11 Jun 2015

हवाहवासा गोवा...


गोव्यात जायला मला नेहमीच आवडतं. खूप वेळा गेलोय असं नाही. पण जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी गोव्याच्या अधिकच प्रेमात पडत गेलोय. पहिल्यांदा गोव्याला गेलो ते लग्नानंतर. हनीमूनला. त्यानंतर इफ्फी कव्हर करायला एकदा गेलो. त्या वेळी अर्थातच एकटा होतो. नंतर लग्नाला दहा वर्षं झाली, म्हणून पुन्हा त्याच हॉटेलात, त्याच ठिकाणी गेलो. या वेळी आमच्या दोघांसोबत मुलाचीही भर पडली होती आणि दोन मित्रही त्यांची कुटुंबं घेऊन सहभागी झाले होते. त्यामुळं या ट्रिपला खूपच धमाल आली. या तिन्ही सहलींच्या वेळी गोव्यात गेल्यावर पाहतात ती सर्व पर्यटनस्थळं, म्हणजे मंगेशीच्या मंदिरापासून ते दोना पावलापर्यंत आणि फोर्ट आग्वादपासून अंजुना बीचपर्यंत (बोट क्रूझसह) करून झाली होती. त्यामुळं या वेळी गोव्याला जायचं ठरवलं ते दोन-तीन दिवस सुशेगाद राहण्यासाठी... इथं माझा नगरचा मित्र उपेंद्र कुलकर्णी याची पत्नी अदिती मदतीला आली. हे उत्साही, झकास जोडपं गोव्यालाच राहत होतं. अदितीनं वारी नावाची एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केलीय आणि उपेंद्र गोव्यात कळंगुटला 'अझ्युरी बाय स्प्री हॉटेल्स' या हॉटेल चेनमध्ये सीनियर एरिया मॅनेजर आहे. मग काय...! याच हॉटेलात राहण्याची सोय अदितीच्या मदतीनं झाली आणि आम्ही - म्हणजे मी, बायको धनश्री व मुलगा नील - गोव्याला रवाना झालो. गोवा म्हटलं, की पावलो ट्रॅव्हल्स हेच नाव डोळ्यांसमोर येतं. आता अनेक कंपन्यांच्या बस जात असल्या तरी आम्ही सोयीच्या वेळेला पावलो बसचंच बुकिंग केलं. स्लीपर कोचनं सात जूनला रात्री निघून सकाळी म्हापशाला पोचलो. जून महिन्यात मी पहिल्यांदाच गोव्यात येत होतो. यापूर्वी गोव्याला येणं झालं होतं ते फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये. जूनमधला गोवा जसा अपेक्षित होता तसाच दिसला. ढगाळ हवामान, नुकताच पाऊस पडून गेलेला.
गोव्याचे सुपुत्र पोएट बा. भ. बोरकर यांच्या शब्दांप्रमाणे सृष्टीला अगदी पाचवा म्हैना... सुरू झाला नसला, तरी तिचं नवं-कोरं गर्भारपण जाणवत होतं. (गोवा म्हटलं, की कुणाला वारुणी आठवते, तर कुणाला तरुणी आठवते... मलाही या दोन्ही गोष्टी आठवत असल्या, तरी जोडीला बाकीबाब यांची ही सुंदर शब्दकळाही आठवते आणि त्या निसर्गरम्य गोव्याच्याच प्रेमात अधिक पडायला होतं...) तबियत खूश करणारा हा मोसम पाहूनच गोव्याच्या पुन्हा नव्यानं प्रेमात पडलो. हवा कुंद होती, धुंद होती. हिरव्यागर्द धरतीला काळ्याभोर आभाळाचं मखर होतं. आम्ही रिक्षा करून हॉटेलला पोचलो. हे हॉटेलही आम्हाला आवडलं. जुनीच इमारत असणार. पण रिनोव्हेट केलेली होती. पांढऱ्या रंगानं रंगवलेली ही इमारत गोव्यातल्या अनेक जुन्या इमारती किंवा चर्चच्या रंगसंगतीशी साधर्म्य राखून होती. मागच्या बाजूला छोटासा तलाव होता आणि त्यामागं शेती. त्याहीमागं डोंगर. एकूण जागा अप्रतिम होती, यात वाद नाही. हॉटेलच्या ट्रीट नावाच्या रेस्तराँमध्ये ब्रेकफास्ट केला आणि मग बाहेर पडलो. उपेंद्रची भेट झाली होती आणि मी त्याला या वेळी नेहमीची पर्यटनस्थळं बघणार नसल्याचं सांगितलं होतं. मग त्यानं पणजीतलं सायन्स पार्क (खास करून नीलला) पाहण्याजोगं आहे, असं सांगितलं. आम्हाला वेळच वेळ होता. बाइक घेऊन फिरण्याचा पर्याय पावसाच्या शक्यतेमुळं बाद ठरला. मग तिथल्या स्थानिक बसमधून आम्ही पणजीला निघालो. ही बस सरळ कळंगुटवरून पणजीला न येता, आतल्या बाजूनं छोटी छोटी गावं घेत पणजीत येते. आम्हाला अनायसे त्या सुंदर भागाचं बसल्या जागी दर्शन झालं. एरवी ही कंट्रीसाइड पाहायला मुद्दाम जाणं झालं नसतं. पण बसमधून गेल्यानं ते साधलं. पणजी आल्यावर आम्ही बसमधून उतरून रिक्षा करून सायन्स पार्कमध्ये गेलो. दोन वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हाच दोना पावलाच्या रस्त्यावर असलेलं हे पार्क पाहिलं होतं. पण तिथं लगेच जायला मिळेल असं वाटलं नव्हतं. त्या मानानं लवकर योग आला.
हे सायन्स पार्क चांगलं आहे. नीलला मजा आली. आम्ही तिथं एक थ्री डी शो पाहिला. पिंपरीत असलेल्या सायन्स पार्कसारखंच, पण थोडं छोटं असं हे गोव्याचं सायन्स पार्क आहे. रिक्षावाला गोव्याचा असल्यानं आम्हाला परत नेण्यासाठी तासभर थांबला होता. जाताना नवं भाडं शोधण्यापेक्षा आम्हाला नेणं त्याला सोयिस्कर वाटत होतं. पण तो थांबला ते बरं झालं. कारण आम्ही रिक्षात बसलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात त्या रस्त्याचं काम चालू होतं आणि समोर एक शाळा सुटली होती. त्यामुळं मस्त ट्रॅफिक जॅम झालं. ते पाहत, शेजारी उधाणलेला समुद्र पाहत टाइमपास झाला. अखेर पंधरा-वीस मिनिटांनी आम्ही तिथून बाहेर पडू शकलो. मीरामार बीच ते मांडवीच्या पुलापर्यंत असलेला हा दयानंद बांदोडकर रस्ता (यालाच बुलेवार्ड म्हणतात...) मला फारच आवडतो. आठ वर्षांपूर्वी फिल्म फेस्टिव्हलला आलो होतो, तेव्हाच मी या रस्त्याच्या प्रेमात पडलो होतो. या रस्त्यानं आम्ही आयनॉक्सला आलो. तिथं दिल धडकने दो बघण्याचा विचार होता, पण ऐन वेळी तो रद्द केला. मग सकाळी मनस्विनीनं (प्रभुणे) सुचवल्याप्रमाणं पणजीतल्या कॅफे भोसलेमध्ये जेवायला गेलो. तिथं बन्स (केळ्याची पुरी) हा प्रकार खाल्ला. मला आवडला. मनस्विनीनं सांगितल्याप्रमाणं या पुरीसोबत मिरची खातात. ती काही आम्हाला मिळाली नाही. पण जेवण छान होतं. भोसलेंना धन्यवाद देऊन बाहेर पडलो. दुपारची वेळ होती. बायकोला शॉपिंग करायची होती. पण पणजीत दुपारी काय वातावरण असतं, हे तिनं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि आम्ही निमूटपणे स्टँडचा रस्ता धरला. सुशेगाद म्हणजे काय, हे आम्हाला नीटच कळलं होतं. (बाकी पणजीला का नावं ठेवा... पुण्यात तरी दुपारी एक ते चार काय वेगळं वातावरण असतं...!)
संध्याकाळ हॉटेलमध्येच साग्रसंगीत घालवल्यानंतर खऱ्या अर्थानं गोवा अंगात भिनायला सुरुवात झाली होती. रात्री बाहेर पडणारा पाऊस आणि हॉटेलच्या रूमचा हवाहवासा ऊबदारपणा... गोव्याच्या हवेतच एवढी झिंग असताना लोक पुन्हा वेगळी दारू का पितात, कळत नाही. अर्थात कळतंय पण वळत नाही असंही अनेकांचं होत असणार म्हणा! असो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उपेंद्रनं सुचवल्याप्रमाणं पर्वरीला गोवा म्युझियम पाहायला गेलो.
नेहमीप्रमाणं रिक्षावाल्यांना हे ठिकाण माहिती नव्हतं. पण गुगलच्या मदतीनं पत्ता शोधला आणि रिक्षेवाल्याला दाखवला. मग त्याच्या लक्षात आलं. आम्हाला तर कसलं म्युझियम आहे, काय आहे काहीही ठाऊक नव्हतं. पण पर्वरीच्या सुंदर भागातून पुढं खाली गेल्यावर हे छोटेखानी म्युझियम लागलं. म्युझियम सरकारी नव्हतं, तर खासगीच होतं. एकाच इमारतीत तीन मजल्यांवर हे हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम होतं. गोव्याच्या स्थापत्यशैलीचे विविध नमुने तिथं होते. जुन्या वास्तूंमध्ये स्तंभ, कड्या इ. नमुने तिथं ठेवले होते. देवघर होतं. घरातलं एक छोटेखानी चर्चही होतं. इंडो-पोर्तुगीज स्थापत्याचे नमुने दाखवणारी भरपूर चित्रं होती. गोव्यातल्या घरांचं वेगळेपण चटकन लक्षात येत होतं. एक वेगळं प्रदर्शन बघितल्याचं समाधान लाभलं. शेजारीच (गोव्यातले विख्यात चित्रकार) मारिओ मिरांडांची गॅलरी होती. आमच्या म्युझियमच्या तिकिटांवर तिथं मिरांडांची पाच
कार्डं गिफ्ट मिळाली. मिरांडांची अफलातून चित्रं पाहिली.
अचानक गुप्तधन गवसावं तसा आम्हाला हा स्पॉट गवसला. त्या म्युझियमच्या मागं वेगळ्याच शैलीत बांधलेल्या दोन-तीन इमारती होत्या. ती एक शाळा आहे हे कळल्यावर तर मला तिथं शिकणाऱ्या पोरांचा फारच हेवा वाटला. तिथून परत येताना लक्षात राहिली ती मिरांडांची लयदार रेषांची करामत आणि गोव्यातली विविध घरं दाखवणारं ते छोटेखानी संग्रहालय... वेगळं काही तरी पाहण्याची इच्छा असलेल्यांनी नक्की पाहावं असंच हे ठिकाण.
संध्याकाळ कळंगुटच्या त्या प्रसिद्ध बीचवर गेली. समुद्र उधाणलेलाच होता. लाल बावटा लागला होता. पण उत्साही पर्यटक लाटांवर झोकून देत होते. सगळीकडं सळसळतं चैतन्य पसरलं होतं. समोर अथांग सागर पसरला होता.... त्यालाही वारंवार उचंबळून येत होतं आणि मलाही... लाटा येत होत्या अन् जात होत्या. मी आणि नील वाळूत घट्ट पाय रोवून उभे होतो. पण जाणारी लाट पायांखालची वाळू काढून नेत होती.... लाट खिदळत होती अन् आम्ही हिंदकळत होतो...  भोवती गर्दी होती, पण तरीही एक अनामिक एकलेपण मनात भरून राहिलं... क्षणभरच! दुसऱ्याच क्षणाला मुलाचा हात हातात आला आणि मी पुन्हा या जगात आलो. थोड्या वेळानं आम्ही तिघंही त्या बीचवरून निघालो, पण पुन्हा अर्ध्या तासानं परत बीचवर आलो... सूर्यास्त होऊन गेला होता... समोरची क्षितिजरेषा केशरी-लालसर रंगाऐवजी जांभळट-करडी होऊ लागली होती... दशदशांनी अंधार चालून आला. समोर दूरवर दोन मोठ्ठी गलबतं आणि त्यावरचे दिवे दिसू लागले. हे दृश्य पाठ सोडवेना. अखेर अगदीच नाइलाजानं तिथून निघालो. कुठल्याशा वेगळ्याच जगात पाच मिनिटं का होईना, घेऊन जाणारा तो सागरकिनारा आता मागं राहिला होता. आम्ही माणसांत आलो होतो...
गोवा आवडतो तो अशाच काही निसटत्या, पण अननभूत क्षणांसाठी...


----------------------------

2 comments: