर गेलो असू. पण ही माहिती काही मला नव्हती. आता पुढच्या वेळी त्या दरवाजांकडं पाहीन, तेव्हा मला या महान माणसाची एकदा तरी आठवण येईलच.
कुणाल - आणि तुझ्यासोबत पण एक महान इंजिनीअर ड्रायव्हर म्हणून येत असतो, त्याचीही आठवण ठेव म्हणजे झालं.
रेणू (हसत) - हा हा हा! तूही त्यांच्यासारखं काही तरी महान कार्य करून दाखव. मग मीच काय, सगळा भारत देश लक्षात ठेवील तुला... शनिवारची सकाळ म्हणून लोळत पडलास तर काही होणार नाही तुझ्याकडून... आणि काय रे, निदान आज तरी हा आळस झटक. घरात गणपती बसले आहेत. निदान दहाच्या आत तरी सकाळची आरती व्हायला पाहिजे रे... आज मला एक सुट्टी आहे म्हणून ठीक आहे. 
कुणाल - आणि काय गं, आज गौरी पण बसतात ना...
रेणू - हो, मग! मला ती पण तयारी करायचीय...
कुणाल - कसली तयारी? आपल्याकडं कुठं येतात गौरी? आपल्या गौरी तर ठाण्याला असतात काकाकडं...
रेणू - अरे हो रे... मला दिघेकाकूंकडं तयारीला जायचंय. त्यांनी मदतीला बोलावलंय.
कुणाल - आँ? सूर्य कुणीकडं उगवला आज? तुझ्यावर कायम वैतागलेल्या असतात त्या... त्यांना कशी काय तुझी आठवण झाली? आज सोसायटीत कुणी भेटलं नाही वाटतं दुसरं?
रेणू - अरे, असं काय करतोस? त्यांना माहितीय फक्त माझ्याकडं इथं गौरी नसतात. बाकी स्नेहल, प्राची, स्वाती, श्रद्धा सगळ्यांकडं त्यांच्या त्यांच्या गौरी असतातच. त्या त्यांचं घरचं सोडून कुठं येतील यांना मदत करायला? मी फक्त मोकळी सापडते...
कुणाल - अरे वा... हे भारी आहे. म्हणजे 'कामापुरती मामी' केली म्हण की तुझी...
रेणू - असू दे रे. तशा मनानं चांगल्या आहेत त्या... माझी पण सणाची हौस भागवते मी... 
कुणाल - मग आज काय पैठणी का?
रेणू - छे रे... कामं करायचीयत मला तिकडं जाऊन... पैठण्या कसल्या नेसतोस? मिरवायचं असेल तर ठीक...
कुणाल - चालेल. संध्याकाळी मी नेतो तुला 'हयात'मध्ये... पार्टी करू...
रेणू (वैतागून) - अहो राजे, 'हयात'मध्ये? पैठणी नेसून? आणि पार्टी? बरा आहेस ना!
कुणाल - अगं, पैठणी नेसून कुठं म्हटलं मी? आणि खरं तर काय बिघडलं? आपण सगळ्यांपेक्षा वेगळे दिसू...
रेणू - हो का! मग तूही ये तो तुमच्या घराण्याचा ऐतिहासिक कळकट कद नेसून आणि वर उघडाबंब... (खो खो हसते) चालेल का? (हसत राहते...)
कुणाल (वैतागून) - तिथं काय सत्यनारायणाची पूजा आहे का?

(तेवढ्यात बेल वाजते...)

कुणाल - कोण आलं आता? दिघेकाकू? ओह नो...
रेणू - थांब रे. बघते मी...

(दार उघडते. दिघेकाकूच असतात.)

दिघेकाकू - आहे का लक्ष्मीनारायणाचा जोडा घरात?
कुणाल - हो हो आहे ना... सत्यनारायण घालायच्या बेतात होता तुमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा... बरं झालं, वेळेत आलात. नाही तर गृहलक्ष्मीकडून उत्तरपूजा ठरली होती.
दिघेकाकू - काय बडबडतोयस रे! तू थांब जरा. रेणू, आवरलंस का बाई? चल, जरा मंडईत जाऊ येऊ.
कुणाल - काकू! आत्ता मंडईत? अहो, कसलं मरणाचं ट्रॅफिक असेल तिथं आत्ता... नको नको...
दिघेकाकू - ए, तुला नाहीये नेत. ही आणि मी पटकन जाऊन येऊ. हिच्या स्कूटरवर अश्शा जाऊ आणि अश्शा येऊ.
कुणाल - काकू, हे तुमच्या वेळचं पुणं राहिलेलं नाही. तुम्ही पूर्वी अश्शा काय, तश्शा काय, एका मिनिटात जाऊन येत असाल मंडईत. आता शनिवारवाडा ते मंडई हे अंतर कापायला किमान एक तास लागतो सकाळच्या वेळी...
दिघेकाकू - अरे बाबा, ते काही असो. मला ना, मंडईतलीच ताजी भाजी लागते. अरे, महालक्ष्म्यांचा नैवेद्य असतो आज. ते घोसाळं, पडवळ वगैरे मिळतं का इथं कुठं काही?
रेणू - काकू, नैवेद्य उद्या ना... गौरी जेवतात उद्या ना?
दिघेकाकू - अगं हो बाई. पण आमच्याकडं रोज असतो नैवेद्य. आज पण सगळं साग्रसंगीत असतं आमच्याकडं...
रेणू - हं... आमचे देशमुख सर मला काल सांगत होते कॉलेजात. त्यांच्याकडं मराठवाड्यात त्यांच्या गावी अजूनही सोवळ्यात स्वयंपाक करते त्यांची आई वीस माणसांचा... पुरणावरणाचा स्वयंपाक आणि त्या प्रसादाच्या सोळा भाज्या असं सगळं एकदम साग्रसंगीत... मला तर काटाच आला ते ऐकून... कसं काय करतात या बायका ना... खरंच!
दिघेकाकू - अगं, खरं तर असंच असतं महालक्ष्म्यांचं... पण आता आपल्याच्यानं काही होत नाही बाई... 
रेणू - काकू, अहो ठीक आहे. काळ बदलला तसं आता आपणही बदलायला हवं ना... सगळं कसं पूर्वीसारखं करणं शक्य आहे सांगा... शिवाय तुमचं वय बघा आता. दिवसभर ती पोरं सांभाळता सांभाळता पुरेवाट होते तुम्हाला... सत्तरी आली म्हटलं...
दिघेकाकू (ठसक्यात) - पण आजही बसल्या बैठकीला मी पण वीस माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक करीन म्हटलं. फक्त ती गॅसची शेगडी खाली काढून द्या मला.... मला ते तुम्हा पोरींसारखं उभ्यानं पोळ्या वगैरे या जन्मात नाही बाई जमणार...
कुणाल - अहो काकू, तुम्ही आत्ता हे करताय हेच खूप झालं. खरं सांगू का, आपण हे सगळं करतो ते कशासाठी? आपल्या मनाला समाधान लाभावं यासाठीच ना... 
दिघेकाकू - हो रे बाबा. आपल्या हातचं खाऊन सगळी माणसं अशी तृप्त झालेली बघणं यात बाईला किती आनंद असतो, ते नाही कळायचं तुम्हा पुरुषांना... तुम्हाला आमचे कष्ट दिसतात. पण समोरच्या माणसानं जेवताना 'काकू, एकदम झक्कास झालाय स्वयंपाक...' असं म्हटलं ना, की सगळे श्रम सत्कारणी लागतात बघ... (गोड हसतात...)
रेणू - काकू, ते सगळं खरं असलं, तरी आत्ताच्या बाईला नोकरी सांभाळून हे सगळं करणं नाही बरं का जमणार. आणि हो, काळानुसार हे सगळं बदलत जाणार यात काही वावगं आहे असं मला तरी वाटत नाही.
दिघेकाकू - अगं बाई, तुला मी काहीच म्हणत नाही. तुझी धावपळ दिसते की मला रोज. साराला अशी घाईत माझ्याकडं ठेवून जातेस आणि संध्याकाळी तरी रोज किती उशीर होतो तुला... रोज त्या ट्रॅफिक जॅमच्या नावाने शंख करतेस...
रेणू - तेच तर ना... अहो, आठवड्याचे सहा दिवस आम्हाला रोज आठ-नऊ तास काम असतं. आणि हल्ली कॉलेजांत अवांतर उपक्रम एवढे चालतात, की काही विचारू नका. आपण कशात मागं पडायला नको यासाठी सतत जागरूक राहावं लागतं. कशाला नाही म्हणता येत नाही. आपण कमिटीच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये जाऊ की काय, अशी भीती वाटत राहते. एकीकडं लेकीचा चेहरा समोर येत असतो आणि आम्ही समोर विद्यार्थ्यांना मातृप्रेमाचे धडे शिकवत असतो. काही विचारू नका...
कुणाल - खरंच गं. तुझी जाम कसरत होते रोज...
दिघेकाकू - असं नुसतं म्हणू नकोस. तिला मदत करत जा... तरच तू खरा पार्टनर तिचा....
रेणू (हसत) - नाही काकू. करतो बरं का तो... शनिवारचा नाश्ता तर त्याच्याकडंच असतो. एरवीही बरीच बारीकसारीक कामं करत असते स्वारी. पण कधी कधी 'काम नको, पण व्याप आवर' म्हणायची वेळ येते खरी. 
कुणाल - अगं, पाच दिवस आम्हालाही भयंकर वैताग आलेला असतो. टार्गेट्स, डेडलाइन, कमिटमेंट, डिलिव्हरी, पर्जेस, ऑडिट या शब्दांच्या भोवऱ्यात गरगरत असतो आम्ही सतत. त्यात 'वेगळं काही तरी' करून दाखवण्याचं प्रेशर असतं सतत. सकाळ-संध्याकाळ दोन तास ट्रॅफिकमध्ये घालवल्यावर मेंदू काय रिझल्ट देणार कप्पाळ? मला तर कधी कधी वाटतं, असा काही तरी मंत्र हवा, की तो उच्चारताच ऑफिसमधून गायब होऊन थेट आपल्या बेडरूममध्ये अवतीर्ण व्हावं आणि लग्गेच अश्शी ताणून द्यावी. (खरंच आळस देतो...) आ हा हा... काय असेल ते सुख!
रेणू - झालं. सकाळ झाली तरी तू स्वप्नंच पाहा. आम्हाला खरोखर कामं आहेत. निघायचंय...
कुणाल - हो. पंधरा मिनिटं थांब. मी 'समर्थ'मधून काही तरी घेऊन येतो. आणि हो, मी दुपारी नाहीय. 
दिघेकाकू - अरे, नाहीय म्हणजे काय? आमच्याकडं जेवायला आहात तुम्ही दोघं... मेहुण... विसरलास?
कुणाल - अहो नाही काकू. म्हणजे आहे लक्षात. पण मी येतो दोन वाजेपर्यंत. रेणू, तुला सांगायचं राहिलं... अगं, सईकडं जायचंय जरा.
रेणू - काय रे? काय अर्जंट? सणासुदीच्या दिवशी तेही?
कुणाल - अगं, तुला आठवतंय का, पंधरा दिवसांपूर्वी आम्ही सगळे भेटलो होतो बघ. श्वेतासाठी... 
रेणू - अरे हो. काय झालं रे पुढं तिचं? मी पण विसरलेच बघ. 
कुणाल - अगं काही नाही. तिचा निर्णय पक्का आहे. ती मुलगी दत्तक घेतेय. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्या विवेकच्या घरच्यांनाही हे पटलंय. तेव्हा ही लग्न करणारे त्याच्यासोबत आणि मग दोघे मिळून मुलगी दत्तक घेणार आहेत पुण्यातून... तेव्हा जरा सईकडं जाऊन मेलामेली करायचीय त्या संदर्भात... काही काँटॅक्ट्स द्यायचे आहेत.
दिघेकाकू - काय बाई एकेक. ऐकावं ते नवलच. अगं, तिला म्हणावं होईल की मूल तुलाच... हे दत्तक काय मधेच?
कुणाल - नाही काकू. तोच तर मुद्दा होता ना. मेडिकल प्रॉब्लेम आहे. तिला नाही होऊ शकणार मूल. पण तिनं मुलगी दत्तक घेऊन मागचं सगळं विसरायचं ठरवलंय. 
रेणू - हं, हे तू बोलला होतास मागे. पण मस्त ना! हे खऱ्या अर्थानं गौरीचं आगमन म्हणायला पाहिजे, श्वेताच्या घरी. 
कुणाल - अर्थात त्या प्रोसेसला वेळ लागेल. पण सहा महिन्यांत विवेक आणि ती इकडं येऊन सगळी कागदपत्रं पूर्ण करतील आणि मग एक छानशी, छोटीशी 'गौरी' त्यांच्या घरात कायमची राहायला येईल.
दिघेकाकू - बरंय बाई. तिला सुख मिळतंय ना... मग सगळं चांगलंच म्हणायचं... 
रेणू - हो काकू. आता काळाप्रमाणं सगळ्या संकल्पना बदलणारच. मुली आता स्वतंत्रपणे विचार करतात. त्यांना केवळ आपल्याकडं परंपरा आहे किंवा रूढी आहे म्हणून आंधळेपणानं काही करायला आवडत नाही. एक तर त्या चांगल्या शिकलेल्या असतात, जग फिरतात, अनेक समाजांमध्ये राहतात. मग त्यांची त्यांची अशी स्वतंत्र मतं तयार होतात. आणि त्या मतांचा आदर करायला आपल्याकडं सगळ्यांनी शिकलं पाहिजे, असं मला वाटतं हं...
दिघेकाकू - हो गं बाई. हल्ली तशीही कुणाला काही बोलायची सोय नाही. आपणच आपल्या मोठेपणाचा आब राखून असावं माणसानं. नाही तर फट म्हणता... काय म्हणतात ना त्यातली गत!
कुणाल - काकू, मला काय वाटतं माहितीय का, जुनं ते सगळं चांगलं आणि नवं ते सगळं वाईट असं सरसकट म्हणणं जेवढं चूक आहे ना, तेवढंच जुनं ते सगळं वाईट आणि नवं ते सगळं चांगलं असं म्हणणंही तितकंच चूक आहे. अहो, दोन्ही पिढ्यांमध्ये काही चांगलं आणि काही वाईट असणारच की... दोन्हींतलं फक्त चांगलं तेवढं आपण घ्यावं असं मला वाटतं, बरं का...
रेणू - अरे, पण चांगलं कशाला म्हणायचं आणि वाईट कशाला म्हणायचं यावरच तर मतभेद असतात ना... प्रत्येक पिढीगणिक आणि व्यक्तीगणिक या 'चांगलं' अन् 'वाईट'च्या व्याख्या बदलतात. मग काय करायचं?
कुणाल - अरे बापरे! हो की गं... 
दिघेकाकू - हे बघा, तुमच्यात काय मतभेद असतील तर तुम्ही त्यावर नंतर भांडा... आत्ता दुपारी माझ्याकडं तुम्ही जेवायला यायचं आहे यावर तुमचं एकमत आहे की नाही, बोला!
रेणू अन् कुणाल (दोघेही एका स्वरात) - म्हणजे काय! अगदी एकमत आहे आमचं... काकूंच्या हातची पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार... कोण सोडणार हे परमसुख! अहाहा...
दिघेकाकू - वा वा वा... आता शोभतोय खरा लक्ष्मीनारायणाचा जोडा...

(सगळे हसतात...)

---


४. २२ सप्टेंबरचा भाग
------------------------------------

(पार्श्वभूमीवर 'गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया' ऐकू येतंय...)

कुणाल (झोपेत बडबडतोय) - सारा, आता बास हं! खूप फिरलो आपण... अगं, हा तोच देखावा आहे होलिका राक्षसिणीच्या वधाचा... किती वेळा तोच देखावा? चला आता घरी. सारा, सारा, पुढं पळू नकोस... सारा, ऐक जरा...
रेणू (कुणालला जागं करतेय) - कुणाल, कुणाल... उठ अरे, उठ... तू झोपेत आणि काय बडबडतोयस हे? आपण घरी आहोत. लक्ष्मी रोडवर नाही... कळतंय का?
कुणाल (जागा होत) - कोण? होलिका? बाप रे...
रेणू (लटक्या रागानं) - ए, होलिका कुठं दिसली रे? तुझी बायको उभी आहे समोर... उठ आता, वेडेपणा बास झाला... 
कुणाल (उठतो, कळवळतो) - होलिका नाहीय ना! आई आई गं... पाय कसले दुखताहेत... ती सारा कुठंय? काय हिंडवलं गं तिनं मला काल... कहर...
रेणू - ए, मी पण होते बरं का सोबत... आमचेही पाय दुखतात म्हटलं. आणि सारा तर उठून, आवरून खाली पूर्वाकडं आरतीला गेलीसुद्धा... तूच एकटा झोपलायस अजून...
कुणाल - हं... काल देखाव्यांचा शेवटचा दिवस म्हणून अगदी रजा वगैरे घेऊन गणपती पाहत हिंडलो, ते नडतंय आता...
रेणू - मिस्टर कुणाल, तुम्हाला हे झेपत नाही बरं का देखावे प्रकरण! आता आपण अगदी पंचविशीचे तरुण असल्याचा आपण कितीही 'देखावा' केलात ना, तरी मागचं पोकळ सत्य दिसतंय म्हटलं सगळ्यांना...
कुणाल - ए रेणू, उगाच काय! मी अजूनही दहाही दिवस गणपतीत रात्रभर हिंडू शकतो बरं का... चॅलेंज नाही द्यायचं आपल्याला... 
रेणू (हसते) - तुझं कसं आहे ना कुणाल, तुझं मन अजूनही त्या पंचविशीतल्या तरुण कुणालसारखंच आहे. त्यामुळं तुला सगळं करायचा उत्साह तर खूप असतो. पण प्रत्यक्ष करायला गेलास ना, की मग तुझं हे चाळिशीकडं निघालेलं शरीर एकदम संप पुकारतं. आणि मग सोसत नाही म्हणून तूच कुरकुर करीत बसतोस. आता आपलं वय झालं हे स्वीकारावं बरं का माणसानं... (परत खळाळून हसते...)
कुणाल (वैतागलेल्या स्वरात) - नाही म्हणजे नाही! मी मुळीच म्हातारा झालेलो नाही. काल सारानं जरा जास्तच पळवलं म्हणून पाय दुखले थोडे; पण बाकी मी एकदम टकाटक आहे. आता विसर्जन मिरवणुकीला जाणारच आहे. आमच्या कंपनीतल्या पोरांचं ढोलपथक आहे यंदा लक्ष्मी रोडवर. त्यामुळं त्यांना चीअर करायला जायचंय... 
रेणू - धन्य आहे बाबा तुझी... 
कुणाल - अहो मॅडम, पुण्यातल्या पोराला गणपतीवरून काही चॅलेंज करायचं नाही कळलं का!
रेणू - नाही करत महाराज. पण आता उठा आणि आवरून घ्या. 
कुणाल - ए रेणू, अगं आज तरी झोपू दे ना... आता आज आणि उद्या सुट्टी आहे तर प्लीज, जरा मला माझ्या मनासारखं वागू दे, जगू दे. मी भरपूर झोप काढणार, दुपारी नेटवर सिनेमा पाहणार, संध्याकाळी अभ्याकडं जाणार... रात्री आम्ही कदाचित दोघं-तिघं जेवायलाच बाहेर जाऊ... उद्या पण असंच... तेव्हा मी तुझं काहीही ऐकणार नाही. नाही म्हणजे नाही!
रेणू (कडक आवाजात) - अहाहा... काय मस्त प्लॅन तयार केलायस रे! आणि या सगळ्यांत मी आणि सारा कुठे आहोत? आम्ही काय करायचंय? आम्ही आहोत म्हटलं घरात आणि आम्हा दोघींनाही सुट्टी आहे.
कुणाल (मवाळ स्वरात) - अगं, नाही नाही, तसं नाही. तुम्ही आहातच गं... धरलंय, तुम्हालाही प्लॅनमध्ये धरलंय. तू बोल, काय करूया आज आणि उद्या... सांग...
रेणू (चिडून) - मला तर आज सुट्टी आहे. साराला तर परवा, सोमवारी पण सुट्टी आहे. बघू आम्ही ठरवू आमचं आमचं काय करायचं ते...
कुणाल - परवा सुट्टी? अरे हो, आपल्याकडं विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीही अघोषित सुट्टीच असते नाही का? या मुलांचं नुकसानच होतं पण त्यामुळं, असं नाही वाटत तुला रेणू?
रेणू - विषय बदलू नकोस. आणि मला वाटून काय होणार आहे? मी एकटी बदलू शकणार आहे का हे सगळं? आपल्याकडं काही गोष्टी मी तर आता सोडूनच दिल्या आहेत. 
कुणाल - हे बघ. वैतागू नकोस. आज आपण दुपारी मस्त बाहेरच जेवायला जाऊ या. अभ्या, सईला पण बोलवू या का?
रेणू (स्वर बदलून, गुपित सांगितल्यासारखं) - सईला मी ऑलरेडी बोलावलंय. ती येईल कधीही...
कुणाल - आँ? ती माझी मैत्रीण आहे की तुझी? मला एका शब्दानंही बोलली नाही काही भवानी, की येतेय ते?
रेणू (हसत) - महाराज, तुम्ही झोपेत होता, तेव्हा सकाळीच आमचं ठरलंय. मीच मेसेज केला होता तिला...
कुणाल - पण विषय काय आहे ? अजेंडा काय आहे? काही तरी सांगा राव मला...
रेणू - हो, हो. सगळं सांगते. आधी तू आवर. सकाळपासून 'आवर आवर' म्हणतेय ते त्यासाठीच. सई कधीही येईल आता आपल्याकडं...
कुणाल - काय चाललेलं असतं ना तुम्हा बायकांचं, खरंच काही कळत नाही बुवा.
रेणू (हसते) - काही चाललेलं नाही रे. आणि तुला सांगितल्याशिवाय आम्ही काही करणार नाही आहोत, कळलं ना?
कुणाल - बरं... उठतो बापडा. आवरतो... (एकदम आठवून) अरे हो, आज नाश्त्याचं काय? आधी जाऊन घेऊन येऊ का?
रेणू (हसत) - काही नकोय कुठं जायला. आज तुला नाश्त्याच्या ड्यूटीतून सुट्टी... मी सकाळी केलेयत दडपे पोहे... सई आली की कॉफी करते...
कुणाल - आणि माझा पहिला चहा? बेड टी हवाय आज मला...
रेणू - बेड टी कसला रे? उठ आधी... तोंड धुऊन घे, आवर. मग देते तुझा चहा...
कुणाल - देवा, ही एक इच्छाही नाही का पूर्ण होणार माझी?

(तेवढ्यात बेल वाजते...) 

रेणू - आली वाटतं सई. तू जा, पळ. आवर आधी...

(दार उघडते... सई येते.) 

सई - हाय रेणू, कशी आहेस? उशीर नाही ना गं झाला मला? कुणाल उठलेला दिसतोय म्हणून विचारलं. (हसत) अगदी दाराच्या बाहेरपर्यंत आवाज येत होता त्याचा... का कोकलतोय?
रेणू - हो गं... काल आम्ही किती उशिरापर्यंत फिरत होतो माहितीय का? दमून झोपलो उशिरा सगळे. पण मला सवयीनं येते बाई जाग लवकर. सारा पण उठून, आवरून तिच्या मैत्रिणीकडं गेलीय खाली खेळायला. कुणाल महाराजांची मात्र हाडं खिळखिळी झालीयत. (दोघी हसतात...)
कुणाल (आतून ब्रश करीत येतो) (तोंडात ब्रश असताना जसा आवाज येईल त्या आवाजात) - ऐकतोय मी बरं का सगळं... हाडं खिळखिळी काय? माझ्या लेकीला संपूर्ण रात्र हातावर घेऊन फिरत होतो मी...
रेणू (वैतागून) - कुणाल, ए, अरे काय हे? आवरून ये बाबा. मग बोलू. फवारा मारशील इथंच...
सई (हसत) - कुणाल, अरे काय चाललंय? थांबलेय मी. कुठं जात नाहीय. ये तू आवरून, जा...
कुणाल - तू तर थांबच. तुला बघतोच!
रेणू - अगं, काय सांगू गंमत! सारा एवढ्या उत्साहानं प्रत्येक देखावा पाहत होती ना... तिनं एवढं काही फिरवलं आम्हाला की बस्स. एकेका देखाव्यापुढं अर्धा अर्धा तास आम्ही उभे. आणि गर्दी काय गं! जीव नको नको होतो. मला ना, हल्ली हे प्रकरण झेपेनासंच झालंय. पण कुणालची हौस अद्याप दांडगी आहे. त्याला वाटतं आपण अजून कॉलेजकुमारच आहोत.
सई - हा हा हा... कहरच झाला म्हण की... तुम्हाला खरंच फार हौस दिसतेय. आम्ही ते सगळं केव्हा बघायचं सोडलं. आठवतच नाही कधी गेलो होतो शेवटचे ते! आमच्या साहेबांना ती गर्दी वगैरे अजिबात आवडत नाही. 
रेणू - अगं, मला पण वैताग येतो. आम्हीही काही रोज जात नाही. पण काल सारासाठी गेलो एकदाचे हिय्या करून... पण तू म्हणतेस ते खरंय. दर वर्षी ती वाढती गर्दी आणि ते ध्वनिप्रदूषण यामुळं जीव नकोसा होतो बघ.
कुणाल - मी आलोय. एक मिनिट. परत सांग... काय म्हणालीस? तुला गर्दी आणि प्रदूषणाचा त्रास होतो, रेणू? अगं, मग या दोन गोष्टी तर वर्षभर आपण झेलतच असतो की आपल्या शहरात. तुम्ही म्हणजे ना! ह्यॅ!! उत्सवाची गंमत तुम्हाला नाही कळणार...
सई (समजावणीच्या स्वरात) - ए कुणाल. तू मला तरी हे सांगू नकोस हं. मी आत्ताआत्तापर्यंत आमच्या मंडळाच्या ढोलपथकात होते आणि दीड-दोन महिने ते ढोल वाजवून... (पोझ घेत) मेरे ये दोनों हाथ लोहे के हाथ बन गए है ठाकूर... तेव्हा उत्सवाची गंमत आम्हाला नाही सांगायची, काय!
कुणाल - खरंच सई, मला तर आपले कॉलेजचे दिवस आठवतात. काय धिंगाणा घालायचो आपण...
सई - आठवतंय ना... मग कशाला असं बोलतोस रे!
रेणू - ए, काय धमाल करायचा तुम्ही सांग की सई...
सई - अगं, दहाही दिवस आम्ही आमच्या मंडळात पडीक असायचो. देखावा करण्यासाठी अहोरात्र खपायचो. वैज्ञानिक देखावा ही आमच्या मंडळाची खासियत होती बरं का... खूप गर्दी लोटायची... विशेषतः घरांतले गौरी-गणपती गेले, की बाहेर गणपती पाहायला गर्दी व्हायची. अजूनही तसंच आहे. पण तेव्हाची गर्दी पुष्कळ नियंत्रणात होती, असं वाटतंय आता. आता सगळंच हातातून सुटलं आहे असं वातावरण आहे.
कुणाल - तुला आठवतं का सई, आपली सगळी गँग कॉलेज दहाही दिवस बंक करायचो. तसंही लेक्चर वगैरे फार काही व्हायचेच नाहीत. मग आठ-दिवस नुसता धिंगाणा...रात्र रात्र आम्ही बाहेर असायचो. या मुली मैत्रिणींकडं मुक्कामाला जाते, असं सांगून होस्टेलवरून परवानगी काढून यायच्या. तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, सेल्फ्या असलं काही नव्हतं. पण तरी मजा यायची. आम्ही बिनदिक्कत एकमेकांच्या घरी राहायला जायचो. कुठेही खायचो, कुठेही फिरायचो. मग कुणाच्या तरी घरी येऊन टेकायचो. हॉलमध्ये गप्पा मारत मारत तिथंच आडवे व्हायचो. आवाजावर तेव्हा रात्रीची बंधनं नव्हती. गल्लीतल्या देखाव्यांचे लाउडस्पीकर पहाटे पहाटेपर्यंत ऐकू यायचे. तरीही एवढे दमलेलो असायचो, की शांत झोप लागायची. पुन्हा सकाळी लवकर उठून आम्ही आपापल्या घरी पसार... (स्वर बदलून) तेव्हा ना, असं मैत्रिणीला सकाळच्या वेळी आपल्या एम-एटीवरून तिच्या घरी सोडायला जाताना फार भारी वाटायचं. असं मैत्रिणीला सोडायला जायचं, ही आमच्या रोमँटिकपणाची हद्द होती.
सई - ओहो, ओहो... तू त्या गीताला सोडायला जायचास ना रे?
रेणू - कोण गं गीता? हे 'गीतारहस्य' मला कधी सांगितलेलं नाही कुणालनं?
कुणाल - ए सई, कोण गीता? मला काहीही आठवत नाहीय. आता 'गीते'वरून 'महाभारत' नकोय हां आमच्या घरात...

(सगळे हसतात...)

सई (हसत) - अरे, अशीच खेचत होते रे तुझी. रेणू, नाही गं कुणी गीता वगैरे नव्हती. पण हो, हा मुलींना सोडायला जायला सगळ्यांत पुढं असायचा. कारण याच्याचकडं ती एम-८० होती ना फक्त. पण काय रुबाब असायचा.... कहर!
कुणाल - हं... पण एकूण मजा होती. ए, पण असं पंधरा-वीस वर्षांपूर्वीचं बोलायला लागलं ना, की मला एकदम वय झाल्यासारखं वाटतं. तेव्हा प्लीज, आता नॉस्टॅल्जिया बंद... आजचं काय ते बोला... बोला, काय प्लॅन आहे आज? जेवायला जाऊ या बाहेर?
सई - अरे हो, हो... थांब जरा. रेणू, तू याला काही बोललेली नाहीयेस?
रेणू (हसते) - अगं, परत हे महाराज रुसले असते. तुझी आयडिया आहे ना, तूच सांग ना.... 
कुणाल - अरे, कसली आयडिया? काय प्लॅन आहे?
सई - सांगते, सांगते. अरे, मी रेणूला म्हणत होते, की आज आपण देवळेकर काकांना भेटून काही तरी गिफ्ट देऊ या. त्यांच्या संस्थेत थोडा वेळ थांबू या आणि अजून काही करता येतंय का बघू या. 
कुणाल - कोण गं देवळेकर? कुठली संस्था? लक्षात येत नाहीय...
सई - अरे, असं काय करतोस? मागं श्वेता आली होती, तेव्हा 'खादाडेश्वर'ला आपण भेटलो तेव्हा विषय झाला होता. तुझं लक्ष नव्हतं बहुतेक. 
कुणाल - अरे हां, आलं लक्षात. मग सम्याशी झालं का काही बोलणं परत? 
सई - हो. तेच सांगतेय. सम्यानं दिल्लीला वेल्फेअर मिनिस्ट्रीमध्ये बोलून संस्थेसाठी काही मदत मिळवण्याचं कन्फर्म केलंय. तीच गुड न्यूज द्यायला जायचंय काकांना...
रेणू - सॉरी सई, तू बोललीस काल मला; पण हे देवळेकर काका कोण, ते नाही लक्षात आलं माझ्या...
सई - हो अगं, सांगते. हे देवळेकर काका पूर्वी आमच्या सोसायटीत राहायचे. बँकेतून रिटायर्ड झालेले. सोसायटीची खूप कामं स्वतःहून करायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा मध्यंतरी अपघातात गेला. काही महिन्यांपूर्वी काकूही गेल्या. काकांना जवळचं असं कुणीच नाही. मग त्यांनी त्यांचा राहता फ्लॅट विकला आणि ते स्वतःहून या सावली संस्थेत राहायला गेले. त्यांचं म्हणणं, की आपले हात-पाय धड आहेत तोवरच हे महत्त्वाचे निर्णय घेऊन टाकावेत. कुणावरही अवलंबून राहायला नको...
रेणू - काय सांगतेस? ही स्टोरी काहीच माहिती नव्हती गं. 
सई - हं. तेव्हापासून महिन्यातून एकदा तरी मी 'सावली'मध्ये जाऊन काकांना भेटतेच. त्यांना काय हवं-नको ते बघते. ते मला मुलगीच मानतात, म्हण ना... या वेळी अगं, गणपती आणि इतर काही कामांमुळे जायचंच राहिलं होतं. म्हणून तुला म्हटलं, की आज जाऊन येऊ. तुलाही यायला आवडेल म्हणाली होतीस ना तू...
कुणाल (कौतुकानं) - सई, तू ग्रेट आहेस! हे आधी का नाही बोललीस?
सई (हसत) - अरे, तुझ्याकडं आलं, की तुझंच सगळं पुराण ऐकावं लागतं आम्हाला. मग आमच्या गोष्टी कोण ऐकून घेणार?
रेणू - हो, ते मात्र आहे. पण आज छान सरप्राइझ दिलंस....
सई - सरप्राइझ देणारच आहे मी काकांना... हे बघ हा रेडिओ. मी आज काकांना गिफ्ट द्यायला आणलाय. मी मागच्या वेळी पाहिलं तिथं, बाकी सगळं आहे पण एक रेडिओ नव्हता बघ.
रेणू - काय सांगतेस? आश्चर्य आहे. सहसा अशा संस्थांमध्ये असतो की रेडिओ...
सई - आता मी हा काकांना देणारच आहे. समजा, त्यांच्याकडं असला, तर तिथला अजून कुणी तरी त्यांचा सहकारी वापरील ना तो... एवढं काय!
कुणाल - सई, तू खरंच कमाल आहेस. आय अॅम सो प्राउड ऑफ यू! आज माझ्याकडून पार्टी तुला आणि सगळ्यांनाच. ते काका येऊ शकतील का आपल्याबरोबर?
सई - अरे विचारायला हवं. पण येऊ शकतील असं वाटतंय. त्यांना पण खूप आनंद होईल. अरे, असा मस्त माणूस आहे ना... तू तर त्यांना भेटलास तर प्रेमातच पडशील त्यांच्या. जगणं कसं मस्त मजेचं असावं हे काकांकडं पाहून कळतं बघ. कायम हसतमुख असतात. आता काय कमी दुःखं पाहिली का त्यांनी? पोटच्या मुलाचा मृत्यू पाहिला त्यांनी. नंतर बायको गेली. पण चेहऱ्यावर तुला चुकूनही कधी कडवटपणा दिसणार नाही बघ. नक्की घेऊन जाऊ त्यांनाही जेवायला...
रेणू - वा वा... कुणाल, किती छान वाटतंय आत्ता! या वेळी गणपतीत काही तरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. पण देव काही तरी चांगलं करवूनच घेतो आपल्याकडून... नाही का?
कुणाल - खरंय. आपण आपलं काम चांगल्या रीतीनं फक्त करत राहायचं. बाकी सगळं तो पाहून घेतो. बोला, गणपतीबाप्पा...
सई व रेणू - मोरया...

(टाळ्या वाजवतात व मागं सुखकर्ता-दुःखहर्ता आरतीचे स्वर ऐकू येतात....)

----

५. २९ सप्टेंबरचा भाग
-----------------------------------

(पार्श्वभूमीवर 'सुनियो जी अरज म्हारी'च्या आधीची तान ऐकू येते...)

रेणू - कुणाल, सुनियो जी अरज म्हारी... उठ रे बाबा. खूप वेळ झाला आता... आणखी किती वेळ लोळत पडणारेस? आज देशमुख सर येणार आहेत घरी... कधीही येतील. तू असाच पारोसा उठून भेटणार आहेस का त्यांना?
कुणाल - रेणू, अगं काय गं... झोपू दे ना... किती छान वाटतं मला शनिवार उजाडला की. दोन दिवस कशी मस्त सुट्टी... आणि आता आपल्या पुण्यात हवा पण किती झकास आहे... थंडी वाजतेय पहाटे चक्क... असं रजईत गुरफटून घेऊन लोळण्यात काय सुख आहे तुला नाही कळायचं...
रेणू - असू दे. मला नकोय ते सुख... आणि ऑफिशियली थंडी पडायला अजून वेळ आहे. अजून नवरात्र जायचंय. तेव्हा हमखास पाऊस पडतोच आपल्याकडं... आणि काय रे? मागच्या शनिवारी आपल्याला सईबरोबर बाहेर जायचं होतं म्हणून मीच ब्रेकफास्ट केला. आज तसं काही नाहीय. तू करणार आहेस का काही? की परत मलाच उभं राहावं लागणार आहे किचनमध्ये? पण माझं आवरून झालंय आणि मला सरांसोबत जायचंय बाहेर... तेव्हा पुन्हा किचनमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करायची माझी काही तयारी नाहीय बाबा. तर तू उठच आता....
कुणाल - अगं हो हो हो... किती बोलतीयेस रेणू... मान्य आहे, तुझे सर येणार आहेत ते! मी पोहे करू शकतो पटकन. करू का बोल... नाही तर 'समर्थ' आहेच ब्रेकफास्ट सिद्धीस न्यायला! सरळ उडीदवडे आणि सांबार आणू का पार्सल? बाय द वे, कशाला येताहेत सर?
रेणू - सांगते सगळं... आणि तू नको आता कुठं जात बसू. फक्त पोहे टाक. आणि आधी आवरून घे ना रे. ब्रश कर फटाफट... मी सरांना नऊला यायला सांगितलं होतं रे कुणाल. ते वेळेचे पक्के आहेत. कधीही येतील बघ आता. जा, जा, पळ...
कुणाल - हो गं... ते कशासाठी येताहेत ते सांगितलं नाहीस तू...
रेणू - अरे, आमच्या कॉलेजकडं युनिव्हर्सिटीकडून एका प्रकल्पाचा प्रस्ताव आलाय. मराठीतल्या प्रादेशिक बोलीभाषांचा अभ्यास करण्यासाठी एक फेलोशिप आहे. तर त्यासाठी आमच्याकडचे काही अर्ज पाठवायचे आहेत. 
कुणाल - अरे वा... इंटरेस्टिंग... तू कर की रेणू.
रेणू - अरे हो. सर माझ्याच नावाबाबत आग्रही आहेत. मला आवडेलच रे. पण काय काय करू? गाणं पण राहून गेलंय... आता हे नवं काम घेतलं आणि पूर्ण करता नाही ना आलं तर जाम चिडचिड होईल माझी...
कुणाल - अगं, तू कशाला काळजी करतेस? हम हैं ना... माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. तू दे अर्ज...
रेणू - एवढं सोपं नाहीय रे ते. फिरावं लागणार आहे महाराष्ट्रात सगळीकडं... आदिवासी, दुर्गम भागांमध्ये पण जावं लागेल. वर्षभर काम करायचं आहे. खूप गोष्टी आहेत,
कुणाल - ए रेणू, मला पण ने ना तुझ्यासोबत. आपण फिरू मस्तपैकी. देशमुख सरांच्या गावी पण जाऊ. देशमुख सरांच्या आईच्या हातचे धपाटे खाल्ले नाहीत बऱ्याच दिवसांत... जायला हवं एकदा त्यांच्या गावी...
रेणू - अरे, विषय काय चाललाय? तू काय बोलतोयस? आपण सरांकडं नाही चाललोय... ते आपल्याकडं येताहेत. आणि आता त्यांची आई बहुतेक इथंच आलीय पुण्यात त्यांच्याकडं. म्हणजे मागं ते असं बोलताना ऐकलं होतं...
कुणाल - अगं तेच ना. आपण त्यांच्याकडं जायला हवं होतं. म्हणजे काकूंच्या हातचे गरमागरम धपाटे आणि तूप खाल्लं असतं मी. मला तो प्रकार भयंकर आवडलाय. 
रेणू - धपाटे मी तुला घालते आता. कधी न मिळाल्यासारखं करतोस... कमाल आहे हं तुझी...
कुणाल - हे बघ रेणू... आपल्याकडं कधी केलेयत तू तसले धपाटे? तुला येत नाही तसं. ती त्यांच्या मराठवाड्यातली स्पेशालिटी आहे.
रेणू - अरे हो. पण याचा अर्थ मला येत नाही असं नाही. मी काकूंना रेसिपी विचारून घेतलीय धपाट्यांची... मी देईन तुला करून कधी तरी. पण आत्ता आवर...
कुणाल (हसतो) - हो हो. जातो. तुझ्या हातचा धपाटा खाण्यापेक्षा ब्रश केलेला बरा... 

(तेवढ्यात बेल वाजते.)

रेणू - सर आलेच वाटतं. तू आवरून ये पटकन. मी दार उघडते.

(रेणू दार उघडते. देशमुख सर येतात.)

देशमुख सर - सुप्रभात रेणू... अगं काये? आवरलं नाही का काय अजून? निघायचं ना बाई आपल्याला? त्या फेलोशिपची मीटिंग दहाला सुरू आहे बरं शार्प...
रेणू - हो सर. मी आवरून अगदी तयार आहे. ब्रेकफास्ट करू या आणि निघू या... कुणाल करणार आहे पोहे.
देशमुख सर - वा वा... कुठं आहेत साहेब? आवरतेत का अजून? आवरूं द्या, आवरूं द्या... मी तवर इथं बसून जरा पेपर वाचतो.
रेणू - बसा सर निवांत. येईलच तो इतक्यात.... काकू काय म्हणताहेत? कुणालनं आत्ताच त्यांच्या हातच्या धपाट्यांची आठवण काढली होती.
देशमुख सर (हसतात) - वा... वा... म्हातारी झ्याक आहे की... तिचा पांडुरंग आणि तिची पोथी, तिचा तुकोबा आणि त्याची गाथा... चाललेलं असतंय बघ एकदम भारी... 
रेणू - आता इकडंच आल्या ना त्या?
देशमुख सर - न्हाई न्हाई. कदी इकडं असती, तर कधी गावाकडं, माझ्या भावाकडं असती. तिला प्रवास झेपत नाही आता फार... आता आलीय तर दिवाळीपत्तूर हिकडंच राहील आता... तुम्ही दोघं या की परत... धपाटे करून घालील तुम्हाला ब्येस... डोळे जरा अधू झाल्यात तिचं... पण घोर नाही. यावा बिनधास्त...
रेणू (हसते) - अहो, तसं नाही. त्यांची तब्येत होऊ द्या व्यवस्थित. मग येऊ आम्ही...
देशमुख सर - म्हातारीला कष्टाचं काही नाही बघ. तिचं सगळं आयुष्य तसं कष्टातच गेलं. माझे वडील शाळा मास्तर होते, तुला तर माहितीच आहे. सारख्या बदल्या व्हायच्या त्यांच्या. माझे आजोबासुद्धा शिक्षक होते बरं का.... निजामी होती तेव्हा... लांब तिकडं देगलूरला... तवापासून फिरती बघ आमच्या फॅमिलीला सारखी... आईनं कधी कुरकुर केली नाही. घरात वीस-पंचवीस माणसांचा बारदाना होता. पहाटे चारपासून चुलीपाशी असायची. पंचवीस माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक एकटी रेटायची...
रेणू - हो, मी कुणालला सांगितलं होतं मध्यंतरी. असाच विषय निघाला होता स्वयंपाकाचा तेव्हा...
देशमुख सर - पूर्वीच्या या बायांनी फार कष्ट काढले बघ रेणू. पण एक होतं, त्यांनी कधी तक्रार नाही केली. आनंदानं करत राहिल्या. घरातल्या माणसांसाठी राबत राहिल्या. त्या मानानं घरातल्या बाकीच्यांनी त्यांची जेवढी कदर करायला पाहिजे होती तेवढी केली नाही बघ.
रेणू - एक्झॅक्टली सर. मला तेच म्हणायचं होतं. या बायका राबल्या, याचं कारण त्यांना दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही तुम्ही. चूक होतं ते...
देशमुख सर (हसतात) - ए बाई, आता तू माझी शाळा घेऊ नको हां...

(कुणाल येतो.)

कुणाल - वा सर... कधी आलात? आणि कसली शाळा चाललीय?
देशमुख सर - ये बाबा कुणाल. तू आलास ते बरं झालं. नाही तर ही रेणू देत होती मला लेक्चर बायकांच्या बाबतीत आम्ही पुरुषांनी कसा अन्याय केलाय त्यावर...
रेणू - खरंच आहे ते...
कुणाल - ए बाई, राहू दे ते आता. तुम्हाला घाई आहे ना... मी पटकन पोहे टाकतो.
देशमुख सर - पाहा, काळ कुठून कुठं आलाय ते. चुलीपुढची बाई गेली न्हवं का... आणि आता ह्यो गडीमाणूस करणार आपल्यासाठी ब्रेकफास्ट...
रेणू - असू दे की. करू दे. एरवी पाच दिवस मीच राबत असते बरं का सर.... चूल, म्हणजे आता हा गॅस..... हा काही सुटलेला नाही बरं का आम्हाला अजून... उलट आमचे कष्ट दुप्पट झालेयत.
कुणाल - सर, लवकर विषय बदला. नाही तर इथं कधीही धरणीकंप होईल.
रेणू (हसते) - हो, आणि तुला असंच वाटेल, की ही धरणी आता दुभंगून मला पोटात घेईल तर बरं...
देशमुख सर - अगं रेणू, भूकंपावरून आठवलं. हे बघ पेपरला आज लेख आलाय. आमच्या मराठवाड्यात किल्लारीला भूकंप झाला होता ना, त्याला या उद्याच्या रविवारी, म्हणजे ३० सप्टेंबरला २५ वर्षं पूर्ण होतायत.
कुणाल - बाप रे सर... २५ वर्षं झाली? काळ काय भराभर जातो नाही? मला चांगलाच आठवतोय तो भूकंप... १९९३. गणपती विसर्जनाची रात्र होती. मी पुण्यातच होतो. मिरवणूक बघून मी पहाटे अभ्याच्या रूमवर झोपायला गेलो होतो. तर अचानक भांडी वाजून पडायला लागली. काही कळेचना. मग त्या वाड्यातले शेजारचे काका धावत आले बाहेर. ओरडले, की अरे, भूकंप होतोय. सगळे बाहेर या. दोन मिनिटांत आम्ही सगळे वाड्यातले लोक चौकात जमा झालो होतो. मी माझ्या आयुष्यात अनुभवलेला हा एकमेव मोठा भूकंप...
रेणू - देव करो आणि पुन्हा अनुभवायला न मिळो रे बाबा. मी कुठं होते तेव्हा? मला का नाहीय आठवत?
कुणाल - तुला सांगितलेला उपाय तू केलास नाहीस रेणू. बदाम खा बदाम... रोज सकाळी येणारे.... (हसतो...) 
देशमुख सर - अरे, तुम्हाला इथं पुण्यात तरी तसा किरकोळच जाणवला म्हणायचा. मी तर तेव्हा लातूरला राहायचो. शिकायला होतो मी तिथं कॉलेजात. मी ती रात्र कधीच विसरणार नाही. शक्यच नाही तर! इमारत नुसती गदागदा हलत होती आमची.
रेणू अन् कुणाल (एकदम) - बाप रे... भयंकरच...
देशमुख सर - आता काय सांगू? कसा बाहेर पडलो आणि पुढं कसं निभावलं ते माझं मला माहिती. तिथल्या मैदानात सगळे जमले होते. अनेक घरं पडली होती. मग कळलं, की किल्लारीला मेन सेंटर होतं भूकंपाचं... ते गाव तर पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं... आम्ही त्याच संध्याकाळी कॉलेजचे सगळे मित्र तिकडं गेलो मदतीला... भयंकर परिस्थिती होती हो सगळी... आता आठवलं तरी काटा येतोय बघा अंगावर...
कुणाल - खरंय सर. ही नैसर्गिक आपत्ती फारच मोठी होती. खूप नुकसान झालं आपलं...
देशमुख सर - एक तर काय... आपली खेड्यातली घरं तुम्हाला माहिती... सगळी मातीची.... एकमजली किंवा जास्तीत जास्त दुमजली. आणि भूकंप पहाटं झाला ना... लोकांना पळायला संधीच मिळाली नाही हो... आम्ही नंतर पाहिलं ना तिथं... अनेक बॉड्या बाहेर काढल्या. झोपलेला माणूस कसा दिसतो तशाच दिसत होत्या. एकदम शांत, निरागस भाव... लहान लहान लेकरं तर....
रेणू - नको सर, प्लीज... नको. त्रास होतो हो...
देशमुख - होय. त्रास तर होतोच. आम्ही तर प्रत्यक्ष पाहिलं सगळं. पुढले काही दिवस अन्नाचा घास उतरला नाही बघ पोटात. नुस्ते पाणी आणि चहावर राहिलो. संध्याकाळी कोणी कोणी राइसचं पार्सल आणून द्यायचं. कधी दोन घास खाल्ले तर खाल्ले. असं सगळं झालं होतं.
कुणाल - आपल्याकडं नैसर्गिक आपत्ती खूप येतात. पण नंतर परत तसं होऊ नये म्हणून आपण कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात फार कमी पडतो बरं का सर. आपल्याकडं माणसाच्या आयुष्याला सगळ्यांत कमी किंमत! कधी बदलायचं हे सगळं?
रेणू - कुणाल, तू म्हणतोस ते बरोबर आहे. एकदा एका प्रकारानं हानी झाल्यावर पुन्हा तशाच प्रकारातून कमीत कमी जीवितहानी व्हावी, असे प्रयत्न आपण करू शकतो. पण आपल्याकडं नेमकं तेच होताना दिसत नाही.
देशमुख सर - आता पुनर्वसन हा फार मोठा विषय आहे. किल्लारीचं पुनर्वसन झालं. पण गावाचं गावपण गेलं बघा. अनेक गावांचं हे झालं. भूकंपामुळं एक पिढीच संपली. अनेक जण कायमस्वरूपी स्थलांतरित झाले. अनेकांचं गाव सुटलं... ही वेदना फार जीवघेणी असते बरं का...
रेणू - हो सर. कल्पना आहे. आपली मुळं उपटून दुसरीकडं नेऊन रुजवायची हे सोपं काम नाही.
देशमुख सर - खरंय रेणू. विस्थापितांचे प्रश्न, स्थलांतरितांचं दुःख आपण नीट कधी समजूनच घेतलं नाही, असं मला वाटतं. कुठलाही माणूस फार आनंदानं आपलं राहतं घर, आपला गाव सोडून जात नाही. मागं एकदा दुष्काळामुळं शहरांमध्ये होणाऱ्य़ा स्थलांतराबाबत आपल्या व्यंकटेश माडगूळकरांनी एक वाक्य लिहिलं होतं - आणि माणसं जगायला बाहेर पडली! असं चर्र झालं होतं ना ते वाक्य ऐकून... हे बघा. आत्तासुद्धा काटा आलाय माझ्या अंगावर...
कुणाल - बापरे... खरंच केवढं भीषण वास्तव लिहून गेलेयत तात्या या एका वाक्यात... मी अनिल अवचटांच्या 'माणसं' पुस्तकात असाच त्यांचा दुष्काळग्रस्तांवरचा लेख वाचला होता. १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून जी माणसं पुण्यात आली होती, त्यांच्यावर लिहिलं होतं त्यांनी. तो लेख अजूनही लक्षात आहे. अगदी हृदयद्रावक कहाण्या होत्या त्या...
देशमुख सर - दुष्काळदग्रस्त असू द्या, धरणग्रस्त असू द्या, किंवा कुठल्याही मोठ्या प्रकल्पानं बाधित झालेली माणसं असू द्या, आपण त्यांना नीट वागवलेलं नाही... फार जखमा उरात बाळगून आहेत ही सगळी माणसं बरं का...
रेणू - खरंय सर. आता यापुढच्या काळात तरी सरकारनं हे मनावर घ्यावं. कुणावरच अन्याय होऊ देऊ नये. 
देशमुख सर - होईल, चांगलंच होईल. माझा माणुसकीवर अजूनही विश्वास आहे बरं का. आणि ना, माणसानं नेहमी पॉझिटिव्ह राहावं... एकमेकांना मदत करावी. एकमेकांच्या बाबतीत सहानुभूती असावी. राग, द्वेष नको. ज्ञानोबामाऊली म्हणतात, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले... तर असं विश्वाचं आर्त प्रत्येकाच्या मनी प्रकाशलं पाहिजे ना बाबा...
कुणाल - वा... या गाण्यावरून आठवलं. लता मंगेशकरांनी किती सुंदर, आर्त स्वरांत हे गाणं गायलंय...
रेणू - कुणाल, कालच लतादीदींचा वाढदिवस झाला ना! योग्य वेळी त्यांची आठवण झाली म्हणायची तुला...
कुणाल - अगं हो. बरोबर. काल दीदी ८९ वर्षांच्या झाल्या आणि आता त्यांनी नव्वदीत पदार्पण केलंय...
देशमुख सर - व्वा.. शंभर वर्षं जगू देत. जीवेत शरदः शतम्! 
कुणाल - खरंय. काल आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर आम्ही दिवसभर लता मंगेशकर या सातअक्षरी चमत्काराविषयीच बोलत होतो. त्यांची काही गाणी ऐकली ना, की अजूनही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
रेणू - दैवदत्त देणगी आहेच रे आवाजाची. पण त्यांची मेहनत बघ ना... प्रत्येक गाणं सुरेल... हा सूर कधीच बेसुरा झाला नाही. 
कुणाल - आपल्या लहानपणी ते 'मिले सूर मेरा तुम्हारा' लागायचं बघ... त्यात शेवटी दीदी गायच्या. माझ्या अंगावर तर कायम रोमांच उभे राहायचे.
देशमुख सर - आमच्या वडलांकडं पूर्वी तो फोनो होता. कर्णा... त्यावर ते फक्त लताबाईंची गाणी ऐकायचे. असा गोड आवाज...
कुणाल - खरंय. काही लोकांचं आयुष्य बघितलं ना, की थक्क व्हायला होतं. मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलं होतं, की माइकवर अचूक क्षमतेनं आदळणारा असा पिकोलो जातीचा त्यांचा आवाज आहे म्हणे.
रेणू - ते काही असो. त्या आवाजाचा सुयोग्य वापर त्यांनी केला ना पण... सगळ्यांनाच जमतं असं नाही. कित्येक अवघड गाण्यांत त्या श्वास कुठं घेतात, तेही कळत नाही. ही खरंच कमाल आहे.
देशमुख सर - आपल्यासारख्या सामान्य माणसांचं आयुष्य उजळून टाकण्यासाठी देव अशा काही दैवी लोकांना जन्माला घालत असावा. दीदी त्यातल्याच एक आहेत.
कुणाल - खरंय. काही गोष्टी आपल्या सामान्य माणसांच्या आकलनापलीकडच्या असतात. आपण त्यांचं विश्लेषण करायच्या भानगडीत पडूच नये. फक्त त्या गोष्टीचा आनंद लुटावा. लताचं गाणं हा तसाच विषय आहे.
कुणाल - होय. मी त्या अलौकिक आनंदासाठी त्यांचा कायमचा कृतज्ञ आहे.
देशमुख सर - कृतज्ञता ही फार मोठी गोष्ट आहे, बरं का कुणाल. माणसानं नेहमी आपल्याला जे काही मिळालं आहे, ज्यांच्यामुळं मिळालं आहे त्या सगळ्यांविषयी सदैव कृतज्ञ असावं.
रेणू - अरे कुणाल, लतादीदींचा विषय निघाला आणि बोलतच बसलो बघ आपण. तू कर ना पोहे पटकन प्लीज. तसं केलंस तर मी अगदी कृतज्ञ राहीन. (हसते)
देशमुख सर - आणि मी पण बरं का रे (हसतात)
कुणाल - ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या वेळी मला तुमच्या घरी धपाटे खायला न्या, म्हणजे झालं... 

(सगळे हसतात...)

(मागे 'नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाजही पहचान है... गर याद रहें' ऐकू येत राहतं...)

----



No comments:

Post a Comment