14 Oct 2014

हेमलकसा, गडचिरोली डायरी (हिवाळा २००२)नागपूर, गडचिरोली, हेमलकसा, ताडोबा ट्रिप (हिवाळा, २००२)
-----------------------------------------------------------------------------------------

मी आणि माझा मित्र संतोष देशपांडे आम्ही दोघं २००२ च्या हिवाळ्यात, आम्हाला ‘सकाळ’चा पहिला ‘एलटीए’ मिळाला होता - तो घेऊन, विदर्भाच्या सहलीवर जायचं ठरवलं. नागपूर, रामटेक, डॉ. अभय बंग यांचं शोधग्राम, डॉ. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा) आणि ताडोबा इथं जायचं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणं आठवड्याची ही छोटेखानी ट्रिप केलीही. तेव्हा मी २७ वर्षांचा होतो, बॅचलर होतो. ‘सकाळ’मध्ये जॉइन होऊन मला पाच वर्षं झाली होती. माझ्या दोन्ही बहिणींची लग्नं झाली होती आणि मी मुली पाहत होतो. एकूणच २००२ चा हिवाळा माझ्यासाठी फारच धांदलीचा ठरला. तेव्हा मी रोज न चुकता डायरी लिहीत असे. ती डायरी माझ्याजवळ आहे. या ट्रिपच्या वेळी लिहिलेली डायरी ब्लॉगवर टाकली आहे. बारा वर्षांपूर्वीच्या मला, आता त्या डायरीतून पाहताना वाटतं, की हा तरुण मुलगा फारच उत्साही होता. एकाच वेळी काय काय करीत होता... किती प्रवास करत होता, किती फिरत होता... (शिवाय मोबाइल नव्हता त्याच्याकडं तेव्हा)... मजा वाटली ते वाचून... त्यामुळंच ती डायरी जशी लिहिली, तश्शीच देत आहे ब्लॉगवर. तेव्हा कोडॅक क्रोमातून काढलेल्या फोटोचा अल्बम माझ्याजवळ आहे. त्या फोटोंचे मोबाइलमधून काढलेले फोटो सोबत आहेत. त्यामुळं त्यांची क्वालिटी जरा ढपली आहे. पण डायरीच्या एका पानाच्या मर्यादेत बसवलेला एकेक दिवस आणि या आठवणी तुम्हालाही आवडतील असं वाटतं...

------------

डायरीची पाने (जशीच्या तशी...)
----------------------------------------------------

शनिवार, १४ डिसेंबर २००२
--------------------------
सकाळी अकरा वाजता उठलो. पेपर वाचत होतो, एवढ्यात संतोष आला. मग मी आवरलं. आंघोळ केली. मग मी व संतोष रेल्वे स्टेशनला गेलो. तिथं 'आझाद हिंद'ची येण्याची व जाण्याची तिकिटं रद्द केली. वीस रुपये कापून सगळे पैसे परत मिळाले. मग तिथून शिवाजीनगर बसस्थानकावर गेलो. तिथून ‘आवडेल तिथं प्रवास’ योजनेची चौकशी केली. पण ती सध्या सुरू नसल्याचं कळलं. नागपूरची वातानुकूलित एसटीही बंद झाल्याचं कळलं. रात्री दहाच्या आसपास कोणतीही गाडी नव्हती. मग आम्ही तिथून आयसीआयसीआय बँकेत गेलो. तिथं मी नीलेश हिर्लेकरला डीएएसचा फॉर्म दिला. सकाळनं आयसीआयसीआयला आधीच एक पत्र दिल्याचं सांगितलं. मग तिथून ‘देवी हाइट्सला जाऊन ‘प्रसन्न ट्रॅव्हल्स’मध्ये नागपूरच्या गाडीची चौकशी केली. पण तिथंही रात्री सा़डेआठला नॉन-एसी गाडी होती. मनमंदिर’मध्ये जाऊन साडेपाचच्या सैनी ट्रॅव्हल्सच्या नागपूर गाडीचं बुकिंग केलं. आता धावपळ करीत सगळी कामं करावी लागणार होती. मग समोर अमृततुल्य’मध्ये जाऊन चहा प्यायलो. नंतर संतोषनं मला रूमवर सोडलं. तिथून मी माझी गाडी घेऊन ऑफिसला गेलो. लेलेंकडं गेलो; मात्र त्यांनी पीपीएफचे पैसे भरले नसल्याचं सांगितलं. मग मी बेंडाळेशी नगरला बोललो. त्याच्याकडून अतुल धामणकरचा चंद्रपूरचा फोन नंबर घेतला. ‘ताडोबाच्या रिझर्व्हेशनबाबत त्याच्याशी बोलायचं होतं. बेंडाळेही त्याच्याशी बोलणार होता. मग पत्रकार संघात शेणईंना फोन केला. मला राजधानीतून’ पुस्तक घ्यायचं होतं. मग पत्रकार संघात गेलो. शेणईंकडून पुस्तक घेतलं. येताना आत्याकडं गेलो. पण त्यांच्या घराला कुलूप होतं. मग रूमवर गेलो. गाडी लावली. बाहेर जाऊन कॅमेऱ्याचा रोल व सेल आणले. येताना नगरला आईला फोन केला. तिनं आत्याकडं राक्षेंची पत्रिका व फोटो आल्याचं सांगितलं. मग मी आईला, जतकरांचा फोन आला तर लगेच २२ तारखेला बोलवायला नको, असं सांगितलं. नंतर रूमवर जाऊन आवरलं. बॅग भरली. दाढी केली. साडेचारला संतोष आला. मग रिक्षा करून एफसी रोडला गेलो. तिथं साडेपाचला बस आली. आम्ही काही खाल्लं नव्हतं. तिथं सामोसे खाल्ले, बिस्किटं घेतली. सहाला बस निघाली. नगरच्या पुढं मातोश्री हॉटेलमध्ये जेवायला थांबली. तिथं आम्ही जेवलो. मग गाडी पुढं निघाली. मला बऱ्यापैकी झोप आली. रात्री दोन वाजता चिखली आलं...
---

