2 Oct 2014

हैदर                टू बी...

               -------

विल्यम शेक्सपिअरची हॅम्लेट ही कलाकृती त्याची सर्वश्रेष्ठ शोकान्तिका मानली जाते. विशाल भारद्वाजनं शेक्सपिअरच्या कलाकृती हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आणायला सुरुवात केली ती मॅकबेथपासून. मॅकबेथ मकबूल बनून आला आणि ऑथेल्लो ओंकारा. आता हॅम्लेट हैदर बनून आला आहे आणि या हैदरला अस्सल भारतीय तत्त्वज्ञानाचा डोस पाजून शेक्सपिअरला त्याच्या थडग्यातच शॉक ट्रीटमेंट देण्याची किमया या अवलिया दिग्दर्शकानं यात केली आहे.
हॅम्लेटची कथा सर्वांना माहिती आहेच. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात ती अशी. डेन्मार्कचा राजपुत्र असलेल्या हॅम्लेटच्या पित्याचा, त्याचा काका क्लाउडियस खून करतो आणि हॅम्लेटच्या आईशी - गर्ट्रुडशी - लग्न करतो. हे कळल्यावर हॅम्लेट आपल्या पित्याच्या खुनाचा सूड उगविण्याची प्रतिज्ञा करतो. सतराव्या शतकाच्या प्रारंभी लिहिली गेलेली ही कलाकृती जगभरात गाजली. तिची अनेक भाषांतरं झाली, रूपांतरं झाली. शेक्सपिअरचं हे लांबीनं सर्वांत मोठं नाटक. त्यात अनेक पात्रं, उपकथानकं आहेत. पण त्याची मूळ प्रेरणा अर्थातच त्याच्या सर्व कलाकृतींप्रमाणं मानवी वर्तनाच्या अथांग जलाशयाचा तळ धुंडाळण्याचीच असल्यानं हे नाटक सर्वांनाच अपील होतं. त्यातली टु बी ऑर नॉट टु बी सारखी वाक्यं अजरामर झाली आहेत.
अशा या कलाकृतीला भारतीय मातीत आणताना विशाल भारद्वाजनं नेपथ्यरचना केलीय ती भूलोकीच्या नंदनवनाची - काश्मीरची. अर्थात हे काश्मीर सुंदर उपवनांचं किंवा शुभ्र पर्वतराजींचं नाही. स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रयत्नात भटकलेल्या आणि त्यातून दहशतवादाची साथ धरलेल्या एका धगधगत्या समुदायाशी इथं आपली भेट होते. इथं स्थानिक माणसं आणि लष्कर यांच्यात सदैव संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हैदरचे वडीलही एके दिवशी बेपत्ता होतात. अलीगडहून श्रीनगरला परतलेल्या हैदरला त्याची आई आणि काका हास्यविनोदात रमलेले दिसतात आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. पोलिस प्रमुख असलेल्या परवेझ लोन यांची मुलगी अर्शिया (मूळची ओफेलिया) पत्रकार आहे आणि तिचं हैदरवर प्रेम आहे. काही घटना अशा घडतात आणि त्यातून हैदरला आपल्या पित्याचा खून आपल्या काकानंच घडवून आणला आहे, हे कळतं. रुहदार (इरफान) नावाचं एक गूढ पात्र मध्यंतराच्या पूर्वी प्रकटतं आणि गोष्टीला एक ट्विस्ट मिळतो.
उत्तरार्धात हैदरचा पूर्ण कायापालट होतो आणि पित्याच्या खुनाच्या बदल्यानं पिसाटलेला एक तरुण या रूपात तो समोर येतो. पुढं हॅम्लेटमधली सर्व वळणं घेत कथा पुढं जाते. मात्र, शेवट विशालनं बदलला आहे आणि तो काहीसा धक्कादायक आहे. त्याचा संबंध थेट भारतीय तत्त्वज्ञानाशी लावता येईल. हा शेवट योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. मला व्यक्तिशः तरी हा शेवट या सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेणारा वाटतो.
शेक्सपिअरच्या सर्व कलाकृतींत जाणवणारा मानवी नातेसंबंधांचे पीळ उलगडणारा प्रवास मनोज्ञ असतो. विशाल भारद्वाजनं आपल्या रूपांतरामध्येही यावरच भर दिल्यामुळं त्याचे सिनेमे वेगळे ठरतात. पित्याच्या मृत्यूचं कारण कळल्यानंतर, आपल्या जवळच्या जीवलगांचं खरं रूप समजल्यानंतर हैदरची होणारी तडफड त्यानं परिणामकारकरीत्या दाखवली आहे. उत्तरार्धात श्रीनगरच्या लाल चौकात पाच-दहा हजारांच्या जमावासमोर शाहीदनं केलेलं स्वगतवजा भाषण त्या दृष्टीनं बघण्यासारखं आहे. त्याच्या या अशक्य अदाकारीला टाळ्या न मिळत्या तरच नवल. हैदर आणि त्याच्या आईच्या नात्यातील लैंगिक संदर्भांचं केवळ सूचन (दोघांच्या भेटीचं शेवटचं दृश्य) इथं आहे. मकबूल आणि ओंकारा या कलाकृतींमधला हाच धागा याही सिनेमात विशालनं हलकेच पुढं नेला आहे. भारतीय प्रेक्षकाचं मानस ओळखून कदाचित त्यातला तपशील टाळण्यात आला आहे.
काश्मीरचं वेगळं रूप दर्शवणारी पंकज कुमार यांची सिनेमॅटोग्राफी, विशाल भारद्वाज आणि गुलजार या जोडीचं संगीत आणि गीतं, सर्वच प्रमुख कलाकारांचा जबरदस्त अभिनय या हैदरच्या जमेच्या बाजू आहेत. श्रीनगरच्या मार्तंड सूर्य मंदिराच्या भग्नावशेषांवर साकारलेलं हैदरचं बिस्मिल हे गाणं आणि त्यावरचं शाहीदचं अफलातून नृत्य टाळ्या मिळवतं. सिनेमाची वेषभूषाही प्रभावी आहे.
शाहीद कपूरनं साकारलेला हैदर त्याच्यातली स्तिमित करणारी अभिनयक्षमता दाखवून देतो. हा हैदर शाहीद अक्षरशः जगला आहे. (हे वाक्य अनेकदा क्लिशे म्हणून येतं, पण इथं ते खरोखर त्या भावनेनं घ्यावं.) त्याच्या कारकिर्दीतला हा माइलस्टोन ठरावा. तबू, इरफान आणि केके मेनन हे सर्वच जण भारी आहेत. पण या वेळी खुर्रम साकारणाऱ्या केकेनं मजा आणली. प्रिन्सस अशी हाक मारणारा, काश्मिरी बोली बोलणारा, भाभीजानवर प्रेम करणारा, अत्रंगी पण पाताळयंत्री खुर्रम त्यानं सुंदर उभा केला आहे.
  श्रद्धा कपूरनंही अर्शीची भूमिका जीव ओतून केलीय. ती दिसतेही छान. तिच्याकडून अपेक्षा वाढवणाराच हा परफॉर्मन्स आहे. तबूची गजालाही नेहमीप्रमाणंच उत्तम.
सिनेमात काही तपशिलाच्या चुकाही आहेत. शिवाय भारतीय लष्कराचं काहीसं नकारात्मक चित्रण यातून उभं राहतं, असंही मला वाटलं. शेवटी त्यानं काही वाक्यं टाकून आपल्या लष्कराचं कौतुक केलं आहे. पण एकूणच चित्रिकरण फुटिरतावादी काश्मिरींच्या बाजूनं आणि भारतीय लष्कराच्या काहीसं विरोधात झालंय हे नक्की. सिनेमा हैदरच्या दृष्टिकोनातून आहे हे मान्य केलं, तरी काही काश्मिरी युवकांना भारतीय लष्करी अधिकारी टॉर्चर करताहेत, अशी दृश्यं आपल्या सिनेमांतून का दाखवावीत? शिवाय हा सिनेमा लांबलचक आहे. शेवटची पंधरा मिनिटं नक्कीच कमी करता आली असती. किमान दोन गाणी जादा वाटली. एंड टायटलला येणारं रेखा भारद्वाजनं गायलेलं आज के नाम हे फैज अहमद फैज यांचं गीत जमलेलं आहे.
तेव्हा काहीसा फसलेला, पण बराचसा प्रभावी आणि लक्षात राहणारा हा वेगळा सिनेमा नक्कीच एकदा तरी पाहण्याजोगा.
---
निर्माते : विशाल भारद्वाज, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : विशाल भारद्वाज
संगीत : विशाल भारद्वाज
गीते : गुलजार, फैज अहमद फैज
सिनेमॅटोग्राफी : पंकज कुमार
प्रमुख भूमिका : शाहीद कपूर, तबू, के. के. मेनन, श्रद्धा कपूर, इरफान
कालावधी : दोन तास ४१ मिनिटे
दर्जा : *** /
----------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment