20 Mar 2022

‘काश्मीर फाइल्स’विषयी...

विच्छिन्न करणारा अनुभव...
---------------------------------


‘काश्मीर फाइल्स’ अखेर आज - २० मार्च रोजी - बघितला. डोकं सुन्न होऊन गेलं. एखाद्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडवता येतात, तसंच अशी एखादी कलाकृती दाखवून एखाद्याच्या मेंदूतही ठिकऱ्या उत्पन्न करता येतात. ‘काश्मीर फाइल्स’ हा तशा प्रकारचा सिनेमा आहे. प्रेक्षकाच्या डोक्याला वेगळ्या प्रकारे शॉट लावण्यात हा सिनेमा यशस्वी होतो. जनरली, कुठलाही सिनेमा बघण्यापूर्वी मी त्याविषयी काही वाचत किंवा ऐकत नाही. त्यामुळं पूर्वग्रहविरहित नजरेनं सिनेमा बघायला मदत होते. ‘काश्मीर फाइल्स’विषयी मात्र ठरवूनही काही कानावर न पडणं किंवा एकदमच अलिप्त राहणं शक्य नव्हतं एवढं त्याविषयी सर्वत्र लिहिलं जात होतं, बोललं जात होतं. तरीही माझ्या नेहमीच्या पद्धतीने जास्तीत जास्त तटस्थ राहून सिनेमा अनुभवण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही संवेदनशील माणसाचं काळीज हलून जाईल, असे अनेक प्रसंग या सिनेमात आहेत. काश्मीरमध्ये १९९० च्या १९ जानेवारी रोजी जे काही झालं, त्याचं प्रत्ययकारी चित्रण या सिनेमात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनं केलंय. ते बघताना अंतर्बाह्य हादरून जायला होतं. आपल्याच देशात असं काही घडलं आहे आणि आपल्याला याबद्दल फार काही माहिती नाही, यामुळं एकाच वेळी शरम, अपराधगंड, चीड, संताप, उद्वेग आदी भावना मनात येऊन गेल्या.
एक सांगायला पाहिजे. मी स्वत: त्या वेळी १४-१५ वर्षांचा होतो. रोजचं वृत्तपत्र नेमानं वाचत होतो. तरी मला १९९० मध्ये काश्मीरमध्ये असं काही भयानक घडलंय याबद्दल तेव्हा तरी कुठं माध्यमात वाचल्याचं फारसं आठवत नाही. काश्मीरविषयीच्या बातम्या येत होत्या. मात्र, विशेषत: पंडितांबाबत जे काही घडलं, त्यावर फारसं कुठं काही आल्याचं किंवा कुणी काही बोलल्याचं मला तरी आठवत नाही. (हा माझा स्मरणदोषही असू शकतो.) यानंतर एकदम १६ वर्षांनी, म्हणजे २००६ मध्ये मी ‘इफ्फी’त अशोक पंडित यांनी दिग्दर्शित केलेली एक डॉक्युमेंटरी बघितली होती. त्या वेळी पंडित स्वत: तिथं आले होते आणि प्रेक्षकांशी बोलले होते. ती डॉक्युमेंटरी बघून पंडितांच्या प्रश्नाविषयी पहिल्यांदा नीट व सविस्तर कळलं होतं. पंडितांचं एकूण बोलणं, चीड, उद्वेग हा सगळा तेव्हा तरी मला ‘अरण्यरुदन’च वाटला होता. त्यानंतरही १६ वर्षं गेली आणि आता मूळ घटनेला ३२ वर्षं होऊन गेल्यानंतर हा सिनेमा आला आहे. त्याविषयीच्या कुठल्याही चांगल्या-वाईट प्रचाराला बळी न पडता, प्रत्येकानं तो स्वत: बघून काय ते मत ठरवलं पाहिजे. (या सिनेमाच्या नॅरेटिव्हला प्रतिवाद करणाराही सिनेमा कदाचित भविष्यात कुणी करील, तेव्हा तोही आवर्जून पाहिला पाहिजे.)

Spoiler alert

सिनेमात आपल्याला नक्की काय दाखवायचं आहे, याबाबत दिग्दर्शकाच्या मनात कुठलीही शंका नाही. त्यामुळं त्यानं घडलेल्या घटनांची एक कथामालिका गुंफून ती नाट्यमय रूपात आपल्यासमोर सादर केली आहे. पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर) यांच्या घरात झालेल्या भयंकर घटनेच्या अनुषंगाने ही सर्व कथा आपल्यासमोर फ्लॅशबॅकने उलगडत जाते. कृष्णा (दर्शनकुमार) हा पुष्करनाथ यांचा नातू. तो १९९० ची घटना घडली तेव्हा अगदीच लहान असतो. पुष्करनाथ यांचे एके काळचे मित्र व सहकारी त्याला काश्मीरविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी खरं काय घडलंय ते सांगतात. तोवर कृष्णा दिल्लीतील एएनयू (थोडक्यात जेएनयू) विद्यापीठातील प्रा. राधिका मेनन (पल्लवी जोशी) यांच्या संपर्कात आलेला असतो. त्या त्याला विद्यापीठाची निवडणूक लढवायला सांगतात. ‘काश्मीर हा मुळी भारताचा भागच नाही’ यावर मेननबाईंचा ठाम विश्वास असतो. काश्मीरमध्ये पंडितांचं सगळं शिरकाण घडवून आणणारा मास्टरमाइंड फारुक बिट्टा (चिन्मय मांडलेकर) (हे पात्र सरळच जेकेएलएफचा म्होरक्या यासीन मलिकवरून घेतलेलं दिसतं, असं मला वाटलं; पण ते बिट्टा कराटे नावाच्या दहशतवाद्यावरून बेतलं आहे, अशी माहिती समजली...) याच्याशीही मेननबाईंचं संधान आहे. कथानकाच्या ओघात मेननबाईंच्या रूपानं दिल्लीतील एका विशिष्ट वर्तुळाची आणि बिट्टाच्या रूपानं काश्मिरातील फुटिरतावाद्यांची अशा दोन्ही बाजू दिग्दर्शक व्यवस्थित फुटेज देऊन दाखवतो. (उलट कधी कधी जरा जास्तच फुटेज दिलंय असंही वाटून जातं.) 
या सर्व घटनाक्रमात काश्मिरी पंडितांची व्यथा सर्वांत ठळकपणे प्रेक्षकांच्या नजरेत यावी, याची काळजी मात्र दिग्दर्शकानं व्यवस्थित घेतली आहे. अगदी सुरुवातीच्या क्रिकेटच्या प्रसंगापासून काश्मीरमधील भयावह परिस्थितीची जाणीव आपल्याला करून दिली जाते. पुढं काय होणार, याची कल्पना असूनही प्रत्येक वेळी त्या घटनेची तीव्रता किंवा तिचा आघात आपल्या मनावर होईल, अशा पद्धतीनं सर्व प्रसंगांची रचना दिग्दर्शक करतो. यातील प्रमुख पात्रांच्या तोंडून वेगवेगळ्या प्रसंगांत काश्मीरचा इतिहास आपल्याला सांगितला जातो. (तो माझ्यासकट अनेकांना फारसा माहिती नसणार, याची खातरी आहे.) या प्रकारामुळं सिनेमाला क्वचित डॉक्युमेंटरीचं स्वरूप येतंही. मात्र, लगेचच कथानक पूर्वपदावर येतं आणि त्यातील नाट्यमयता कायम राहते, हेही मान्य करायला हवं.
काश्मिरी पंडितांची यात दाखविलेली फरपट आणि होरपळ पाहून कुठल्याही सहृदय माणसाचं काळीज पिळवटून जाईल, यात वाद नाही. आपल्या स्वत:च्या मालकीचं घर, जमीन, गाव, राज्य सोडून जाण्यासाठी कुणी तरी बंदुकीच्या जोरावर धमकावतं आहे, असा प्रसंग आपल्यावर कधीही आलेला नाही. त्यामुळं आपल्याला त्या दु:खाची जाणीव होणं खरं तर फार अवघड आहे. अशा वेळी सहानुभूती ही एकच भावना मनात येऊ शकते. मात्र, हा सिनेमा पाहताना आपल्याला वंशविच्छेदाचं भयावह रूप आणि विस्थापितांची वेदना काही अंशी तरी समजू शकते, हे या कलाकृतीचं मोठं यश म्हणायला हवं.

सिनेमाची प्रदीर्घ लांबी मला खटकली. अर्धा तास तरी हा सिनेमा नक्कीच कमी करता आला असता. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे ब्रह्मदत्त यांच्या घरात असलेल्या नकाशात काश्मीर संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये दाखवलं आहे. ब्रह्मदत्त हे तर भारताच्या बाजूचे असतात. असं असताना त्यांच्या घरात असा नकाशा कसा? आणखी एक. पंडितांच्या छावणीला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी भेट दिली, त्या प्रसंगात 'महाराष्ट्रात बाळासाहेबांनी (ठाकरे) काश्मिरी पंडित मुलांना इंजिनीअरिंग कॉलेजांत जशा जागा राखीव ठेवल्यात तशा देशभर का नाही ठेवत?' असा प्रश्न एक तरुणी सईद यांना विचारताना दाखवली आहे. सईद गृहमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात युतीचं सरकार नव्हतंच. ते नंतर १९९५ मध्ये आलं. त्यामुळं या प्रसंगात कालक्रमाची गडबड झालेली दिसते. असो.
या चित्रपटात अनुपम खेर आणि चिन्मय मांडलेकर या दोघांनीही कमाल अभिनय केला आहे. विशेषत: चिन्मयनं त्या खलनायकी भूमिकेचे सर्व कंगोरे जबरदस्त दाखवले आहेत. डोळ्यांची फडफड खासच! त्या तुलनेत ब्रह्मदत्त यांच्या भूमिकेतील मिथुन चक्रवर्ती मला तरी फार काही पटले नाहीत. पुनीत इस्सर, प्रकाश बेलवडी आणि अतुल श्रीवास्तव यांच्या रूपानं पोलिस, डॉक्टर व पत्रकार या तिघांचेही प्रतिनिधी हजर आहेत. त्यांच्यातली वाद-चर्चा कथानक पुढं नेण्यासाठी महत्त्वाची. मृणाल कुलकर्णी यांचं काम मोजकंच, पण लक्षात राहणारं आहे. सर्वांत जबरदस्त भूमिका केली आहे ती पल्लवी जोशी यांनी. राधिका मेननचं नॅरेटिव्ह पल्लवी जोशींनी ठसक्यात मांडलंय. कृष्णा झालेल्या दर्शनकुमारनं शेवटच्या त्या भाषणाच्या प्रसंगात सगळं जिंकून घेतलंय. चित्रपटाला संगीत स्वप्नील बांदोडकर यांचं आहे. पण यात गाणी हा प्रकार लक्षात राहणारा नाहीच.
चित्रपटात अर्थातच मोठ्या प्रमाणावर हिंसा आहे. (मला स्वत:ला पडद्यावर कुठलीही हिंसा बघताना फार त्रास होतो. या घटना सूचक पद्धतीनं दाखविल्यास अधिक परिणाम करून जातात, असं मला स्वत:ला वाटतं. लहान मुलांची हत्या कुठल्याही परिस्थितीत सेन्सॉरसंमत व्हायला नको खरं तर... पण असो.) या सिनेमात रक्तरंजित हिंसेला पर्याय नव्हताच हे माहिती होतं. त्यामुळं कमालीचा त्रास झाला. (तो तसा व्हावा अशीच दिग्दर्शकाची अपेक्षा आहे.) 
काश्मीरमध्ये १९९० मध्ये झालेल्या या अत्याचारांविषयी गेली ३२ वर्षं कुणीही फार बोललं नाही किंवा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत त्याची फार चर्चा झाली नाही, अशी दिग्दर्शकाची मांडणी यात आहे. ते बऱ्याच अंशी खरंही आहे. काश्मिरी पंडितच काय, एकूणच देशातल्या कुठल्याही पीडित, शोषित वर्गाविषयी उर्वरित देशातील बहुसंख्य जनतेला फार काही पडलेलं आहे, असं मला तरी वाटत नाही. आपल्या देशात आर्थिक उदारीकरणानंतर, त्यातही २००० नंतर मध्यमवर्ग सुखासीन झाला. महानगरं गर्दीनं फुगू लागली. आपण सारेच आपल्याभोवती सुखाचा छोटासा कोष विणून त्यात रममाण झालो. वास्तविक त्यापूर्वी मध्यमवर्ग हाच देशातल्या सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज होता. तो कामगार चळवळीत होता, तो महिलांच्या हक्कांसाठी अग्रगण्य होता, तो दलित-शोषितांच्या दु:खानं कळवळत होता... मात्र, बाजार नावाच्या गोष्टीनं आपण आपल्या जवळच्या नातेवाइकांना विसरलो, तिथं काश्मिरी पंडित कोण? आपल्या या सुखासीनतेला, त्यातून आलेल्या कोमट-पांचट उदासीनतेला मारलेली ही सणसणीत चपराक आहे. शरमेनं तोंड लपवून बसावं अशा किती तरी घटना या देशात घडून गेल्या, घडत आहेत आणि घडत राहतीलही. काश्मिरी पंडितांची समस्या ही नक्कीच त्यातली एक आहे. त्याविषयी या चित्रपटानं आपल्या मनात अपराधगंडाची बारीकशी टोचणी लावली तरी ते या कलाकृतीचं सर्वांत मोठं यश ठरेल. केवळ शंभर कोटी मिळविले किंवा अनेक लोकांनी इतर अनेकांना वेगवेगळ्या माध्यमांतून हा सिनेमा बघण्याचा आग्रह धरला हे काही त्या सिनेमाचं खरं यश नव्हे. आपल्यात काय बदल होतो, देशातल्या इतर सर्व अशा लाजिरवाण्या घटनांविषयी आपण तितकेच संवेदनशील राहणार का, की केवळ निवडक घटनांमध्येच आपली संवेदनशीलता उफाळून येणार यावर आपलं माणूसपण अवलंबून असेल. ‘काश्मीर फाइल्स’नं आपल्याला त्या माणूसपणाच्या मार्गावर ढकललं आहे, हे त्याचं फार मोठं यश मला वाटतं. पुढं जायचं की नाही हा सर्वस्वी आपला निर्णय!
या देशात कुठल्याही समाजघटकावर अन्याय होता कामा नये, सर्वांना समान आणि घटनादत्त अधिकारानुसार वागणूक मिळाली पाहिजे, ही अपेक्षा अवाजवी नसावी. या सिनेमात तेच दाखवलं आहे. अन्याय झालेल्या समाजघटकाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तोच इथं दिग्दर्शकानं काश्मिरी पंडितांसाठी बजावलेला दिसतो. हा सिनेमा पूर्वग्रहविरहित नजरेनं पाहणं फार आवश्यक आहे. कुठलंही एक नॅरेटिव्ह किंवा एक मांडणी मनात ठेवून हा सिनेमा पाहायला जाणं म्हणजे त्या कलाकृतीशीही प्रतारणा केल्यासारखं होईल. (हे खरं तर सर्वच कलाकृतींना लागू आहे.)
तेव्हा ‘काश्मीर फाइल्स’ नक्की पाहा. हा सुन्न करणारा अनुभव घेताना आपण दुसऱ्यांच्या दु:खाप्रती कायम अधिक संवेदनशील झालो, तर त्यापेक्षा या चित्रपटाचं मोठं यश दुसरं नसेल.

