10 Jan 2020

साहित्य शिवार दिवाळी २०१९ - अजय देवगण लेख

मनुष्यगणातला अभिनेता
------------------------------अजय देवगण नामक अभिनेत्यानं १९९१ मध्ये 'फूल और काँटे' अशा टिपिकल नावाच्या टिपिकल सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा आणखी एक 'बडे बाप का बेटा' वशिल्यानं रूपेरी पडद्यावर झळकला, अशीच प्रतिक्रिया उमटली होती. नव्वदचं ते दशक भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवं स्थित्यंतर घेऊन येत होतं. आधीची सुमारे ४०-५० वर्षं हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारी एकेक दिग्गज मंडळी एक तर काळाच्या पडद्याआड गेली होती किंवा निवृत्त तरी झाली होती. राज कपूरचं १९८८ मध्ये निधन झालं आणि त्याच वर्षी आमिर खानचा 'कयामत से कयामत तक' प्रदर्शित झाला. अमिताभ राजकारणाच्या अपयशी खेळीनंतर पुन्हा चित्रपटसृष्टीतलं आपलं सिंहासन पुन्हा बळकट करण्याच्या मागे होता. देवआनंदची जादू केव्हाच लोप पावली होती. राजेश खन्ना जवळपास निवृत्त झाला होता. सनी देओलचं बस्तान बसल्यानंतर धरमपाजींनीही मुख्य भूमिका करणं सोडलंच होतं. दिलीपसाब केवळ सुभाष घईसारख्या बड्या दिग्दर्शकांकडं मोजक्या चरित्र भूमिकांकडं वळले होते. तेव्हा चलती होती ती अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, गोविंदा, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती या जुन्या-नव्या हिरोंची! मात्र, लवकरच तीन 'खान'मंडळी रूपेरी पडद्यावर येऊन पुढची किती तरी वर्षं आपलं साम्राज्य निर्माण करणार होती. त्यापैकी आमिरचा पहिला चित्रपट तर १९८८ मध्ये पडद्यावर आलाही होता आणि जोरदार हिटही झाला होता. पुढच्याच वर्षी पटकथा लेखक सलीम खानचा सलमान नावाचा धाकटा पोरगा 'मैंने प्यार किया'मधून दमदार पदार्पण करता झाला. तिसरा खान तेव्हा 'दूरदर्शन'वर 'फौजी'सारख्या मालिका करत होता. तोही दोन-तीन वर्षांतच 'दिवाना', 'बाजीगर'मधून धमाकेदार एंट्री घेणार होता. पण हे सगळं जरा नंतर... ऐंशीचं दशक हे तसं अस्वस्थतेचं, बदलांचं, कमअस्सलतेचं दशक होतं. तेव्हा डिस्कोची क्रेझ होती. व्हिडिओ पार्लरांची चलती होती. एकपडदा थिएटरबाहेर ब्लॅकवाल्यांची दादागिरी होती. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग संपलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळून चाळिशी उलटून गेली होती आणि चाळिशी उलटलेल्या मध्यमवर्गीय पुरुषासारखीच देशाची केविलवाणी अवस्था झाली होती. धड ना तरुण, धड ना म्हातारा... जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलेला आणि सभोवतीच्या परिस्थितीनं गांजलेला... काही तरी नवं, क्रांतिकारक घडायला हवं होतं. देशाचं राजकीय क्षितिज योग्य संधीची वाट पाहत होतं... आणि ते वर्ष उजाडलं... ते होतं १९९१.
भारताच्या आयुष्यात 'जागतिकीकरण' नावाच्या देखण्या स्त्रीनं प्रवेश केला आणि चाळिशीत देशाचं नवं अफेअर सुरू झालं. अजय देवगणचा 'फूल और काँटे' याच वर्षी झळकला. तो तुफान चालला. वास्तविक 'हिरो'च्या पारंपरिक व्याख्येत बसणारं रंग-रूप अजयकडं नव्हतं. तो सावळा होता. चेहरा मख्ख वाटत होता. मात्र, तरीही त्यानं दोन मोटारसायकलींवर पाय ठेवून उभं राहून घेतलेली एंट्री तुफान हलकल्लोळ माजवून गेली. कॉलेजच्या पोरा-पोरींनी 'फूल और काँटे' डोक्यावर घेतला. त्यातली सगळीच गाणी गाजली. अजयबरोबरच मधू या दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. हिंदी चित्रपटसृष्टीत तोवर एक बडं प्रस्थ होऊन बसलेले फाइटमास्टर वीरू देवगण यांचा अजय हा मुलगा असल्यानं, 'वशिल्यानं आलेला आणखी एक नट' अशी त्याची संभावना होण्याची शक्यता होतीच. मात्र, अजय देवगणनं हे सगळे अंदाज खोटे ठरविले. पुढची तीन दशकं हा पठ्ठ्या हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ पाय रोवून उभाच राहिला नाही, तर त्यानं अव्वल पाच हिरोंमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं. सुरुवातीला ठोंब्या चेहरा व अभिनयात ठोकळा वाटणाऱ्या या माणसानं पुढं सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी दोनदा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्याच्यात झालेला हा बदल सोपा नव्हता. हा आतला लढा असतो. आपला आपल्यालाच लढावा लागतो. अजय त्याच्या आयुष्यात कायमच हा लढा देत आला आहे. त्यामुळंच आज पन्नाशी पार केली तरी तो तगड्या नायकाच्या भूमिकेत उभा राहू शकतो. येत्या २२ नोव्हेंबरला त्याचा 'तानाजी - द अनसंग हिरो' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट येतोय.
(लेख लिहितेवेळी प्रदर्शनाची ही तारीख जाहीर झाली होती. नंतर ती पुढं ढकलली व आता हा चित्रपट आत्ता, आज, १० जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.) 
या चित्रपटात अजय स्वतः नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका करतोय. 'लोकमान्य टिळक' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत हाच या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करतो आहे. त्यानिमित्तानं अजय देवगणच्या गेल्या तीन दशकांच्या यशस्वी कारकिर्दीचा आणि एक माणूस म्हणून त्याच्या झालेल्या प्रगतीचा वेध घ्यायला हरकत नाही.
ही देवगण मंडळी पंजाबी. मूळची अमृतसरची राहणारी. वीणा आणि वीरू देवगण हे अजयच्या आई-वडिलांचं नाव. त्यांच्या पोटी दोन एप्रिल १९६९ रोजी दिल्लीत अजयचा जन्म झाला. त्याचं जन्मनाव खरं तर विशाल. पण चित्रपटात नायक म्हणून पदार्पण करताना त्यानं विशाल हे नाव टाकून 'अजय' हे नाव धारण केलं. हे सगळं कुटुंबच चित्रपट व्यवसायाशी संबंधित आहे. वीरू देवगण फाइट मास्टर म्हणून नाव कमवून होते, तर आई वीणा निर्माती होती. अजयचा भाऊ अनिल देवगण हाही पटकथा लेखक आहे. अजयचा जन्म दिल्लीत झाला असला, तरी तो वाढला मुंबईतच. जुहू येथील सिल्व्हर बीच हायस्कूलमध्ये तो शिकला. त्यानंतर मिठीबाई कॉलेजातही गेला. मात्र, पहिला चित्रपट मिळाल्यानंतर अजयचं पुढचं औपचारिक शिक्षण थांबलंच. 'फूल और काँटे' नुसता सुपरहिट ठरला नाही, तर अजयला त्या वर्षीचं 'सर्वोत्कृष्ट पदार्पण - पुरुष' हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्याच्याकडं भरपूर चित्रपटांच्या ऑफर आल्या, यात नवल नाही. त्यातले 'जिगर', 'संग्राम', 'विजयपथ', अक्षयकुमारसोबतचा 'सुहाग', 'हकीकत', 'नाजायज', 'दिलजले' आणि इंद्रकुमारचा 'इश्क' हे चित्रपट चांगले चालले. 'जिगर' चित्रपटादरम्यान नायिका करिश्मा कपूरसोबत अजयचं सूत जुळलं. पण हे अफेअर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलं नाही आणि १९९५ मध्ये त्यांचा 'ब्रेकअप' झाला. त्याच्या आदल्याच वर्षी म्हणजे १९९४ मध्ये आलेल्या 'विजयपथ' चित्रपटात तबू त्याची नायिका होती.
अजयचे हे उपरोल्लेखित चित्रपट चांगले चालले असले, तरी अजयच्या नावावर खणखणीत असं काही जमा नव्हतं. अभिजन प्रेक्षकांच्या दृष्टीनं तो अजूनही पिटातल्या प्रेक्षकांचाच, बी ग्रेडचा हिरो होता. त्याचा चेहरा कमालीचा थंड वाटायचा. बोलायचे ते त्याचे डोळे. त्या काहीशा निस्तेज चेहऱ्यावरचे ते डोळे गूढ, खोल असं काही तरी सांगायचे. अजयच्या या सुप्त ताकदीचा प्रत्यय लवकरच आला. वर्ष होतं १९९८ आणि चित्रपट होता - महेश भट यांचा 'जख्म.' अजयच्या कारकिर्दीतलं पहिलं महत्त्वाचं वळण आलं होतं. अजयच्या डोळ्यांतला 'दर्द' महेश भट यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाला जाणवला असावा. 'जख्म' ही महेश भट यांच्या स्वतःच्या आयुष्याचीच गोष्ट होती. त्यात त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना अजयला निवडावंसं वाटलं, हीच अजयमधल्या अभिनेत्याला मोठी दाद होती. मुस्लिम आई आणि हिंदू वडिलांच्या पोटी जन्मलेल्या अजय या संगीत दिग्दर्शकाची व्यथा आणि कथा हा सिनेमा मांडतो. हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन व्यक्तींमधलं अतूट प्रेम आणि त्यांच्या अपत्यांना बसणारी त्याची झळ याचं प्रत्ययकारी दर्शन महेश भट यांनी या चित्रपटातून केलं होतं. या चित्रपटासाठी संवेदनशील अभिनयाची गरज होती. महेश भट यांनी अजयकडून तसा अभिनय काढून घेतला म्हणा, किंवा अजयमधल्या सुप्त अभिनयगुणांना एकदम वाट सापडली म्हणा... या चित्रपटातून वेगळाच अजय देवगण प्रेक्षकांसमोर आला. यातलं त्याचं काम सगळ्यांना अतिशय आवडलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही. मात्र, अजयला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं त्याच्या या अभिनयक्षमतेवर राजमान्यतेचं शिक्कामोर्तबही झालं. या चित्रपटात लहानपणच्या अजयचं काम कुणाल खेमूनं केलं होतं. या चित्रपटातली गाणीही गाजली. विशेषतः अलका याज्ञिक यांच्या आवाजातल्या 'गली में आज चाँद निकला' या अप्रतिम गाण्यानं तर सर्वांना वेड लावलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. कुमार सानूनं म्हटलेलं 'हम यहाँ तुम कहाँ' हे गाणंही लोकप्रिय ठरलं. या चित्रपटात अजयची नायिका होती सोनाली बेंद्रे. अजयच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण देण्याचं काम या चित्रपटानं केलं, यात शंका नाही. या चित्रपटानंतर अजय 'अ' श्रेणीतला कलाकार गणला जाऊ लागला. त्याला चित्रपटसृष्टीत गांभीर्यानं घेतलं जाऊ लागलं. हा 'लंबी रेस का घोडा' आहे, हे काही जाणत्या दिग्दर्शकांच्या लक्षात आलं. यापैकीच एक होता संजय लीला भन्साळी. भन्साळींनी त्यांच्या पुढच्या चित्रपटात अजयला महत्त्वपूर्ण भूमिका देऊ केली. अन्य प्रमुख कलाकार होते ऐश्वर्या राय व सलमान खान. वर्ष होतं १९९९ आणि चित्रपट होता - हम दिल दे चुके सनम! या चित्रपटाच्या तुफान यशानं अजयचं नशीबच बदलून गेलं. सुंदर, सुस्वरूप पत्नीचं लग्नाआधी दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम होतं, हे लक्षात आल्यावर तिला त्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी तडफड करणारा वनराज अजयनं अतिशय आत्मविश्वासानं साकारला. अजयची भूमिका सहानुभूती मिळविणारी होती. पण त्यात अजयच्या त्या गूढ वेदना वागविणाऱ्या डोळ्यांचा आणि सहज अभिनयाचा वाटा मोठा होता. 'हम दिल दे चुके सनम' तुफान गाजला. यातली सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट ठरली. सलमान आणि ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण त्या वेळी बहरात होतं. अजयनं मात्र 'इश्क'च्या सेटवर भेटलेल्या काजोलबरोबर जोडी जमवून टाकली होती. आदल्याच वर्षी आलेला दोघांचाही 'प्यार तो होना ही था' (फ्रेंच किस या १९९५ मध्ये आलेल्या हॉलिवूडपटाचा रिमेक) चांगला चालला होता. खरं तर या दोघांची जोडी कुणालाच 'मेड फॉर इच आदर' वाटत नव्हती. प्रथमदर्शनी तरी ती विसंगत, कृत्रिम जोडी वाटायची. पण नियतीच्या मनात वेगळंच असतं. त्याच दोघांना एकमेकांच्या सान्निध्यात आयुष्याचा जोडीदार सापडला. दोघांनीही २४ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्रीय पद्धतीनं लग्न करून चित्रपटसृष्टीला एक धक्काच दिला. वयाच्या तिशीत अजय खऱ्या अर्थानं स्थिरावला होता. त्याचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य एका 'एक्स्प्रेस वे'च्या तोंडाशी येऊन उभं राहिलं होतं. इथून पुढचा प्रवास सुसाटच असणार होता...
रामगोपाल वर्माच्या 'कंपनी'त अजयला हाजी मस्तानची भूमिका करायला मिळाली. टिपिकल रामगोपाल वर्मा शैलीतील या गुन्हेपटात अजय चांगलाच शोभून दिसला. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार मिळाला. याच वर्षी आलेल्या 'दिवानगी'मधली त्याची खलनायकी ढंगाची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. 'फिल्मफेअर'नं सर्वोत्कृष्ट व्हिलन म्हणून त्याचा गौरव केला. एकूणच २००२ ते २००४ ही वर्षं अजयच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ म्हणता येईल. राजकुमार संतोषीसारख्या ख्यातनाम दिग्दर्शकानं आपल्या 'द लिजंड ऑफ भगतसिंग' (२००३) या चित्रपटात अजयला प्रमुख भूमिका दिली. भगतसिंगांच्या भूमिकेचं अजयनं सोनं केलं. 'जख्म'पाठोपाठ या चित्रपटासाठीही त्याला दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच वर्षी आलेल्या रामगोपाल वर्माच्या 'भूत' या गाजलेल्या चित्रपटातही अजय होता. अजय देवगणचं नाव इंडस्ट्रीत आता एक ताकदवान अभिनेता म्हणून दुमदुमू लागलं होतं. म्हणूनच पुढच्या वर्षी म्हणजे २००४ मध्ये ऋतुपर्ण घोष, प्रकाश झा आणि मणिरत्नम यांसारख्या बड्या दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात अजय हवासा वाटला. ऋतुपर्णचा 'रेनकोट' हा चित्रपट म्हणजे पडद्यावरची कविता होती. ओ. हेन्रीच्या 'द गिफ्ट ऑफ मॅगी' या कथेवर आधारित या चित्रपटात अजयची नायिका होती ऐश्वर्या राय. 'हम दिल दे चुके सनम'नंतर पुन्हा एकदा या जोडीनं उत्कृष्ट काम केलं आणि समीक्षकांची वाहवा मिळविली. प्रकाश झा यांनी 'गंगाजल'मध्ये अजयला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका दिली. भागलपूर इथल्या अॅसिड टाकून डोळे काढण्याच्या प्रकारावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात अजयनं एसएसपी अमितकुमार ही भूमिका प्रभावीपणे केली होती. 'गंगाजल' सुपरहिट झाला. इथूनच प्रकाश झा आणि अजय देवगण ही नवी दिग्दर्शक-अभिनेता जोडी जमली. या जोडीनं पुढं 'अपहरण' (२००५), 'राजनीती' (२०१०) असे काही चांगले चित्रपट दिले. सन २००४ मध्ये मणिरत्नम यांनी त्यांच्या 'युवा' या चित्रपटात अजयला मायकेल मुखर्जी ही विद्यार्थी नेत्याची भूमिका दिली. अजयनं ही भूमिकाही जोरदार केली. विशाल भारद्वाजनं शेक्सपीअरच्या नाट्यत्रयीवर आधारित आपल्या दुसऱ्या 'ओंकारा' या चित्रपटात अजयला स्थान दिलं. हा चित्रपट 'ऑथेल्लो'वर आधारित होता. यात ओंकारा शुक्ला उर्फ ओमीची शीर्षक भूमिका अजयनं केली होती. या वेळेपर्यंत त्याची ताकदवान अभिनेता ही प्रतिमा जनमानसातही रुजली होती. 'ओंकारा'नं या प्रतिमेलाही न्याय दिला. याच वर्षी अजयनं राजकुमार संतोषीच्या 'खाकी'मध्ये अमिताभ, ऐश्वर्या व अक्षयकुमारसोबत काम केलं.
हे सर्व सुरू असतानाच रोहित शेट्टी नावाचा एक अवलिया दिग्दर्शक अजयला भेटला. त्यानं 'गोलमाल : फन अनलिमिटेड' या आपल्या चित्रपटात अजयला चक्क विनोदी भूमिका दिली. तोवर अजयची गंभीर भूमिका करणारा नट अशी प्रतिमा झाली होती. इंद्रकुमारचा 'इश्क' आला त्यालाही जवळपास दहा वर्षे होत आली होती. मात्र, रोहित शेट्टीला काय वाटलं कुणास ठाऊक! त्यानं अजयला यात विनोदी भूमिकेत पुढं आणलं. आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. इथंही रोहित शेट्टी आणि अजय देवगण ही आणखी एक सुपरहिट दिग्दर्शक-अभिनेता जोडी पुढं आली. या 'गोलमाल' फ्रँजायजीनं पुढची दहा वर्षं काय धमाल केली हे सगळ्यांना माहिती आहे. पुढच्या चार वर्षांत 'गोलमाल'चे आणखी दोन भाग ('गोलमाल रिटर्न्स' आणि 'गोलमाल ३') आले. दोन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये 'गोलमाल अगेन' हा चौथा चित्रपट आला. यातली अजयची 'गोपाल' ही भूमिका आणि त्यातले अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू हे सगळे कलाकार हिट आहेत. रोहित शेट्टी आणि अजय या जोडीनं २०११ मध्ये आणखी एका सुपरहिट फ्रँचायजीला जन्म दिला. तिचं नाव होतं - सिंघम. यातली अजयची बाजीराव सिंघम ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका कमालीची हिट झाली. तीन वर्षांनी, २०१४ मध्ये 'सिंघम रिटर्न्स' आला. तोही चांगला चालला. अजय देवगणला कणखर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना आवडतं. रोहित शेट्टीच्या चित्रपटात बाकी सगळा मालमसालाही ठासून भरलेला असल्यानं हे चित्रपट चांगली गर्दी खेचतात, असा अनुभव आहे. पहिल्या 'सिंघम'नंतर २०१२ मध्ये अजयनं रोहित शेट्टीचाच 'बोलबच्चन' हा चित्रपट केला. हा चित्रपट व त्यातली गाणीही गाजली. याच वर्षी दिवाळीत त्यानं 'सन ऑफ सरदार' हा त्याचा चित्रपट करण जोहर-शाहरुख जोडीच्या 'जब तक है जान'समोर प्रदर्शित करण्याचं धाडस दाखवलं होतं. तेव्हा त्याचा करणशी जाहीर वादही झाला होता. थिएटर वितरणावरून दोघा बड्या स्टारची जुंपली होती. अजयची पत्नी काजोल ही करण व शाहरुख दोघांचीही चांगली मैत्रीण. मात्र, या वादामुळं काजोलची करणशी असलेली मैत्री काही काळ तुटली होती, अशी कबुली करणनंच नंतर त्याच्या पुस्तकात दिली. 'सन ऑफ सरदार' हा चित्रपट तसा ठीकठाकच होता. पण या वादामुळं त्यालाही मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आणि चित्रपटानं चांगला गल्ला गोळा केला.
यानंतर अजयचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट २०१५ मध्ये आला, त्याचं नाव 'दृश्यम'. मूळ मल्याळी चित्रपटाचा सर्व दक्षिणी भाषांत रिमेक झाला होता. तसाच तो हिंदीत आला, तेव्हा निशिकांत कामतकडं त्याचं दिग्दर्शन आलं. मूळ चित्रपटाची पटकथा एवढी बांधीव व घट्ट होती, की निशिकांतला फार वेगळं काही करावंच लागलं नाही. हिंदीत हा चित्रपट गोव्यात घडताना दाखविण्यात आला होता. यात कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणाऱ्या विजय साळगावकर या चौथी पास, व्हिडिओ कॅसेटचं दुकान चालविणाऱ्या, पण अत्यंत डोकेबाज, हुशार माणसाची भूमिका अजयनं फार सुंदर साकारली होती. हिंदीतही हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अजयच्या नावावर आणखी एका चांगल्या भूमिकेची नोंद झाली.
त्यानंतर पुढच्या वर्षी अजयनं स्वतः दिग्दर्शित केलेला 'शिवाय' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. (यापूर्वी त्यानं २००८ मध्ये 'यू, मी और हम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.) 'शिवाय' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं असलं, तरी आधी ज्या प्रकारची हवा निर्माण करण्यात आली होती, ती पाहता, प्रेक्षक काहीसे निराशच झाले, असं म्हणता येईल. या चित्रपटातील साहसदृश्ये चांगली होती. 'क्लिफहँगर'सारख्या अनेक हॉलिवूडपटांचा त्यावरचा प्रभाव स्पष्ट जाणवत होता. मात्र, असं असलं तरी हा काही अजयचा सर्वोत्तम सिनेमा नव्हता. अजय पुन्हा फॉर्मात आला तो २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार गुप्ताच्या 'रेड' या चित्रपटामुळं. उत्तर प्रदेशात ऐंशीच्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात अजयनं आयआरएस ऑफिसर अभय पटनाईक ही भूमिका केली होती. केवळ ३० कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल दीडशे कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या वर्षी अजय पुन्हा इंद्रकुमारच्या 'टोटल धमाल' या 'धमाल' फ्रँजायजीमध्ये प्रथमच दिसला. याशिवाय 'दे दे प्यार दे' या अकीव अली दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडीतही अजय झळकला. यात त्यानं तब्बूसोबत अनेक वर्षांनी काम केलं. वयानं खूप लहान असलेल्या तरुणीच्या प्रेमात पडणाऱ्या नायकाची भूमिका त्यानं यात केली होती. यापूर्वी मधुर भांडारकरच्या 'दिल तो बच्चा है जी' (२०११) या चित्रपटातही अशाच प्रकारची भूमिका केली होती आणि ती प्रेक्षकांना आवडली होती. याशिवाय 'काल'सारख्या (२००५) भयपटात त्यानं केलेली कालीची छोटीशी भूमिकाही वेगळी आणि त्याच्या चाहत्यांना भावलेली होती. 'सन ऑफ सरदार'चा दिग्दर्शक अश्वनी धीर यानं त्यापूर्वी २०१० मध्ये काढलेल्या 'अतिथी तुम कब जाओगे?' या विनोदी चित्रपटातही अजयनं कोंकणा सेनशर्मा व परेश रावल यांच्यासोबत धमाल केली होती. याच वर्षी आलेल्या मिलन लुथ्राच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' या चित्रपटात अजयनं सुलतान मिर्झाची साकारलेली भूमिका अशीच प्रेक्षकपसंती मिळवून गेली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला.
आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती 'तानाजी' या चित्रपटाची. या चित्रपटात ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली अजयनं नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेला न्याय दिला असेल, अशी खात्री वाटते. दिवाळीनंतर प्रदर्शित होणारा हा चित्रपट लोकप्रिय ठरेल, असा अंदाज आहे. याशिवाय 'मैदान' नावाच्या एका चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका करणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी, म्हणजे २०२० मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या मल्टिस्टारर चित्रपटातही संजय दत्त, राणा दुगुबत्ती, परिणिती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अजय झळकणार आहे.
तब्बल तीन दशकांपूर्वी, म्हणजे १९९१ मध्ये सुरू झालेली अजयची कारकीर्द आगामी काळातही बहरत जाईल, यात शंका नाही. केंद्र सरकारने २०१६ मध्ये 'पद्मश्री' सन्मान देऊन त्याच्या कारकिर्दीचा गौरव केला आहेच. काजोलसोबत गेली दोन दशके तो सुखाचा संसार करतोय, याचंही त्याच्या चाहत्यांना कौतुक आणि अप्रूप आहे. त्यांना न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. अजयनं त्याच्या कारकिर्दीत फार वाद कधी ओढवून घेतलेले दिसत नाहीत. आपण बरं आणि आपलं काम बरं, अशी त्याची एकूण वृत्ती दिसते. त्याचं आडनाव 'देवगण' असलं, तरी त्याच्या बहुतेक भूमिकांना 'मानवी' आहेत. त्या अर्थानं तो 'मनुष्यगणातला अभिनेता' आहे. त्याच्या पुढील कारकिर्दीकडं चित्रपट रसिकांचं लक्ष राहील. त्यासाठी त्याला शुभेच्छा!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०१९)

---

3 comments: