9 Dec 2013

आणखी काही कविता...

आणखी काही कविता
---------------------

४. तू..
------

तू एक सुंदर स्वप्न आहेस,

तू हळूवारपणे गालावर फिरणारं मोरपीस आहेस,

तू शिशिरातील पानगळीवर मात करणारी वसंत आहेस,

तू एक बहर आहेस,

तू तृषार्त चातकाची टपटप रिमझिम आहेस,

तू भेगाळलेल्या वसुंधरेची बरसात आहेस,

तू थंडीवर मात करणारी ऊब आहेस,

तू पहाटेचं कोवळं दंव आहेस,

तू रिकाम्या मनाच्या गाभाऱ्यातील निःशब्द शिल्प आहेस,

तू विराण वाळंवटातील हिरवंगार 'ओअॅसिस' आहेस,

तू ओसाड, पडीक माळरानावरली कोवळी हिरवळ आहेस,

तू अमावस्येच्या रातीची शांत, निश्चल समई आहेस,

तू एक नंदादीप आहेस,

तू आकाशतारकांच्या अंगणातली ध्रुव आहेस,

तू अफाट दर्यावरल्या छोट्याशा नावेची दीपस्तंभ आहेस,

तू खरं तर एक जिवंत भास आहेस,

छे! तू तर माझी आला-गेला श्वास आहेस!!!

- आनंदीनंदन

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
---

५. प्रवास
---------

अंधारलेल्या संध्याकाळची साथ धरून,
क्षणिक वावटळीने दूरदूर जाणाऱ्या,
क्षणात् मान टाकणाऱ्या
पिवळ्या पानांकडे हेव्याने पाहून,
मी रस्त्याने अडखळत जात असतो,
तेव्हा तुझ्याच सोबतीतल्या दिवसांच्या
आठवणींचा प्रकाश वाट दाखवीत असतो,

फार फार दिवसांपूर्वी मी लहान होतो,
लहान कसला, इवल्याशा रोपट्याचे
इवलेसे पान होतो,
बालपण सरले, 'तारुण्य' म्हणजे काय
ते कळण्याच्या आतच प्रौढत्वाने ग्रासले,
तेव्हा तुझीच साथ ह्या कु़डीत
प्राण फुंकत होती,
अंधारातल्या घोर चकव्याला
नवे आव्हान देत होती,

परिस्थितीच्या वादळात दोघेही
पुरते होतो वाट चुकलेले,
तुझ्या केवळ अस्तित्वानेच नवचैतन्य
मिळाले लढण्याचे, मुळातच नसलेले
अचानक तू सोडून गेलीस,
जगायचे कसे हेच मग मी
विसरून गेलो,

अशा या एकांड्या रस्त्याने
अडखळत पाऊल टाकताना,
माझीच सावली मला भिववते आहे,
तुझ्या त्या अवचित जाण्याची
गूढ महती मला पटवते आहे!!!

- आनंदीनंदन

(३ नोव्हेंबर १९९३, बुधवार, रात्री ९.४० वा., पुणे)
----

६. राजकारणी
--------------

राजकारणात तसे ते हुशार होते,
सत्तेचे अनेक पत्ते यशस्वीपणे
त्यांनी मांडले होते,

हुकमाचे एक्के नेहमीच त्यांच्या हाती असत,
अक्कलहुशारीमुळे समोरच्याच्या मनावरही ते लगेच ठसत!

सरकारे उलथवणे डाव्या हाताचा मळ होता,
पंतप्रधानपदासाठी कायमच टाकलेला गळ होता,

कधी डावे, कधी उजवे सारेच त्यांचे मित्र होते,
कधी संत, कधी चोर, सगळेच चित्र स्वच्छ होते,

दिवसाउजेडी गरीब, असहाय्य जनतेची
त्यांच्या दारी रांग असे,
दिवस सरताच, निशेच्या संगतीने,
वारुणिच्या रंगतीने सभा त्यांची रंगत असे

खाकी अर्धी चड्डीवाल्यांवरही त्यांचा जीव होता,
हिरव्या निशाणावरही त्यांचा तेवढाच जीव होता,
खरा जीव त्यांचा होता काळ्या गॉगलवाल्यांवर,
कारण ते होते तेच त्यांच्यामुळे; अन्यथा केव्हाच वर,

राजकारण ही त्यांची हौस होती,
फावल्या वेळेची करमणूक होती,
खरी लालसा तिजोरी भरण्याची होती,
त्यासाठीच त्यांच्या देहाची धडपड होती,

कॉन्टेसा, मारुती, अम्बेसिडर सगळ्या वापरून
जुन्या झाल्या होत्या,
मर्सिडीज, टोयोटा, रोल्स रॉइस यांच्या
ऑर्डरी बुक केल्या होत्या,

सामान्यांच्या झोपडपट्टीत पायी ते फिरत होते,
पायांना घाण लागू नये म्हणून,
'दाऊद'चे बूट सजग होते,

त्यांची देहयष्टी पहिल्यापासूनच स्थूल असणार,
भरपूर लागतं 'खायला', कोण काय करणार?
इवल्याशा त्या पोटासाठीच तर सारी धडपड आहे,
जीवाच्या कराराने जगणाऱ्यांची केविलवाणी ती तडफड आहे!!!

- आनंदीनंदन

(३ नोव्हेंबर १९९३, बुधवार, रात्री ९.५५ वा., पुणे)
----

७. आम्ही
----------

चुकणं माहीतच नाही आम्हाला,
आम्ही म्हणजे विश्वाचे सारथी,
सर्व जगाच्या बुद्धीचे भांडार,
बृहस्पतीचेही बाप आम्ही,
चुकणं माहीतच नाही आम्हाला,
आम्ही जन्माला आलो तेच मुळी
जगाच्या चुका सुधारायला,
सर्व काही ठाकठीक होण्यासाठी,
करड्या नजरेचा अंकुश फिरवायला,
भलेही करू आम्ही दशसहस्र अपराध,
पण, चुकणं माहीतच नाही आम्हाला,
जननियंत्याने करून ठेवलेत प्रचंड घोटाळे,
तेच निस्तरण्याचे आमचे काम मोठे,
अनेक कचराकुंड्या कराव्या लागतात साफ,
ह्या बाबतीतही आम्ही आहोत आळश्यांचे बाप,
पण शेवटी कामं करणारे अर्थात् आम्हीच,
कारण, चुकणं माहीतच नाही आम्हाला!!!

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
----

८. दोष कुणाचा?
----------------

चंदेरी रातीचा गोडवा मोठा,
अलगद अलगद गाणे येई ओठा,
जरी बसले सभोवती सगळे,
का मज होते असे ते न कळे,
प्रतिमा फक्त तुझीच पाहती डोळे,
अन्य साऱ्यांचे भानच जणू गळे,
क्षणी भिडती नयनांना नयन आपुले,
उरी घायाळ करीसी; आम्ही बापुडे
धडधड माझी वाढता वाढे उरीची,
का पडतोस फंदी या; काळजी मनीची,
तुझे ते शरसंधान साहवेना मज जरी,
मनी उमटते चित्र प्रणयी भरजरी,
तशातच तुझे ते उठणे अवचित,
अन् येणे माझ्याकडे; मी भयचकित,
स्पर्शाची कल्पना तुझ्या, मला उभारी देई,
आणि अचानक; तू मजसमोरून निघूनी जातसे,
डोक्यात प्रकाश पडे मग; अरे, हिच्या डोळ्यांत दोष असे!!!

- आनंदीनंदन

(१९ ऑक्टोबर १९९३, पुणे)
---

No comments:

Post a Comment