23 Nov 2023

मनशक्ती दिवाळी २३ लेख

‘आमच्या वेळी असं नव्हतं...’
----------------------------------

दोन पिढ्यांमधलं अंतर स्पष्ट करणारं आणि नेहमी ऐकू येणारं वाक्य म्हणजे - ‘आमच्या वेळी असं नव्हतं’... सतत हे वाक्य उच्चारणाऱ्यांना आपली पिढी काळाच्या स्पर्धेत मागं पडत चालल्याचा एक विचित्र अपराधगंड असतो बहुतेक! वास्तविक दोन पिढ्यांमध्ये काळाचं जसं स्वाभाविक अंतर असतं, तसंच ते इतर सर्व बाबतींत असणार, हे उघड आहे. तरीही आमच्या वेळी असं नव्हतं, हे सांगण्याचा अट्टाहास बहुतेक मंडळी का करतात देव जाणे. खरं तर नव्या पिढीशी दोस्ती करणं अवघड नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा मात्र हवा. मुलाला पित्याच्या चपला यायला लागल्या, की त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होतं किंवा व्हायला पाहिजे, असं एका संस्कृत श्लोकात सांगितलं आहे. मात्र, आपल्यापैकी किती जणांना आपल्याच मुलांशी असं मैत्रीचं नातं प्रस्थापित करता येतं?
यातही गंमत अशी असते, की आपण दर वेळी आपली दोन्ही पिढ्यांशी सतत तुलना करत असतो. एक आपल्या आई-वडिलांची पिढी आणि एक आपल्या मुलांची पिढी. दोन्ही पिढ्यांकडून आपल्यावर अन्याय झाला; आपलं ‘सँडविच’ झालं, असं आत्ताच्या पिढीला मनोमन वाटत असतं. विशेष म्हणजे, प्रत्येक पिढीमध्ये ही भावना दिसते. म्हणजे आपल्या आई-वडिलांनाही त्यांच्या आई-वडिलांविषयी व आपल्याविषयी असंच वाटत असतं. आपल्या मुलांनाही नंतर आपल्याबद्दल आणि त्यांच्या अपत्यांबद्दल असंच वाटणार, हेही नक्की.
आपल्याला कायम आपल्या स्वत:विषयी सहानुभूती वाटत असते. हे अगदी स्वाभाविक आहे. आपलं इतर कुणाहीपेक्षा आपल्या स्वत:वरच प्रेम अधिक असतं. आपण स्वत:ला फार जपत असतो. त्यामुळं आपलं प्रेम, विरह, दु:ख, वेदना, उद्वेग हे जे काही असेल ते इतरांपेक्षा कांकणभर अधिक सरस असतं, असं आपल्याला कायम वाटत असतं. लग्न झालेल्या प्रत्येक बाईला ‘मी होते म्हणून टिकले, दुसरी कुणी असती तर...’ हे जसं वाटत असतं, तसंच आपल्याला ‘मी जो त्याग केला, ते केवळ मी होतो म्हणून; बाकी कुणी असतं तर...’ असंच वाटत असतं. आपण चांगल्या घरात जन्माला आलो, आई-वडील इतर चार लोकांसारखेच होते, आपलं बालपण तसं सुखात गेलं, आयुष्यात फार कटकटी किंवा त्रास न होता, आतापर्यंतचा प्रवास झाला, लग्न वेळेवर झालं, मुलं-बाळं वेळेवर झाली, नोकरीत फार काही जाच नव्हता, मुलंही नीट शिकली, पैसे खर्च होत असले तरी आवकही बऱ्यापैकी होती, कष्टाने पैसे कमावले व चार गाठीलाही बांधले... हे सहसा पटकन कबूल करायला कुणी तयार होत नाही. खरं म्हणजे आपल्याकडे शंभरातील ८० ते ९० लोकांचं जीवन असंच गेलेलं असतं. मात्र, त्या आयुष्याला आपल्या कथित कष्टांचा, त्यागाचा तडका लावल्याशिवाय जीवनाची इतिकर्तव्यता झाली, असं आपल्याला वाटतच नाही. तसं बघायला गेलं, तर प्रत्येक पिढी त्या त्या काळानुसार जगत असते. त्या काळात जे जे उपलब्ध आहे, त्याचा आनंद घेत असते. जे नाही त्याचा त्या पिढीला खेद वा खंत असं काही नसतं. माणसाला साधारणपणे ८० वर्षांचं सरासरी आयुष्य मिळतं. म्हटलं तर हा काळ मोठा आहे. या काळात बरेच बदल घडून येऊ शकतात. अगदी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं उदाहरण घेतलं, तर यंदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षं पूर्ण झाली. आपल्यापैकी अनेकांनी तो काळ बघितलेला नाही. मात्र, देशाला मिळालेलं स्वातंत्र्य बघितलेले लोकही आज आहेत. तेव्हा ते अगदी लहान असतील, पण ती घटना त्यांना स्पष्ट आठवते आहे. आज साधारण ८५ ते ९० वय असलेले अनेक लोक आपल्यामध्ये आहेत. या सर्वांना देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन नीट आठवत असणार. त्यानंतरच्या सर्व घटना-घडामोडीही आठवत असणार. आपल्याकडे एखाद्याच्या वयाचा उल्लेख करायचा, तर ‘मी अमुक पावसाळे पाहिले आहेत,’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. याचा अर्थ तेवढे ऋतू पाहिले; तेवढी वर्षं पाहिली. काळाशी निगडित या सगळ्या आठवणी सापेक्ष असतात. कुणाला ६० वर्षं म्हणजे खूप जुना काळ वाटतो, तर कुणाला २० वर्षं म्हणजेही खूप पूर्वीची गोष्ट झाली, असं वाटू शकतं.
मध्यंतरी माझ्याच बाबतीत झालेली एक गंमत सांगायला हवी. दुपारी जेवत असताना, सहज चॅनेल सर्फिंग करत होतो. ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘तराने पुराने’  कार्यक्रम सुरू होणार असल्याची पाटी दिसली. ‘व्वा’ असं म्हणून मी एखादं जुन्या काळचं कृष्णधवल गीत सुरू व्हायची वाट बघू लागलो. तर गाणं लागलं - अजनबी मुझ को इतना बता... हे तर ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातलं (१९९८) काजोल व अजय देवगण यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. मनात विचार आला, अरेच्चा! हा तर आपल्या डोळ्यांसमोर रीलीज झालेला आणि थिएटरला जाऊन पाहिलेला सिनेमा आहे राव! पण मग विचार केला, त्यांचंही बरोबरच आहे. झाली की २५ वर्षं आता! हे ‘तराने’ आता ‘पुराने’च म्हणायचे. तर काळाचं हे असं असतं. आपलं वय होत जातं; पण आपल्याला अनेकदा ते स्वीकारायचं नसतं. सगळं आपल्या काळात जसं चाललं होतं, तसंच पुढच्या सर्व काळात चालायला पाहिजे, असं आपल्याला वाटत असतं. यातली गंमत अशी, की काळानुरूप झालेले सर्व आधुनिक बदल, तंत्रज्ञानादी सोयी, सुखासीनता यांच्याबाबत आपल्याला काही आक्षेप नसतो. ते सगळं आपल्याला हवंच असतं. म्हणजे उदाहरणार्थ, आज चाळिशीत असलेल्या व्यक्तीच्या विशीत स्मार्टफोन नव्हते, म्हणून वीस वर्षांपूर्वीचा काळच कसा चांगला होता, म्हणत उसासे टाकणाऱ्या त्याच व्यक्तीला स्मार्टफोनचा विरह मात्र वीस सेकंदही सहन होत नाही.
‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्या मनात नक्की कोणती भावना असते? खूप प्रामाणिकपणे उत्तर देता येईल का आपल्याला? आपल्याला आपल्या काळात नसलेल्या व आता उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा उपभोग आता वयपरत्वे घेता येत नाही, याची काहीशी असूया तर वाटत नसते ना? मागच्या पिढीत आणि पुढच्या पिढीत आपलं ‘सँडविच’ झालं असं म्हणताना, खरं तर आपल्याला ‘आम्हाला दोन्ही पिढ्यांचे फायदे मिळाले नाहीत,’ असं काहीसं विषादानं वाटत असतं. आधीच्या पिढ्यांमधला कौटुंबिक जिव्हाळा, सामाजिक सौहार्द, व्यक्तिगत जिव्हाळा, शांत-संथ ग्रामीण जीवन किंवा चाळीतलं वा वाड्यातलं आपुलकीचं जीवन आपल्याला हवं असतं, तर नव्या पिढीच्या वाट्याला आलेली भौतिक संपन्नता, तंत्रज्ञानातील प्रगती, सढळ हाताने पैसे खर्च करण्याची ताकद, एसी घरांपासून ते विमानप्रवासापर्यंतच्या सर्व गोष्टी याही आपल्याला हव्या असतात. दोन्ही गोष्टी अर्थात एकाच वेळी मिळू शकत नाहीत. मग हा संघर्ष उभा राहतो आणि आपण काहीसं खंतावून, काहीसं वैतागून म्हणतो - ‘आमच्या वेळी असं नव्हतं...!’
खरं तर प्रत्येक पिढीसमोर काही ना काही तरी आव्हानं उभी असतातच. ती बरीचशी त्या काळानं उभी केलेली असतात. काही गोष्टी चांगल्या असणार, तर काही वाईट हे अगदी गृहीत आहे. आजच्या तरुणांबाबत, म्हणजे पुढच्या पिढीबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्यासमोरही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेतच. काळ वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाची प्रगती अतिशय वेगाने होत असल्यानं या बदलांचाही वेग प्रचंड आहे. नव्या पिढीला या वेगाशी जमवून घेण्याचं मोठं आव्हान आहे. हल्ली ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप बोलबाला आहे. या ‘एआय’चं मोठं आव्हान आजच्या तरुण पिढीसमोर आहेच. स्मार्टफोनमुळं आपलं जगणंच कसं पूर्ण बदलून गेलं, हे आपल्या पिढीनं गेल्या १२-१५ वर्षांत नीट अनुभवलं आहे. आता कदाचित त्याहून अधिक वेगवान आणि स्तिमित करणारे बदल ‘एआय’मुळे घडू शकतील. किंबहुना आत्ताच घडत आहेत. यंत्र मानवाची जागा घेऊ शकत नाही, असे आपल्याला आतापर्यंत वाटत होते. मात्र, आता तसे काही प्रमाणात का होईना, घडण्याची चिन्हे दिसत आहे. त्यातून निराळेच सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक प्रश्न उपस्थित होणार आहेत. नव्या पिढीलाच त्यांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणात प्रतिकूल बदल घडताना दिसत आहेत. त्यामुळेच वादळे, महापूर, भूस्खलन आदी भौगोलिक संकटे वाढताना दिसत आहेत. या संकटांचा सामना पुढच्या पिढीलाच करायचा आहे. याशिवाय वाढती लोकसंख्या, वाढती धार्मिकता, वाढता कट्टरतावाद, वाढता उन्माद, वाढता हिंसाचार या सगळ्यांना तोंड देण्याची तयारी तरुण पिढीला करावी लागणार आहे.
अर्थात या तरुण पिढीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीही कमी नाहीत. एक तर ही तरुण पिढी अतिशय स्मार्ट आहे. हुशार आहे. हे सगळे तरुण अतिशय ‘सॉर्टेड’ आहेत. त्यांना आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही, याचं नेमकं भानही आहे. त्या जोरावर ते ही नवी आव्हानं नक्कीच पार पाडतील. त्या तुलनेत आपल्या आधीची पिढी आणि अगदी आपली म्हणजे आत्ता चाळिशीत किंवा पन्नाशीत असलेली पिढी यांना खरोखरच याहून कमी आव्हानांना तोंड द्यावं लागलं आहे, हे मान्य करायला हवं. करोनाकाळ हा एक अपवाद. मात्र, ते संकट अवघ्या मानवजातीनंच पेललं. त्यात ही पिढी, पुढची पिढी असा काही भेद मुळातच नव्हता. त्या तुलनेत आता टीनएजमध्ये किंवा विशीत असलेल्या तरुणाईला अधिक व्यापक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, हे निश्चित. मात्र, ही तरुण पिढी या सर्व आव्हानांना पुरून उरेल आणि एक आदर्श, सुखवस्तू आणि समाधानी असा देश घडवू शकेल, यात अजिबात शंका बाळगायला नको. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजीमहाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई ते स्वामी विवेकानंद अशा अनेक शूर स्त्री-पुरुषांनी अगदी कमी वयात फार मोठे पराक्रम गाजवले आणि काळाच्या पटावर आपली लखलखीत नाममुद्रा कोरून ठेवली. भारतातील तरुणांपुढे असे उत्तुंग आदर्श असल्याने त्यांनाही ही उंची गाठण्याची आस असणारच.
तेव्हा ‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ हे रडगाणं गायचं बंद करून, नव्या पिढीसाठी ‘कुठल्याच काळात कधीच नव्हतं, असं भव्य काही तरी निर्माण करा’ असा आशीर्वादाचा उद्गार आपल्या मुखातून बाहेर यावा, हीच सदिच्छा!


---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती दिवाळी अंक २०२३)

---

1 comment: