8 May 2013

संकल्प - एक 'सोडणे'...नेमेचि येते थर्टी फर्स्ट
पार्टीमध्ये होतो बर्स्ट
सेलिब्रेशनची बसता किक
झक्कास जाई पहिला वीक
संकल्पांचा असतो सदाचाच फेरा
तीन दिवसांतच वाजतात तीन-तेरा...

...वाहव्वा... वाहव्वा... थर्टी फर्स्टच्या रात्री काय करायचं याचं प्लॅनिंग करण्यासाठी 'बसलेलो' असताना आमच्या कविराज मित्रांना हे काव्य स्फुरलं आणि फेसाळणारे 'चषक बिलोरी' हिंदकाळत, आंदोळत दाद देते जाहले...
नववर्ष आणि कुठले ना कुठले संकल्प या संकल्पनेचा आणि त्यावरून उडणाऱ्या चेष्टेचाही आता एवढा क्लिशे झाला आहे, की यंदा हा विषय कुठंही काढायचा नाही, असंच आम्ही मित्रांनी मनोमन ठरवलं होतं. मात्र, 'बसण्यात बसणं थर्टी फर्स्टचं...' असं म्हणत बसण्याला पुन्हा 'थर्टी फर्स्ट'चीच निवड झाली आणि पाठोपाठ कविमित्राच्या काव्यकळा सुरू झाल्या. त्या सहन करण्याला पर्याय नसतो. ऑफिसमधला डिसेंबरमधला शेवटचा आठवडा आणि या कविमित्राच्या कविता यात मी तरी पहिलाच पर्याय निवडला असता. तिथं निदान त्यागाचा वगैरे महान देखावा तरी करून दाखवता येतो. त्याउलट यमकं जुळवीत केलेल्या या मित्राच्या कविता म्हणजे कहर असतो. कवितेला पाहून पळालो, हे आमच्याबाबतीत वेगवेगळ्या वेळा त्रिवार सत्यच ठरलं आहे. असो. हे थोडं विषयांतर झालं. आता 'बसलेल्या' माणसाच्या विचारांचं आंदोलन हे असंच असतं. 'आला आला...' करेपर्यंत एखादा बरा विचार क्षणात दुसऱ्या टोकाला जाणाऱ्या पंचमीच्या हिंदोळ्यासारखा दूर निघून जातो आणि 'डोळे माझे ओले' होतात! तेव्हा संकल्पाविषयीचे हे हलते-झुलते आणि मधून मधून फुलते विचार आपण चकण्याप्रमाणे टेस्टी मानून घ्याल, अशी अनंत आशा आहे.
नववर्ष आणि संकल्प यांचं नातं हे साधारण ख्रिस्तपूर्व काळापासून असावं. का बरं या दिवशी माणूस भलते-सलते संकल्प सोडत असेल? काही जबरदस्त कॉमन संकल्प आहेत. सिगारेट सोडणे, दारू सोडणे, डायरी लिहिणे, नियमित व्यायाम करणे, जिम जॉइन करणे, लग्न करणे, अजिबात लग्न न करणे, ब्रेकअप घेणे, नवी पोरगी/पोरगा पटविणे, ट्रेकिंगला जाणे, परदेशी सहलीला जाणे, नोकरी मिळविणे आणि नोकरी सोडणे हे तेरा संकल्प सर्वाधिक कॉमन असावेत. या संकल्पांवर सहज नजर टाकली, तरी यातला कुठलाच संकल्प जीवघेणा नाही किंवा जीवनावश्यकही नाही. तरीही माणसं वर्षानुवर्षं हे संकल्प करीत असतात. याचं एकमेव कारण म्हणजे त्याला आयुष्यात काही तरी चेंज हवा असतो. मर्ढेकरांच्या शब्दांत आपण सारे 'सर्वेपि रुटीनः जन्तु' असल्यामुळं आणि चाकोरीच्या त्याच त्या चक्रातून जाताना सवयींचे पक्के गुलाम झाल्यानं आपलं आयुष्य म्हणजे मनमोहनसिंगांच्या चेहऱ्याएवढंच करुण होऊन जातं. मनमोहनसिंग तेरा वर्षांनी एकदा हसतात म्हणे. (ते १९९१ ला पहिल्यांदा हसले. मग २००४ ला पंतप्रधान झाल्यावर पुन्हा एकदा हसले. आता २०१७ मध्येच हसतील. का ते ओळखा पाहू...) तर आपल्या आयुष्यात तेरा वर्षांनी, आणि तोही असा बदल व्हायचा म्हणजे फारच झालं. तेव्हा संकल्पांच्या निमित्ताने तरी काही बदल होतो का हे पाहावं, असा विचार चतुर मंडळी करीत असल्यास नवल नाही. संकल्पांच्या निमित्तानं पहिले आठ-नऊ दिवस खूपच एक्साइटमेंटमध्ये जातात. उगाचच आपण मोदी वगैरे असल्यासारखं वाटतं. गेले वर्षभर ढोणीसारखं वागणारं आपलं नशीब अचानक कुकसारखं शिट्ट्या मारायला लागतं. (म्हणजे असं आपल्याला फक्त वाटतं.) दोन दिवस व्यायाम केला, तरी बाहू चुलबुल पांडेसारखे फुरफुरू लागतात. आता अगदी शर्ट वगैरे निघून येत नाही. (त्यासाठी आपल्या 'रज्जो'ला तो अंगातून ओढूनच काढावा लागेल. आणि म्हणूनच तो सहसा निघत नाही...!) सिगारेट सोडली, तर आपली तब्येत फुकाची सुधारल्यासारखी वाटते. दारू सोडली, तर गरगराट कमी होतो. पोरगी पटविली, तरी अजून दुष्परिणाम ठाऊक नसल्यानं मन मोरपंखी वगैरे होतं... नोकरी लागली, तर अजून दुष्परिणाम ठाऊक नसल्यानं मन पार्टी वगैरे देतं... असं सगळं गोड गोड सुरू असतं. पण हे जास्तीत जास्त भोगी-संक्रांतीपर्यंत... नंतर रथसप्तमीपर्यंत उत्साहाला उतरती कळा लागते आणि फेब्रुवारीतल्या पहिल्या आठवड्यात आणि गेल्या वर्षाच्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आश्चर्यकारक साम्य आढळून येतं. म्हणजे संकल्पांचा बोऱ्या वाजलेला असतो आणि पुन्हा एकदा 'रुटीनः जन्तु' म्हणून चाकोरीतून फिरायला आपली सुरुवात झालेली असते.
त्यामुळे असले (उपरोक्त तेरांपैकी) हुडुत संकल्प करायचेच नाहीत, असा एकच एक दबंग संकल्प आमच्या मित्रांनी आणि त्यांच्यामुळं मी केला आहे. अर्थात आम्हास नावीन्याची सदा ओढ असल्यामुळं काही नवे संकल्प करावेत, असं मनात येऊन त्या दृष्टीनं प्रतिभासाधन सुरूही झालं आहे. उदा. यंदा फेसबुकवर कुण्णाकुण्णाला दुखवायचं नाही, सदैव छान छान, गोड गोड लिहायचं... प्रत्येक गोष्टीला 'लाइक' करायचं असं एक ठरवता येईल. ट्रॅफिकचे नियम पाळायचे असा एक जरासा अवघड; पण शक्य कोटीतला संकल्पही सोडता येईल. पुण्यात शक्यतो सिग्नलला उभं राहायचं आणि त्यातही आपल्याला उजवीकडं वळायचं असेल, तर उजव्याच बाजूला थांबायचं (डावीकडून पुढं येऊन सर्वांसमोर परेड करीत उजवीकडं जायचं नाही) हा महान संकल्प करता येईल. हॉटेलांत भरमसाठ पदार्थांची ऑर्डर देऊन ते पदार्थ तसेच टाकून द्यायचे नाहीत, बेसिनमध्ये नळ सोडून दाढी करायची नाही, होता होईल तो पाणी वाचवायचं, एकदा तरी चांगल्या कामासाठी वेळ आणि पैसा दोन्ही स्वतःहून खर्च करायचा, अरबट-चरबट न खाता सात्त्विक खाणं खायचं (हवं तर त्यासाठी ऑफिसात डबा न्यायचा) असे अनेक जीवनोन्नतीचे संकल्प आपल्याला सोडता येतील.
शेवटी एक... मराठीत संकल्प करण्याला 'संकल्प सोडणे' असं म्हणतात. हा शब्दप्रयोग तयार करणाऱ्यास सलाम... कारण त्यानं नावातच तो 'सोडायची' तजवीज करून ठेवली आहे. वाहव्वा! जय संकल्प!! जय मराठी भाषा!!! 

(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)
--

No comments:

Post a Comment