30 Oct 2018

जगणं मस्त मजेचं - ऑक्टोबर

जगणं मस्त मजेचं...
-----------------------

रसिकहो नमस्कार,
‘जगणं मस्त मजेचं’ ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता (आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ‘विविधभारती’वर) प्रसारित होणारी लोकप्रिय कौटुंबिक श्रुतिका मालिका..! या मालिकेसाठी लिखाण करण्याची संधी मला गौरी लागू आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ औटी यांनी दिली. मी यानिमित्ताने श्रुतिका प्रथमच लिहिली. पुण्यात राहणाऱ्या, कुणाल व रेणू या आधुनिक, आजच्या काळात जगणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही काल्पनिक श्रुतिका लिहायची होती. हे काम मला आवडलं... कुणाल इंजिनीअर, तर रेणू मराठीची प्राध्यापिका असते...
या मालिकेसाठी लिहिलेले स्क्रिप्ट मी इथं शेअर करतो आहे. अर्थात या स्क्रिप्टचं वाचन करणारे अमित वझे (कुणाल), रूपाली भावे-वैद्य (रेणू), आरती पाठक (सई), दीप्ती भोगले (दिघेकाकू), गोंधळेकरकाका (बाळाजी देशपांडे), देशमुख सर (संजय डोळे) यांच्यामुळं ही श्रुतिका खऱ्या अर्थानं श्रवणीय झाली. (मी अजूनपर्यंत यातल्या एकाही कलाकाराला भेटलेलो नाही.)
आकाशवाणीसाठी लिहावं ही माझी खूप जुनी इच्छा होती. गेल्या दोन-तीन वर्षांत तशा काही संधी मिळाल्या, तरी श्रुतिका हा प्रकार लिहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. ‘जगणं मस्त मजेचं’ या मालिकेच्या निमित्तानं माझी ही इच्छाही पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद आहे. जूनमध्ये नव्या स्वरूपात ही मालिका सुरू झाली, तेव्हा मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखकांनी तिचे सुरुवातीचे भाग लिहिले होते. त्यामुळं ही धुरा पुढं वाहताना मला किंचित दडपणही आलं होतं. पण पहिलाच भाग आवडल्याचं गौरी लागूंनी कळवलं आणि मला हुश्श झालं...
मला आशा आहे, आपल्यालाही हे स्क्रिप्ट * वाचायला आवडेल...

(* हे स्क्रिप्ट आणि प्रत्यक्षात सादर झालेले भाग यात थोडेफार बदल आहेत. कधी कलाकारांनी इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, तर कधी काही भाग एडिट झाला आहे. पण एकूण इफेक्ट अर्थातच खूप चांगला आला आहे.)

-----

१. सहा ऑक्टोबरचा भाग
-----------------------------


रेणू (जोरजोरात हाका मारतेय) - कुणाल, कुणाल... कुणाल, अरे, कुठं आहेस? 
कुणाल - अगं हो हो, आलो आलो...
रेणू - अरे, मी पाच मिनिटांपूर्वी अंघोळीला गेले तेव्हा झोपला होतास आणि मी बाहेर येईपर्यंत तू चक्क गायब? होतास कुठं तू?
कुणाल - अगं, काय सांगू तुला... मी झोपलोच होतो. स्वप्न पाहत होतो. माझ्या स्वप्नात कोण आलं असेल? ओळख बघू...
रेणू (वैतागून) - आली असेल तुझी माधुरी किंवा विद्या किंवा अशीच कुणी तरी...
कुणाल - हा हा हा... नाही गं नाही. तशी कुणी नाही. ऐक, माझ्या स्वप्नात ना, फुलराणी आली फुलराणी...
रेणू (हसते) - ए बास हां... तुझी टेप लावू नकोस सकाळी सकाळी.... मला खरोखर वेळ नाहीय. कॉलेज आहे मला. तू फटाफटा नाश्त्याचं काय ते बघ. मला निघायचंय हं अर्ध्या तासात...
कुणाल - अगं विचार तरी कोण फुलराणी? कुठली फुलराणी?
रेणू (डिप्लोमॅटिकली) - हे बघ, फुलराणी म्हटलं ना, की माझ्या डोळ्यांसमोर आधी बालकवींची फुलराणी येते... हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, सुंदर त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती... (ट्रान्समध्ये जात)अहाहा... काय सुंदर काव्य!
कुणाल (हसत) - नाही, नो... ही नव्हेच.
रेणू - मग फुलराणी म्हटलं, की माझ्या डोळ्यांसमोर आणखी येते ती आपल्या पेशवे पार्कातली फुलराणी...
कुणाल - आयला हो... मी कसा विसरलो त्या फुलराणीला? चालू आहे का गं अजून ती?
रेणू - कुणाल, आपण शेवटचं त्या पार्कात कधी गेलो होतो ते आठवतंय तरी का तुला? 
कुणाल - खरंच की गं... माझ्या बालपणीचा नॉस्टॅल्जिया आहे फुलराणी म्हणजे... तेव्हा बघ, मी दहा वर्षांचा असेन... आणि ना...
रेणू - कुणाल, प्लीज. तू पेशवे पार्कात हरवल्याचा तो किस्सा परत सांगू नकोस हां... खूपदा ऐकलाय मी तो... आणि आपण काय बोलत होतो? ही पेशवे पार्कातली फुलराणी आली होती का आपल्या स्वप्नात, महाराज? ते सांगा आधी...
कुणाल - नाही, नाही. तुझा हाही अंदाज चुकला. आता लास्ट चान्स...
रेणू (विचार करीत) - अं...अं...अं...? मग साईना नेहवाल? तिला म्हणतात ता फुलराणी?
कुणाल (खो खो हसतो) - अगं काहीही काय रेणू! तुझं डोकं बाकी भन्नाट चालतं हं... अगं, ती कशाला येईल आता माझ्या स्वप्नात? हां, आता ती छान दिसते, छान खेळते... मलाही बॅडमिंटन आवडतं हे सगळं खरंय. पण साईना नेहवाल माझ्या स्वप्नात म्हणजे जरा... अतीच हां... (हसतो)
रेणू (वैतागून) - बरं बाबा, हरले! सांग कोणती फुलराणी आली होती तुझ्या स्वप्नात ते! आणि तू कुठं गायब झाला होतास तेही सांग...
कुणाल - सांगतो, सांगतो. अगं, माझ्या स्वप्नात आपल्या टेरेसमधली गुलाबाची फुलं आली होती स्वप्नात... तो लाल गुलाब... ती जाई-जुई, मोगरा, सदाफुली हे सगळे... ही फुलराणी म्हणत होतो मी... मला स्वप्नात येऊन म्हणाली, की काय कुणाल, लक्ष कुठंय तुझं? आम्हाला विसरलास? मला इतकं कसं तरी झालं ना... मी पांघरूण फेकून ताडकन उठलो आणि आधी टेरेसमध्ये गेलो... सगळ्या झाडांना, फुलांना, वेलींना गोंजारलं... त्यांना पाणी घातलं... इतकं बरं वाटलं ना... आणि आइसिंग ऑन द केक म्हणजे कुठूनसा एक भारद्वाज आला आणि आपल्या टेरेसच्या रेलिंगवर येऊन बसला... अहाहा, भारद्वाजाचं दर्शन झालं सकाळी सकाळी... आता दिवस मस्त जाणार.... 
रेणू - वा, वा, वा... ती फुलं स्वप्नात आल्यानं का होईना, तुला आपल्या घराची, आपल्या टेरेसची, तिथल्या तूच हौसेनं आणून लावलेल्या झाडांची, रोपांची आठवण आली हे काय कमी झालं! छान... एरवी मीच करते त्यांचं सगळं... तुला असतो का वेळ?
कुणाल - तेच ना रेणू... मला इतकं वाईट वाटलं बघ. आपण आपल्या या रुटीनच्या रहाटगाडग्यात इतके अडकून गेलोय ना... 
रेणू - मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं, तर सर्वेपि रुटीनः जन्तु... 
कुणाल - हो ना, सुखाच्या जागी हे रुटीन कधी येऊन बसलं, ते कळलंच नाही. मग असे छोटे छोटे, हळवे, सुखाचे क्षणही नीट उपभोगता येत नाहीत बघ.
रेणू - असं काही नाही. आपल्याला यातूनच वेळ बाजूला काढावा लागतो कुणाल...
कुणाल - हं, खरंय. वेळेचं व्यवस्थापन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बाई. तुला जमतं ते सगळं खरं... मला तर शनिवार-रविवार लोळत पडून राहावंसं वाटतं... पूर्वी मला उत्साह असायचा. ट्रेकिंगला जाऊ, सिनेमाला जाऊ, मित्रांकडं जाऊ, महत्त्वाचं म्हणजे पक्षिनिरीक्षणाला जाऊ... हे आता काहीच होत नाहीय माझ्याकडून... कंटाळा! नुसता कंटाळा भरलाय आता अंगात...
रेणू - आमच्या कॉलेजमधले सायकॉलॉजीचे वर्दे सर आहेत ना, ते नेहमी सांगतात, कंटाळा म्हणजे मनाची एक स्थिती आहे. कंटाळा, वैताग हे सगळं सापेक्ष असतं. तुमचं मन कसा विचार करतं, त्यावर असतं हे सगळं...
कुणाल (तिरकसपणे) - हे सांगायला सायकॉलॉजीचे सर कशाला पाहिजेत? माझ्यासारख्या बायकोलॉजीमध्ये एक्स्पर्ट असलेल्या माणसाला विचार की. मी पण हेच सांगीन.
रेणू (हसते) - कुणाल, झाले का तुझे पीजे सुरू परत? बायकोलॉजी काय अरे! 
कुणाल - मग काय! सर्व लॉज्या आणि लॉजिक जिथं हात टेकतं आणि फक्त 'जी, जी' असं म्हणतं, ती बायकोलॉजी... 
रेणू (खो खो हसते) - कुणाल, गप्प बैस हं... काहीही बोलतोस! आणि काय रे, तुझा उत्साह एवढा मावळायला झालंय तरी काय? असं काय अगदी वय झालंय तुझं? ते गोंधळेकरकाका बघ, अजून किती उत्साही आहेत!
कुणाल - ए, अगं, कशाला नाव काढलंस त्यांचं? कधीही येऊन टपकतात ते सकाळी सकाळी...
रेणू - अरे नाही. एवढ्या दोन-तीन आठवड्यांत नाही आले ते...

(तेवढ्यात बेल वाजते. गोंधळेकरकाका येतात.)

कुणाल - नक्की गोंधळेकरकाकाच. त्यांना खूप आयुष्य आहे बुवा खरंच. या काका, या. आता तुमचा विश्वास बसणार नाही, पण आत्ता खरंच तुमचंच नाव काढलेलं आम्ही दोघांनी; की तुम्ही खूप दिवसांत आला नाहीत, म्हणून...
गोंधळेकरकाका - वा, वा! या म्हाताऱ्याची तुम्हाला आठवण येते म्हणजे कमालच म्हणायची. तुम्ही तुमच्या व्यापात बिझी असणारे लोक... 
रेणू - काका, अहो हाच विषय चालला होता... बरं, तुम्ही काय सहज आला होता का? ते काय आहे आणि तुमच्या हातातल्या पिशवीत?
गोंधळेकरकाका - अगं, गावी गेलो होतो. तिथं आमच्या भावानं नर्सरी सुरू केलीय. मग तुझ्यासाठी दोन रोपं घेऊन आलो. मिरची आणि कढीपत्ता आहे बघ. तुला घरच्या घरी मिळतील आता मिरच्या आणि कढीपत्ता...
रेणू - व्वा काका! आत्ता आमचा टेरेसवरच्या झाडांचा, फुलांचाच विषय चालला होता आणि जोडीला 'आपल्याला वेळ कसा नाही' हा नेहमीचा विषय! पण बरं झालं तुम्ही ही रोपं आणलीत. मला हवीच होती. 
गोंधळेकरकाका - वा, वा... बरं झालं मग. आता पुढच्या वेळी घरच्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून पोहे कर हो. आणि महत्त्वाचं म्हणजे मला बोलाव खायला... काय? (हसतात)
रेणू - म्हणजे काय काका! अहो, हे काय बोलणं झालं? मी नक्की बोलावणार तुम्हाला...
कुणाल - काका, तुमचा उत्साह पाहून आता मला मला नव्यानं उत्साह आला आहे. आता मी गच्चीतली बाग या विषयात पुन्हा लक्षात घालायला सुरुवात करणार आहे. आता नव्या कुंड्या पण आणतो आजच... सगळी रचना पण मला बदलायची आहे. मागं तुम्ही दिलेल्या पिवळ्या गुलाबाला छान फुलं आली बरं का... आज घेऊन जा एखादं...
गोंधळेकरकाका (हसतात) - अरे राहू दे, राहू दे. तू ते सगळे गुलाब या रेणूला दे. तिलाच छान दिसतील ते! 
रेणू - काका, हा स्वतःहून मला देईल होय गुलाबाचं फूल... मुळीच शक्य नाही.
कुणाल (हसत) - अहो काका, तिला गरजच नाही. तिला रोज सकाळी एवढे गुलाब मिळतात ना, की रोज म्हटलं तरी गुलकंद करून खाता येईल.
गोंधळेकरकाका - काय बोलतोस मला काही कळत नाही बाबा. आता दुधासारखा गुलाबाचा पण रतीब सुरू केलाय का तुम्ही?
कुणाल - हां काका, तसा रतीबच म्हणायचा. पण हा रतीब आपल्याला सुरू करावा लागत नाही. लोकच सुरू करतात आपल्यासाठी...
रेणू (हसते) - ए कुणाल, काय रे! अहो काका, व्हॉट्सअपवर रोज सकाळी येणाऱ्या मेसेजबद्दल बोलतोय तो...
गोंधळेकरकाका - ते तुमचं व्हॉट्सअप वगैरे आपल्याला काही नाही जमत हां... आम्ही आपले थेट लोकांना जाऊन भेटतो आणि समोरासमोर नमस्कार घालतो.
कुणाल - काका, खरं सांगू का? असं समोरासमोर भेटण्यात जी मजा आहे ना, ती त्या कृत्रिम संदेशांमध्ये नाही, हे अगदी खरंय बरं का...
गोंधळेकरकाका - अरे, नाहीच येणार. जिवंत माणसासारखा माणूस भेटतो हे किती महत्त्वाचं आहे! माणसासारखं इंटरेस्टिंग या जगात दुसरं काही नाही बघ.
रेणू - आणि हल्ली ना काका, आपण या माणसालाच भेटायला टाळतो आहोत. अहो, चार माणसं जरी भेटली ना, तरी ती मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. म्हणूनच आम्ही शनिवारी सकाळी मोबाइलवर बंदी आणलीय. निदान थोडा वेळ तरी आपण त्या यंत्रापासून दूर राहू शकतो का, हे आम्ही बघतो. आणि खरं सांगू का, काही बिघडत नाही दोन तास नाही पाहिला तो मोबाइल तर...
गोंधळेकरकाका - अगं रेणू, माणसानं माणसाला भेटलं पाहिजे. गप्पा मारल्या पाहिजेत. ख्यालीखुशाली विचारली पाहिजे. असं पाहिजे की नको? मला तर या तुमच्या पिढीचं काही कळतच नाही. 
कुणाल - आमचं कसं झालंय माहितीय का काका, जेवढी जेवढी म्हणून आम्हाला संवादाची अत्याधुनिक साधनं उपलब्ध होतायत ना, तेवढे तेवढे आम्ही अधिकाधिक प्रायव्हेट होत चाललो आहोत. पूर्वी आपण जास्त सार्वजनिक होतो. आता फार खासगी होत चाललो आहोत. हे नक्की किती बरोबर आहे, मला तर काही कळतच नाही. पण काही तरी चुकतंय एवढंच जाणवतं.
रेणू - मी सांगू का, प्रायव्हेट होण्यात गैर काही नाही. फक्त आपल्याकडं तारतम्य नावाच्या गोष्टीची जरा कमतरताच आहे. त्यामुळं कुठल्याही तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं आणि किती नाही, हे कळतच नाही... एक तर वाहून जायचं पूर्ण त्यात किंवा एकदम दूर राहायचं... दोन्हींचा समन्वय साधता येतो की...
कुणाल - मला आज हे फुलराणीचं स्वप्न पडल्यापासून तर काही तरी वेगळीच अनुभूती येतेय. मला ना, निसर्ग परत खुणावतोय रेणू... आपण जायचं का ट्रेकला?
गोंधळेकरकाका - तुला हेच सांगणार होतो कुणाल. मी आत्ताच गावाकडं जाऊन आलो म्हटलं ना. तिथं एवढं छान वाटत होतं ना, की असं वाटलं, भावाला म्हणावं, मी पण येतो रे परत इकडंच राह्यला... मस्तपैकी एखादी झोपडी बांधू आणि राहू. आहे काय अन् नाही काय!
कुणाल - काका, तुम्हाला शहरात राह्यची झालीय सवय... चार दिवस ठीक आहे; पण नंतर कंटाळून जाल तुम्ही तिकडं. बघा, माझं चॅलेंज आहे. 
रेणू - खरंच काका. अहो, खेड्यांत चार दिवस पाहुणे म्हणून जाणाऱ्यांना सगळ्यांनाच तिथलं छान, मस्त वगैरे वाटतं. पण तिथं कायमस्वरूपी राहणं अवघडच आहे. विशेषतः शहरात राहण्याची सवय असलेल्या तुमच्यासारख्यांना...
गोंधळेकरकाका - अगं, हा सगळा घोळ आहे. खेड्यांतून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतर होत असतं. आणि ही काही आजची प्रक्रिया नाही. गेली कित्येक वर्षं हे चालू आहे आणि जगभर चालू आहे. पण आता हा रिव्हर्स मायग्रेशनचा नवा ट्रेंड बघायला मिळतोय. बापूजी म्हणायचे, की खेड्याकडं चला. आता लोकांना त्यांचं म्हणणं पटलं आहे असं वाटतं. 
कुणाल - अहो, पण ते वेगळ्या संदर्भात म्हणाले होते. आता काय त्याचं?
गोंधळेकरकाका - महात्मा गांधींची जयंती आत्ताच दोन तारखेला आपण साजरी केली ना! आता तर त्यांची दीडशेवी जयंती आहे पुढच्या वर्षी. तेव्हा या निमित्तानं हे वर्षभर आपल्याला गांधीजी नीट आठवले, पचले तरी पुष्कळ. काळाच्या पुढचे विचार होते बघ त्यांचे... सगळेच काही आपल्याला झेपतील असं नाही.
रेणू - काका, गांधीजींचे आदर्श समोर ठेवून गडचिरोलीत काम करणारे डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांचं काम मला खरंच आवडतं. मी जाऊन आलेय त्यांच्या प्रकल्पात. सगळं काम पाहून आले आहे. तीच गोष्ट प्रकाश आणि मंदाताई आमटेंची... या लोकांनी तिथं उभं केलेलं काम बघून थक्क व्हायला झालं. अगदी शून्यापासून सुरुवात करून त्यांनी आज केवढे मोठे प्रकल्प उभारलेयत. खरोखर कमाल वाटते या माणसांची...
कुणाल - मोठ्या माणसांपासून अशी प्रेरणा घेऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी माणसं मलाही आवडतात. याचं कारण ते फक्त बोलत नाहीत, तर ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवतात. 
रेणू - खरंय. एकदम पटलं बघ.
गोंधळेकरकाका - आमच्या लहानपणी मी आमच्या वडिलांकडून गांधीजींच्या गोष्टी ऐकायचो. आमच्या अप्पांनी गांधीजींना वर्ध्यातल्या आश्रमात प्रत्यक्ष बघितलं होतं. तो प्रभाव त्यांच्यावर शेवटपर्यंत होता. आमच्या घरात त्यांनी गांधीजींचा फोटो लावला होता. 
कुणाल - काका, पण नंतर प्रॉब्लेम हा झाला, की आपण फक्त त्यांचे फोटोच लावले. विचार तसेच राहिले. फार थोड्या लोकांनी ते खरोखर आचरणात आणले. 'खेड्यांकडे चला' हा गांधीजींचा उपदेश लोकांनी त्यातलं मर्म समजून, तेव्हाच अमलात आणला असता ना, तर आज आपल्या शहरांची ही जी केविलवाणी अवस्था झाली आहे, ती झाली नसती. 
रेणू - खरंय रे. स्थलांतराचा प्रश्न एवढा भयंकर झालाय आणि त्यातून शहरांची जी सूज आल्यासारखी वाढ झालीय ना आपल्या, ती बघून डोकं गरगरतं अक्षरशः 
गोंधळेकरकाका - माझ्या लहानपणीचं गाव आणि आत्ताचं गाव यात फार फरक पडलाय रे... मलाही तो जाणवतो. गावाचं गावपण हरवलंय आणि शहरंही धड 'शहर' म्हणावं अशी झाली नाहीत. सगळीच तिरपागडी अवस्था... आपण खेड्यांचं खेडेपण जपायला हवं होतं. एके काळी सगळ्या बाबतींत ही खेडी स्वयंपूर्ण होती. आता सगळीच अधांतर अवस्था...
कुणाल - आपल्याकडं नगरनियोजन नावाचा प्रकार आहे की नाही, अशी शंका येते अनेकदा. काही अपवाद सोडले ना, तर शहरंही किती बकाल होत चाललीयत आपली... वाहतुकीपासून ते सार्वजनिक सुविधांपर्यंत... किती अडचणी आहेत!
गोंधळेकरकाका - म्हणूनच मला वाटलं कुणाल, की आपल्या भावाकडं जाऊन राहावं गावी. तेच बरं...
रेणू (हसते) - काका, असे वैतागू नका. आणि कुठंही जाऊ नका. आणि तिकडं गेलात तर तुम्हाला कुणालच्या हातचा नाश्ता आणि माझ्या हातचा चहा मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
गोंधळेकरकाका (हसतात) - अरे हो. हे बाकी खरं बरं का. मला काही या दोन गोष्टींचा मोह सोडवायचा नाही. आणि गांधीजींची शपथ घेऊन खरं सांगतो - मी काही कुठं जात नाही. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ...
रेणू व कुणाल (एकदम) - ये हुई ना बात...!

(सगळे हसतात...)

---

२. १३ ऑक्टोबरचा भाग
----------------------

कुणाल - मेरे सपनों की रानी कब आएगी तू, चली आ, रेणू तू चली आ...
रेणू - आले आले... ओ किशोरकुमार, थांबा आता... आजूबाजूचे लोक पळून जातील तुमचं गाणं ऐकून... आणि मोठ्यांदा ओरडू नकोस. आणि आत्ता पहाटेचे सव्वापाच वाजले आहेत एवढं लक्षात ठेव...
कुणाल - अगं रेणू, खरंच उशीर होतोय... पावणेसहाला पोचायचं होतं अगं मला अभ्याच्या घरी... एक तर किती दिवसांनी ट्रेकला निघालोय... त्यात माझ्यामुळं उशीर नको. नाही का?
रेणू - अरे हो... तुझा डबाच भरतेय... व्यवस्थित खा. सँडविचेस आहेत, बिस्किटं आहेत, नारळपाण्याचे सॅशे आहेत. पाण्याची बाटली आहे. तुझ्या गोळ्या आहेत. अजून काय राहिलंय बघ...
कुणाल - अगं, एवढं कशाला भरलंय? तिकडं साग्रसंगीत चुलीवर जेवण तयार करणार आहोत आम्ही...
रेणू - अरे, असू दे. येता-जाता लागतं हे. आणि काळजी घे. नीट जा, नीट ये. कळलं का? 
कुणाल - हो. खरंच एवढं मस्त वाटतंय ना रेणू. किती दिवसांनी हा योग आलाय बघ ना... परवा सई अचानक म्हणाली, की परत ट्रेकला जाऊ या. मग अभ्या, निल्या आणि आमची सगळी गँगच तयार झाली. मजा येणार आहे. खरं तर तू पण यायला हवं होतंस रेणू...
रेणू - अरे हो. पण तुला माहितीय ना, साराच्या शाळेत आज पेरेंट्स मीटिंग आहे. मला खरं तर कॉलेजमध्ये पण काम होतं. ते फेलोशिपच्या अर्जाचं काम अजून रखडलंच आहे. देशमुख सर चिडले आहेत खूप. काय काय करू? त्यात आज साराच्या शाळेत जायचं म्हणून उशिरा जावं लागणार आहे कॉलेजात...
कुणाल - सॉरी हं रेणू... अगं, आमचा ट्रेकचा प्लान अचानक ठरला. एरवी एवढं अचानक काही ठरत नाही. पण या वेळी मला मोह आवरला नाही. पण आपण पुढच्या महिन्यात परत जाऊ.
रेणू - जाऊ रे. तू नको गिल्टी वाटून घेऊ. आता आपल्याला नाही जमत सगळ्या गोष्टी एकत्र करायला... तू जा. मजा कर. तुला हा ब्रेक हवाच होता ना नाही तरी.
कुणाल - अॅक्चुअली रेणू... पावसाळा संपायची वाटच पाहत होतो. आता एवढी ऑक्टोबर हीट आहे ना, ती जाऊ दे. मग माझा आवडता ऋतू येणार आहे. वॉव... वेटिंग वेटिंग फॉर हिवाळा... 
रेणू - खरंच. माझा पण आवडता आहे बरं का हिवाळा... कवीलोक म्हणतात तसं, चित्तवृत्ती वगैरे फुलून येतात अगदी त्या ऋतूत...
कुणाल - अहाहा... ती गुलाबी थंडी, ती मऊमऊ दुलई... पहाटेची साखरझोप आणि तुझ्या...
रेणू - बास, बास... कळल्या भावना. सगळंच बोलून टाकणार आहेस का?
कुणाल - आणि तुझ्या हातचा गरमागरम चहा असं म्हणणार होतो, रेणू! तुझ्या मनात काही दुसरं आलं का? हा हा हा...
रेणू - इश्श! गप रे... भलत्या वेळी काहीही सुचतंय तुला...
कुणाल - भलत्या वेळी? वा, वा! ही पहाटेची मस्त वेळ जर 'भलतीच' असेल, तर मी संपलोच मग! मला ते कुमार गंधर्वांचं गाणं आठवलं... आज अचानक गाठ पडे... भलत्या वेळी भलत्या मेळी असता मन भलतीचकडे...
रेणू (गाते) - नयन वळविता सहज कुठे तरी, एकाएकी तूच पुढे...!
कुणाल - वा, वा... रेणू... आपलं आवडतं गाणं... म्हणूनच तर आपलं जमलं नाही गं... कुमार तर आपले आवडतेच!
रेणू - अगदी. म्हणूनच 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीस तुष्टता मोठी' असं झालं ना आपलं...
कुणाल - अहाहा... रेणू, तू आता खरोखर भलत्या वेळी मला नॉस्टॅल्जियात अडकवू नकोस हं... की मी जाऊ नये म्हणून तू हे एकेक अस्त्र बाहेर काढतीयेस?
रेणू - नाही रे बाबा. तू निघ. आता माझ्यामुळं उशीर होतोय असं म्हणू नकोस बरं का.
कुणाल - अगं हे बघ. अभ्याचा मेसेज आलाय. गाडीचा काही तरी प्रॉब्लेम झालाय म्हणतोय. तेव्हा तो आता निघ म्हणाल्यावरच मी निघणार आहे. आहे अजून थोडा वेळ... एक मिनिट, पेपर आले का बघतो...
रेणू - इतक्या लवकर कुठले पेपर येताहेत रे? साडेपाच झालेयत फक्त...
कुणाल - आलेयत पण. हे बघ. आजचा रंग ग्रे आहे म्हणे.
रेणू - माझ्याकडं ती लिस्ट तयार आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये आम्हीही ग्रे कलरच्या साड्या नेसून फोटो काढणार आहोत, कळलं का! 
कुणाल - मी तर ट्रेकिंगला चालल्यामुळं आज बाय डिफॉल्ट ग्रे आहे सगळा. माझे शूज, पँट, टी-शर्ट... बघ सगळं 'ग्रे'च आहे... फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे... हा हा हा... 
रेणू - कुणाल, बास... कळल्या भावना बरं का... आज पहाटे फारच रोमँटिक मूड झालाय का?
कुणाल - अगं हो. वातावरणच तसं आहे बघ ना. सारा उठली नाहीय ना अजून... मग ऐक ना, आपण जरा... 
रेणू - काय? 
कुणाल - काही नाही. 'रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना...' म्हणणार होतो. 
रेणू - कुणाल... आवरा... भावना आवरा आपल्या...
कुणाल - गंमत गं...! पण बघ ना. आज किशोर आठवतोय सारखा. त्याची पुण्यतिथी आहे गं आज... 
रेणू - हो? खरंच? तुला बऱ्या या तारखा लक्षात राहतात बाई...
कुणाल - राहतात बुवा. आणि खरं सांगू का? हल्ली व्हॉट्सअपमुळं मध्यरात्री बारा वाजल्यापासून त्या त्या दिवसाचं माहात्म्य कळायला सुरुवात होते. 
रेणू - हे बाकी खरंय.  
कुणाल - हो ना. किशोरकुमार गेल्याचं मला आठवतंय. मी फार लहान होतो. १९८७ मध्ये किशोर गेला, त्या दिवशी बुधवार होता. तेव्हा 'चित्रहार' रद करून किशोरकुमारचा एक जुना लाइव्ह कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला होता. मला अजून आठवतंय.
रेणू - भारीच अवलिया होता हा माणूस... त्याचं ते 'यॉडलिंग' वगैरे म्हणजे तर कहर होता. पण गंभीर गाणी पण किती उत्कटतेनं म्हणायचा....
कुणाल - अगदी. आज ट्रेकमध्ये सगळी किशोरच्या गाण्यांची आवर्तनं होणार आहेत बघ. चला, निघायला हवं.
रेणू - महाराज, तेच म्हणणार होते. निघा आता. मलाही आवरायचंय अरे. आणि हो, दिघेकाकू येणार होत्या आत्ता...
कुणाल - आत्ता? पहाटे साडेपाचला?
रेणू - अरे, पाचलाच येते म्हणाल्या होत्या. त्यांना चतुःशृंगीला जायचं होतं. देवीला. मला घेऊन चल म्हणत होत्या. 
कुणाल - तू हे काही बोलली नाहीस रेणू. आणि किती गर्दी असेल तिकडं आत्ता...
रेणू - अरे, तू काल उशिरा आलास. काल रात्री तू यायच्या आधी जस्ट येऊन गेल्या होत्या, त्या. 
कुणाल - अगं, तुला आज एवढी गडबड आहे, तर मग तू त्यांना सांगायचंस ना, जमत नाहीय म्हणून...
रेणू - खरंय रे. पण काकूंचं मन मोडवलं नाही मला. आणि पहाटे जायचं होतं ना. तुझ्यासाठी उठायचंच होतं मला लवकर. म्हणून मी त्यांना हो म्हटलं...
कुणाल (हसत) - धन्य आहात हो आपण... हात जोडतो...

(तेवढ्यात बेल वाजते.)

रेणू - आल्याच बघ त्या. तू निघणार आहेस ना लगेच.
कुणाल - हो. आता एकदमच बाहेर पडू.
रेणू - हो, एक मिनिट. 

(दार उघडते. दिघेकाकू येतात.)

दिघेकाकू - अगं बाई, अजून तयार नाही का झालीस? आणि तू एवढा पहाटेचा का उठलायस रे बाबा?
कुणाल - काकू, मी ट्रेकला चाललोय. म्हणून लवकर उठून आवरून बसलोय.
रेणू - काकू, पाच मिनिटं बसा हं. मी आवरून येते.
दिघेकाकू - सावकाश गं बाई. माझ्यामुळं तुझी गडबड झालेली दिसतेय. अगं काल बोलली असतीस, तर मी त्या श्रद्धाला सांगितलं असतं. तिच्याबरोबर गेले असते.
रेणू - असू द्या हो काकू. माझी शनिवारची गडबड नेहमीचीच आहे. कुणाल ट्रेकला जाणार, म्हणून मला लवकर उठायचंच होतं. त्यामुळं तुमच्यामुळं काही त्रास झालेला नाही.
दिघेकाकू - अगं, आमच्याकडं नवरात्राची पूर्वी गडबड असायची. गौरींसारखंच नवरात्रही साग्रसंगीत करायचे. आता फक्त गौरींचं तेवढं करते. नवरात्राचं एवढं होत नाही बाई मला. म्हणून म्हटलं, निदान नऊ दिवसांतले एक-दोन दिवस तरी पहाटे जाऊ देवीला...
रेणू - काकू, तुमची तब्येत सांभाळून तुम्ही करताय ते पुष्कळ आहे.
दिघेकाकू - हो बाई. पण तुला खरं सांगू का, सणाचे दिवस आले, की मनाला आपोआप एक उत्साह येतो बघ. वातावरण पण कसं बदलतं ना...
कुणाल - काकू, मला पण केवळ या बदललेल्या वातावरणामुळं ट्रेकला जायचा उत्साह आलाय. पाऊस संपलाय, सगळीकडं हिरवंगार झालंय. तुमचा रोजचा रंग कुठला का असेना, आमच्या मनाचा रंग तरी रोज 'हिरवा' असाच झालाय बरं का! 
रेणू (लटकेपणानं) - काही सांगू नकोस तुझ्या हिरव्या मनाचं... पुरे झालं कौतुक...
दिघेकाकू - निसर्ग हा खरा जादूगार आहे बघ रेणू. या दिवसांत हे असं छान वातावरण तयार होतं सगळीकडं आणि नेमके त्याच काळात आपले हे सगळे सण येतात...
कुणाल - खरंय काकू. आपल्या भोवतालाचा आपल्यावर परिणाम होतच असतो. बघा ना, कडक उन्हाळा असेल, तर कसं मलूल झाल्यासारखं वाटतं. धुवाँधार पाऊस पडत असेल, तर फार भव्य, उदात्त असं काही तरी वाटतं आणि हिवाळा तर माझ्यासाठी सृजनाचा ऋतू आहे. असलं भारी वाटतं ना हिवाळ्यात... मला तर वाटतं, की आपण युरोपातच जन्माला यायला हवं होतं. 
रेणू (हसत) - अगदी अगदी. बरं का काकू, कुणालला तर पूर्वी या ऋतूत कविता वगैरे व्हायच्या.
दिघेकाकू - अगं, याचं सोड. मीदेखील कविता करायची. अगदी गेल्या हिवाळ्यातसुद्धा मी कविता केली होती. तुला ऐकवीन एकदा...
रेणू - वा, वा... आत्ता ऐकवा ना... 
दिघेकाकू - एवढी कुठली गं लक्षात माझ्या... घरी असेल वही माझी... पण ऐकवीन एकदा...
कुणाल - काकू, तुम्ही चक्क कविता करता? माहिती नव्हतं हं हे अजिबात. दंडवत घ्या...
दिघेकाकू - तुला वाटलं काय कुणाल? अरे, आमच्या मिरजेच्या कॉलेजमध्ये मी काव्यवाचनात पहिली आले होते. पण नंतर संसाराच्या रामरगाड्यात कविता हरवलीच बघ कुठं तरी...
रेणू - असंच होतं हो काकू... पण तुम्ही परत कविता लिहायला लागलात हे ऐकून फार छान वाटलं बरं का! 
दिघेकाकू - अगं, एवढी काही विशेष नाही. उगाच आपली करमणूक म्हणून चार ओळी खरडायच्या झालं.
कुणाल - काकू, तुमच्या आनंदासाठी तुम्ही लिहिता ना... हे सगळ्यांत बेश्ट आहे बघा. आपण आपला आनंद मिळवावा. मला पक्षिनिरीक्षणातून, ट्रेकमधून मिळतो. रेणूला गाण्यातून, भाषेच्या अभ्यासातून मिळतो. तुम्हाला तर स्वयंपाक करून लोकांना खायला घालण्यातसुद्धा आनंद मिळतो. खरं की नाही!
दिघेकाकू - कळतंय बरं का... गौरीचं मेहुण झालं, आता नवरात्रात कधी बोलावताय जेवायला, असं म्हण की सरळ...
कुणाल (हसतो) - नाही नाही. असं काही नाही. पण बघा, म्हणजे तेवढं ते पुरणपोळी, साजूक तूप वगैरे...
रेणू - कुणाल, कमाल आहे हं तुझी. अरे, काकूंना काय सांगतोयस? मी करीन की घरी...
दिघेकाकू - असू दे गं. गेल्या वर्षीपासून मी हे नवरात्राचं जरा कमी केलंय. म्हटलं ना, हल्ली होत नाही म्हणून. नाही तर माझं आमंत्रण ठरलेलं असतं. तुम्हालाही माहिती आहे. 
कुणाल - काकू, नाही हो. गंमत केली. तुम्हीच या आज आमच्याकडं जेवायला. मी तर बाहेर चाललोय. दुपारी रेणू आणि सारा दोघीच आहेत घरी. 
रेणू - कुणाल, मी काकूंना ऑलरेडी सांगून ठेवलंय. आम्ही बाहेरच जाणार आहोत जेवायला. माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी पण येणार आहेत.
कुणाल - आयला! परस्पर प्लॅन ठरवून मोकळ्या! मला कुणी सांगायलाही तयार नाही. कुणाल ट्रेकला निघाला, की तुमचे इकडे प्लॅन सुरू... काय!
दिघेकाकू - असू दे रे. तुला काय सांगायचंय सगळं... आमचं आम्ही ठरवलंय. पण रेणू, अगं, किती वेळ बोलत बसलोय आपण... जायचंय ना देवीला. पटकन जाऊन येऊ. 
रेणू - हो काकू. निघू या. कुणाल पण निघणार आहेच... 
कुणाल - रेणू, तू काकूंकडं नीट बघितलंस का? काकू आज ग्रे कलरची साडी नेसल्यायत चक्क...
दिघेकाकू (लाजून हसतात) - अरे काय सांगू, आमच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपवर. त्यात आम्ही ठरवत असतो हे असलं सगळं. आज संध्याकाळी आमच्या मंडळाचा कार्यक्रम पण आहे. गेटटुगेदर की काय ते!
रेणू - काकू, हे भारी आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर आहात हे माहिती होतं. पण तुमचा ग्रुप वगैरे हे आजच कळतंय. मस्तच हं...
दिघेकाकू - आम्हा म्हाताऱ्यांना चांगली करमणूक झालीय बाई ती. माझी ती मिरजेची मैत्रीण आहे ना वीणा, तिनं पुढाकार घेऊन केलंय हे सगळं. ती पण हल्ली पुण्यातच आलीय राहायला.
कुणाल - व्वा.. व्वा... काकू, हे तुम्ही जे काळासोबत राहताय ना, ते फार छान वाटतंय बघा.  
दिघेकाकू - अरे, आता आमचे दिवस असे राहिलेतच किती! आला दिवस सुखानं कसा घालवता येईल तेवढं बघायचं.
रेणू - काकू, काहीही बोलता हं. काय झालंय तुम्हाला... मागच्या वेळी तर म्हणाला होतात, की बसल्या बैठकीला आजही २०-२५ माणसांचा स्वयंपाक कराल म्हणून...
दिघेकाकू - होच मुळी. मी आहे तेवढी खंबीर. पण हल्ली कुणाचं काही सांगता येत नाही बाई. त्यामुळं फार ताण नको वाटतो मनाला... देवाचं आपलं होईल तेवढं करते.
कुणाल - काकू... हे पटलंय आपल्याला. फार मस्त बोललात.
रेणू - खरंय अगदी. फार ताण घ्यायचाच कशाला? हे जगणं मस्त मजेचं आहे. ते तसंच जगू या.
कुणाल - आता तुम्हा दोघींना असं बोलताना बघून मला भरून वगैरे आलं आहे. सकाळी तुम्हा दोघींच्या रूपात मलाच देवीचं दर्शन झालंय असं वाटतंय. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये हे देवीतत्त्व असतं. आपण ते ओळखायला आणि त्याचा आदर करायला शिकायला पाहिजे, असं मला नेहमी वाटतं.
रेणू - नुसतं असं बोलून काही उपयोग नाही रे कुणाल. वागण्यात दिसलं पाहिजे ते...
दिघेकाकू - आणि नुसतं याच्या नाही गं... सगळ्या पुरुषांच्या वागण्यात दिसलं पाहिजे.
कुणाल - झालात का सुरू तुम्ही परत? देवी कोपली का लगेच? आता काय करावं?
रेणू (हसून) - ऐक मग वत्सा! या देवीला आत्ताच्या आत्ता गरमागरम चहा हवा आहे. तो भक्त कुणाल आणून देईल का?
दिघेकाकू - भक्ता, मलाही अर्धा कप चालेल.
कुणाल (हसतो) - तुम्हाला सकाळी सकाळी चहाचा नैवेद्य दाखवला, म्हणजे आमचा ट्रेक जोरदार होईल. चला, तिकडं गडावरची व्याघ्रेश्वरीही आमची वाट पाहत असेल. अभ्याचा मेसेजही आलाय. निघू या म्हणून. तेव्हा आता चहा घेऊ आणि निघू....
रेणू व दिघेकाकू - व्वा... नीट जा, नीट ये. शुभास्ते पंथानः सन्तु...

(सगळे हसतात...)
---

३. २० ऑक्टोबरचा भाग
-----------------------

(पार्श्वभूमीवर माणसांचे बोलल्याचे आवाज येत आहेत...)

रेणू - कुणाल, कुणाल, अरे इकडं, इकडं आहोत आम्ही... 
सई - कुणाल... अरे इकडं बघ...
कुणाल - इकडं आहात होय तुम्ही... कुठं कोपऱ्यात येऊन बसलात?
रेणू - ए, इथं किती गर्दी असते माहितीय ना सकाळच्या वेळी? लगेच जागा मिळाली हेच खूप झालं...
कुणाल - अगं, मी गाडी पार्क करून येईपर्यंत थांबायचं ना पाच मिनिटं...
सई - ए, आम्ही थांबलो होतो रे. पण इकडं जागा झाली आणि वेटरनी हाक मारली आम्हाला... आणि बरं झालं आलो लवकर ते... किती वेटिंग आहे बघ आता...
कुणाल - हो ना. कंटाळा येतो या गर्दीचा यार. मला तर शनिवारी उठून कुठं जायचं म्हणजे ना असा वैताग येतो! आणि या रस्त्यावर गाडी लावायला एक जागा मिळत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे.
रेणू - अरे, मग काय केलं, शेवटी?
कुणाल - अगं, इथं ते कॉर्पोरेशनचं पार्किंग झालंय तिकडं लावून आलो गाडी. तिथून चालत आलो. अर्धा किलोमीटर तरी लांब असेल...
सई - तरीच वेळ लागला बरं का रे तुला...
कुणाल - मग काय अगं! उगाच पायपीट... पण तुम्हाला हे 'खादाडेश्वर'च लागतं ना...
रेणू (हसत) - असू दे रे... तसंही आज तू वॉकिंगला दांडी मारली आहेस. पार्किंगच्या निमित्तानं तेवढंच तुझं चालणं झालंय...
कुणाल - ए काही नाही गं... मागच्याच शनिवारी मी ट्रेकच्या निमित्तानं खूप खूप खूप चाललोय. माझा आठवड्याचा कोटा खरं तर मागच्या शनिवारीच भरलाय. कळलं ना...
सई - ए हो... मजा आली ना. संध्याकाळी पाय दुखले रे पण जाम... पण हा चेंज आपल्याला पाहिजेच होता नाही का! ए रेणू, पुढच्या ट्रेकला तू पण चल. 
रेणू - अगं, साराचं सगळं शेड्यूल बघावं लागतं बाई... आज पण तिला दिघेकाकूंकडं सोडलंय तास-दीड तासात जाऊन येते म्हणून... मग झाली माझी सुटका...
कुणाल - तुझी धावपळ होतेय खूप रेणू, हे मान्यच आहे. पण ट्रेकचं हे एक निमित्त होतं बघ. त्या निमित्तानं मी पण खूप दिवसांनी पुण्याच्या बाहेर पडलो. बाहेर अजून जरा बरं वातावरण आहे. सह्याद्रीच्या कुशीत हिरवागार निसर्ग आहे, स्वच्छ हवा-बिवा आहे... एकूण बाहेर बरं चाललंय जगाचं... (हसतो)
सई - मग काय... मी तर तो स्वच्छ हवेतला ऑक्सिजन असा भरभरून घेतला शरीरात. त्या जोरावर पुढचा एक महिना आता सहज निघेल. मग दिवाळी झाल्यावर पुन्हा एका ट्रेकचं प्लॅनिंग आहेच... आणि रेणू, तुला त्या वेळी मी नेणारच आहे, बरं का...
रेणू - मी तर शेवटची अशी ट्रेकला वगैरे कधी गेले होते हेच मला आठवत नाहीय. साराच्या जन्मापासून तर गेली चार-पाच वर्षं ट्रेक सोड, साधं बाहेर कुठं फिरायला जाणं झालेलं नाही बघ आमचं...
सई - हो अगं, तुझी धावपळ खूपच वाढलीय ना रेणू...
रेणू - अगं पण धावपळ नाही केली, तर काहीच करता येणार नाही. करिअर वगैरे तर सोड. आपल्या उपजीविकेसाठी ही नोकरी करावी लागतेय तीही करता आली नसती मग...
कुणाल - पण काय गं, तुझ्या आवडीचा जॉब आहे ना... प्रोफेसर रेणू मॅडम... मराठीचा तुमचा अभ्यास सत्कारणी लागलाय ना. वर दणदणीत पगारही मिळतोय की छान.
सई - अरे, बाहेरून सगळं छान दिसतंच की. पण त्या त्या जॉबच्या अडचणी असतात त्या बाहेर कुणाला कळत नाहीत.
रेणू - बघ की... बरं ऑर्डर काय द्यायचीय ते सांगा पटकन... तो वेटर दोनदा येऊन गेलाय हं... आपण नुसतं पाणीच पितोय मघापासून... आता तो तिसऱ्यांदा येऊन आपल्याला खरंच पाणी पाजून जाईल हां... (हसते)
सई - मला चीज डोसा...
कुणाल - मला पण डोसाच, पण साधा...
रेणू - मग मी आप्पे घेते. आणि नंतर तीन फिल्टर कॉफी ना... हां... हे बेश्ट... 
कुणाल - मामा, घ्या लवकर ऑर्डर... हां, काय बोलत होता तुम्ही? जॉब आणि आनंद वगैरे ना... ते सगळं खरं सांगू का, रेणूच्या प्राध्यापकी मराठीत सांगायचं ना, तर सापेक्ष असतं बरं का सगळं...
रेणू - अरे हो की! आम्ही तक्रार करतच नाही आहोत. उगाच काय?
कुणाल - हो, सापेक्ष म्हणजे कुठलीही गोष्ट आपण तिच्याकडं कसं बघतो त्यावर असते ना... आता हा पाण्याचा जग, मला इथून जसा दिसतो तसा तुला तो तुझ्या जागेवरून दिसणारच नाहीय. तुला त्याची दुसरी बाजू दिसणार आहे.
सई - ए, फार बेसिक सांगू नकोस हां... हे आम्हालाही कळतंय. पण मूळ मुद्दा काय होता?
रेणू - अगं हेच. जॉब सॅटिसफॅक्शन, करिअर आणि कशासाठी आपण नक्की काय किंमत मोजतो हा विषय होता ना.
सई - त्यावर कितीही बोललो तरी शेवटी चर्चा अपूर्णच राहील. पण मला काय वाटतं, माहितीय का? आपण व्यवस्थापन शिकून घेतलं पाहिजे आयुष्यात... वेळेचं, माणसांचं, भावनांचं...
कुणाल - भावनांचं व्यवस्थापन? ओहो, छान मुद्दा आहे. पण त्याचा इथं काय संबंध?
रेणू - हो ना. म्हणजे या दोन गोष्टी कशा जोडतेयस तू?
सई - असं बघ. आपण आयुष्यात फोकस्ड असणं जसं महत्त्वाचं असतं ना, तसं ऑर्गनाइज्ड असणं पण महत्त्वाचं असतं. म्हणजे या दोन गोष्टी एकमेकींना पूरक आहेत. तुला प्राध्यापकीमध्ये करिअर करायचंय हा तुझा फोकस झाला आणि त्यासाठी तुझ्या आयुष्यातल्या त्याच्याशी निगडित सर्व गोष्टींचं छान व्यवस्थापन करणं हे ऑर्गनाइज्ड असणं झालं. राइट?
कुणाल - हो, पण हा टाइम मॅनेजमेंटचा विषय झाला. भावनांचा संबंध येतो कुठं?
सई - अरे, आपण माणसं आहोत ना! की रोबो आहोत? आपण काम करतो म्हणजे आपलं मन गुंतलेलं असतं तिथं. इन फॅक्ट, आपण मन गुंतविल्याशिवाय कुठलंही काम नीट करू शकत नाही. पण हे मन म्हणजे मोठी विचित्र गोष्ट असते. त्यावर आपलं नियंत्रण नसतं. मग ते इकडं-तिकडं भरकटतं. पण त्याला पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी आणि पुन्हा त्याच्याकडून फोकस्ड पद्धतीनं काम करवून घेण्यासाठी जे करावं लागतं ना, त्याला भावनांचं व्यवस्थापन म्हणतात.
कुणाल - ए, हे खूप बोजड होतंय हं... बाउन्सर जाताहेत.
रेणू - हं, मला थोडं कळलं सई काय म्हणतेय ते... आपल्याला कधी कधी कामाचा, रुटीनचा वैताग येतो बघ. फटिग येतो. तेव्हा आपण काय म्हणतो, मरू दे. सोडून देतो आता हे सगळं... तेव्हा एक प्रकारे तो भावनांचा उद्रेकच असतो. पण आपण प्रत्यक्षात काही असा जॉब सोडू शकत नाहीच. त्यातून मग फ्रस्ट्रेशन येतं. मग मुळात त्या उद्रेक होऊ घातलेल्या भावनांना नियंत्रित करणं गरजेचं असतं.
कुणाल - ते कळलं. पण ते करायचं कसं? 
सई - ओके. आता तुम्हाला बेसिकली भावनेच्या व्यवस्थापनाची गरज पटलीय हे महत्त्वाचं. एकदा आपण ही गरज मान्य केली, की मग त्यावरची उपाययोजना स्वीकारणं सोपं असतं. परिस्थितीचा स्वीकार करणं, तिची अपरिहार्यता समजून घेणं ही सगळ्या समस्यांच्या पूर्ततेसाठीची पूर्वअट असते, हे लक्षात घे. 
कुणाल - ए, हिच्या डोशात नक्की काय घालतंय पाहा गं रेणू? ही फार जड जड बोलतेय...
सई (हसते) - सॉरी सॉरी. अरे पण, हे फार अवघड नाहीय समजायला. 
रेणू - ए, तू सांग गं... छान सांगतीयेस... मजा येतेय मला ऐकताना.
सई - हं, तर ऐक. तुला उद्या अचानक असं वाटायला लागलं, की आपण जे काही करतोय त्यात काही अर्थ नाही. हे काम आपल्या योग्यतेचं नाही, आपण दुसरं काही तरी करायला हवं, तर याचा अर्थ तू काय घेशील?
कुणाल - याचा अर्थ एक तर माझ्या कामात साचलेपणा आलाय किंवा मी स्वतः साचेबद्ध झालोय.
सई - राइट. मग यावर उपाय काय? 
कुणाल - काम बदलून बघणं...
सई - उपयोग होईल?
रेणू - नाही. कारण हा माणूस तोच आहे. 
सई - हं, म्हणजे दोन्ही अर्थांनी लागू आहे. तुझ्या कामात साचलेपण आलं असेल, तर तुला काम बदलून बघितल्यावर लगेचच फरक लक्षात येईल. पण काम बदलूनही तुला निरर्थकता जाणवत राहिली तर प्रॉब्लेम कुठं आहे?
कुणाल - माझ्यात... (एकदम उसळून) ए, माझा काय इंटरव्ह्यू चालवलाय का तुम्ही दोघींनी? की उगाच कौन्सेलिंगचे प्रयोग करताय माझ्यावर? मला काहीही झालेलं नाहीये हां... सांगून ठेवतोय.
सई - हे बघ, हे बघ. ही अशी आततायी प्रतिक्रिया देणं हेसुद्धा काही तरी बिघडल्याचंच लक्षण आहे बरं का कुणाल... (हसते.) 
रेणू - ए, तू ती सांगतेय ती उत्तरं दे. नाही तर आम्ही दोघी बोलतो.
कुणाल - नाही नाही, ठीक आहे. हं, बोल. 
सई - तर सांग ना, काम बदलूनही तुला निरर्थकता जाणवत राहिली तर प्रॉब्लेम तुझ्यात आहे हे तुला कळलं ना...
कुणाल - हो कळलं. पण भावनांचं व्यवस्थापन कुठं येतंय इथं? बाकी तो शब्द आपल्याला आवडलाय बरं का सई! भावनांचं व्यवस्थापन... मस्त... रेणू, काही तरी ब्लॉग वगैरे लिही ना यावर.
रेणू - तू शांत बस रे. ती चांगलं काही तरी सांगतेय तर ऐकून घे ना...
कुणाल - हो, हो. शहाण्या मुलासारखा वागतो. हातावर बोट, तोंडावर घडी...
सई (हसते) - हा हा हा. तसं नसतं रे ते. हाताची घडी, तोंडावर बोट... असं असतं ते...
रेणू - याला आधी शब्दांचं व्यवस्थापन शिकवावं लागणार आहे मला...
सई - बघ की. तर ऐक रे नीट. तर आपला प्रॉब्लेम झालेला असतो, हे आपल्याला कळतं. पण तो नक्की काय प्रॉब्लेम झालाय हे माहिती नसतं. तर हा प्रॉब्लेम असतो तो भावनांच्या व्यवस्थापनाचा... म्हणजे अॅक्चुअली भावनांच्या गैरव्यवस्थापनाचा...
रेणू - अच्छा अच्छा... येतंय लक्षात.
कुणाल - मला तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यासारखं वाटतंय. मी कुठं तरी गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार केलाय असं वाटायला लागलंय.
सई - ऐक रे जरा. तर हे भावनांचं व्यवस्थापन म्हणजे तरी काय! तर मोकळ्या माळरानात दावं सुटलेल्या वासरागत हुंदडणारं हे जे मन आहे ना, त्याला लगाम घालणं. त्याला आपल्या संयमाच्या गोठ्यात आणून बांधणं...
कुणाल - ए, ही काय बोलतेय! मानसशास्त्रातनं एकदम शेतीत कुठं शिरली ही... तुझंच मन जास्त हुंदडतंय सई. त्याला आवर घाल. 
सई - माझं मन बरोबर असायचं तिथंच आहे. माझा चीज डोसा संपलाय. तुझा बघ. अजून अर्धाही संपलेला नाही. आणि काय रे, शेतीत शिरली काय! मनाचं पण शेतीसारखंच असतं बरं का! त्या मनाचीही उत्तम मशागत करावी लागते. तरच त्यात चांगल्या विचारांचं पीक येतं. 
रेणू - हे भारी आहे हं वाक्य. सानेगुरुजींचं पुस्तक वाचल्यासारखं वाटतंय. 
सई - अगं हा बघ की. याला समजून सांगायचं म्हणून असं सोपं उदाहरण दिलं. 
रेणू - मला तर तुझं हे व्याख्यान ऐकून ते गाणं आठवलं - कई बार यूं ही देखा है... ये जो मन की सीमारेखा है... मन तोडने लगता है... अंजानी प्यास के पीछे, अंजानी आस के पीछे, मन दौडने लगता है... कसलं मस्त गाणं आहे ना! अगदी अर्थपूर्ण...
कुणाल - आमचं तर मन फॉर्म्युला वनमधल्या कारसारखं पळत असतं सतत...
रेणू - ते माहितीय आम्हाला. म्हणूनच सई हे सांगतीय ना...
कुणाल - नुकताच दसरा झालाय. आपल्याकडं आपण दसऱ्याला सीमोल्लंघन करतो. आणि ही सीमेच्या आत खेचतेय (हसतो)...
सई - अरे हो. ते सीमोल्लंघन वेगळं. काही तरी पराक्रम गाजवण्यासाठी आपल्या नेहमीच्या कक्षा सोडून, सीमा सोडून धैर्यानं पुढं येणं अशा अर्थानं सीमोल्लंघन अभिप्रेत आहे बरं का त्यात.
रेणू - हो ना! आम्हाला सीमोल्लंघन म्हणजे फक्त सिग्नलच्या अलीकडं मारलेल्या पांढऱ्या रेषेला ओलांडून पुढं जाणं आणि सिग्नलचं उल्लंघन करणं एवढंच माहिती आहे. 
कुणाल - आणि आमच्या वर्गात ना ती एक सीमा होती. आम्ही काय करायचो, तिच्या...
रेणू व सई (एकदम) - बास, बास... नको हां प्लीज. तो पीजे परत नको. भावना पोचल्या. 
कुणाल - पोचल्या ना... म्हणजे मला नीट व्यवस्थापन करायला जमतंय म्हणायचं त्या भावनांचं...
सई - कुणाल, अरे जमतंय तुला. मुळात काय आहे माहितीय का, आपण लहानपणापासून काही विशिष्ट संस्कार, शिकवण घेऊनच वाढत असतो. त्यात आपल्या रुढी-परंपरा असतातच. या सगळ्यांतून आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं. त्यातून हे भावनांचं व्यवस्थापनही आपण नकळतपणे करतच असतो. पण कधी कधी हे दोर सैल पडतात आणि मन भरकटतं. मग करिअरवरचाही फोकस हलतो आणि उगाच फ्रस्ट्रेशन येतं. ते टाळलं की झालं.
रेणू - हं, दोर सैल झाले आहेत हे बाकी खरंय बरं का...
कुणाल - अरे, तुम्ही म्हणजे मी कुणी तरी बैल आहे आणि माझा कासरा तुमच्या हातात आहे असंच बोलताय. कम्मॉन... आणि तुम्हाला नाही का गरज भावनांचं व्यवस्थापन करण्याची? की आज फक्त माझीच शाळा घेताय?
सई - अरे, यात तू किंवा आम्ही असा काही भेदभाव नाही. हा नियम सगळ्यांनाच लागू आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही. उलट स्त्रीचं मन जास्त हळवं असतं. तिला तर याची जास्त गरज आहे. 
कुणाल - हां, आता कसं! या रेणूला सांग. तिची फारच द्विधा अवस्था झालेली असते कायम...
रेणू - मुळीच नाही. करिअर करण्यावर मी ठाम होते आणि म्हणूनच ते झालंय. कळलं ना... 
कुणाल - बरं बाई. तू महान आहेस. पण ए, ऐका दोघीही. उशीर झालाय. आता मला खरोखर सीमोल्लंघन करण्याची वेळ आलेली आहे. मी निघू का? माझी काही अर्जंट कामं आहेत. ती करून मी परस्पर घरी जाणार आहे. तुम्ही दोघी बसा हवं तर...
सई - हो. नीघ लवकर. आणि पुढच्या वेळी भेटायला वेळेत ये.
कुणाल - का बुवा का? 
सई - कारण, पुढचं लेक्चर मी वेळेचं व्यवस्थापन यावर ठेवणार आहे. 

(सगळे हसतात.)

---

४. २७ ऑक्टोबरचा भाग
-----------------------

(कुणाल व रेणू गोंधळेकरकाकांच्या घरी आले आहेत... दारातून कुणाल हाक मारतो...)

कुणाल - काका आहेत का घरी?
गोंधळेकरकाका - अरे, कुणाल? रेणू? या, या, या... या गोंधळेकरांच्या घराला आपल्या चरणकमलदल लागले... वा, वा... आम्ही धन्य झालो...
रेणू (हसते) - काय हो काका? कधी येत नाही का आम्ही?
कुणाल - मग काय? अहो, तुम्हाला बरं नाही असं कळलं म्हणून मुद्दाम आलो. बाहेरच निघालो आहोत. म्हटलं, तुमच्याकडं डोकावून जावं....
गोंधळेकरकाका - ते बरं केलंस. अरे, तुम्ही आमच्या घरी यायचे प्रसंग कमीच. मी मात्र अनेकदा येत असतो की नाही सांगा तुमच्याकडं...
रेणू - असू दे हो काका. बरं, आता कसंय तुमचं?
गोंधळेकरकाका - बरंच आहे म्हणायचं. काल सकाळी चालायला गेलो, तेव्हा जरा धाप लागल्यासारखी वाटली. आमची ज्येष्ठ नागरिकांची गँग होतीच सोबत. रामभाऊ होते, शिंदेकाका होते. मग जरा बसलो, पाणी प्यायलो. मग शिंदेकाका मागंच लागले, की लगेच डॉक्टरला दाखवू या म्हणून. मग गेलो दोघे रिक्षा करून डॉक्टर जोशींकडं... ते आमचे फॅमिली डॉक्टरच. त्यांनी तपासलं. बीपी जरा हाय झालं होतं. बाकी काळजीसारखं काही नाही म्हणाले. पण जरा वजन कमी करायला सांगितलंय. शिवाय एकदा संपूर्ण चेकअप पण करून घेऊ म्हणाले आहेत.
कुणाल - काका, तुम्ही सत्तरीचे वाटत नाही हे खरंय. पण तरीही तब्येतीची काळजी घेतलेली बरी, नाही का? डॉक्टर जोशी म्हणताहेत, तसं एकदा खरंच संपूर्ण चेकअप करून घ्या. हवं तर मी येईन तुमच्यासोबत हॉस्पिटलला.
रेणू - अरे, हल्ली तर घरी येऊनसुद्धा सगळं चेकिंग करतात. 
गोंधळेकरकाका (हसतात) - अगं रेणू, मी एवढा म्हातारा झालेलो नाहीय. मी स्वतः चालत जाईन हॉस्पिटलात... हो...
कुणाल - हो, हो. मला खात्री आहे तुमच्याबद्दल. पण मी आलो तरी काही बिघडत नाही. असू द्या.
गोंधळेकरकाका - हं... आता मी ठीक आहे बरं का, पण आता सांगायला हरकत नाही, की काल एका क्षणी ब्रह्मांड आठवलं होतं. तो जो अस्वस्थतेचा एक क्षण असतो ना, तो एखाद्या युगासारखा वाटतो. आजूबाजूला सगळी माणसं असतात, पण यातलं आत्ता आपल्या कुणीच उपयोगाचं नाही, असं वाटायला लागतं.
रेणू - आई गं... किती वाईट फीलिंग आहे ना हे...
कुणाल - हे बघ रेणू, आपण शेवटी हाडामासाची माणसं आहोत. वेदना झाली की कण्हणार, दुःख झालं की रडणार, तसंच आनंद झाला की हसणार. नाही का?
गोंधळेकरकाका - नाही रे कुणाल. मी सांगतोय ते जरा वेगळं आहे. तुम्ही अजून लहान आहात. पण माझ्यासारख्या वय झालेल्या माणसाला ना, ही सगळं संपत चालल्याची जाणीव फार त्रासदायक असते. ती अस्वस्थता नुसती शारीरिक नसते; मानसिक जास्त असते. एका क्षणी असं वाटतं, की संपलं आता सगळं... आता काही आपण जगत नाही. आणि मग त्या क्षणभरात आपलं मन हजारो प्रकाशवर्षांइतकं वेगानं धावून किती तरी गोष्टींचा विचार करतं. आपलं हे करायचं राहिलंय, आपलं ते राहिलंय, हे अजून पाहिलं नाही, ते अजून दिसलं नाही... किती तरी गोष्टी!
रेणू - काका, मी कल्पना करू शकते. माणसाचं मन ही फारच विलक्षण गोष्ट आहे. 'वैरी न चिंती ते मन चिंती' असं म्हटलंच आहे. पण खरं सांगू का, आपल्या जगण्याला शिस्तबद्ध जीवनशैलीची जोड दिली ना, तर पुष्कळ गोष्टी सोप्या होतात.
कुणाल - आली, आली. रेणूचं शिस्तीवरचं व्याख्यान ऐकण्याची वेळ आली. (हसतो) अहो काका, मागच्या शनिवारी हिनं आणि त्या सईनं माझी अशीच शाळा घेतली होती. त्या 'खादाडेश्वरा'तला तो पेसरट्टू डोसा काही मला नीट खाऊ दिला नव्हता या दोघींनी... भावनांचं व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन, शब्दांचं व्यवस्थापन... अहो, एका क्षणी तर मला वाटलं, की मी पुन्हा मॅनेजमेंटच्या कोर्सला अॅडमिशन घेतलीय...
रेणू - पण काही खोटं आहे का ते? तुझ्याच भल्यासाठी सांगत होतो बरं का आम्ही! 
गोंधळेकरकाका - कुणाल, ती सांगतीय ते काही खोटं नाही बरं का... अरे, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात वर्षातून किमान २०-२५ व्याख्यानं होतात. त्यातली ९० टक्के ही आपल्या जीवनशैलीत कसा बदल करावा हे सांगणारी असतात. खरं तर आम्ही जुन्या पिढीतली माणसं... उलट आम्हाला या तुमच्या एकविसाव्या शतकातल्या जीवनशैलीशीच जुळवून घेता येत नाही बघ. सारखे धावत असता तुम्ही मंडळी... पण त्रास आम्हाला होतो.
कुणाल - काका, अहो, आजच्या काळात दुसरा काही इलाज आहे का त्याला सांगा! धावलो नाही तर मागे पडू. स्पर्धाच एवढी तीव्र आहे सगळीकडं...
रेणू - ते सगळं खरंय कुणाल. पण आयुष्याला एक ठेहराव हवा, स्वल्पविराम हवा, पॉज हवा. गाण्यात या 'ठेहरावा'चं महत्त्व आहे. गायक असा एकतानतेनं गात असतो, स्वरांच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतो आणि मग त्याच्या गाण्यात तो एका क्षणाचा ठेहराव येतो बघ. तिथं श्रोतेही थबकतात. त्यांना तो 'पॉज' जाणवतो. खरे रसिक असतात ते या ठेहरावालाही दाद देतात आणि गाणं पुढं सुरू राहतं. नाटकात तर हा 'पॉज' किती महत्त्वाचा असतो हे मी तुला सांगायला नकोच...
कुणाल - खरंय गं ते सगळं रेणू. पण इथं आयुष्याचंच नाटक झालंय बघ सगळं... कसले पॉज आणि कसलं काय! 
गोंधळेकरकाका - तो वर बसलाय ना, त्याच्या हातात सगळ्यांच्या दोऱ्या आहेत बरं का. तो खेळवतोय आपल्या सगळ्यांना... त्याच्या लेखी आपला पार्ट संपला, की आपली नाटकातून एक्झिट ठरलेली.
रेणू - व्वा काका! तुम्ही एवढी छान फिलॉसॉफी मांडताय, तर मग घाबरता कशाला? सरळ आल्या प्रसंगाला तोंड द्या... आणि काही होत नाही तुम्हाला इतक्यात... शंभर वर्षं जगणार आहात तुम्ही...
गोंधळेकरकाका (हसतात) - कसं आहे रेणू, फिलॉसॉफी आणि सल्ला या गोष्टी दुसऱ्याला फुकट द्यायला छान वाटतात. आपल्यावर त्याचा प्रयोग करायची वेळ आली ना, की मग खरं काय ते कळतं. 
कुणाल - मला त्या ठेहरावाची आयडिया आवडलीय रेणू. आपण खरंच आपल्या या अत्यंत व्यग्र वगैरे, पण खरं तर फालतू दिनक्रमातून वेळ काढला पाहिजे यार. ठेहराव जरूरी है... आय नीड अ पॉझ... 
रेणू - मग तू आजच काही तरी ठरव. तुला आजच्या दिवसाची एक गंमत माहितीय का? 
कुणाल - नाही. काय आहे आज?
रेणू - आज २७ ऑक्टोबर. म्हणजे हा वर्षातला तीनशेवा दिवस असतो.
गोंधळेकरकाका - काय सांगतेस? तुला या अशा गोष्टी बऱ्या माहिती असतात गं?
रेणू (हसते) - अहो, हे 'व्हॉट्सअप ग्यान' आहे काका. मी 'व्हॉट्सअप विद्यापीठा'ची पदवीधर झालीय ऑलरेडी...
कुणाल (हसतो) - हा हा हा. ते काही सांगायला नकोच. आणि या विद्यापीठात रोज सकाळी नाश्त्याला बदामाचा शिरा असतो बरं का काका...
रेणू - गप रे... किती वेळा त्या बदामांचा उद्धार! मी काय सांगतेय ते ऐक. तर २७ ऑक्टोबर हा वर्षातला तीनशेवा दिवस. आणि अर्थात लीप इयर असेल तर हा तीनशे एकावा दिवस असतो. तर मुद्दा काय, की हा एक चांगला मुहूर्त आहे ना, आपण वर्षभरात काय केलं, काय करायचं राहिलं याचा आढावा घ्यायला! बघ. तीनशे दिवस संपले आणि फक्त ६५ दिवस राहिलेयत आता २०१८ चे.
गोंधळेकरकाका - अरे वा... मला हे माहिती नव्हतं बरं का रेणू. चांगली कल्पना आहे की ही.
कुणाल - मला तरी आत्ता उरलेले ६५ दिवस फक्त झोपून, लोळून, आराम करीत, सिनेमे बघत घालवायचे आहेत गं रेणू... जमेल का हे? बघ ना, म्हणजे तूच मला मदत करू शकशील...
रेणू - ऐक जरा. ऑन ए सीरियस नोट, तू खरंच तुझी सगळी बेरीज-वजाबाकी मांड वर्षभराची. हवं तर चक्क लॅपटॉपमध्ये एक्सेल शीटमध्ये कर. आणि मग बघ. तुझं तुलाच कळेल, की तू हे तीनशे दिवस कसे घालवलेयत ते... 
कुणाल - नको नको. मला आत्ताच माहिती आहे, की मी अनेक गोष्टी करीन करीन म्हटलं आणि केलेल्याच नाहीयत. सगळं वर्ष असंच जाणार आहे.
गोंधळेकरकाका - असं आयुष्य आखून-रेखून जगता आलं असतं, तर काय पाहिजे होतं रेणू! पण तुला खरं सांगू का, आयुष्यात जी अनिश्चितता आहे ना, ती फार सुंदर गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात ना, ती 'ग्लोरियस अनसर्टन्टी' की काय, ती! पुढं काय वाढून ठेवलंय हे माहिती नसतं. म्हणून तर उजाडणारा प्रत्येक दिवस कसा मस्त येतो.
रेणू - काका, हे अगदीच मान्य आहे. पण याचा अर्थ आयुष्यात आपल्याला जे काही करायचंय त्याचं नियोजन करू नये असा नाहीय. हे बघा. सुरळीत चाललेल्या आयुष्यात अनेक गोष्टी नियोजन करून पार पाडता येणाऱ्या असतात. त्यामुळं एक तर आपला वेळ वाचतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या गुणामुळं एकूणच आयुष्य ऑर्गनाइज्ड व्हायला मदत होते.
कुणाल - क्रिकेटवरून आठवलं. अरे, आज आपल्या पुण्यात मॅच आहे यार. आपली आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे दुपारी इथं. गहुंज्यात. मला जायचं होतं खरं तर... मित्र तयार होते, पण ही रेणू नको म्हणाली.
गोंधळेकरकाका - का गं? जाऊ द्यायचं की त्याला तरी...
रेणू - अहो काका, मागं एकदा आम्ही गेलेलो आहोत तिकडं. तुम्हाला खरं सांगते, आपल्या घरी सोफ्यावर निवांत बसून सामना बघणं यासारखं सुख नाही. 
कुणाल - तुला तर क्रिकेट आवडतच नाही. तू काही बोलूच नकोस. सामना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यात जे थ्रिल आहे ना, ते नाही कळायचं तुला.
गोंधळेकरकाका - पूर्वी पुण्यात एवढे सामने होत नसत. आम्ही मुंबईला जाऊन कसोटी सामने पाहिले आहेत. ब्रेबॉर्न स्टेडियमला... गावसकर, विश्वनाथ, वाडेकर, सरदेसाई.... अहाहा... वेस्ट इंडिजचे ते मार्शल, होल्डिंग, गार्नर रॉबर्टस वगैरे लोक आग ओकायचे अक्षरशः आग... आणि आपला हा पठ्ठ्या - गावसकर - हेल्मेट न घालता खेळायचा. पण त्याची नजर अशी तेज, की कधीही बॉल डोक्याला लागला नाही. 
रेणू - झालं. काका रमले आता नॉस्टॅल्जियात... पण काका, खरंच तुम्हाला एवढं आवडतं क्रिकेट तर तुम्ही आता यू-ट्यूबवर सगळ्या जुन्या मॅचेस पाहू शकता. 
गोंधळेकरकाका - काय सांगतेस? मागच्या आठवड्यात आमचा रामभाऊ पण मला त्या कुठल्या तरी अॅपविषयी सांगत होता बरं का... पण आता आम्हाला हे एवढं टेक्निकल काही जमत नाही हो तुमच्या पिढीसारखं...
कुणाल - काही नाही काका. सगळं अत्यंत सोपं आहे. हे सगळे अॅप किंवा टेक्नॉलॉजी ही यूजर फ्रेंडली अशी तयार करतात. अगदी लहान मुलांनाही वापरता येईल अशी. तुम्हाला तर सहज जमेल.
रेणू - कुणाल, काकांना ते हेल्थचे अॅप पण डाउनलोड करून दे. रोज प्रकृतीचे सगळे अपडेट्स कळतील.
गोंधळेकरकाका - ते सगळं ठीक आहे. पण यंत्रानं आपल्या तब्येतीची चौकशी करण्यापेक्षा तुमच्यासारख्या जिवंत, हाडामांसाच्या माणसांनी प्रत्यक्ष घरी येऊन विचारपूस केली ना, तर ते आम्हाला जास्त आवडतं रे. आमचं आयुष्य त्यामुळं नक्कीच एक-दोन दिवसांनी वाढतं. 
कुणाल - काका, अगदी बरोबर आहे. आता मी किंवा रेणू रोज संध्याकाळी तुमच्याकडं थोडा वेळ येऊन बसत जाऊ.
गोंधळेकरकाका - आमच्या आयुष्यातल्या कॅलेंडरमधले तीनशे दिवस संपले. आता फक्त ६५ राहिले बघ. तेवढे आनंदानं, हसतमुखानं, आपला दुसऱ्याला अजिबात त्रास न होता जाऊ दे, एवढीच त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना आहे. बरं, हे मोदक घ्या. काजूचे मोदक... आज चतुर्थी आहे. म्हणून आणले.
रेणू - अहो काका, तुम्हाला बरं नाहीय ना. मग उपास वगैरे कशाला करताय?
गोंधळेकरकाका - उपास अजिबात नाही. सगळं खाऊन-पिऊन देवाची भक्ती असते आपली... दुपारी मिसळीचा बेत आहे. शिंदेकाका स्वतः पार्सल घेऊन येताहेत. तुम्हीही येता का?
रेणू - मला तर कॉलेजात जाययंच काका. अजून सुट्ट्या नाही लागल्या. त्यात दिवाळीची थोडी फार तयारी...
कुणाल - काका, मी एका पायावर तयार आहे. मला आज सुट्टीच आहे. आपण इथंच मिसळ खात, मॅच बघत दंगा करू...
गोंधळेकरकाका - वा, वा, वा... हे बेश्ट झालं बघ. ये... ये... तो गणपतीबाप्पा तुला अशीच सुबुद्धी देवो...
कुणाल (हसतो) - येतो, येतो. आयुष्यात थोडा 'ठेहराव' घ्यायलाच हवा ना... तो आज तुमच्या घरी घेतो... ठेहराव विथ मिसळ-पाव... वा, वा, वा!!!

(सगळे हसतात...) 

----

No comments:

Post a Comment