17 Dec 2013

'जंबिया मधाचा...'


कौशिकी चक्रवर्तीचं गाणं ऐकताना अडचण एकच येते. ती म्हणजे डोळे बंद करून तिचं गाणं ऐकता येत नाही. म्हणजे तसं करायला गेलो, तर कान आणि डोळे यांच्यात भांडणच सुरू होतं! पण हे देखणं स्वरशिल्प अनुभवताना एका गोष्टीत मात्र स्वतःचंच एकमत होतं, ते म्हणजे ऐंद्रिय अनुभूतीच्याही पार नेणारं काही तरी आपण ऐकत आहोत... परवा सवाई गंधर्व महोत्सवाच्या स्वरमंचावर कौशिकीचं गाणं ऐकताना माझं मन नकळत भूतकाळात गेलं. स्वतः कौशिकीनंही तिच्या या मंचावरच्या पहिल्या हजेरीचा अनुभव सांगितला. त्या वेळी चहा प्यायला बाहेर न गेलेल्यांपैकी मी एक होतो आणि तेव्हाचं तिचं ते गाणं ऐकून मी तेव्हाच तिचा फॅन झालो होतो....
कौशिकीचा जन्म १९८० चा. म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवात ती पहिल्यांदा गायिली तेव्हा, तर तिनं तिशीही ओलांडली नव्हती. तेव्हाच तिचं गाणं ऐकतानाच लक्षात आलं होतं, की हे प्रकरण काही तरी निराळं आहे... मला शास्त्रीय संगीतातलं खूप कळतं, असं अजिबात नाही. व्याकरण तर नाहीच कळत... पण तरीही कौशिकीचं गाणं आवडतं. ते गाणं समजतं. याचं कारण कौशिकीचं गाणं हे आजच्या तरुणाईचं गाणं आहे. भारतातल्या नव्या पिढीची सर्व लक्षणं तिच्या गाण्यात दिसतात. लहानपणापासून झालेले गाण्याचे संस्कार, आत्मविश्वास, जग जिंकण्याची दुर्दम्य आकांक्षा आणि त्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत घेण्याची तयारी ही या पिढीची सहज दिसणारी लक्षणं आहेत. विश्वनाथन आनंद, सचिन तेंडुलकर यांच्यापासून प्रेरणा घेणारी ही पिढी आहे. तिच्या गाण्यात तिच्या व्यक्तिमत्त्वातला अवघा गोडवा उतरतो आणि आणि तो ऐकणाऱ्याला वेडं करतो. आपल्याकडं असलेल्या गुणांची, बलस्थानांची नेमकी जाणीव असणं हेही या पिढीचं लक्षण आहे. कौशिकीलाही ती आहे. मैफली कशा जिंकायच्या, याचं एक शास्त्र आहे. ते तिनं पुरेपूर अंगीकारलं आहे. अनेक मोठमोठे गायक विनम्र भावाचं प्रदर्शन करतात. कौशिकीही तसंच बोलते. मात्र, तिचं हे बोलणं मनापासूनचं वाटतं. ते खोटं, कृत्रिम वाटत नाही. तिच्या गाण्यासारखाच तिच्या व्यक्तिमत्त्वातला तो लखलखीत पारदर्शीपणा बावनकशी सोन्यासारखा अस्सल आहे.
तिचे पिता आणि गुरू पं. अजय चक्रवर्ती यांनी कौशिकीवर आणि तिच्या गाण्यावर घेतलेली मेहनत जाणवते. अर्थात गाताना ती एवढ्या सहजतेनं गाते, की शास्त्रीय संगीत गाणं खूप सोपं आहे, असं वाटावं. आणि असं वाटायला लावणं यातच तिचं यश आहे. सूरांवरची तिची हुकमी पकड कळतेच. शिवाय पल्लेदार ताना, मुरके, खटके, हरकती आदी शास्त्रीय संगीतातल्या अनेक गोष्टी ती लीलया करते. कधी तरी वरचा सूर लावताना तिचा आवाज किंचित किनरा होतो. पण हा दोष न वाटता, ती तो इतक्या आकर्षक पद्धतीनं सादर करते, की बस्स... मला खरोखर त्यातल्या तांत्रिक बाबी कळत नाहीत. शास्त्रीय संगीताच्या समीक्षकांच्या दृष्टीने तिचं गाणं कसं आहे, हे मी सांगू शकत नाही. मात्र, सूरांचं नातं ऐकणाऱ्याच्या हृदयाशी असतं, एवढं मला कळतं. कौशिकीच्या गाण्यातल्या काही जागा अशा असतात, की बोरकरांच्या भाषेत तो 'जंबिया मधाचा... कलिजा चिरत' जातो... त्या ताना ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात... आपलं संपूर्ण शरीर त्या सूरांवर डोलत असतं. हृदयात कसलीशी तीव्र स्पंदनांची कारंजी उसळत असतात आणि वाटत असतं, की हे सूर असेच कानी पडत राहावेत...
कौशिकीसाठी हजारोंच्या संख्येनं त्या मंडपात उपस्थित राहिलेल्या अनेक रसिकांचीही हीच भावना असणार. अगदी थोड्या कालावधीत या गायिकेनं आपली सर्वांगसुंदर स्वरमुद्रा सर्वांच्या हृदयावर उमटवली आहे. म्हणून तर तिचं गाणं संपल्यावर आता काही ऐकूच नये, असा सार्वत्रिक भाव तिथं उमटला. तिचं गाणं संपल्यानंतर रसिकांनी किती तरी वेळ टाळ्यांचा कडकडाट करून आणि उभं राहून तिला जी दाद दिली, ती पुरेशी बोलकी होती. कौशिकीचं गाणं पुणेकरांना मनापासून भावलं आहे आणि ही गायिका त्यांच्या गळ्यातली ताइत बनली आहे, हे सिद्ध करायला आता आणखी कुठल्याही पुराव्यांची गरज नाही. भारतात शास्त्रीय संगीताला किती उज्ज्वल भवितव्य आहे आणि पुढची पिढी किती समर्थपणे ही परंपरा पुढं घेऊन चालली आहे, हे पाहायला पं. भीमसेन जोशी त्या सभामंडपात हवे होते... अर्थात अण्णांचा आणि त्यांच्या सर्व पूर्वसूरींचा आत्मा त्या वेळी नक्कीच तिथं असणार आणि त्यांनी या गुणवती गायिकेवर आशीर्वादांच्या सूरांच्या लडीवर लडी उधळल्या असणार, असं वाटावं एवढं त्या वातावरणात भारावलेपण आलं होतं.
काही काही गोष्टी समीक्षेच्या किंवा रुक्ष गणिती मोजपट्टीच्या हिशेबापलीकडं असतात... कौशिकीनं शेवटी गायिलेल्या त्या एका याद पिया की आये...वर दिल आणि जान दोन्ही कुर्बान...
पुढची कित्येक वर्षं तिनं आपलं आयुष्य असंच सुरेल करावं, एवढंच त्या जगन्नियंत्याकडं मागणं...

17 comments:

 1. मी जारी या अनुभवाला मुकलो आहे तरी हे आणि असंच सगळं या आधी आणि अत्ता सगळ्यांच्या तोंडी ऐकतो आहे. तुझं अभिनंदन. गाण्या एवढ्याच सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 2. कौशिकी चक्रवर्तीचं गाणं नितांतसुंदर आहे यात शंका नाही.
  तसेच स्वराना शब्द ची साथ लाभल्याने जो सुगन्ध पसरतो याचि प्रचिती लेख वाचुन येते

  ReplyDelete
 3. वाह! श्रीपादजी वाहवा!! काय तुमचा शब्द भंडार आहे! कोणत्या समुद्रातून हे शब्दरुपी मोती शोधून आणता हो. सवाई महोत्सवाला यंदा येणे जमले नाही, परंतु तुमच्या या लेखाने तिथे असल्याचा भास मात्र करवून दिला. तुमच्या समीक्षाही आवर्जुन वाचतो. अगदी चपखल शब्दात लिहिता. सिनेमा फ्लॉप असला तरी त्यावरची तुमची भन्नाट समीक्षा वाचायला फार आवडते, मजा येते. असेच लिहित राहा आणि आनंद वाटत राहा! शुभेच्छा!!!

  ReplyDelete
  Replies
  1. बाप रे.... अहो, हे जरा जास्तच झालं... पण मनापासून धन्यवाद...

   Delete
 4. वाह...ब्रम्हेजी...वाह...क्या बात है..किती सुंदर...किती तरल...अगदी कौशिकी यांच्या आवाजाप्रमाणेच..
  .......मी त्या टाळ्या आणि त्यांच्या गाण्याची अखेर कानामध्ये अगदी साठवून ठेवली आहे...तुमचे लिखाण वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला...

  ReplyDelete
 5. परवीन सुलताना यांची पुण्यातली पहिली मैफल (1970 च्या सुमारास) ऐकताना असेच झाले होते कान आणि डोळ्यांचे भांडण.

  ReplyDelete
  Replies
  1. वा वा... त्या अजूनही कसल्या भारी दिसतात....

   Delete
 6. तू ही अगदी स्वरशिल्पचं उभं केलंस ह्या लेखातून!!

  ReplyDelete
 7. तंतोतंत.
  बोरकर असते तर जपानी सारखीच हिच्या साठी बंगाली गवळण लिहिली असती 😀

  ReplyDelete
 8. सुंदर , अतिसुंदर

  ReplyDelete