27 Oct 2018

मटा मैफल लेख


ये छूने से फैलता है...
--------------------


काही वर्षांपूर्वी शबाना आझमीची एड्सबद्दलच्या जागृतीची एक जाहिरात लागायची. त्यात एड्सग्रस्तांना स्पर्श करायला हरकत नसते, असं सांगताना शबाना म्हणायची, ‘ये छूने से नहीं फैलता... इससे तो प्यार फैलता है...’ 
ही जाहिरात पाहताना आणि नंतरही आयुष्यात असं सतत जाणवत राहिलं, की आपण दुसऱ्या माणसाच्या स्पर्शाला पारखी असलेली माणसं आहोत. माणसानं दुसऱ्या माणसाला कुठल्या भावनेनं स्पर्श करावा, याचं कुठलंही शिक्षण आपल्याला दिलं जात नाही. त्यामुळं आपण आपल्यातल्याबेसिक इन्स्टिंक्टला जागून स्पर्श करायला जातो आणि तिथंच सगळा लोचा होतो. वास्तविक, माणसानं माणसाला जवळ घेणं, मिठी मारणं, हस्तांदोलन करणं, हात हातात घेणं, पायाला वाकून नमस्कार करणं अशा किती तरी गोष्टींमध्ये निखळ प्रेम किंवा माया किंवा आदर दडलेला असतो. हजारो शब्द जी भावना बोलू शकत नाहीत, ती आपण केवळ एका स्पर्शानं व्यक्त करू शकतो. पण हे स्पर्श कधी, कुठं, केव्हा, कसे करायचे याचे काही नीतिनियम, काहीएक चौकटी समाज म्हणून आपण आखून घेतल्या आहेत. त्यांचं पालन सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. पण तसं होताना दिसत नाही. समाज म्हणून आपल्या जगण्या-वागण्यात अनेक विसंगती आहेत. आपण खूप भोंदूपणानं जगतो. दांभिक वागतो. त्याचाच परिपाक म्हणजे आपण आज जिथं आहोत तिथं आहोत. आपण प्रेमाचा स्पर्श तर गमावलाच आहे; पण स्पर्श या साध्या शारीर क्रियेमागच्या सर्व मानसिक भावनाही गमावून बसलो आहोत आणि ते जास्त खेदकारक आहे.
आपण लहान असतो, तेव्हा आईच्या अंगावर दूध पीत असतो. तिच्या पदराशी खेळत असतो. कधी आज्जीच्या मांडीवर बसून आपण जेवण भरवून घेत असतो, तर कधी आजोबांच्या पाठीवर बसून त्यांचाघोडा घोडाकरत असतो. भावंडांशी तर प्रचंड दंगा-मस्ती चालू असते. गादीवर उड्या मारणं, एकमेकांच्या अंगावर पडणं, एकमेकांना बुकलून काढणं, घुसळणं हे सगळं आपण वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापर्यंत करत असतो. त्याचं तेव्हा कुणालाच काही वाटत नाही. मग एके दिवशी अचानक आपल्या मोठ्या बहिणीला या गटातून बाहेर काढलं जातं. ‘उगाच कुणाच्या अंगचटीला जायचं नाही,’ असं तिला शिकवलं जातं. तीही अचानकशहाणीहोते आणि खाली मान घालून हिंडू-फिरू लागते. ताईला अचानक असं काय झालं, हे आपल्याला काही कळत नाही. मग आपणही मोठे व्हायला लागतो. सातवी-आठवीच्या वयात आतून काही तरी सतत धडका द्यायला लागतं. काय होतंय ते कळत नाही. पण आपण उगाचच आईच्या, बहिणींच्या अंगचटीला जायला लागतो. त्यांना मिठ्या मारायला लागतो. आईच्या हे लक्षात येतं आणि पाठीत धपाटे मिळतात. बहिणींना कायमचं दूर केलं जातं. आपलं आपल्यालाच नीट काय ते कळत नसतं. पण काही तरी बिनसत चालल्याचं तेवढं लक्षात येतं. आयुष्यात पहिली आठ-दहा वर्षं मनसोक्त मिळालेला आपल्या माणसांचा स्पर्श मग अचानक संपून जातो. एकदम दुष्काळ पडावा तसे आपण कोरडे कोरडे होत जातो. घरातल्या मोठ्या पुरुष माणसांच्याही स्पर्शापासून आपण पारखे होतो. वडिलांचा हात कधी आपल्या अंगाला लागलाच, तर तो मार देण्यापुरताच लागतो. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्यांत नाजूक कालखंडातून जात असतो, तेव्हा आपल्याला क्रूरपणे सर्व स्पर्शांपासून तोडून टाकण्यात येतं. पुरुष ही कुणी तरी भयंकर जमात आहे आणि ती तुला हर प्रकारे उद्ध्वस्त करायला टिपलीय असं मुलीच्या; तर स्त्रीला आता तुझं लग्न झाल्यावरच (बायको म्हणूनच) हात लावायचा, असं प्रत्येक मुलाच्या मनावर नकळतपणे बिंबवलं जातं. (याला सन्माननीय अपवाद आहेतच. पण सर्वसाधारणतः असंच घडतं.)
अशा वयात मग मुलगी असो, की मुलगा... अचानक एकलकोंडे व्हायला लागतात. दरम्यान निसर्ग आपलं काम करीत असतोच. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी जाम आकर्षण वाटायला लागतं. पण इथंही समाजाने लावलेले कडी-कोयंडे दिसत राहतात. आईच्या, मावशीच्या, काकूच्या शिकवणीमुळं मुली दुसऱ्याच्या स्पर्शाबाबत भलत्याच जागरूक होतात आणि पापभिरू मुलगेही फुकटचा मार पडू नये, म्हणून अशा स्पर्शापासून होता होईल तो दूर राहायचा प्रयत्न करतात. पण या समाजनियमांमध्ये नैसर्गिक आकर्षणाचा फार मोठाग्रे एरियातसाच राहिलेला असतो. मग हे नियम झुगारून देण्याचे प्रयत्न सुरू होतात. मुली आणि मुलगे या दोघांकडूनही! पण सगळ्यांच्याच नशिबी कथित प्रेम वगैरे गोष्टी येत नाहीत. मग त्यांचं हे आकर्षण विकृतीकडं झुकायला लागतं. आर्थिक परिस्थिती, अभावग्रस्तता, घरचे संस्कार आदी गोष्टीही यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मग या गोष्टींच्या कमी-अधिक परिणामांनुसार विकृतीचं प्रमाणही ठरतं
मिळत नसलेली गोष्ट ओरबाडून मिळवायची, ही भावना अशा वेळी सर्वांत प्रबळ ठरते. साध्या प्रेमाच्या स्पर्शाला पारख्या झालेल्या नजरा मग सावज हेरायला लागतात. बहुतेकांना अशी संधी मिळत नाहीच. त्यामुळं विकृतीचं प्रमाण वाढत जातं. चोरटं का होईना, पण स्पर्शसुख मिळविण्यासाठी धडपड सुरू होते. मग बसमध्ये, ट्रेनमध्ये, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी, लिफ्टमध्ये असं कुठंही संधी मिळताच हात फिरवण्याची किळसवाणी स्पर्धा सुरू होते. मुलींना लहानपणापासूनच मिळालेल्या शिकवणीनुसार, या स्पर्शाचीजातत्यांना कळतेच. त्यातून मग साध्या स्पर्शाची ही गोष्ट नकोशा विकृतीपर्यंत येऊन थांबते. स्पर्शाची उणीव नजर दूषित करून टाकते.
स्पर्शासारख्या नितांतसुंदर गोष्टीचं हे विकृतीकरण झालंय, त्याला नक्की कोण कारणीभूत आहे? एक समाज म्हणून आपण सगळेच. समाज सुरळीत चालावा, सगळ्यांनी नीतिनियमांचं पालन करावं म्हणून काही रूढी-परंपरा आल्या, काही अलिखित संकेत आले, तर काही कायदे आले. ‘सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन’ (पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन - पीडीए) हा आपल्याकडे कायद्याने गुन्हा आहे. ठीक आहे. पण एवढा कायदा करून त्याचं पालन नीट होतंय का? मुळीच नाही. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत काही ठरावीक ठिकाणी या कायद्याचं सर्रास उल्लंघन होताना आपल्याला दिसतं. मग कायदे करून काय उपयोग?
मूळ मुद्दा हा आहे, की आपण लहानपणापासून मुलांना या गोष्टी नीट शिकवतो का? स्पर्शातलं सौंदर्य, त्यातली माया, जिव्हाळा आपण त्यांना शिकवतो का? विरुद्ध लिंगी व्यक्तीला स्पर्श केला (किंवा चुकून झाला), की ते महापाप! असं का? निसर्गाच्या विरोधात जाऊन नियम केले, की ते मोडण्याकडंच कल वाढणार. त्यापेक्षा त्या मुलाला मुलींचा, स्त्रीचा आदर करायला आपण शिकवू नाही का शकत? मुलं आपल्या आजूबाजूला जे दिसतं, त्यातून धडे घेत शिकत असतात. आपलंच अनुकरण करत असतात. आपण स्त्रियांवर घरात वाह्यात जोक करायचे आणि मुलानं मात्र त्यांना आदर द्यायची अपेक्षा करायची, हे कसं जमायचं? आपण घरातल्या पत्नीला, आईला, बहिणीला कसं वागवतो हे मुलं पाहत असतात. आपण स्वतः किती महिलांना आदरानं वागवतो? घरात, सोसायटीत, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसात (आणि एकांतातसुद्धा) आपलं स्त्रियांसोबतचं वर्तन कसं असतं? आत्मपरीक्षण करण्याचीच ही गोष्ट आहे.
पंजाबी लोकांकडं किंवा एकूणच उत्तर भारतीय लोकांकडं पाहिलं, की मला फार छान वाटतं. ते लोक लाजता, मोकळ्या मनानं एकमेकांना मिठ्या मारतात. वयस्कर आज्जीला तिचा तरुण नातू जाऊन बिलगू शकतो, तसंच एखादा खट्याळजिजाजीआपल्या मेव्हणीला सहज, छानशी मिठी मारू शकतो. आपल्यात ही सहजता नाही, याचं कारण आपलं मन तेवढं साफ नाही. मन साफ नाही, कारण लहानपणापासून तसे संस्कार नाहीत. आपण सार्वजनिक ठिकाणी एखाद्या स्त्रीशी शेकहँड करायलाही बिचकतो. याचं कारण स्त्रीचा आदर राखून, तिला मान देऊन, ग्रेसफुली तिला (अर्थात तिच्या संमतीनं) स्पर्श करता येतो, हे आपण शिकलोच नाही. त्यामुळं आधी हे तातडीनं शिकायची अन् शिकवायची गरज आहे. असा आदरानं, प्रेमानं केलेला स्पर्श कुठलीही स्त्री कधीही नाकारणार नाही, याची खात्री बाळगा. स्त्रीला देवीचं रूप मानणारे आपण लोक आहोत. ते केवळ दिखाऊपणापुरतं मर्यादित असू नये.
स्पर्शातल्या प्रेमाला पारखे झालेल्या लोकांकडून मग किळसवाणे, बीभत्स प्रकार होत राहतात. ते ज्यांच्या बाबतीत होतात त्यांना ते आयुष्यभर पुरतात. मग ते कधी तरी बाहेर येतात. अन् तेव्हामी टूचळवळ सुरू होते!
त्यानिमित्त हे सगळं आठवलं, जाणवलं अन् सांगावंसं वाटलं, इतकंच...

----
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, मैफल पुरवणी, २७ ऑक्टोबर २०१८)
---


4 comments:

  1. छान विचार.👍👍

    ReplyDelete
  2. श्रीपाद लेख मस्त झालाय. थोडा उशिरा वाचला त्यामुळे तुला कळवायला देखील उशीर..

    ReplyDelete