रविवार, १५ डिसेंबर २००२
----------------------------

...चिखलीत मी चहाला खाली उतरलो. नंतर सलग अशी झोप आलीच नाही. पहाटे चारला अकोला आलं. अमरावतीच्या अलीकडं ‘ट्रॅफिक जॅम’ होता. मग आमच्या ड्रायव्हरनं बाजूला गाडी काढून अमरावतीला आणली. पुढं आठ वाजता एका ठिकाणी चहाला थांबली. नऊ वाजता आम्ही नागपुरात पोचलो. बसस्टँडजवळ आशीर्वाद टॉकीजपाशी आम्ही उतरलो. तिथून मग सायकलरिक्षानं एका लॉजवर आलो. त्या रिक्षावाल्यानंच सी. . रोडवरचा हा लॉज दाखवला होता. पण तो महागडा होता. मग जरा पलीकडं सिद्धार्थ हॉटेल होतं. हे बरं वाटलं. रेटपण २५० रुपये होता. मग एक रूम घेतली. आधी फ्रेश झालो. आंघोळी केल्या. टीव्ही लावला. गुजरातमध्ये भाजप दणदणीत विजयाकडं वाटचाल करीत होता. नंतर आम्ही आवरून संतोषच्या मामांकडं गेलो. खाली शेअर रिक्षानं बर्डी’ला (सीताबर्डी) गेलो. नागपूर शहर खरोखर चकाचक झालं आहे. फ्लायओव्हरही भरपूर झाले आहेत. (ही गडकरींची कृपा!) ‘चकाचक नागपूरचं श्रेय टी. चंद्रशेखरना! असो. बर्डीतून पुन्हा ‘सवारी रिक्षा’नं सोमलवाड्यात गेलो. तिथून गेट नं. (रेल्वे) १२० पासून बरंच आत अरुंधतीचं (संतोषची मामेबहीण) घर होतं. त्यांच्या घरी पोचलो. ते मामा निम्म्या रस्त्यात आमचीच वाट पाहत होते. मग जरा गप्पा वगैरे झाल्यानंतर त्यांच्याकडं जेवलो. मामीही बऱ्याच गप्पीष्ट होत्या. अरूशी आधी ओळख होतीच. मामींनी झकास जेवण बनवलं होतं. श्रीखंडही होतं. नंतर आम्ही रामटेकला जायचा आमचा बेत सांगितला. अरूही यायला तयार झाली. मग तिचं जेवण झाल्यावर आम्ही निघालो. ‘सवारी’नं बर्डीला, तिथून सिटीबसनं कामठीला, तिथून सिक्स सीटरनं मनसरला व तिथून पुन्हा सवारी’नं रामटेकला पोचलो. तेव्हा साडेपाच वाजले होते. रामटेक सुरेखच होतं. अंबाल्याचं तळंही देखणं. वरून दिसणारं रामटेक गावाचं दृश्य म्हणजे लँडस्केपचा अप्रतिम नमुनाच. आम्हाला फार वेळ थांबता आलं नाही. रिक्षानं स्टँडवर आलो. सात वाजता बस मिळाली. बर्डीला उतरल्यावर मी आधी डॉ. बंगांना फोन केला. त्यांनी उद्या गडचिरोलीत कसं यायचं, हे सांगितलं. मग नगरला घरी व जालन्याला डॉ. पौर्णिमाकडं फोन केला. तिनं नागपूरमधल्या तिच्या नणंदेचा फोन नं. व पत्ता दिला. मग आम्ही अरूच्या घरी गेलो. रात्रीचं जेवलो. सव्वादहाला तिथून निघालो. अकराला हॉटेलवर पोचलो.
----
सोमवार, १६ डिसेंबर २००२
------------------------------
सकाळी सव्वासातला जाग आली. मग आवरलं. आंघोळ केली. आठ वाजता लॉजमधून चेक-आउटझालो. मग रिक्षानं नागपूर बसस्टँडवर गेलो. चहा प्यायलो. ‘नवराष्ट्र’ हे दैनिक घेतलं. नंतर आम्हाला लगेच नागपूर-गडचिरोली बस मिळाली. उमरेड, पवनी, वडसा (देसाईगंज), लाखांदूर मार्गे ती गडचिरोलीला १२.४० ला पोचली. काल डॉ. बंग यांच्याशी बोलणं झाल्याप्रमाणं आम्ही इंदिरा चौकातच उतरलो. तिथं सर्चचं ऑफिस शोधलं. आनंदराव हे कार्यकर्ते तिथं भेटले. मग आम्ही नंतर समोरच्या हॉटेलमधून ढोकळा खाऊन आलो. मग आनंदरावांनी आम्हाला सर्चची सुमो दिली. तीत बसून आम्ही दी़डच्या सुमारास शोधग्राम’मध्ये आलो. प्रवेशद्वारापासूनच शोधग्राम’चं वेगळेपण जाणवत होतं. चेतना नावाच्या अटेंडंट-कार्यकर्तीनं आम्हा वेळूबन’ या गेस्ट हाऊसमध्ये नेलं. तिथं आम्ही दोघांत एक रूम घेतली. मग समोर मेसमध्ये जेवलो. तिथंच थोड्या वेळानं डॉ. बंग आले. मग मी पुढं होऊन त्यांना माझी ओळख सांगितली. त्यांनी संध्याकाळी निवांत भेटू, असं सांगितलं. मग आम्ही रूमवर येऊन जरा पडलो. तुषार खोरगडे हे प्रकल्प उपसंचालक आम्हाला 'शोधग्राम' दाखवणार होते. तीन वाजता ‘मुक्तिपथ या व्यसनमुक्ती केंद्राचा कार्यक्रम होता. तिथं गेलो
तिथं डॉ. राणी बंग होत्या. प्रत्येकानं आपली ओळख करून द्यायची होती. मीही ‘मुक्तांगणच्या बबलूचा एक अनुभव नमूद केला. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. मग तुषार खोरगडे यानं आम्हाला संपूर्ण शोधग्राम’ दाखवलं. संध्याकाळी साडेसहाला आम्ही प्रार्थनेला जमलो. त्यानंतर मी उपस्थित स्टाफला माझी ओळख करून दिली. सकाळबद्दल माहिती सांगितली व इथं येण्याचा उद्देशही सांगितला. रात्री डॉ. रेड्डी यांच्या मुलीचा वाढदिवस होता. म्हणून त्यांच्याकडं सगळे जमले. छोटी पार्टीच झाली. मग तिथं डॉ. बंग भेटले. सकाळी फिरायला येणार का, त्या वेळी बोलू या,’ असं ते म्हणाले. आम्ही चटकनहो म्हणालो. नंतर हेमलकसाला डॉ. प्रकाश आमटेंकडं फोन लावला. पण लागला नाही. पण जगनभाऊंकडं लागला. त्यांनी उद्या नागेपल्लीला यायला सांगितलंय. चंद्रपूरला अतुल धामणकरशीही बोललो. त्यानं ‘ताडोबा’त रिझर्व्हेशन मिळत नसल्याचं सांगितलं. रात्री आम्ही मेसमध्येच जेवलो.
----
मंगळवार, १७ डिसेंबर २००२
--------------------------------
सकाळी साडेपाचला मला जाग आली; पण परत झोपलो. शेवटी साडेसहाला उठलो. संतोषला उठवलं. मग भराभर आवरलं. तोंड धुतलं. मी दाढीपण केली. सातला आवरून तयार झालो. एवढ्यात डॉ. बंग यांच्याकडून निरोप आलाच. ते तयारच होते. आम्ही धावत-पळत गेलो. तिथून आमचा ‘मॉर्निंग वॉक सुरू झाला. डॉक्टरांशी छान गप्पा झाल्या. सुमारे अडीच-तीन किलोमीटर आम्ही चाललो असू. कुराईकुन्ही गावाच्या हद्दीपर्यंत जाऊन आलो
 हा रस्ताही फारच सुरेख होता. दोन्ही बाजूंना गर्द झाडी होती. डॉक्टरांनी आम्हाला तेंदू, साग, येना (क्रोकोडाइल बार्क) असली झाडं दाखवली. ‘वॉकवरून परत आल्यावर आम्ही डॉक्टरांच्या घरी जाऊन डॉ. राणी बंगना भेटलो. संतोषनं त्यांना सदराबाबत विचारलं. त्यांनी प्रांजळपणे मला लिहिण्याची सवय नाही,असं सांगून टाकलं. त्यांचं घर ('चंदन') फार छान होतं. बाहेर वेलींचे मांडव होते. झाडं म्हणजे राणीताईंच्या गोईन (मैत्रीण)! त्या स्वतः फुलांचा हार करीत बसल्या होत्या. शेवटी आम्ही त्यांचा निरोप घेतला
 संजय ड्रायव्हरनं आम्हाला जीपमधून गडचिरोलीच्या स्टँडवर नेऊन पोचवलं. आम्ही आष्टी’ गाडीत बसलो. आष्टीतून दुसऱ्या गाडीला वेळ होता. मग तिथं चहा प्यायलो. लगेच अहेरीची गाडी मिळाली. नागेपल्लीला ‘लोकबिरादरी’च्या स्टॉपवर उतरलो. जगनभाऊंच्या घरी गेलो. ते घरी नव्हते. थोड्या वेळानं आले. तोपर्यंत त्यांच्या पत्नीनं (सौ. मुक्ता मचकले) आम्हाला छान गरम-गरम जेवायलाही वाढलं. मग जगनभाऊ आले
जगनभाऊ १९७२ पासून बाबांकडं काम करतात. त्यांचं जीवन विलक्षणच आहे. (लढाई जगण्याची’साठी मी त्यांची सविस्तर मुलाखत करणारच आहे.) मग त्यांनी पावणेतीनला भामरागडच्या गाडीत बसवलं. अलापल्ली ते भामरागड (हेमलकसा) हा प्रवास मी आयुष्यात विसरणार नाही. गर्द सभोवती रान साजणी (?) अशी स्थिती होती. साडेचारला हेमलकसाला पोचलो. आमच्याबरोबर धीरज फडणीस होता. त्याचे वडील इथं एचएम (मुख्याध्यापक) आहेत. त्यानं डॉ. प्रकाश आमटेंना भेटवलं. मग आम्ही डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या घरी जाऊन (त्यांच्या शेकोटीशी) छान गप्पा मारल्या. हे दाम्पत्य (अपेक्षेपेक्षा) खूपच साधं. मग आम्ही इव्हिनिंग वॉकला भामरागडपर्यंत गेलो. आल्यावर सात वाजताच जेवण. मग पुन्हा गप्पा. साडेआठला झोप!
----
बुधवार, १८ डिसेंबर २००२
-----------------------------


सकाळी साडेपाचला जाग आली ती ‘हेमल’च्या गर्जनांनी. तो सतत डुरकत होता. टोनी आणि सोना तर रात्रीपासूनच आमच्या खोलीत तळ ठोकून होते. सकाळी उठलो तर दोघांनी शेकहँडकरून मला गुड मॉर्निंग’ केलं. मग मी व संतोषनं आवरलं. मागं गरम पाणी मिळत होतं. मग आंघोळी झाल्या. नंतर डॉ. आमटेंच्या घरी गेलो. डॉ. मंदाताईंनी स्वतः उपमा केला होता. चहाही झाला. 


मग डॉक्टरांनी आम्हाला त्यांचं आगळं-वेगळं प्राणिसंग्रहालय (प्राणी आश्रम) दाखवलं. त्यात जायंट स्क्वारल (शेकरू), घोरपड, ‘माऊस डिअर’ हा अत्यंत दुर्मिळ प्राणी, चितळं, नीलगायी, टोनीचा मित्र गणपती’ (माकड), मगरी, लांडगे, अस्वल, कोल्हे, साळिंदर, लांडोर, राजा व रंगू हे बिबटे, ‘हेमल’ (सिंह), आग्यामण्यार हा पिवळे व काळे ठिपके असलेला अत्यंत विषारी साप, अजगर, सर्पगरूड, घोणस असं काय काय होतं. 
 मग त्यांनी आश्रमशाळा दाखवली. हॉस्पिटल दाखवलं. तिथं आलेले माडिया, गोंड आदिवासी दाखवले. त्यांच्यातले वेगवेगळे रोग (टीबी, थायरॉइड, कुपोषण इ.) पाह्यले. (एक मुलगी तर दहा महिन्यांची, पण तिचं डोकं नुकत्याच जन्मलेल्या बाळाएवढं होतं. ‘हार्मोन्स डिफिशिअन्सी’!) मग डॉक्टर त्यांच्या ‘सुमोतून आम्हाला भामरागडला त्रिवेणी संगमावर घेऊन गेले. इथं इंद्रावती, पर्लकोटा व पामूल या तीन नद्यांचा संगम आहे. इंद्रावतीच्या पलीकडं बस्तर जिल्हा आहे. तिथून आल्यावर आम्ही जेवलो व निघालो. साडेअकराची बस मिळाली. या गाडीनं अलापल्लीला आलो. तिथून दुसऱ्या गाडीनं आष्टी, गोडपिंपरी, बल्लारपूर मार्गे चार वाजता चंद्रपूरला आलो. मग अतुल धामणकरला फोन केला. त्यानं घरी कसं यायचं, ते सांगितलं. मग रिक्षानं तिथं गेलो. अतुल हा माझ्याएवढाच वयानं. ग्रीन पीजन सोसायटीही त्याची संघटना. पक्षीमित्र संमेलनाची त्यांची तयारी सुरू होती. त्याचे इतर सहकारीही (गोपाल, मनोज, प्रमोद) भेटले. मग आम्ही उद्या ताडोबाला जाण्यासाठी स्पेशल गाडी करायचं ठरवलं. नंतर गिरनार हॉटेलात जाऊन रूम बुक केली. मग शेजारीच ‘थालीनावाचं यांचंच हॉटेल आहे. तिथं जेवलो. नगर, जामखेडला फोन केले. आता टीव्ही पाहतोय. लवकर झोपायचंय. कारण उद्या सकाळी सहा वाजता ताडोबा’ला जायचंय.


--------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, १९ डिसेंबर २००२
---------------------------

सकाळी साडेपाचला रिसेप्शन’वरून त्या पोरानं फोन करून उठवलं, तेव्हा जाग आली. मग संतोषलाही उठवलं. दोघांनीही आवरलं. साडेसहाला मनोज व गोपाल आलेच. गोपालनं काल सांगितल्याप्रमाणं मारुती व्हॅन’ आणली होती. मग आम्ही ताडोबाला जायला निघालो. आधी जेटपुरा गेटला ‘मामूकडं चहा प्यायलो. बरोबर पावणेसातला आम्ही ताडोबाला रवाना झालो. ताडोबा इथून ४५ किलोमीटर आहे. जाताना चंद्रपूरचं (दुर्गापूर) महाऔष्णिक ऊर्जा केंद्र लागलं. पुढं ताडोबाच्या आधी १६ किलोमीटरवर मोहर्ली इथं पहिला चेक पॉइंट लागला. इथं गाडीचं भाडं, माणशी प्रवेशशुल्क, कॅमेरा शुल्क व गाइडचं भाडं असे १४२ रुपये भरले. अनिल हा गाइड आमच्याबरोबर आला. आम्ही मोहर्ली सोडल्यानंतर लगेच उजव्या बाजूनं (मुख्य रस्ता सोडून) जंगलात घुसलो. सांबर, मोर, चितळं, रानडुकरं बरीच पाहायला मिळाली. मग ताडोबाच्या मुख्य जागी (तलावापाशी) गेलो. हा तलाव अप्रतिमच आहे. मग मागच्या बाजूला नवेगाव गेटपर्यंत जाऊन आलो. (अजून वाघाचा पत्तानव्हता!) मग साडेअकराला परत आलो. संजय मानकर यांचं उपाहारगृह तिथं आहे. तिथं जेवलो. मग पंचधारा’ला चालत गेलो. तिथल्या मचाणावर तासभर शांत बसलो. (हा अनुभव वेगळा व छान होता; पण वाघ?) मग चालत परत एक चक्कर मारून उपाहारगृहापाशी आलो. तिथं चहा घेतला. मग परत गाडीतून तलावाच्या दुसऱ्या बाजूला दोन-तीन चकरा मारल्या. जंगल हे अप्रतिम होतं, घनदाट होतं यात शंकाच नाही; पण वाघ न दिसल्यानं थोडी निराशाही झाली. गोपाल व मनोजनं खूप प्रयत्न केले, पण वाघ नाहीच दिसला! येताना गेटवर या कार्यकर्त्यांनी तयार केलेलं निसर्ग परिचय केंद्रपाह्यलं. आठ वाजता चंद्रपुरात पोचलो. मग अतुलचा निरोप घेऊन आलो. समोर ‘जायका’ नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो. मग मी पुण्याला आत्याकडं फोन केला. उदयचे बाबा नव्हते. वहिनी होत्या. मग मी राक्षेंची पत्रिका जमतीय की नाही, तेवढं पाहून ठेवा, असं सांगितलं. मग रूमवर (हॉटेलवर) आलो. उद्या येथून थेट औरंगाबादला गाडी नाही. त्यामुळं सकाळी नागपूरलाच जावं लागणार आहे.
-----

शुक्रवार, २० डिसेंबर २००२
----------------------------

सकाळी साडेसहाला रिसेप्शन’नं फोन करून उठवलं. मग मी उठलो. संतोषला उठवलं. आवरलं. मी दाढी केली. आंघोळ केली. आठ वाजता हॉटेल सोडलं. रिक्षानं बसस्टँडला गेलो. नागपूरची गाडी बघत होतो; पण तेवढ्यात राजुरा-परळी’ अशी गाडी उभी असलेली दिसली. मग याच गाडीनं परभणीला जायचं आम्ही ठरवलं. कंडक्टरला विचारलं, तर त्यानं रात्री पावणेआठला ही गाडी परभणीत पोचेल, असं सांगितलं. आम्हालाही हे सोयीचं होतं. शिवाय नवा भागही पाहायला मिळेल, हा फायदा होता. मग आमची गाडी वरोरा, वणी, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, शेंबाळपिंपरी, कळमनुरी, हिंगोली, औंढ्या नागनाथ अशा ठिकाणांहून बरोबर पावणेआठला परभणीला पोचली. तिथं उतरल्या उतरल्या आम्ही एसटीची चौकशी केली. पुण्याला जायला आठ वाजता गाडी होती. मग संतोषला सोलापूरला जाण्यासाठी ‘ट्रॅव्हल्स’च्या गाड्या पाहायला लागलो. त्याला बार्शीपर्यंत एक गाडी मिळाली. मग तो त्या गाडीनं गेला. नंतर मी जालन्याला डॉ. पौर्णिमाकडं फोन करून, मी तिकडं येत नसल्याचं कळवलं. पुण्याला उदयच्या बाबांकडं फोन केला. त्यांनी राक्षेंची पत्रिका जमते आहे, (२२ गुण) असं सांगितलं. पण त्यांचा फोन नंबर त्यांच्याकडं नव्हता. नंतर मी आठची गाडी पाहिली; पण त्यात भरपूर गर्दी होती. मग औरंगाबाद मार्गे जाण्याचं ठरवलं. औरंगाबादला साडेदहाला गाडी असल्याचं कळलं. नंतर मी औरंगाबाद ऑफिसला फोन करून परभणी ऑफिसचा फोन नंबर घेतला. तिथं फोन केला, तर धारासूरकर घरी असल्याचं कळलं. मग घरी फोन केला. ते घरीच होते. ते लगेच स्कूटरवर मला न्यायला स्टँडवर आले. मला मुक्काम करण्याचाच आग्रह ते करीत होते. पण मी नकोम्हटलं. मग त्यांनी ‘विसावा’ हॉटेलमध्ये नेलं. तिथं आम्ही जेवलो. मग त्यांनी मला स्टँडवर आणून सोडलं. नांदेड-औरंगाबाद’ गाडी लागलीच होती. ती बरोबर साडेदहाला निघाली. जिंतूर, जालना मार्गे पहाटे पावणेतीन वाजता औरंगाबादच्या स्टँडवर येऊन पोचलो.
----
शनिवार, २१ डिसेंबर २००२
-----------------------------
...जालन्यालाच मीअमरावती-पुणेगाडी पाहिली होती. तीच औरंगाबादला मिळणार होती. औरंगाबादला उतरल्यावर आधी चहा प्यायलो. मग अमरावती-पुणेगाडी आलीच. ही गाडी तीन वाजता निघाली. ती पहाटे ५.१० वाजता तारकपूर स्टँडवर पोचली. मग मी रिक्षा करून घरी आलो. आईनं चहा केला. मग जरा वेळ टीव्हीवर मॅच पाहून झोपलो....

-------

No comments:

Post a Comment