2 Aug 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - अस्तु

अविस्मरणीय!
------------------
 सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं कायमच उत्तमोत्तम कलाकृती दिल्या आहेत. प्रेक्षकांना डोक्याला काही तरी वैचारिक खाद्य पुरवलं आहे. माणसाच्या जगण्यातले एकेक पैलू घेऊन त्यावर आधारित सिनेमे त्यांनी तयार केले आहेत. अल्झायमर किंवा विस्मृतीच्या आजाराचा आधार घेऊन त्यांनी तयार केलेली ‘अस्तु’ ही नवी कलाकृती म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. डॉ. मोहन आगाशेंसारख्या कसलेल्या कलावंताचा अप्रतिम अभिनय, त्याला इरावती हर्षे अन् अमृता सुभाष यांसारख्या सहकलाकारांनी दिलेली सुरेख साथ, घट्ट विणीची पटकथा आणि दिग्दर्शकांचं प्रतिपाद्य कथावस्तूवर असलेलं प्रेम यामुळं ‘अस्तु’ हा या दिग्दर्शकद्वयीच्या काही अव्वल कलाकृतींमध्ये जाऊन बसला आहे.
माणसाला स्मरणशक्तीचं वरदान आहे. आपण गोष्टी लक्षात ठेवू शकतो. आपली माणसं ओळखू शकतो. आपल्या मेंदूत आपल्या जगण्यातल्या बहुतांश महत्त्वाच्या बाबींचं रेकॉर्डिंग सुरू असतं. सगळ्या नोंदी अगदी पक्क्या असतात. त्याचबरोबर माणसाला विस्मरणाचंही वरदान आहे, असं म्हणतात. हे वरदान नसतं, तर आपलं जगणं अवघड झालं असतं. दुःखद, भयानक अनुभवांचं विस्मरण झालं नाही, तर काय परिस्थिती ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात हे विस्मरण प्रमाणापेक्षा जास्त झालं, की अल्झायमरसारखे (विस्मृती) आजार होतात. मेंदूतली हार्ड डिस्कच क्रॅश होते म्हणा ना. त्या माणसाला काहीही आठवत नाही. मग अगदी लहान मुलासारखी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. त्या माणसाचं जगणं भयावह दुरापास्त तर होतंच, पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या त्याच्या आप्तांसाठीही हा कठीण परीक्षेचा काळ असतो. माणसाची स्मृती म्हणजेच त्याचं माणूस असणं असतं का? समजा, ही स्मृती राहिली नाही, तिनं आपल्या आप्तांना ओळखलं नाही, तर ती व्यक्ती तिच्या ओळखीसह पुसली जाते का? तिचं अस्तित्व संदर्भहीन होतं, म्हणजे ती व्यक्तीही संपते का, या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांची सहज चर्चा करीत ‘अस्तु’ आपल्याला विचारप्रवण करतो.
प्रा. डॉ. चक्रपाणि शास्त्री (डॉ. मोहन आगाशे) हे प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील प्राध्यापक, संशोधक. अतिशय विद्वान, प्रकांडपंडित असलेले डॉ. शास्त्री आता सत्तरीत आहेत आणि त्यांना अल्झायमरनं ग्रासलं आहे. त्यांची मुलगी इरा (इरावती हर्षे) त्यांची काळजी घेते आहे. एके दिवशी मंडईत दोघंही गेले असताना, डॉ. शास्त्रींना एक हत्तीण दिसते. मुलगी त्यांना गाडीतून उतरू नका, असं सांगून एका दुकानात गेली आहे. ती परत येते, तेव्हा वडील कारमध्ये नसतात. ते हत्तिणीच्या मागेमागे जात राहतात. अगदी माहुताच्या वस्तीवर जातात. इकडे मुलगी वडिलांना शोधून शोधून थकते. पण ते सापडत नाहीत. कन्नड भाषक असलेल्या माहुताच्या (नचिकेत पूर्णपात्रे) वस्तीवर त्याची बायको (अमृता) डॉक्टरांना सांभाळते. आता विस्मृती झालेल्या वडिलांना परत घरी कसं आणायचं, हा इरासमोर यक्षप्रश्न असतो. ती तिच्या बहिणीला - राहीला (देविका दफ्तरदार) मुंबईहून बोलावून घेते. त्यानंतर सुरू होते एक शोधयात्रा! व्यापक अर्थाची! कथेतल्या पात्रांचं मानसिक द्वंद्व सुरू होतं. वेगवेगळ्या पातळ्यांवर ही पात्रं वेगवेगळी उत्तरं शोधू लागतात. शेवटी डॉ. शास्त्रींचं काय होतं, इरा काय निर्णय घेते हे पडद्यावरच पाहायला हवं.
सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी यापूर्वीही देवराईसारख्या सिनेमाच्या माध्यमातून मानसिक आजारांवर भाष्य केलं आहे. अल्झायमर किंवा डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) यांसारख्या आजारांचं वेगळेपण असं, की हे आजार शारीरिक आहेत; पण त्याचे परिणाम मात्र शंभर टक्के मानसिक आहेत. बाधित व्यक्ती बाह्यतः एकदम व्यवस्थित असते. केवळ मेंदूतील विशिष्ट भाग काम करेनासा झाल्यामुळं त्यांना हे आजारपण आलेलं असतं. अशा व्यक्तींना समजून घेणं खूप गरजेचं असतं. पण आजाराच्या स्वरूपामुळं ते अधिकच अवघड बनतं. मग काय करावं? दिग्दर्शकद्वयीनं यासाठी सिनेमात वापरलेलं हत्तिणीचं प्रतीक खूपच बोलकं आणि महत्त्वाचं आहे. हत्ती हा प्राणी उत्तम स्मरणशक्तीसाठी ओळखला जातो. याशिवाय हत्ती कळप करून राहणारा, कुटुंबवत्सल, कळपातील सर्वांची काळजी घेणारा म्हणूनही ओळखला जातो. सिनेमातले डॉ. शास्त्री कुठल्याशा अनाम ओढीनं त्या हत्तीमागं जात राहतात. वर्तमान विसरलेल्या त्यांना त्या वेळी संस्कृत श्लोक मात्र मुखोद्गत येत असतात. हे सर्व संदर्भ फार सूचक आणि कमालीचे हळवे आहेत. असा आजार असलेल्या व्यक्तींना हत्तीसारखं विशाल हृदय करूनच जपायला हवं, असा संदेश कथा देते. वैचारिक संघर्ष जागोजागी आहे. इराचा आणि तिच्या बहिणीचा संवाद या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. तो या सिनेमाचा एक हायपॉइंट आहे. शिवाय डॉ. शास्त्री माहुताच्या बायकोला ‘आई’ अशी हाक मारतात तो, आणि त्यापूर्वी ती ‘लहान लेकरासारखं जपा याला, देव झालं त्याचं,’ असं म्हणते तो, हे दोन्ही प्रसंग उत्कट आणि जमलेले आहेत.
या सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी डॉ. आगाशेंसारख्या कसलेल्या अभिनेत्याची निवड करूनच दिग्दर्शकांनी निम्मी बाजी मारली. स्वतः मनोविकारतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांनी शास्त्रींची भूमिका अत्यंत समरसून केली आहे. एके काळी ज्याच्या जिभेवर सरस्वती नाचत होती आणि आता केवळ अर्धवट स्मृतींतून गळालेले श्लोक येताहेत, अशा वृद्ध माणसाची ही भूमिका त्यांनी ज्या सहजतेनं साकारली आहे, त्यावरून त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेले कष्ट, केलेला अभ्यास जाणवतो. त्यांच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी. इरावती हर्षेनं प्रथमच मराठीत काम केलं आहे. मात्र, तिनं इराच्या भूमिकेत कमाल केली आहे. वडिलांच्या आजारामुळं होत असलेली हळव्या मुलीची तडफड तिनं प्रभावीपणे दाखवली आहे. 
 अमृता सुभाषचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या अभिनेत्रीला कायाप्रवेशाचं वरदान आहे. ती जी भूमिका करते, ती मूर्तिमंत उभी करते. कन्नड बोलणारी, अशिक्षित, गावंढळ माहुताची पत्नी तिनं फारच जबरदस्त साकारली आहे. तिचं कन्नड गाणंही मस्त. या तिन्ही अभिनेत्यांना त्यांच्या कामाची पोचपावती यापूर्वीच विविध पुरस्कारांतून मिळाली आहेच. बाकी भूमिकांत मिलिंद सोमण, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे, देविका दफ्तरदार यांनी उत्तम साथ दिली आहे. साकेत कानेटकर-धनंजय खरवंडीकर यांचं संगीत कानांत रुंजी घालणारं!
तेव्हा विस्मरणासारख्या विषयावर आधारित हा अविस्मरणीय अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका.
---
निर्माते : डॉ. मोहन आगाशे व शीला राव
दिग्दर्शक : सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
कथा-पटकथा-संवाद : सुमित्रा भावे
सिनेमॅटोग्राफी : मिलिंद जोग,
संकलन : मोहित टाकळकर
संगीत : साकेत कानेटकर-धनंजय खरवंडीकर
प्रमुख भूमिका : डॉ. मोहन आगाशे, इरावती हर्षे, अमृता सुभाष, मिलिंद सोमण, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे, देविका दफ्तरदार, ओम भुतकर, ज्योती सुभाष व लक्ष्मी हत्तीण
कालावधी : दोन तास तीन मिनिटे
दर्जा - ****
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २ ऑगस्ट २०१४)
---
------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment