6 May 2013

बीस साल बाद...



एखाद्या देशाच्या आयुष्यात वीस वर्षांचा कालखंड म्हणजे तसा फार नव्हे. पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मात्र ही वीस वर्षं फार मोठा काळ मानला जातो. वीस वर्षांत माणूस खूप मोठा पल्ला गाठू शकतो. यशाची शिखरं चढू शकतो, अपयशाच्या गर्तेत अडकू शकतो किंवा सर्वस्वी वेगळा माणूस म्हणूनही समोर येऊ शकतो. भारतात सध्या तिशी-चाळिशीत असलेल्या पिढीनं मात्र एकाच वेळी देशाच्या आणि स्वतःच्या जगण्यात गेल्या वीस वर्षांत एक स्थित्यंतर बघितलं. १९९१ या वर्षात भारतानं आर्थिक उदारीकरणाच्या पदचिन्हांवरून चालायला सुरुवात केली आणि पाहता पाहता पुढील वीस वर्षांत देशात अबोल अशी क्रांती झाली. या खाउजा (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) क्रांतीनंतर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात फार मोठा बदल घडून आला. विशेषतः मध्यमवर्गाच्या जगण्यात या वीस वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. बुद्धीच्या जोरावर आपण पैसा मिळवू शकतो, हे या वर्गाच्या ध्यानात आलं. यापूर्वीही पैसा मिळविण्यासाठी या वर्गाला ज्ञानमार्गाचाच आश्रय घ्यावा लागत होता, पण तुलनेत मिळणारा मोबदला हा अगदीच अव्यावसायिक होता. पैसा निर्माण करणारी सारी क्षेत्रं सरकारच्या ताब्यात होती. सुरुवातीला देशाची घडी बसण्यासाठी तेव्हाच्या राजकीय नेतृत्वानं घेतलेला हा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीत योग्य असेलही, मात्र पुढे-पुढे या व्यवस्थेला जडत्वाची बाधा झाली आणि भ्रष्टाचाराचा संसर्ग झाला. त्यातूनच परमिटराजचा उदय झाला. या व्यवस्थेला गांजलेल्या या वर्गाची अवस्था ठेविले अनंते तैसेचि राहावे अशीच होती. या देशात राहून कुणाचंही भलं होणार नाही, अशी त्यांची खात्रीच पटली होती. म्हणूनच मग युरोप, अमेरिकेकडे आधी शिक्षणाच्या व नंतर करिअरच्या कारणाने या वर्गाचा ओढा वाढू लागला. डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं आणि यूके किंवा स्टेट्सला सेट्ल व्हायचं, हा या वर्गाच्या सुखाचा मूलमंत्र ठरला.
याच कालखंडात भारतात अवतरलं जागतिकीकरण. त्यापूर्वी दोन वर्षं आधी बर्लिनची भिंत कोसळली होती. युरोपात नवी समीकरणं जुळत होती. सोव्हिएत युनियनची शकलं झाली होती आणि जगातली एकमेव महासत्ता उरलेल्या अमेरिकेनं कुवेतमधल्या तेलाच्या निमित्तानं इराकवर युद्ध लादलं होतं. खुद्द भारतात तर तेव्हा अत्यंत अस्थिर राजकीय वातावरण होतं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर विक्रमी बहुमतानं सत्तेत आलेल्या राजीव गांधींना त्यांच्या विरोधकांनी बोफोर्स तोफेच्या तोंडी देऊन, १९८९ च्या निवडणुकीत पराभवाची चव दाखवली होती. सत्तेत आल्या आल्या विश्वनाथ प्रताप सिंहांनी मंडल आयोगाचा वणवा देशभर पेटवला होता. त्यातच रामजन्मभूमीच्या वादाचं निमित्त करून उजव्या, हिंदुत्ववादी पक्षांनी देशभर उन्मादी वातावरण निर्माण केलं होतं. लालकृष्ण अडवाणी अश्वमेधाला निघाल्यासारखे रथयात्रेला निघाले होते. मात्र, बिहारमध्ये लालूंनी अडवाणींचा अश्वमेध रोखला आणि अडवाणींना अटक केली. त्याचं निमित्त करून भाजपनं व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर अवघ्या ५४ खासदारांच्या जोरावर चंद्रशेखर यांचं सरकार सत्तारूढ झालं. देशाची रिकामी झालेली तिजोरी पाहून या सरकारचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. केवळ सात दिवस पुरेल, एवढीच परकीय चलनाची गंगाजळी देशात शिल्लक होती. अखेर देशातलं सोनं 'बँक ऑफ इंग्लंड'कडं गहाण ठेवून परकीय चलन मिळवावं लागलं. त्यातच चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा राजीव गांधींनी काढून घेतला आणि दोनच वर्षांत पुन्हा मुदतपूर्व निवडणुकांना देशाला सामोरं जावं लागलं. अर्धी निवडणूक झाली असतानाच राजीव गांधींची हत्या झाली आणि देश पुन्हा अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडला. अशा वेळी पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासारख्या चाणक्यानं देशाची सूत्रं हाती घेतली. अर्थमंत्रिपदावर डॉ. मनमोहनसिंग यांना आणण्याचा निर्णय तेव्हा बऱ्याच जणांना आश्चर्यचकित करून गेला होता. मात्र, मनमोहनसिंगांनी रावांच्या नेतृत्वाखाली देशाची दारं जगाला उघडी करून दिली आणि आपल्याही आयुष्यात एक वेगळं पर्व सुरू झालं.
सर्वप्रथम खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आल्या. एरवी फक्त दूरदर्शन एके दूरदर्शन बघायची सवय असलेल्या भारतीय प्रेक्षकांना सीएनएनवरून आखाती युद्ध लाइव्ह बघायला मिळालं. 'झी'च्या रूपानं पहिली खासगी मनोरंजन वाहिनी प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाली. पाहता पाहता देशभर केबलचं जाळं विणलं जाऊ लागलं. राजीव गांधींच्या काळात सॅम पित्रोदा यांनी दूरसंचार क्षेत्रात क्रांती करून दाखवली होती. तेव्हा एसटीडी, आयएसडीचे पिवळे बूथ गावोगावी उभे राहिले आणि संपर्क करणं सोपं झालं. नातेवाइकांना फोन करण्यासाठी टेलिफोन बूथवर जावं लागे आणि मिनिटाला अमुक पैसे अशा हिशेबाने पैसे मोजावे लागत, हे आज पंधरा-सोळा वर्षांच्या मुलांना सांगितलं, तर त्यांना ती पाषाणयुगातील कथा वाटेल. पण १९९० च्या आसपास तीदेखील क्रांती म्हणवली जात होती. मात्र, भारतात १९९५ मध्ये मोबाइल अवतरला आणि तो खरा 'गेम चेंजर' ठरला. तत्पूर्वी १९९४ मध्ये सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय अनुक्रमे 'मिस युनिव्हर्स' आणि 'मिस वर्ल्ड' ठरल्याने सौंदर्य प्रसाधनांच्या मल्टिनॅशनल कंपन्यांना भारत नावाची अलीबाबाची गुहाच गवसली. पुढच्या काही वर्षांतच भारत अशा सौंदर्य प्रसाधनांची जगातील प्रमुख बाजारपेठ बनला.


मोबाइलनं तर लँडलाइन, पेजर वगैरे मंडळींचा बाजारच उठविला. तरीही त्या काळातले मोबाइलचे २४ रुपये आउटगोइंग आणि १६ रुपये इनकमिंग हे दर आजही अनेकांना थक्क करतील. मात्र, लवकरच या कंपन्यांच्या स्पर्धेतून मोबाइलचा प्रसार प्रचंड प्रमाणात वाढला. आज किमान ८० कोटी मोबाइलधारक या देशात आहेत. आणि अर्थातच बाजारपेठेला विस्ताराला भरपूर वाव आहे. आज थ्री जीच्या जमान्यात आपण येऊन पोचलो आहोत. पुढं हे तंत्रज्ञान कुठं जाईल, हे खरंच सांगता येत नाही. तंत्रज्ञानामुळं पिढीतील बदलाचं अंतर केवळ तीन ते पाच वर्षं एवढं खाली आलं आहे.
दोन हजारच्या आसपास 'वाय टू के प्रॉब्लेम'मुळं भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांना एक काम मिळालं. मग डॉटकॉम कंपन्यांची लाटच आली. ती लवकरच विरली. पण लवकरच बंगळूर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली ही शहरं आयटी कंपन्यांच्या नकाशावर झळकू लागली. आयटी कंपन्यांच्या घोडदौडीमुळं अनेक गुणवान तरुणांना भारतातच करिअरच्या चांगल्या संधी मिळू लागल्या. महानगरं आणखी विस्तारली, तर पुण्यासारखी टु-टिअर शहरं महानगरांच्या दिशेनं वाटचाल करू लागली. जमिनींना भाव आले. बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस आले. सरकारने महामार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतू अशा पायाभूत सुविधांमध्ये पैसा ओतला. देशात प्रगतीचा असा दृश्यात्मक बदल जाणवू लागला. मध्यमवर्गाच्या हाती पैसा खुळखुळू लागला. पर्यटनाचं प्रमाण वाढलं. पाच दिवस काम आणि दोन दिवस वीकएंडला फुल्ल ऐश हा अमेरिकी फंडा इथेही दिसू लागला. शहरांमध्ये मोठमोठ्या मॉल्सची, मल्टिप्लेक्सची उभारणी होऊ लागली. मध्यमवर्गाला कारची क्रेझ पूर्वीपासूनच होती. आता ती गाडी त्याच्या आवाक्यात आली आणि लगेच त्याच्या पार्किंग लॉटमध्येही दाखल झाली. सोबत सेवा क्षेत्र प्रचंड प्रमाणात विस्तारलं. एवढं की, सरकारला आता उत्पादनशुल्कापाठोपाठ सेवाकरातून सर्वाधिक महसूल मिळू लागला. जगण्याचा स्तर उंचावला.
मात्र, हे होत असतानाच या जागतिकीकरणाचे दुष्परिणामही दिसू लागले. दिवसेंदिवस शेती ओस पडत चालली. खेड्यांची लय बिघडली. स्थलांतराचं प्रमाण वाढून शहरं आणखी बकाल झाली. पायाभूत सुविधांची दाणादाण उडाली. अतिस्पर्धेमुळं कामाचा ताण-तणाव वाढला, त्यातून व्यसनाधीनता वाढली. चंगळवादामुळं नैतिक मूल्यांशी प्रतारणा झाली. कुटुंब व्यवस्थेला आव्हान उभं राहिलं. मनःशांती ढळली. केवळ पैसा आणि पैसा यामागं धावल्यानं दोन घटका निवांत बसणंही माणसांना दुरापास्त झालं. नातेसंबंधांवर परिणाम झाला. सोशल नेटवर्किंग साइटचं फॅड बळावल्यानं व्हर्च्युअल जगात वावरण्याचं व्यसन अनेकांना जडलं. त्यातून वास्तवाचं भान सुटलं आणि पायाखालची जमीनही सरकली.
अशा दुभंग अवस्थेत आज आपण जगतो आहोत. मात्र, परिस्थिती एवढी निराशाजनक नक्कीच नाही. आपल्याला नक्की काय हवं आणि काय नको, याचं भान आपल्यावरील अंगभूत शहाणपणामुळं अनेकांना पुन्हा आलं आहे. अमेरिकेचं आर्थिक मॉडेल फॉलो करताना भारतीय संस्कार सोडून चालणार नाही, हेही आता अनेकांना पटू लागलं आहे. बचतीच्या सवयीमुळं भारत मंदीच्या फेऱ्यातून वाचला, हे जगातले नामवंत अर्थतज्ज्ञही मान्य करीत आहेत. तेव्हा पैसा आणि संस्कार यांचा योग्य मिलाफ घडवून आपण प्रगती करू शकलो, तर पुढची वीस काय, हजारो वर्षं भारतीयांचीच राहतील, यात वाद नाही.

(पूर्वप्रसिद्धी : चपराक दिवाळी अंक २०११)
-------

No comments:

Post a Comment