19 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग १३ ते १५

बिंगोस्कोप
---------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा पाचवा भाग...

----

१३. साउंड ऑफ म्युझिक
-----------------------------

जगण्याचं सुरेल गाणं
-------------------------

मित्रांनो, आपल्याला गाणी ऐकायला, म्हणायला, गुणगुणायला आवडतात ना? संगीत आवडत नाही, सूर आवडत नाहीत अशी माणसं फारशी नसतात. आपल्याला सगळ्यांनाच संगीत आवडतं. गाणी आवडतात. पण कल्पना करा, हे संगीत, हे सूर, ही गाणी आपल्या आयुष्यात नसती तर? आयुष्य किती नीरस झालं असतं, ना! अगदी गद्य, रुक्ष अशा त्या ‘बोअर’ जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र, अशा काही नीरस लोकांच्या जगण्यात संगीताचे सूर भरण्याची एक कथा म्हणजेच ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा अत्यंत गाजलेला इंग्लिश चित्रपट. सुमारे ५३ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट जगभरात अतिशय नावाजला गेला. त्यातल्या संगीताचं, गाण्याचं, ज्यूली अँड्र्यूज या प्रमुख अभिनेत्रीचं सगळीकडं खूप कौतुक झालं. यातली ‘डो रे मी’, ‘साउंड ऑफ म्युझिक’, ‘आय ॲम सिक्स्टीन, गोइंग ऑन सेव्हन्टीन’ आदी गाणी प्रचंड गाजली. अजूनही ती ऐकली जातात.

मारिया (ज्यूली) आणि निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन जॉर्ज व्हॉन ट्रॅप (ख्रिस्तोफर प्लमर) यांची ही कथा आहे. ही कथा साल्सबर्ग (ऑस्ट्रिया) येथे सन १९३८ मध्ये घडते. मारिया नन म्हणून काम करण्यासाठी जाते. मात्र, तिची संगीताची आवड, पर्वतांविषयीचं प्रेम, एकूणच खळाळत्या उत्साहानं जगणं आणि काहीशी बेशिस्त, स्वैर जीवनशैली यामुळं ती हे शिक्षण पूर्ण करू शकणार नाही, असं तिच्या शिक्षिकेला वाटतं. ती तिला कॅप्टन ट्रॅप यांच्याकडं पाठवते. त्यांच्या सात मुलांची आया म्हणून तिला काम करायचं असतं. या मुलांना आई नसते. कॅप्टनसाहेबांच्या कडक शिस्तीखाली ही सगळी मुलं अतिशय दबलेली असतात. कॅप्टनसाहेब व्हिएन्नाला जातात, तेव्हा मारिया या मुलांना गायला, मोकळेपणाने जगायला शिकवते. ते परत येतात, तेव्हा त्यांना मुलांचं हे वागणं बिलकुल रुचत नाही. मात्र, हळूहळू त्यांच्यात बदल होत जातो. तेही अनेक वर्षांनी गायला लागतात. नंतर या मुलांना प्रसिद्ध अशा साल्सबर्ग फेस्टिव्हलमध्ये गाण्याच्या स्पर्धेत पाठवावं, अशी टूम निघते. मात्र, कॅप्टनसाहेब त्यास नकार देतात. पुढे अशा काही गोष्टी घडत जातात, की संगीतच या कुटुंबाला एकत्र आणते. त्या गोष्टींचा आनंद प्रत्यक्ष सिनेमा पाहताना लुटणेच योग्य.
रॉबर्ट वाइज या दिग्दर्शकानं काही सत्य घटनांवरून हा सिनेमा तयार केला आहे. मारिया व्हॉन ट्रॅप यांच्या ‘द स्टोरी ऑफ द ट्रॅप फॅमिली सिंगर्स’ या नावाच्या पुस्तकावरून ‘साउंड ऑफ म्युझिक’ नावाची संगीतिका १९५९ मध्ये रंगमंचावर आली होती. ऑस्कर हॅमरस्टाइन II यांनी यातली गीते लिहिली होती, तर रिचर्ड रॉजर्स यांनी त्या संगीतिकेचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. नंतर रॉबर्ट वाइज यांनी हा चित्रपट तयार केला, तेव्हा त्या चित्रपटाचं संगीतही रॉजर्स यांनीच दिलं. हा चित्रपट अमेरिकेत २ मार्च १९६५ रोजी फारसा गाजावाजा न होता, मर्यादित स्वरूपात प्रदर्शित झाला होता. मात्र, लवकरच या चित्रपटानं तुफान लोकप्रियता मिळविली आणि अवघ्या चार आठवड्यांत तो त्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पुढील वर्षभरातच या चित्रपटाने उत्पन्नाचे आणखी विक्रम मोडले आणि (‘गॉन विथ द विंड’ला मागे टाकून) तो सार्वकालिक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा विक्रम या चित्रपटाच्या नावावर पुढील पाच वर्षे राहिला. या चित्रपटातील मारियाच्या भूमिकेमुळं ज्यूली अँड्रयूज ही अभिनेत्री अजरामर झाली. या चित्रपटामुळे आपल्या चित्रकर्मींनाही प्रेरणा मिळाली. प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार यांनी या चित्रपटावरून काहीसा बेतलेला ‘परिचय’ हा चित्रपट १९७२ मध्ये तयार केला होता.
पुढे तर ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट म्हणजे एक दंतकथा ठरला. या चित्रपटाने त्या वर्षी पाच ऑस्कर पुरस्कार पटकावले. त्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारांचा समावेश होता. जगभरातील लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. याचं कारण म्हणजे हा चित्रपट सांगत असलेली संगीताची भाषा सर्वांना समजणारी होती. सूरांनी साधल्या जाणाऱ्या संवादाला भाषेचं बंधन नसतंच. शिवाय या चित्रपटातून केवळ संगीताची महती सांगितली आहे असं नाही. किंबहुना कुठलंही आनंददायी जगणं सुरेलच असतं, असा मंत्र हा सिनेमा आपल्याला देतो. या सिनेमात दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा काळ आहे. या महायुद्धामुळे युरोपातील अनेक देशांची मोठी होरपळ झाली. माणसामाणसांत द्वेष असू नये, प्रेमानं-एकोप्यानं सर्वांनी गाणं गात, गुणगुणत, हसत जगावं, असा साधासोपा संदेश देणारा हा सिनेमा युद्धाच्या क्रौर्याच्या पार्श्वभूमीवर त्या काळी सर्वांना अत्यंत आवडावा, यात आश्चर्य नव्हतं. या सिनेमाने सांगितलेली मानवी मूल्यं चिरंतन आहेत. त्यामुळंच आजही हा सिनेमा पाहताना कंटाळा येत नाही. तुम्ही तो अजून पाहिला नसेल, तर नक्की पाहा. तब्बल तीन तास सूरांच्या सहवासात हरवून जा...

----

साउंड ऑफ म्युझिक (अमेरिका/इंग्लिश/१९६५/रंगीत/१७४ मिनिटे)

निर्माते : रॉबर्ट वाइज, दिग्दर्शक : रॉबर्ट वाइज, कथा : मारिया व्हॉन ट्रॅप, पटकथा : अर्नेस्ट लेहमन
प्रमुख भूमिका : ज्यूली अँड्र्यूज, ख्रिस्तोफर प्लमर, एलिनॉर पार्कर, पेगी वूड
संगीत : रिचर्ड रॉजर्स, ऑस्कर हॅमरस्टाइन II
सिनेमॅटोग्राफी : टेड डी मॅक्कॉर्ड
संकलन : विल्यम रेनॉल्ड्स

---

१४. एलिझाबेथ एकादशी
-----------------------------

गजर मूल्यांचा...
------------------

मुलांनो, २०१४ मध्ये बालदिनाच्या म्हणजेच १४ नोव्हेंबरच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘एलिझाबेथ एकादशी’ या गमतीशीर नावाचा मराठी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल, तर नक्की पाहा. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या भावविश्वाची सुंदर गुंफण असलेले फार मोजके सिनेमे मराठीत तयार झाले आहेत. त्यापैकी हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. या सिनेमाच्या गमतीशीर नावाचा उलगडा पटकन होत नाही. सिनेमाचं पोस्टर पाहिल्यावर लक्षात येतं, की त्यात एक मस्त, वेगळ्या डिझाइनची सायकल दिसते आहे. या सायकलचंच नाव ‘एलिझाबेथ’ असतं. आता सायकलला असं वेगळंच नाव का असतं, ते सिनेमा पाहिल्यावरच कळेल. शिवाय ‘एकादशी’ का म्हटलंय, तर ही कथा पंढरपूरमध्ये घडते आणि तिथं आषाढी एकादशीच्या दिवशी जी मोठी यात्रा भरते, तिला या कथेत महत्त्व आहे. 

दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ही अत्यंत साधी, सरळ, हृदयस्पर्शी गोष्ट अत्यंत सुंदररीत्या सांगितली आहे. ज्ञानेश व मुक्ता ही दोन मुलं आपल्या आई व आजीसोबत पंढरपूरमध्ये राहत असतात. (या मुलांची नावं संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांच्यावरून प्रेरित आहेत, हे आपल्या लक्षात आलंच असेल.) या मुलांच्या वडिलांचं निधन झालेलं असतं आणि आई मशिनवर स्वेटर तयार करून संसार चालवत असते. ज्ञानेश शाळेत अतिशय हुशार असतो, पण त्याच्याकडे फीसाठीही पैसे नसतात. त्याचे शिक्षकच त्याच्या फीचे पैसे भरत असतात. कर्ज फेडता न आल्याने त्याच्या आईचे मशिनही बँकेचे लोक घेऊन जातात. आता ते सोडवून आणण्यासाठी आईकडं एकच उपाय असतो. तो म्हणजे ज्ञानेशची सायकल - ‘एलिझाबेथ’ विकणे. ही सायकल ज्ञानेशच्या विज्ञाननिष्ठ वडिलांनी त्याला खास तयार करून दिलेली असते. त्यामुळे त्याला ती मुळीच विकण्याची इच्छा नसते. मग ही सायकल वाचवण्यासाठी ही भावंडं आणि त्यांचे मित्र काय युक्ती करतात, याची ही कथा आहे.
परेशची पत्नी व मूळची पंढरपूर निवासी असलेल्या मधुगंधा कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यांच्या अस्सल अनुभवांची जोड असल्यानं हा चित्रपट अगदी वास्तववादी झाला आहे. पंढरपूरमधील जुने वाडे, गल्ल्या, यात्रेच्या आधी त्या गावात सुरू होणारी लगबग, वारकऱ्यांचे आगमन, तीर्थक्षेत्र असलेल्या गावाची अर्थव्यवस्था अशा अनेक गोष्टी कळत-नकळत सिनेमात दिसत राहतात. अत्यंत साध्या-साध्या, पण हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगांतून चित्रपट पुढं सरकत राहतो. परेशच्या या सिनेमावर इराणी सिनेमाचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतो. साध्या माणसांचं साधंच जगणं त्यातल्या हळव्या-नाजूक क्षणांसह टिपणं ही इराणी दिग्दर्शकांची खासियत! परेशही या सिनेमात हे साधतो. शिवाय कथानकाला इथल्या अस्सल मातीची जोड असल्यानं हा सिनेमा वेगळीच उंची गाठतो. 
या चित्रपटात ज्ञानेशच्या कुटुंबाच्या माध्यमातून दिग्दर्शक या मातीत रुजलेल्या संस्कारांची, नीतिमूल्यांची शिकवण देतो. तीही कुठलाही आविर्भाव न आणता! त्यामुळंच हा चित्रपट मनाला भिडतो. या चित्रपटात श्रीरंग महाजन या मुलानं ज्ञानेशची, तर सायली भंडारकवठेकर या मुलीनं मुक्ताची भूमिका केली आहे. या दोन मुलांनी फारच सुंदर काम केलं आहे. मुलांच्या आईच्या भूमिकेत नंदिता धुरी, तर आजीच्या भूमिकेत वनमाला किणीकर यांनीही फार समजून-उमजून काम केलंय. मुळात हे सगळे अभिनय करताहेत, असं कुठंच वाटत नाही. आपण पंढरपुरातील एखाद्या घरातील प्रसंग पाहतो आहोत, असंच वाटतं. या चित्रपटातून पंढरपूरचं सामाजिक दर्शन तर घडतंच, पण त्यानिमित्तानं महाराष्ट्राचं, इथल्या मराठी समाजाचं एक हृद्य चित्रण पाहायला मिळतं. या कारणासाठी हा सिनेमा नक्की बघा.
यात ‘दगड दगड’ असं एक गाणं स्वत: दिग्दर्शकानंच लिहिलं आहे. त्याला दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी संगीत दिलंय. शरयू दातेनं गायलेलं हे गाणंही मस्त जमलं आहे. याशिवाय ज्ञानेश घरी पाहुणे म्हणून आलेल्या वारकऱ्यांसमोर कीर्तन करतो, तो प्रसंगही खूप रंगला आहे. या चित्रपटात पुष्कर लोणारकर या मुलानं ज्ञानेशच्या मित्राच्या, म्हणजे गण्याच्या भूमिकेत धमाल केली आहे. यातले मुलांचे सगळेच प्रसंग खूप गमतीदार, हसवणारे, तर प्रसंगी डोळ्यांत पाणी आणणारे झाले आहेत.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ‘संत तुकाराम’ पुरस्कारही मिळाला. या चित्रपटाला मोठी लोकप्रियताही लाभली. असा हा चित्रपट तुम्ही अद्याप पाहिला नसल्यास मित्र-मैत्रिणींसह जरूर पाहा.

----

एलिझाबेथ एकादशी (भारत/मराठी/२०१४/रंगीत/९० मिनिटे)

निर्माते : निखिल साने, नितीन केणी, मधुगंधा कुलकर्णी
दिग्दर्शक : परेश मोकाशी, कथा : मधुगंधा कुलकर्णी, पटकथा : परेश मोकाशी
संगीत : आनंद मोडक, सिनेमॅटोग्राफर : अमोल गोळे, संकलन : अभिजित देशपांडे
प्रमुख भूमिका : नंदिता धुरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, वनमाला किणीकर, पुष्कर लोणारकर

---

१५. मकडी

--------------

भयाचं गमतीदार जाळं!
---------------------------

मुलांनो, तुम्ही कोळ्याचं जाळं कधी पाहिलं आहे का? एखाद्या कसबी कारागिरासारखं विणलेलं हे भक्कम जाळं म्हणजे कोळ्याच्या भक्ष्याचं साक्षात मरणच! कुणी त्या जाळ्यात अडकला, तर त्याची सुटका नाहीच. कधी संधी मिळाली तर त्या छोट्याशा कीटकानं बारकाईनं विणलेलं हे जाळं जरूर पाहा. याशिवाय ‘स्पायडरमॅन’ तर तुम्हाला माहिती आहेच. स्पायडर म्हणजे कोळीच! हिंदीत या कोळ्याला ‘मकडी’ असं म्हणतात. विशाल भारद्वाज या प्रतिभावंत दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला याच नावाचा हिंदी सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? नसेल तर नक्की पाहा. लहान मुलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत. परीची, राक्षसाची, भुताची किंवा पडक्या वाड्यातील रहस्याची गोष्ट आपल्याला वाचायला आवडते. हा चित्रपटही अशाच अद्‘भुत’रम्य दुनियेची सैर घडवितो.

उत्तर भारतातल्या एका छोट्या गावात ही गोष्ट घडते. यात चुन्नी आणि मुन्नी नावाच्या दोन जुळ्या बहिणी आहेत. चुन्नी ही अत्यंत खोडकर, तर मुन्नी ही तिची बहीण गरीब. चुन्नी जुळेपणाचा फायदा घेऊन गावकऱ्यांची नेहमी गंमत करीत असते. ‘मुघले आझम’ या गमतीशीर नावाचा त्यांचा एक छोटा मित्रही असतो. याच गावात एक जुना ओसाड महालवजा वाडा असतो. या वाड्यात ‘मकडी’ नावाची गूढ स्त्री राहत असते. ही ‘मकडी’ जादूगार असून, तिच्या तावडीत कुणी सापडलं, तर ती त्या व्यक्तीचं रूपांतर कुठल्याही प्राण्यात किंवा पक्ष्यात करते, असा समज गावकऱ्यांमध्ये असतो. त्यामुळं त्या वाड्याकडं लहान मुलंच काय, मोठ्यांनाही फिरकायला खूप भीती वाटत असते. या गावात राहणाऱ्या कल्लू नावाच्या खाटकाशी चुन्नी-मुन्नी व मुघले आझम या तिघांचंही मुळीच पटत नसतं. एकदा चुन्नी नेहमीप्रमाणे कल्लूची काही तरी खोडी काढते. कल्लू तिच्या मागे धावतो. मात्र, तो गडबडीत चुकून मुन्नीलाच चुन्नी समजतो आणि तिचा पाठलाग करायला लागतो. घाबरलेली मुन्नी चुकून त्या ‘मकडी’च्या वाड्यात शिरते. चुन्नीला जेव्हा हे कळतं, तेव्हा ती तिला शोधायला त्या वाड्याकडे धावते. मुन्नीला आपण कोंबडी केलं, असं ‘मकडी’ तिला सांगते. चुन्नीला जेव्हा त्या लाल कापडाखाली खरोखर एक कोंबडी दिसते, तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. ती ‘मकडी’च्या पाया पडून, रडून तिला आपल्या गरीब बहिणीला परत माणूस करण्याची विनंती करते. मात्र, ‘मकडी’ त्याला नकार देते. अखेर ती चुन्नीपुढं एक अट ठेवते. चुन्नीनं तिला शंभर कोंबड्या आणून दिल्या, तरच ती मुन्नीला परत माणूस करणार असते. आता चुन्नीपुढं ‘मकडी’साठी शंभर कोंबड्या गोळा करायचं आव्हान उभं राहतं... पुढं चुन्नी काय करते, मुन्नी खरंच कोंबडी झालेली असते का, ‘मकडी’ नक्की कोण असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला ‘मकडी’ चित्रपट पाहायलाच हवा.

विशाल भारद्वाज या संगीतकार-दिग्दर्शकानं या चित्रपटाद्वारे आपण उत्कृष्ट बालचित्रपट देऊ शकतो, हे सिद्ध केलं. या चित्रपटाचं आकर्षण होतं ते ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी यात साकारलेली ‘मकडी’ची प्रमुख भूमिका. आझमी यांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक भूमिका म्हणता येईल. त्यांना या भूमिकेसाठी चेटकिणीची जी वेषभूषा केली आहे, तीही बारकाईने पाहा. श्वेता बसू प्रसाद या चुणचुणीत मुलीनं यातल्या चुन्नी व मुन्नीची भूमिका अगदी झकास रंगविली आहे. तिला या भूमिकेसाठी २००३ चा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मकरंद देशपांडे या रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंतानं यातील कल्लू खाटकाची भूमिका केली आहे. या चित्रपटातील ‘मकडी’चा जुनाट भयावह वाडा आणि तिची एंट्री पाहताना लहान मुलं हमखास दचकतात. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य होय.
‘मकडी’ चित्रपट २२ नोव्हेंबर २००२ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिकागो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे दुसरे पारितोषिक मिळाले. याशिवाय प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविला गेला. या संपूर्ण चित्रपटाचं चित्रिकरण अलिबागजवळ वाघोली नावाच्या गावात व गोव्यात करण्यात आलं आहे. सिनेमा संपल्यावर येणारं ‘छुट्टी है छुट्टी’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. अनेक स्नेहसंमेलनांमध्ये तुम्ही ते ऐकलंही असेल.
विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाचा हा उत्कृष्ट बालचित्रपट तुम्ही नक्की पाहा आणि मोठे झाल्यावर या दिग्दर्शकाच्या अन्य महत्त्वाच्या कलाकृतीही आवर्जून पाहा. 

---

मकडी (भारत/हिंदी/२००२/रंगीत/९० मिनिटे)

निर्माता : विशाल भारद्वाज, दिग्दर्शक : विशाल भारद्वाज
कथा : अब्बास टायरवाला, विशाल भारद्वाज, पटकथा : विशाल भारद्वाज, संगीत : विशाल भारद्वाज
गीते : गुलजार, सिनेमॅटोग्राफर : हेमंत चतुर्वेदी, संकलन : आरिफ शेख
प्रमुख भूमिका : शबाना आझमी, श्वेता बसू प्रसाद, मकरंद देशपांडे, आलाप माजगावकर, दयाशंकर पांडे

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment