21 Dec 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो धूम-३

फक्त आमिर & आमिर...
-------------------------




'धूम' मालिकेतल्या तिसऱ्या भागात खलनायकाची भूमिका आमिर खान साकारणार आहे, ही बातमी ज्या दिवशी फुटली त्याच दिवशी हा टोटली आमिर खानचा सिनेमा असणार, हे नक्की होतं. (कारण कथित नायक-नायकाची जोडी अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हीच ठरलेली आहे. ती राष्ट्रीय तरुण बेरोजगार योजना की काय... त्याअंतर्गत!) पण सिनेमा प्रत्यक्षात बघितल्यावर त्यात थोडी भर घालून म्हणावंसं वाटतं - की हा फक्त आमिर आणि आमिरचा सिनेमा आहे! आमिर खान हाच सिनेमाचा महानायक आहे. सिनेमा सुरू झाल्यानंतर साधारण दहाव्या मिनिटाला आमिरचं पडद्यावर दर्शन होतं आणि ते शेवटच्या फ्रेमपर्यंत कायम राहतं. आमिरच्या याआधीच्या सिनेमांप्रमाणे याही सिनेमात त्यानं संपूर्ण फोकस आपल्यावर राहील, याची काळजी घेतली आहे. त्याच्या सव्वापाच फूट उंचीच्या देहात संपूर्ण पडदा व्यापण्याची क्षमता आहे. त्या अर्थानं आमिरच्या चाहत्यांना हा सिनेमा म्हणजे त्याच्याकडून आणखी एक ट्रिट आहे. पण...
हा 'पण...' अनेक गोष्टींत लागू आहे. आमिर खान त्याच्या सिनेमाच्या पटकथेवर (पुष्कळ ढवळाढवळ करून) काम करतो, असं ऐकलं होतं. पण 'धूम-३'ची पटकथा अत्यंत विस्कळित आणि अस्ताव्यत आहे, हे आमिरच्या लक्षात आलं नाही? 'धूम-३'सारख्या अॅक्शन सिनेमाला ज्या किंचित रहस्याची डूब देऊन हा सारा डोलारा उभा केला आहे, ते किती कमकुवत आहे, याची कल्पना या बुद्धिमान नटाला आली नसावी? आमिर स्वतःच्या व्यक्तिरेखे(खां)वर भरपूर मेहनत घेतो, स्वतःच्या लूकवर खूप काम करतो, प्रत्येक फ्रेममधील त्याचं अस्तित्व नीट चाचपून घेतो, हे सर्वांनाच माहिती आहे. इथंही त्यानं ते केलंच आहे आणि त्याबद्दल त्याला सलाम... पण बाकीचं काय? बहुदा बाकीच्या पात्रांची मांडणी, उभारणी आणि त्यांचा कथेतला प्रवास, कथेतील ट्विट्स अँड टर्न्स आदी सर्वच बाबी त्यानं दिग्दर्शकावर सोडून दिल्या असाव्यात. अर्थात त्या दिग्दर्शकानंच पाहणं अपेक्षित असतं. पण आमिर खानचा सिनेमा अशा सर्वच बाबींना अपवाद असतो, म्हणून ही तक्रार. कारण आमिर खान या नावाचं वलय आणि त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या असतात. नाही तर अन्य खानांमध्ये आणि त्याच्यात फरक तो काय राहिला?
एकापेक्षा एक अतर्क्य आणि प्रेक्षकांच्या किमान बुद्धीलाही आव्हान देणाऱ्या प्रसंगमालिकांनीच हा सिनेमा सुरू होतो आणि काळजाचा ठोका क्षणभर चुकतो. विशेषतः जय (अभिषेक बच्चन) आणि अली (उदय चोप्रा) यांची एंट्री ज्या गावठी आणि बी ग्रेडच्या दृश्यानं (इथं दिग्दर्शकाला कॉमेडी अपेक्षित असावी...) होते, तिथं तर सिनेमा पूर्ण हातातून गेला, असंच वाटून जातं. पण सुदैवानं नायकाच्या संघर्षाला प्रारंभ होतो आणि सिनेमा पुन्हा ट्रॅकवर येतो. शिकागोत नव्वद सालात द ग्रेट इंडियन सर्कस चालविणारा इक्बाल खान (जॅकी श्रॉफ) आणि कर्जफेड केली नाही म्हणून त्यावर जप्ती आणणारी वेस्टर्न बँक ऑफ शिकागो यांच्यातील संघर्षात इक्बालचा बळी गेलेला त्याचा मुलगा साहिर (सिद्धार्थ निगम) पाहतो. हाच मुलगा मोठा साहिर (आमिर) होऊन बँकेला धडा शिकवण्याच्या मागे लागतो. आता इथं (सब)नायक-नायक जोडी भारतातून येण्यासाठी काही तरी निमित्त हवं. मग त्यासाठी महानायक सगळीकडं कोळशानं हिंदीतून बँक की ऐसी की तैसी वगैरे लिहून ठेवत असतो... (आता अमेरिकेत ढिगानं असलेले कोणीही भारतीय हे काय लिहिलंय हे सांगू शकलं असतं. पण मग जय आणि अली तिथं येणार कसे? असो.) इथून पुढं मग बाइक्सची थरारक धूम, पाठलाग वगैरे साग्रसंगीत पार पडतं. (ही दृश्यं चांगलीच आहेत, पण आता तो दर्जा या सिनेमात अपेक्षितच आहे...) मग मध्यंतराला गोष्टीतला तो (किंचित) ट्विस्ट येतो. वास्तविक हिंदी सिनेमे पाहणारा कोणीही माणूस हे रहस्य लगेचच ओळखील. पण तरीही इथं ते सांगत नाही.
मग उत्तरार्धात या किंचित रहस्यानं निर्माण झालेला गुंता सोडवण्याचा जय आणि अली यांचा प्रवास आणि महानायकाचं त्यांना चकवा देत पळणं हा भाग बऱ्यापैकी खिळवून ठेवतो. त्यात काही उपकथानकासारखाही भाग येतो. अरे हो, या सिनेमाला एक नायिकाही आहे हं अलिया (कतरिना) नावाची. महानायकासमोर पाच मिनिटांचा (अक्षरशः 'स्टनिंग' असा) डान्स करून ती त्याच्या सर्कसमध्ये दाखल होते आणि महानायकाला नायिका हवी, ही महत्त्वाची गरज पूर्ण करते. मग पुढं त्यांचं प्रेमप्रकरण वगैरे. पण तो भाग थोडा किंचित रहस्याशी संबंधित असल्यानं सविस्तर सांगता येत नाही. तर हे सगळं होतं आणि अपेक्षेप्रमाणं सबनायकांच्या हातून मार खाऊन मरण्यापेक्षा महानायक वेगळा मार्ग निवडतो, हे सांगायला नको. वेगानं खाली जाऊन महानायकाला अंतिमतः मोठी उंची प्राप्त होते, हे ओघानं आलंच!
या सिनेमाला खाली नेणारी, पण अंतिमतः मोठी उंची प्राप्त अजिबात न करून देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची लांबी. सुमारे तीन तासांचा हा सिनेमा असून, एवढ्या लांबीची मुळीच गरज नव्हती. मात्र, विस्कळित पटकथेवर त्याचा सगळा दोष जातो. तरीही यात आयटेम साँग नाही, ते एक बरंय.
प्रीतम यांचं संगीत ठीक आहे. मलंग मलंग हे गाणं आणि त्याचं चित्रिकरण अप्रतिम आहे, यात वाद नाही. आमिर, कतरिना यांनी नृत्य आणि सर्कशीतले बरेच कायिक प्रकार लीलया केले आहेत आणि डमी न वापरता त्यांनी हे केलं असेल, तर त्यांचे खास कौतुक. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा त्यांची कामं नेहमीच्या सफाईनं करतात. मात्र, दुर्दैवानं आमिरसमोर त्यांना अजिबातच स्कोप नाही. सुरुवातीला छोट्या भूमिकेत जग्गूदादा उत्तम.
तेव्हा आमिरचे चाहते असाल, तर नक्की पाहा. कतरिनाचे असाल, तर अं... ओके. बघा. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राचे कुणी आहेत काय?
---

निर्मिती : यशराज फिल्म्स
दिग्दर्शक : विजय कृष्ण आचार्य
संगीत : प्रीतम
सिनेमॅटोग्राफी : सुदीप चटर्जी
प्रमुख भूमिका : आमिर खान, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ
दर्जा : ***१/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २१ डिसेंबर २०१३)


No comments:

Post a Comment