---

25 comments:

  1. धन्यवाद!मी आपली वाचक follower आहे. बहुतांशी तुमची परीक्षण वाचून सिनेमा पाहाते. यावेळेस उलटं झालं होतं. या चित्रपटामुळे सध्या निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती त्यामुळे आपल्या परीक्षणाची उत्सूकता होती. कोणतंही पूर्वग्रहविरहित अतिशय मार्मिक सिनेमा सांगितलाय. धन्यवाद!असेच लिहित रहा!'खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. पुरवग्रहविरहित परीक्षण आवडलं.. मस्त लिहिलंयस श्रीपाद दादा 👌🏻

    ReplyDelete
  3. श्रीपाद,
    सध्याच्या उन्मादी वातावरणात तठस्थ भूमिकेतून मांडलेले विचार वाचून छान वाटले. आपल्या देशात समाजाच्या कुठल्याही समाजघटकावर अन्याय होता कामा नये. तुझी चित्रपट परीक्षणे मला नेहमीच भावतात. मला या निमित्ताने 'फिराक' चित्रपटाची आठवण झाली.

    राजीवकाका.

    ReplyDelete
  4. Replies
    1. धन्यवाद... कृपया आपले नाव लिहा...

      Delete
  5. उत्तम समीक्षा 👌👌

    ReplyDelete
  6. आपल्या देशात आर्थिक उदारीकरणानंतर, त्यातही २००० नंतर मध्यमवर्ग सुखासीन झाला. महानगरं गर्दीनं फुगू लागली. आपण सारेच आपल्याभोवती सुखाचा छोटासा कोष विणून त्यात रममाण झालो.

    हे विश्लेषण विशेष आवडलं

    ReplyDelete
  7. परीक्षण आवडलच. पिक्चर पाहिला तेंव्हा मीही सुन्न झाले होते. दुरदेशी होणारे अन्याय आपल्याला ठाऊक आणि भारतीयांवर झालेला अन्याय आपल्याला ठाऊकच नवता याच वाईट वाटलं.
    कुठल्याही व्यक्तीला स्वतःच घर,स्वतःच गाव अशा पद्धतीने सोडावं लागुन निर्वासित व्हाव लागु नये

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. कृपया आपले नाव लिहा...

      Delete
  8. सर सिनेमाच्या सगळ्या पैलूंना अतिशय समर्पक न्याय दिलात. परीक्षण म्हणजे काय आणि सिनेमा हे माध्यम किती गांभीर्याने पाहायचा विषय आहे, हे नेहमीच तुमच्या लेखनातून समोर येते.सिनेमासारखेच आपले लेखनही नव्या पिढीसाठी अभ्यासाचा विषय आहे, हे नक्की! अधिकाधिक लिहावे,ही विनंती आणि शुभेच्छा.

    ReplyDelete
  9. विचार करायला लावणार आहे परीक्षण ..खर म्हणजे मी आठवड्यापूर्वी हा चित्रपट पाहिला व याबाबतीत बरच काही पूर्वी वाचलं व ऐकलं होत .. पण आज तुमच्या परीक्षणातून एक वेगळी बाजू पण दिसली ..विविध कोनातून उत्तम विश्लेषण केलंयत ..काही गोष्टी व कंगोरे आत्ता लक्षात आलेत ..जबरदस्त अवलोकन व अफाट लिखाण आहे तुमचे ..अभिनंदन व खूप धन्यवाद !👌💐

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद वीणाजी...

      Delete
  10. Movie not seen till now .
    But perfectly written review from all perspectives...👍🏻👍🏻

    ReplyDelete
  11. खरोखरच सुन्न करणारा अनुभव. अतिशय सुंदर परीक्षण. परीक्षणामुळे पुन्हा हा सिनेमा पहावासा वाटतोय .

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद ज्योत्स्नाताई...

      Delete
  12. ��सुंदर आणि सविस्तर चपखल परीक्षण वाचायला मिळालं.�� ��' द काश्मिर फाईल्स' ह्या चित्रपटात काही प्रश्न कालातीत आहेत, ते चित्रपटापुरते मर्यादीत नाहीत. धर्मांधांनी युवा उर्जेला चिथवणं, धर्मांध क्रौर्याची परिसीमा, परधर्मी शेजाय्राच्या जागेचा हव्यास मनी धरून त्या स्वधर्मी क्रूरकर्म्याला मदत करणं, लेखणीचा वा वाणीचा ओजस्वी वापर करून समाजसुधारणा करणाय्रांना निःशस्त्र अवस्थेत शस्त्राच्या बळावर नामोहरम करणं हे तर सीमेपलिकडून वा सीमावर्ती भागात स्वातंत्र्योत्तर काळात आजही घडत असताना चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून ते उत्तम दिग्दर्शनाखाली उत्तम अभिनयाद्वारे दाखवलं गेलं असेल तर चित्रपट पाहून सुन्नपणे बाहेर पडणाय्रा प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडणारच. क्रौर्याच्या भडक सादरीकरणाशिवाय पटकथेला बळकटी येत नाही हे तर या माध्यमाचं गृहितक आहे. त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थितीत विकली जाऊ शकणारी पत्रकारिता, सडलेल्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे बांधलेले पोलिसखात्याचे हात, बेछुट वागण्याला जरासा विरोध झाला की रुग्णसेवकांनाही दहशतीखाली आणण्याची अपप्रवृत्ती हे सारंसुद्धा यात दाखवलं गेलंय, जे आजही आपण ठायीठायी अनुभवत आहोत. त्यामुळे काश्मिरी पंडीतांच्या विस्थापनाचा कटू विषय हे या चित्रपटाचं एक निमित्त मानलं, तरी आज पदोपदी विस्थापित होणाय्रा 'माणुस'कीची चिंता वाढणं आणि त्यावर समाजाचं समुपदेशन होणं ही काळाची गरज आहे असं वाटतं.

    ReplyDelete