29 Nov 2024

मटा पुणे दिवाळी अंक २४ – कथा

रघू आणि रघू २.०
---------------------

दिवाळीच्या सुट्ट्या जवळ येऊ लागल्या, तसा रघू खूश झाला. या सुट्टीत त्याचा आनंदमामा अमेरिकेहून पुण्याला येणार होता. हा मामा रघूचा अतिशय आवडता होता आणि मामाचाही रघू एकदम लाडका. त्यामुळं कधी सुट्ट्या लागताहेत आणि कधी मामा आपल्या घरी येतोय असं त्याला झालं होतं. सातवीची सहामाही परीक्षा म्हणजे रघूच्या डाव्या हातचा मळ होता. त्याचे आई-बाबाही ‘अभ्यास एके अभ्यास’ असा धोशा लावणारे नव्हते. उलट रघूनं अभ्यासाबरोबरच खेळ, सिनेमा, नाटक, भटकंती या सर्वांचा आस्वाद घेत, एक अष्टपैलू आणि जबाबदार नागरिक व्हावं यासाठी रघूचे आई-बाबा नेहमीच प्रयत्नशील असायचे.
रघू पूर्वी वाड्यात राहायचा. मात्र, आता ते उपनगरातील एका सुंदर वास्तुसंकुलात राहायला गेले होते. इथून रघूच्या बाबांचं ऑफिस जवळ पडायचं. मुंबईकडून येणाऱ्या महामार्गाच्या जवळच हे संकुल होतं. इथूनच नवा मेट्रो मार्गही जात होता. रघू अगदी आतुरतेनं मेट्रो पूर्ण व्हायची वाट पाहत होता. त्याला मेट्रोनं शाळेत जायचं होतं.
लवकरच रघूची सहामाही परीक्षा संपली आणि रघू आता मामाची वाट पाहू लागला. एरवी तो मित्रांसोबत निदान सिंहगडाची एक वारी तरी नक्की करून आला असता. पण आता त्याचं लक्ष मित्रांशी खेळण्यात किंवा भटकण्यात नव्हतंच. कधी मामा येतो आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे आपलं गिफ्ट आणतो, असं त्याला झालं होतं. साधारण महिन्यापूर्वी मामाचा व्हिडिओ कॉल आला होता, तेव्हा तो आईशी बोलत असताना रघूनं मधेच घुसखोरी करून मामाला ‘हाय’ केलं होतं. नंतर तेच दोघं बोलायला लागले तशी रघूच्या आईनं वैतागून तो फोनच रघूकडं दिला आणि ‘बसा बोलत तुम्ही मामा-भाचे’ म्हणत, कृतककोपानं ती आपल्या कामाकडं वळली होती. त्याच वेळी रघूचं आणि मामाचं ते बोलणं झालं होतं. अमेरिकेत नुकत्याच विक्रीस आलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या रोबोबद्दल रघूनं ऐकलं होतं. हा रोबो आपली सगळी दु:खं स्वत:कडं घेतो आणि फक्त आनंदाच्या गोष्टी तेवढ्या आपल्याला देतो, असं रघूनं वाचलं होतं. हे रघूनं मामाला सांगितलं तेव्हा मामा मोठ्यानं हसला होता. मात्र, लगेच ‘रघूशेठ, हा रोबो आणणं तर मला काही शक्य नाही, पण तुम्हाला एक सरप्राइज गिफ्ट मात्र मी नक्की आणणार बरं का,’ असंही हसत हसत म्हणाला होता. रघूला आता त्याच गिफ्टची मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
अखेर तो दिवस उजाडला. मामाचं फ्लाइट मुंबईत उतरलं. खरं तर रघूचे बाबा रघूसह मुंबई विमानतळावरच जाणार होते मामाला आणायला; मात्र त्या दिवशी नेमकं बाबांना दुसरं महत्त्वाचं काम आलं आणि मग मुंबई ट्रिप राहिलीच. रघू जरा हिरमुसला. पण मुंबईच्या विमानतळावर उतरल्या उतरल्या मामाचा फोन आला, की मी टॅक्सी करून थेट घरी येतोय रे…. हे ऐकून रघूचा मूड परत जागेवर आला. आता केवळ चार ते साडेचार तासांची वाट पाहायची. मामा कधीही घरी येईल. रघू त्या दिवशी भराभर जेवला. बिल्डिंगमध्येच त्याचा खास दोस्त श्रेयस राहत होता. त्याच्याकडे जाऊन आला. आता आपण पुढचे काही दिवस भेटणार नाही; मामा येतोय असं तो श्रेयसला सांगून आला. खरं तर दर दिवाळीच्या सुट्टीत रघू आणि त्याचे आई-बाबा कुठे तरी चार दिवस ट्रिपला जातात. यंदा मामा आल्यावर त्याच्याबरोबरच जायचं असं ठरलं होतं. नेहमीप्रमाणे कोकणात न जाता, बाबांचे एक चुलतभाऊ फलटणला राहतात तिकडं जायचं, असं त्यांचं ठरलं होतं. मामा आणि फलटणचा काका इंजिनीअरिंगला एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळं ते एकमेकांचे मित्रच होते. त्यामुळं फलटणचा रामकाकाही त्याच्या मित्राची – आनंदाची – वाटच पाहत होता. श्रेयसला हा सगळा कार्यक्रम सांगून रघू घरी पोचतो, तोच खाली टॅक्सीचा हॉर्न वाजला. ‘नक्कीच आनंदमामा...’ असं म्हणत रघू थेट लिफ्टमध्येच शिरला. चौदाव्या मजल्यावरून तळमजल्यावर लिफ्ट येईपर्यंतचा एकेक सेकंद त्याला एकेका तासासारखा वाटला. अखेर लिफ्ट खाली आली. दार उघडताच समोर बघतो तो आनंदमामा. रघूनं धावत जाऊन मामाला मिठीच मारली. मामाकडं भरपूर सामान होतं. ते एकेक करून लिफ्टमध्ये ठेवायला रघूनं आणि वॉचमनदादांनी मदत केली. रघूची नजर त्या सर्व बॅगांवर भिरभिरत होती. मामानं त्याला टपली मारली आणि म्हणाला, ‘रघूशेठ, तुमचं गिफ्ट आणलंय, पण आधी घरात तर चला…’
मामा घरात शिरला तोच हास्याच्या गडगडाटात. भाऊ-बहीण प्रेमानं भेटले. रघूचे बाबा मात्र घरी नव्हते. रघू नुसता मामाभोवती नाचत होता. मामा फ्रेश होऊन येईपर्यंत आईनं त्याच्यासाठी गरमागरम चहा आणि नुकत्याच केलेल्या खमंग चकल्यांची डिश समोर ठेवली. चहा घेत आणि चकलीचा तुकडा मोडत ते गप्पा मारू लागले. मामा खरं तर दमला होता. अमेरिकेहून जवळपास २०-२२ तासांचा प्रवास आणि मुंबईहून पुण्यापर्यंतचा जवळपास पाच तासांचा प्रवास करून मामा अगदीच शिणला होता. मात्र, त्याच्या ताईला आणि भाच्याला बघून त्याच्याही अंगात उत्साह संचारला होता. तो प्रवास कसा कसा झाला, मुंबईत किती ट्रॅफिक लागलं, घाटात कसा अडकलो, मिसिंग लिंकचं काम कधी पूर्ण होणार, मेट्रो कधी पूर्ण होणार असलंच काही तरी बोलत बसला. रघूला यात फार रस नव्हता. त्याचं सगळं लक्ष लागलं होतं ते मामानं आणलेल्या सरप्राइज गिफ्टकडं. शेवटी न राहवून रघूनं ‘आनंदमामा, माझं गिफ्ट?’ असं विचारलंच. त्यावर आई रघूला जरा ओरडलीच. म्हणाली, ‘अरे, आत्ताच आलाय ना तो? जरा विश्रांती घेऊ दे… संध्याकाळी बाबा आले की मग सगळे परत निवांत गप्पा मारू.’ मग मामाही म्हणाला, ‘रघूशेठ, तुमचं गिफ्ट कुरिअरनं येतंय मागून…. थोडा धीर धरा…’ हे ऐकल्यावर रघू पुन्हा जरा नाराजच झाला. मामा तर आला, पण गिफ्ट मागून कुरिअरने? हे काही त्याला झेपलं नाही. पण मग मामाही ‘जेटलॅग’मुळं झोपायला गेला आणि आईही तिच्या दिवाळी फराळाच्या कामात गुंगून गेली, तसा रघू खालच्या गार्डनमध्ये सायकल खेळायला निघून गेला. सगळंच घर थोडा वेळ शांत झालं.
संध्याकाळी बाबा आले तशी रघूची कळी पुन्हा खुलली. आज बाबांनी संध्याकाळी सगळ्यांना त्याच्या आवडत्या हॉटेलमध्ये पार्टीला न्यायचं कबूल केलं होतं. मग त्यांच्या कारमधून ते सगळे त्या हॉटेलमध्ये गेले. रघूनं मामाला मुद्दाम मागं बसवलं आणि तो स्वत: त्याच्या शेजारी बसला. त्याला मामाशी खूप गप्पा मारायच्या होत्या. रघू पुन:पुन्हा त्या अमेरिकेतल्या रोबोविषयी विचारत होता आणि मामा त्यावर मोठ्यांदा हसत होता. मधेच बाहेर बघत, ‘पुणं काय बदललंय… एवढी ही गर्दी… आम्ही कॉलेजला होतो, तेव्हाचं पुणं किती शांत होतं…’ असं काही काही बोलत होता. मामानं आपल्या बोलण्याकडं लक्ष द्यावं, म्हणून रघू मधूनच मामाचं जर्किन ओढत होता. मग मामा त्याला जोरात ओढून जवळ घ्यायचा आणि हसत त्याच्या पाठीवर धपाधपा थोपटायचा. रघूला ते आवडायचं, पण मामा आपल्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही, असंही वाटायचं. त्या हॉटेलमध्येही जेवताना, त्याचा आवडता पास्ता खाताना रघू मामाशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिला आणि मामा मात्र आई-बाबांशी वेगळ्याच विषयावर बोलण्यात गुंगून गेला. रघूला तो सगळा प्रकार बोअरच झाला. नंतरचे तीन-चार दिवस मामा दिवसाही झोपायचा आणि रात्री तो आणि बाबा टेरेसमध्ये गप्पा मारत बसायचे. तेव्हा रघू परत श्रेयसकडं जायला लागला. अखेर दिवाळी आली आणि सगळं घर पुन्हा पणत्यांनी, उटण्याच्या वासानं, आकाशकंदिलाच्या आणि दिव्यांच्या माळेच्या प्रकाशानं न्हाऊन निघालं. रघूची सगळी बिल्डिंग नुसती झगमगत होती. आता मामाचा ‘जेटलॅग’ही कमी झाला होता आणि तो दिवसा जागा राहून गप्पा मारायला लागला. बिल्डिंगच्या खाली रघू, श्रेयस आणि त्यांच्या इतर मित्रांनी किल्ला केला होता. मामाही तो किल्ला बघायला आला; इतकंच नाही तर त्यानं तो सजवायला मदतही केली.
दिवाळीचे चार दिवस भुर्रकन निघून गेले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना फलटणला रामकाकाकडं निघायचं होतं. रघूच्या मनातून अजूनही गिफ्टचा विषय गेला नव्हता. ’मामानं आपल्याला शेंडी तर लावली नाही ना?’ असंही त्याच्या मनात येऊन गेलं. मात्र, त्याच दिवशी त्यांच्या दाराची बेल वाजली आणि कुरिअरवाला आला. स्वत: रघूनंच ते कुरिअर घेतलं. मामानं रघूसाठी मागवलेलं ते गिफ्ट होतं. रघूनं पत्ता पाहिला. ते कुरिअर अमेरिकेतूनच आलं होतं. मग मामानं ते स्वत:सोबत का आणलं नाही, हे त्याला कळेना. तेवढ्यात मामा आलाच. ‘रघूशेठ, मिळालं ना गिफ्ट? उघडा बघू…’ असं मामानं हसत म्हणताच रघूनं ते पार्सल फोडलं. आतून एक बाहुला बाहेर आला. पूर्वी ‘झपाटलेला’ सिनेमात असाच एक बाहुला होता. रघूनं तो सिनेमा बघितला होता. तो बाहुला बघून तो पुन्हा जरा हिरमुसलाच. ‘मामा, मला रोबो हवा होता. आता असल्या बाहुल्याशी खेळायला मी काही लहान नाही,’ असं तो फुरंगटून म्हणाला. त्यावर आनंदमामा म्हणाला, ‘अरे, हाच तर रोबो आहे. आता हा तू सांगशील तसं ऐकणार. तुझ्या फोनच्या ब्लूटूथशी कनेक्ट कर त्याला…’ हे ऐकून रघूनं उडीच मारली. त्यानं त्याचा स्मार्टफोन आणला आणि तो त्या रोबोला कनेक्ट केला. आधी त्या रोबोनं ‘तू मला काय नावानं हाक मारशील?’ असं विचारलं. रघूनं त्याचं नाव ‘पोपटराव’ ठेवलं. पोपटराव चांगला रोबो होता. त्यानं रघूला खूश करून टाकलं. रघूच्या आवडीची गाणी ऐकवली. रघूच्या आवडत्या सिनेमांची यादी करून ठेवली. होमवर्कचं एक फोल्डर करून दिलं. मित्रांचे वाढदिवस पाठ करून टाकले. घरातल्या सीसीटीव्हीलाही स्वत:ला जोडून घेतलं.
खरं तर आता घरात सगळी प्रवासाला निघायची गडबड होती. रघू मात्र पोपटरावला सोडायला तयार नव्हता. नुसता आनंदानं नाचत होता. त्याला हा ‘रोबो’ भलताच आवडला होता.
बाबांनी फलटणच्या दिशेनं कार भन्नाट सोडली. दिवेघाट जवळ येताच वातावरण बदललं. शहरातील गर्दी, धूळ, प्रदूषण जाऊन सगळीकडं हिरवीगार जमीन, अजूनही सुरू असलेले छोटे धबधबे, भरलेले तलाव असं सुंदर दृश्य सुरू झालं. मध्येच एका छोट्याशा, पण खूप प्रसिद्ध हॉटेलमध्ये मिसळही खाऊन झाली. आता सासवड, जेजुरी, नीरा असं करत करत गाडी सुमारे अडीच-तीन तासांच्या प्रवासानंतर फलटणला पोचली. रामकाकाचा बंगला थोडासा गावाबाहेर होता. आजूबाजूला सगळं उसाचं शेत. रघूला हे गाव आवडलं. रामकाकाच्या घरी आगत-स्वागत झालं. आनंद आणि राम हे दोन मित्र दीर्घकाळानं भेटत होते. त्यामुळं त्यांच्या गप्पा लगेच रंगल्या. रामकाकाचा मुलगा स्वानंद रघूच्याच वयाचा होता. रघूनं त्याला आपला रोबो दाखवला. स्वानंद तो रोबो बघून भयंकर खूश झाला. रघू आणि सगळे आता रामकाकाकडं दोन दिवस राहणार होते. संध्याकाळी सगळे गावात रामाच्या दर्शनाला गेले. ते सुंदर मंदिर, रामकाकाच्या शेतातली विहीर, तिथं पोहणारे स्वानंदचे मित्र, तिथली पेरूची बाग हे सगळं बघून रघू एकदम खूश झाला.
रात्रीचं जेवण बंगल्यासमोरच्या अंगणात होतं. दिवाळी संपल्यानंतर असते तशी किंचित थंडी हवेत होती. मात्र, आजूबाजूला शेती असल्यानं आणि त्यात कालव्याचं पाणी खेळवलेलं असल्यानं थंडी नेहमीपेक्षा इथं जरा जास्त वाजत होती, हेही रघूला जाणवलं. रात्रीच्या जेवणात पिठलं-भाकरीचा बेत होता. दिवाळीत खूप गोड खाऊन सगळ्यांचीच तोंडं काही तरी खमंग खायला आतुरली होती. सोबत शेतातून आणलेला कच्चा कांदा, गाजर, मुळा, काकडी असं सगळं सॅलड होतं. सगळे जेवता जेवता गप्पा मारत होते. रघू स्वानंदशी बोलत असला तरी त्याचं सगळं लक्ष मोठ्यांच्या बोलण्याकडं होतं. रामकाका सांगत होते, की आता खेड्यात शेती करत राहणं कसं परवडत नाही, सगळे तरुण कसे शहराच्या दिशेनं धाव घेतात, खेड्यात अजूनही पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत म्हणाव्यात अशा सुविधा फार नाहीत वगैरे वगैरे. नंतर नंतर तर गाडी राजकारणावर घसरली तेव्हा तर त्या सगळ्या गोष्टी रघूच्या डोक्यावरूनच गेल्या…
रघूला सगळंच समजलं नसलं, तरी इकडं सगळं काही आलबेल नाही, एवढं त्याच्या लक्षात आलं. स्वानंदशी बोलतानाही काही गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. आपल्या शहरात असलेल्या अनेक सुखसुविधा इकडं नाहीत, हे त्याच्या लक्षात आलं. ऑनलाइन फूड मागवणं किंवा मोठे मॉल किंवा मल्टिप्लेक्स अशा गोष्टी तर इथं नाहीत, पण इंटरनेटलाही चांगला वेग नाही. स्मार्टफोन मात्र प्रत्येकाकडं होता. अगदी स्वानंदकडंही लेटेस्ट मॉडेलचा, चांगल्या ब्रँडचा फोन होता. गावात काही अत्याधुनिक कार किंवा एसयूव्हीही त्यानं पाहिल्या. मात्र, त्याच वेळी अगदी झोपडीसारखी म्हणावीत, अशा साध्या घरांतून राहणारी माणसंही त्यानं तिथं पाहिली. उघडी गटारं दिसली. रस्त्यात फतकल मारून बसलेली गुरं, रस्त्याच्या कडेला अस्वच्छता, गुटखा खाऊन रंगलेल्या टपऱ्या हेही दिसलं. यातल्या काही गोष्टी त्याला शहरातही दिसत होत्याच. 
रात्री जेवणं झाल्यावर सगळे त्याच अंगणात शतपावली करायला लागले, तेव्हा त्यानं बाबांना हे विचारलं. तेव्हा बाबा हसून म्हणाले, ‘तुला हे सगळं दिसतंय आणि जाणवतंय हे खूप चांगलंय बाळा…’ पण बाबांच्या या कौतुकानं रघूचं काही समाधान झालं नाही. त्यानं मामालाही हेच विचारलं. मामा म्हणाला, ‘रघू, एक सांग. तू उद्या शिकून मोठा झालास की काय करणार? माझ्यासारखंच अमेरिकेत किंवा इंग्लंडला जाणार आणि तिकडंच राहणार ना?’ रघूला काय उत्तर द्यावं कळेना. मग त्यानं स्वानंदला विचारलं, की तू पुढं मोठा होऊन काय करणार? त्यावर स्वानंदचं उत्तर ठरलेलं होतं, तो म्हणाला, ‘कुठंही जाईन, पण इथं नक्कीच राहणार नाही. इथं आमचं घर आहे, चांगला बंगला आहे, पण हळूहळू सगळेच शहराकडं निघालेत. साधं शेतीला पाणी द्यायचं तर इथं आठ-आठ तास वीज नसते. तरी आमचं तालुक्याचं ठिकाण आहे, म्हणून बरं आहे. जरा इथून आठ-दहा किलोमीटवरच्या छोट्या गावांत जा. तिथं याहून भयंकर परिस्थिती दिसेल.’
स्वानंदचं हे बोलणं ऐकून रघू विचारात पडला. आपल्याकडं येणारी भाजी, धान्यं अशा सगळ्या लहान-मोठ्या गोष्टी अशा लहान गावांतील शेतकऱ्यांकडूनच तर येतात. आपण ऑनलाइन खरेदी करतो, पण आपल्या शहराशेजारीच असलेल्या गावात फारसं कधी जात नाही. या विचारानं रघूच्या मनाचा ताबा घेतला. रघूला अचानक त्या ‘रोबो’ची आठवण झाली. स्वानंदनं आल्या आल्या खूप कुतूहलानं त्याच्याविषयी रघूला विचारलं होतं. रघूच्या मनात एक कल्पना आली. त्यानं मनातल्या मनात काही गोष्टी ठरवल्या. तो पुन्हा मामाजवळ गेला. मामा आता रामकाकाशी बोलत होता. तरी त्यानं मामाला बाजूला बोलावून त्याच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. मामा समाधानानं हसला.
दुसऱ्या दिवशी परत पुण्याला निघायचं होतं. खरं तर रामकाकाचं घर आणि तो सगळाच परिसर रघूला एवढा आवडला होता, की पुन्हा लवकरच स्वानंदकडं राहायला यायचं असं त्यानं मनोमन ठरवून टाकलं होतं. आनंदमामा, रघूचे आई-बाबा आणि रघू गाडीत बसले. रामकाका, काकू, स्वानंद आणि त्यांचं सगळं कुटुंब त्यांना ‘टाटा बाय बाय’ करायला मुख्य रस्त्यापर्यंत आलं. अगदी निघताना रघूनं स्वानंदच्या हातात एक बॉक्स ठेवला. नंतर उघड, असं सांगून ते सगळे पुढं निघाले.
स्वानंदची उत्सुकता शिगेला पोचलो होती. तो पळतच घरात शिरला आणि त्यानं तो बॉक्स उघडला. बघतो तो काय, त्यात रघूचा ‘पोपटराव’ हा रोबो होता. सोबत तो रोबो कसा वापरायचा याच्या सगळ्या सूचना लिहून प्रिंटआउट काढून ठेवल्या होत्या. स्वानंदला लक्षात आलं, की आपण या रोबोच्या मदतीनं पुष्कळ गोष्टी करू शकतो. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विहिरीवरचा पंप इथून चालू-बंद करता येईल. त्यासाठी त्याच्या वडिलांना रात्रीचं अंधारात लांब-वर जायची गरज नाही. शिवाय वीजपुरवठा, इंटरनेटचा स्पीड इ. गोष्टींसाठी काय काय करायचं याचीही लिस्ट सोबत होती. स्वानंदला कळलं, की आपण एक सोशल मीडिया अकाउंट काढून संबंधित यंत्रणेपर्यंत आपल्या तक्रारी थेट पोचवू शकतो. त्यासाठी या रोबोचीही मदत होईलच. आपण नुसतं बोललं तरी हा सगळं टाइप करून देतो. शाळेतले अवघड विषय शिकण्यासाठीही ‘पोपटराव’ची मदत होईल.
हे सगळं बघितल्यावर तर रामकाका खूश झालेच, पण काकूही लगेच रामाच्या देवळात पेढे ठेवायला गेल्या. देवळातला रामराया आपल्याकडं बघून मंद हसतोय, असा भास स्वानंदच्या आईला झाला. इकडं रघूची कार पुण्याच्या दिशेनं भरधाव निघाली होती. मागच्या सीटवर बसून रघू आनंदमामाकडं बघून समजुतीनं हसत होता. मामाही त्याला जवळ घेऊन थोपटत होता… जाताना रघू नुसता रघू होता, येताना तो ‘रघू २.०’ झाला होता… रस्त्याकडेची हिरवीगार पिकं आनंदानं वाऱ्यावर डुलत होती…

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स (पुणे) दिवाळी अंक, २०२४)

---

27 Nov 2024

मनशक्ती दिवाळी अंक २०२४ लेख

यश म्हणजे नक्की काय असतं?
-------------------------------------

आयुष्यात आपण मोठं झालं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे असं जन्माला आल्यापासून आपण सतत ऐकत आहोत. यश मिळवायचं म्हणजे नक्की काय करायचं, असा प्रश्न पडायच्या आतच त्या प्रश्नाची उत्तरं आपल्यासमोर तयार ठेवण्यात आली होती. परीक्षेत चांगले मार्क मिळवून पास व्हायचं हे एक प्रकारचं यश असायचं. त्यातून तुम्ही सहज पुढं गेलात तर आणखी कठीण आव्हानं तयार असायची. मग नुसतं पास होऊन चालायचं नाही तर पहिल्या तीन नंबरांत तुम्ही पास व्हायला पाहिजे असायचं. त्यातून तुम्ही कधी दुसरे किंवा तिसरे आलात तर पहिल्या नंबरचं उद्दिष्ट तातडीनं समोर ठेवलं जायचं. आयुष्यात पहिला नंबर मिळवून सातत्यानं पास झालात तर पुढच्या कठीण परीक्षाही लगेच तयार असायच्या. आता तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनीअर होऊन दाखवायचं असतं. त्यासाठी पुन्हा तुमच्या राज्यातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये नंबर मिळवून दाखवणं हेही तुमच्या यशाचं एक माप असायचं. ती कसोटी पार केलीत की मग पुढं उत्तम नोकरी मिळवणं, ‘चांगली’ बायको (किंवा नवरा) मिळवणं, मग आजी-आजोबांना नातवंडं मिळवून देणं, नोकरीत सतत चांगल्या ग्रेड मिळवत राहणं, खाली मान घालून काम करणं, नेटका संसार करणं या सगळ्या क्रमाक्रमानं येणाऱ्या ‘यशा’च्या पायऱ्या असायच्या. तुम्ही एक पायरी चढलात, की पुढची तयारच असते. आता नक्की काय केलं म्हणजे आपण सर्वोच्च यश मिळवलं असं सगळे म्हणतील, असं कित्येकदा वाटून जातं. या ऐहिक किंवा भौतिक यशाच्या मोजमापाला काही मर्यादा नाही. ते कितीही मिळवा, त्याहून अधिक मिळवणारा कुणी तरी असतोच. शिवाय आपल्याकडं सगळ्या यशाचं मोजमाप हे इतरांशी तुलनेनं चालतं. ‘भला उस की कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ हा तर त्या तुलनेचा मुख्य आधार. मग ते सर्वोच्च म्हणवलं जाणारं यश मिळणार तरी कसं?
यश नक्की कशाला म्हणायचं असा प्रश्न पडेपर्यंत आपलं निम्मं आयुष्य सरलेलं असतं. आयुष्यात स्थिरस्थावर होण्याची लढाई संपली, की मग आपल्याला जरा स्वत:बद्दल विचार करण्याची उसंत मिळते. तेव्हा लक्षात येतं, की आपण एवढे दिवस ज्या कथित यशासाठी राबत होतो, ते यश खरंच आपल्याला साध्य करायचं होतं का? की आपण एवढे दिवस कुणा दुसऱ्याच्याच स्वप्नांच्या यादीसाठी स्वत:चा जीव कष्टवत होतो? आपल्याला आयुष्यात जे करायचं होतं, ते आपण करतो आहोत का? आपल्याला ज्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो, त्या आपण करतो का? जरा विचार केल्यावर आणि आजूबाजूला नजर टाकल्यावर आपल्या असं लक्षात येतं, की केवळ आपणच नव्हे, तर आपल्या पिढीतले बहुसंख्य तरुण आपल्यासारखंच तर करत आले आहेत! ही ‘मेंढरांच्या कळपा’ची मानसिकता हे आपलं व्यवच्छेदक लक्षण. सगळे इंजिनीअरिंगला जात आहेत ना, मग आपणही तिकडंच जायचं. सगळे डॉक्टर होताहेत तर मग आपणही तीच वाट निवडायची. यात धोका नाही. वाट मळलेली आहे. आपण फक्त पुढच्या मेंढरामागं चालत राहायचं. डोळ्यांना परंपरेची, रुढीची, स्वतंत्र विचार न करण्याची अदृश्य झापडं लावलेली असतातच. त्यामुळं इकडं-तिकडं बघायचं काही कारणही उरत नाही. एखाद्याला चुकून वाटलं, की आपल्याला चित्रकलेत रस आहे, तर तो रस मारून टाकण्याकडं आपला सगळ्यांचाच कल. समाजानं मान्य केलेल्या चौकटीत मिळालेलं यश तेच ‘यश’ असतं, असंच आपल्यावर लहानपणापासून बिंबवलं जातं. आपण वेगळा विचार करण्याची थोडी फार शक्यताही त्यातून नष्ट होते. मी स्वत: दहावीनंतर इंजिनीअरिंगला जाऊन, अपयशाच्या थपडा खाऊन शहाणा झालेला एक विद्यार्थी आहे. आपल्याला भाषा विषयात गती आहे, आपण वृत्तपत्रात, माध्यमात लेखनाचं काम करून यश मिळवू शकतो, हे कळेपर्यंत तारुण्यातली महत्त्वाची तीन-चार वर्षं गेली. अर्थात ती ‘वाया गेली’ असं मी म्हणणार नाही. याचं कारण शिकण्याची प्रक्रिया सुरू होतीच. त्यावर परीक्षेतील गुणांचं वा प्रमाणपत्राचं शिक्कामोर्तब झालं नाही इतकंच. अनेक थोर-मोठे कलावंत लौकिक अर्थानं फार शिकलेले नव्हते. परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण सोडावं लागलं किंवा नीट घेता आलं नाही. मात्र, पुढं त्यांच्या कर्तृत्वात त्यामुळं कुठेही उणेपणा आला नाही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ही अगदी सर्वांना माहिती असलेली उदाहरणं. या दोघांनीही जेमतेम प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण घेतलं होतं. मात्र, लतादीदी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात एवढ्या उत्तुंग स्थानी गेल्या, की ते स्थान गाठणं इतरांना जवळपास अशक्य व्हावं. तीच गोष्ट वसंतदादांची. दादांकडं शाळेचं प्रमाणपत्र नसेलही; मात्र, जगण्यातून ते जे शिकले होते, ते कित्येकांना पदवी घेऊनही समजलं नसतं. खेड्यापाड्यांतील माणसांची वेदना, दु:ख जाणणारा असा हा मुख्यमंत्री होता. राजभवनाचं ऐश्वर्य मिळालं, तरी भाजी-भाकरी गोड मानून खाणारा मातीतला नेता होता. मग यांनी जे ‘यश’ मिळवलं ते कसं मोजायचं? सचिन तेंडुलकरचं उदाहरणही महत्त्वाचं. रूढार्थानं बारावी पण उत्तीर्ण नाही. मात्र, त्याच्या क्षेत्रात त्यानं एवढं यश मिळवलं, की त्याचं यश हीच एक दंतकथा झाली. बारावी किंवा त्याआधीच्या वर्गांना त्याचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा लागला. ‘यश’ या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल, एवढं उदंड यश मिळवलं. ‘मायक्रोसॉफ्ट’चं साम्राज्य उभं करणाऱ्या बिल गेट्सची कथाही अशीच. थोर गायक पं. भीमसेन जोशींची कहाणी पण तशीच. किती तरी उदाहरणं आहेत. शाळेतलं किंवा मार्कांचं यश हा नेहमीचा मापदंड ओलांडून ही माणसं पुढं गेली. त्यांनी रूढ यशाच्या चौकटी लांघल्या. आपले स्वत:चे मानदंड प्रस्थापित केले.
याशिवाय प्रयत्नपूर्वक चौकट मोडून वेगळं काही तरी करून धजणारे, त्यासाठी अविरत कष्ट करणारे, त्याची किंमत मोजणारे असे किती तरी लोक आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातला प्रत्येक जण प्रसिद्ध होऊ शकतो असं नाही. पण माझ्या मते, असा प्रत्येक माणूस हा सेलिब्रेटीच आहे. आपल्याकडं ५०-६० वर्षांपूर्वी किंवा अगदी ३०-४० वर्षांपूर्वी जी शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती होती, त्या तुलनेत आता काळ थोडा बदलला आहे. आता निदान मुलांना त्यांच्या आवडी-निवडी समजतात. कल चाचणी असते. त्यानुसार अभ्यासक्रम निवडता येतो तरी. शिवाय आता पालकही पुरेसे जागरूक झाले आहेत. मुलांना एखाद्या क्षेत्रात गती नसेल तर तिकडं त्याला पाठवू नये एवढा विचार तरी ते नक्कीच करतात. ‘तुला हवं ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,’ असं म्हणणाऱ्या पालकांची संख्या वाढते आहे. निदान शहरांत तरी असे पालक दिसताहेत ही जमेची बाजू आहे. किमान चौकट मोडता येणं, ही भावी यशाची नांदी असू शकते. आपल्या चौकटबद्ध, चाकोरीबद्ध, पारंपरिक विचारांमुळं आपण किती तरी वेगळ्या, अज्ञात वाटा धुंडाळण्याविना राहिलो. किती तरी ज्ञानशाखा आपल्याला ठाऊकच झाल्या नाहीत. आता ही सगळी वाट खुली होताना दिसते आहे. दार निदान किलकिलं झालं आहे. पायवाट दिसते आहे, तिचा लवकरच महामार्गही होईल. त्यामुळे यशाच्याही नवनव्या व्याख्या तयार होतील. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, तो किती मोलाचा आहे, याची जाण होणंही महत्त्वाचं. त्यामुळं आपण जन्माला आलो आहोत ते काही तरी करून दाखवण्यासाठी अशी एक जिद्द मनात तयार होते. निदान तयार व्हायला पाहिजे. आपलं जगणं कायम उदात्त आणि उन्नत असायला पाहिजे, याची खूणगाठ मनाशी बांधता येते. आपल्या जगण्यातून आजूबाजूच्या चार लोकांचं भलं कसं होईल, याचा विचार सुरू होतो. आतापर्यंत जगात विज्ञानानं जी प्रगती केली, शास्त्रज्ञांनी जे मोठमोठे शोध लावले त्यामागे हाच मूलभूत विचार आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ हे जसं खरं आहे, तसंच ‘जगाच्या कल्याणा शास्त्रज्ञांच्या विभूती’ हेही तितकंच खरं आहे. विशेषत: मध्ययुगापासून गेली चार-पाच शतकं माणसाच्या इतिहासात जी क्रांती घडली, त्यामुळं आपलं अवघं जीवनच बदलून गेलं आहे. या क्रांतीच्या मुळाशी हाच अभ्यास होता, हाच ध्यास होता. त्यामुळं एकेका शोधामुळं मानवी जीवनानं प्रगतीचा एकेक पुढचा टप्पा गाठला. मोठी मजल मारली. विविध औषधांचे शोध असोत, किंवा तंत्रज्ञानातील प्रगतीचे अद्भुत आविष्कार असोत; या प्रत्येक शोधामुळं आपलं जीवन आणखी सुकर, आणखी सुखकर झालं आहे. मानवी कल्याणासाठी केल्या गेलेल्या या प्रत्येक गोष्टीला आपण यश म्हटलं, तर या यशाचं परिमाणही फार वेगळं व उच्च असेल.
यशाच्या फूटपट्ट्या अनेक आहेत. माझ्या मते, माणसाच्या जगण्यातील मूलभूत मूल्यांचा आदर राखून मिळवलेलं यश हे अधिक उजवं मानायला हवं. उदा. प्रामाणिकपणा, सचोटी, मेहनत, जिद्द हे गुण आणि सामाजिक समानता, भिन्नलिंगी व्यक्तीवषयी आदर, देशाप्रति निष्ठा, आपल्या कामावरील प्रेम, समाजाचे नियम पाळण्याची असोशी ही मूल्यं यांचं पालन करून मिळवलेलं यश खरोखर सुवर्णयश मानायला हवं. आपण वरील गुणांचं व मूल्यांचं पालन करून यश मिळवलं आहे का, हे जाणण्याची छोटी कसोटी आहे. यश मिळाल्यावरही आपल्या अंगी विनम्रता कायम असेल किंवा आपले पाय जमिनीवर असतील तर आपण ही कसोटी उत्तीर्ण झालो, असं खुशाल समजावं.
हे जग अतिशय विशाल आणि वैविध्यानं भरलेलं आहे. आपल्याला ते जेवढं उमजत जाईल, तेवढे आपण विनम्र होत जाऊ. आपल्याआधी या जगात किती तरी थोर माणसांनी केवढे तरी महान पराक्रम करून ठेवले आहेत. आपल्याला त्याची नुसती जाणीव असणंही पुरेसं आहे.

 तुम्ही कधी रायगडावर गेला आहात का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेथील पुतळ्यासमोर आपण काही क्षण उभे राहिलो, तरी डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. राजांचं अवघं जगणं त्या अश्रूधारांत प्रतिबिंबित होत असतं. आपल्या सर्वांसाठी महाराजांनी काय काय करून ठेवलं आहे, याची नुसती उजळणी केली तरी आपली छाती अपार कृतज्ञतेनं भरून येते. अवघ्या पन्नास वर्षांच्या जीवनात महाराजांनी यशाचे एकेक मानदंड स्वत: प्रस्थापित केले. असा युगपुरुष हजारो वर्षांतून एकदाच जन्माला येतो. अर्थात म्हणूनच त्यांना युगपुरुष म्हणतात.
महाराजांचे समकालीन म्हणावेत असा ज्येष्ठ शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन किंवा महान शास्र्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन किंवा जेम्स वॅट किंवा लुई पाश्चर किंवा मार्कोनी किंवा जगदीशचंद्र बोस यांचाही मी विचार करतो, तेव्हा माझं मन कृतज्ञतेनं असंच भरून येतं. या मंडळींनी मूलभूत स्वरूपाचे असे शोध लावले नसते तर आपण आज कसलं आयुष्य जगत असतो कुणास ठाऊक. हीच गोष्ट महात्मा गांधी किंवा डॉ. आंबेडकर किंवा सावरकर यांच्याविषयी म्हणता येईल. या सर्व महान विभूतींनी त्यांच्या आयुष्यात जे काही केलं, जे काही मिळवलं त्याला निर्विवाद यश म्हणता येईल. ही यशाची एक वेगळीच व्याख्या होऊ शकते.
या सर्वांच्या जगण्यातलं एक समान सार काढलं, तर एक लक्षात येईल, की या सर्वांनी केवळ स्वत:चा विचार केला नाही. त्यांनी संपूर्ण समाजाचा, किंबहुना सर्व मानवजातीचा विचार केला. त्यामुळंच त्यांच्या हातून एक किंवा अनेक अलौकिक गोष्टी होऊ शकल्या.
आपल्याकडं मोठी संतपरंपरा आहे. संत म्हटलं, की त्यांच्याविषयी आपल्या मनात एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. आपल्यासारख्या सामान्य संसारी माणसांशी त्यांची तुलना होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं. ते काहीसं खरं असलं, तरी पूर्णांशांनं खरं नाही. संत म्हणजे आपल्यासारखीच हाडामासांची माणसं होती. संत तुकाराम महाराज तर संसारी गृहस्थ होते. मात्र, त्यांनी विठ्ठलभक्तीचा ध्यास घेतला आणि त्यातून त्यांच्या हातून गाथेसारखी अजरामर रचना निर्माण झाली. मात्र, या संतांकडून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांची त्यांच्या श्रद्धास्थानावर असलेली प्रचंड भक्ती आणि ऐहिकाबाबत असलेली विरक्ती. आपल्याला आपल्या साध्या जगण्यात या दोन गोष्टी जरी साध्य करता आल्या, तरी आपण मोठं ‘यश’ मिळवलं असं म्हणता येईल. भौतिक सुखाची आसक्ती आणि ते मिळविण्याची सक्ती हाच आपल्या आयुष्यातला कार्यकारणभाव असला तरी एका मर्यादेनंतर आपल्याला या ऐहिक गोष्टींबाबत विरक्ती अंगी बाणवता आली पाहिजे. ‘सगळ्यांत असूनही कशात नसल्याची अवस्था’ गाठली आणि सोपे मोह टाळले तर आपलं सगळ्यांचंच आयुष्य अतिशय सहजपणे सुखी होऊन जाईल.
या सर्व कथनामागचा खटाटोप एवढाच, की यश ही संकल्पना सापेक्ष असली तरी आपल्यापुरतं आपल्याला तिचं गमक सापडलं तरी पुरे. हे गमक कशात आहे? आपल्या आयुष्याचं, आपल्या जन्माचं प्रयोजन आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येक जण काही तरी थोर कार्य करायलाच जन्माला आलेला असतो असं नाही, हे मान्यच! मात्र, आपल्या वाट्याला जे काही काम आलं आहे ते नेटकेपणानं, प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीनं करणं म्हणजेसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अनेकदा हीच गोष्ट अनेकांकडून होताना दिसत नाही, म्हणून अनेक समस्या निर्माण होत आहेत. आपल्यासमोर लहानपणापासून ज्या ‘यशा’चं गाजर ठेवलं जातं, त्या यश नावाच्या मृगजळाच्या मागं उरस्फोड करीत धावण्यातून काहीही साध्य होत नाही. याउलट आपल्याला जगण्याचं प्रयोजन सापडलं, की त्यातून होणारी प्रत्येक कृती आनंददायी होते आणि यश आपोआप मागून येत राहतं. उदाहरण द्यायचं झालं, तर डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे असोत, किंवा डॉ. अभय बंग – डॉ. राणी बंग असोत… जगण्याचं प्रयोजन सापडलेली ही माणसं आहेत. त्यांच्या जीवनाशी आपलं जगणं ताडून बघितलं तरी कळेल, की ‘यश’ या संकल्पनेचं नक्की काय करायचं ते… या मंथनातून आपल्याला आपलं जगणं थोडं अधिक समृद्ध करता आलं, थोडं अधिक आनंददायी करता आलं, तरी ते आपल्या पातळीवरचं, लहानसं का होईना, पण यशच असेल!

----

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती दिवाळी अंक, २०२४)

---

30 Oct 2024

सातारा ट्रिप ९-१०-२४

वाघनखं, चित्रं आणि ‘लक्ष्मी’
-------------------------------

गेल्या बुधवारी मी आणि माझा आतेभाऊ साईनाथ साताऱ्याला गेलो होतो. तिथल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवलेली वाघनखं बघणं हा एक उद्देश होताच; शिवाय याच संग्रहालयात रवी परांजपे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले आहे, ही बातमी समजल्यावर तर आम्ही तिकडं जायचंच, असं ठरवून टाकलं. साईनाथ चित्रकार आहे. त्यामुळे त्याला हे प्रदर्शन पाहण्याची विशेष उत्सुकता होती. याशिवाय मेटगुताड येथील ‘व्हिंटेज व्हील्स’ हे दुचाकींचं प्रदर्शन मी गेल्या मे महिन्यात महाबळेश्वर ट्रिपमध्ये बघितलं होतं, तेही त्याला बघायचं होतं. मग मागच्या बुधवारी आम्ही सकाळी नऊ वाजता त्याच्या ‘नेक्सॉन’मधून साताऱ्याला निघालो. वाई फाट्याला ‘अभिरुची’त ब्रेकफास्ट करून आम्ही साडेअकरा वाजता संग्रहालयात पोचलो.
हे संग्रहालय बसस्टँडच्या बाजूलाच आहे. आम्ही बायपासपासून लोणंद-सातारा रस्त्याने सातारा शहरात शिरल्यामुळं वस्तुसंग्रहालयाच्या बाजूच्या दाराने आत शिरलो. एखाद्या किल्ल्यासारखं दिसणारं हे संग्रहालय जुलैत (बहुतेक नूतनीकरण होऊन) सुरू झालेलं दिसतंय. वाघनखं आली तेव्हाच हे संग्रहालयही नव्यानं सुरू झालं. दहा रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आहे. चपला बाहेर काढाव्या लागतात. आत मोबाइल किंवा कुठलीही फोटोग्राफी केलेली चालत नाही. सुरुवातीला डाव्या हाताला शिवकालीन शस्त्रांचे दालन आहे. तिथं साताऱ्याच्या ‘गादी’सह पेशवेकालीन मेणे आदी ठेवले आहेत. सर्व दालनं चांगली सजवली आहेत व तेथील प्रकाशयोजनाही आकर्षक आहे. शस्त्रांच्या दालनातच वाघनखं ठेवली आहेत. तिथं एक बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात आहे. वाघनखं काचेच्या पेटीत असून, विशिष्ट तापमानासाठी दोन्ही बाजूंनी कूलर किंवा वातानुकूलित यंत्रं सुरू ठेवली होती. वाघनखांची माहिती शेजारी लिहिली होती. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखं तात्पुरती भारतात आणण्यात आली आहेत. ही वाघनखं छत्रपती शिवरायांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळी वापरलेलीच आहेत किंवा कसे, याविषयी तेथेही नेमके असे काही लिहिलेले नाही. या विशिष्ट वाघनखांचा प्रकार कसा झाला, हे मात्र तिथं लिहिलं आहे. ग्रँड डफच्या नातवाकडून की पणतवाकडून व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाला ही वाघनखं मिळाली. मुळात ग्रँड डफ साताऱ्याचा जिल्हाधिकारी की प्रांताधिकारी असताना त्याला राजघराण्याकडून ही वाघनखं मिळाली. अशी आणखीही वाघनखं तेव्हा राजघराण्याकडं होती. त्यामुळं नेमक्या कुठल्या वाघनखांनी महाराजांनी अफजलचा कोथळा काढला, हे संदिग्धच आहे. असो. मात्र ते सोन्यासारखं चमकणारं हत्यार बघता आलं हेही नसे थोडके. (गंमत म्हणजे मी गेल्या वर्षी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासमोर अर्धा तास आराम करत बसलो होतो. नॅचरल हिस्टरी म्युझियम आणि सायन्स म्युझियम बघून पायाचे तुकडे पडले होते. मला तेव्हा ही वाघनखं त्या समोरच्या संग्रहालयात आहेत, हे माहिती नव्हतं. नाही तर तिथंच जाऊन पाहिली असती.)
वाघनखांच्या जोडीला जुन्या काळातील बहुतेक सर्व शस्त्रं इथं आहेत. राघोबादादांची (अटकेपार गेलेली?) तलवारही इथं बघायला मिळते. शिवाय कट्यार, बिचवे, भाले, ढाली आदी विविध प्रकार व त्यांची व्यवस्थित माहिती इथं लिहिलेली आहे.

म्युझियमची एकच बाजू सुरू आहे. मध्ये मोकळी जागा आहे. वरून छत आहे. त्यामुळे एखाद्या सभागृृहासारखी ही जागा व व्यासपीठ कार्यक्रमांसाठी केली असणार. समोरच्या बाजूला चित्रांचं दालन व्हायचं आहे. त्याचं काम सुरू आहे. रवी परांजपेंची चित्रं तळमजल्यावर होती. आम्ही तिथं जाऊन ती पाहिली. परांजपे श्रेष्ठ कलाकार होते, याची
पदोपदी साक्ष देणारी ती पन्नासेक देखणी चित्रं आम्ही अगदी निवांत पाहिली. (हे चित्रप्रदर्शन २० ऑक्टोबरपर्यंत सुरू होतं.)
साधारण एक वाजता आम्ही तिथून बाहेर पडलो. ब्रेकफास्ट झाला असल्यानं आम्हाला अजून भूक नव्हती. मग आम्ही लगेच मेढा मार्गे महाबळेश्वरकडे निघालो. मी या रस्त्याने गेलो नव्हतो आधी कधी. अतिशय सुंदर रस्ता आहे. महत्त्वाचं म्हणजे रस्ता चांगला आहे. नव्याने तयार केलेला दिसला. त्यामुळं ड्रायव्हिंगचाही आनंद होता. डाव्या हाताला कण्हेर धरण ठेवून आम्ही पुढं निघालो. मेढा हे टुमदार गाव लागलं. हा सगळा जावली तालुक्याचा परिसर आजही घनदाट जंगलाचा आहे. सुदैवानं आकाश ढगाळ होतं आणि पाऊसही नव्हता. बुधवार असल्यानं पर्यटकांचीच काय, रस्त्यानं कुठल्याच वाहनांची गर्दी नव्हती. अशा वेळी आवडती गाणी लावून, (आपण ड्रायव्हिंग करत नसताना) पाय पसरून प्रवास करणं हे काय सुख असतं नाही!
सव्वादोन वाजता मेटगुताडला ‘व्हिंटेज व्हील्स’ला पोचलो. तिथंही कुणीही नव्हतं. मग निवांत सर्व दुचाक्यांचं प्रदर्शन पाहिलं. आमच्या घरी असलेल्या ‘लक्ष्मी’ या गाडीचं मॉडेल तिथं होतं. (हाही इथं येण्यामागचा एक उत्सुकतेचा भाग होता.) मग तिथं फोटोसेशन वगैरे झालं. साडेतीनला तिथून निघालो. आता भूक लागली होती. मॅप्रोसमोर एका हॉटेलमध्ये पोटपूजा केली. वाई फाट्याला आल्यावर चहा घेतला. गोपाल महाराजचे पेढे घेतले आणि संध्याकाळी सातच्या आत घरीही पोचलो.


------------------

14 Oct 2024

दोन पुस्तकांविषयी...

रूह आणि खुलभर दुधाची कहाणी
-----------------------------------------


अलीकडं सोशल मीडिया, स्मार्टफोन या गोष्टींमुळं पुस्तकवाचन कमी झालं आहे. ही काही फार अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट नाहीय खरं; पण ही वस्तुस्थिती आहे हे मान्य करायला पाहिजे. असं असलं तरी पुस्तकं खरेदी केली जातातच. उशाशी ठेवलेला आवडत्या पुस्तकांचा ढीग कधीही कमी होत नाही. त्यातलं एखादं पुस्तक कधीही उचलून वाचावं, अशा हेतूनंच तो ढीग तिथं ठेवलेला असतो. कधी वाचली जातात, कधी नाही! मात्र, नुकतीच दोन अतिशय चांगली मराठी पुस्तकं वाचून संपविली. एरवी एखादं दोनशे पानांचं पुस्तक संपवायला मला कधी महिनाही लागू शकतो. ही दोन पुस्तकं मात्र अगदी रोज सलग वाचून आठवडाभरात संपविली. एक दोनशे पानांचं होतं, तर एक चारशे. या दोन्ही पुस्तकांविषयी आपल्यासारख्या रसिक वाचकांना सांगितलंच पाहिजे, म्हणून हा लेखप्रपंच....

(विशेष नोंद - हे या पुस्तकांंच परीक्षण नाही. फार तर आस्वादन आहे, असं म्हणू या.)

---

 १.  रूह
----------

पहिलं पुस्तकं वाचलं ते मानव कौलचं ‘रूह’. हा रोहन प्रकाशननं केलेला मराठी अनुवाद आहे. माझी मैत्रीण नीता कुलकर्णी हिनं हा अनुवाद केला आहे. हे पुस्तक म्हणजे एका अस्वस्थ कलाकारानं स्वत:ची मुळं शोधण्याचा केलेला मनस्वी प्रवास आहे.
मानव कौल मला आधी माहिती झाला तो एक अभिनेता म्हणून. ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात विद्या बालनचा ‘लो प्रोफाइल’ नायक म्हणून तो लक्षात राहिला. अगदी ‘सातच्या आत घरात’मधला मानवही आठवला. मानव अभिनेता म्हणून प्रसिद्ध असला, तरी अलीकडं लेखक म्हणूनही त्यानं त्याची ओळख प्रस्थापित केली आहे. हिंदीतील साहित्यविश्वात त्याची पुस्तकं लोकप्रिय आहेत. आपल्याकडेही त्याच्या लेखनाचे अनेक चाहते आहेत. मी स्वत: त्याचं हे पहिलंच पुस्तक वाचलं. तेही अनुवादित स्वरूपात. मात्र, आता या लेखकाची इतर पुस्तकं (मूळ भाषेतून) वाचायला हवीत, असं वाटू लागलं आहे.
‘रूह’, म्हणजेच आत्मा, ही मानवच्या स्वत:च्या मुळांचा शोध आहेच; पण त्यासोबतच तो त्याचा स्वत:चाही आत्मशोध आहे. ही कौल मंडळी म्हणजे काश्मिरी पंडित. गेल्या चार दशकांत काश्मीरमध्ये काय सुरू आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. सन १९९० मध्ये काश्मीरमधून सर्व पंडितांना भयानकरीत्या हाकलून देण्यात आले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांच्या मालमत्ता हडप करण्यात आल्या, त्यांच्या बायका-मुलींवर बलात्कार करण्यात आले, अनेकांचे खून पाडण्यात आले. चार दशकं झाली तरी अजूनही काश्मिरी पंडितांना न्याय मिळालेला नाही. मानवचं घर बारामुल्लाजवळ ख्वाजाबाग या गावी आहे. तिथल्या त्या घराच्या त्याच्या आठवणी त्याच्या लहानपणच्या आहेत आणि धूसर आहेत. त्याला आठवतो तो फक्त त्या घराचा निळा दरवाजा आणि आजूबाजूची वस्ती. हा घराच्या ओढीनं तो काश्मीरमध्ये जातो आणि तिथं त्याला काय अनुभव येतो, त्याची ही कहाणी आहे.
या कहाणीत लेखकाची नायिका आहे ‘रूहानी’ (किंवा ‘रूह’) या नावाची. ही अमेरिकेतील तरुणी, पण तिचा काश्मीरवर मोठा अभ्यास आहे. ती लेखकाची मैत्रीण/प्रेयसी आहे आणि त्याला त्याच्या घराचा शोध घेण्यास प्रवृत्त करते आहे. ही कादंबरी दोन स्तरांवर आपल्याशी संवाद साधते. एक आहे तो मानवचा काश्मीरमधल्या त्याच्या मुळांचा शोध घेणारा प्रवास आणि दुसरा आहे तो काश्मीरमधील नागरिक, तिथले स्थानिक लोक यांच्याशी त्याचा होत असलेला संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं काश्मीरचं वेगळं रूप. यापैकी त्याचा पहिला प्रवास हा बऱ्यापैकी गूढ, आत्मरत आणि स्वसंवादी असा आहे. यातली ‘रूह’ हेदेखील एक प्रतीकच म्हणून तो वापरतो आहे की काय, असंही मला काही वेळा वाटून गेलं. म्हणजे ‘रूह’ ही त्याची प्रेयसी नसून, त्याचंच एक अंतर्मन किंवा आत्मा आहे आणि त्या अद्वैताशी त्याचा संवाद होतो आहे, असंही वाटलं. विशेषत: ‘रूहानी’ आणि ‘रूह’ असे दोन वेगळे उल्लेख येतात, तेव्हा असं वाटतं. एक ‘रूहानी’ लेखकाला खरोखर भेटली असावी आणि ‘रूह’ म्हणून जो उल्लेख येतो, तो कदाचित त्याचा अंतर्मनाशी असलेला संवाद असावा. माहिती नाही. लेखकाच्या मनात तसं असेल किंवा नसेलही. तसंही एका कथनाचे अनेक अर्थ, अनेक आविष्कार होणं हे एका चांगल्या कलाकृतीचंच लक्षण मानतात. त्या अर्थानेही ‘रूह’ ही शब्दश: आपल्या आत्म्याला भिडते. 
दुसरीकडं लेखक आणि त्याच्या वडिलांचं एक विलक्षण नातं यात आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. काश्मीर सोडताना वडिलांना झालेल्या वेदना ते शेवटपर्यंत विसरू शकत नाहीत. मुळापासून उखडलेलं झाड दुसरीकडं रुजू शकत नाही, तशी त्यांची अवस्था होते. लेखकाच्या संवेदनशील मनाला वडिलांची ही तगमग दिसत राहते. तो वडिलांसाठी पुन्हा काश्मीरमधलं आपलं संचित शोधायला जातो. या प्रवासात लेखकाचं मन सतत त्याचं बालपण, तेव्हाचे मित्र, तेव्हाची कॉलनी आणि तो सगळा परिसर यांचा शोध घेत राहतं. श्रीनगरमध्ये, वेगवेगळ्या शहरांत प्रवास करताना भेटणारे तिथले जुने मित्र, काही आप्त किंवा काही स्थानिक माणसं यांचं मनोगत त्याला ऐकायला मिळतं. त्यातून काश्मीरची भळभळती व्यथा-वेदना दिसत राहते. एक मात्र आहे. या सर्व परिस्थितीला लेखक कुठेही कोणालाही जबाबदार धरत नाही. कोणावरही हेत्वारोप करत नाही. आहे ते स्वीकारण्याची एक समंजस जाणीव दिसते.
अशा जवळपास काव्यात्म अनुभव असलेल्या लेखनाचा अनुवाद करणं ही कठीण गोष्ट. त्यात लेखक कधी भूतकाळ, कधी वर्तमानकाळ तर कधी भविष्यकाळ असा तिन्ही काळांत लीलया संचार करतो. मात्र, नीता अतिशय संवेदनशीलतेनं आणि सफाईनं या जाणिवेचा भावानुवाद करते. त्या लेखनातील सगळी व्याकुळता, सगळी वेदना, सगळा ‘दर्द’ तिनं अगदी व्यवस्थित मराठी रूपांतरात आणला आहे. ‘रोहन’ची निर्मिती नेहमीच देखणी असते. ‘आंतरभारती’ या विभागात ते भारतातील इतर भाषांतील पुस्तकं मराठीत आणत असतात. या मालिकेतील हे महत्त्वाचं पुस्तक आहे. ते वाचणं म्हणजे एक समृद्ध करणारा, पण त्याच वेळी मनात एक अनाम टोचणी लावणारा, तरी हवाहवासा वाटणारा अनुभव आहे.

---

२. खुलभर दुधाची कहाणी
--------------------------------

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. 
सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं.
एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर  सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे.
सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच  निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.
त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे.


------

30 Sept 2024

प्रतापराव पवार - गौरवांक लेख

कुटुंबप्रमुख
--------------

मी सकाळ संस्थेत रुजू झालो १९९७ मध्ये. प्रतापराव पवार सरांना ‘सकाळ’मध्ये बहुसंख्य लोक ‘पीजीपी सर’ किंवा नुसतं ‘पीजीपी’ या नावानं ओळखतात, हे मला तिथं गेल्यावरच कळलं. ‘सकाळ’मध्ये दर मंगळवारी सकाळी ११ वाजता संपादकीय विभागाची साप्ताहिक बैठक व्हायची. या मीटिंगला पीजीपी सर यायचे. मात्र, आम्हा नवोदितांना त्या मीटिंगला प्रवेश नसायचा. त्यामुळं पीजीपी सरांची थेट भेट व्हायचा काही प्रश्नच आला नाही. तो आला एक जानेवारीला. एक जानेवारी हा ‘सकाळ’चा वर्धापनदिन. तेव्हा या दिवशी ‘सकाळ’ला सुट्टी असायची. ‘सकाळ’च्या प्रांगणात मोठा मांडव घालून तिथं संध्याकाळी स्नेहीजनांचा, वाचकांचा मोठा मेळावा भरायचा. हा मेळावा संध्याकाळी असायचा. मात्र, सकाळी ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना जेवण असायचं. अगदी लग्नात असतात तशा रीतसर पंगती बसायच्या. पीजीपी सर एरवी कायम कोट-टाय अशा फॉर्मल वेशात असायचे. मात्र, या दिवशी ते झब्बा घालून यायचे. ते आणि त्यांच्या पत्नी भारतीताई असे दोघे मिळून पंगतीत बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिलेबीचा आग्रह करायचे. ‘कुटुंबप्रमुख’ हे त्यांचं रूप अशा वेळी फार ठळकपणे जाणवायचं.
पीजीजी सर तिसऱ्या मजल्यावर बसायचे. ‘सकाळ’मध्ये एक ऐतिहासिक, जुनी अशी लिफ्ट होती. अनेक कर्मचारी पहिल्या मजल्यावर जायलाही ही लिफ्ट वापरायचे. स्वत: प्रतापराव मात्र कधीही ही लिफ्ट वापरायचे नाहीत. कायम जिना चढून वर चालत जायचे. अशा वेळी जिन्यात अचानक ते कधी समोर आले तर आम्ही आपले जिन्यातील भिंतीला टेकून, अंग चोरून उभं राहायचो. नजरानजर झाली तर हसायचो. तेही हलके हसून पुढं जात. आम्हा ज्युनिअर कर्मचाऱ्यांना त्यांनी व्यक्तिश: ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. पुढं मंगळवारच्या मीटिंगला बसायची परवानगी मिळाली, तशी पीजीपी सरांची थेट भेट होण्याची संधी वाढली. त्या मीटिंगमध्येही ते बरोबर अकराला एक मिनिट कमी असताना हजर व्हायचे. त्यांच्या त्या काटेकोर वेळ पाळण्याची सर्व कर्मचाऱ्यांना दहशतच होती. त्यामुळं अनेक जण साडेदहा वाजताच ऑफिसमध्ये येऊन बसत. स्वत: पीजीपी त्या मीटिंगमध्ये फारसं बोलत नसत. इतकंच काय, मुख्य खुर्चीतही ते बसत नसत. तो मान संपादकांचा. शिवाय मीटिंगच्या अगदी शेवटी बोलण्याचा मानही संपादकांचा. हा संकेत पीजीपींनी कधीही मोडलेला मी पाहिला नाही. संपादकांच्या आधी ते क्वचित कधी तरी बोलायचे. त्यांचं बोलणं अतिशय मृदू आहे. आवाज अतिशय हळू. अगदी हळूवारपणे ते काही गोष्टी सांगत. त्यात गेल्या आठवड्यात तुमचं काय चुकलं वगैरे असा जाब विचारण्याचा आविर्भाव तर कधीही नसे. (ते काम संपादकांचं…) पीजीपी त्यांच्या उद्योग-व्यवसायानिमित्त जगभर फिरत. मग संपादकीय मीटिंगमध्ये ते आपले असे काही खास अनुभव शेअर करत. परदेशांत काय सुरू आहे, जग कुठं चाललं आहे, आपण नवं काय शिकलं पाहिजे असे आणि असेच त्यांच्या बोलण्याचे विषय असायचे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘सकाळ’मध्ये असलं पाहिजे, याबाबत ते अतिशय आग्रही होते. ’सकाळ’मधील कर्मचाऱ्यांनी जग हिंडलं पाहिजे, नवनव्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी कित्येक संपादकीय कर्मचाऱ्यांना परदेशांत पाठवलं आहे. किंबहुना, त्यांच्यामुळे माझ्यासकट अनेकांचा पहिला परदेश दौरा झाला आहे. काही काही कर्मचाऱ्यांना तर ते वैयक्तिक त्यांच्या खिशातून डॉलर किंवा संबंधित देशाचं चलन खर्च करण्यासाठी देत असत. ‘कुटुंबप्रमुख’ हे त्यांचं रूप अशा वेळी लखलखीतपणे उठून दिसायचं.
संपादकीय कामकाजात त्यांचा हस्तक्षेप अजिबात नसे. पूर्वी अनेकांचा असा समज होता किंवा आहे, की पवार कुटुंबाची मालकी असल्यामुळं अगदी रोजची हेडलाइन पण काय असावी, हे खुद्द शरद पवार फोन करून इथं सांगतात. मी ‘सकाळ’मथ्ये १३ वर्षं होतो. या संपूर्ण कार्यकाळात शरद पवार केवळ एकदा आमच्या ऑफिसमध्ये आले. शरद पवार तर सोडाच, पण पीजीपी सरांचाही आमच्या डेस्कवर क्वचित फोन यायचा. जे काही त्यांना सांगायचं असेल ते थेट संपादकांना ते सांगत असतील. मात्र, क्वचित कधी तरी आजची हेडलाइन विचारायला किंवा अन्य कुठली माहिती कन्फर्म करायला त्यांचा फोन आला, की आमची पळापळ होत असे. टेलिफोन ऑपरेटर आधीच सांगत असे, की पीजीपी सरांचा फोन आहे. त्यामुळं डेस्कवरचा सर्वांत सीनियर सहकारीच त्यांच्याशी बोले. माझ्या आठवणीत मी एकदाच त्यांचा फोन घेतला होता. मात्र, ते एवढ्या हळू आवाजात बोलत, की ते काय बोलताहेत हे समजण्यासाठी अक्षरश: प्राण कानात आणावे लागत.
पीजीपींकडं आठवणींचा भरपूर खजिना होता. त्यांनी पुढं ‘सकाळ’मध्ये सदर लिहून त्या आठवणी शब्दबद्ध केल्या, हे अतिशय चांगलं झालं. त्यातल्या बऱ्याचशा आठवणी आम्ही मंगळवारच्या मीटिंगमध्ये आधीच ऐकलेल्या होत्या. मी ‘सकाळ’ सोडून आता १३ वर्षं होऊन गेली. मात्र, एक जानेवारीला मी आवर्जून तिथं स्नेहमेळाव्याला जातो. सगळे जुने सहकारी भेटतात. एक-दोन वर्षांपूर्वी मी पीजीपी सरांसोबत तिथं आवर्जून फोटो काढून घेतला. अगदी अलीकडं, म्हणजे जून महिन्यात राजीव साबडे सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पीजीपी सरांना भेटण्याचा योग आला. मध्ये बराच काळ गेला होता. त्यांनी माझी ओळख ठेवण्याचा प्रश्नच येत नव्हता. मीच पुढं होऊन त्यांना सांगितलं. त्यावर ‘साहजिक आहे. मी तुमच्या विभागात फारसा येतच नसे,’ असं त्यांच्या नेहमीच्या हळुवार स्वरांत सांगितलं.
पीजीपी सरांसारखा संस्थाप्रमुख, कुटुंबप्रमुख नशिबानंच मिळतो. माझ्या नशिबात हा योग होता, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पीजीपी सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा. जीवेत् शरद: शतम्!

----

('आमचे पीजीपी' या 'सकाळ'च्या माजी कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या लेखांवर आधारित पुस्तकात हा लेख समाविष्ट आहे. हे पुस्तक १३ ऑक्टोबर २४ रोजी पुण्यात प्रकाशित झाले. पुस्तकाची संकल्पना - प्रभाकर भोसले, संपादन - नयना निर्गुण)

----

9 Sept 2024

मटा - आइन्स्टाइन लेख ८-९-२४

आइन्स्टाइन आणि आपण...
----------------------------------

आपल्या सभोवतीच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही प्रख्यात शास्त्रज्ञ प्रा. अल्बर्ट आइन्स्टाइनच्या ‘सापेक्षतावादाच्या सिद्धान्ता’त सापडतात, असं कुणी सांगितलं तर आपण कदाचित चटकन विश्वास ठेवणार नाही. पण खरोखरच ते तसं आहे आणि हे सतत सिद्ध होताना दिसतं आहे. कसं ते पाहू या. आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तात अनेक बाबी अंतर्भूत आहेत. त्यात ‘काळ हा सापेक्ष असतो,’ अशी एक संकल्पना आहे. (शास्त्रीय भाषेत या संकल्पना अधिक नेमक्या, व्यापक आणि सुस्पष्ट असतात. इथं त्या केवळ एका विचाराच्या आधारासाठी घेतल्या आहेत. त्यामुळे ही त्याची व्याख्या नसून, ढोबळ मांडणी आहे.) काळ सापेक्ष असतो, हे तर खरंच. ‘निरीक्षक कोणत्या चौकटीतून काळाकडं पाहतो, त्यावर त्या काळाची गती असते किंवा त्याला जाणवते,’ असा त्याचा साधारण अर्थ. आपल्याला तर अगदी रोजच्या उदाहरणांवरूनही हे सहज जाणवेल. उदा. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीची वाट पाहत असू तर काळ खूप हळूहळू सरकतो आहे, असे वाटेल. याउलट आपण आपली आवडती मालिका बघत असू किंवा गाणं ऐकत असू तर ती गोष्ट पटकन संपली, असं आपल्याला वाटतं. इतकंच कशाला, सुट्टीचा दिवस भर्रकन निघून जातो आणि कामावर असताना वेळ निघता निघत नाही, असाही बहुसंख्यांचा अनुभव असेलच. काळ मोजण्याच्या काहीएक पद्धती आपण निश्चित केल्या असल्या, तरी ब्रह्मांडाच्या अनंत पोकळीतील प्रवासात या सगळ्या पद्धती बाद ठरतात. अनेक साय-फाय चित्रपटांत आपण हे पाहिलं आहे. तर ते असो. मुद्दा काळाच्या सापेक्षतेचा आहे आणि तो आपल्याला मान्यच आहे.
आपल्या आजूबाजूला असलेली माणसं, समाज, व्यक्तिसमूह ही काळाच्या वेगवेगळ्या मितींमध्ये वावरत असतात आणि आपल्यासमोर जे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, ते त्यामुळे झाले आहेत. या दोन मितींमधली माणसं किंवा समुदाय एकमेकांसमोर आले, तरी त्यांना एकमेकांना ओळखता येत नाही किंवा त्यांचं बोलणं एकमेकांना ऐकू जात नाही. मध्यंतरी ‘डार्क’ नावाची एक जर्मन वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’वर आली होती. त्यात काळाच्या गुंतागुंतीचा हा वेधक प्रवास दाखविण्यात आला होता. त्यात काही माणसं ३३ वर्षं पुढं किंवा मागं जात असतात. ही फँटसी असली, तरी आपल्या आजूबाजूलाही नीट पाहिलं तर काळाच्या एका वेगळ्या टप्प्यावर जगणारी माणसं आपल्याला सहज दिसतील. सोप्या भाषेत सांगायचं, तर आपल्यातील काही जण मध्ययुगीन काळात जगत आहेत, काही एकोणिसाव्या शतकात, काही जण विसाव्या शतकात, तर काही बाविसाव्या! आणखी एक साधं उदाहरण पाहू. आपण रस्त्याने चालत असताना सिग्नलला उभे असतो. शेजारी काही जण जोरात पुढे निघून जातात. आपल्याला त्यांचा राग येतो. मात्र, ही माणसं अजून मध्ययुगातच जगत असल्यानं त्यांना सिग्नल ही संकल्पनाच माहिती नसते. मग ते कसे थांबणार त्या विचित्र दिसणाऱ्या तीन रंगीत दिव्यांना पाहून? त्यामुळे यापुढे आपण त्यांच्यावर न रागावता, ‘वेगळ्या काल-मितीत जगणारी माणसं पाहिली,’ याचा आनंद मानला पाहिजे. आपल्या पुणे शहरात सध्या कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. हीसुद्धा पंधराव्या शतकात जगणारी माणसं आहेत, हे आपल्या लक्षात येईल. शिवकाळाआधी आपल्या प्रदेशात पेंढाऱ्यांनी धुमाकूळ घातला होता. आपल्या शहरात सपासप माणसं कापणारी, त्यांचं मुंडकं उडवणारी, शेतातलं पीक कापावं तशी माणसं उडवत जाणारी ही  टोळी त्याच काळातील आहे. ‘डार्क’ मालिकेत वेगळ्या काळात जगणारी माणसं एकमेकांसमोर येतात खरी; मात्र ती एकमेकांना पाहू शकत नाहीत. त्यांच्या मधोमध काळ  नावाची काचेची जाडजूड भिंत असते. त्याचप्रमाणे तुम्ही या टोळीला काही सांगायला गेलात, तर त्यांना तुमचं बोलणं ऐकूच येणार नाही; कारण तुम्ही एकविसाव्या शतकात आहात आणि ते पंधराव्या...
याउलट काही माणसं बाविसाव्या शतकात राहतात. पुण्यात पोर्श कार चालविणारे अद्भुत बालक हे बाविसाव्या शतकातच वावरत होते. तेव्हा हवेतून विमानासारख्या उडणाऱ्या कार येणार आहेत, हे आपल्याला साय-फाय चित्रपट पाहून आता माहितीच झालं आहे. हे बालक त्याच काळात कार चालवीत होते. दुर्दैवाने शंभर वर्षं मागे असणारे दोघे त्याच्या त्या ‘उडत्या’ कारसमोर आले, त्याला ते काळाच्या पुढचे बालक तरी काय करणार? पुण्या-मुंबईतील (किंबहुना देशातील कुठल्याही महानगरातील) काही विशिष्ट बार, पब आदी ठिकाणी गेल्यास एकाच वेळी बाविसाव्या शतकातील आणि पाषाणयुगातील माणसांचे दर्शन होते. पाषाणयुगात माणसे जेमतेम लाज झाकायला वस्त्रं किंवा झाडांची पानं गुंडाळायला शिकली होती. इथंही तितपतच वस्त्रं अंगी असलेले मनुष्यविशेष आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी येताना ही मंडळी बाविसाव्या शतकातील उपरोल्लेखित ‘उडत्या कार’ने आलेली असतात, हे सांगायला नकोच. थोडक्यात, दोन विभिन्न युगांचे एकाच वेळी दर्शन घेण्याचा, मदहोश करणारा योग त्या विलक्षण जागी साधता येतो.

आणखी एक मुद्दा. काळ हा नेहमी पुरोगामी, पुढे जाणारा (प्रगतिशील अशा अर्थाने) असतो, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, तोही खरा नाही. इथे ख्रिस्तोफर नोलनच्या ‘TENET’ या चित्रपटाची आठवण येणं स्वाभाविक आहे. यात काळ पुढेही जात असतो आणि मागेही जात असतो. हीदेखील फँटसीच आहे. (चित्रपटाच्या नावापासून ही सुरुवात आहे. हे नाव रोमन लिपीत उलटसुलट कसेही वाचले तरी सारखेच वाचले जाते.) मात्र, आपल्या आजूबाजूला पाहिलं तर काळ हा कायम प्रगतिशील नसून, तो अधोगतीशील किंवा मागे जाणाराही असतो, हे आपल्याला सहज पटेल. उदा. आज पन्नास किंवा साठ या वयोगटातील किंवा त्याहून अधिक वयाची आणि दीर्घकाळ पुण्यात राहणारी माणसं काय बोलतात, हे ऐकू या. ‘आमच्या वेळी पुणं असं नव्हतं,’ हा अगदी सामायिक असा उद्गार! (यात ‘आमच्या वेळी पुणं अधिक चांगलं होतं,’ हेच अध्याहृत असतं.) आपल्या आजूबाजूची अनेक मध्यम आकाराची शहरं, तालुक्याची गावं किंवा त्याहून अधिक लहान अशी खेडी यांचं आपण गेली ३०-४० वर्षं तरी निरीक्षण करत आलो आहोत. आपली काय भावना आहे या शहरांबद्दल, गावांबद्दल? ती पूर्वी आजपेक्षा चांगली होती, हीच ती सर्वसाधारण भावना आहे, यात दुमत नसावं. सत्तर ते नव्वदच्या दशकात प्रगतिशील होत गेलेली अनेक गावं, जिल्ह्यांची मुख्यालयं असलेली टुमदार शहरं पुढंपुढं मुडदूस व्हावा, तशी कुपोषित होत गेली, आक्रसत गेली हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तिथं बागा होत्या, स्वच्छ बसस्थानकं होती, चिमुकली का होईना, नाट्यगृहं होती. आता सगळं कसं भकास झालेलं दिसतं! खेडी तर बघवत नाहीत. मग काळ हा सदैव ‘प्रोग्रेसिव्ह कसा? तो ‘रिग्रेसिव्ह’ही असतो. थोडक्यात, सापेक्ष असतो. आइन्स्टाइनच्या मूलभूत मांडणीवर पुन्हा शिक्कामोर्तब...

थोडक्यात, आता यापुढं आपण कळकळीनं, तळमळीनं काही तरी सांगतोय आणि एखाद्या व्यक्तीला, समाजाला किंवा समुदायाला ते ऐकूच जात नाहीय असं वाटलं तर लक्षात घ्या - ती काळाची जाडजूड काचेची भिंत मध्ये उभी आहे! काळाची मितीच वेगळी असल्यानं आपण कितीही ओरडून सांगितलं, तरी ते ऐकू जाणार नाहीय. मग यावर उपाय काय? शिक्षणाचा, नागरी सुविधांचा, हक्कांचा आणि नागरिकशास्त्रातील काही मूलभूत कर्तव्यांचा प्रसार होणं हाच यावरचा उपाय. पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब व श्रीमंतांची मुलं एकाच गणवेशात, एकाच वर्गात शेजारी शेजारी बसायची. आपल्या घटनाकारांनी, राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी फार समजुतीनं दोघांचा काळ असा एकत्र आणला होता. पुढं सगळं विस्कटत गेलं आणि आपण वेगवेगळ्या काळाच्या मितींत फेकले गेलो. गणपती ही बुद्धीची देवता; ती सध्या आपल्या घरी वास्तव्याला आली आहे. काळाच्या या मिती तोडून पुन्हा सगळे एकाच काळात येऊ देत, हीच त्या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना!


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - ८ सप्टेंबर २०२४)

(इमेजेस - मेटा एआयवरून)

--- 

30 Aug 2024

माळशेज ट्रिप २९-८-२०२४

निसर्गाच्या कुशीत...
-------------------------


वयाच्या, करिअरच्या एका टप्प्यावर कामाचा एक दिवसही मोकळा काढणं अशक्य व्हावं, अशी स्थिती अनेकदा येत असते. यात आपली चूक नसते. आपण कामाला आणि कामानं आपल्याला जुंपून घेतलेलं असतं. अशा वेळी हक्कानं आवाज दिला, की गोळा होतील आणि भटकायला बाहेर पडतील, असे मित्र लाभणं ही काय श्रीमंती असते, हे ती ज्यांना लाभली आहे त्यांना बरोबर समजेल. मंदार, अभिजित आणि योगेश हे माझे तीन मित्र असे आहेत. त्यातल्या त्यात मंदार व अभिजित यांच्याबरोबर अधिक भटकणं, फिरणं, भेटणं होतं, ही गोष्ट खरी आहे. मात्र, सीए असलेला आणि ‘बजाज फिनसर्व्ह’मध्ये मोठ्या पदावर असलेला आमचा चौथा मित्र योगेश जोशी जेव्हा वेळ काढून भेटतो, तेव्हा आम्हाला खरोखर फार मजा येते. आमचा चौघांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. दिवसेंदिवस त्यावर काही बोलणंही होत नाही. मात्र, मैत्री अशा पातळीवर आहे, की या सगळ्यांची गरजही पडत नाही. मागे एकदा चौघं गप्पा मारत बसलो असताना, माळशेज घाटात एखाद्या पावसाळ्यात फिरायला जाऊ या, असा विषय झाला. नेहमीप्रमाणे तो एक-दोन वर्षं बाजूला पडला. यंदा मी नेहमीप्रमाणे परत आठवण केली, तर चक्क चौघांचं एकमत होऊन २२ ऑगस्टला जाऊ या, असं ठरलंही. मात्र, नेमका दोन दिवस आधी योगेश आजारी पडला. मग तेव्हा ते जाणं स्थगित झालं आणि त्याच वेळी पुढच्या गुरुवारी, म्हणजे २९ ऑगस्टला नक्की जाऊ असं ठरलं. 
अखेर सगळं जुळून आलं, रजा वगैरे सगळ्यांना मिळाल्या आणि आम्ही सकाळी निघालो. योगेशकडं ‘टाटा हेक्सा’ ही दणकट गाडी आहे. तेव्हा तीच गाडी घ्यायची हे ठरलं होतं. गंमत म्हणजे आमच्या चौघांपैकी कुणीही यापूर्वी माळशेजला एकदाही गेलं नव्हतं. आम्हाला याचं फार आश्चर्य वाटलं आणि हे कसं काय राहून गेलं, असं आम्ही बोलूनही दाखवलं. कदाचित, हे ठिकाण आधी पाहिलं नसल्यानं आम्हाला ‘ट्रिगर’ मिळाला असावा, हेही खरं. तर, आम्ही ठरल्याप्रमाणे आठ वाजता निघायचं असं म्हणून साडेआठला निघालो. दहा वाजता आम्ही चाकण पार केलं, तेव्हा आमचे ग्रह आज उच्चीचे आहेत आणि ही ट्रिप मस्त पार पडणार, असं फीलिंग आलं. योगेशनं सकाळी काही खाल्लं नव्हतं म्हणून मग भामा नदी पार केल्यावर दोन्ही बाजूंना जी हॉटेलांची रांग आहे, त्यापैकी एका ठिकाणी थांबलो. मिसळ, पोहे, चहा असं सगळं यथासांग झाल्यावर योगेशनं गाडी भरधाव सोडली. पाऊस नव्हता, पण ढगाळ हवा होती. वातावरण उत्तम होतं. पुणे-नाशिक हायवे आता चांगला झाला आहे. बहुतेक गावांना बायपास आहे. त्यामुळं फारच लवकर आळेफाट्याला पोचलो. तिथंही आता बायपास झाला आहे. मग त्या बायपासनं वळून आम्ही नगर-कल्याण महामार्गाला लागलो. इथून पुढं आता दुपदरी रस्ता होता. हा रस्ता कसे असेल अशी आम्हाला धास्ती वाटत होती. मात्र, सुदैवानं रस्ता बरा होता. या रस्त्याला लागल्याबरोबर हवा आणि परिसर दोन्ही एकदम बदलल्याचं जाणवलं. सगळा आसमंत हिरवागार होता. समोर डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. सह्याद्री दोन्ही हात फैलावून साद घालत होता. रस्त्यावर किती तरी ठिकाणी आता इथंच थांबावं, असं वाटून गेलं. मात्र, आम्हाला गाठायचा होता माळशेज घाट! 
थोड्याच वेळात ओतूर आलं. मी खूप पूर्वी या गावात आलो होतो. माझा आतेभाऊ तेव्हा इथं शिकायला होता. आता हे गाव पुष्कळ बदललेलं दिसलं. वाढलं होतं. ओतूर म्हटलं, की आमच्या ‘बाबा’ची (अनिल अवचट) आठवण होणं स्वाभाविकच. हे त्याचं गाव. शिवाय ‘साप्ताहिक सकाळ’चे दिवंगत संपादक सदा डुम्बरे यांचंही हे गाव. या दोघांचंही स्मरण त्या गावातून जात असताना होणं अगदी स्वाभाविक होतं. पुढं गेल्यावर एके ठिकाणी छोट्या खिंडीसारखा भाग ओलांडून आलो आणि समोरचं दृश्य बघून अक्षरश: स्तिमित झालो. उजव्या बाजूला पिंपळगाव जोगे धरणाचा विस्तीर्ण जलाशय पसरलेला दिसला आणि त्यामागे हिरवीगार, उंच डोंगररांग.... खरं तर तिन्ही बाजूंनी डोंगर आणि मधे बशीसारखं पसरलेलं ते धरणातलं पाणी... अहाहा! स्वित्झर्लंडपेक्षा काय कमी सुंदर होतं हे दृश्य, असं किती वेळा मनात येऊन गेलं. त्या भागात हळूहळू रिसॉर्टसारखी बांधकामंही होताना दिसली आणि मन संभ्रमात पडलं. पर्यटनामुळं विकास होणार, हे खरं; पण त्यामुळं इथला निसर्ग आत्ता आहे तसा राहील का, असंही वाटून गेलं. अर्थात फार वेिचार करायला वेळ नव्हता. एखाद्या ‘बायोस्कोप’मध्ये एकापाठोपाठ एक दृश्यांची माळ दिसत राहते, तशी ‘एक से एक’ अप्रतिम दृश्यं निसर्ग आमच्यासमोर पेश करत होता. सह्याद्रीचं हे वैशिष्ट्य आहे. कितीही वेळा तुम्ही एखादा भाग, डोंगर, किल्ला किंवा पायवाट अनुभवा; तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. आम्हा चौघांपैकी अभ्या हा जास्त भटका जीव. मी कॉलेज काळात किंवा नंतरही अगदी बॅचलर असेपर्यंत बऱ्यापैकी भटकलेलो. नंतर मात्र, ‘लेजर ट्रिप’ जास्त झाल्या. आमची आजची ट्रिपही तशीच होती. वेळेचं बंधन नव्हतं, अमुक ठिकाण गाठायचंय, अशी घाई नव्हती, की तमुक टिकमार्क गोष्ट केलीच पाहिजे, अशी सक्ती नव्हती. उलट मजेत, गप्पा मारत, आमची आवडती ‘नाइन्टीज’ची गाणी ऐकत मस्त प्रवास सुरू होता. थोड्याच वेळात पुण्याची हद्द संपली (आणि चांगला काँक्रिटचा रस्ताही संपला) आणि ठाणे जिल्ह्याची हद्द सुरू झाली. संपूर्ण माळशेज घाट ठाण्याच्या हद्दीत येतो. मी इकडं पूर्वी कधीही आलो नसल्यानं सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या. मेंदू आपोआप एकेक नोंदी करत चालला होता. पुढं घाट सुरू होताना उजव्या बाजूला एमटीडीसीचं रिसॉर्ट लागलं. मात्र, मी डाव्या बाजूला बसल्यानं माझ्या ते पटकन लक्षात आलं नाही. एक वळण घेऊन आम्ही पुढं गेलो, तर मोठा धबधबा दिसला. झालं. लगेच आम्ही गाडी थांबवली. तिथं बरीच दुकानं होती. मात्र, आज आठवड्याचा मधलाच दिवस असल्यानं पर्यटक फार नव्हते. (आम्हाला तेच अपेक्षित होतं.) थबधब्यापाशी गेलो. तिथं वर जाण्यासाठी पक्क्या पायऱ्या व रेलिंग केलं होतं. धबधब्याखालून जाताना भिजलोच. मला आणि मंदारला भिजायचं नव्हतं; पण योगेश आणि अभ्यानं मनसोक्त भिजून घेतलं. आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढायचं काम केलं. इथं फारच झकास वातावरण होतं. समोर घाट आणि त्याखाली पसरलेली दरी दिसत होती. इथं बराच वेळ रेंगाळल्यावर मग खाली उतरलो. तिथल्या एका दुकानदाराला विचारलं, तर त्यानं पुढं आणखी दहा किलोमीटर घाट आहे, असं सांगितलं. एमटीडीसीचं रिसॉर्ट मागेच गेल्याचंही तो म्हणाला. (आम्हाला शक्यतो तिथं जेवायला जायचं होतं.) मग आम्ही घाटातून पुढं निघालो. एका वळणानंतर अचानक तो ‘आयकॉनिक’ बोगदा दिसला. तो ओलांडल्यावर मग व्ही आकाराचं ते लांबलचक वळण दिसलं. ‘माळशेज घाट’ म्हटलं, की जे फोटो दिसतात, ते याच पट्ट्यातले. बोगदा ओलांडल्यावर समोरच्या डोंगरावरून अक्षरश: पंधरा ते सोळा धबधबे कोसळताना दिसले. फार पाऊस नसल्यानं धबधबे खूप मोठे नव्हते, पण वाहत होते, हेही नसे थोडके. मग आम्ही त्या ‘व्ही’च्या टोकाला टर्न मारून पुढं त्याच धबधधब्यांखाली आलो. इथंच तो ‘कार वॉश पॉइंट’  दिसला. अतिशय शार्प अशा कातळांतून रस्ता काढला होता आणि एका ठिकाणी तो धबधबा थेट रस्त्यावर पडत होता. आम्ही गेलो, तर काही पोरं-पोरी त्या पाण्याखाली, ऐन रस्त्यात बसकण मारून बसले होते आणि अर्थात ‘रील्स’ काढत होते. आम्ही मोठमोठ्यानं हॉर्न वाजवून त्यांच्या बाजूनं गाडी पुढं निघाली. पुढच्या वळणावर एक मोठा पॉइंट दिसला. मात्र, आम्ही तिथं थांबलो नाही. आम्हाला तो घाटरस्ता पूर्ण बघायचा होता. एका वळणानंतर समोर एक अतिप्रचंड कातळाची भिंत अगदी अंगावर आली. खरं तर ती तिथून खूप लांब होती. मात्र, तो अवाढव्य आकार छाती दडपवून टाकत होता. तिथल्या वळणानंतर उतार सुरू झाला. मग पुढं आणखी एक पॉइंट दिसला. (त्याचं नाव लाजवंती सनसेट पॉइंट हे नंतर कळलं.) तिथं आधीच एक तरुण-तरुणी येऊन फोटो काढत बसले होते. मग आम्हीही आमचं फोटोसेशन केलं. इथून दोन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या विशाल रांगा दूरवर दिसत होत्या. एक अंगठ्यासारखा सुळकाही दिसला. (हाच तो प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’ असावा का? माहिती नाही...) इथं आजूबाजूला बरेच गड, सुळके, किल्ले असणार. मात्र, आम्हाला त्याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळं काही कळलं नाही. अर्थात तो निसर्ग डोळ्यांनी पिऊन घेताना मात्र आम्हाला अजिबात कंटाळा येत नव्हता. ऑक्सिजन रिफिलिंगचं काम जोरात सुरू होतं.

आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. विशेषत: योगेशला खूपच भूक लागली होती. मग आम्ही परतीचा रस्ता धरला. येताना अभ्याच्या लक्षात आलं, की त्याचं जर्किन त्या धबधब्यापाशीच राहिलं आहे. मग ते घ्यायला घाईनं पोचायला हवं, म्हणून येताना त्या मोठ्या पॉइंटपाशी थांबलोच नाही. सुदैवानं धबधब्यापाशी अभिजितचं जर्किन आणि टोपी जशीच्या तशी मिळाली. मग एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये गेलो. तिथं त्यांचं फ्लेमिंगो रेस्टॉरंट आहे. मग तिथं मस्तपैकी जेवलो. जेवण चांगलं होतं. जेवल्यावर मग एमटीडीसीच्या रिसॉर्टवर फेरफटका मारला. डोंगराच्या बाजूनं मोठं माळरान आहे. ते डोंगराच्या बाजूनं कुंपण बांधून बंदिस्त केलंय. तिथं आम्ही जरा फिरलो. फोटो काढले. अभ्यानं रील्स केले. तिथला भन्नाट वारा अगदी झिंग आणणारा होता. निसर्गाचं भव्य रूप चहूबाजूंनी दिसत होतं. उत्तुंग, बेलाग डोंगरकडे आणि त्यावर झेपावणारा सावळ्या मेघांचा महासागर हे रूप पाहून आपल्या खुजेपणाची जाणीव होत होती. पावलं रेंगाळली. मनही तिथंच घुटमळलं... पण आता निघायला हवं होतं. वातावरण असं होतं, की किती वाजले कळत नव्हतं. मगापर्यंत बडबड करणारे आम्ही सगळेच तिथं एकदम शांत, शांत होऊन गेलो होतो. काही बोलू नये, आवाज करू नये... एकमेकांच्या सोबतीनं फक्त तिथं उभं राहावं आणि ती असीम शांतता काळजात भरून घ्यावी!
असा काही वेळ गेल्यावर एका श्वानानं भौतिक अस्तित्वाची जाणीव करून दिली. अगदी जड अंत:करणानं तिथून निघालो. आता जवळपास साडेतीन वाजून गेले होते. आता परतीचे वेध लागले होते. येताना थोडं पुढं आल्यावर जुन्नरकडं जाणारा वेगळा रस्ता दिसला. मग आळेफाट्यावरून न जाता या वेगळ्या रस्त्यानं जाऊ; म्हणजे तोही जरा नवा भाग बघण्यात येईल, असं मी सुचवलं. मग योगेशनं तिकडं गाडी वळवली. जुन्नर हा पर्यटन तालुका जाहीर झाल्यानं इकडं भरपूर निधी आला आहे. अर्थात निधी आला तरी कामं होतातच असं नाही. इथं मात्र अतिशय सुंदर रस्ता तयार केलेला दिसला. साधा दुपदरीच, पण अजिबात खड्डे नसलेला, नवा रस्ता! त्यावर प्रॉपर दुभाजक, दोन्ही बाजूंनी पांढरे पट्टे आखलेले... स्पीड ब्रेकर, फलक सगळं व्यवस्थित असं... या रस्त्यानं पुढं गेल्यावर एक छोटासा घाट लागला. तो तर फारच सुंदर होता. तिथून वर गेल्यावर एक खिंड लागली. तिला ‘गणेश खिंड’ असं नाव आहे, असं तिथल्या फलकावरून कळलं. पुढं जुन्नर अगदी दहा किलोमीटरच होतं. उजवीकडं शिवनेरी किल्ला दिसू लागला. मधली छोटी छोटी गावं चार वाजताच्या कोवळ्या उन्हानं लखलखून दिसत होती. समोर पांढऱ्या अभ्रांचे पुंजके असलेलं निळं-स्वच्छ आकाश आणि खाली हिरवाईचं कोंदण ल्यायलेली धरणी... आपण इंग्लंडच्या कंट्रीसाइडचं खूप कौतुक करतो; पण आम्ही आत्ता बघत असलेला हा भाग त्यापेक्षा कुठंही कमी नव्हता. जुन्नर गावात प्रवेश करताना उजवीकडं ‘नाणेघाट ४३ किमी’ अशी पाटी दिसली. (पुढच्या ट्रिपची खूणगाठ बांधून झाली...) समोर एक भव्य प्रवेशद्वार लागलं. त्याला शहाजीराजांचं नाव होतं. मागे शिवनेरी दुर्ग दिमाखात उभा होता. जुन्नर हे एक टुमदार गाव आहे. गावाच्या मधल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. तिथून डावीकडं वळून बसस्टँडवरून आम्ही गावाबाहेर पडलो. आता नारायणगावकडं निघालो. रस्त्यात ओझर, लेण्याद्री, खोडद खुणावत होते. मात्र, आता उशीर झाला होता. मग आम्ही नारायणगावला येऊन बायपासला चहाला थांबलो.
इथं साधारण पाच वाजले होते. आता पुण्याची वाट खुणावत होती. हा नाशिक-पुणे हायवे असल्यानं इथून पुढं चाकणपर्यंत भन्नाट प्रवास झाला. पुण्यात यायला मात्र साडेसात वाजले. मग पुण्यातच जेवून सहलीची सांगता करायला हवी होती. तशी ती यथासांग, साग्रसंगीत झाली. एका दिवसाची ही नीटनेटकी ट्रिप आता आम्हाला पुढं पुष्कळ दिवस प्राणवायू पुरवत राहील, यात शंका नाही. पुढची सहल कुठं काढू या, अशी चर्चा लगेच सुरू झालीय, हेच मोठं फलित! इति!!


--------

(काही महत्त्वाच्या नोंदी -
- पुणे ते माळशेज घाट अंतर - १३० किलोमीटर
- स्वत:चं वाहन घेऊन जाणे उत्तम
- शक्यतो आठवड्याच्या अधल्या-मधल्या दिवशी जावे. वीकएंडना प्रचंड गर्दी असते. विशेषत: मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईमुळे गेल्या काही वर्षांत माळशेज बदनाम झाले आहे. तरी ‘फॅमिलीवाल्या’ मंडळींनी वीकएंड टाळावाच.
- एमटीडीसीच्या रिसॉर्टवर जेवणाची चांगली सोय
- थोडा वेळ काढून गेल्यास किंवा मुक्काम केल्यास याच ट्रिपमध्ये शिवनेरी, ओझर, लेण्याद्री किंवा खोडद ही ठिकाणेही पाहता येतील.
- पुण्यातून लवकर निघून, सकाळी नऊच्या आत चाकणच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. चाकणच्या पुढे भामा नदी ओलांडली, की दोन्ही बाजूंना नाश्त्यासाठी बरीच हॉटेल आहेत.)

------

9 Aug 2024

तीन गाणी, तीन आठवणी...

१. सो गया ये जहाँ...
-----------------------

आत्ता खूप दिवसांनी ‘तेजाब’मधलं ‘सो गया ये जहाँ...’ गाणं ऐकलं आणि मन भूतकाळात गेलं. हा सिनेमा आला १९८८ मध्ये. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. पौगंडावस्थेतलं वय आणि आयुष्यात पहिल्यांदा झालेलं स्थलांतर. मी माझं गाव सोडून शहरात राहायला आलो होतो. तिथल्याच थिएटरच्या अंधारात हा सिनेमा बघितला होता. तेव्हा अर्थात माधुरीच्या ‘एक दो तीन...’चं गारूड होतं. ‘सो गया ये जहाँ...’ गाण्यातला दर्द समजायला चाळिशी यावी लागली. नंतरही मी खूप वेळा हा सिनेमा पाहिलाय असं नाही. मात्र, त्यातले काही काही प्रसंग अगदी लख्ख लक्षात आहेत. महेश देशमुखचा ‘मुन्ना’ कसा झाला, याचा हा विदारक प्रवास आहे. त्या प्रवासाला ऐंशीच्या दशकातील सामाजिक, राजकीय स्थितीची पार्श्वभूमी आहे. भले सिनेमात ती नकळत आली असेल... अर्थात आता इथं तो विषय नाही.
...तर हे गाणं... लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं सगीत, शब्बीर अहमद या फारशा माहिती नसलेल्या गीतकाराचं गीत आणि नितीन मुकेश, अलका याज्ञिक व शब्बीरकुमार यांचे प्रमुख स्वर. सोबतीला कोरस. या कोरसच्या हमिंगनं गाण्याची सुरुवात होते. मुंबईतला रिकामा रस्ता, नुकताच पडून गेलेला पाऊस, त्या पावसाचं रस्त्यावर साठलेलं पाणी आणि सोडियम व्हेपरच्या प्रकाशात चमकणारे ओलसर रस्ते... मुन्नाचे मित्र मुन्ना आणि मोहिनीला घेऊन परत निघाले आहेत. गाणं चित्रित झालंय चंकी पांडे, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरवर. मित्रांमध्ये विजय पाटकर वगैरे दिसतात. ते सगळे त्या स्टेशन वॅगनसारख्या गाडीच्या छतावर आडवे पडलेले आहेत. समोरची काच फुटलेली ती गाडी चंकी चालवतो आहे आणि गातो आहे - सो गया ये जहाँ, सो गया आसमाँ, सो गयी है सारी मंज़िले, हो सारी मंज़िले, सो गया है रस्ता...
नितीन मुकेशचा प्रमुख स्वर या गाण्यात एक विलक्षण आर्त भाव घेऊन येतो. हा स्वर एकाच वेळी वेदनेचा आहे, वेदनेवर फुंकर घालणाराही आहे, आपल्या बेफिकिरीवर खूश होणारा आहे आणि त्याच वेळी आपल्या अनिकेत अवस्थेची अपरिहार्यता सांगणाराही आहे. नितीन मुकेश यांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांत निश्चितच या गाण्याचा समावेश व्हावा. सिनेमातील मुख्य पात्रांच्या जगण्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सगळं जग, नियती विरोधात आहे. केवळ मित्रांचा भरोसा आहे. त्यांच्याच साथीत ही वाटचाल सुरू आहे. नायक-नायिका एका विलक्षण वळणावर ताटातूट होऊन अगदी वेगळ्या रूपात पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. त्यांना एकमेकांच्या संगतीत घालवलेले प्रेमाचे दिवस आठवताहेत. दोघेही त्या गाडीत मागच्या बाजूला अवघडून बसले आहेत. नायिका जखमी झाली आहे, तर नायक सिगारेटी फुंकून आपला उद्वेग शमवतो आहे. दोघांच्याही भावना गाण्यातून पार्श्वभूमीवर व्यक्त होतात. ‘क्यूं प्यार का मौसम बीत गया, क्यू हम से जमाना जीत गया’...’ ही नायिकेची व्यथा आहे, तर ‘हर घडी मेरा दिल ग़म के घेरे में है, जि़ंदगी दूर तब अंधेरे में है...’ असं नायकाला वाटतंय. मध्येच नायिकेला डुलकी लागते आणि ती बसल्या जागी पडू लागते तर नायक चटकन तिच्या शेजारी सरकून तिला आधार देतो. तीही झोपेत अगदी निश्चिंतपणे त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपते. नंतर हे मित्र कॅम्प फायरवर नाचतात. तिथं नायिकेच्या चेहऱ्यावर जरा वेळ हसू उमलतं, पण तेवढंच...
पुन्हा या गाडीचा अंधाऱ्या रस्त्यांतून प्रवास सुरू होतो. आपल्याही आयुष्यात आपण असे क्षण अनुभवलेले असतात. सगळीकडे अंधार दिसत असतो. कित्येकदा अशाच मोकळ्या रस्त्यांवरून आपणही हिंडलेले असतो. मग पडद्यावरची पात्रं आणि आपण अगदी एकजीव होऊन जातो...
चंकी पांडे या कलाकाराविषयी फार काही चांगलं बोललेलं ऐकू येत नाही. पण या देखण्या अभिनेत्यानं या एका गाण्यात कमाल केली आहे. त्यासाठी त्याला बाकीचे सगळे माकडचाळे माफ आहेत. या गाण्याचा दर्द पुरेसा समजून घेऊन, चंकीनं हे गाणं पडद्यावर अक्षरश: ‘ड्राइव्ह’ केलं आहे. माधुरी तर या गाण्यात कमाल सुंदर दिसली आहे. अनिल कपूरच्या ‘अँग्री यंग’ मुन्नाच्या तर सगळेच प्रेमात होते. ‘तेजाब’ सुपरडुपर हिट होता. अनेकांनी केवळ माधुरीसाठी या सिनेमाची अक्षरश: पारायणं केली. मात्र, हे गाणं, त्यातलं ते पावसाळी ओलं वातावरण आणि मानवी भावभावनांच्या अनोख्या परी दाखवणारं गीत व संगीत मंत्रमुग्ध करतं. विशेषत: वयाची एक मॅच्युरिटी गाठल्यावर या गाण्याला दर्द अधिकाधिक काळीज चिरत जातो. बाबा आझमीच्या कॅमेऱ्याची आणि त्या कॅमेऱ्यामागच्या एन. चंद्राच्या दिग्दर्शकीय दृष्टीचीही ती कमाल आहे. तेजाब ११ नोव्हेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झाला. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याला ३६ वर्षं, म्हणजे तब्बल तीन तपं होतील. मात्र, आज चाळिशीत-पन्नाशीत असलेल्या सगळ्यांसाठी हे गाणं आजही तितकंच ताजं, टवटवीत आणि हृदयातली एक दुखरी कळ जागवणारं राहील यात शंका नाही.

(१५ जुलै २०२४)

----

हे गाणं बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------


२. सूरमयी शाम इस तरह आये...
----------------------------------------

आज सुरेश वाडकरांचा वाढदिवस. मला त्यांचा आवाज आवडतो. काही काही गाण्यांत तर त्यांच्याऐवजी इतर आवाजाची कल्पनाच आपण करू शकत नाही, एवढी ती गाणी वाडकरांनी अजरामर करून ठेवली आहेत.  मराठीत ‘दयाघना’ तसंच हिंदीत ‘सूरमयी शाम इस तरह आये...’ ही त्यांची दोन्ही गाणी मला अतिशय आवडतात. दोन्ही गाणी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली आहेत. संगीतकारच मुळात अत्यंत आवडते असल्याने असेल, पण वाडकरांची दोन गाणी विशेष आवडतात. जयदेव यांचं ‘सीने में जलन...’ किंवा इलायराजा यांचं ‘ऐ ज़िंदगी गले लगा ले...’ किंवा रवी दातेंचं ‘आताच अमृताची बरसुन रात गेली...’ यांवरही वाडकरांचा निर्विवाद स्टॅम्प आहेच. पण आज सांगायचं आहे ते ‘सूरमयी शाम...’विषयी...
‘लेकिन’ या चित्रपटातलं हे गाणं. विनोद खन्ना आणि डिम्पलवर चित्रित झालेलं. हे गाणं मी ‘लेकिन’ चित्रपट रीलीज झाल्यापासून, म्हणजे साधारण १९९१ पासून (म्हणजे माझ्या वयाच्या १६ व्या वर्षापासून) ऐकत आलो आहे. मी हे गाणं कितीही वेळा ऐकू शकतो. सुरुवातीला वॉकमनवर ‘लेकिन’च्या कॅसेटची पारायणंच्या पारायणं झाली असल्यामुळं हे गाणं अगदी त्यातल्या प्रत्येक पॉझसकट, वाद्यमेळांसकट कानात इतकं बसलंय की ते प्रत्यक्ष ऐकलं नाही तरी सतत ऐकू येत राहतं. गुलज़ार यांचे खास शब्द, खास मंगेशकर टच असलेलं बाळासाहेबांचं संगीत आणि वाडकरांचा मखमली स्वर यांची अशी काही जादू आपल्यावर होते की बस्स! हिंदीत ज्याला ‘सुकून मिलना’ म्हणतात, तशी काहीशी तृप्तीची भावना हे गाणं ऐकल्यावर मनात येते.
मला कायम वाटतं, गावाकडची ग्रीष्मातली संध्याकाळ असावी.... उकाडा संपून, संध्याकाळची थंड हवेची झुळूक यायला सुरुवात झालेली असावी, आपण घरासमोरच्या सारवलेल्या स्वच्छ अंगणात आरामखुर्ची टाकून, जीव ओवाळून टाकावा असं काही तरी भन्नाट पुस्तक वाचत बसलेलं असावं आणि त्या आपल्या अशा कुणा खास व्यक्तीच्या येण्याची वाट बघताना हे गाणं कानावर यावं... वाट पाहण्यात एक ओढ आहे, वेगळा अनिवार आनंद आहे आणि त्याच वेळी एक हुरहुरही आहे. ‘कोई आहट नहीं बदन की कही फिर भी लगता है तू यहीं है कहीं...’ ही ओळ काय किंवा ‘दिन का जो भी पहर गुजरता है, कोई एहसान सा उतरता है’ ही खास गुलज़ार टच असलेली ओळ काय... प्रत्येक शब्द न् शब्द ऐकताना आपल्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहतात. हे असं वाट पाहणं सुसह्य होतं ते अशा सुरेल गाण्यानं... हे ‘एहसान’ काही आपण आयुष्यभर विसरू शकत नाही...

व्वा वाडकर... जियो... 

(७ ऑगस्ट २०२४)

----

हे गाणे बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------

३. गंजल्या ओठास माझ्या...
---------------------------------

काही काही गाणी आपल्याला अत्यंत आवडतात, काही आपल्या भावविश्वाचा भाग होऊन जातात, तर काही आपल्या आयुष्यावरच विलक्षण परिणाम करून जातात. 'गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे' हे असंच माझ्या आयुष्यावर कायमचा परिणाम करून गेलेलं गाणं... जितक्या वेळा मी हे गाणं ऐकतो, तितक्यांदा माझे डोळे ओले झाले आहेत. वरकरणी दगडी कवचात जगणाऱ्या आपल्या मनातला पाषाण फोडून, आतला निर्झर वाहता करण्याची ताकद या गाण्यात आहे.
सुरेश भट, बाळासाहेब, रवींद्र साठे ऊर्फ बुवा, जब्बार आणि स्मिता हे सगळे अत्यंत दुष्ट लोक आहेत, असं माझं मत आहे. 'उंबरठा' या चित्रपटातल्या या गाण्याचं चित्रिकरण म्हटलं, तर अगदी साधं... स्मिता एका टांग्यातून तिच्या अनाथाश्रामाकडं निघाली आहे. हा सगळा देशावरचा उजाड, भकास भाग आहे. त्यातल्या धुळीच्या रस्त्यानं तो टांगा निघाला आहे. रस्ता निर्जन आहे... मधेच एक रेल्वे जाते. त्या रेल्वेलायनीच्या शेजारच्या धुळकट रस्त्यानं हा टांगा निघाला आहे. तिथं चरत असलेलं एक डुक्करही आपल्याला दिसतं. पुढंही साधारणत: अशाच भागातून हा टांगा मार्गक्रमणा करीत राहतो. कॅमेरा लाँग शॉटमध्ये एकदा हा सारा आसमंत दाखवतो, तर एकदा क्लोजमध्ये स्मिताचा करारी, निर्धारी चेहरा दाखवतो. ज्या गाण्याच्या चित्रिकरणात गाणं केवळ पार्श्वभूमीवर वाजतं, त्या ठिकाणी त्या शब्दांवर अभिनय करणं ही किती जिकिरीची गोष्ट आहे! पण स्मिताला सारं सहजसाध्य आहे. तिचा उत्कट चेहरा पाहत राहावा... त्या चित्रपटातल्या सुलभा महाजनचा सगळा संघर्ष आणि तिची जिद्द त्यात उतरली आहे...
यातला भूप्रदेश माझ्या जन्मगावाच्या भौगोलिक परिस्थितीशी मिळताजुळता आहे. म्हणून मला तो आपलासा वाटतो. आपणही इथूनच आलो आहोत आणि असाच संघर्ष करीत आलो आहोत, हे सारखं जाणवत राहतं....
भटांनी लिहिलं आहे -

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यास माझ्या सूर्य सत्याचा जळू दे!

पांगळा बंधिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे!

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे!

लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे!

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे!

बाळासाहेबांनी यातली पहिली चार कडवी गाण्यात घेतली आहेत. शेवटचं कडवं गाण्यात नाही. पण भटांचे हे शब्द, हृदयनाथांची चाल आणि बुवांचा आवाज हे त्रिकुट असं काही जमून आलं आहे की बस्स...
यातल्या शेवटच्या म्हणजे 'लाभू दे लाचार छाया... ' या कडव्याला माझ्या डोळ्यांत हमखास पाणी येतं. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, पण काहीएक नीतिमत्ता मानणाऱ्या लोकांच्या आयुष्याचं हे राष्ट्रगीतच म्हणायला हवं. माझ्या आयुष्यात अगदी तरुणपणी माझ्या वाट्याला नैराश्य, संघर्ष आला होता. तो तसा कुणालाच चुकत नाही. मात्र, त्याही काळात माझं मन शांत राहिलं ते हे गाणं आणि त्यातल्या या ओळी ऐकून...
आजही हे गाणं ऐकताना माझाच तो कटू भूतकाळ सर्रकन डोळ्यांसमोरून जातो आणि त्या आठवणींनी मन आणि डोळे दोन्ही चिंब होतात...
थोर गाणी अशीच घडतात, तयार होतात... कारण ती आपल्या मनात कायमची वस्तीला येतात...

(६ जुलै २०१८)

---

हे गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

आणखी ‘दोन गाणी, दोन आठवणी’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

--------

30 Jul 2024

कोथरूडवरील लेख

कोथरूड... पुण्याचं नाक!
--------------------------------

(नोंद - साधारण दहा वर्षांपूर्वी पुणे ‘मटा’त एक ‘कोथरूड प्लस’ नावाची पुरवणी सुरू झाली होती. त्या पुरवणीसाठी लिहिलेला हा लेख... २०१५ मध्ये लिहिलेला हा लेख अजून मी ब्लॉगवर कसा काय टाकला नाही, याचं आश्चर्य वाटलं. आता हा लेख शेअर करतोय....)

----


मध्य पुणे किंवा पेठांचा भाग हे पुण्याचं हृदय मानलं तर कोथरूड हे पुण्याचं नाक आहे, असं निश्चित म्हणता येईल. किंबहुना पुण्याची पंचेद्रियं म्हणजे कोथरूड असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. नाक हे जास्त ठळक, कारण पुण्याचा सगळा तोरा हे नाक आपल्या अंगावर मिरवतं. 'ऑल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल' असं जॉर्ज ऑरवेलनं म्हटलंय, त्याच धर्तीवर 'आम्ही कोथरूडकर, जरा अधिक पुणेकर' असं कोथरूडकर अगदी अभिमानानं म्हणत असतात. हे म्हणत असताना त्यांच्या लालबुंद नाकाच्या शेंड्यावरचा तो अभिमान अगदी लखलखीतपणे दिसत असतो. 'आशियातलं सर्वांत वेगानं वाढलेलं उपनगर' अशी एके काळी विक्रमी नोंद करणारं हे उपनगर आता जवळपास मुख्य शहराचाच भाग झालंय. नळस्टॉपपासून साधारण कोथरूडची हवा सुरू होते. पौड फाट्यापासून डाव्या अंगानं कर्वेनगर, वारज्यापर्यंत जाणारा कर्वे रोड आणि उजव्या हाताला चांदणी चौकापर्यंत जाणारा पौड रोड या बेचक्यात कोथरूड नावाचं हे खास शहर वसलं आहे. हे दोन्ही रस्ते अत्यंत गजबजलेले. याउलट काही अत्यंत शांत, मस्त झाडीत लपलेल्या शांत, उच्चभ्रू सोसायट्या... असं हे सुंदर कोथरूड पाहताक्षणीच प्रेमात पडण्यासारखं. डहाणूकर कॉलनी, आयडियल कॉलनी, हॅपी कॉलनी किंवा पौड रोडच्या कडेच्या अनेक सोसायट्या अत्यंत आखीवरेखीव आणि नियोजनबद्ध आहेत. खेळाची मैदानं, छोटी उद्यानं, ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे असं सारं काही इथं आहे. काही काही भागांत तर चक्क परदेशात असल्याचाही भास होतो म्हणे. तसंही कोथरूडमध्ये साधारण घरटी एक माणूस अमेरिका किंवा युरोप किंवा ऑस्ट्रेलियात आहेच म्हणा. एके काळी कोथरूडच्या पोस्टातून सर्वाधिक 'एअर मेल' जात असत. आताही ते प्रमाण कायम असलं, तरी स्काइप वगैरे आल्यापासून थेटच संवाद सुरू झाला आहे.

मध्य पुण्यातच एके काळी राहत असलेले पुणेकर कोथरूडमध्ये एक तर बंगले बांधून किंवा मोठी घरं हवीत म्हणून शिफ्ट झाले. त्यामुळं पुणेकर नावाचं जे रसायन आहे, ते मूळच्या झऱ्यासह इथंही खळाळून वाहतंच आहे. एकविसाव्या शतकात आयटी क्रांतीनंतर पुणं चहूअंगानं विस्तारलं तसं कोथरूडही वाढत गेलं. पार वारज्याच्या पुढं बायपासपर्यंत जाऊन भिडलं. ऐंशीच्या दशकात बांधलेल्या तीन तीन मजली सोसायट्या आता ३०-३५ वर्षांनी 'रिडेव्हलपमेंट'ला आल्यासुद्धा. कोथरूड पुन्हा कात टाकू पाहतंय. कोथरूडमध्ये सिटीप्राइड मल्टिप्लेक्स सुरू झालं त्यालाही आता नऊ वर्षं झाली. हे मल्टिप्लेक्स आणि त्याच्याशेजारीच असलेला 'बिग बझार'सारखा मॉल यामुळं हा भाग एकदम हॅपनिंग स्ट्रीट होऊन गेला. कर्वे शिक्षण संस्था, एसएनडीटी किंवा एमआयटी यासारख्या मोठ्या शिक्षण संस्थांनी कोथरूड हे आपलं माहेरघर केल्यानं इथं तरुणाईची कायमच गजबज असते. बालगंधर्व आणि टिळक स्मारक लांब पडत असल्यानं कोथरूडकरांच्या आग्रहास्तव महापालिकेनं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासारखं सुसज्ज नाट्यगृह इथं बांधलं. तेव्हापासून नाट्यप्रेमी कोथरूडकरांची तीही गरज पूर्ण झाली. आता तिथंच आणखी एक मिनी थिएटर होऊ घातलंय. (हे अजूनही पूर्ण झालेलं नाही, ते सोडा...) कोथरूड स्टँड ते वनदेवी मंदिरापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी मोठमोठ्या ब्रँडेड दुकानांनी गजबजलेला असतो. आता हौशी कोथरूडकर मंडईत किंवा लक्ष्मी रोडला सहज जातातही; पण बऱ्याचशा गरजा कोथरूडमध्येच पूर्ण होतात, यात शंका नाही. उपनगर साहित्य संमेलन भरणारं हे कदाचित देशातलं एकमेव उपनगर असावं. इथं कायमच वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम सुरू असतात. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाव्यतिरिक्त डहाणूकर कॉलनीतला कमिन्स हॉल, हॅपी कॉलनीचा हॉल, धन्वंतरी सभागृह, शैलेश सभागृह, महालक्ष्मी लॉन्स, मोरे विद्यालयातील सभागृह, पुण्याई सभागृह, मनोहर मंगल कार्यालय (इथं आता ‘व्हरांडा’ हॉटेल झालं आहे...) इथं काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं सतत सुरूच असतात आणि कोथरूडकर हौसेनं इथं भेटी देत असतात.
खाऊ गल्लीतही कोथरूड अर्थातच मागं नाही. खवय्या कोथरूडकरांना हवं ते खिलवण्यासाठी इथं कॉन्टिनेंटलपासून ते स्ट्रीट फूडपर्यंत सगळं काही उपलब्ध आहे. एमआयटी कॉलेजचा परिसर, करिष्मा सोसायटीजवळची चौपाटी किंवा डहाणूकर कॉलनीजवळचा परिसर इथं मोठ्या संख्येनं फूड जॉइंट्स आहेत आणि ती कायम खवय्यांनी हाउसफुल्ल असतात. शनिवारी तर अनेक ठिकाणी वेटिंग असतं. कोथरूडमध्ये मंगल कार्यालयंही मोठ्या संख्येनं आहेत. डी. पी. रस्त्यावरची लॉन्सही अनेकदा या लग्नसमारंभांसाठी फुल्ल असतात. मध्यमवर्गीयांपासून ते नवश्रीमंतांपर्यंतचा पैसे खुळखुळत असलेला वर्ग इथं मोठ्या संख्येनं राहत असल्यानं अनेक सेवासुविधा इथं घरपोच पोचवल्या जातात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही तयार होतो. सुसंस्कृत आणि नागरी हक्कांबाबत अत्यंत जागरूक वर्ग इथला रहिवासी असल्यानं इथल्या नगरसेवकांनाही कायम अलर्ट राहावं लागतं. सेवा बजावून घेणारे इथले नागरिक प्रॉपर्टी टॅक्स भरायलाही रांगा लावतात हेही आवर्जून सांगायला हवं.
याचा अर्थ कोथरूडमध्ये सगळंच काही आलबेल आहे, असं नाही. इथं अजूनही काही सुविधांची वानवा आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या उपनगरासाठी खरं तर स्वतंत्र एसटी बसस्थानकाची गरज आहे. कोथरूडवरून मुंबईला किंवा कोल्हापूरकडं जाणाऱ्या लोकांसाठी बायपासलगत कुठे तरी मोठं बसस्टँड होण्याची गरज आहे. कोथरूडमध्ये पंचतारांकित हॉटेल नाही. खरं तर ही व्यावसायिक गरज आहे. पण अद्याप तरी कुणी असं पंचतारांकित हॉटेल कोथरूडमध्ये उभारलेलं नाही, हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे उद्यानासारखं मोठं उद्यान कोथरूडमध्ये नाही. अर्थात आता ते होणंही शक्य नाही, कारण एवढी जागाच इथं उपलब्ध नाही. पण किमान जितेंद्र अभिषेकी उद्यानासारखं चांगलं उद्यान आता तरी चालू व्हावं, ही इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे. (हेही उद्यान अद्याप सुरू झालेलं नाही...) आणि हो, आश्चर्य वाटेल, पण कोथरूडसारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या उपनगरात पुस्तकांचं एकही मोठं दालन नाही. मराठी व इंग्रजी पुस्तकं मिळतील असं पुस्तकांचं तीन-चार मजली दालन कोथरूडमध्ये व्हायला हवं. तसं ते झालं तर ते जोरात चालेल, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.  (आता पुस्तकपेठ, भावार्थ आणि इतरही काही पुस्तकांची दुकानं सुरू झाली आहेत...) अर्थात या सुविधा मिळाल्या, तर कोथरूडचा मूळचा वाढीव भाव आणखीनच वधारेल आणि पुण्याचं हे नाक आणखी टेचात सगळीकडे मिरवेल, यात शंका नाही.


(ता. क. सन २०१६ मध्ये भूमिपूजन झालेली वनाझ ते रामवाडी मेट्रो २०२२ मध्ये सुरू झाली आणि आता कोथरूडकरांच्या चांगली अंगवळणी पडलीय...)

----

17 Jul 2024

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख
---------------------------------------

विशेष नोंद - 

‘मटा’मध्ये दोन वर्षांपूर्वी संपादकीय पानावर ‘जाता जाता’ हे सदर ‘चकोर’ या टोपणनावाने प्रसिद्ध होत असे. वेगवेगळे संपादकीय सहकारी ते लिहीत असत. मीही अनेकदा ते लिहिले आहे. खाली दिलेला पहिला भाग मी आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्यानंतर काही मैत्रिणींनी गमतीत अशी तक्रार केली, की ही तर एकच (म्हणजे पुरुषांची) बाजू आहे. आम्ही लिहू का आमची बाजू? त्यावर मीही गमतीनं म्हटलं, की तुम्ही कशाला? मीच लिहितो. मग मी त्या ग्रुपपुरता एक मजकूर लिहिला आणि तिकडं शेअर केला. त्यात सदराचं नाव ‘येता येता’ असं ठेवलं आणि लिहिणारीचं नाव ‘चकोरी’ झालं. त्यालाही चांगला प्रतिसाद म्हणाला. स्त्रीच्या भूमिकेतून आपण तसा विचार करू शकतो का, याची ही एक चाचणी होती. हा परकाया प्रवेश अवघड असला, तरी अशक्य नव्हता. आता दोन वर्षांनंतर मला वाटलं, की ही गंमत अधिक जास्त वाचकांपर्यंत पोचावी, म्हणून दोन्ही लेख इथं ब्लॉगवर प्रकाशित करतोय. आधी मूळ सदरातील लेख, नंतर त्याला ग्रुपपुरतं दिलेलं उत्तर... एंजॉय...

-------------


जाता जाता
--------------

एक आदिम साहसी खेळ
-----------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच आम्ही वाट बघत होतो. एक दीर्घानुभवी पती असल्यानं आम्ही स्वत: ही मागणी करणं शक्यच नव्हतं, हे चाणाक्ष (अन् अनुभवी) वाचकांच्या लक्षात आलंच असेल. अखेर व्हॉट्सअप मेसेजेस स्क्रोल करता करता ‘तो’ मेसेज दिसला अन् गुदगुल्या झाल्या. ‘लग्नालाही साहसी खेळ’ म्हणून मान्यता द्या, अशी अतिसाहसी मागणी त्या कथित विनोदी संदेशात होती. आम्हाला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. या खेळाची वैशिष्ट्यं अगणित आहेत. जगातील बहुसंख्य लोक आयुष्यात किमान एकदा तरी हा खेळ खेळतात. या खेळात जोडीदार बदलण्याची संधी (सहसा) नसते. निवडण्याची जरूर असते; मात्र एकदा निवडला, की त्या जोडीदारासोबतच पुढं आयुष्यभर हा खेळ खेळावा लागतो. बहुतेकांना खूप लहानपणापासून या खेळासाठी तयार केलं जातं. घरी पालकांचा ओरडा आणि शाळेत शिक्षकांचा दणका यांतून आपण या खेळासाठी टणक होत जातो. आपल्या अंगी अधिक सोशिकता यावी, यासाठी परीक्षादी उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या खेळात भाग घेण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता करणं अगदी गरजेचं असतं. दर महिना काही विशिष्ट रकमेच्या दमड्या कमावणं आणि किमान चार खोल्यांचा फ्लॅट असणं, या त्या बेसिक अटी होत. या अटी पूर्ण होईपर्यंतच खेळाडूंचं निम्मं अवसान गळालेलं असतं. मात्र, अशा खेळाडूचे पालक जोशात असतात. ते कोंबड्यांची झुंज लावावी, त्याप्रमाणे आपल्या अपत्याला या साहसी खेळात भाग घ्यायला उतरवतातच. एक मन नको म्हणत असतं; मात्र काही ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ना बळी पडून खेळाडू अखेर या खेळाच्या मैदानात उतरतोच. खेळाडू एकदा तयार झाला, की लाखो रुपये खर्च करून मोठा सोहळा आयोजित केला जातो. देवा-ब्राह्मणांच्या आणि (किरकोळ आहेराच्या बदल्यात) फुकटचं जेवण झोडायला आलेल्या गावभरच्या पाहुण्यांच्या साक्षीनं खेळाडू आपल्या जोडीदाराबरोबर गळ्यात हार घालून घेतो. खेळाच्या सुरुवातीलाच त्याच्या वाट्याला ‘हार’ नावाचा हा प्रकार येतो, तो पुढं आयुष्यभर कायम राहणार असतो. बहुतेक (पुरुष) खेळाडू त्या वेळी बावळट असल्यानं, त्यांना याची काहीही कल्पना नसते. लाखो रुपये खर्च करूनही ते वेड्यासारखे हसत फोटो काढून घेत असतात. (पुढं आयुष्यभर या प्रसंगाचे हृदयद्रावक फोटो बघून त्यांना रडायचंच असतं.) अनेक पुरुष खेळाडूंचा हा बावळटपणा पुढं अनेक वर्षं टिकतो. काही गडी मात्र स्मार्ट असतात. ते पहिल्यापासून आपण बावळट किंवा येडछाप असल्याचं सोंग घेतात आणि ते आयुष्यभर निभावतात. हे सोंग एकदा जमलं, तर या साहसी खेळात त्यांना पुढं बऱ्यापैकी गंमत येऊ लागते. तसे या खेळाचे नियम अगदी सोपे असतात. आपल्या पत्नी नामक जोडीदारासमोर कायम नतमस्तक होऊन राहणं आणि तिनं काहीही विचारलं, की वरपासून खालपर्यंत मुंडी हलवणं ही एक शारीरिक क्रिया करणं, एवढं केलं की खेळ जमतोच. आयुष्यभर माणसाला ‘होय होय’ करायला लावणारा एवढा सकारात्मक खेळ दुसरा नसेल. अशा या खेळाप्रति आणि खेळाडूंप्रति समाजानं कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोर

(मटा, २३-८-२०२२)

---

येता येता...

---------------

साहसे ‘श्री.’ प्रतिवसति...
---
-------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच मी वाट बघत होते. एक दीर्घानुभवी बायको असल्यानं आपणच ही मागणी करावी, असं कालपास्नं सारखं वाटत होतं. पण मेल्या भिशी ग्रुपच्या वस्साप गप्पांतून सवड ती कशी होईना! अखेर आमच्या शाळेच्या ग्रुपवर ‘तो’ मेसेज पडलाच. खुदुखुदू हसू लागले. ‘लग्नालाही साहसी खेळ म्हणून मान्यता द्या,’ अशी मागणी त्या कथित विनोदी संदेशात करण्यात आली होती. मला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं काही म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. माझंच बघा. चांगली डिग्री होईपर्यंत सुखात होते. आई-बाबांच्या लाडाकोडात वाढत होते. ते घरी आणि कॉलेजमधले गोंडाघोळू मित्र बाहेर काही कमी पडू देत नव्हते. कॉलेजात तर ‘चकोरी कॉलेजक्वीन’ असं कुणी कुणी नालायक लिहूनही ठेवायचं भिंतीवर... तेव्हा ‘किशन कन्हैया’तलं ‘चंदा पे चकोरी क्यूं हो हो हो होती है कुरबान’ हे गाणं फेमस होतं. त्या दंताळ्या गण्यानं मला फिशपॉंड टाकला होता त्यावरून! नंतर चप्पल दाखवलीन् त्याला... असे सुखाचे दिवस चालले होते. पण आई-बाबांना हे सुख बघवेना. माझा मंगळ कडक असावा बहुतेक. पोरीनं लव्ह मॅरेज करावं, म्हणून आईनं सगळे देव पाण्यात घातले होते. पण त्यात मदनदेव नसावा. शिवाय तिला दासबोधाचं वेड! मग कसलं होतंय आमचं लव्हमॅरेज? झालं. ते ‘चहा-पोहे’ नावाचं महाबंडल प्रकरण आयुष्यात आलं. काय एकेक नग आले होते देवा... दर वेळी आमच्याकडच्या रोहिणीमावशीनं केलेले पोहे मी त्या पोरट्यासमोर नेऊन आदळायची आणि ते येडं ‘छान चव आहे तुमच्या हाताला’ म्हणत कोमट हसायचं. मी इकडं इतकी फुटायचे! सावरून घेता घेता आईची पुरेवाट व्हायची. अखेर आईचा त्रागा बघवेना आणि बाबांच्या सिग्रेटी वाढत चालल्या तसा मी एक ‘चि. श्याम’ पसंत करून टाकला. धुमधडाक्यात लग्न लागलं. हे पहिलं साहस! हनीमूनला प्रथेप्रमाणे गोव्याला गेलो. आमचा चि. श्याम खरोखर ‘चि. श्याम’ होता, हे मला पहिल्याच रात्री कळलं. तेव्हापासून आमच्या संसाराच्या ड्रायव्हिंग व्हीलवर मीच बसल्ये आहे. हे दुसरं साहस! आज १२ वर्षं झाली. श्यामरावांना हनीमूनमधली गंमत लवकरच कळली आणि आमच्या संसारवेलीवर ‘बकुळ’ फुलली. मला मुलगीच हवी होती. आमच्या ‘ललिता पवारां’ना आम्हाला अजून पोरगं व्हायला हवं होतं म्हणे. आता याला दु:साहस म्हणायचं नाही तर काय! मी बरी खमकी होते आणि ‘ललिताबाईं’ना लवकरच बाप्पानं तिकडं बोलावून घेतलं आणि आम्ही सुटलो. तेव्हापासून किराणा यादीपासून लाइट बिलापर्यंत आणि इस्त्रीच्या कपड्यांपासून ते बकुळच्या डब्यापर्यंत मीच सगळा गाडा ओढत्ये आहे. श्यामराव भिडस्त असले तरी कधी मूडमध्ये आले, की घरातल्या घरात मला ऑर्डरी सोडतात. एका कामाला हात म्हणून लावत नाहीत. त्यांच्या गादीला मी राजगादी म्हणते. श्यामरावांना त्यातही एक कोमट आनंद होतो. बाकी त्यांना एकूण ‘हे’ कमीच. एवढी दमले, तरी बाबा कधी अर्धा कप चहा विचारणार नाही. मलाही अपेक्षा नाहीच म्हणा! एकूण आमचा संसार हॉट नसला, तरी ‘कोमट’ तरी आहे. बाकी मैत्रिणींच्या संसाराचे काय धिंडवडे निघालेत ते आमच्या ‘टवाळ टवळ्या’ ग्रुपवर कळतंच. मी आपलं ध्यान पदरी पडलं पवित्र झालं म्हणत्ये आणि बकुळच्या (आगामी) संसाराची चित्रं रंगवत बसते. बकुळनं तरी प्रेमविवाह करावा अशी माझी इच्छा आहे. मी सगळ्या इच्छा मारत मारत जगले, तसं तिचं होऊ नये. थोडक्यात, बाईमाणसाची आयुष्यभर सत्त्वपरीक्षा पाहणारा हा साहसी खेळ नाही, असं कोण म्हणेल? या साहसातच आमचे ‘श्री’ वस्ती करून राहताहेत ना! ‘साहसे श्री प्रतिवसति’ ही संस्कृत म्हण तिथूनच आली असली पाहिजे. ते काही का असेना, मला वाटतं, की या खेळाप्रति आणि माझ्यासारख्या सोशिक खेळाडूंप्रति समाजाने कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोरी

---