2 May 2013

साहित्य शिवार दिवाळी अंक - अमिताभ लेख

बच्चन...
----------


बच्चन या नावाशी माझा संबंध लहानपणीच आला. कुणी फार हिरोगिरी करायला लागला, की त्याला 'तू काय स्वतःला बच्चन समजतोस काय रे,' अशा शब्दांत बाकीचे हिणवायचे. तरीही 'बच्चन' हे प्रकरण काय आहे, हे तोपर्यंत नीटसं माहिती नव्हतं. जामखेडसारख्या निम्नशहरी, तालुक्याच्या गावी माझं बालपण गेलं. १९८०-८१ च्या सुमारास तेव्हा सर्वत्र व्हिडिओचं पेव फुटलं होतं. गावोगावी हे व्हिडिओ पार्लर धुमाकूळ घालत होते. आमच्या गावी तेव्हा दोन टुरिंग टॉकीज होत्या. त्यामुळं तिथं एकच शो रात्रीचा असायचा. व्हिडिओ पार्लरमुळे दिवसा केव्हाही टीव्हीवर पिक्चर दाखवायची सोय झाली. आमच्या गावातही तेव्हा एक असंच पार्लर बाजारतळावर सुरू झालं होतं. अगदी एका छोट्याशा खोलीत एक कलर टीव्ही आणि त्यावर एक व्हीसीआर ठेवलेला असायचा. या पार्लरचा मालक त्याला जशा व्हिडिओ कॅसेट उपलब्ध होतील, तसतसे सिनेमे दाखवायचा. एक दिवस तिथं झळकला शोले. खांद्यावरून शाल घेतलेल्या संजीवकुमारची ती उग्र, निग्रही नजर आणि त्याखाली अग्नीच्या ज्वाळांमध्ये लपेटलेलं 'शोले' हे नाव असं ते पोस्टर मला आजही आठवतं. एका मित्राच्या आग्रहावरून आम्ही (अर्थातच गुपचूप) शोले बघायला त्या पार्लरमध्ये दाखल झालो. एक रुपया दारावरच्या पोराच्या हातात टिकवला आणि मित्रासह मी त्या खोलीत बसलो. तिथं बहुतेक सगळी माझ्याच वयाची (म्हणजे वय सहा ते दहा) पोरं होती. थोड्यात वेळात अंधार झाला आणि समोरच्या टीव्हीवर मी 'शोले' पाहू लागलो. पुढचे तीन तास मी जवळपास 'हिप्नोटाइज्झ' अवस्थेत होतो. त्याच अवस्थेत घरी आलो. 'सत्तर एमएम'ची भव्यता टीव्हीच्या पडद्याला नसली, तरी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या शोलेच्या या पहिल्या 'शो'नं जवळपास तेवढाच परिणाम माझ्या बालमनावर साधला. त्यापूर्वीही मी सिनेमे पाहिले होते. पण हे काही तरी वेगळं होतं. ही बच्चनची जादू होती. त्या सिनेमात वास्तविक अमिताभला फार फुटेज नव्हतं. संजीवकुमार हाच खरा त्या सिनेमाचा नायक होता. मात्र, बच्चनच्या जागी आपण दुसऱ्या कुणालाही कल्पू शकत नाही, एवढा परिणाम त्या जयच्या भूमिकेनं साधला होता. पुढं हा सिनेमा अनेकदा पाहिला. मोठ्या पडद्यावर, सर्व तांत्रिक परिणामांसह पाहिला. मात्र, पहिल्या वेळचाच परिणाम अधिक लक्षात राहिला. पुढं त्याचे इतरही सिनेमे पाहिले आणि मग बच्चन नावाच्या करिष्म्याचा अन्वयार्थ हळूहळू उलगडू लागला.
बच्चनची लोकप्रियता आणि त्या वेळची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती यांची अनेकदा सांगड घातली जाते. त्यावर पुष्कळ अभ्यास झाला आहे. अनेकांनी पीएच. डी.ही केल्या आहेत. बच्चनच्या रूपात 'अँग्री यंग मॅन'चा उदय होणं, ही घटना अटळ होती. तेव्हाची सामाजिक स्थिती त्यासाठी अगदी पोषक होती. सत्तरचं दशक हे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात नवनिर्माणाचं दशक ओळखलं जातं. चीनचं युद्ध, त्यातला पराभव, नेहरू युगाचा अस्त, शास्त्रीजींचं नेतृत्व, 'जय जवान जय किसान'चं भारावलेलं वातावरण, पाकिस्तानला १९६५ च्या युद्धात दिलेला तडाखा, शास्त्रीजींचं अकाली निधन, इंदिरा गांधींचं नेतृत्व, संस्थानिकांचे तनखे रद्द करणं, बँकांचं राष्ट्रीयीकरण असे ऐतिहासिक निर्णय अशा विलक्षण घडामोडींनी हे दशक भरलेलं होतं. सामाजिक परिस्थितीही तशी खाऊन-पिऊन सुखाचीच म्हणता येईल. नेहरू युगाच्या प्रभावामुळं असेल; पण एक रोमँटिसिझम सगळ्या वातावरणात भरलेला होता. विशेषतः या काळातील देशातील महानगरांमधलं जीवन खूपच चार्मिंग आणि रसिलं असावं, असं त्या काळातल्या चित्रपटांकडं नजर टाकल्यास लक्षात येईल. हा काळ देव-राज-दिलीप त्रयीचा होता, तसाच 'बीटल्स'चा होता. नेहरूंएवढंच केनेडींचं आपल्या लोकांना आकर्षण होतं. लता, रफी, सचिनदा, मदनमोहन, सलीलदा, हेमंतदा यांच्या करिअरचा हा ऐन बहराचा काळ होता. अनेक उत्तमोत्तम गाणी, सिनेमे या काळात तयार झाले. कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. देशभरात मोठमोठ्या धरणांची उभारणी झाली. शास्त्रीय संशोधनाच्या संस्था उभ्या राहिल्या. परदेशांतून शिकून आलेले तरुण देशप्रेमाच्या भावनेनं या संस्थांतून देशाची सेवा करू लागले. पुन्हा सिनेमाचा संदर्भ घेतला, तर देवच्या 'हम दोनो'पासून राजेश खन्नाच्या 'आराधना'पर्यंत रसिले आणि रोमँटिक नायक हे त्या काळच्या आदर्श व सुखवस्तू भारतीय समाजाचं प्रतिबिंब होतं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात जे उत्साहानं फसफसलेलं वातावरण होतं, त्या 'हनीमून पिरियड'च्या शेवटाचा का होईना, पण हा काळ होता. बांगलादेश मुक्तीच्या घटनेनं यावर कळस चढविला. आपला देश त्या वेळी स्वाभिमानाच्या कोशंटवर कदाचित सर्वोच्च गुण मिळवणारा ठरला असता. पण एकदा या घटनेचा बहर ओसरला आणि १९७२ च्या भीषण दुष्काळानं देशाला जो तडाखा दिला, त्यातून या सगळ्या हनीमून पिरियडची, रोमँटिसिझमची राखरांगोळी झाली. अमिताभचा पहिला सिनेमा १९६९ चा असला, तरी 'अँग्री यंग मॅन' म्हणून त्याला प्रस्थापित करणारा 'जंजीर' १९७३ मध्ये आला, हा घटनाक्रम लक्षात घेण्यासारखा आहे. लोक अमिताभच्या संतप्त नायकाकडं का वळले असावेत, याचं सहज उत्तर त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत सापडेल. इंदिरायुग उतरणीला लागलं होतं. भ्रष्टाचार नावाचा नवा शिष्टाचार बाबू संस्कृतीत मूळ धरू लागला होता. परमिट राजच्या जमान्यात फिक्सर, दलाल मंडळींना महत्त्व आलं होतं. सामान्य माणसाचं जिणं कठीण होत चाललं होतं. महागाईचा भडका उडाला होता. रेशनवरच्या धान्याचा काळाबाजार सुरू झाला होता. अमेरिकेनं पाठविलेला कचरा मिलो गहू खाण्याची वेळ लोकांवर आली होती. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची फळी आंदोलनं करू लागली होती. गुजरातेत नवनिर्माण आंदोलनानं जोर धरला होता. जॉर्ज फर्नांडिस 'बंदसम्राट' झाले होते. त्यांच्या एका हाकेसरशी मुंबईतल्या गिरण्या ठप्प होत होत्या. रेल्वेचा चक्का जाम होत होता. अशा वातावरणात लोकांच्या संतापाला वाट करून दिली ती बच्चननं. 'जब तक बैठने को कहा न जाए, चूपचाप खडे रहो.... ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं...' असं म्हणून गुंड शेरखानला टशन देणारा अमिताभ या काळातल्या लोकांनी डोक्यावर घेतला नसता, तरच नवल. 
बच्चन आपल्या भूमिकांविषयी कायमच नम्रतेनं बोलतो. हे आपल्या हातून घडून गेलं, मी काही एवढा ग्रेट नट नाही, असं तो कायम सांगतो. मात्र, बच्चननं आपल्या भूमिकांची केलेली निवड पाहता, त्याचं हे बोलणं खरं नाही हे लगेचच लक्षात येतं. बच्चननं कायमच ग्रे शेडमधल्या भूमिका केल्या. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उठून उभ्या राहणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला त्यानं पडद्यावर रूप दिलं. मग तो 'दिवार'मधला 'आज और एक आदमी पैसे देने से इन्कार करेगा' म्हणणारा सर्वसामान्य मजूर असो, की 'त्रिशूल'मधला 'नाजायज बापा'ला ठणकावणारा मुलगा असो... बच्चन कायमच पब्लिकच्या बाजूनं राहिला. टिपिकल भारतीय संस्कारांना त्यानं धक्का लावला नाही. आई, बहीण, भाऊ ही नाती पडद्यावरचं त्याचं पात्र कायमच जपत आलं आहे. त्याचे बहुतांश संवाद लिहिणाऱ्या सलीम-जावेद या दुकलीचा भारतीय जनमानसाचा अंदाज अचूक होता. लोकांना काय पाहायला आवडेल आणि आपल्या हिरोनं काय बोललेलं आवडेल, याची नस त्यांनी नेमकी ओळखली होती. अमिताभचा खर्जातला आवाज आणि त्याची निसर्गदत्त भव्य उंची या भारतीय पुरुषांच्या क्वचितच वाट्याला येणाऱ्या गोष्टी. या गोष्टींचा नेमका वापर अमिताभच्या दिग्दर्शकांनी करून घेतला आणि त्याला पडद्यावर शब्दशः 'लार्जर दॅन लाइफ' अशी प्रतिमा मिळाली. 
अमिताभचं एक आणखी एक आगळंवेगळं वैशिष्ट्य परवा सहज ध्यानात आलं. त्याच्या सत्तराव्या वाढदिवशी यू-ट्यूबवर त्याची गाणी पाहत बसलो होतो. अगदी सहज, रँडमली आठवतील तशी. सुरुवात केली 'मुकद्दर का सिकंदर'मधल्या 'रोते हुए आते है सब...' या जबरदस्त गाण्यानं. (बच्चन या गाण्यात जसा 'हिरो' दिसलाय तसा फारच क्वचित अन्यत्र दिसलाय.) नंतर 'मि. नटवरलाल'मधलं 'मेरे पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो,' हे त्याच्याच आवाजातलं गाणं ऐकलं. मग 'शोले'तलं 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे', मग 'खुद्दार'मधलं 'मच गया शोर सारी नगरी रे', मग 'कभी कभी'मधलं टायटल साँग, मग 'शराबी'तलं 'जहाँ चार यार...' मग 'अमर अकबर अँथनी'तलं 'माय नेम इज अँथनी गोन्सालविस', मग 'सत्ते पे सत्ता'मधलं 'प्यार हमें किस मोड पे ले आया...' मग 'सिलसिला'तलं 'रंग बरसे...' मग 'लावारिस'मधलं 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है...' मग लावलं 'नमक हलाल'मधलं 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी...' आणि शेवटी 'याराना'तलं एव्हरग्रीन 'छू कर मेरे मन को...'
सहज लक्षात आलं, की यातली फक्त दोन गाणी (कभी कभी व याराना) अशी आहेत, की त्यात फक्त बच्चन व नायिका असे दोघेच आहेत. म्हणजे हिंदी सिनेमातल्या हिरोचं गाणं म्हटलं, की कायम हिरो-हिरॉइन आणि त्यांची बागेतील किंवा स्वित्झर्लंडमधल्या डोंगरांवरची पळापळच आठवते. पण बच्चनची अन्य दहा गाणी पाहा. एकात तो मुलांना गोष्ट सांगतोय, एकात जीवलग मित्रासोबत स्कूटरवर आहे, एकात दहीहंडीत नाचतोय, एकात दारू पिऊन मध्यरात्री मित्रांसोबत रस्त्यावर गातोय, एक टिपिकल कॉमेडी पार्टी साँग आहे, एकात सात भावांसोबत गातोय, एकात होळीत रंग उधळतोय, एकात वेगवेगळी सोंगं काढून मिमिक्री करतोय, तर एकात पार्टीत सगळ्यांची खेचतोय... आणि ही सर्व गाणी अगदी सहज सुचतील, तशी लावली होती. मुद्दाम अजिबात नाही. तरीही त्याच्या गाण्यांमध्ये चकित करणारं एवढं वैविध्य आढळलं. थोडक्यात हा नायक तुमच्या-आमच्यासारखा वागतो, बोलतो, नाचतो, गमती करतो आणि सगळ्यांना हसवतो. त्यामुळंच बच्चनच्या यशात त्याच्या या भूमिकांच्या निवडीचं कसब वाखाखण्यासारखं आहे. 
बच्चननं आयुष्यात यश पाहिलं, तसं अपयशही पाहिलं. मात्र, तो खचून गेला नाही. यामागं त्याचे घरचे संस्कार कारणीभूत आहेत. हरिवंशराय बच्चन यांच्यासारख्या मोठ्या कवीचा हा मुलगा अत्यंत चांगले संस्कार बाळगून आहे. त्यामुळंच तो एवढं उत्तुंग, नजर लागेल असं यश मिळवूनही जमिनीवर पाय ठेवून चालू शकला. त्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला या गुणाचा प्रचंड फायदा झाला. 'कौन बनेगा करोडपती' या मालिकेतलं ९० टक्के यश हे केवळ त्यात बच्चन आहे, यातच आहे. दुसऱ्या एका नटाला हे काम देण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा ते बच्चनकडं सोपविण्यात आलं, यातच बच्चन हा बच्चन आहे हे स्पष्ट होतं. शिवाय हा हाडाचा कलाकार आहे. त्यामुळंच वयाची सत्तरी गाठतानाही तो 'पा'सारखी सुंदर भूमिका करू शकतो. अजूनही मुलीच्या वयाएवढ्या नायिकांसोबत पाय थिरकवू शकतो आणि अनेकींना आपल्या अदांनी घायाळही करू शकतो. अर्थात आता बच्चन या सर्वाच्या खूपच पुढं निघून गेला आहे. एका अर्थानं तो आता या हिंदी सिनेमाची जिवंत, चालती-बोलता दंतकथा झालाय. आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. कारण अगदी अभिमानानं आपण सांगू शकतो, की येस्स, आम्ही बच्चन पाह्यलाय...

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०१२)

---

12 comments:

  1. Amitabh Bachchan yanna shabdat mandayach mhanaje khup awaghad kam aahe...tu te agadi sahaj pane kelay aani te hi khup takadine..

    ReplyDelete
  2. वा श्री... किती मनापासून लिहिलंस आणि बच्चनचा कालपट उभा करताना तू आजूबाजूला घडणारी जी सामाजिक, राजकीय घुसळण आहे ती मांडलीस त्यामुळं अधिक समग्रतेनं हा माणूस तू मांडू शकलास. बच्चन अलिकडे त्याच्या या नव्या इनिंगमध्ये मला जास्त आवडू लागला... पण हे लोणचं मुरलं कसं हे जाणून घेण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे सिनेमे पाहायलाच हवेत. थँक्यू!!

    ReplyDelete
  3. काही प्रतिक्रिया देण्यापलिकडे एवढं मस्त लिहिल आहे ... सगळ्यांत जास्त भावल ते अफलातून निरीक्षण आणि प्रत्यक्ष जिवनाची आणि पडदयावरील जीवनाची एकमेकांशी घातलेली उत्तम सांगड...

    ReplyDelete
  4. काही प्रतिक्रिया देण्यापलिकडे एवढं मस्त लिहिल आहे ... सगळ्यांत जास्त भावल ते अफलातून निरीक्षण आणि प्रत्यक्ष जिवनाची आणि पडदयावरील जीवनाची एकमेकांशी घातलेली उत्तम सांगड...

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सुप्रिया, तुझ्या प्रतिक्रियेबद्दल...

      Delete
  5. Great Shripad. ...khup mast.....1 to 10 all positions. ...only AMITABH. ...

    ReplyDelete
  6. आज अमिताभच्या ८० व्या वाढदिवशी हा ७ वर्षांपूर्वीचा लेख वाचत असताना त्याच्याबरोबरच, श्रीपादजी, तुमचा लेखही किती ताजा व छान वाटतोय ...प्रत्येक शब्द एकदम चपखल !..खूप खूप अभिनंदन !👏👏👏👌👍🌹🙏

    ReplyDelete
  7. आहाहा..मस्त 💐💐💐💐

    ReplyDelete