4 May 2013

आले अन् गेले!



बॉलीवुडला दर शुक्रवारी नवे नायक-नायिका मिळत असतात. इथं कुणाचं नशीब कधी फळफळेल आणि कोणाचं कधी ढासळेल हे काही सांगता येत नाही. बॉलिवुडला असलेलं अफाट ग्लॅमर बघता, आपणही हिरो व्हावं, हिरॉइन व्हावं असं स्वप्न आपल्या देशातल्या करोडो तरुण-तरुणींना रोज पडावं यात नवल नाही. मुंबई नावाच्या या मायानगरीत आपलं नशीब काढायला रोज शेकडो स्वप्नाळू तरुण-तरुणींचे जथे सीएसटीवर उतरत असतात. अनेक दिवस स्ट्रगल करून, स्टुडिओंचे उंबरे झिजवून, निर्माता-दिग्दर्शकाची दाढी खाजवून एक चान्स द्या असं सांगणारे शेकडो भावी हिरो-हिरॉइन या मॅक्झिमम सिटीत अक्षरशः घोंघावत असतात. सिनेमात काम करायला मिळावं, म्हणून या मुला-मुलींना काय तडजोडी कराव्या लागतात, याच्या सुरस कहाण्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. एवढं करूनही योग्य संधी मिळतेच असं नाही. त्यामुळं किमान एक फिल्म तरी मिळावी, ती रिलीज व्हावी यासाठी काहीही करायला ही मंडळी तयार असतात. काही जण अधिक भाग्यवान असतात. त्यांनी चित्रपटसृष्टीतल्या स्थापित दिग्गजांच्या पोटी जन्म घेतलेला असतो. त्यामुळं स्टारपुत्र किंवा स्टारपुत्री म्हणून त्यांचं धडाक्यात लाँचिंग होतं. पण अभिनयगुण नसतील, तर पहिल्या फिल्मपुरतंच त्यांचं हे पदार्पण गाजतं. शशी कपूरचा मुलगा करण कपूर, राजेंद्रकुमारचा मुलगा कुमार गौरव, जानी राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमार, अनुपम खेरचा मुलगा सिकंदर ही काही वानगीदाखल नावं.
वन फिल्म वंडर असलेल्या हिरोंची संख्या काही कमी नाही. भाग्यश्रीचा नवरा हिमालय याला तर केवळ तिच्यामुळंच दोन-तीन चित्रपटांत काम करायला मिळालं. भाग्यश्रीची तेव्हा एवढी क्रेझ होती, की लोकांनी तिची ही हिमालयाएवढी चूक सहन केली. अर्थात आडात नाही तर पोहऱयात कुठून येणार, या न्यायानं त्याची 'अभिनयक्षमता' लोकांना कळलीच आणि दोन-तीन चित्रपटांनंतर दोघांचीही सद्दी संपली. गुलशनकुमारचा भाऊ किशनकुमार याचंही नशीब जोरावर होतं. त्यानंही दोन-तीन चित्रपटांत हिरोगिरी केली. चांगल्या चांगल्या गाण्यांवर किशनकुमारचा चेहरा पडद्यावर गाताना पाहिला, की चांगल्या झाडावर माकडंच चढतात, या उक्तीची आठवण यायची. आणखी काही दिवस तो हिरो म्हणून दिसला असता, तर लोकांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करून त्याचं काम थांबवलं असतं, याची खात्री आहे.

आणखीही काही उदाहरणं आहेत. तो आफताब शिवदासानी हल्ली काय करतो? हा एके काळी बऱयापैकी पोटँशिअल असलेला चेहरा वाटला होता. पण आता पूर्णपणे गायब झालाय. मल्लिका शेरावतचा 'ख्वाहिश' हा पहिला चित्रपट त्यातल्या सतराशेसाठ चुंबनदृश्यांसाठी गाजला होता. पण मल्लिकाच्या ओठांना ओठ भिडवणारा हिमांशू मलिक नावाचा वळू कोणाला आठवतोय? पण पुन्हा तेच. चांगलं झाड आणि माकड... मध्यंतरी रामू वर्माला वेडाचे झटके येत होते, तेव्हा त्यानं 'जेम्स' नावाचा एक शेण चित्रपट काढला होता. त्यातला मोहित अहलावत नावाचा सांड आता कुठं नाहीसा झाला, कुणास ठाऊक! लोखंडवाला कॉम्प्लेक्समधल्या कुठल्या तरी जिममध्ये नोकरी करीत असेल कदाचित... आशिष चौधरी, सिद्धार्थ, सुशांत, सुदेश बेरी ही मंडळी हिरो होती, हे कुणाला आज सांगून तरी पटेल? आणि ही अगदी जाता जाता आठवलेली नावं आहेत. असे आणखी किती तरी जण तुम्हाला आठवतील... किंवा कदाचित नाहीदेखील आठवणार... कारण आवर्जून आठवावं असं कर्तृत्व त्यांनी दाखवलं असतं, तर ते असे नामशेष झालेच नसते.
गेल्या आठ-दहा वर्षांत बॉलिवुडचं कार्पोरेटायझेशन झाल्यापासून कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात चित्रपटनिर्मिती वाढविली. त्यात मल्टिप्लेक्स कल्चरमुळं स्मॉल बजेट चित्रपटांचं प्रस्थही वाढलं. अशा चित्रपटांतून अनेक नवे चेहरे दर शुक्रवारी भेटायला येऊ लागले. एक मात्र आहे... विनय पाठक, इरफान, रजत कपूर अशा एरवी जबरदस्त क्षमतेच्या, पण पारंपरिक हिरो पठडीत न बसणाऱ्या चेहऱ्यांनाही याच चित्रपटांमुळं हिरो बनता आलं...!
बॉलिवुड म्हणजे पैशांचा खेळ. तेव्हा ज्याच्याकडं नशीब नाही, अभिनयक्षमता नाही, पण पैसे आहेत, तो इथं एका फिल्मपुरता का होईना, हिरो बनू शकतो. मात्र, लोकांच्या मनात स्थान मिळण्यासाठी इतर काही गुणांची आवश्यकता असते, हे या मंडळींना कधी कळणार
?

(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)

No comments:

Post a Comment