8 Nov 2018

रिव्ह्यू - आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

अवलियाचा 'कॅड्डॅक', नशीला खेळ
----------------------------------------


मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार अशी ख्याती मिळविणारे, अनेक लोकप्रिय भूमिका करून नाट्यरसिकांच्या हृदयात स्थान मिळविणारे डॉ. काशिनाथ घाणेकर हे एक मनस्वी वृत्तीचे, कलंदर अभिनेते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर तब्बल ३२ वर्षांनी त्यांच्यावरचा बायोपिक 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठी चित्रपटाच्या रूपाने पडद्यावर आला, तेव्हा तो पाहण्याचा मोह टाळता येण्यासारखा नव्हताच. सुबोध भावे हा आवडता अभिनेता यात डॉ. घाणेकरांची भूमिका करतो आहे, हे समजल्यावर तर आणखीनच उत्सुकता वाटली. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे प्रोमोज आणि 'गोमू संगतीनं' हे गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा काही तरी चांगलं पाहायला मिळेल, असा विश्वास वाटू लागला. त्यामुळं अभिजित देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाल्याबरोबर पहिल्याच 'शो'ला पाहिला. सिनेमानं अपेक्षाभंग केला नाही. डॉ. काशिनाथ घाणेकरांसारख्या अवलिया कलावंताला या चित्रकृतीनं खऱ्या अर्थानं आता अजरामर केलंय, असं म्हणायला हरकत नाही.
मराठी रंगभूमीवरचा साधारणतः १९६० ते १९८५ असा तब्बल २५ वर्षांचा कालखंड सिनेमात येतो. या कालावधीत मराठी रंगभूमीवर डॉ. काशिनाथ घाणेकर तेजाने तळपत होते. 'रायगडाला जेव्हा जाग येते' या वसंत कानेटकर लिखित नाटकात त्यांनी साकारलेले शंभूराजे त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेले. त्यानंतर आलेल्या कानेटकरांच्याच 'अश्रूंची झाली फुले'मधील त्यांच्या लाल्याच्या भूमिकेनं तर इतिहास घडविला. मराठी रंगभूमीवर एंट्रीला टाळी मिळविणारे डॉक्टर हे पहिले अभिनेते ठरले. लोक त्यांचे संवाद त्यांच्यासोबत तोंडपाठ म्हणू लागले. खेळ संपल्यावर चाहत्यांची अफाट गर्दी त्यांच्याभोवती होऊ लागली. त्यानंतर आलेल्या 'गारंबीचा बापू', 'इथे ओशाळला मृत्यू', 'आनंदी गोपाळ' आदी नाटकांतही डॉ. घाणेकर चमकले. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली, की नाटकाच्या श्रेयनामावलीत त्यांचं नाव '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' असं लिहिलं जाऊ लागलं. रंगमंचावर काम करण्याची नशा काही औरच असते. त्यात डॉक्टरांसारखा मनस्वी कलावंत वाहून गेला नसता, तरच नवल! चाहत्यांच्या या प्रेमाने डॉक्टर अक्षरशः आंधळे झाले. त्यांच्याकडून अनेक चुका होत गेल्या. वैयक्तिक आयुष्यही फार काही सुखावह नव्हतं. डॉ. इरावती ही त्यांची पहिली पत्नी. अनेकदा प्रयत्न करूनही मूल होत नसल्यानं दोघेही नैराश्यग्रस्त झालेले. अशा वेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांची कन्या कांचन त्यांच्या आयुष्यात एखाद्या झुळुकीसारखे येते. या झुळुकीचं रूपांतर पुढं वादळात होतं. सुलोचनादीदींमुळंच डॉक्टरांना अनेक मराठी सिनेमांमध्येही काम करायला मिळालं होतं. पण तिथं ते फार रमले नाहीत. 'गोमू संगतीनं' गाण्यात आपण गाढवासारखे नाचलो. डॉ. काशिनाथ घाणेकर वेडा झाला होता, असं ते स्वतःच सांगतात. त्यात रंगभूमीवर डॉ. श्रीराम लागूंसारख्या कलाकाराचं आगमन झाल्यानंतर तर डॉ. घाणेकरांसमोर मोठंच आव्हान उभं राहतं. अशा अत्यंत अस्ताव्यस्त व बेफिकीर आयुष्यात त्यांना कांचनचं प्रेमही स्थिर राहू देत नाही. डॉक्टरांकडून चुका होत राहतात. 'आईसाहेब' म्हणून ते हाक मारत असलेल्या लाडक्या सेवकाकडून दुधात दारू मिसळून पिण्यापासून ते दारू पिऊन रंगमंचावर एका नाटकातले संवाद भलत्याच नाटकात म्हणण्यापर्यंत त्यांची अधोगती होते. वडिलांच्या कौतुकाच्या दोन शब्दांसाठी झुरणाऱ्या या उमद्या नटाची दारू आणि सततची सिगारेट यामुळं वाताहत होत राहते. अखेर १९८६ मध्ये अमरावतीला दौऱ्यावर असतानाच सतत पाठीमागे दबा धरून बसलेला मृत्यू त्यांना गाठतोच. एका कलावंताची अखेर शेवटी ग्रीनरूममध्ये मेकअप लावत असतानाच होते...
दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचं सर्वप्रथम अभिनंदन करायला हवं ते त्यांनी या सिनेमाचं शिवधनुष्य चांगल्या पद्धतीनं पेलल्याबद्दल. अवघ्या ५४ वर्षांचं, पण वादळी आयुष्य लाभलेल्या या कलावंतावर बायोपिक काढणं ही सोपी गोष्ट नाही. मात्र, दिग्दर्शकानं अत्यंत प्रेमानं या विषयाला न्याय दिल्याचं जाणवतं. त्यासाठी घेतलेली मेहनत दिसते. डॉ. घाणेकर यांच्यातला मनस्वी, कलंदर कलावंत दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाला आहे. घाणेकर यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे हा सिनेमा नेमकेपणानं दाखवतो. कुठंही रेंगाळत नाही की गरजेपेक्षा वेगाने धावत नाही. डॉ. घाणेकरांचं निधन झालं, त्याला आता ३२ पेक्षा अधिक वर्षं झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांनी 'नाथ हा माझा' हे पुस्तक लिहिलं. या सिनेमालाही याच पुस्तकाचा मोठा आधार आहे. या पुस्तकाव्यतिरिक्त आणि घाणेकर यांच्या काही मोजक्या चित्रपटांव्यतिरिक्त आता त्यांचं कुठलंही काम दृश्यरूपानं आपल्याकडं दुर्दैवानं अस्तित्वात नाही. डॉ. घाणेकर यांची कुठलीही मुलाखत किंवा कार्यक्रम, नाटकातले प्रसंग यांचं व्हिडिओ चित्रण उपलब्ध नाही. त्यामुळं त्यांचा तो काळ पुन्हा जिवंत करणं हे तसं कठीण काम होतं. शिवाय डॉ. घाणेकरांना प्रत्यक्ष रंगमंचावर काम करताना पाहिलेले बहुतेक लोक आज साठीच्या घरात किंवा त्याहून मोठे असेच आहेत. डॉ. घाणेकर गेले तेव्हा मी जेमतेम १०-११ वर्षांचा होतो. ते गेले तेव्हा पेपरला आलेली मोठी बातमी मला आठवते. मात्र, त्यांचं रंगमंचावरचं काम पाहायला मिळालेलं नाही. सिनेमांबाबतही तेच. नंतर 'दूरदर्शन'वर दाखवलेले थोडे फार सिनेमे पाहिले इतकंच. पण ती सगळी स्मृती आता धूसर झाली आहे. अशा परिस्थितीत नव्या पिढीचा डॉ. घाणेकर यांच्याशी मुळीच नसलेला कनेक्ट लक्षात घेता, हा चित्रपट तयार करणं म्हणजे फारच मोठी रिस्क होती. मात्र, हा सिनेमा पाहिल्यावर आता वाटतं, की नव्या पिढीला डॉ. घाणेकरांविषयी अधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल. त्यांच्या शंभूराजांची, बापूची, लाल्याची जादू प्रत्यक्ष अनुभवता आली नाही, तरी ती जादू नक्की काय होती, याचा थोडा फार अंदाज तरी नक्कीच येऊ शकेल.
याचं श्रेय दिग्दर्शकाचं, तसंच कलाकारांचंही. या चित्रपटात सुलोचनादीदी, कांचन घाणेकर, भालजी पेंढारकर, प्रभाकर पणशीकर, मा. दत्ताराम, वसंत कानेटकर, डॉ. श्रीराम लागू अशी डॉक्टरांशी संबंधित बरीच मंडळी पडद्यावर दिसणार होती. अभिजित देशपांडे यांनी परफेक्ट कास्टिंग केल्यानं सिनेमाचं निम्मं यश तिथंच निश्चित झालं. सुलोचनादीदींच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, कांचनच्या भूमिकेत वैदेही परशुरामी, डॉ. लागूंच्या भूमिकेत सुमीत राघवन, वसंत कानेटकरांच्या भूमिकेत आनंद इंगळे आणि प्रभाकरपंतांच्या भूमिकेत प्रसाद ओक यांनी जीव ओतून काम केलंय. मोहन जोशी भालजी म्हणून फारसे पटले नाहीत. पण तो रोलही फार मोठा नाही.
सगळ्यांत महत्त्वाचा उल्लेख अर्थातच सुबोधचा. या भूमिकेसाठी सुबोधचं खरोखर मनापासून अभिनंदन. अशा चरित्रनायकांच्या भूमिका हा त्याच्यासाठी आता हातखंडा झाला आहे. वास्तविक सुबोधची अंगकाठी आणि एकूण चेहरा डॉ. घाणेकरांच्या चेहऱ्याशी फार मिळताजुळता नाही. मात्र, त्यानं ही उणीव आपल्या अभिनयानं भरून काढली आहे. सुरुवातीला मा. दत्ताराम यांच्यासमोर संभाजीची भूमिका मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांपासून ते शेवटी ग्रीनरूममध्ये कोसळून मृत्यू होईपर्यंत सुबोध घाणेकरांचंच आयुष्य जगला आहे. त्या माणसाची कलंदरी, बेफिकीरपणा, चाहत्यांच्या प्रेमात आकंठ बुडण्याचा सोस हे सगळं सुबोधनं फार प्रभावीपणे दाखवलं आहे. या भूमिकेसाठी त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होणार, हे नक्की.
सोनाली कुलकर्णीनं सुलोचनादीदी फार उत्तम उभ्या केल्या आहेत. सुमीत राघवननंही डॉ. लागू शब्दशः 'साकारले' आहेत. या दोन्ही व्यक्ती अद्याप हयात असताना त्यांच्या भूमिका पडद्यावर करायला मिळणं हा तसा बहुमान आणि एक प्रकारे आव्हानही! मात्र, सुमीत आणि सोनाली या दोघांनीही ते आव्हान उत्तम पेललंय. प्रसाद ओकने उभे केलेले 'पंत' पणशीकर अगदी लाजवाब. डॉक्टरांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा सच्चा मित्र ही पणशीकरांची (नव्या पिढीसाठी) नवी ओळख प्रसादनं चांगली अधोरेखित केली. कांचन घाणेकरांचं काम करणारी वैदेही परशुरामी हे या चित्रपटातलं सगळ्यांत गोड सरप्राइज पॅकेज म्हणायला हवं. हा सिनेमा पाहण्याआधी मी 'नाथ हा माझा' हे पुस्तक मुद्दाम आणून वाचलं. त्यामुळं संपूर्ण सिनेमा हा कांचनच्या नजरेतूनही पाहता आला. त्या दृष्टीनं विचार करता, हे पुस्तक न वाचता ही भूमिका करणाऱ्या वैदेहीचं खास कौतुकच करायला हवं. कांचन घाणेकरांनाही तिचा हा रोल नक्की आवडेल.
या चित्रपटासाठी 'शूर आम्ही सरदार', 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' आणि 'गोमू संगतीनं' ही तीन गाणी अप्रतिमपणे रिक्रिएट करण्यात आली आहेत. प्रोमोजमध्ये दिसतात तेवढ्या लांबीची ही गाणी सिनेमात अर्थातच नाहीत आणि ते योग्यच आहे. ती कथेच्या ओघात जेवढी हवी तेवढी एखाद्या मिनिटभरासाठी दिसतात. पण त्या गाण्यांमुळं या संपूर्ण कथानकाला एक छान कोंदण मिळालंय. शिवाय मूळ ट्रॅकच वापरला असल्यानं नॉस्टॅल्जिया जागृत करण्याचं काम ही गाणी अचूक करतात. याखेरीज कांचन आणि काशिनाथ यांचं लग्न झाल्यानंतर येणारं एक हळुवार प्रेमगीत आणि एक 'लाल्यागीत'ही यात आहे. ती दोन्ही गाणीही जमून आली आहेत. या चित्रपटासाठी कलादिग्दर्शन हा भाग अत्यंत महत्त्वाचा होता. या चित्रपटात ते उत्तम रीतीनं साकारलं आहे.
एखादं चक्रीवादळ वेगानं यावं आणि तेवढ्याच वेगानं निघून जावं, तसं डॉ. घाणेकरांचं आयुष्य होतं. चेहऱ्यावर रंग लावल्यानंतर आणि रंगमंचावरचे लाइट्स उजळल्यानंतर येणारी नशा काय असते, याचा अनुभव ती नशा ज्यांनी एकदा तरी अनुभवली आहे, तेच घेऊ शकतात. आपण अशा लोकांच्या आयुष्याकडं केवळ स्तिमित होऊन पाहत राहण्यापलीकडं काही करू शकत नाही. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याच्या फूटपट्ट्या त्यांना लावता येत नाहीत. मात्र, तरीही लौकिक जगणं या कलाकारांना चुकत नाहीच. त्यातून होणारी त्यांची उद्विग्न तडफड हा सिनेमा फार नेमकेपणानं दाखवतो.
मराठी रंगभूमीवरच्या एका सुपरस्टारला नव्या पिढीकडून मिळालेला हा ट्रिब्यूट अनुभवावा असाच... चुकवू नका.
---
दर्जा - चार स्टार
---

9 comments:

  1. सुंदर परीक्षण 👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम मित्रा

    ReplyDelete
  3. सुंदर परीक्षण. मी काशीनाथ घाणेकर यांना गोमू संगतीन ह्या गाण्यातच पाहिलं होतं. ते एवढे मोठे कलाकार होते काहीच माहीत नव्हत. खरच अप्रतिम चित्रपट. डॉ.लागू बरोबर ची स्पर्धा आणि प्रभाकर पणशीकर यांच्याशी मैत्री देखील उत्तम

    ReplyDelete
  4. वाह !! अप्रतिम कलाकृती

    ReplyDelete
  5. अचूक परीक्षण

    ReplyDelete
  6. Shreepadji Uttam parikshan kela aahe tumhi. Chitrapatachya shrey namawali madhe ani success madhe aajun eka nawacha ullekh karawach lagel to mhanaje make up artist Vikram Gaikwad yancha. Dr. Kashinath Ghanekar screen war ubhe karanyamadhe tyancha khup months wata aahe asa mala watate..

    ReplyDelete
  7. This above reply is from Chitragupta Bhide.

    ReplyDelete