4 May 2013

काय? बॅट-बॉल? इश्श...!




वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर... खरं तर सुरू होण्यापूर्वीच बायकोनं, 'तुम्ही आता रोज मॅच पाहा; मीही पाहते...' असं सांगून धक्काच दिला. इतकंच नव्हे, तर कामाच्या व्यापात गळ्यापर्यंत बुडून गेलेल्या पतिराजासाठी तिनं वर्ल्ड कपचं छानसं वेळापत्रक तयार करून टेबलावर लावलं. भारताच्या मॅचेस असतील, त्या दिवशी पूर्ण रजा काढून घरी निवांत मॅच कशी पाहता येईल, याविषयी प्रेमाची सल्लामसलत झाली. आता धक्के वाढू लागले होते. खास वर्ल्ड कपचे सामने पाहता यावेत, यासाठी तिनं चक्क स्वतःच्या बँक बॅलन्सला धक्का लावून एलसीडी आणायची टूम काढली आणि ती प्रत्यक्षातही आणली. प्रत्यक्ष मॅचच्या वेळी तर तिनं शुचिर्भूत वगैरे होऊन टीव्हीची पूजा केली. सेहवाग जेव्हा बांगलादेशी गोलंदाजीचा खिमा खात होता, तेव्हा अस्मादिकांचं अर्धांगही मुदपाकखान्यातून एक से एक 'लजीज व्यंजन' (हा टीव्हीवरचे खादडीचे हिंदी कार्यक्रम बघितल्याचा परिणाम) आणून आमची रसना तृप्त करीत होतं. इथं आता आपल्याला हृदयविकाराचा धक्का तर बसणार नाही ना, अशी काळजी मला वाटू लागली. त्यानंतर तर कमालच झाली. ती चक्क शेजारी येऊन मॅच बघू लागली. तीही बांगलादेशची बॅटिंग सुरू असताना! वास्तविक शत्रूपक्षाची बॅटिंग सुरू असताना अस्सल क्रिकेटप्रेमीही जरा इकडंतिकडं टंगळमंगळ करतो. थोडंफार सर्फिंग करतो. मात्र, त्या दिवशी हिनं बांगलादेशची बॅटिंग केवळ पाहिली नाही, तर शकीब, कायेस वगैरे मंडळींनी कसं फ्रंटवर खेळलं पाहिजे, फूटवर्क कसं चुकतंय... आदी केवळ क्रिकेट किड्यालाच शोभतील अशा भाषेत चक्क रनिंग काॅमेंट्री सुरू केली. इथं मात्र माझ्यातलं त्राण गेलं आणि डोळ्यांतून चक्क आनंदाश्रू वाहू लागले...
त्या आनंदात डोळे पुसत असतानाच, 'चला, उठा...' ही चिरपरिचित आज्ञा, नेहमीच्या टिपेच्या स्वरात कानी आली आणि काय झालं ते लक्षात आलं... त्या गोड स्वप्नातून जागं झाल्यावर एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे, की एक अशी नॉर्मल वगैरे, चारचौघींसारखी आपली बायको आहे आणि तिला क्रिकेट अतोनात आवडतं, ही काही फारशी शक्य कॅटॅगरीतली गोष्ट वाटत नाही! मुळात हे काही जमणारं रसायनच नव्हे. जसं एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसं! नवऱ्याचा जीव ज्या (मोजक्या काही) गोष्टींसाठी वेडापिसा होतो, ती गोष्ट बायका मनातल्या मनात सवतीच्या जागी कल्पून त्यांच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकत असाव्यात. शिवाय काही काही कॉम्बिनेशनची आपण कल्पनाच करू शकत नाही. उदा. राखी सावंत किंवा अजित पवार किंवा पाँटिंग आणि नम्रता (म्हणजे गुण या अर्थी)... किंवा दलेर मेहंदी 'मोगरा फुलला...' म्हणतोय... किंवा भाकरी अन् बासुंदीची डिश... किंवा बिनगॉगलचे करुणानिधी... किंवा पूर्ण साडीतली मल्लिका... तर सांगायचा मुद्दा असा, की (क्रिकेटपटू नसताना) क्रिकेट आवडणारी बायको मिळणं म्हणजे अहोभाग्यच. (किंवा 'अहों'चं भाग्य म्हणा हवं तर!) आता लगेच या मताचे विरोधक (म्हणजे बायकाच) क्रिकेट आवडणाऱ्या पोरींची यादी समोर भिरकावतील. पण पोरींना क्रिकेटपटू आवडतात, क्रिकेट नव्हे! त्यांचे चॉईस ठरलेले असतात. मग इरफान असो किंवा झहीर... युवराज असो की कोहली... तो क्रिकेटपटू बॅटिंग करीत असेल, तोपर्यंत त्याच्या या चाहत्या मॅच पाहतील. किंबहुना युवराज कथक करीत असताना (जे तो हल्ली पीचवरही करतो बऱ्याच वेळा) दिसला, तरी त्यांना फारसा फरक पडत नाही. त्यांच्या इंटरेस्टचा विषय ठरलेला असतो. तेव्हा तो मुद्दा बाद. केवळ येता-जाता 'अय्या, सचिन गेला?.. आता हरणार मग आपण!' एवढं वाक्य भिरकावून आपल्याला काव आणणारी ही जमात क्रिकेटवेडी कशी असणार, हा प्रश्नच आहे. मॅचची स्थिती काय, समोर प्रतिस्पर्धी कोण आहेत, कश्शा-कश्शाचा विचार नाही. मागं एकदा एका सिन्सिअर दिसणाऱया तरुणीनं का कोण जाणे, पण डकवर्थ-लुईस हा ऑस्ट्रेलियात पडणाऱ्या पावसाचा प्रकार असल्याचं सांगून उपस्थितांस फेफरं आणलं होतं. (या न्यायानं इरापल्ली प्रसन्ना हे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचं आणि कपुगेदरा हे श्रीलंकन नारळाच्या जातीचं नाव असं सांगायला हरकत नाही. - 'कापू दे जरा' म्हटलं तरी चालेल!) पण हे काही वर्षांपूर्वीचं चित्र होतं. आता अर्थात मंदिरा बेदीमुळं क्रिकेट विथ महिला या कॉम्बिनेशनला चांगले दिवस आले आहेत. (लंकन मुलींना 'क्रिकेट विथ माहेला' जास्त आवडेल.) त्यामुळं मुलीही खूप उत्साहात आता क्रिकेट पाहतात. त्यांना खेळातलं तर मुलांपेक्षाही जास्त कळतं. फक्त त्यांचं रूपांतर 'बायको'त झालं, की हे क्रिकेटप्रेम कुठं आटतं, कुणास ठाऊक! कदाचित आपण क्रिकेटला हाड-हूड करायला सुरुवात केली, की मग त्यांना क्रिकेटप्रेमाचं भरतं येईल...
(आपल्याला क्रिकेट कळतं, असा दावा असणाऱया समस्त माता-भगिनींची आगाऊच माफी चाहतो...)

- घरचा वीरू 

---
(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)

---

1 comment:

  1. ' सायबा लेख एकदम झक्कास . ' बायको ' जमातीला अंमळ जास्तीच चिमटे काढले असशील असं वाटत असेल तर थोडी काळजी घ्यायला हवी … वर्ल्ड कप तर आताशा सुरु होतोय . ' सवती मत्सरापायी तुझ्याच , नव्हे तर तमाम 'नवरे ' जमातीच्या ' क्रिकेट प्रेमाचा बळी जाऊ नये आणि ' टीव्ही ' सुरु केल्याक्षणी ताबडतोब आपली विकेट पडू नये म्हणजे मिळविली

    ReplyDelete