23 Aug 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - मर्दानी (A)

चवताळलेली वाघीण
-------------------------

 स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून, त्यातही आठ ते बारा वर्षांच्या कुमारिका मुलींना पळवून नेऊन, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारे आणि त्यातून करोडो रुपयांची माया गोळा करणारे नराधम पाहून खरोखर आपली ‘सटकते’! पण असे नरराक्षस आपल्या देशात अगदी राजरोस वावरत आहेत. अशा नराधमांना काय म्हणावं हे कळत नाही असं नाही; पण वृत्तपत्रीय लिखाणाच्या मर्यादेमुळं इथं लिहिता येत नाही, एवढंच! अशा लोकांना खास आपल्या स्टाइलनं वठणीवर आणणारी ‘मर्दानी’ राणी मुखर्जीच्या रूपानं रूपेरी पडद्यावर अवतरली आहे. लहान मुलींच्या कोवळ्या शरीराशी अत्यंत निर्घृण व्यवहार करणारे नामर्द लोक क्लायमॅक्सला मर्दानी राणीच्या बुटाखाली आणि नंतर त्या मुलींच्या लाथांखाली शेवटी तुडवले जातात, तेव्हा प्रेक्षागृहात (विशेषतः मुलींकडून) होणारा जल्लोष पाहून, या प्रकाराबाबत जनमानसात केवढा संताप खदखदतो आहे, याची कल्पना येते. सिनेमाची बाकी गुणवत्ता जाऊ द्या; केवळ या तीव्र भावनेला पडद्यावर अत्यंत परिणामकारकरीत्या सादर केल्याबद्दल निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक प्रदीपदादा सरकार आणि राणी खास अभिनंदनास पात्र आहेत, हे सांगायलाच हवं.
प्रदीपदादा हे कसलेले दिग्दर्शक आहेत, हे ‘परिणिता’पासूनच आपल्याला ठाऊक आहे. नंतरचे दोन सिनेमे मात्र ते एवढी चमक दाखवू शकले नव्हते. पण त्यांना या सिनेमात पुन्हा सूर गवसला आहे, हे सांगायला आनंद वाटतो. त्यांनी ११३ मिनिटांचा हा क्राइम ड्रामा जोरकसपणे मांडला आहे. या सिनेमाचा विषय अत्यंत संवेदनशील असला, तरी त्यांनी कुठंही त्यातून चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध एकरेषीय पद्धतीने पुढं जात असला, तरी तो पुरेसा खिळवून ठेवणारा झाला आहे. मुंबईसारख्या महानगरातून लहान मुलींना उचलणारी टोळी, त्यांची अंगावर काटा आणणारी कार्यपद्धती आणि मुंबईत क्राइम ब्रँचमध्ये सीनियर इन्स्पेक्टर असणाऱ्या शिवानी शिवाजी रॉय (राणी) या तडफदार अधिकाऱ्याची योगायोगानं या नेटवर्कशी पडलेली गाठ हा सर्व भाग पूर्वार्धात येतो. रस्त्यावर फुले विकणारी प्यारी (प्रियांका शर्मा) शिवानीच्या भाचीची मैत्रीण असते. एके दिवशी ही प्यारी गायब होते आणि शिवानी आपोआप या प्रकरणात ओढली जाते. प्यारीच्या निमित्ताने ती या गुन्ह्याच्या आणि त्याच्या बड्या सूत्रधारांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते, हा सर्वच भाग अत्यंत वेगवान पद्धतीनं आपल्यासमोर येतो. खऱ्या सूत्रधाराची शिवानीची फोनवरूनच झालेली ओळख आणि दोघांचं एकमेकांना आव्हान देणं आणि ३० दिवसांच्या आत त्याची गठडी वळण्याचं शिवानीनं चॅलेंज घेणं इथपर्यंत मध्यंतराचा प्रवास रोचक होतो. उत्तरार्धात कथा दिल्लीत पोचते. कुठलाही आगापिछा नसताना शिवानी खऱ्या गुन्हेगारांपर्यंत कशी पोचते आणि त्यांना कायमचा धडा शिकवते हे उत्तरार्धात रंजक आणि थरारक पद्धतीनं दिग्दर्शकानं मांडलं आहे.
दादांना पहिला सलाम तो प्रमुख भूमिकेसाठी राणी मुखर्जीची निवड केल्याबद्दल! राणीनं शिवानीची भूमिका ज्या पद्धतीनं उभी केली आहे, ते पाहण्यासारखं आहे. बंबय्या हिंदी-मराठीतून बोलणारी, ‘भ’ आणि ‘च’पासून सुरू होणाऱ्या शिव्यांचा सर्रास वापर करणारी जिंदादिल पोलिस ऑफिसर तिनं झक्कास साकारली आहे. प्यारीविषयीच्या जिव्हाळ्यातून गुन्हेगारीचं मोठं नेटवर्क तोडण्याचं आव्हान घेणारी, वरिष्ठांकडून होणारा विरोध सोसणारी आणि कनिष्ठ सहकाऱ्यांची मनापासूनची साथ घेऊन लढणारी शिवानी ही राणीच्या कारकिर्दीतील महत्त्वाची भूमिका ठरणार, यात शंकाच नाही. कोणताही प्रमुख पुरुष कलाकार नसतानाही हा सिनेमा आपल्याला कुठंही ती कमतरता राणीमुळंच जाणवू देत नाही. किंबहुना दादांच्या सिनेमात नायिका हीच खरी हिरो असते. राणीनं क्षणात हळवी होणारी, पण दुसऱ्याच क्षणी कर्तव्यकठोर होऊन लढणारी नायिका साकारताना आपल्या अभिनयक्षमतेची कक्षा लक्षणीयरीत्या विस्तारली आहे, हे लक्षात येतं.
या सिनेमात काही त्रुटी नक्कीच आहेत. विशेषतः मुंबईत राणी एकटीच या मोठ्या गुन्हेगारांशी लढते, तेव्हा तिचे कोणीच वरिष्ठ अधिकारी दाखवलेले नाहीत. एकाच प्रसंगात एक सीनियर अधिकारी तिला ओरडताना दाखवला आहे. पण त्यानंतर जेव्हा ती मुलींच्या ट्रॅफिकिंगच्या विरोधात उभी राहते, तेव्हा तिच्या दोन विश्वासू सहकाऱ्यांसह फक्त ती लढताना दाखवली आहे. मुंबईतून ती दिल्लीत जाते, तेव्हा एकदा एक वरिष्ठ अधिकारी तिला या केसमधून दूर व्हायला सांगतो, असं दाखवलं आहे. नंतर मात्र राणी स्वतःच वैयक्तिकरीत्या ही केस हाताळते. शिवाय जेव्हा ती प्रमुख सूत्रधाराच्या घरी पोचते, तेव्हा तो तिला फार काही न करता सोडून देतो, हे पटत नाही. त्याचं नंतर एक कारण सांगितलं जातंही; पण ते फारच फिल्मी आहे. सिनेमाच्या तोपर्यंतच्या वास्तववादी प्रवासाला ते सूट होत नाही. राणी तिचं नाव शिवानी शिवाजी रॉय असं सांगते. पण तिच्या घरावर पाटी मात्र डॉ. बिक्रम रॉय अशी असते. (अर्थात तिच्या वडिलांचं नाव शिवाजी असेल आणि नवऱ्याचं डॉ. बिक्रम असेल; दोघांचंही आडनाव एकच असेल आणि ती पोलिस दलात जुन्याच नावानं वावरत असेल, ही एक शक्यता आहे.)
प्रमुख खलनायक वॉल्ट उर्फ करण रस्तोगीच्या रूपात ताहिर रंजन हा नवा कलाकार आहे. त्यानं या उलट्या काळजाच्या खलनायकाची प्रत्येक छटा जीव ओतून दाखवली आहे. छोट्या भूमिकेत जिश्शू सेनगुप्ता आणि मोना आंबेगावकर प्रभावी. अन्य छोट्या भूमिकांत अनेक नवोदित कलाकार आहेत. त्यांचीही कामं चांगली झाली आहेत. विशेषतः शिवानीच्या मुंबई पोलिस दलातील मुस्लिम सहकाऱ्याचं काम करणारा कलाकार छाप पाडतो. सिनेमाला संगीत शंतनू मोईत्रा यांचं असून, शेवटी ‘छेड के देखो तुम मुझ को मैं तुम को नही छोडूंगी,’ हे (‘मर्दानी अँथम’ असं वर्णिलेलं) गाणं जमलेलं आहे.
निर्भया प्रकरणानंतर आपल्या देशात स्त्री अत्याचारांविरुद्ध मोठी जागृती झाल्याचं चित्र वरकरणी दिसतं. मात्र, प्रत्यक्षात अनेक लहान मुलींना आजही राजरोस पळवून नेलं जातं आणि त्यांना परदेशांत करोडो रुपयांना विकलं जातं. हे प्रकार बंद होतील, तेव्हाच देशातला प्रत्येक पुरुष ‘मर्द’ म्हणवण्यास लायक असेल. अन्यथा तोपर्यंत अशा नराधमांना ‘मर्दानीं’च्या बुटांचा प्रसाद वाटप करीत राहणे, हाच या सिनेमाचा खरा संदेश!
---
निर्माते : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : प्रदीप सरकार
कथा : गोपी पुथरन
संगीत : शंतनू मोईत्रा
प्रमुख भूमिका : राणी मुखर्जी, जिश्शू, रंजन, प्रियांका शर्मा, मोना आंबेगावकर आदी.
कालावधी : एक तास ५३ मिनिटे
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २३ ऑगस्ट २०१४)
----
--------------------------------------------------------------------------------------
 

22 Aug 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - सिंघम रिटर्न्स

मनोरंजनाचं महा'चिंगम'
--------------------
रोहित शेट्टीला 'चिंगम' (च्युइंगम) हा पदार्थ खूप आवडत असावा. कितीही वेळ चघळत बसलं, तरी न संपणारा आणि तोंड दुखेपर्यंत सोबत करणारा, शिवाय पाहिजे तेवढा ताणता येणारा असा हा बहुगुणी पदार्थ आहे. त्याचा सिंघम रिटर्न्स हा नवा हिंदी सिनेमा म्हणजे मनोरंजनाचं असंच चिंगम आहे. चिंगम आवडणाऱ्यांना ते आवडेल. चिंगम म्हणताच थूः थूः करणाऱ्यांना ते अर्थातच अजिबात आवडणार नाही.
फर्स्ट थिंग फर्स्ट. सिंघम हा या दुसऱ्या भागापेक्षा सरस सिनेमा होता. त्यातला सामना अधिक नेमका, थेट होता. बाजीराव सिंघमची स्टाइल नवी होती. त्याला जयकांत शिकरेच्या रूपानं तगडा खलनायक लाभला होता. त्यामुळं ती मनोरंजनाची महागर्जना चांगलीच दुमदुमली होती. सिंघम रिटर्न्समध्ये आता हा सामना मुंबईत आला आहे. सुमारे १.८४ कोटी मुंबईकरांची प्राणपणाने रक्षण करण्याची जबाबदारी अवघ्या ४७ हजार पोलिसांवर आहे आणि त्यातले बहुसंख्य सर्वसामान्य पोलिस अगदी नेकीने हे काम पार पाडत असतात. मात्र, काळ्या पैशांचं राजकारण करणाऱ्या आणि भोंदू बाबांच्या आश्रमांत हे पैसे लपविणाऱ्या राजकारण्यांमुळं सामान्यांप्रमाणंच काही चांगले पोलिसही भरडले जात असतात. अशा वेळी डीसीपी पदावर मुंबईत आलेला बाजीराव सिंघम हे दुष्टचक्र भेदण्याचा प्रयत्न करतो आणि पोलिसांच्या सहकार्यानं ही कामगिरी पूर्ण करतो. 
 'सिंघम रिटर्न्स'चा स्वतंत्र विचार करता तो अगदीच टाकाऊ बनला आहे, असं अजिबात नाही. पण रोहित शेट्टीनं अगदी ती सुरतची शंभर पदार्थ मिळणारी महाथाळीच सादर करण्याचा निश्चय केल्याप्रमाणे इतक्या गोष्टी यात कोंबल्या आहेत, की विचारायची सोय नाही. त्यामुळं याही सिनेमात रोहितची बाळगोपाळांचं मनोरंजन करणारी ती गाड्यांची हवेतली उडवाउडवी आहे, नायकाची काही जमलेली साहस दृश्ये आहेत, सुंदर नायिका आहे, तिचा कॉमेडी-कम-प्रेमाचा ट्रॅक आहे, सिंघमचं शिवगड गाव आहे, आई-बाबा आहेत, सर्वसामान्य पोलिस आणि त्यांच्या कुटुंबांची परवड आहे, काळा पैसा वापरणारे राजकारणी आहेत, आघाडीचं राजकारण आहे, चांगला-वाइट मीडिया आहे, दिल्लीचं प्रेशर आहे, दर्गा आहे, चादर आहे... गाणी आहेत. असं सगळं सगळं आहे. तरीही पहिल्या भागातल्यासारखी नायकाची ती 'स्टीम' जाणवत नाही. याचं कारण या सिनेमाचं झालेलं 'चिंगम'. आधीच खाल्लेलं च्युइंगम पुन्हा कुणी चघळायला दिलं तर ते जेवढं बेचव वाटेल, तसं काही वेळा वाटतं. म्हणजे काही काही ट्रॅक एवढे प्रेडिक्टेबल आहेत, की बस्स. कॉन्स्टेबल महेश जाधवचा (गणेश यादव) थोडासा सस्पेन्स ट्रॅक वगळला, तर या सिनेमात नवं किंवा वेगळं काहीही नाही. भारतीय लोक पार्टीचे प्रमुख गुरुराज आचार्य (अनुपम खेर) हे 'सिंघम'चेही गुरुजी असतात. राज्याचे मुख्यमंत्री अधिकारी (महेश मांजरेकर) हाही सिंघमचा शाळेतला सीनियर मित्र. सत्ताधारी पक्षाबरोबर आघाडी असलेले नेते प्रकाश राव (झाकीर हुसेन) आणि भोंदू बाबा सत्यराज चंदर (अमोल गुप्ते) यांच्या काळ्या पैशांच्या जोरावर सुरू असलेल्या कारवायांना गुरुजींचा विरोध असतो. त्यातून प्रकाश राव आणि बाबा सत्तेतून बाहेर पडतात आणि त्याच वेळी गुरुजींचीही हत्या होते. राव आणि बाबांच्या काळ्या पैशांविरोधात पुरावा गोळा करण्याची जबाबदारी सिंघमवर येते. त्याच वेळी त्याचा विश्वासू कॉन्स्टेबल महेश जाधव एका रुग्णवाहिकेतून दहा कोटी रुपयांचा काळा पैसा नेताना मृतावस्थेत आढळतो. सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेल्या सिंघमला आता कसंही करून राव आणि बाबांपर्यंत पोचायचं असतं. त्यासाठी मग एका प्रसंगातून त्याची सटकावी लागते. तशी ती सटकते आणि मग उत्तरार्धात संपूर्ण सिंघम स्टाइल हाणामाऱ्या होऊन, शेवटी हजारो पोलिस रस्त्यावर (बनियनवर) उतरतात. मग सिंघम खलनायकांना आपल्या पद्धतीनं धडा शिकवतो.
 अजयनं नेहमीच्या पद्धतीनं जोरदार सिंघम सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पहिल्या भागापेक्षा तो यात कमी प्रभावी वाटला, हे नक्की. तरीही त्याचे दोनच अॅक्शन सिक्वेन्स त्याच्या चाहत्यांसाठी पैसा वसूल करणारे ठरतील. करिनानं मराठीतून शिवीगाळ करणारी आणि सदैव खाण्याच्या शोधात असलेली अवनी धमाल साकारली आहे. अमोल गुप्तेनं यातला भोंदूबाबा चांगला केला असला, तरी जयकांत शिकरेची सर आली नाही. तीच गोष्ट झाकीर हुसेनची. बाकी महेश मांजरेकर, समीर धर्माधिकारी, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी (ज्यु.), स्मिता तांबे, अश्विनी काळसेकर, गणेश यादव, छाया कदम, मेघना वैद्य आदी मराठी कलाकारांची यात फौजच आहे आणि त्या सर्वांनी चांगलं काम केलं आहे, हे खरं तर वेगळं सांगायला नकोच. त्यातही एकाच दृश्यात छाया कदम यांनी कमाल केली आहे. जितेंद्र आणि सोनाली यांचा अजय-करिनासोबतचा एक छोटासाच कॉमेडी ट्रॅक जमला आहे. इन्स्पेक्टर दया (दयानंद शेट्टी) अनेकदा टाळ्या घेतो.
शेवटी 'आता माझी सटकली' या गाण्याविषयी. यो यो हनीसिंगच्या या गाण्यानं सध्या सगळीकडं धुमाकूळ घातला आहे. सिनेमात चांगली गोष्ट एवढीच, की हे गाणं एंड स्क्रोलला येतं. तेव्हा ज्यांना ते आवडत नाही, त्यांना थिएटर सोडण्याचा मार्ग मोकळा आहे. अन्यथा उगाच मला राग येतोय असं ओरडायची वेळ यायची. बाकी काही असलं, तरी हे गाणं खूप वेळा ऐकल्यानंतर तुम्हाला आवडायला लागतं. चिंगमसारखंच! 'सिंघम रिटर्न्स'ही अगदी तस्साच आहे... मोठ्ठ्या 'महाचिंगम'सारखा...  तर चघळत बसा; नाही तर फेकून द्या!
---

निर्मिती - रिलायन्स एंटरटेन्मेंट, अजय देवगण, रोहित शेट्टी
दिग्दर्शक - रोहित शेट्टी
संगीत - जित गांगुली, यो यो हनीसिंग, अंकित तिवारी, मिट ब्रो अंजान
पटकथा - युनूस साजावाल
संवाद - साजिद-फरहाद
पार्श्वसंगीत - अमर मोहिले
भूमिका - अजय देवगण, करिना कपूर-खान, अनुपम खेर, अमोल गुप्ते, झाकीर हुसेन, दयानंद शेट्टी, शरद सक्सेना, महेश मांजरेकर, स्मिता तांबे, गणेश यादव, अश्विनी काळसेकर, समीर धर्माधिकारी, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी, मेघना वैद्य, छाया कदम.
दर्जा - ***
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १६ ऑगस्ट २०१४ - मुंबई आवृत्ती, १७ ऑगस्ट - पुणे)
---
---------------------------------------------------------------------------------------
 

9 Aug 2014

रमा-माधव

उत्कट, उदात्त प्रेमगाथा...
-----------------------------
मृणाल कुलकर्णी... हॅट्स ऑफ... इतिहासाच्या पानांतून दरवळणारी, थेऊरच्या सतिस्थळी किंवा श्री चिंतामणीच्या गाभाऱ्यात गुंजणारी, शनिवारवाड्याच्या प्रत्येक दगड-विटांनी अनुभवलेली... रमा आणि माधव यांची उत्कट, उदात्त प्रेमगाथा, तू किती प्रेमानं दाखवलीस! जीव ओतला आहेस या कलाकृतीत... १४७ मिनिटांची मंत्रमुग्ध करणारी अलौकिक गाथा... उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्तम वेषभूषा, सुंदर संवाद... सगळं काही मृणालनं मनापासून, कष्ट घेऊन केलं आहे हे प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं... आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे यांच्या रूपानं एक देखणी, अभिनयसंपन्न नवी जोडी मराठी सिनेमाला दिलीय... आनंद मोडक काकांची गाणी ऐकताना, विशेषतः गणपतीची आरती, डोळे झरतच राहले स्वतःच्याही नकळत... आनंदकाकांसाठी! अतिशय तरल, हळव्या भावना व्यक्त करणारे सुंदर शब्द देणाऱ्या मोघेकाकांसाठी... या आणि अशा गोष्टींमुळं हा फक्त रूपेरी पडद्यावरचा निर्जीव खेळ राहिलेला नाही... त्यानं आपल्याशी सघन, जैव नातं जोडलंय... अशा भाषेत ही कलाकृती आपल्याशी बोलते, जी शब्दांनी नाही व्यक्त होत... होते फक्त हृदयानं...!
थोरल्या माधवराव पेशव्यांची कर्तबगारी इतिहासकारांनी लिहून ठेवलीय. मराठ्यांचं पानिपत झाल्यानंतर अवघ्या सोळाव्या वर्षी पेशवेपद मिळालेल्या माधवरावांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आणि समशेरबहादरीनं पुढील ११ वर्षं राज्यकारभार केला. उत्तम केला. त्यांना रयत 'स्वामी' म्हणू लागली. हा सगळा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. ज्ञात नव्हतं ते रमा या त्यांच्या पत्नीसोबत असलेलं त्यांचं हळवं-तरल नातं. खरं म्हणजे आता या नात्याविषयी आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पण सोळाव्या वर्षीही पत्नीस ऋतुप्राप्ती न झाल्यानं त्या वेळच्या सर्वमान्य रिवाजानुसार, राजकीय वारसासाठी दुसरं लग्न करण्याचा आईचा - गोपिकाबाईचा - सल्ला धुडकावून, आई, पुन्हा हा विषय काढू नकोस, असं सांगणाऱ्या माधवरावांच्या मनात रमेविषयी नक्की काय भावना असाव्यात, हे सांगायला फार प्रतिभेची गरज नाही. शिवाय अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी राजयक्ष्म्यामुळं अकाली गेलेल्या पतीपाठोपाठ शांतपणे सती जाण्याचा निर्णय घेणारी रमा पतीविषयी नक्की काय भावना मनात बाळगून होती, हेही सांगायला नको. अशा या प्रेमाची प्रत, त्याची उत्कटता, उदात्तता उलगडून पाहण्याची इच्छा केवळ प्रतिभावंत कलावंतांनाच होऊ शकते. मृणालनं केवळ ही इच्छा बाळगली नाही, तर ती रूपेरी पडद्यावर भव्यतेनं, सौंदर्यदृष्टीनं आणि विलक्षण कष्टानं साकारून दाखवली म्हणून तिला हॅट्स ऑफ. मराठी सिनेमाची निर्मिती कशी होते, हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांना या म्हणण्यामागचं मर्म समजेल. अनेक पुरुष दिग्दर्शकही ज्या विषयाला हात लावू धजत नाहीत, तो ऐतिहासिक विषय पार्श्वभूमीला घेणं आणि त्यासोबत ही अलौकिक प्रेमगाथा सादर करणं हे खरंच येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. मृणालला हा विषय प्रिय असण्याचं कारण म्हणजे रणजित देसाईंच्या स्वामी कादंबरीवर आलेली स्वामी ही दूरदर्शन मालिका. गजानन जागीरदारांसारख्या दिग्गजानं रमाच्या भूमिकेत १७-१८ वर्षांच्या मृणालला निवडलं आणि पुढचा सर्व इतिहास आपल्याला ठाऊक आहे. या मालिकेनं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता तेव्हा. आज पंचविशीत असलेल्या पिढीला हे आठवण्याचं, माहिती असण्याचं काही कारण नाही. ही मालिका आली, तेव्हा अस्मादिकही सातवी-आठवीतले शाळकरी विद्यार्थी होते. पण अजूनही तोच पिता साक्षात मानावा, हे रवी साठेंनी गायलेलं टायटल साँग, रवींद्र मंकणींनी साकारलेले माधवराव, अस्सं का? अरे व्वा! असं म्हणणारे ठसकेबाज राघोबादादा सादर करणारे श्रीकांत मोघे आणि अर्थात मृणालची लोभस, राजस रमा लक्षात आहे. मात्र, ती मालिका प्राधान्यानं माधवराव आणि त्यांच्या कर्तबगारीवर फोकस करणारी होती, असं मला वाटतं. त्यात रमा-माधव यांचं नातं हा साइड-ट्रॅक होता. रमा-माधव सिनेमात मात्र तीच मुख्य कथा आहे. राजकारण दुय्यम आहे. तरीही नेपथ्यरचनेसाठी हे सगळं येतंच. 'रमा-माधव'च्या दिग्दर्शिकेचं कौतुक अशासाठी, की मुख्य कथेसोबतच तिनं या आजूबाजूच्या गोष्टींकडं, त्या अन्य पात्रांकडंही लक्ष दिलं आहे. विशेषतः सर्व कलाकारांची निवड अगदी अचूक जमली आहे. रवींद्र मंकणींनी नानासाहेबांचा सर्व दरारा, आदब आणि शेवटी पुत्रवियोगानं येणारी हळहळ फार समर्थपणे दाखवली आहे. 
तीच गोष्ट स्वतः मृणालनं साकारलेल्या गोपिकाबाईंची. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर खचून न जाता, धोरणीपणानं धाकट्या मुलाकडं पेशवेपद कसं येईल हे पाहणारी, मुलावर प्रेम करणारी, पण त्याचं कर्तव्यकठोर मन ओळखू न शकणारी मुत्सद्दी, पण काहीशी भरकटलेली गोपिकाबाई तिनं सुरेखच उभी केली आहे. डॉ. अमोल कोल्हेंना सदाशिवरावभाऊच्या भूमिकेत फार स्कोप नाहीये. पण त्यांनी छोट्याशाच रोलमध्ये जीव ओतून काम केलंय. पार्वतीबाईंच्या भूमिकेत श्रुती मराठेनंही चांगलं काम केलंय. पतीची वाट पाहणारी पार्वती तिनं खूप तन्मयतेनं उभी केली आहे. आलोक राजवाडेनं माधवरावांच्या भूमिकेत अत्यंत आश्वासक कामगिरी केली आहे. त्याच्याकडून आता मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. पर्ण पेठेनं रमा पूर्णपणे समजून-उमजून उभी केली आहे. ती रमा म्हणून छान शोभते आणि तिनं कामही चांगलं केलं आहे. छोटी रमा झालेली श्रुती कार्लेकर खूपच गोड आहे. तिनं कामही अगदी झक्कास केलं आहे. सोनाली कुलकर्णीनं आनंदीबाई खूपच ठसक्यात सादर केली आहे. ती आनंदीबाई म्हणून दिसलीय खूपच छान. या सर्वांत खरा टाळ्यांचा मानकरी ठरला आहे तो राघोबादादा साकारणारा प्रसाद ओक. गादीसाठी त्यांची चालू असलेली धडपड, राजकारण सर्व काही त्यानं झकास उभं केलं आहे. रणधुरंधर, पण त्याच वेळी नर्तकीकडं जाणारा रंगेल राघोबा प्रसाद ओकनं टेचात उभारला आहे. पुतण्याविषयी मधूनच उफाळून येणारं प्रेम आणि त्यातून येणारी हतबलता प्रसादनं समजून सादर केली आहे. त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार मिळायला हरकत नाही. 
'रमा-माधव'मध्ये काही त्रुटी अर्थातच आहेत. विशेषतः पहिला भाग काहीसा संथ वाटतो. हमामा रे पोरा हमामा पोरा हे माधुरी पुरंदरेंनी म्हटलेलं लोकप्रिय गाणं सुरुवातीला येतं. रमाचं मिरजेतलं बालपण आणि तेथून तिचा शनिवारवाड्यापर्यंतचा प्रवास, त्यानंतर तिचं गोपिकाबाई आणि अन्य ज्येष्ठ सासवांसोबतचं नातं, मंगळागौरीचं गाणं यात बराच वेळ जातो. माधवरावांचं लहानपण, पानिपतच्या लढाईची तयारी आणि राघोबांची नाराजी यानंतर कथानक वेग घेऊ लागतं. त्यातही रमा-माधव यांचा एका तलावाकाठी पाण्यात दगड मारण्याचा प्रसंग अनावश्यक मोठा झाल्याचं जाणवतं. शिवाय याच लोकेशनला नंतर अनेक वेगवेगळ्या प्रसंगांची दृश्यं आहेत. काही प्रसंगांची लिंक लागत नाही. युद्धाचे प्रसंग ऑथेंटिक व्हावेत म्हणून दिग्दर्शिकेनं भरपूर प्रयत्न केले असले, विशिष्ट अँगलनी शूट केले असले, तरी त्यातल्या मर्यादा खूपच जाणवतात. उत्तरार्धात माधवराव पेशवेपदाची सूत्रं हाती घेतात, तेव्हापासून कथानकाला वेग येतो. विशेषतः रमा मोठी होते आणि दोघांमधलं प्रेम फुलू लागतं, हा भाग सविस्तर, तपशिलानं येतो. यात एक गाणंही आहे. ते जरा अस्थानी वाटत असलं, तरी गाणं म्हणून ते खूपच चांगलं आहे. सिनेमात सर्वांत खटकणारी बाब म्हणजे सुरुवातीची आणि शेवटी येणारी नामावली. या नामावलीत असंख्य चुका आहेत. रवींद्र हा शब्द रवींर्द्र असा लिहिला आहे, तर पर्श्वगाइका, मंगळागैर या सहज दिसलेल्या चुका. बाकी तर भरपूर आहेत.
आनंद मोडकांनी संगीत दिलेला हा शेवटचा सिनेमा. यातली शंकर महादेवननं म्हटलेली गणपतीची आरती जमली आहे. 'स्वप्नीही नव्हते दिसले' हे हृषीकेश रानडे आणि प्रियांका बर्वेनं म्हटलेलं हळुवार गाणंही सुंदर. 'लुट लियो' ही मधुरा दातारनं सादर केलेलं मुजरा गीत थेट देवदासमधल्या 'काहे छेड मोहे'ची आठवण करून देणारं. आदिती राव-हैदरी या गाण्यात नाचलीय छान आणि दिसलीही आहे सुंदर. 
थोडक्यात, 'रमा-माधव इज ए ट्रीट टु आइज'! महाराष्ट्रातल्या एक थोर, कर्तबगार पेशव्याची आणि त्याच्यावर मनःपूत प्रेम करणाऱ्या रमेची ही गाथा नक्की पाहावी अशीच.
---

निर्मिती : शिवम-जेनिम फिल्म्स
कथा, दिग्दर्शिका : मृणाल कुलकर्णी
संवाद : मृणाल कुलकर्णी, मनस्विनी लता रवींद्र
सिनेमॅटोग्राफी : राजीव जैन
संगीत : आनंद मोडक
प्रमुख भूमिका : आलोक राजवाडे, पर्ण पेठे, रवींद्र मंकणी, मृणाल कुलकर्णी, डॉ. अमोल कोल्हे, श्रुती मराठे, सोनाली, श्रुती कार्लेकर आणि प्रसाद ओक.
दर्जा : *** १/२
----

8 Aug 2014

बाळपणीचा खाऊ सुखाचा...


लहानपणी - म्हणजे जेव्हा 'खाऊ' या शब्दाचा अर्थ 'खाण्याचे पदार्थ' एवढाच होता - त्या वेळच्या शाळेतल्या, मधल्या सुट्टीतल्या चटकमटक खाण्याच्या या आठवणी आहेत. गाभुळलेल्या चिंचा पाहिल्यावर तोंडाचे जे काही होते, तेच आत्ता माझ्या मनाचे या आठवणी जागवताना झाले आहे. मेंदूतली ती विशिष्ट संप्रेरके जागृत झाली आहेत आणि शाळेतल्या मधल्या सुट्टीची घंटा कानात घणघणू लागली आहे. या आठवणी १९८१ ते १९८५ या काळात प्राथमिक शाळेत गेलेल्या इतर कुठल्याही मुला-मुलींच्या आठवणीसारख्याच आहेत. सगळ्याच गोड अजिबात नाहीत... बऱ्याचशा आंबट, तुरट, खारट आणि तिखटही आहेत. माझं शिक्षण तालुक्याच्या गावाला जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जि. प. च्या शाळेला 'जीवन शिक्षण विद्या मंदिर' हेच नाव असतं. तसंच ते माझ्या शाळेलाही होतं. चौकोनी आकारात शाळा होती. काटकोनात दोन कोन मुलांचे, तिसरा मुलींचा आणि चौथा म्हणजे एक भिंत होती. त्या भिंतीवर 'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी' असं भल्या मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं. ('जगामाजी'चा अर्थ माहिती नसल्यानं बरेच दिवस हे लिहायला चुकलंय असंच वाटायचं.) ही भिंत लांबलचक होती. 'विद्येनेच' आणि 'जगामाजी' या शब्दांमध्ये चांगलं पन्नास-साठ मीटर अंतर असेल. 'विद्येनेच' या शब्दाच्या आश्रयाला एक खाऊवाला असायचा आणि 'जगामाजी' दुसरा बसायचा. याशिवाय काही अंतर सोडून खासगी माध्यमिक शाळा होती. या दोन्हीच्या जंक्शनला तर भरपूर खाऊवाले बसायचे. त्यात मावशा जास्त असायच्या. खाऊमध्ये लेमन गोळ्या, चिक्की असायची. चॉकलेटं फार नसत. किमती पाच पैशांपासून ते ५० पैशांपर्यंत असायच्या. 
 मुलांकडं पाच, दहा, वीस, पंचवीस आणि ५० पैशांची नाणी असत. रुपया क्वचितच कुणाकडं असे. दहा पैशांचं नाणं गोल, पण झिगझॅग आकाराचं असायचं. वीस पैशांचं नाणं बहुदा षटकोनी आकाराचं होतं. २५ पैसे अर्थात चाराणे हे नाणं फारच लहान होतं. ५० पैशांचं नाणं जरा चांगल्या धातूचं (निकेल?) असायचं. मधली सुट्टी झाली, की पोरांच्या कंपासमधून किंवा खाकी चड्ड्यांमधून ही नाणी बाहेर यायची. त्या वेळी पारलेनं 'किसमी' नावाचं एक चॉकलेट काढलं होतं. ते या खाऊवाल्यांकडं मिळत नसलं, तरी किराणा दुकानांत मिळायचं. लिमलेट किंवा लेमनच्या रंगीबिरंगी गोळ्या असायच्या. त्या अतिगोड असत आणि दातानं कडाकडा फोडून खायला मजा येत असे. रावळगावच्या टॉफ्याही क्वचित असत. 

या खाऊवाल्यांकडं घरगुती चिक्की मिळायची. अल्युमिनियमच्या एका मोठ्या परातीत ती ठेवलेली असायची. मावशा किमतीनुसार ती हातानंच तोडून देत. भलती चिकट असायची. त्यात गूळ मजबूत. ही चिक्की खाण्यापेक्षा इतर पोरांना पाठीमागं किंवा डोक्यात केसांना लावण्यासाठीच वापरली जायची. आणखी एक लोकप्रिय खाऊ म्हणजे बॉबी. ही बॉबी भरपूर खावी, असं मला वाटे आणि कितीही खाल्ली तरी समाधान होत नसे. पाच बोटांत पाच बॉब्या घालून मिरवणे हा तर सगळ्यांचाच आवडता छंद होता. ही बॉबीदेखील नगावर मिळायची आणि ती कधीच पुरत नसे. (पुढं मोठं झाल्यावर मग बॉबीचे मोठमोठे पुडे आणून मी ती हौस फेडली.) कधी तरी 'बुढ्ढी के बाल'वाला माणूस यायचा. ते आम्ही कधी तरी खायचो. या पदार्थाविषयी पुष्कळ प्रवाद असायचे. त्यात एकदा एका मुलानं मला हा पदार्थ कशापासून बनवतात हे सांगितलं (ते मी इथं लिहू शकत नाही...), तेव्हापासून मी हा पदार्थ कायमचा सोडला. पुढं त्यात काही तथ्य नव्हतं, हे कळलं तरीही! आणि हो, कुल्फीवाले, गारेगारवाले असायचेच. त्यातल्या त्यात मलई कुल्फी आम्ही खायचो. गारेगारला हात लावू नये, असंच घरून शिकवण्यात आलं होतं. पण कधी तरी चोरून-मारून खाणं व्हायचंच. याशिवाय सीझननुसार रानमेवा असायचा. 
चिंचा, बोरं, पेरू, आवळे, जांभळं हे सगळं मिळायचं. आणि अगदी स्वस्तात. गाभुळलेल्या चिंचांकडं अर्थात मुलींचा ओढा असायचा. त्यांच्या गर्दीतून वाट मिळाली, तरच मुलांना बोरं वगैरे मिळायची. ही गावरान, शेंबडी बोरं असायची. ती वर्गात चोरून न्यायची आणि बोरं खाऊन बिया फेकून मारण्याचं (मुलं वि. मुली असं) युद्ध रंगवायचं हे तर चालायचंच.

शहरी मुलांना मिळणारे केक, क्रीमरोल, पाव, सँडविच, जेली, जॅम, सॉस, क्रीम बिस्किटं हे पदार्थ आमच्या गावीही नव्हते. (म्हणजे शब्दशः आमच्या गावात मिळत नसत.) शहरात कुणी गेलं किंवा तिथून कुणी आलं तरच हे बेकरी प्रॉडक्ट्स तोंडी पडत. पण त्यासाठी आम्ही हपापलेले नव्हतो. उलट गावच्या गावरान खाऊमुळं चांगल्या वाढीला मदतच झाली. आमच्या लहानपणचं एकमेव बिस्कीट म्हणजे पारले ग्लुकोज. (जे नंतर 'पारले-जी' झालं!) या बिस्कीट कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल विभागाला आपला साष्टांग दंडवत आहे. 
कारण लहानपणी जी चव लागत असे, तीच आजही हे बिस्कीट खाताना लागते. लहानपणाशी धागा जोडणारा हा एकच पदार्थ आता उरला आहे. माझं लहानपण फारशा सोयी-सुविधा नसलेल्या तालुक्याच्या लहान गावात गेलं. तिथल्या खाऊच्या आठवणी फार अगदी 'वॉव' करायला लावणाऱ्या नसतीलही; पण अगदी 'वॅक' करायला लावतील अशाही नाहीत! आपल्या मध्यमवर्गीय जगण्यासारख्या त्या आठवणीही मध्यम मध्यमच आहेत. काही गोड, काही आंबट, काही तुरट, तर काही तिखट! फार तीव्र, टोकाचं असं काही नाही. तरीही त्या अजून मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत आहेत... कारण त्या फार गोड अन् निरागस आहेत. आपल्या लहानपणासारख्याच! 

_______________________________________________

2 Aug 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - अस्तु

अविस्मरणीय!
------------------
 सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं कायमच उत्तमोत्तम कलाकृती दिल्या आहेत. प्रेक्षकांना डोक्याला काही तरी वैचारिक खाद्य पुरवलं आहे. माणसाच्या जगण्यातले एकेक पैलू घेऊन त्यावर आधारित सिनेमे त्यांनी तयार केले आहेत. अल्झायमर किंवा विस्मृतीच्या आजाराचा आधार घेऊन त्यांनी तयार केलेली ‘अस्तु’ ही नवी कलाकृती म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. डॉ. मोहन आगाशेंसारख्या कसलेल्या कलावंताचा अप्रतिम अभिनय, त्याला इरावती हर्षे अन् अमृता सुभाष यांसारख्या सहकलाकारांनी दिलेली सुरेख साथ, घट्ट विणीची पटकथा आणि दिग्दर्शकांचं प्रतिपाद्य कथावस्तूवर असलेलं प्रेम यामुळं ‘अस्तु’ हा या दिग्दर्शकद्वयीच्या काही अव्वल कलाकृतींमध्ये जाऊन बसला आहे.
माणसाला स्मरणशक्तीचं वरदान आहे. आपण गोष्टी लक्षात ठेवू शकतो. आपली माणसं ओळखू शकतो. आपल्या मेंदूत आपल्या जगण्यातल्या बहुतांश महत्त्वाच्या बाबींचं रेकॉर्डिंग सुरू असतं. सगळ्या नोंदी अगदी पक्क्या असतात. त्याचबरोबर माणसाला विस्मरणाचंही वरदान आहे, असं म्हणतात. हे वरदान नसतं, तर आपलं जगणं अवघड झालं असतं. दुःखद, भयानक अनुभवांचं विस्मरण झालं नाही, तर काय परिस्थिती ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात हे विस्मरण प्रमाणापेक्षा जास्त झालं, की अल्झायमरसारखे (विस्मृती) आजार होतात. मेंदूतली हार्ड डिस्कच क्रॅश होते म्हणा ना. त्या माणसाला काहीही आठवत नाही. मग अगदी लहान मुलासारखी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. त्या माणसाचं जगणं भयावह दुरापास्त तर होतंच, पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या त्याच्या आप्तांसाठीही हा कठीण परीक्षेचा काळ असतो. माणसाची स्मृती म्हणजेच त्याचं माणूस असणं असतं का? समजा, ही स्मृती राहिली नाही, तिनं आपल्या आप्तांना ओळखलं नाही, तर ती व्यक्ती तिच्या ओळखीसह पुसली जाते का? तिचं अस्तित्व संदर्भहीन होतं, म्हणजे ती व्यक्तीही संपते का, या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांची सहज चर्चा करीत ‘अस्तु’ आपल्याला विचारप्रवण करतो.
प्रा. डॉ. चक्रपाणि शास्त्री (डॉ. मोहन आगाशे) हे प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील प्राध्यापक, संशोधक. अतिशय विद्वान, प्रकांडपंडित असलेले डॉ. शास्त्री आता सत्तरीत आहेत आणि त्यांना अल्झायमरनं ग्रासलं आहे. त्यांची मुलगी इरा (इरावती हर्षे) त्यांची काळजी घेते आहे. एके दिवशी मंडईत दोघंही गेले असताना, डॉ. शास्त्रींना एक हत्तीण दिसते. मुलगी त्यांना गाडीतून उतरू नका, असं सांगून एका दुकानात गेली आहे. ती परत येते, तेव्हा वडील कारमध्ये नसतात. ते हत्तिणीच्या मागेमागे जात राहतात. अगदी माहुताच्या वस्तीवर जातात. इकडे मुलगी वडिलांना शोधून शोधून थकते. पण ते सापडत नाहीत. कन्नड भाषक असलेल्या माहुताच्या (नचिकेत पूर्णपात्रे) वस्तीवर त्याची बायको (अमृता) डॉक्टरांना सांभाळते. आता विस्मृती झालेल्या वडिलांना परत घरी कसं आणायचं, हा इरासमोर यक्षप्रश्न असतो. ती तिच्या बहिणीला - राहीला (देविका दफ्तरदार) मुंबईहून बोलावून घेते. त्यानंतर सुरू होते एक शोधयात्रा! व्यापक अर्थाची! कथेतल्या पात्रांचं मानसिक द्वंद्व सुरू होतं. वेगवेगळ्या पातळ्यांवर ही पात्रं वेगवेगळी उत्तरं शोधू लागतात. शेवटी डॉ. शास्त्रींचं काय होतं, इरा काय निर्णय घेते हे पडद्यावरच पाहायला हवं.
सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी यापूर्वीही देवराईसारख्या सिनेमाच्या माध्यमातून मानसिक आजारांवर भाष्य केलं आहे. अल्झायमर किंवा डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) यांसारख्या आजारांचं वेगळेपण असं, की हे आजार शारीरिक आहेत; पण त्याचे परिणाम मात्र शंभर टक्के मानसिक आहेत. बाधित व्यक्ती बाह्यतः एकदम व्यवस्थित असते. केवळ मेंदूतील विशिष्ट भाग काम करेनासा झाल्यामुळं त्यांना हे आजारपण आलेलं असतं. अशा व्यक्तींना समजून घेणं खूप गरजेचं असतं. पण आजाराच्या स्वरूपामुळं ते अधिकच अवघड बनतं. मग काय करावं? दिग्दर्शकद्वयीनं यासाठी सिनेमात वापरलेलं हत्तिणीचं प्रतीक खूपच बोलकं आणि महत्त्वाचं आहे. हत्ती हा प्राणी उत्तम स्मरणशक्तीसाठी ओळखला जातो. याशिवाय हत्ती कळप करून राहणारा, कुटुंबवत्सल, कळपातील सर्वांची काळजी घेणारा म्हणूनही ओळखला जातो. सिनेमातले डॉ. शास्त्री कुठल्याशा अनाम ओढीनं त्या हत्तीमागं जात राहतात. वर्तमान विसरलेल्या त्यांना त्या वेळी संस्कृत श्लोक मात्र मुखोद्गत येत असतात. हे सर्व संदर्भ फार सूचक आणि कमालीचे हळवे आहेत. असा आजार असलेल्या व्यक्तींना हत्तीसारखं विशाल हृदय करूनच जपायला हवं, असा संदेश कथा देते. वैचारिक संघर्ष जागोजागी आहे. इराचा आणि तिच्या बहिणीचा संवाद या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. तो या सिनेमाचा एक हायपॉइंट आहे. शिवाय डॉ. शास्त्री माहुताच्या बायकोला ‘आई’ अशी हाक मारतात तो, आणि त्यापूर्वी ती ‘लहान लेकरासारखं जपा याला, देव झालं त्याचं,’ असं म्हणते तो, हे दोन्ही प्रसंग उत्कट आणि जमलेले आहेत.
या सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी डॉ. आगाशेंसारख्या कसलेल्या अभिनेत्याची निवड करूनच दिग्दर्शकांनी निम्मी बाजी मारली. स्वतः मनोविकारतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांनी शास्त्रींची भूमिका अत्यंत समरसून केली आहे. एके काळी ज्याच्या जिभेवर सरस्वती नाचत होती आणि आता केवळ अर्धवट स्मृतींतून गळालेले श्लोक येताहेत, अशा वृद्ध माणसाची ही भूमिका त्यांनी ज्या सहजतेनं साकारली आहे, त्यावरून त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेले कष्ट, केलेला अभ्यास जाणवतो. त्यांच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी. इरावती हर्षेनं प्रथमच मराठीत काम केलं आहे. मात्र, तिनं इराच्या भूमिकेत कमाल केली आहे. वडिलांच्या आजारामुळं होत असलेली हळव्या मुलीची तडफड तिनं प्रभावीपणे दाखवली आहे. 
 अमृता सुभाषचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या अभिनेत्रीला कायाप्रवेशाचं वरदान आहे. ती जी भूमिका करते, ती मूर्तिमंत उभी करते. कन्नड बोलणारी, अशिक्षित, गावंढळ माहुताची पत्नी तिनं फारच जबरदस्त साकारली आहे. तिचं कन्नड गाणंही मस्त. या तिन्ही अभिनेत्यांना त्यांच्या कामाची पोचपावती यापूर्वीच विविध पुरस्कारांतून मिळाली आहेच. बाकी भूमिकांत मिलिंद सोमण, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे, देविका दफ्तरदार यांनी उत्तम साथ दिली आहे. साकेत कानेटकर-धनंजय खरवंडीकर यांचं संगीत कानांत रुंजी घालणारं!
तेव्हा विस्मरणासारख्या विषयावर आधारित हा अविस्मरणीय अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका.
---
निर्माते : डॉ. मोहन आगाशे व शीला राव
दिग्दर्शक : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
कथा-पटकथा-संवाद : सुमित्रा भावे
सिनेमॅटोग्राफी : मिलिंद जोग,
संकलन : मोहित टाकळकर
संगीत : साकेत कानेटकर-धनंजय खरवंडीकर
प्रमुख भूमिका : डॉ. मोहन आगाशे, इरावती हर्षे, अमृता सुभाष, मिलिंद सोमण, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे, देविका दफ्तरदार, ओम भुतकर, ज्योती सुभाष व लक्ष्मी हत्तीण
कालावधी : दोन तास तीन मिनिटे
दर्जा - ****
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २ ऑगस्ट २०१४)
---
------------------------------------------------------------------------