12 May 2013

माधुरी, स्वागत आहे!





'प्रिय माधुरी, तुझं स्वागत आहे,' असं म्हणतानाही जीभ अडखळतेय... कारण स्वागत हे दुसरीकडून कुठून तरी आलेल्याचं करतात. मुळात तू कुठं गेली नव्हतीसच... तू इथंच होतीस - आमच्या हृदयात! कारण एकोणीस वर्षांपूर्वी तेजाबमध्ये एक दो तीन... करीत तू आमच्यावर जी मोहिनी घातलीयस, ती अद्याप उतरायला तयार नाही.
तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत श्रीदेवीचं राज्य होतं. नव्हे; ती अनभिषिक्त सम्राज्ञीच होती! दाक्षिणात्य नायिका आणि उत्तरेतले पंजाबी नायक यांचंच हिंदी चित्रपटसृष्टीवर कायम वर्चस्व राहिलेलं आहे. तुझ्यापूर्वी दुर्गा खोटेंपासून स्मिता पाटीलपर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत ठसा उमटवला होता, नाही असं नाही. पण एकछत्री अंमल कुणी गाजवला नव्हता. राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'अबोध'मधून तू १९८४ मध्ये प्रथम रूपेरी पडद्यावर पदार्पण केलंस, तेव्हा तुझ्याबाबतही असा विचार कुणी केला नव्हता. पुढं 'आवारा बाप', 'हिफाजत', 'स्वाती', 'उत्तर दक्षिण' वगैरे चित्रपटांतून तू फुटकळ भूमिका केल्यास, पण तेव्हाही तुझं अस्तित्व दखल घेण्याजोगं नव्हतंच. पण एन. चंद्रांच्या तेजाबनं जादू केली आणि पुढचा सगळा इतिहास आहे.
माधुरी, तुझं खळाळतं हास्य, अप्रतिम नृत्यनिपुणता, तुझं अभिनयकौशल्य सगळं सगळंच मोहवणारं होतं. पुढं आमीरबरोबर तू 'दिल' शेअर केलंस आणि आम्ही मनोमन आमचं 'दिल' तुला देऊन बसलो. (त्यामुळंच त्या काळात एक्स्ट्रीम क्लोजअपमध्ये दिसणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावरच्या मुरुमांच्या पुटकुळ्या आम्हाला दिसल्या नाहीत!) मधल्या काळात तू 'प्रेमप्रतिज्ञा', 'राम-लखन', 'परिंदा', 'त्रिदेव', 'वर्दी', 'इलाका', 'मुजरीम' अशा चित्रपटांतून दिसत राहिलीस. पण 'प्रेमप्रतिज्ञा' किंवा 'परिंदा'चा अपवाद वगळता अन्य चित्रपटांतून तू तशी शोभेची बाहुलीच होतीस. नंतर १९९२ मध्ये तू 'बेटा' अनिल कपूरबरोबर 'धक धक करने लगा' करीत पुन्हा पडदा गाजवलास. तुझ्या त्या अदेनं घायाळ झाला नाही, असा तुझा एकही चाहता नसेल. त्यापूर्वीच १९९१ मध्ये आलेल्या नानाच्या 'प्रहार'मध्ये तू विनामेकअप काम करून रसिकांची दाद मिळवली होतीस. त्याच वर्षी आलेल्या सुपरहिट 'साजन'नं तुझी सम्राज्ञीपदाकडं वाटचाल सुरू झाली होतीच. 'धक धक'नं त्यावर शिक्कामोर्तब झालं. पुढं 'संगीत', 'प्रेमदिवाने', 'खेल', 'खलनायक', 'जिंदगी एक जुआ' वगैरे चित्रपटांतून तुझा निर्वेध प्रवास सुरू झाला.


मग आला १९९४ चा 'हम आप के है कौन!' या चित्रपटातील निशानं तुला भारतातल्या घराघरांत स्थान मिळवून दिलं. तुझी चुलबुली, खोडकर, हसरी आणि (तरीही) मादक निशा सर्वांनाच आवडून गेली. अर्थात तुझ्या अभिनयक्षमतेचा खरा कस लागेल, अशा फारशा भूमिका तुला मिळत नव्हत्या, हेही खरंच. पण १९९७ मध्ये आलेल्या प्रकाश झा यांच्या 'मृत्युदंड'नं तीही उणीव भरून काढली. त्याच वर्षी आलेल्या 'दिल तो पागल है'नं तुला करिअरच्या सर्वोच्च शिखरावर नेलं.
आता तुझ्या सम्राज्ञीपदाला जवळपास एक दशक होत आलं होतं. मकबूल फिदा हुसेन यांनी तुझ्यावर 'फिदा' होऊन 'गजगामिनी'ची निर्मिती केली होती. अर्थात त्यापूर्वीच १७ ऑक्टोबर १९९९ ला तू हळूच अमेरिकेतल्या डॉ. श्रीराम नेनेंशी विवाह करून तुझ्या तमाम रसिकांकडं 'पाठ' फिरविली होतीस...
...मग तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर 'देवदास'मधून तुझी 'चंद्रमुखी' आली आणि आम्ही पुन्हा सुखावलो. पण नंतर पाच वर्षं गेली आणि सर्व नायिकांचं करिअर विशिष्ट वयानंतर आणि लग्नानंतर संपुष्टात येतं, तसंच तुझ्याबाबत झालं, असं समजून आम्ही तुझ्या जुन्या आठवणींत रमलो.



आणि आता अचानक पाच वर्षांनी तू परत येतेयस... 'आजा नच ले' म्हणत आम्हाला बोलावतेयस... ग्रेट! माधुरी, तू खरंच थोर आहेस. आज वयाच्या एक्केचाळिसाव्या वर्षी 'नच ले'च्या 'प्रोमो'मध्ये तू काय दिसलीयस! विशेषतः जीन्स आणि टॉपमध्ये... टॉपच! स्वागत आहे... ये, माधुरी! आम्हीही तुझ्याबरोबर आणि तुझ्यासाठी नाचण्यास आतुर आहोत...

(पूर्वप्रसिद्धी - ३० नोव्हेंबर २००७, सकाळ)
---

3 comments: